वैद्यकीय क्षेत्रातील माध्यमकल्लोळ
वैद्यकीय क्षेत्रातील माध्यमकल्लोळ
- डॉ. अमेया कुलकर्णी-कनाकिया
काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. माझ्या ओपीडीमध्ये एक पेशंट फॉलोअपसाठी आली होती. तिच्या गर्भाशयात एक फायब्रॉईड (मासपेशींचा गोळा) होता ज्यात कर्करोगाच्या पेशी आढळून आल्या होत्या. साधारण एक लाख फायब्रॉइडच्या केसेसपैकी एखाद्या केसमध्येच कर्करोग निघतो, पण जर निघाला तर मात्र तो पटकन वाढणारा असा ‘आक्रमक’ कर्करोग असतो. त्यामुळे ऑपरेशननंतर या कर्करोगाला कीमोथेरपी निश्चितच लागते. पण माझ्यासमोर बसलेली पेशंट मला खात्रीशीर सांगत होती की डॉक्टर आता पुढे काहीही करायची गरज नाही कारण माझा उरलेला कर्करोग बरा होण्यासाठी आता मी रोज गाजराचा रस पिते. कॅन्सरसाठी गाजराचा रस? मी थक्कच झाले! मी पुढे काही समजवायच्या आत मला तिनं, "डॉक्टर तुम्ही व्हॉट्सॲप वापरत नाही का? व्हॉट्सॲपमधे एक फॉरवर्ड आला होता त्यात असं लिहिलेलं होतं. तुम्हाला नाही आला का मेसेज? मी पाठवू का तुम्हाला?", असं विचारलं. मी कपाळावर हात मारून घेतला. पुढे काही महिन्यांनी तिचा कर्करोग वाढला आणि ती दगावली. ‘व्हॉट्सॲप फॉरवर्ड'नं एका डॉक्टरच्या डोळ्यांदेखत एक बळी घेतला. असे कित्येक जीव त्या आणि त्यांसारख्या अनेक 'फॉरवर्डांनी' घेतले असतील. गणना अशक्य आहे!
काही दिवसांपूर्वी मलादेखील व्हॉट्सॲपवर निसर्गोपचार करणाऱ्या एका बाईंचा व्हिडिओ आला. गर्भाशयाच्या तोंडाच्या कर्करोगाची लस कशी चुकीची आहे; हा कर्करोग कसा अत्यंत दुर्मीळ आहे; आणि कसा हा सगळा ऊहापोह चुकीचा आहे याबद्दल बाई बोलत होत्या. गर्भाशयाच्या तोंडाचा कर्करोग दुर्मीळ असणे तर सोडाच, पण गर्भाशयाच्या-मुखाच्या कर्करोगाच्या जगभरात आढळणाऱ्या केसेसपैकी एक चतुर्थांश केसेस भारतातच आढळतात. आपलं सरकार, आरोग्यसेवेसाठी जो काही तुटपुंजा निधी देत असेल त्यातही ‘सर्व्हायकल कॅन्सरमुक्त भारत’ (सर्व्हायकल कॅन्सर – गर्भाशयमुखाचा कर्करोग) असं अभियान राबवतंय. या अभियानाअंतर्गत गर्भाशयमुखाच्या कर्करोगाची चाचणी एका साध्या ओपीडीमध्ये होऊ शकणाऱ्या 'पॅप स्मिअर टेस्ट'नं केली जाते आणि कर्करोगावरच्या लशीबद्दल माहिती दिली जाते. आता तुम्ही म्हणाल, कर्करोगासाठी लस कशी काय? तर हा कर्करोग ‘ह्युमन पॅपिलोमा’ या संसर्गजन्य व्हायरसमुळे होतो. त्यामुळे या व्हायरसवर लस घेतल्यानं आजार होण्याची शक्यता कितीतरी पटींनी कमी होते. जिथे सरकार आणि डॉक्टर ही गोष्ट लोकांपर्यंत पोचवण्याचा कसोशीनं प्रयत्न करत आहेत, तिथे सोशल मिडियावरून पसरणाऱ्या या माहितीमुळे नुसतं नुकसानच होत नाही तर डॉक्टरकी करणं म्हणजे पैसे उकळण्याचे धंदे आहेत असा गैरसमजही समाजात पसरतो.
आता लशींच्या मुद्द्यावर आलोच आहोत तर लहान मुलांना जन्मापासून काही ठरावीक अंतरानं देण्यात येणाऱ्या अत्यावश्यक लशींविरुद्धदेखील सोशल मिडियावर अनेक गट सक्रिय आहेत. पाश्चात्य देशांतल्या अनेक प्रसिद्ध व्यक्तीदेखील अशा 'अँटी व्हॅक्सिन’ गटांमध्ये सक्रिय आहेत. विशेषतः अमेरिकेत अशी एक मोठी लॉबीच आहे जिनं वैद्यकीय व्यवस्थेच्याच नाकी नऊ आणले आहेत. भांडवलशाही स्वतःच्या फायद्यासाठी आपल्या तान्ह्या बाळांच्या शरीरात विष टोचते आहे, असा जहाल आणि कोणत्याही निरागस व्यक्तीला भीती वाटावी असा प्रचार केला जातो. परिणामी अनेक पालक मुलांना लशी टोचत नाहीत. आता यावर, "त्यांचं मूल, त्यांचा निर्णय!" असं म्हणता येईलच. पण संसर्गजन्य आजारांना रोखण्यासाठी असा व्यक्तिकेंद्री बाणा उपयोगाचा नाही. समाजात (शाळेत, खेळाच्या मैदानावर, बागेत) एकत्र खेळणाऱ्या, वावरणाऱ्या जास्तीतजास्त मुलांनी लस घेतली असेल तरच त्या रोगाचा अटकाव आणि निर्मूलन होऊ शकतं. आपल्या देशात गेली अनेक दशकं पोलिओ निर्मूलनाची अशी मोहीम यशस्वीपणे राबवली जात आहे. खेड्यापाड्यांतल्या घरांच्या, गोठ्यांच्या भिंतींवर आजही, पोलिओ लशीची माहिती पांढऱ्या रंगानं रंगवलेली दिसते. गरीब, अशिक्षित लोकांना लसीकरणाचं महत्त्व पटवून देण्यासाठी आजवर आलेल्या प्रत्येक सरकारनं पैसा आणि साधनं खर्ची घातली आहेत. खरं तर, लसीकरणाचा असा एक स्वतंत्र इतिहासच आहे. मोठमोठ्या शास्त्रज्ञांनी आपल्या जिवाची परवा न करता हे शोध लावले आहेत. आज एका रीलसरशी आपण अनेक शतकांच्या अथक प्रयत्नांवर पाणी ओततो आहोत. याचा परिणाम असा की ज्या संसर्गजन्य आजारांचं काही दशकांपूर्वीच निर्मूलन झालं होतं, (उदाहरणार्थ: गालगुंड, गोवर), ते आता अमेरिकेसारख्या प्रगत देशांतही पुन्हा आढळू लागले आहेत.
प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र मत असण्याची मुभा आहेच. पण विज्ञानानं, संख्याशास्त्रानं आधीच सिद्ध केलेल्या गोष्टींबद्दल चुकीची मतं असणारे लोक समाजमाध्यमांच्या आधारे ती झटकन पसरवू शकतात. त्यात 'निसर्ग' विरुद्ध 'रसायनं'; 'भांडवलशाही' विरुद्ध 'सामान्य माणूस'; 'पारंपरिक' विरुद्ध 'आधुनिक' अशी मांडणी असते तेव्हा तर ती वाऱ्यासारखी पसरतात. आमच्या क्षेत्रात ही मोठ्या चिंतेची बाब होत चालली आहे. कारण, या माध्यमांवर असलेल्या प्रत्येक स्वयंघोषित 'तज्ज्ञा'ला विरोध करायची क्षमता वैद्यकीय व्यवस्थेत नाही. आणि अशा माहितीमुळे होणारी उपचारांची धरसोड, एक डॉक्टर म्हणून आणि एक माणूस म्हणूनदेखील पाहवत नाही.
अर्थात प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात तशा यालादेखील आहेतच. प्रसूतितज्ज्ञ म्हणून मी जेव्हा काही गोष्टी बघते तेव्हा सोशल मिडियाचं एक महत्त्वाचं सत्कार्य पटकन डोळ्यासमोर येतं. ते म्हणजे माध्यमांवरचे 'माता गट' (mommy groups). फेसबुकवर खास नवमातांसाठी म्हणून तयार झालेले हे गट बाईच्या आयुष्यातल्या अत्यंत महत्त्वाच्या काळात तिला आधार देताना मी बघितलेलं आहे. शहरी, सधन आणि विभक्त कुटुंबपद्धतीतल्या मातृत्वात इतका एकटेपणा असेल अशी कल्पनादेखील आधी डोक्यात येत नाही. घरात बाळ येणार म्हणजे सगळ्यांना, विशेषतः आईला आनंदच होणार हे गृहीत धरलेलं असतं. पण तसं खरंच असतं का? आपण बाळाला जन्म देतो तेव्हा आपण आयुष्यभराच्या एका काळजीलाही जन्म देत असतो. ही चिंता पहिल्या स्तनपानापासूनच सुरु होते. बाळाचं पोट भरतंय ना? त्याला पुरेसं दूध मिळतंय ना? त्याचं वजन योग्य गतीनं वाढतंय ना? या सगळ्या चिंता तर असतातच, पण आपलं बदललेलं शरीर; नऊ महिने स्रवलेल्या संप्रेरकांमध्ये अचानक झालेले बदल – या सगळ्यांमुळे कधीकधी नैराश्यदेखील येतं. कितीही सुखवस्तू घरात बाळंतपण झालं असलं तरी बाळ झाल्यानंतरच्या पहिल्या काही महिन्यांमध्ये आई आणि मूल हे संयुग एकाकीच असतं. अशा वेळी आपल्यासारख्याच परिस्थितीतून जाणाऱ्या आपल्या परिघातल्या, देशातल्याच नव्हे तर अगदी जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातल्या बायका आपल्या हातातल्या फोनमध्ये असण्याचा एक वेगळाच आधार असतो. या बायका क्लिनिकमध्ये येतात तेव्हा त्यांच्या बारीकबारीक चिंतांना उत्तरं द्यायला आम्हाला वेळ नसतो. आणि आमच्या दृष्टीनं त्या चिंता महत्त्वाच्याही नसतात. कामाच्या रेट्यात प्रत्येक पेशंटकडे सहानुभूतीनं बघणं शक्य होत नाही. मी स्वतः आई झाल्यावर, क्लिनिकमधली असलेली डॉक्टर 'मी' आणि माझ्या मुलीची आई असलेली 'मी' या दोन जगांमधला फरक मला प्रकर्षानं जाणवला. मीदेखील त्या काळात सोशल मिडियाकडेच वळले. समाजमाध्यमांमुळे स्तनपानाबद्दल भरपूर जनगागृती झाली. आणि अनेक देशांमध्ये मातृत्वासाठी म्हणून देण्यात येणाऱ्या पगारी रजेचा कालावधीदेखील अलीकडे वाढवण्यात आला आहे.
पण यातही बुचकळ्यात टाकणारी गोष्ट म्हणजे बाळानं जास्तीतजास्त स्तनपान करावं असा टोकाचा आग्रह धरणारी एखादी आईच लसीकरणाला विरोध करत असते. आणि हे वाचणारी एखादी रजा न मिळालेली बाई, आपल्या बाळाला आपण स्तनपान देऊ शकत नाही म्हणून जगाच्या एखाद्या कोपऱ्यात खंतावत असते. आपल्यासमोर येणारी ही महासागरासारखी माहिती आपण आपल्या कुवतीप्रमाणे आणि मानसिक स्थितीनुसार पचवत असतो. माहिती देणाऱ्या व्यक्तींचे पूर्वग्रहदेखील त्या माहितीला आकार देत असतात. त्यामुळे, मुद्देसूद आणि पूर्वग्रहविरहित माहिती मिळणं अत्यंत गरजेचं आहे.
अलीकडेच आपण कोव्हिडच्या रूपात एक जागतिक संकट अनुभवलं. एखाद्या व्यक्तीला प्रत्यक्ष भेटणं हेच आजाराला निमंत्रण देणं ठरू लागलं त्या काळात आपल्याला सोशल मिडियानं तारून नेलं. या काळात सोशल मिडियामुळे, कोणत्या इस्पितळात जागा आहे, प्राणवायू कुठे उपलब्ध आहे अशा मोठ्यामोठ्या गोष्टींपासून, भाजी, वाणसामान अशा लहानलहान गोष्टींसाठीदेखील आपण सर्रास सोशल मिडिया वापरायला शिकलो. पण या अवलंबित्वाची पुढची पायरी, आज चार-पाच वर्षांनी आपण बघत आहोत. नुकत्याच चालायला आणि बोलायला शिकणाऱ्या लहान मुलांपासून ते अगदी साठी ओलांडलेल्या ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांनाच सोशल मिडियाचं व्यसन लागलेलं बघायला मिळतं. आपल्या एका बोटाच्या टोकावर माहितीचा महासागर असला तरी त्यातलं काय खरं काय खोटं हे ठरवण्याचा विवेक आपल्याजवळ नाही. माणूस असण्याचा कितीही अभिमान बाळगला तरी शेवटी मानवाचा मेंदू ठरावीक प्रकारचं उत्तेजन मिळाल्यावर ठरावीक संप्रेरक सोडणारं एक यंत्रच आहे. त्या क्षमतेचा अतिवापर केला तर ते यंत्रही कोलमडून पडणार. आपले सतत किणकिणारे फोन आपल्या मेंदूत डोपामिन या संप्रेरकाची निर्मिती करत असतात. डोपामिनमुळे आपल्याला क्षणिक आनंद अनुभवायला मिळतो. त्या संप्रेरकाचा परिणाम कमी झाल्यावर खिन्नताही तितक्याच तीव्रतेने जाणवते. आणि दिवसभरात सारखंच आपल्याला असं आनंदी वाटावं यासाठी मेंदू पुन्हापुन्हा फोनकडे वाळू लागतो. पण मेंदूत सतत चाललेल्या या चढाओढीमुळे 'कॉर्टिसॉल' हे चिंता आणि तणाव उत्पन्न करणारं संप्रेरकही अधिक प्रमाणात स्रवू लागतं. त्यामुळे घालमेल, चिंता, अवास्तव भीती अशा भावनादेखील वाढीस लागतात. कोचावर किंवा पलंगावर पडून आपण एक एक धावती चित्रफीत पुढे ढकलत असतो तेव्हा आपल्या मेंदूत एवढी उलाढाल होते आहे हे आपल्या लक्षातच येत नाही.
PCOS (polycystic ovarian syndrome) हे स्त्रियांच्या अंडाशयाशी संबंधित असलेल्या अनेक व्याधींना एकत्रितपणे दिलेलं एक नाव आहे. वजनवाढ, अनियमित मासिक पाळी आणि गर्भ राहण्यास विलंब ही या व्याधीची उघडपणे दिसणारी/लक्षात येणारी काही लक्षणं. माझ्या क्लिनिकमध्ये येणारी PCOSची प्रत्येक पेशंट, रात्री उशिरापर्यंत फोनवर काही तरी बघत जागत बसते अशी कबुली पहिल्याच भेटीत देते. झोप नीट न झाल्यामुळे संप्रेरकांचं संतुलन बिघडतं. ते बिघडल्यामुळे वजन वाढतं. रात्री उशिरापर्यंत जागण्यानं पुरेसा व्यायाम मिळत नाही. आणि शारीरिक हालचाल आणि आहार यांतलं संतुलन बिघडल्यानं इन्सुलिन या संप्रेरकाच्या कार्यक्षमतेमध्ये बिघाड होतो. तरुणपणी या गोष्टी दुरुस्त केल्या नाहीत, तर चाळिशीनंतर मधुमेह, रक्तदाब अशा व्याधी हमखास जडतात. गंमत म्हणजे ज्या क्षणिक आनंदासाठी आपण तासंतास समाजमाध्यमांवर वेळ घालवतो, तसाच आनंद आपल्याला व्यायामातूनही मिळू शकतो. पण माणसाचा कल नेहमी कमीतकमी कष्टांत जास्तीतजास्त फायदा मिळवण्याकडे असतो. लहान वयातच अशा दुष्टचक्रात अडकलेल्या पेशंटना औषधांपेक्षा योग्य माहितीची गरज जास्त असते.
या सगळ्यावर उपाय काय? आपण याकडे नुसतं बघत बसावं आणि हळहळावं का? एखाद्या डॉक्टरनं आपल्या कामाची जाहिरात करायला समाजमाध्यमांचा आधार घ्यावा हे थोडं विचित्रच वाटतं. समाजमाध्यमं हा कलाकारांचा आणि अलीकडे ज्यांना 'इन्फ्लुएन्सर' म्हणतात त्यांचा प्रांत! डॉक्टरनं धीरगंभीर असावं. आपला चष्मा नाकावरून वर सरकवून विशेष न बोलता चिठ्ठी लिहून द्यावी. तरच औषधाला गुण येतो! पण मी आणि माझ्या काही मित्रमैत्रिणींनी या साच्यातून बाहेर पडायचं ठरवलं. लोकांना योग्य माहिती देण्यापेक्षा अधिक प्रभावी कोणती जाहिरात असू शकेल? म्हणून आम्हीदेखील 'रील' करू लागलो.
चाळीशी आली!
अनेक डॉक्टर आहेत ज्यांच्या इन्स्टा प्रोफाइलवर योग्य माहिती मिळू शकते. व्हॉटसॅप किंवा फेसबुकवर ज्यांच्याकडे त्या विषयातलं शिक्षण किंवा पदवी नाही अशा लोकांचं ऐकण्यापेक्षा थेट डॉक्टरांचं ऐकावं! अर्थात, आम्हीदेखील माणसंच आहोत. त्यामुळे प्रसिद्धीच्या आहारी जाण्याचा धोका आम्हालाही असतोच. तरीही, काही आवर्जून बघण्यासारख्या इन्स्टा प्रोफाइल आहेत, ज्या जरूर बघाव्या.
आणि यापेक्षा सुरक्षित मार्ग म्हणजे आपल्या आरोग्याबद्दल असलेले प्रश्न थेट क्लिनिकमध्ये जाऊन एखाद्या डॉक्टरलाच विचारावेत. वर्षातून एकदा आरोग्यचाचण्या कराव्यात. विशेषतः स्त्रियांनी आवर्जून स्वतःच्या आरोग्यासाठी वेळ आणि पैसा ठेवावा. नियमित व्यायाम करावा आणि सकस आहार घ्यावा. या गोष्टींना समाजमाध्यमांवर कोणतेही झटपट पर्याय नाहीत. हे मान्य केलं की चुकीच्या माहितीचा कोणताच धोका उद्भवणार नाही.