चटका-१
अर्धनग्नावस्थेत पलंगावरती पडलेल्या संयुक्ताचा तीळपापड झालेला होता, डोळ्यातून अश्रूंची संततधार लागलेली होती. ऊर धपापत होता आणि चेहरा लालबुंद झालेला होता. तिच्या हाताच्या मुठी गच्च आवळलेल्या होत्या, डोक्यात विचारांची गर्दी गर्दी उडाली होती. तिला काहीही सुधरत नव्हते, हॉटेलची रुम भोवती गरगर फिरते आहे की काय असे वाटत होते. संताप-संताप आणि शरम दोहोच्या कात्रीत तिच्या डोक्याचा पार भुगा व्हायचा बाकी होता. आणि तिच्या कानात धीरजचे शेवटचे शब्द अजुनही तप्त लाव्ह्यासारखे भाजत होते -
"तुझ्या नवर्यापाशी राहीली नाहीस तू, माझ्याकडे काय रहाणार? माझं काम झालं हा मी चाललो पण जाता जाता एक ऐक - तुझ्यात आणि वेश्येत काडीचाही फरक नाही. किंबहुना वेश्या अन्य कोणाशी नाही तर निदान टिचभर पोटाशी तरी प्रामाणिक असते, तुझ्यात तोही प्रामाणिकपणा नाही. कींव येते मला तुझी आणि तुझ्या नवर्याची." अवाक होउन संयुक्ता फक्त ऐकत राहीली, इतकी की उठायचे, वस्त्रप्रावरण सांभाळायचेही भान तिला राहीले नाही. काय बोलतोय हा माणूस - ज्याच्यावर विश्वास ठेउन गेले तीन महीने मी वेळ मिळेल तेव्हा हॉटेलच्या रुमवरती याला भेटत राहीले त्याने असा वार करावा?
विवाहोपरान्त पहील्या काही महीन्यातच संयुक्ताला नवरा सेक्सच्या वेळी टंगळ मंगळ करतो, रात्र होउ लागली की मूड ऑफ होइल असे बोलतो, लागेल असे बोलतो हे लक्षात आलेले होते. प्रथम प्रथम तिला वाटे की हे स्वभावातील कंगोरे आहेत. धार आहे. सगळ्याच नवरा बायकोत पहीली काही वर्षे अशी सतत भांडणे होत असतील. मे बी नवर्याच्या आपल्याकडून दिसण्याच्या संदर्भात जास्त अपेक्षा आहेत. कदाचित आकर्षक दिसण्यात आपणच कमी पडतो. सायन्स साईडला गेलेल्या मुली तशा मेक अप आणि नटणं मुरडणं यामध्ये मंद असतात. आपणही शिकू, आपणही त्याचे मन जिंकून घेउ. आपणही सुंदर दिसू, आकर्षक दिसू. पण दिवस जाउ लागले तरी संध्याकाळपासूनची लागट बोलणी, खुसपटे काढणे कमी होइना, तिने कितीही काळजी घेउ देत संध्याकाळ पडू लागली की काहीतरी बिनसतच असे. क्वचित जर संध्याकाळ बरी गेली तरी प्रत्यक्ष सेक्स करतेवेळी तिलाच काही जमत नाही असे आरोप होत असत. एकंदर थंडपणा, गिळगिळीत स्पर्श, आणि फ्लॅसिडनेस चा कंटाळा येउ लागला तिला. तिला वेळ लागला खरा पण एक कळून चुकले की नवर्याला काहीतरी समस्या आहे. बरं डॉक्टरकडे जा - असे सुचवले तर तो भडकायचा. आधीच डोक्याने तिरसट म्हणुन ती काही बोलत नसे. हळूहळू वर्षे सपक चालली होती.
नंतर एकदा धीरज तिच्या आयुष्यात आला. दोन वर्षांपूर्वी ऑफिसच्या एका पार्टीत तिच्या एका सहकारी स्त्रीने त्याच्याशी ओळख करुन दिली. आणि मग ई मेल्स, फोन्स, कामानिमित्त भेट - यातून आकर्षणात रुपांतर कधी झाले कळलेच नाही. धीरज अविवाहित होता. तिच्यापेक्षा खूप वेगळ्या स्वभावाचा होता. खरं तर ती जितकी सरळ होती तितकाच तो रुथलेस, व्यवहारी व श्र्युड होता. पण अपोझिटस अॅट्रॅक्ट असेल म्हणा की अन्य काही पर्याय तेव्हा उपलब्ध नव्हता म्हणा, संयुक्ताला त्याच्याविषयी आकर्षण आणि विश्वास वाटू लागला होता. हळूहळू त्यांची इमेल्स्ची, फोन्स ची देवाण घेवाण वाढत गेली. गेले तीन महीने तर दोघे या हॉटेलमध्ये एका रुममध्ये भेटू लागले होते. यात संयुक्ताला चूकीचे वाटत नव्हते. तिला स्वतः च्या शरीराचा सुखासाठी होणारा आकांत माहीत होता. आणि मग जर ती स्वतःच्या गरजांशी प्रामाणिक राहीली तर त्यात चूकच काय होते? तिच्या नवर्याने एक प्रकारे तिला फसवले होते नाही का!
तीन महीने तर काही इश्यू नव्हता ती आणि धीरज रुमवरती भेटत आणि काही घडलेच नाही असे दाखवत आपापल्या मार्गाने निघून जात ते पुन्हा भेटण्याची उर्मी मनात बाळगूनच. ती तृप्त होती, तिच्या बेसिक गरजा पूर्ण होत होत्या बिनबोभाट. हे तिने तिच्या एका फक्त एका मैत्रिणी बरोबर बेला बरोबर, शेअर केलेले होते. फक्त हे जाणून घ्यायला की यात काही चूकी आहे का, तिला गुन्हेगारीची भावना जी काही थोडीबहुत वाटत होती तीसुद्ध्हा बेलाशी बोलल्यानंतर दूर झाली होती, एक स्त्री दुसर्या स्त्रीला परिपूर्णतेने जाणुन घेउ शकते असा आनंददायक अनुभव घेउनच. त्यामुळे थोडीही सल न बाळगता ती या अफेअरला निर्ढावली होती.
आज ती नेहमीप्रमाणे रुमवर आलेली होती. नेहमीप्रमाणेच तर सर्व काही घडत होते. नेहमीप्रमाणे नाही. आज धीरजने तिला खेळ म्हणुन, फोरप्ले म्हणुन तिने त्याच्याकडे शरीरसुखाची याचना करावी असे सुचविले होते जे तिने आनंदाने केले. त्याने सांगीतल्याप्रमाण एकेक वस्त्र उतरवित गेली आणि याचना करत. आता तिची अपेक्षा होती की पुढे नेहमीप्रमाणे ....... पण झाले भलतेच तिच्या या अर्धनग्न स्थितीत, याचना करतेवेळी धीरजचे डोळे एकदम थंड आणि क्रूर झाले व तो म्हणाला "वाह!!! छान दिसतेस तू अशी याचना करतानाच. पण तुला खरं सांगू कंटाळा आला आता तुझा. तुझ्या नवर्यापाशी राहीली नाहीस तू, माझ्याकडे काय रहाणार? माझं काम झालं हा मी चाललो पण जाता जाता एक ऐक - तुझ्यात आणि वेश्येत काडीचाही फरक नाही. किंबहुना वेश्या अन्य कोणाशी नाही तर निदान टिचभर पोटाशी तरी प्रामाणिक असते, तुझ्यात तोही प्रामाणिकपणा नाही. कींव येते मला तुझी आणि तुझ्या नवर्याची." हे ऐकताच संयुक्तावरती छप्पर कोसळल्यासारखे झाले. अंगावर कशीबशी चादर ओढून घेत, ती म्हणाली "काय बोलतोयस तू हे?" आणि यावरती तो उत्तरला - "होय, पुरुषच आहे मी आणि आमच्यातही सॉलिडॅरिटी म्हणुन काही गोष्ट असते हे नशीब समज की तुझे अशा अवस्थेतले फोटो त्याला पाठवले नाहीत"
दार आपटून निघून गेला खरा तो. पण सुन्न, संतापाने लालेलाल झालेली,शरमेने काळवंडलेली संयुक्ता कशी जाणार होती निघून? कशी स्वतःला सावरणार होती? कोणती थेरपिस्ट तिला सावरु शकणार होती? बेला पुरेशी नव्हती. आयुष्यभरचा चटका होता हा.