डिजिटल युगात लोकशाहीचे भवितव्य (भाग 1)

photo 1


डेटा इज प्युअर गोल्ड

आताचा कालखंड डिजिटल क्रांतीचा परमोच्च काळ म्हणून इतिहास नोंद घेईल असे अनेक तज्ञांना वाटत आहे. ही क्रांती जगाच्या आतापर्यंतच्या आर्थिक, सामाजिक व्यवहारांना कलाटणी देणारी ठरत आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या अत्याधुनिक साधन-सुविधा व त्यात होत असलेल्या शोधामुळे संग्रहित होत असलेला डेटा अलिकडच्या काळात दर वर्षी दुप्पट वेगाने वाढत आहेत. 2016 साली संग्रहित झालेला डेटा मानवी इतिहासातील 2015पर्यंतच्या डेटा एवढा असेल. गूगल सर्च व फेसबुकवरील डेटा दर मिनिटाला लाखोंनी वाढत असावा. हा डेटा मुख्यत्वेकरून आपण ज्या प्रकारे विचार करतो व/वा आपल्याला काय वाटते या माहितीच्या स्वरूपात असते. त्याचप्रमाणे आपल्या आवडी-निवडी, आपण कुठले कपडे घालतो, आपल्याला कुठले खाद्य पदार्थ आवडतात, आपले छंद काय आहेत, यासंबंधीचा डेटाही संग्रहित होत आहे. पुढील 10 वर्षात 15 हजार कोटी सेन्सॉर्स नेटवर्कशी जोडलेले असतील. म्हणजे जगाच्या लोकसंख्येपेक्षा 20 ते 25 पटीने जास्त! त्यामुळे दर बारा तासाला डेटा दुप्पट होत राहील. एका उद्योजकाच्या मते डेटा इज प्युर गोल्ड. व या सोन्याच्या खाणीमागे अमेरिकेतील गोल्डरश प्रमाणे अनेक लहान मोठ्या कंपन्या व कार्पोरेट्स धावत आहेत. या उदंड डेटाचा मोठ्या प्रमाणात पैशाच्या स्वरूपात बदलण्याच्या मागे लागलेले आहेत.

अल्गॉरिदम
यानंतर सगळ्या गोष्टी चलाख, स्मार्ट व शहाणे होण्याच्या मार्गावर आहेत. स्मार्ट फोन्स, स्मार्ट घरं, स्मार्ट कारखाने, स्मार्ट सिटीज इ.इ. याचाच पुढचा टप्पा म्हणजे स्मार्ट देश! कदाचित स्मार्ट पृथ्वीही असू शकेल. हा जो तथाकथित स्मार्टनेस, कृत्रिम बुद्धिमत्तेतील (Artificial Intelligence – AI) प्रगत संशोधनामुळे साध्य होत आहे, असे अनेकांचे मत आहे. ही बुद्धिमत्ता विशेष करून आटोमेशनशी संबंधित डेटांच्या विश्लेषणात भरीव कामगिरी करत आहे. आताचे कृत्रिम बुद्धिमत्तेचे प्रोग्रॅम्स एका वाक्यानंतर पुढील वाक्य या पद्धतीने लिहिले जात नसून त्या स्वतःच पूर्वानुभवावरून शिकत आहेत व शिकता शिकता विकसित होत आहेत. सर्वांचा लाडका फेसबुक या समाज माध्यमाचा अप्लिकेशन कोड आहे 6 कोटी ओळीचे, विंडोज 10 प्रणालीचं कोड 5 कोटी ओळीचे आणि गूगलच्या सगळ्या सुविधा मिळून एकूण 200 कोटी ओळीचे प्रोग्रॅम्स आहेत. यावरून AI कसे काय शिकत असेल याची कल्पना न केलेले बरे. गूगलच्या डीप मांइंड या रोबोचे गेम्ससंबंधीचे अल्गॉरिदम स्वतःचे स्वतःच शिकून ‘अटारी’ हा गेम 49 वेळा जिंकू शकला. कुठल्याही स्पर्धेत अटीतटीची वेळ आल्यावर वा समोरचा स्पर्धक जिंकतो की काय असे वाटल्यावर स्पर्धक गेमवर लक्ष केंद्रित करून ज्याप्रकारे आक्रमकरित्या खेळ खेळू लागतो तशाच प्रकारचे वर्तन डीप माइंड दाखवत आहे. अशा प्रकारच्या गोष्टी व कृत्रिम बुद्धिमत्तेचा वाढत असलेला आवाका आणि यात होत असलेली गुंतवणूक बघता यानंतरच्या अर्थव्यवस्थेसकट सर्व क्षेत्रावर ते परिणाम करू शकतात, याबद्दल मात्र तज्ञांचे एकमत आहे.

पुढील 10-15 वर्षात अशा प्रकारच्या AIच्या अल्गॉरिदममुळे जेथे जेथे मानवी हस्तक्षेपाची वा निर्णयप्रक्रियेची गरज भासत होती ते सर्व उद्योगावकाश कमी कमी होत जाणार आहेत. जगातील सर्वश्रेष्ठ असे समजल्या जाणाऱ्या 500 कंपन्यापैकी 40 टक्के कंपन्या गाशा गुंडाळतील असा अंदाज वर्तविला जात आहे. वेळीच काळजी न घेतल्यास 2020 ते 2060च्या दरम्यान सुपर कॉम्पुटर्स मानवी क्षमतेला ओलांडून पुढे जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. ही धोक्याची घंटा समजून पुढील नियोजन करणे अत्यंत गरजेचे ठरत आहे. तंत्रज्ञानाचे भविष्यवेत्ते, टेस्ला मोटर्सचे इलॉन मस्क, मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स व अ‍ॅपल कॉम्प्युटर्सचे स्टीव्ह वोडिन्याक यांनी सुपरइंटेलिजेंट संगणकापासून मानववंशाला मोठा धोका असून हा धोका अण्वस्त्रांपेक्षा जास्त आहे असे ठामपणाने सांगत आहेत.

खरोखरच धोकादायक आहे का?
एक मात्र खरे की ज्याप्रकारे अर्थव्यवस्था व सामाजिक व्यवहार इथपर्यंत चालत होत्या त्यात मूलभूत फरक पडणार हे मात्र नक्की. दुसऱ्या जागतिक महासुद्धानंतरच्या कालखंडापासून हळू हळू होत असलेला बदल आपण आता अनुभवत आहोत. उत्पादनांच्या आटोमेशनचे स्वप्न पूर्ण होत आहेत. खरेदी विक्रीच्या व्यवहारासाठी कुणाच्याही उंबरे झिजवण्याची गरज राहणार नाही. एका क्षणार्धात मोठमोठ्या रकमा घरबैठ्या हजारो किलोमीटर्स दूर असलेल्या बँकेच्या शाखेत बिनधोकपणे पाठवता येणे शक्य झाले आहे. दळणवळणाच्या साधन सुविधामध्ये फार मोठ्या प्रमाणात सुधारणा झाल्या आहेत. संवादाचा अतिरेक होत आहे इतपत सुविधा उपलब्ध झालेले आहेत. याचाच पुढचा टप्पा म्हणून स्वयंचलित कार्ससाठी समाज अधीर झाला आहे. अशा प्रकारे उत्पादनांचे आटोमेशन व स्वयंचलित कार्सनंतर संपूर्ण समाजाचेच आटोमेशनचे स्वप्न बघितले जात आहेत. हा समाज आता एका क्रॉस रोडवर भांबावलेल्या अवस्थेत उभा आहे. समोर फार मोठी संधी दिसत आहे. त्याचप्रमाणे धोकेही दिसत आहेत. आपण चुकीचे निर्णय घेतल्यास इतिहास आपल्याला क्षमा करणार नाही याचीही जाणीव त्याच्या मनात आहे.

सायबरनेटिक्स
1940च्या सुमारास नॉर्बर्ट वीनर (1894-1964) यानी control systems, electrical network theory, mechanical engineering, logic modeling, evolutionary biology, neuroscience, anthropology, and psychology या अभ्यासक्षेत्रांचे एकमेकाशी संबंध असून मनुष्यप्राणी व मशीन यांच्या संदर्भात काही निष्कर्ष काढले. या अभ्यासक्षेत्राला त्यानी सायबरनेटिक्स हे नाव दिले. त्याच्या मते व्यवस्थेच्या वर्तनाचे नियंत्रण योग्य प्रकारचे फीडबॅक वापरून करता येणे शक्य आहे. हाच धागा पकडून त्या काळी काही संशोधकांनी अर्थ व समाजव्यवस्था यांचाही नियंत्रण करणे शक्य आहे का याबद्दल संशोधन करू लागले. परंतु त्या काळचे तंत्रज्ञान योग्य फीडबॅक देण्यास असमर्थ ठरल्यामुळे त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले. परंतु 21व्या शतकात कंट्रोल सिस्टिम्स, लॉजिक मॉडेलिंग, सेन्सॉर्स तंत्रज्ञान, फीडबॅक यंत्रणा इत्यादींच्या प्रगतीत फार मोठा टप्पा गाठल्यामुळे नॉर्बर्ट वीनरचे स्वप्न साकार होत आहे.

सिंगापूर येथील समाजव्यवस्था डेटा नियंत्रित आहे असे म्हणण्याइतपत सायबरनेटिक्सचा वारेमाप वापर केला जात आहे. नागरिकांना दहशतवादापासून वाचवण्याच्या (एकमेव!) उद्दिष्टाने लिहिलेली संगणक प्रणाली आर्थिक व्यवहार, बाजार व्यवस्था, स्थलांतरितांचे प्रश्न, शिक्षण, आरोग्य इत्यादी सामाजिक व्यवहारांचे नियंत्रण करत आहे. व त्याबद्दल कुणाचीच तक्रार नाही, उलट त्याचे कौतुक केले जात आहे.

चीनसुद्धा त्याच वाटेवर जात आहे. गूगलसारखे सर्च इंजिन असणारे चायनीज बैदू (Baidu) मिलिटरी प्रशिक्षणाचा भाग असलेल्या मेंदूप्रकल्पात सहभागी झाला होता. सर्च इंजिनमधून मिळालेल्या डेटावरून स्वयं शिकणारे अल्गॉरिदम विकसित करणे अपेक्षित होते. त्याच बरोबर याचा वापर समूहाची मानसिकता समजून घेऊन सामाजिक नियंत्रण करणे शक्य होईल का याची चाचपणी करणे हाही उद्दिष्ट त्या प्रकल्पाचा भाग होता. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर त्या अल्गॉरिदमच्या चाचणीबद्दलचा अहवाल प्रसिद्ध झाला. त्या अहवालानुसार सहभागी झालेल्या प्रत्येक चायनीज नागरिकाला सिटिझन स्कोर नावाचे मानांकन दिले होते. त्या स्कोरच्या आधारे एखाद्याला कर्ज देणे, नोकरी देणे, किंवा परदेशी जाण्यासाठी व्हिसा देणे ठरविले जात होते. हा स्कोर प्रामुख्याने नागरिकांच्या इंटरनेट सर्फिंगचा इतिहास व त्याचे सामाजिक व्यवहार यावरून ठरवले जात होते. क्रेसिल, सिबिलप्रमाणेच येथेही एखाद्याला कर्ज द्यायचे की नाही यासाठी कर्जफेडीची पत पाहिली जात होती. यावरून एखादी चाणाक्ष यंत्रणा आपल्या सर्व व्यवहारावर अत्यंत बारकाईने नजर ठेवू शकते हे स्पष्ट होत आहे.

ब्रिटिश गुप्तचर संस्थेने त्यांच्या ‘कर्मा पोलीस’ या प्रकल्पाची माहिती जाहीर केली. त्यात वापरकर्त्यांच्या अपरोक्ष वा त्यांच्या अनुमतीविना आयपी अड्रेसवरून इंटरनेटच्या वापराची इत्थंभूत माहिती घेतली जात होती. डिलीट केलेले सर्व फाइल्ससुद्धा त्यात होत्या. कुठल्याही मानवी हस्तक्षेपाविना वा मदतीविना व काही टॅग्स वापरून त्या व्यक्तीचे प्रोफाइल संगणकातील अल्गॉरिदम विनासायास तयार करून ठेवत होती. व संबंधित यंत्रणेला काही महत्वाचे असल्यास सूचना देत होती. त्यामुळे आपल्या पाठीमागे कुणीतरी उभे राहून आपल्यावर पाळत ठेऊ शकते याबद्दल आपण शंकाच घेऊ शकत नाही, अशी स्थिती ‘कर्मा’ पोलीसच्या प्रकल्पाने दाखवून दिले आहे. कदाचित जॉर्ज ऑर्वेलचा ‘बिग ब्रदर’ अस्तित्वात आला ही असेल.

क्रमशः

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet