विलक्षणाच्या उभ्या पिकावर

विलक्षणाच्या उभ्या पिकावर
देण्या खडा पहारा
पाहिजेत-जे भेदू शकतील
स्थळकाळाची कारा

पाहिजेत ते - नेणीव ज्यांची
जाणिवेतुनी झरते
अर्थगर्भ मौनातही ज्यांचे
रोमरोम रुणझुणते

पाहिजेत-जे उत्स्फूर्तीच्या
पुष्करणीचे पाणी
पिऊनी खोदतिल अमूर्तावरी
अकल्पिताची लेणी

पाहिजेत-जे अज्ञेयावर
कलम करुनी ज्ञाताचे
विलक्षणाचे वाण बनवुनी
घेतील पीक उद्याचे

field_vote: 
0
No votes yet