लिहावे नेटके या पुस्तकातील काही मजेदार किस्से (भाग – २)

बालहट्टाचा नमूना...
माझी काकू सांगते, की लहान असताना एकदा मी कुंडीत आंब्याचे झाड लावण्याचा हट्ट धरला. वर्षभर घरातल्या घरात आंबे मिळावेत ही माझी कल्पना होती. तेव्हा माझे सगळे हट्ट चमत्कारिक असत. ‘अमुक करायचे नसते’ असे म्हटले की मला तेच करायचे असे. मी हट्टालाच पेटलो होतो. माझी समजूत घालताना सर्वांना नाकी नऊ यायचे. याला अपवाद फक्त नानांचा होता. ते मला समजावणीच्या भानगडीत न पडता मला समोर उभे करून ते माझ्याकडे असे काही बघत होते की माझा आवाजच घशातल्या घशातच विरत होता. पण त्यांची पाठ फिरली की पहिले पाढे पंचावन्न सुरु व्हायचे.
एकदा मी एका लग्नाला जाताना ताईचा नवा फ्रॉक घालून जाण्यासाठी हटून बसलो. नाना परगावी गेले होते, त्यामुळे मला कोणाचीच भीती नव्हती. मी ‘मुलगी म्हणून चिडवतील सगळे’ असे आईने सांगून बघीतले. पण मी बधलो नाही. अखेर तो फ्रॉक मी घातला आणि लग्नाच्या मांडवात करवलीसारखा मिरवला.

मुलांना शाळेत पाठविणे
“वाजले किती? अय्याS, पावणेसात?! अरे कुणाल, ऊठ! रिक्षाकाका येतील ना एवढ्यात! पटकन दात घास आणि तोंडावर पाणी मार. अंघोळ करू नकोस आज, उशीर होईल.... तोंड वाकडं नकोय
करायला! रोज अंघोळीला जा, म्हणून विनवण्या कराव्या लागतात, आणि आज वेळ नाहीये तर... वेळेवर उठत जा अन्‌ मस्त अभ्यंगस्नानं करत जा; नको कोण म्हणतंय! शाळेतून आल्यावर दोनदा कर हवं तर.... अहोS, तुम्ही गंमत बघताहात का माझी? तो पेपर ठेवा बाजूला जरा आणि त्याचं आवरून द्या. तोवर मी दूध गरम करते.... आज गणवेश नसतो, तो लाल टी-शर्ट घाला त्याला!... कुणाल, दप्तर भरलंयस का? बाबांकडून फीचे पैसे घे आणि दप्तरात ठेव नीट. ताईंना आठवणीनं दे आणि पावती घेऊन ये, आजच्या आज! नाही तर परत पाठवीन हां शाळेत, सांगून ठेवतेय.... आणि काल रात्री जागून मी तो डोंगर चिकटवून ठेवलाय वहीत... कुठली म्हणजे? पर्यावरणाची हिरवी वही! ती विसरू नकोस.... अहो, अंघोळीला जाऊ नका आत्ता. याची रिक्षा चुकली तर... घ्या! वाजलाच हॉर्न. कुणाल, ते बूट उचल हातात आणि रिक्षात बसून घाल. पळ!“

वायफळ गप्पा
“तू मूर्खासारखे प्रश्‍न न विचारता मला शेवटपर्यंत बोलू देणार असशील, तर गंमत सांगतो.”
“सांग.”
“परवा नेहमीप्रमाणे प्रल्हाद पहाटे उठला, नदीवर गेला....''
“आणि नेहमीप्रमाणे श्रुती उशिरा उठली, फिरायला गेली....”
“'नाही.”'
“मग श्रुती आणि मेधाही पहाटे उठल्या आणि नदीवर गेल्या. बरोबर मेधाची दोन्ही कुत्री गेली.''
“चूक!”
“मग प्रल्हाद आणि अर्जुन उशिरा उठले, फिरायला गेले....''
“हेही चूक; कारण मी मघाशीच सांगितलं, प्रल्हाद एकटा नदीवर गेला.”
“मग?”
“थोड्या वेळानं मेधाची दोन्ही कुत्री तिथे पोचली. प्रल्हाद आणि ती कुत्री नदीत पोहले. मग मेधा कुत्र्यांना शोधत तिथे पोचली. मनसोक्त पोहून झाल्यावर ते टपरीवर चहा प्यायला गेले.''
“ते कोण?!”
“प्रल्हाद आणि मेधा चहा प्यायला गेले.”
“आणि कुत्री? ती प्यायली चहा?”
“अरे, कुणी आहे का रे तिकडे? ह्याला....”
“नको, मीच जातो.”

शाळेची सहल
सहलीच्या दिवशी पोरे पहाटेच शाळेच्या फाटकापाशी जमायची. मला बाबा सायकलवरून आणून सोडायचे. अंधार असायचा. थंडीमुळे अंगात स्वेटर, डोक्याभोवती नाक झाकेल अशा प्रकारे गुंडाळलेला मफलर, असा प्रत्येकाचा यडपट अवतार असल्याने कुणी कुणाला ओळखू यायचे नाही. अंधारात एखादा मुलगा धडपडायचा; हातातला डबा पडायचा; खाऊ सांडायचा. मग पोरे 'पुंडलीSक वरदेSSS' चा गजर करायची. एखादी मुलगी विवचिवायची, ''अय्याSS, सांडला वाटतं! मी देईन हं तुला माझ्यातली पुरी!'' मग पुढे दिवसभर त्या मुलाची ह्यावरून खेचाखेची चालायची. सहल म्हणजे अशी धमाल असायची.

प्रतिज्ञापत्र
शाळेच्या पहिल्या दिवसापासून अभ्यास करायचा, असा मी ह्या वेळी निश्चय केला आहे. काल मी वहीमध्ये तशी प्रतिज्ञाच लिहून काढली आहे.
“मी वृंदावन मेधश्याम ताडगोळकर – प्रगतीपुस्तकातल्या लाल रेघांना स्मरून प्रतिज्ञा करतो, की शाळेच्या पहिल्या दिवसापासून मी रोज पहाटे उठणार, नियमित फिरायला जाणार, अंघोळीला पाच मिनिटापेक्षा जास्त वेळ घेणार नाही, आणी न रेंगाळता लगेच अभ्यासाला बसणार. सर्व विषयांचा घरचा अभ्यास रोजच्यारोज संपवणार, आईला माझ्यावर ओरडण्याची संधी देणार नाही, वर्गात नीट लक्ष देणार, टाकळेसरांची चित्रे काढून मुलांना हसवणार नाही. म्हणजे मग पासलकरबाई मला नेहमी नेहमी वर्गाबाहेर काढणार नाहीत. परीक्षेत पेपर झकास लिहिणार, प्रगतीपुस्तकातल्या लाल रेषा गायब करणार. हेडसर ऑफिसमध्ये बोलावून माझे कौतुक करणार, घरी आई माझी दृष्टच काढणार.”
ह्या वर्षी ही प्रतिज्ञा मी काही झाले तरी पूर्ण करणार.
तसे शाळा सुरु व्हायला अजून पंधरा दिवस आहेत. तोपर्यंत मी चिक्कार झोपून घेणार. टीव्हीवरचे झाडून सर्व सिनेमे बघणार. पुन्हा – म्हणजे पाचव्यांदा – सर्कसला जाणार. वर्षभर जे जे करायला मिळणार नाही ते ते सगळे करणार. आईबाबा आरडा ओरडा करतील, पण माझी प्रतिज्ञा त्यांनी वाचली नाही. आपला सुपुत्र किती गुणी आहे, हे त्यांना लवकर कळेल. आणि मग आपण याला रागावलो असे वाटून त्यांना पश्चात्ताप होईल.
ही प्रतिज्ञा मी शंत्याला आणि पित्याला वाचून दाखवण्याचा विचार मी बदलला आहे. . ती पूर्ण करायला नाहीच जमले तर फुकट हशे होणार आणि सगळ्यांना आयतेच कोलीत हाती मिळणार नाहीच ते. असो.
परवा शाहरूख खान आणि राणी मुकर्जीचा नवा सिनेमा लागणार; तो पाहण्यासाठी मामाला कसे पटवायचे, एवढाच विचार तूर्त करावा. पुढे वर्षभर शहाण्यासारखे वागायचे आहे.
जय हिंद

अनोखा शोध
उजाडण्यापूर्वीच काशी रानाची वाट धरते. जाताना ती रुक्मिणीला हाक मारते. रुक्मिणी वाटच बघत असते. ती पळत घरातून बाहेर येते.
“आज दिसतील, नक्की?'' ती कुजबुजत विचारते.
काशी रुक्मिणीचा हात पकडते. दोघी पळतच ओढा ओलांडतात. हळदीची टेकडी
चढून गेल्यावर दोघीही श्‍वास घेण्यासाठी थांबतात. समोर रानफुलांचा गालिचा
पसरलेला असतो. अचानक काशी रुक्मिणीचा दंड पकडते आणि बोटाने काही तरी
दाखवते. पहाटेच्या अंधूक प्रकाशात फुलांच्या त्या गालिचावरून निळ्या रंगाचा एक
ओघळ सरकताना दिसतो.
“मोर!'' रुक्मिणी उद्‌गारते.

आजोबा व नातीचे वेगळे जग
माणकी एकटीच घराच्या पायरीवर बसली होती. अप्पा तिच्यासमोर येऊन उभे राहिले आणि म्हणाले, “काय हो, माणकूताई, अशा का बसल्याहात?”
“आज आमच्याबरोबर खेळायला कुणीच नाही. अंकिता नाचाच्या क्लासला गेलीये,'' माणकी नाक उडवून म्हणाली.
“मग तू का नाही गेलीस तिच्याबरोबर ?''
“मला नाही आवडत! अप्पाआजोबा, मी तुमच्याकडे येऊ? तुम्ही माझ्याबरोबर सागरगोटे खेळाल? हे बघा, माझ्यापाशी अकरा सागरगोटे आहेत. आपण नऊ-खऊ खेळू या,'' माणकी सागरगोट्यांची ओंजळ त्यांच्यापुढे करून म्हणाली. अप्पा हसले.
“पण तुझ्या बाकीच्या मैत्रिणी कुठे गेल्या?
“त्या मला आपल्यामधे खेळायला घेत नाहीत. म्हणतात, तुझ्यामुळे भाडणं होतात.... सांगा ना, येऊ मी? ”
“अगं, सुमाआजी आजारी आहे ना, तिच्यासाठी औषध आणायचं आहे. जयकाकाला का नाही विचारत? त्यालादेखील छान खेळता येतात सागरगोटे. ”
“तुमच्यापेक्षा?''
“माझ्यापेक्षा !''
“चालेल. ''

प्राण्याच्या जगात
एका वानराला सीताफळे खाण्याची इच्छा झाली.
वानर एका शेतकऱ्याला म्हणाले,
“तुझ्या शेतातील वडाचे झाड उपटून तिथे सीताफळाचे झाड लाव.” शेतकरी ‘नाही’ म्हणाला.
वडाच्या झाडावर मधाचे पोळ होते. वानर मधमाश्यांना म्हणाले,
“शेतकऱ्याला चावा.” मधमाश्या नाही म्हणाल्या. काठीला सांगितले, “मधमाश्यांना हुसकून लाव.” काठी नाही म्हणाली. राजाच्या शिपायांना सांगितले, “काठीचे तुकडे करा.” शिपाई नाही म्हणाले. राजाला सांगितले, “शिपायांना हुकुम दे.” राजा नाही म्हणाला. राणीला सांगितले, “राजावर रुसून बस.” राणी नाही म्हणाली. उंदरांना सांगितले, “राणीची लुगडी कुरतडा.” उंदीर नाही म्हणाले. मांजरांना सांगितले, “उंदरांना खा.” मांजर नाही म्हणाले. तळ्याला सांगितले, “मांजराला बुडव.” तळं नाही म्हणाले.
उदास होऊन वानर तळ्याकाठी बसलेले असताना तिकडून एक साधू आला. त्याने वानराला विचारले, “का रे बाबा, असा उदास होऊन का बसला आहेस?”
वानर खिन्न आवाजात म्हणाले, कारण हे तळं मांजराला आपल्या पाण्यात बुडवत नाही.”
साधूने विचारले, “मांजराला बुडवल्यानं काय होईल?”
वानर म्हणाले, “मला सीताफळं खायला मिळतील.”
साधू वानरासमोर मांडी घालून बसला आणि म्हणाला, “ही काही तरी मजेची गोष्ट दिसते आहे. मला सगळं नीट सांग बर!”
वानर रडक्या सुरात म्हणाले, “काय सांगू? सगळ जग माझ्या वाइटावर आहे. हे...हे तळंच पाहा ना!
तळं मांजराना बुडवत नाही.
मांजरं उंदरांना खात नाहीत.
उंदरं राणीची लुगडी कुरतडत नाहीत.
राणी राजावर रुसून बसत नाही.
राजा शिपायांना हुकुम देत नाही.
शिपाई काठीचे तुकडे करत नाहीत.
काठी मधमाश्यांना हुसकून लावत नाही.
मधमाश्या शेतकऱ्ला चावत नाहीत.
शेतकरी वडाचं झाड उपटून टाकत नाही आणि सीताफळाचं झाड तिथे लावत नाही. अस सगळं जग दुष्टांनी भरलेलं आहे. म्हणून मी उदास आहे.”

प्राण्यांकडे आपण माणसासारखेच बघत असतो
एक सिंह असतो. आपल्या शक्तीचा त्याला फारच गर्व असतो. त्या शक्तीचा उगाचच वापर करण्याची त्याला मधूनमधून लहर येत असते.
एकदा अशाच लहरीच्या झटक्‍्यामध्ये तो गुहेतून बाहेर पडतो. समोरच त्याला एक ससा दिसतो. सिंह त्याला विचारतो, “खरं सांग, जंगलातला सर्वात शक्तिमान प्राणी कोण?''
ससा थरथरत म्हणतो, “तुम्हीच, महाराज!''
“शाब्बास! हुशार आहेस!” सिंह म्हणतो.
मग सिहाला वानर भेटते, हरीण भेटते, काल्हा भेटतो. सगळे हेच म्हणतात - “सर्वात शक्तिमान तुम्हीच आहात, महाराज !'*
सिंह खूष होतो. एवढ्यात त्याला हत्ती दिसतो. सिंह जाऊन त्याच्या पुढ्यात उभा राहतो आणि विचारतो, “काय रे, तुझं काय म्हणणं आहे? जंगलात सर्वांत शक्तिमान प्राणी कोण?”
हत्ती सिंहाकडे पाहतो, आपल्या सोंडेचा विळखा त्याच्या कंबरेला घालतो, त्याला दूरवर भिरकावून देतो आणि पुन्हा शांतपणे चरायला लागतो.
जमिनीवर जोरात आदळल्यामुळे सिंहाची पाठ शेकते. कसेबसे उठून कण्हत कण्हत तो म्हणतो, “मी साधी चौकशी केली! तोंडानं उत्तर देता येत नव्हतं का?!”

नातवाशी हितगुज
“आजोबा, इकडे या ना! त्या पिंपळाच्या झाडावर बघा, माशांनी किती पोळी केली आहेत!'' आजोबांना हाताला धरून ओढत चैतन्य म्हणाला.
“हो? पोहत जाऊन केली का? की त्यांना पंख फुटले?'' आजोबा गालात हसत म्हणाले.
“म्हणजे?”
“तू म्हणालास - 'माशांनी पोळी केली”. पाण्यातल्या माशांना झाडावर पोळी बांधण्यासाठी उडतच जायला हवं की नाही?''
चैतन्य खुदकन हसला. आजोबा म्हणाले, “पाण्यातले मासे असले उद्योग करायला लागले, की त्यांची नावंही 'मधमासा, गांधीलमासा' अशी करावी लागतील. मग झाडावर पोळी बांधणं हे ज्यांचं काम आहे, त्या माश्यांनी काय करायचं?''
“पाण्यात राहायला जायचं! पोळी बांधण्याबिंधण्याची कटकटच नाही,'' चैतन्य म्हणाला, “मासेबाजारात - नाही, माश्याबाजारात - सुरमई, पापलेट, बोंबील असे मासे नाही मिळणार; कसल्या कसल्या माश्यांचे वाटे मिळतील. मग आई मधमाश्यांचे कालवण, गांधीलमाश्यांचं कटलेट, आगीमाश्यांचा झणझणीत ठेचा करेल. मज्जा!!””
त्याच्या बरोबरीने आजोबाही इतके खिदळत सुटले, की आई-बाबा काय झालं म्हणून बघायला आले.

कासव व हत्तीची रेस
जीव खाऊन धाबल्यामुळे हत्तीची दमछाक झाली. थोडी विश्रांती घेण्यासाठी तो एका झाडापाशी थांबला आणि धप्पकन खाली बसला. त्याच्या अशा बसण्याने झाडाखाली राहणाऱ्या उंदराचे बीळ हादरले आणि तो धावत बाहेर आला.
“काय हे! ही काय पद्धत झाली बसण्याची? तुझ्या वागण्याला आजकाल काही धरबंधच राहिलेला नाहीये,'' तो रागारागाने ओरडला. अजूनही धापाच टाकत असलेला हत्ती कसेबसे पुटपुटला, ''सॉरी!....”
“हे एक बरं आहे तुझं. तुला काय वाटलं, तू 'सॉरी' म्हटल्यावर मी गप्प बसेन? आणि पळतोहेस कशासाठी, वाघ मागे लागल्यासारखं?''
“शर्यत लागलीये, कासवाबरोबर,'' हत्ती उत्साहाने म्हणाला.
“उंदराने कपाळावर हात मारला. “हे कासव म्हणजे...! त्याच्या पणजोबानं सशाबरोबरची शर्यत जिंकल्याची गोष्ट ऐकल्यापासून ते चेकाळलंच आहे! दिसेल त्याला पळवत सुटलंय. तुलाही
पळवण्यापर्यंत मजल गेलीये त्याची. मग? आता ते इथे येईपर्यंत बसून राहण्याचा बेत आहे की काय? ऊठ आणि पळ! नाही तर सशासारखंच तिथे पोचल्यानंतर शर्यत हरल्याच लक्षात येईल. ''

काना मात्रा, वेलांटी, जोडाक्षरे इत्यादींची ऐशी तैशी
p1

संगणकावरील अनुस्वाराची कीच गायब
१. आकाशकदील पूर्ण झाल्यावर बिशूने तो खाबावरच्या खिळ्याला टागला आणि आत दिवा सोडला.
२. घरमालक अघोळ करीत असताना दरवाजाचा कोयडा उचकटून चोर घरात शिरला आणि त्याने हाताला लागतील त्या वस्तू लपास केल्या.
3. आमच्या सोसायटीत काल एक रोमाचकारक प्रसग घडला.पहिल्या मजल्यावरच्या अनगळकाकूचे सात नबरमधल्या रेडकराच्या मोलकरणीशी सणकून भाडण झाले. याचा शेजारच्या कर्पे कुटुंबाला भयकर आनद झाला.
४. माझी धाकटी बहीण अत्यत धादरट होती, आणि ते तिच्या पथ्यावरच पडत असे. तिच्यावर कधीही स्वयपाकाशी सबधित कामे सोपवली जात नसत. तिचे काम करणे म्हणजे साडलवड, फोडतोड आणि पसारा. त्यामुळे इतर घरामध्ये सहसा न दिसणारे दृश्य आमच्याकडे दिसत असे: मुलगा असून मी आईला राधण्यात मदत करतो आहे आणि बहीण गावभर हुदडते आहे.
५. आपण मघाशी पाहिली ती शभर टक्के मेढी होती, याबद्दल तात्याला खात्री होती. पण मग ती म्हशीप्रमाणे हबरेल कशी? की म्हशीने अगावर लोकर पाघरली होती? काही तरी गोधळ होता हे नक्की.

व्याकरणाशी काही देणे घेणे नाही...
माननीय नगरसेवक,
मी एक समाज कायकता आहे. शहराच्या पयावरणाचे रक्षण करण्यासाठी काय करण्याची माझी इच्छा आहे. काही तरण विद्याथीही त्याकरता उल्स्फतपणे पढे येत आहेत. दोन महिन्यांपवी वगणी काढन आम्ही नदीच्या काही भागाची स्वच्छता केली. परंत अशा कामाला खच खप येतो. आपल्यामाफत काही निधी मिळ शकला तर आम्हाला संपण नदीची सफाई करता येईल. आपण सहकाय कराल अशी आशा वाटते.
आपला विश्वास
म. पां. आंबेकर

प्रूफ रीडरची अग्नी परीक्षा
““दिलप्याSS!'*
घरातून मावशिचि हाक . तिचया धारदार सुरावरूनच मि अंदांज बाधलाकि काहि तरि गडबड आहे. हातातेल पुस्तक मला खालि ठेवववत नव्हते. मि मनाविरूद्धच उठलो आणि घराच्या दरवाजत उभा राहिलो
“पितळेचि परात गेलि, दिलप्याS!'' मावशि दुखावेलल्या स्वरात म्हणालि.
“अगं, असेल इथेच कुठे तरि. शोधु आपण” मि समजावणिच्या सूरात म्हटल.
मावशिने जोरजोरात मान हलवलि. ''परात गेलिच बाबा. एवढ मोठि जिन्नस या वितभर खोलित मला दिसत नाहि होय? आता आणखि काय न्यायंच ठेवलयं तुझ्या भावजिनि तेवढं बघ.”
मावशिचे खरेच होते. तिच्या व्यसनि नवऱ्या शोधण्यासाठि घरात काहि शील्लकंच ठेवले नव्हते.

बायका काय काय करत असतात याची कल्पना नसते!
चाळणे पाखडणे कांडणे कुटणे दळणे चिरणे चोचणे मळणे भिजवणे तिंबणे थापणे लाटणे पस्तणे तळणे उलथणे आंबवणे धुणे शिजवणे वाफवणे किसणे खोवणे गाळणे चुरडणे ठेचणे उकळणे तापवणे कालवणे मिसळणे निथळणे उपसणे घुसळणे फेसणे खोवणे भुरभुरणे पेरणे घोटणे कुसकरणे आटवणे कढवणे खरबडणे मुरवणे सोलणे निवडणे कापणे भाजणे उकडणे वाटणे फेटणे ढवळणे

आपल्याला काय हवे ते नीट न सांगता आल्यामुऴे होणारे घोळ...
मालक - (इकडेतिकडे बघत वैतागून) पुन्हा गेली! आत्ता होती म्हणेपर्यंत नाहीशी झाली. कुठे असेल बरं? या दादूला विचारावं. (नोकराला) काय रे दादू, ती आहे का? की गेली?
नोकर - काय पाह्यलं नाय बा!
मालक - पाह्यलं नाही? तुला कितींदा सांगितलं, की तिच्या येण्याजाण्यावर लक्ष ठेवत जा.
नोकर - जाता-येता त्येवडंच बगत बसायला मला काय दुसरी कामं न्हाईत?
मालक - मुद्दाम कशाला बघावं लागतं? लपून राहण्यासारखी आहे की काय ती? घरात असते तेव्हा दिसतेच. अगदी डोळे दिपून जातात.
नोकर - त्ये राती वो! ती नसंल तर रातचं काय बी सुदरत न्हाई, ह्ये बरीक खरं. पन मला कळत न्हाई, दिवसाढवळ्या तुमचं तिच्याबिगर काय अडलंय? ,
मालक - दाद्याS! तू काय बोलतोयस ते तुझं तुला तरी कळतंय का? रात्र काय, दिवस काय!
नोकर - वरडाय काय झालंय यवढं? लाइट नसली तर सुदरतं न्हाई ना? दिवसा सुर्व्या आकाशात हाये का न्हाई, ह्ये तुमाला लाइट लागती का? न्हाई ना? मंग इतका जीव चाललाय तुमचा?
मालक - (शांत राहण्याचा प्रयत्न करत) दादू, मी एकदा तरी बोललो का? नाही ना? मी माझ्या स्वतःच्या बायकोला शोधलं तर तुला काही त्रास आहे का? नाही ना?
नोकर - (ओशाळून) आसं झालं व्हय? मग नीट उलगडून मान्सानं. निस्तं 'ती आली का?' न्‌ 'ती गेली का?' विचारल्यावर आमी काय समजायचं?

क्रमशः
या पूर्वीचेः https://aisiakshare.com/node/9015

field_vote: 
0
No votes yet