'धुक्यात हरवलेले लाल तारे'च्या निमित्ताने
जवळपास नऊ वर्षांपूर्वी प्रसाद, निखिल आणि मी गप्पा मारत बसलो होतो. सोविएत रशियन पुस्तकांबद्दल काहीतरी केलं पाहिजे असं तिघांनाही वाटत होतं, पण नेमकं काय ते सुचत नव्हतं. अचानक प्रसाद म्हणाला "तुमच्या बोलण्यात सर्वात जास्त उल्लेख येतात ते लहानपणी वाचलेल्या रशियन पुस्तकांचे. त्या पुस्तकांचाच मागोवा घेतला तर?" ती कल्पना ताबडतोब क्लिक झाली, आणि आम्ही रिसर्चला सुरुवात केली.
आता सोविएत बालवाङ्मय आम्ही वाचलं होतं ते १९८० च्या दशकामध्ये. त्याला बरीच वर्षं होऊन लोटली होती. सोविएत संघाचं विघटन झालं त्यालाही २५ वर्षं झाली होती. पण तरीही, या पुस्तकांबद्दल माहिती - आणि आस्था - असणारे बरेच जण भेटतील अशी आशा होती.
ही पुस्तकं मॉस्कोत प्रकशित होत असत हे ठाऊक होतं. पण त्यातील काही पुस्तकांवर मुंबईच्या लोकवाङ्मय गृहाचाही उल्लेख असे. निखिलच्या ओळखीने लोकवाङ्मयमध्ये गेलो, आणि तिथे माहितीचा अक्षरश: खजिना मिळाला. चारूल जोशी, सुकुमार दामले, राजन बावडेकर, डॉ. भालचंद्र कानगो या सर्व कॉम्रेड्सनी सोविएत पुस्तकांचा इतिहास, अनुवादाची प्रक्रिया, याची सविस्तर माहिती दिली. याच सुमारास लोकवाङ्मयने पाच सोविएत पुस्तकांचं पुनर्प्रकाशन केलं होतं, त्याबद्दलचे विचार कॉ. दामले आणि कॉ. डॉ. कानगो यांनी अत्यंत प्रांजळपणे व्यक्त केले. लोकवाङ्मयचे भूतपूर्व व्यवस्थापक बाळ देसाई यांनी १९५० आणि १९६०च्या दशकातील भारावलेल्या दिवसांच्या आठवणी सांगितल्या.
लोकवाङ्मयमधूनच मनोविकास प्रकाशनाच्या अरविंद पाटकरांशी आणि शिवाजी विद्यापीठातील डॉ. मेघा पानसरेंशी संपर्क प्रस्थापित झाला, आणि टीम धुहलाता पहिल्या दौऱ्यावर निघाली. पुण्यात पाटकरांनी सोविएत पुस्तकांच्या विक्रीबद्दल त्यांच्या आठवणी सांगितल्या, आणि एकूणच बालवाङ्मयाचा प्रसार होण्यासाठी काय करता येईल याबद्दल मार्गदर्शन केलं. नंतर कोल्हापूरमध्ये पानसरेंनी अनुवादाच्या प्रक्रियेतील कंगोरे समजावून सांगितले, आणि आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी अनुवादित केलेल्या "सेर्योझा" या पुस्तकातील काही उताऱ्यांचं अभिवाचन केलं.
पुण्यात यांनतर अजून दोन ट्रिप झाल्या. अनिल अवचट, माधुरी पुरंदरे, दिलीप प्रभावळकर, गणेश विसपुते, अरविंद गुप्ता अशा दिग्गजांशी बोलणं ही आमच्यासाठी पर्वणीच होती. अनिल अवचट आणि माधुरी पुरंदरेंनी कसदार बालवाङ्मय कसं असावं याबद्दल मार्गदर्शन केलं, दिलीप प्रभावळकरांनी कथेची रचना कशी होते याची रोचक माहिती सांगितली, गणेश विसपुतेंनी सोविएत पुस्तकांमधील विषयांच्या वैविध्याबद्दल आणि दृक कलांबद्दल विचार व्यक्त केले, आणि अरविंद गुप्तांनी सोविएत बालसाहित्याचा इतिहासाबद्दल सांगून हा सर्व जगासाठी अमूल्य ठेवा आहे असं प्रतिपादन केलं.
मुलांसाठीच्या सोविएत रशियन पुस्तकांच्या आठवणींमध्ये त्यांतील सुंदर, रंगीबेरंगी चित्रं हा महत्त्वाचा पैलू असतो. रुची म्हसणे आणि ऋजुता घाटे यांनी पुस्तकातील आशय बालवाचकांपर्यंत पोहोचवण्यात चित्रांच्या महत्त्वाच्या भूमिकेबद्दल सविस्तर मतं मांडली.
साहित्यिकांची आणि चित्रकारांची मतं रोचक आणि विचारप्रवर्तक होतीच, पण सोविएत बालसाहित्याबद्दल आणि एकूणच वाचनसंस्कृतीबद्दल वाचकांच्या आठवणी आणि विचार जाणून घेणंही महत्त्वाचं होतं. यशोदा वाकणकरांनी सोविएत रशियाबद्दल भारतीयांच्या आत्मीयतेबद्दल भरभरून सांगितलं. ऋग्वेदीता परखांनी 'दोन भाऊ' ('चुक आणि गेक') हे पुस्तक वाचताना दरवेळी नवीन पैलू कसे जाणवतात याबद्दल सांगितलं. विनील भुरकेंनी 'माणूस महाबलाढ्य कसा बनला' यासारख्या पुस्तकांतून विज्ञानाची गोडी कशी लागली हे सांगितलं. सायली राजाध्यक्ष आणि निरंजन राजाध्यक्षांनी मराठी बालसाहित्याचं भवितव्य आणि वाङ्मयप्रसारात नवीन तंत्रज्ञानाचा परिणाम याबद्दल मार्गदर्शन केलं. सुलभा सुब्रमण्यम यांनी मुलांच्या मानसशास्त्रीय जडणघडणीत पुस्तकांचा वाटा, आणि मुलांच्या बुद्धीला किंवा व्यक्तिमत्त्वाला कमी न लेखणं हा सोविएत पुस्तकांचा महत्त्वाचा पैलू यांबद्दल सांगितलं.
या सगळं रिसर्च, मुलाखती चालू असताना एक प्रश्न मात्र पडला होता - सोविएत संघातून पुस्तकांचा अनुवाद आणि वितरण होत असताना यांत प्रत्यक्ष सहभागी झालेल्या व्यक्तींशी संपर्क कसा साधायचा? आणि याची उत्तरं अचानकच मिळाली. मॉस्कोमध्ये राहून अनेक सोविएत पुस्तकांचा अनुवाद करणारे डॉ. रविंद्र रसाळ यांनी अनुवादासाठी पुस्तकांची निवड कशी होत असे, अनुवादाची प्रक्रिया कशी होती, याबद्दल स्वत:चे अनुभव विशद केले. मेझ्दुनारोद्नाया क्निगा या सोविएत वितरणसंस्थेच्या मुंबईतील कार्यवाहक रोहिणी परळकर यांनी मॉस्कोतून भारतात होणारी पुस्तकांची आयात, त्यांची प्रसिद्धीव्यवस्था, वितरणप्रक्रिया याबद्दल सविस्तर माहिती दिली.
या सर्वांनी दिलेली माहिती समजून घ्यायची, मुलाखतींमधले महत्त्वाचे पैलू निवडायचे, विविध मुलाखतींची सुसंगत मांडणी करायची आणि सोविएत रशियन बालसाहित्याची गोष्ट रंजक आणि रोचक पद्धतीने प्रेक्षकांसमोर प्रस्तुत करायची हे शिवधनुष्यासारखं कठीण आव्हान होतं, पण प्रसादने ते लीलया पेललं. निखिल आणि मी आमच्या परीने मदत करत होतोच. इरावती कर्णिक (निवेदन), शंतनू बोन्द्रे (ध्वनिसंकलन) वैदेही पगडी फणसाळकर (इंग्रजी सबटायटल्स), मंगेश सिंदकर (रशियन सबटायटल्स) यांची महत्त्वाची मदत या उपक्रमाला लाभली. अनेक व्यक्तींनी आणि संस्थांनी आम्हाला विविध प्रकारची माहिती दिली, आर्थिक पाठबळ दिलं, प्रोत्साहन दिलं. या सर्वांचे मन:पूर्वक आभार! 'धुक्यात हरवलेले लाल तारे'च्या निर्मितीचं श्रेय या सर्वांनाच आहे.
तीनेक वर्षं काम केल्यावर 'धुक्यात हरवलेले लाल तारे' तयार झाली. मुंबईत, कोल्हापुरात, व्हॅन्कूव्हरला, सिऍटलला, सेंट पीटर्सबर्गला, मॉस्कोत (भारतीय दूतावासात!) धुहलाताचे प्रयोगही झाले. पण नंतर कोव्हीडकाळात लॉकडाऊन आणि नंतर रोजच्या कामकाजाची धावपळ यांत अजून प्रयोग करणं लांबणीवर पडत गेलं. उत्तमोत्तम मुलाखती घेतल्या त्या पुण्यात अजून प्रयोग करू शकलो नाही याचं वाईट वाटतं, पण मित्रमैत्रिणींच्या सहकार्याने लवकरच प्रयोग करू शकू अशी आशाही आहे.
तोवर -' धुक्यात हरवलेले लाल तारे' यूट्यूबवर उपलब्ध आहे.
https://www.youtube.com/watch?v=cVdMpvMdNGE
या माहितीपटाची निर्मिती आणि त्यातील आशय ह्याबद्दल आपली मते आम्हाला अवश्य कळवावीत. आमचा पत्ता: १७ झूबोवस्की बुलेवार्द, मॉस्को, सोविएत संघ.
प्रतिक्रिया
.
मस्त उपक्रम आहे. माहितीपट नक्की पाहीन.
> आमचा पत्ता: १७ झूबोवस्की बुलेवार्द, मॉस्को, सोविएत संघ.
हा पत्ता सिरिलिकमध्ये लिहून द्यावा ही विनंती. म्हणजे पत्र पाठवणं सोयीचं होईल.
-----
- जयदीप चिपलकट्टी
(होमपेज)
उत्तम. रादुगा प्रकाशन आणि
उत्तम. रादुगा प्रकाशन आणि आणखी एक कोणते तरी पब्लिशिंग हाऊस यांची अनेक पुस्तके लहानपणी १९८०च्या दशकाच्या सुरुवातीला वाचलेली होती. त्यात सुंदर चित्रेही असत. ती बघण्यावर भर असे. एक वेगळेच जग त्यात असे. इथल्या जगापेक्षा ते जास्त सुंदर भासे. पुस्तक आणि एकूण सर्व अगदी उच्च क्वालिटी, रंगीत आणि गुळगुळीत असे. त्याबद्दल अद्भुत वाटले तरी आपल्या आसपासच्या जगाशी ते जुळणारे नसल्याने फक्त काही युनिव्हर्सल भावभावना सोडल्या तर इतर गोष्टी त्या वयात रीलेट होत नसत. काही चित्रे तर मला अजूनही आठवतात. अगदी लहान मुलांची पुस्तकेही होती.
याच सोबत साधारण त्याच काळात आपले हिंदी सिनेमे आणि विशेषतः मिथुन, जिमी जिमी आजा आजा वगैरे रशियात देखील पोचले आणि रुजले होते असे नंतर कळले. आजही गोव्यात एखाद्या लाईव्ह बँडच्या कार्यक्रमात जिमी जिमी गाणे असतेच. आणि रशियन (आता कमी झाले) हे त्यावर उसळून नाचू लागतात.
जिमी
हा त्या काळात ‘गरीबांचा अमिताभ’ म्हणून फेमस होता. अत्यंत दुय्यम दर्जाचा अॅक्टर!
पण मुळात जिमी ३ आजा ३ हे गाणे ढापलेले होते ना?
हे रशियन लोक चीप सब्स्टिट्यूट मिठुन आणि डुप्लिकेट जिमी ३ आजा ३वर असला आंबटशौक करावा लागण्याइतके डेस्परेट का असावेत बरे?
पण मुळात जिमी ३ आजा ३ हे गाणे
होच. अर्थातच.. पण ते ते ओके गाणे तिकडे न पोचता जिमी जिमी पोचले.
त्या काळी नेमके असे का झाले यावर एक छोटासा यू ट्यूब व्हिडिओ बघितला होता. शोधावा लागेल. थोडक्यात सांगणे अवघड.
बाय द वे, आता मिथुनदा दुय्यम अभिनेते मानले जात नाहीत. तेही महागुरू. आणि भारतात वयाने एकूण सर्वच.. म्हणजे रजनीकांत वगैरे पण ज्येष्ठ आणि सन्माननीय मानले जातात (म्हणजे दर्जेदार पण आलेच). लकी अली ज्येष्ठ चांगला गायक..
!
म्हणजे आम्ही पण ज्येष्ठ मआंजाकर... (च्यायला!)
O tempora o mores, कालाय तस्मै नम:, वगैरे.
असो चालायचेच.
इथून तिथून मिथुन
भारतीय सिनेमाच्या इतिहासात क्वचितच अभिनयगुण आणि लोकप्रियता यांचा संगम होत असतो. राजेंद्र कुमारसारखा मठ्ठ नट ज्युबिली किंग होता हे विसरू नये. राहता राहिला मिथुन, तर त्याचे सिनेमे भारतात त्या काळी प्रचंड लोकप्रिय होते. म्हणजे, मध्यमवर्गाला 'खट्टा मीठा' (१९७८) किंवा तत्सम पाणचट प्रकार आवडत असत त्या काळात 'सुरक्षा' (१९७९) किंवा डिस्को डान्सर१ (१९८२) अशा सुपरहिट फिल्म्स त्याने दिल्या.
१. ही जगभरात १०० कोटी गल्ला कमावणारी पहिली भारतीय फिल्म (म्हणे)
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
मिथुन चक्रवर्ती चा गुंडा सिनेमा
गुंडा ही एक लीगसी फिल्म आहे.
मला तर प्रश्न पडतो कि दस्तुरखुद्द मिथुन चक्रवर्ती ने त्यांचे किती सिनेमे बघितले असतील....
----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू
.
अत्यंत सुंदर उपक्रम !!