दी ब्लॉग ऑफ युजिनिया वॉटसन १

फॅनफिक्शनला दुय्यम दर्जाचं वाङ्मय मानलं जातं.

कुणीतरी आधीच जिवंत केलेली पात्रं आपण उचलून आपण त्यांत हवे तसे फेरफार करायचे आणि आपली अशी एक गोष्ट लिहायची, ही फॅनफिक्शनची व्याख्या मला कुणी सांगितली असती, तरी मीही तसंच मानलं असतं. पण शेरलॉकच्या निमित्तानं फॅनफिक्शनच्या संकल्पनेशी आतून - बाहेरून ओळख झाली, तेव्हा मला आपल्या रामायण - महाभारताची आठवण होणं अपरिहार्य होतं. मी ही महाकाव्यं कधीही मुळातून वाचलेली नाहीत. त्यांच्याशी माझी ओळख झालीय, तीच मुळी कुणीतरी सांगितलेल्या त्यांच्या कितव्यातरी आवृत्त्यांमधून. कुणाला त्यातला कर्ण नायक वाटतो, कुणाला कृष्ण. कुणाला राम थोर वाटतो, तर कुणाला रावण. कुणाला सीतेला देवी मानून पुजावंसं वाटतं, कुणाला शूर्पणखेवरच्या अन्यायात सामाजिक दडपणुकीचा इतिहास दिसतो. दृष्टिकोनागणिक बदलत जाणारी कथानकं. नि तरीही पात्रांचे मूळ स्वभाव अभंग राहतात. मुळच्या कथानकाचा सांगाडा तसाच्या तसा राहून त्यातून अनेकानेक रूपं साकारतात. या पात्रांना समजून घेण्याचे अनेक नवनवीन रस्ते त्यातून सापडत जातात.

हे मला नवं थोडंच आहे? नि याहून फॅनफिक्शन निराळी कुठे आहे?

याच टप्प्यावर मला मॅड लोरी नामक लेखिकेची ’दी ब्लॉग ऑफ युजिनिया वॉटसन’ ही गोष्ट सापडली. या गोष्टीतले शेरलॉक नि जॉन एकमेकांशी विवाहित आहेत नि त्यांना एक लेकही आहे. दोन पुरुषांचं जोडपं ही आजच्या सामाजिक व्यवस्थेत भिवया उंचावायला लावणारी बाब असली, तरी त्यांच्या लेकीसाठी ते वास्तव आहे. खेरीज ते तितकं दुःखी वा करुणही नाही. उलट मिश्कील, हसरं आणि तिच्यासाठी अभिमानाचं आहे. तिच्या नजरेतून तिला दिसणारी ही दोघा बापांची गोष्ट होती. काहीशी भाबडी, पर्युत्सुक, फॅण्टसीकडे झुकणारी होती. पण तरीही लोभसवाणी होती. बीबीसीच्या मालिकेतले जॉन नि वॉटसन हे आपल्याला समकालीन नि बरेचदा समवयस्क म्हणून भेटतात. पण हे चक्रम, हुशार आणि धाडसी तरुण बाप झाल्यावर त्यांच्या स्वभावातले काने-कोपरे, त्यांची बलस्थानं नि मर्यादा कशा उघड्या पडतात वा उजळून निघतात ते या गोष्टीतून पाहणं फार फार मजेचं, आनंदाचं होतं.

हा या गोष्टीच्या भाषांतराचा पहिला भाग -

***

थोडक्यातः

हा माझा ब्लॉग आहे. पण खरं तर तो ब्लॉग कमी, नि आज ना उद्या प्रचंड यशस्वी आणि प्रसिद्ध होणार्‍या माझ्या पुस्तकाचा पहिला खर्डा जास्त आहे, असंच मी मानते. पुस्तकाचं नाव आहे - जगावेगळ्या कुटुंबातलं माझं आयुष्य नि माझ्या आठवणी. तर - माझ्या आई-बाबाचा घटस्फोट झालाय. बाबा, बाबाचा नवरा, आई आणि मी - असे आम्ही एकत्रच राहतो. कसं वाटतंय? आत्ताशी तर फक्त सुरुवात आहे.
माझं नाव युजिनिया वॉटसन आहे. पण मला जिनी म्हणालात तरी चालेल. तर - हे असं आहे.
तळटीपः सध्या तरी ही पूर्ण झालेली गोष्ट आहे. या टप्प्यावर ती थांबवणं सोईचंही आहे. पुढे-मागे कदाचित त्यात भर घातली जाईलही.

प्रकरण १: १ सप्टेंबर

आज मी शाळेतून घरी आले तेव्हा माझं डोकं फिरलेलंच होतं. आधीच आज तास वैतागवाणे होते. नि मी माझ्या सावत्र बापावर - शेरलॉकवरपण अजूनही जरा भडकलेलीच होते, कारण तो तसाच वागला आहे. अर्थात रात्रीपर्यंत सगळं ठीक झालंच. घरी आल्या आल्या काहीतरी कुजल्याचा वास आला, की गोष्टी ठीकठाक झाल्याच म्हणून समजाव्यात.

कुजणार्‍या प्रेताचा वास जिला ताबडतोब आणि अचूक ओळखता येतो अशी माझ्या वर्गातली मी एकमेव मुलगी असेन, नक्कीच. पण खरंच, माणसाने तो वास आयुष्यात पहिल्यांदा जरी घेतला, तरी त्याला तो ओळखता येईलच. आपल्या आदिम मेंदूला इशारा देणारं काहीतरी त्या वासात असतं - 'शिट, कुणीतरी मेलंय, पळा...'. म्हणून तर घराच्या जवळपास कुजणारी प्रेतं असणार असतील, तर आमच्या घरात काही नियम पाळावे लागतात. ते नियम घालून देण्यात मी माझा बराच वेळ खर्च केलाय. अर्थातच. मला बाथरूममधे रासायनिक प्रयोग करायला परवानगी मिळणार नसेल, तर घरात कुजणार्‍या प्रेतांचा वास येता कामा नये ही माझी अपेक्षा चुकीची कशी असेल?

आज बहुतेक हा नियम धाब्यावर बसवला गेला होता. घरात पाऊल टाकता क्षणीच मला वास आला. "ईईईSSSSSSईईई" किंवा तत्सम काहीतरी किंचाळत, तोंडानं श्वास घेत मी धावतच वर गेले.

आमच्या फ्लॅटचं दार उघडून मी ओरडले, "आई! प्रेताचा वास येतोय!"

दडादडा पावलं वाजली, कुठेतरी काहीतरी पडल्या-झडल्याचे आवाज आले नि पाठोपाठ आई हॉलमधून बाहेर आली. नुकतंच न्हायल्यामुळे ओले केस आणि हातात हाSSS कपड्यांचा बोळा. "सॉरी, सॉरी. तू घरी यायच्या आत मला हे सगळं साफ करायचं होतं."

"पण तू म्हणाली होतीस, हे कुजणारे कपडेपण तू लॅबमधे ठेवून येणार आहेस. यक्स.."

"हो गं, पण..."

"गेल्या दोन-एक दिवसांत एखादं वास मारणारं प्रेत आलं असणार तुझ्याकडे. नि तुला तुझे लॅबमधले कपडे धुवायला वेळच मिळाला नसणार. त्यामुळे तिथे बदलायला कपडेच उरले नसणार. म्हणून तू हे घरी घेऊन आल्येस."

एक भिवई उंचावून आई माझ्याकडे बघत राहिली. "कारण माहीत आहे म्हणजे तुला. मग आरडाओरडा करू नकोस उगाच."

"हेल्लो. गेल्या आठवड्यात आपल्या ठरलेल्या वेळापेक्षा अर्धा तास उशीर झाला मला यायला. माझ्याकडेपण कारण होतं. तरी आरडाओरडा झालाच."

"ठीक आहे, ठीक आहे. मी जातेय कपडे घेऊन खाली लॉण्ड्रीत." मला उडवून लावत आई म्हणाली.

"मी काहीतरी सुगंधी लावते." थोडा नागचंपाचा वास नि उघडलेल्या खिडक्या एवढ्यानं काम भागतं, ते गचाळ कपडे तस्सेच साठवून न ठेवता नाहीसे केले तर.

तेवढ्यात शेजारच्या फ्लॅटचं दार उघडलं नि काहीतरी बोलत शेरलॉक बाहेर आला. शेरलॉकच्या चालीचं वर्णन करणं कठीण आहे. त्याच्यामागे एखाद्या अदृष्य राजवस्त्राचा दिमाखदार घोळ रुळत असावा असा भास होतो, इतकंच म्हटलं तरी पुरे. तो नाक मुरडून म्हणाला, "प्रेताला सुटलेल्या पाण्याचा वास आहे हा," मग ओरडत, "हो ना, ग्रेस?"

"हो रे बाबा, हो!" जिन्यावरून खाली तळघरात जाता जाता आई ओरडून म्हणाली.

"जॉन कुठाय?" शेरलॉकनी मला विचारलं.

"मला माहीत नाही."

"पण तुला कायम माहीत असतं." माझ्याकडे रोखून बघत शेरलॉक म्हणाला.

"तो 'तुझा' नवरा आहे."

"हो, पण म्हणून त्याच्या नि माझ्या मेंदूला जोडणारी तार वगैरे अस्तित्वात नाहीय."

"माझ्यापण नाही. त्याला टेक्स्ट कर नि विचार."

"विचारलं. त्याचं उत्तर नाही आलं."

"किमान पाच सेकंदं तरी वाट पाहिलीस? नाही ना? अर्थात." मी हे म्हणायची वाट पाहत असल्यासारखा, नेमका त्या क्षणी त्याचा मोबाईल गुरगुरला. त्यानं वैतागून मोबाईल पाहिला.

"ओह, तो टेस्कोमधे थांबलाय."

"पाहिलंस? आपल्याला आला असता अंदाज?"

"तू अजूनही माझ्यावर रागावलेली आहेस, मला दिसतंय."

तुम्हांला काय वाटत असेल, ते मला कळू शकतं. दुष्ट सावत्र बाप, बंडखोर वय. एरवी तिच्या आई - बापानं परत एकत्र यायचं ठरवलंही असतं. पण आता हा 'मधे आलेला' माणूस घरात घुसल्यावर ते शक्यच नाही. बघू या, ती कसा मुकाबला करते याच्याशी. इत्यादी इत्यादी. तसं काही नाहीय. ही सगळी घासून गुळगुळीत झालेली वर्णनं मला लागू पडत नाहीत. मला शेरलॉक खूप खूप खूप आवडतो, कारण मुळात तो दुष्ट नाहीय (ओके, निदान छळ वगैरे करणारा तरी नाहीय) नि माझ्यासाठी तो परकाही नाहीय, माझ्या जन्मापासून मी त्याला बघत आलेय, शिवाय माझ्या घरात घुसलेला नाहीये तो, माझं घर अगदी व्यवस्थित आहे, थॅन्क्यू व्हेरी मच. आणि हो, माझ्या आई-बाबाला 'परत' एकत्र यायची काही गरजही नाही, त्यांचं तसंही चांगलं जमतं. फक्त ते आता एकमेकांचे नवरा - बायको नाहीयेत, इतकंच.

माझं शेरलॉकवर प्रेम आहे, म्हणून मी त्याच्यावर अजूनही चिडले आहे. काल मी 'लंडन चेस क्लासिक'मधे खेळायला उतरले होते. ज्युनिअर डिव्हिजन नाही, रेग्युलर. आमच्या फील्डमधली मी सगळ्यात लहान खेळाडू आहे. बाकीचे सगळे माझ्याहून किमान तीन वर्षांनी मोठे आहेत. मी गणितात मठ्ठ असेन, इतिहासाचा मला वैताग येत असेल, पण बुद्धिबळात मला कुणी नडू नये. इए-ओ रेटिंगमधे मी नुकताचा २४०० चा स्कोअर क्रॅक केला. चांगल्या तुल्यबळ फील्डमधे अजून थोड्या स्पर्धा जिंकल्या, की मी आंतरराष्ट्रीय मास्टर होईन. लंडन क्लासिक ही फक्त एक पायरी होती. त्यात मी जिंकीन असं मला वाटलं नव्हतंच (आणि मी जिंकलेही नाही), पण मी मस्त खेळले. माझं रेटिंगपण सुधारलं.

तर - कालचा दिवस महत्त्वाचा होता. सगळे जण आले होते. आई, बाबा, ऑण्ट एडेल नि बाकीचे सगळे मामा-मावश्या-काका वगैरे. हडसन आजी, पेप्रिज आजोबा नि आजी, मेट्सी आणि झेक. माझ्याबद्दल ज्यांना काही वाटतं, असे सगळे. माझे दोन आवडते शिक्षकपण आले होते. माझ्यासाठी महत्त्वाचा असणारा प्रत्येक माणूस तिथे हजर होता. शेरलॉक सोडून. ज्याने मी चार वर्षांची असताना मला आयुष्यात पहिल्यांदा बुद्धिबळाचा पट मांडून दिला, ज्याने माझ्यासाठी प्रशिक्षक शोधला आणि मी स्पर्धेत उतरलं पाहिजे हे आई-बाबाच्या गळी उतरवलं, तो शेरलॉक. तो तिथे असायला हवा होता. त्यानं मला तसं वचन दिलं होतं. पण तो आलाच नाही. त्याला म्हणे काम होतं. नेहमीप्रमाणेच. सोळा वर्षांत मला त्याची सवय व्हायला हवी होती, असं तुम्ही म्हणाल. झालीय मला सवय. पण एका गोष्टीची मात्र मला सवय नाही झालेली अजून. शेरलॉकमुळे मला वाईट वाटलंय, असं वाटून बाबाचा चेहरा पाSर पडतो. त्याला वाटतं, ही त्याचीच चूक आहे. या गोष्टीची मला कधी सवय होणारही नाही, कारण माझा बाबा माझा जगातला सगळ्यात लाडका माणूस आहे.

आणि वरून 'अजून रागावली आहेस का'. मी लक्षच दिलं नाही. सरळ नागचंपाची उदबत्ती लावण्यात गुंग झाल्यासारखं दाखवलं.

"तुला ऐकून बरं वाटणार असेल तर एक सांगू का? तुझा बाबा माझ्याशी अजूनही बोलत नाहीय."

"च्यक्. मला नाही बरं वाटत," मी वळून म्हटलं, "आपल्याला एक कुटुंब आहे, हे तुझ्या डोक्यात कधी शिरेल याची वाट बघून बघून आम्ही सगळे कंटाळून गेलोय आता."

"कुटुंब जॉनचं आहे. मी आपला... नुसताच आहे."

मी आ वासून त्याच्याकडे बघत बसले. यावर काय बोलावं ते मला कळेचना, म्हणून वैतागून त्याच्या खांद्यावर जोरात गुद्दा मारला. "ओय!" लहान मुलासारखा हात चोळत चोळत शेरलॉक म्हणाला, "का मारलंस?"

"तू मूर्ख आहेस म्हणून! तूपण माझा बाप आहेस, हे तू नाही नाकारू शकत!"

"मी तुझा बाप नाहीय."

"हो का? मग बाबा लाजून नुसता चाचरत होता, तेव्हा मला सेक्सबद्दल कुणी सांगितलं सगळं? आईनी काहीतरी थातुरमातुर सोवळी माहिती सांगितल्यावर मला खरीखुरी ड्रग्सची माहिती कुणी सांगितली? लंडनमधल्या सगळ्या आडगल्ल्या कुणी दाखवल्या मला? नि स्लिपनॉट कशी बांधायची ते? नि विज्ञान प्रदर्शनात बटाट्याच्या बॅटर्‍या कश्या बनवायच्या ते?" माझ्या डोळ्यांतून पाणी यायला लागलं. असं मला अजिबात आवडत नाही. पण हे बोलणं महत्त्वाचं होतं. "रात्री-बेरात्री घाबरून उठले, तर तूच व्हायोलीन वाजवायचास मला परत झोप लागेपर्यंत. मला पुस्तकातल्या गोष्टी वाचून दाखवताना कसले कसले भारी आवाज काढायचास. तू आमच्या कुटुंबात नाहीस, वगैरे बकवास मला सांगूच नकोस तू. ओके?"

तो जरा शरमला असावा. "पण मी करायचोच हे सगळं. मी नाही कुठे म्हणतोय, जिनी?" तो नाही नव्हताच म्हणत. तेच तर. पण तो आम्हांला त्याचं कुटुंब मानतच नव्हता. आम्ही 'त्याला' आपलं म्हणू, ही कल्पनाच त्याच्या पचनी पडलेली नव्हती, इतक्या सगळ्या वर्षांनंतरही.

माझा आरडाओरडा करून झाला होता. शेवटी मी त्याच्या गळ्यात पडून मी त्याला घट्ट मिठी मारली. शेरलॉकला मिठी मारल्यावर बाबाला मिठी मारल्यासारखं नाही वाटत. बाबाला मिठी मारल्यावर कसं ऊबदार, गुबगुबीत, मऊ-मऊ वाटतं. शेरलॉकच्या मिठीत एखाद्या बर्‍याच पायांच्या काटकुळ्या प्राण्याला मिठी मारल्यासारखं वाटतं. नुसती हाडं. पण त्यानं मला घट्ट कवळून टाकलं आणि मग मला मजा वाटलीच. त्याचे हात माझ्या डोक्यामागे नि माझं डोकं त्याच्या हनुवटीला जेमतेम टेकणारं. परफेक्ट. "मला यायचं होतं, खरंच." हळूच तो म्हणाला.

"मला माहीत आहे."

"जॉन म्हणाला तू मस्त खेळलीस."

"तिसरा नंबर. अजून १५ रॅन्क पॉईण्ट्स मिळाले."

"गुड गर्ल. त्या यड्या राईखमानला हरवलंस का?"

मला हसू फुटलं. "बेचाळीस चालीत."

"नोट्स घेतल्या असशीलच."

"तर. बघायच्या आहेत?"

"म्हणजे काय?"

इतक्यात कसलासा आवाज झाला म्हणून आम्ही दोघांनीही वर पाहिलं. '२२१बी'च्या दारातून आमच्याकडे बघत बाबा उभा होता.

बाबाला हातानं जवळ बोलावत मी म्हटलं, "ये ना बाबा. मी त्याला माफ केलं. आता तुलापण करावं लागेल."
बाबा जवळ येऊन क्षणभर उभा राहिला. "त्यानं माफी मागितली तुझी?" मला विचारलं. शेरलॉक बाबाकडे अगदी दीनवाणं तोंड करून बघत होता, तरी बाबानं शेरलॉककडे दुर्लक्ष केलं. शेरलॉक हा एक थंड, हृदयशून्य माणूस आहे असं म्हणणार्‍या लोकांनी त्याला बाबाकडे असं बघताना पाहिलं पाहिजे.

"हम्म. थोडंफार तसंच."

"मग बहुतेक तेवढं पुरे," मान हलवत बाबा म्हणाला. मग मी त्यालापण मिठीत ओढलं. शेरलॉक निसटू बघत होता, पण बाबानं त्याला जाऊ दिलं नाही. "अहं. इतकं हलकटासारखं वागल्याबद्दल हीच शिक्षा तुला. चुपचाप थांब इथे."

शेरलॉकनं एक मोठ्ठा नाटकी सुस्कारा सोडला. "तुम्ही दोघेही दुष्ट आहात."

"बाबावर गेलेय मी." मी म्हटलं.

माझ्या कपाळावर ओठ टेकत बाबा लग्गेच म्हणाला, "कुठल्या?"

नंतर गोष्टी जरा हाताबाहेरच गेल्या असं म्हटलं तरी चालेल. आईपण वर आली नि आम्हांला हे असं बघून एकदम हळवी झाली. मग आम्ही सगळेच एकमेकांना मिठी मारायचा प्रयत्न करत होतो नि तेवढ्यात शेरलॉकला तो बाबाला नेमका कशासाठी शोधत होता (तंबाखूच्या थुंकीबद्दल काहीतरी होतं, काय ते नका विचारू) ते त्याला आठवलं. तेव्हाच बुद्धिबळातल्या माझ्या रेटिंगबद्दल माझ्याशी बोलायला एका बातमीदाराचा फोन आला नि मी बुद्धिबळ खेळत असले तरी अगदीच कुक्कुलं बाळ नसल्यामुळे बहुतेक त्याला मी इतकी काही भारी वाटले नसणार. मग मी नि आई उरलं-सुरलं काहीतरी खायला शोधू या म्हणून गेलो. नंतर त्या तंबाखूच्या थुंकीतलं काही कळतंय का ते बघायला मी ’२२१बी’मधे गेले होते - काहीतरी गूढ होतं त्याच्यात, नक्की - पण बाबा नि शेरलॉकला त्यांच्या कोचावर बसून किस करताना बघून मागे फिरले.

तसल्या थुंकीबद्दल मला काही माहिती नको होती. देवा, मी हे काय खरडतेय! अशानं मी आठवडाभर इथेच लिहीत बसीन.

या ब्लॉगिंगनं दमायला होतं. बाबा कसं काय करतो काय माहीत. तो याच्यापेक्षा किमान दसपट तरी लिहितो आणि शिवाय त्यांच्या केसेसमधले एकूण एक तपशीलपण लिहितो. हे सगळं फक्त दोन तासांपूर्वी घडलंय नि मला आत्ताच नेमके शब्द काय होते ते आठवत नाहीयेत. काही काही वाक्यं मी माझ्या शब्दांत लिहिली आहेत, मला मान्य आहे. पण 'मी तुझा बाप नाहीय' असं शेरलॉक म्हणाल्यावर मी त्याच्यावर जे काही ओरडलेय त्यातला शब्द न् शब्द माझ्या पक्का लक्षात आहे.

बहुतेक मी रात्रभर इथेच बसणार आहे. आता एवढ्यात मेट्सीचा फोन येईल. तिला तिच्या कवितेच्या वर्गाबद्दल कुरकुर करायची असेल. तुम्हांला त्याबद्दल वाचायला नाही आवडणार, खरंच.

क्रमशः

***
- भाषांतरासाठी लेखिकेची संमती आहे. तरीही यातल्या सगळ्या बलस्थानांचं श्रेय लेखिकेचं आहे आणि मर्यादांचं वा चुकांचं अपश्रेय माझं आहे, हे इथं नमूद करते.
- हे भाषांतर मी 'ऐसी अक्षरे'सोबत इथेही प्रकाशित करते आहे. यांत 'ऐसी'च्या कुठल्या नियमांचा भंग होत असेल, तर हे इथून उतरवून घेतलं तरी चालेल.
- सुधारणा / सुचवण्यांचं अर्थातच स्वागत आहे.

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

गंमतीदार वाटला युजिनियाचा ब्लॉग. नेहमीच्या शेरलॉक आणि वॉटसनना वेगळ्याच भूमिकेत पाहताना (म्हणजे वाचताना) थोडं अडखळल्यासारखं झालं खर .. पण लिहिण्याची शैली आकर्षक असल्याने हा नवा चष्मा पण गंमतीचा वाटला. पुढचे भाग वाचायला आवडतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाचताना गंमत वाटली, पण खूप नाही. अजून थोडं वाचायला आवडेल अशी काहीशी उणीव वाटली. (आणि बहुदा 'अजून थोडं हवं' हे संपणार नाही.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हो, गंमतीदार आहेत व्यक्तिरेखा. नि मलापण शैली फार फार आवडली. ती मराठीत आणणं अशक्यच. पण प्रयत्न करायला मजा येते आहे. एकूण २८ प्रकरणं आहेत. जमेल तसतशी भाषांतरित करायचा प्ल्यान आहे. पाहू.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

ब्लॉगमागची संकल्पना मस्त आहे. भाषांतरही छान झालंय. पुढील भाग वाचण्याची उत्सुकता आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गंमत वाटली वाचून
पण असाही शेरलाँक आवडला

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

सवडीने वाचेन. तुर्तास पोच

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मला कल्पनाच आवडली! भाषांतरही नेटके झाले आहे. उत्तरोत्तर अधिक सहजपणा येत जाईलच. पुढील दोन भाग प्रकाशित केले आहेतच आता ते वाचतो

अवांतरः
१. 'शिट', 'यक्स' खटकलं त्याऐवजी 'आईशप्पत!/बापरे!' आणि 'शीऽऽ!' कसं वाटेल? (मराठीत इतरत्र इंग्रजी शब्द चालतील (मला चालतात) मात्र उद्गारदर्शक संबोधनं खास मरठी हवीत असं माझं मत)
२. नागचंपा! हा हा! किती दिवसांनी हा शब्द वाचला! मजा आली

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!