सिंधू सरस्वती संस्कृती (भाग २)
सिंधू सरस्वती संस्कृती – भाग २
गुजरातमधील सिंधू सरस्वती संस्कृतीची स्थळे
सुधीर भिडे
(मागील भाग)
ढोलाविरा
प्रथम आपण ढोलाविरा कुठे आहे ते पाहू. मोहेंजोदारोपासून ढोलाविरा सुमारे आठशे किलोमीटर दूर कच्छच्या रणामध्ये आहे. तेथे एक मोठे शहर असू शकते यावर विश्वासच ठेवता येत नाही. अर्थातच सहा हजार वर्षापूर्वी वातावरण आणि भौगोलिक स्थिती निराळी होती. पश्चिम भारतात पावसाचे प्रमाण जास्त होते. समुद्र पातळी पुष्कळ जास्त होती. सरस्वती नदीचे मुख जवळच होते. त्यामुळे हा प्रदेश सुपीक होता. येथील सापडलेल्या वस्तूंच्या कार्बन डेटिंगवरून येथील वस्ती हडप्पाच्या पेक्षा जुनी असावी.
ढोलाविराची नगररचना आजच्या टाउन प्लानर्सची बरोबरी करेल अशी होती. दोन नद्यांमध्ये एका टेकडीच्या उतारावर हे शहर वसले होते. सर्वात उंच जागी शहराचा मुखिया राहत असावा. येथील निवासस्थानाभोवती एक कोट होता. तेथील प्रवेश द्वाराच्या बाहेर त्या वेळच्या भाषेत काही मजकूर लिहिला आहे.
त्याच्या खालच्या बाजूला एक मोकळी जागा होती . त्यात सार्वजनिक कार्यक्रम होत असावेत. तिथे एक चक्राकार बांधकाम मिळाले. चित्रात मागच्या बाजूला आपण एक शिश्न (लिंग) पाहतो. हे लोक लिंगदेवाची पूजा करीत. ऋग्वेदात लिंगदेव – शंकराला स्थान नाही. उलट शिश्नदेवाची निंदा केली आहे. ऋग्वेदात रुद्र नावाच्या देवाचा संदर्भ येतो.
या भागाबाहेर शहरातील व्यापारी, अमात्य वगैरे मंडळी रहात असावी. शहराच्या या भागाभोवतीपण एक तटबंदी आहे. त्याबाहेर सामान्य जनता, कारागीर, शेतकरी राहत. या भागात पाण्याचे मोठे टाक आहे. या भागात शेती आणि भाजीपाला याची लागवड होत असे. या सर्व वस्तीबाहेर अजून एक तटबंदी आहे.
या काळातील इतर शहरांप्रमाणे ढोलाविरामध्येही एक पाण्याचे टाक आहे.
त्याचबरोबर या संस्कृतीत सर्वत्र मिळतात अशी टेराकोटाची नक्षीकाम केलेली भांडी मिळाली. इतर सर्व शहरांबरोबर या शहराचाही सुमारे ४००० वर्षापूर्वी अस्त झाला. या शहराजवळून जाणाऱ्या नद्यांना हिमालयातून येणार्या पाण्याचा पुरवठा होत असे असा अंदाज आहे – आज सिंधू, गंगा, यमुना या नद्यांना जसा पुरवठा होतो तसा. काही कारणाने हा पुरवठा बंद झाला (तो का याची कारणे पुढे पाहू) आणि त्यानंतर या वस्तीचे पतन चालू झाले.
मोरोढारो
ढोलाविराच्या पूर्वेला ५१ कि मी अंतरावर लोडरानी गावाजवळ एक ४५०० वर्षापूर्वीची वस्ती मिळाली आहे. येथे ५८ मी. X १०२ मी.ची तटबंदी आहे ज्याच्या आत वस्ती होती. या तटबंदीच्या भिंतीची रुंदी ३.५ मी होती. तटबंदीच्या आत एक विहीर मिळाली. खापरांचे तुकडे मिळाले. ही खापरे सिंधू-सरस्वती संस्कृतीसारखी होती. तटबंदीच्या बाहेर दफनाची जागा मिळाली. ढोलाविराप्रमाणेच ही जागा पण समुद्राजवळ असावी असा अंदाज आहे. येथे उत्खनन चालू आहे. (ToI, २०/२/२४)
लोथल
सहा हजार वर्षापूर्वी गुजरातचा समुद्रकिनारा फार निराळा होता. समुद्रापातळी आजच्या तुलनेत काही मीटर्स जास्त होती. सौराष्ट्र आणि कच्छ ही दोन बेटे होती. लोथल हे एक मोठे बंदर होते. त्यामुळे आज जेव्हा आपण समुद्रापासून दूर बोटींची गोदी पाहतो तेव्हा आश्चर्य वाटते. लोथलच्या बंदरातून मेसोपोटेमिया आणि इजिप्तशी व्यापार चाले. लोथलची गोदी खालील चित्रात –
मेसोपोटेमियामध्ये सापडलेला एक ताम्रपट पहा. यात असे लिहिले होते की मेलुहामधून हे दोन प्राणी राजाने आणले. प्राचीन काळी सिंधू सरस्वती भागाला मेलुहा असे नाव होते. मेलुहामधून दोन म्हशी राजाने आणल्या. म्हैस हा प्राणी मेसोपोटेमियात नवीन होता. म्हैस हा प्राणी आफ्रिका आणि दक्षिण आशियात आढळून येतो.
नानी खटीया
कच्छ मधील भूज गावापासून १०० कि मी वर नानी खटीया खेड्याजवळ एक दफन भूमी मिळाली आहे. ही वस्ती हडप्पाच्या पूर्वीची असावी असा अंदाज आहे. या ठिकाणी शंभर कबरी मिळाल्या आहेत, ज्यापैकी २६ कबरींचे उत्खनन झाले आहे. कबरींच्या बरोबर मातीची भांडी, दगडाची अवजारे, तुटलेल्या बांगड्यांचे तुकडे मिळाले आहेत. एवढी मोठी दफनभूमी मिळाली याचा अर्थ जवळ मोठी वस्ती असणार. त्याचा शोध घेणे बाकी आहे.
सिंधू सरस्वती संस्कृतीची विशेषता
शहरी नियोजन
या संस्कृतीची खासियत म्हणजे नागरी नियोजन – टाऊन प्लॅनिंग. प्रत्येक शहराच्या पश्चिमेला उंचवट्यावर एक किल्लेवजा जागा असे. त्या भोवती एक भिंत असे. या भागात शहरातील मुख्य लोक रहात असत. या वस्तीच्या बाहेर मध्यमवर्ग राहत असे. या भागातच शहरातील सामूहिक कार्यक्रम होत असत. या भागाबाहेर पण एक तटबंदी असे. त्या बाहेर कामगार, आणि शेतकरी यांची वस्ती असे. या वस्तीत, मणी, खेळणी बनवली जात. सर्व शहराभोवती मोठी तटबंदी असे. शहरातील रस्ते काटकोनात असत. रस्ते अंदाजे तीन मिटर रुंद असत.
बहुतेक इमारती एक मजली असत. बांबू आणि गवत वापरून स्लॅब बनविली जाई. त्यावर चिखलाचा थर देण्यात येई. दोन घरामध्ये एक गल्ली असे. प्रत्येक घरात एक न्हाणीघर आणि एक संडास असे. सांडपाणी घराबाहेर गटारात सोडले जाई.
घरे बांधण्यासाठी वापरात येणार्या विटा या एकाच आकाराच्या असत. 1:2:4 असे उंची, रुंदी आणि लांबी यांचे गुणोत्तर असे. बऱ्याच घरात विहिरी आढळल्या. मोहेन्जोदारो येथे सातशे विहिरी आढळल्या आहेत. विहिरीचा व्यास खूप लहान असे.
सर्व शहरात एक पाण्याचे टाके असे. ढोलाविरा तेथील पाण्याच्या टाक्याचे चित्र आपण पाहिलेच आहे.
भाषा
या संस्कृतीची सर्वात गूढ गोष्ट म्हणजे त्यांची भाषा. त्यांची लिपी चिन्ह आधारित असावी. एक चिन्ह देवता, प्राणी, कृती, किंवा कल्पना असण्याची शक्यता आहे. एकंदर चारशे वीस चिन्हे आढळून आली आहेत. त्या पैकी एकशे पन्नास कमी वापरातली चिन्हे आहेत. U आणि II ही सर्वात अधिक वापरातली चिन्हे आहेत. साधारणपणे पाच ते पंचवीस चिन्हे एका लिखाणात वापरली जातात. या वरून असे वाटते की आपण जसे पानेच्या पाने लिहितो तसे हे लोक लिहीत नसत. पहिली ओळ डावीकडून तर दुसरी उजवीकडून लिहिली जात असे. काही तज्ज्ञांच्या मते ही लिपी संस्कृत किंवा ब्राह्मी लिपीची सुरुवात असावी. या भाषेचा अजून अर्थ लागलेला नाही.
पंधरा वर्षाची कुमारिका ही मोहेंजोदारो येथे सापडलेली जगप्रसिद्ध मूर्ती आहे. अशा प्रकारच्या मूर्तीचे काय प्रयोजन असावे हे कळत नाही . ही गंमत पाहा – हातभर बांगड्या आहेत पण अंगावर कपडा नाही. कपड्यापेक्षा बांगड्यांना जास्त महत्त्व असावे. या कुमारिकेचा चेहेरा आर्यन मुळाचा वाटत नाही.
राज्यव्यवस्था
सिंधू सरस्वती संस्कृतीच्या वेळच्या दुसर्या संस्कृती म्हणजे मेसोपोटेमिया आणि इजिप्त येथील संस्कृती. या दोन्ही संस्कृतीत राजे होते. सिंधू सरस्वती संस्कृतीत केंद्रीय राजसत्ता दिसत नाही. त्यानंतर आलेल्या ग्रीक संस्कृतीप्रमाणे इथे सिटी स्टेट्स होती.
या संस्कृतीची आणखी एक विशेषता म्हणजे इथे शस्त्रे सापडली नाहीत. समाज शांतिप्रिय होता. लढायांची गरज नव्हती. त्यामुळेच बहुधा यांचा आर्यांबरोबर टिकाव लागू शकला नाही.
अर्थकारण
भारतीय उपखंडात शेतीची सुरुवात १० हजार वर्षापूर्वी झाली असे मानले जाते. सिंधू सरस्वती संस्कृतीत प्रमुख उद्योग शेती हा होता. बनावली येथे लाकडी नांगर मिळाले आहेत. सिंधू आणि सरस्वती या दोन नद्यांच्या मधली जमीन सुपीक होती. त्या काळात त्या भागात २५ इंच पाऊस पडत असावा. यामुळे शेतीला योग्य वातावरण होते. गहू आणि बार्ली ही प्रमुख पिके होती. या शिवाय कडधान्ये , भाजी आणि फळे यांचेही उत्पन्न घेतले जात असे. तांदुळाचा पुरावा अजून सापडलेला नाही. गुजरात मधील स्थळात ज्वारी आणि बाजरी सापडली आहे.
गाय, बैल, शेळी, मेंढी हे पशुधन मोठ्या प्रमाणावर आढळून येते. घोडा आणि उंट असल्याची पुरावे नाहीत. (पुढच्या लेखात आपण पाहू की देशपांडे यांचे मत असे की या संस्कृतीत घोडे होते, पण ढवळीकर यांचे मत अधिक ग्राह्य धरले पाहिजे)
धातू उद्योग
भारतात तांबे मिळत नाही. त्यामुळे या संस्कृतीत तांब्याच्या वस्तू मिळाल्या हे आश्चर्य वाटते. असे शक्य आहे की त्या काळात तांब्याचे खनिज जवळपास मिळत असावे. तोच प्रकार सोन्याच्या दागिन्यांचा. या संस्कृतीचे लोक मोठ्या प्रमाणावर व्यापार करीत. सोने आयात करून दागिने बनवले असावेत. आजही तीच स्थिती आहे.
व्यापार
अफगाणिस्तान आणि इराणबरोबर खुश्कीच्या मार्गाने आणि इराक़मधील अकेडीयन संस्कृतीशी समुद्र मार्गे व्यापार चाले. अकेडीयन संस्कृतीत भारताला मेलूहा म्हटले जायचे. मेलुहा हा शब्द तांब्याच्या वस्तूंच्या निर्यातीवरून आला असावा. शंख, हस्तिदंती वस्तू, मणी, कापड, इमारती लाकूड यांची निर्यात होती. समुद्रावरून केलेली निर्यात गुजरातमधील लोथल बंदरातून केली जाई.
उत्खननाच्या निरनिराळ्या ठिकाणी शेकडोंच्या संख्येने शिक्के – सील्स – मिळाले आहेत. या शिक्क्यांवर निरनिराळ्या खुणा आणि चित्रे आहेत. या शिक्क्यांचा व्यापारासाठी उपयोग होत असावा. या संस्कृतीतील शिक्के मेसोपोटेमियात मिळाले आहेत. आणखी एक विशेष म्हणजे एका वजनाची वजने निरनिराळ्या स्थळांवर मिळाली आहेत. शिक्के आणि समान वजने याचा वापर करून हे लोक मोठ्या प्रदेशात व्यापार करीत असत.
प्रमुख उद्योग शेती, पशुपालन, कपडाउद्योग आणि लाल मातीची शेकलेली भांडी (टेराकोटा) बनविणे हे होते.
कापड उद्योग
कापड उद्योग मोठ्या प्रमाणावर विकसित झाला होता. विस्कोंसिन युनिवर्सिटीच्या एका अभ्यासाप्रमाणे या संस्कृतीत वस्त्राचा पहिला पुरावा ४८०० वर्षापूर्वी मिळतो . बहुतेक सर्व पुरावे त्या काळातील शिक्के आणि भांड्यावरील चित्रांवरून उपलब्ध झाले आहेत. राखीगढी येथील उत्खननात धागा गुंडाळण्यासाठी फिरकी मिळाली आहे . एका मातीच्या भांड्याला चिकटलेला कापडाचा तुकडा मिळाला आहे .
संदर्भ ग्रंथ
कोणे एके काळी, सिंधू संस्कृती, म के ढवळीकर, राजहंस प्रकाशन, २००६
प्रतिक्रिया
विहिरी
विहिर खणायला पहार किंवा कुदळ हवी, लोखंडाचा शोध तर लागला नव्हता तरीही या लोकांनी विहिरी खणल्या. नेमकी कुठली अवजारे वापरली असावीत बरे.