दी ब्लॉग ऑफ युजिनिया वॉटसन: २

आधीची प्रकरणे:

प्रकरण १

***

प्रकरण २: ४ सप्टेंबर

दी ब्लॉग ऑफ युजिनिया व्ही. वॉटसन, दी सॉसेज किंग ऑफ शिकागो

४ सप्टेंबर

शप्पथ मी हे रोजच्या रोज लिहायचं ठरवलं होतं. पण मधले तीन दिवस कुठे गेले कुणास ठाऊक, बघता बघता एकदम चौथाच दिवस उगवला.

खरं तर मी तसा आणीबाणीचा प्रसंग हाताळत होते. काल संध्याकाळी मेट्सी (म्हणजे माझी बेस्ट फ्रेंड मेट्रोना - प्लीज, तिला तिच्या नावाबद्दल काही विचारत जाऊ नका, प्लीज) घरी आली, तेव्हा पार वेडीपिशी झालेली होती. तिला वाटत होतं, की तिला दिवस गेलेले असण्याची दाट शक्यता आहे. आता जर खरंच तसं असतं, तर ती वेडाच्याही पलीकडे गेली असती, हे सोडा.

"बर्थ कण्ट्रोल नावाची गोष्ट ऐकून तरी माहीत आहे का तुला?" रडून रडून हालत झालेल्या मेट्सीनं दारात पाऊल टाकल्या टाकल्या मी तिला विचारलं. मग शक्य तितकं गपचूप तिला वर माझ्या खोलीत नेलं. अर्थात त्या प्रयत्नात फार काही अर्थ नव्हता म्हणा. आई नि शेरलॉक त्यांच्या ऑफिसात काम करत असताना नि मेट्सीची जिन्यावर दाणदाण पाय आपटत जाण्याची सवय बघता हे फार काळ लपून राहणं शक्य नव्हतं.

"म्हणजे काय! रबर्स वापरले होते आम्ही! पण त्याचं काय सांगता येतं का? होतं असं कधी कधी!" टिश्यूत नाक शिंकरत मेट्सी म्हणाली.

"मी बाबाला विचारू? तो... म्हणजे तो तपासेल हवं तर."

मी डोक्यावर पडलेली असल्यासारखं तिनं माझ्याकडे बघितलं. "जिनी, का-ही-ही काय? तुझ्या बाबाकडून मी तपासून घेऊ? नि मग तुझा बाबा ’त्याला’ सांगेल..." मेट्सी लाजून लालेलाल झाली. जवळजवळ वेडसरपणाच्या सीमेवरचं लक्षण म्हणता येईल असा तिला शेरलॉक आवडतो. म्हणजे ती त्याच्याकडे ’बघते’! तो खोलीत असताना संकोचानं तिला दोन शब्दही धड बोलता येत नाहीत. "किंवा त्याहून वाईट म्हणजे तुझ्या बाबाला त्याला काही सांगायची गरजच पडणार नाही. तो माझ्याकडे नुसता बघेल नि त्याला कळेलच. नुसतं तेवढंच नाही, तर पार आम्ही कुठल्या पोझिशनमधे काय काय केलं नि रबर्स कुठल्या कंपनीचे होते, तेपण!"

यावर खरं म्हणजे मला प्रचंड हसायला येत होतं, पण ते फारच वाईट दिसलं असतं. मेट्सी अजिबात बरी नव्हती. "बरं, ते जाऊ दे. थोडा चहा घेणारेस का तू?"

त्यावर तिनं मान डोलावली. "चालेल."

तिला रडायसाठी माझं जुनं पांघरूण नि थोडे टिश्यूज दिले नि मी आत गेले. चहा हवाच होता. पण ते आपलं निमित्त. खरं म्हणजे मला आईशी बोलायचं होतं.

मी दार वाजवून तिच्या ऑफिसात डोकावले. ती नि शेरलॉक डेस्कापाशी काही फोटोग्राफ्समधे डोकं घालून बसले होते. दोघांचेही चेहरे तितकेच व्यग्र.

आता तुम्हांला वाटेल, आमच्या घरात जर कुठल्या दोन माणसांत साम्य असेल, तर ते मी नि आई, किंवा मी नि बाबा यांच्यात. किंवा गेला बाजार माझी आई नि बाबा यांच्यात तरी? च्यक. उलट शेरलॉक नि आई? एकाला झाका नि दुसर्‍याला काढा. कुण्णाला काही कळणार नाही. हो, जरा विचित्रच आहे हे. शिवाय मुळात बाबा आईच्या प्रेमात का पडला होता ते आता लक्षात आलं, असंही यावर कुणी खवचटपणानं म्हणू शकेल. पण असं आहे खरं. दोघेही उंच नि शिडशिडीत. एखाद्या मॉडेलसारखे. कपड्यांच्या बाबतीत एकदम चोखंदळ. नि एखाद्या गोष्टीचा तर्कानं कीस काढायची सवय इतकी, की समोरच्याला पार वेडं करतील. आईला त्याच्याइतकं पटकन निष्कर्षावर येता येत नाही. पण ते लक्षात येतं, ते तिची तुलना शेरलॉकशी होते म्हणून. नाहीतर तिला दिव्यदृष्टी आहे असंच कुणालाही वाटेल. पण त्यांच्यातला खरा मोठा फरक म्हणजे ती पुस्तकी आहे नि तो प्रॅक्टिकल आहे.

खरं म्हणजे आई नि बाबा शेरलॉकमुळेच भेटले. शेरलॉकची तिच्याशी आधी ओळख होती. ती फोरेन्सिक मानववंशशास्त्रज्ञ आहे. त्यांनी एखाद-दोन केसेसवर एकत्र काम केलं नि मग शेरलॉककडून क्वचितच मिळणारं ’त्यातल्या त्यात कमी मूर्ख’ हे दुर्मीळ प्रशस्तिपत्रक तिला मिळालं. शेरलॉकचा एक सहकारीपण आहे अशी कुणकुण लागल्यावर तर ती चकितच झाली (हो, बरेच जण होतात). म्हणजे असा एक माणूस या पृथ्वीतलावर आहे, जो शेरलॉकसोबत काम करतो. फक्त तेवढंच नाही, तर त्याच्याबरोबर राहतोही. कुठल्याही शस्त्राविना. तिला काही करून त्या माणसाला भेटायचंच होतं. म्हणून मग तिनं माझ्या बाबाला भेटायचा घाट घातला. पुढचं तुम्हांला माहीतच आहे.

आम्ही ’शेफर्ड्‍स बुश’मधे राहायचो तेव्हाचं मला फारसं काही आठवत नाही. तेव्हा म्हणजे, आई नि बाबाचं लग्न मोडलं नव्हतं, तेव्हा. मला आमचं घर आठवतं. तेव्हा शेरलॉकबरोबर ’बेकर स्ट्रीट’ला आल्याचंही मला आठवतं. बाबा तिथून बाहेर पडल्यापासून शेरलॉक एकटाच राहत होता. मोठं झाल्यानंतर आपणपण ’शेरलॉक’ व्हायचं, असं वाटायचं मला तेव्हा. त्यामुळे शेरलॉकचं घर म्हणजे माझ्यासाठी जगातली सगळ्यात भारी जागा होती.

सात वर्षांची होईस्तोवरच्या माझ्या आठवणी अंधुक आहेत. मला अपघात झाल्यानंतर मात्र सगळं बदलून गेलं. नेमकं काय झालं होतं, ते मला नीटसं आठवत नाही. पण मी हॉस्पिटलमधून आल्यानंतर बाबा थोडे दिवस घरी नव्हता, इतकं मला आठवतंय. मी सारखी पेप्रिज आजी-आजोबांकडेच असायचे. मग एकदा आई नि बाबानी समोर बसवून मला नीट समजावून सांगितलं की आपण आता दुसरीकडे राहायला जायचंय नि आता सगळे जण वेगळ्या वेगळ्या खोल्यांमधे झोपणारेत. तरी सगळं पूर्वीसारखंच असणारेय नि कुणीही कुठेही निघून चाल्लेलं नाहीये. मग आम्ही ’२१९ बी’मधे राहायला आलो. तिथल्या दोन फ्लॅट्सच्या मधे नवी दारं लावणारे गवंडी मला आठवतात. तिथला जुना वॉलपेपरपण मला खूप आवडायचा. घराचं काम झाल्यावर आपण परत तस्साच वॉलपेपर लावू या, असं शेरलॉकनं मला प्रॉमिस केलं होतं. आपण आता शेरलॉकच्या घरी राहायला यायचं म्हणून मी चांगलीच खूश झाले होते. मला त्यात काही वेगळं वाटलंच नव्हतं. सकाळ-संध्याकाळ जेवायच्या वेळी आई बाबा असायचेच. रात्री मला झोपवतानापण. बाबा आईच्या खोलीत झोपायचा नाही, इतकंच काय ते. पण मला त्यानं काय फरक पडणार? तेव्हा अजून काय काय झालं होतं, ते मला अजूनही नीटसं माहीत नाही. पण कुणी चिडलेलं वा दुःखी-बिख्खी नसायचं. तुम्हांला वाटेल, आईला तरी वाईट वाटलं असेल. पण छे, आईपण कधी दुःखात वगैरे नाही दिसायची. अर्थात मला माहीत नसलेलं काहीतरी त्या तिघांच्यात घडलेलं असणारच. कधीतरी मी धीर करून विचारणारेय.

मला आठवतंय, तिकडे राहायला गेल्यानंतर साधारण सहा-एक महिन्यांनी मला सकाळी जाग आली नि बाबाच्या हातच्या धिरड्यांची आठवण झाली. बाबा मस्त बनवतो धिरडी. आईला स्वैपाक अजिबात करता येत नाही. त्यामुळे मला तिला उठवायचं नव्हतं. नाहीतर मग तिनंच धिरडी करायला घेतली असती. मग सगळंच ओम्‌ फस्स. म्हणून अजिबात आवाज न करता मी हळूच बाबाला शोधायला गेले. तो शेरलॉकच्या फ्लॅटमधल्या त्याच्या जुन्या खोलीत झोपलेला असणार असा माझा अंदाज. म्हणून मी हळूच वर ’२२१ बी’मधे गेले. पण त्याच्या जुन्या खोलीत तो नव्हताच. तिथे फक्त एक डेस्क नि पुस्तकांची कपाटं होती. मला काही कळेचना. बाबा होता कुठे मग? शेरलॉकलाच विचारायला लागणार, म्हणून मी खाली त्याच्या खोलीत गेले नि दार ढकललं. च्‌ च्‌! तसलं काही बघितलं नाही मी! बाबा शेरलॉकच्या छातीवर डोकं ठेवून झोपला होता फक्त. शेरलॉकनं त्याला कुशीत घेतलं होतं. सापडला की बाबा. बाबा उठेपर्यंत मी त्याला हलवतच बसले. मग तो उठून मला ’२१९’मधे घेऊन आला नि मला धिरडी घालून दिली. मग हळूहळू सगळेच उठले नि धिरडी खायला आले. शेरलॉकच्या हातात त्याची ताटली देताना, बाबानं माझ्याकडे बघितलं, मोठा श्वास घेतला नि शेरलॉकला किस केलं. मी फक्त ’ऊप्स’ इतकंच म्हटलं. मग परत सगळं पहिल्यासारखं नॉर्मल झालं.

हां - तर कुठे होते मी? जरा भरकटलेच, नाही?

मी ऑफिसात आल्यावर आईनं माझ्याकडे बघून म्हटलं, "एक सेकंद हां, सोन्या."

"सगळ्या सीन्सचे एरियल शॉट्स आहेत तुझ्याकडे?" शेरलॉकनं तिला विचारलं.

"हो, हे घे," आतून अजून फोटो काढून त्याला देत ती म्हणाली. "इन्फ्रारेड असते तर बरं झालं असतं. झुडपातनं कुणी चालत गेल्याचं कळलं तरी असतं."

"कदाचित मिळतीलपण. सॅटेलाईट्स वगैरे असतात ना."

"कुणीतरी असेलच ना काम करेलसं तुझ्या ओळखीचं सरकार दरबारी? सगळेच तुझे देणेकरी."

"अर्थात. आज देणं लागत नसतील, तर उद्या लागतील. पण काम करतीलच. बदनामीचा फायदा." फोटोवर खुणेनं दाखवत तो म्हणाला, "इथे बघ. हाच पॅटर्न पुन्हा पुन्हा दिसला, तर बहुतेक हीच दफनाची जागा असणार."

आईनं मान डोलावली. "आम्हांलापण तेच वाटतंय."

शेरलॉकनं उठत माझ्याकडे आपादमस्तक बघितलं. मग कुत्सितपणे हसून म्हणाला, ’मेट्रोनाला सांग, तिला दिवस गेलेले नाहीत."

"काय?" आई उद्गारली.

मी फक्त तोंड उघडं टाकून बावळटासारखी बघतच बसले. "तुला कसं... काय... ओके, हे अती होतंय! तू ’शेरलॉक’ असलास तरीही."

"ती अर्थातच वरच्या खोलीत आहे. तिची दाणदाण पावलं मी कुठेही कधीही ओळखीन. तुझ्या खांद्यावर एक ओलसर डाग आहे. तिथे डोकं ठेवून ती नुकतीच रडलीय. अर्थातच तिला घरी जायला उशीर झालाय. तिचे पालक तसे कडक आहेत. त्यांचा धाक बघता, ती घरी उशिरा जाण्याचा धोका इतक्या सहजासहजी पत्करणार नाही. उशीर होऊनही ती गुपचूप इथे आलीय, म्हणजे नक्कीच काहीतरी मोठं संकट असणार. नाहीतर तिनं रात्री उशिरा रडारड करायला तुला फोन केला असता. पण फोन न करता ती इथे आलीय. म्हणजे एक तर तिच्या बॉयफ्रेंडनं तिच्याशी ब्रेक-अप केलंय, नाहीतर तिला दिवस गेल्याची तरी भीती वाटतेय. बॉयफ्रेंडशी ब्रेक-अप असतं, तर तू आईकडे आली नसतीस. म्हणजे दिवस गेल्याची भीती. मेट्रोना तशी तमासखोर आहे. म्हणजे तिची पाळी यायला थोडा जरी उशीर झाला, तरी ताबडतोब तिला भीती वाटणार. याचा अर्थ असा की, तिला दिवस गेले असते, तर दिवस राहण्याची तारीख साधारण दोन आठवड्यांपूर्वीची असती. पण मला बरोबर आठवत असेल, तर तिचा लबाड बॉयफ्रेंड तेव्हा सुट्टीवर कुठेतरी गेला होता. ती त्याला फसवणार नाही नक्की, ती त्या येड्याच्या प्रेमात आहे. म्हणजे एकमेव तर्कशुद्ध निष्कर्ष निघतो. तो म्हणजे तिला दिवस गेलेले नाहीत."

"हे सगळं तर्कशुद्ध वाटतंय. पण दिवस राहण्याची तारीख ठरवताना पाच-सहा दिवस मागे-पुढे धरावे लागतात. त्यामुळे बॉयफ्रेंड इथे होता की नव्हता, यावरून काहीच निष्कर्ष काढता येत नाही. तो अजिबातच इथे नसता, तर मेट्सीचं मेट्सीलापण हे कळलंच असतं. त्यामुळे तो सुट्टीत मधे कधीतरी तिला भेटून गेला असणार, असं मानायला जागा आहे."

"पण त्यासाठी मेट्रोनाला तिच्या पाळीची तारीख नीट लक्षात आहे असं गृहित धरावं लागेल. तरच असा तर्क करणं शक्य आहे."

"अरे ए!" मी म्हणाले. तेव्हा कुठे त्यांनी वळून माझ्याकडे बघितलं. "तुम्ही तुमची तर्कशुद्ध युद्धं मग खेळा. आई, मेट्सी खरीच बरी नाहीये. काय करू मी?"

आई उठली. "चल, थोडा चहा करू या. मी बोलू तिच्याशी?"

"नको. पण काय बोलायचं ते मला कळतच नाहीये."

"मी बोलू शकतो का तिच्याशी?" शेरलॉकनं विचारलं.

आई आणि मी, दोघींनीही थरकापून त्याच्याकडे बघितलं. "’नको’ म्हटलेलं पुरेल तुला?" मी विचारलं.

"पण हे इंट्रेस्टिंग आहे! जिनी, तू टीनेजमधल्या पोरांसारखी भारीपैकी तमाशे करतच नाहीस कधी. मला निरीक्षण कधी करायला मिळणार मग?"

"हे संशोधन नाहीये. मेट्सी कशी आहे ते तुला माहितीय. तू आलास तर तिला ऍन्युरिझमचा झटका वगैरे यायचा, नाहीतर लाजून ती बेशुद्ध तरी पडायची." मी म्हटलं.

"काहीही!" मला हातानं उडवून लावत शेरलॉक म्हणाला, "ते माझ्याबद्दलचं किशोरवयीन आकर्षण वगैरे मरू दे. मी एकदम शांत बसीन. मग तर झालं?"

"नको!" आई नि मी एकदमच ओरडलो.

"पण... मला कंटाळा आलाय," तो म्हणाला.

"जा, बाबाला पकव, जा." मी म्हटलं.

वैतागून शेरलॉकनं कार्पेटवर पाय आपटून दाखवले. तो कसा दिसत होता माहितीय? उन्हाळ्याच्या सुट्टीत कंटाळलेली ती पाचेक वर्षांची पोरं असतात ना? अगदी तस्साच. फक्त उंची जरा जास्त. म्हणाला, "तो पबमधे गेलाय."

आईनं त्याला डेस्काकडे ढकललं. "मग ते फोटो बघ. त्यानं पाय निराळ्या ठिकाणी का पुरलेत ते कळतंय का बघ." तिनं त्याला खांद्याला धरून तिथे बसवलं.

आईच्या त्या क्राईम सीनवरच्या फोटोंकडे बघत तो वैतागून पुटपुटला, "मी म्हणजे एखादं मस्तीखोर मूल वाटलो का तुला?"

"तू तसंच करतोयस पण. आता नीट वाग, नाहीतर परवा रात्री तीन निकोटीन पॅचेस्‌ लावताना मी तुला पकडलं, हे मी जॉनला सांगीन."

"सांगून बघच तू."

"बघ मग," ’आता बघतेच तुला’ प्रकारचा लुक देत आई उभी राहिली. काहीतरी नक्की माहीत असणार तिला. हे निकोटीन पॅचेस्‌चं प्रकरण गंभीर होतं. इतक्यात शेरलॉकनं परत तीन निकोटीन पॅचेस्‌ लावले होते हे कळल्यावर माझ्या पोटात एकदम गोळा आला. पण त्याबद्दल परत कधीतरी. हे आधीच खूप लांबत चाललंय.

आई नि मी त्याला तिथेच सोडून स्वैपाकघरात गेलो. किटली लावत ती मला म्हणाली, "काय चाललंय जिनी? खरंच दिवस गेलेत मेट्सीला?"

"असं तिला वाटतंय. जाम टेन्शन आलंय तिला."

"पाळी चुकलीय तिची? किती दिवसांनी?"

"दोन."

आई जरा शांत झाली. "बस? म्हणजे काही नसूही शकतं राजा."

"पण ती म्हणतेय, तिची एकदम रेग्युलर असते म्हणून."

"असूही शकेल. तपासून घेईस्तोवर थांब म्हणावं तिला." सुस्कारा सोडत आईनं केसांतून हात फिरवला.

"तिला बर्थ कंट्रोल वगैरे सगळं माहीत आहे का?"

तिला वेगळंच काहीतरी विचारायचं होतं हे सरळ होतं. "हो गं आई. मलापण माहीत आहे."

आई बिचकत, माझी नजर चुकवत म्हणाली, "तू... असं काही केलंस, तर सांगशील ना मला? इतका विश्वास आहे ना तुझा माझ्यावर?"

"अर्थात आई. तुला नाही का सांगणार? मला काय काय काळजी घ्यायची असते ते माहितीय सगळं. मी आधीच गोळ्या नाही का घेणार नीट?" खांदे उडवत मी तिला विचारलं. "अर्थात हे सगळं कुणाला माझ्यासोबत काही करावंसं वाटलं तर."

विषय हसण्यावारी न्यायचा माझा प्रयत्न उडवून लावत तिनं मान हलवली नि चहा ओतायला घेतला. "अजून लहान आहेस तू, युजिनिया."

"सोळा पूर्ण. सतरावं चालू."

"तेच. लहान आहेस तू अजून."

"तू आता बाबासारखं करतेयस. आधुनिक, पुरोगामी पालक म्हणवता ना तुम्ही स्वतःला? बाबा तर ’मी जिवंत असेस्तोवर नाही’वरच ठामच असतो."

"आपल्या लाडक्या लेकीच्या बाबतीत पुरोगामी, आधुनिक वगैरे विचार करताना जड जातं गं."
"आई, मी काहीही ’केलेलं’ नाहीये! मेट्सीबद्दल चाललंय हे, माझ्याबद्दल नाही." हताश होत मी म्हटलं. "गुन्ह्यात साथीदार म्हणून मला शिक्षा देऊन मोकळी होतेयस तू."

"पालकांसाठी सोपं नसतं गं हे," चहाचा कप दोन्ही हातांनी नीट धरत आई म्हणाली. "आता तू लहान राहिलेली नाहीस म्हणायची. आत्ता कुठे रांगत होतीस. नि इतक्यात तुझ्या मैत्रिणी सेक्सबद्दल बोलायलापण लागल्या? नि दिवस गेलेसे वाटतायत त्यांना? कमाल आहे." कप ठेवून आईनं चेहरा सारखा केला. "भीती वाटते गं."

तिला एक ’जादू की झप्पी’ हवी होतीशी वाटली, म्हणून तिला मिठी मारली मी. मला घट्ट जवळ घेतलं तिनं. "इट्स ओके, आई."

"मला आधी सांगशील ना? आधी म्हणजे... आधी."

"हो गं आई. प्रॉमिस. शिवाय मला कुणासोबत सिरियसली डेटिंग वगैरे करायची भीती वाटते गं. मायक्रॉफ्ट त्या बिचार्‍याला सैबेरियात वगैरे धाडून मोकळा व्हायचा, कुणी सांगावं?"

आई हसायला लागली. "तुझे काका लोक अतीच करतात जरा, नाही?"

मलापण हसायला आलं. "मायक्रॉफ्टकडून तुझी अपेक्षा तरी काय आहे आई!"

इतक्यात मेट्सीच्या दाणदाण पावलांचा जिन्यावर आवाज आला. मी आईपासून लांब होतेय, तितक्यात ती आत आलीच. तिचा चेहरा लालबुंद नि सुजलेला दिसत होता, पण हसरा होता. वेड्यासारखे हातवारे करन तिनं मला बोलावलं. आईकडे पटकन एक चोरटी नजर टाकून मी मेट्सीबरोबर बाहेरच्या खोलीत आले. "आली माझी पाळी," ती कुजबुजली.

"ओह, थॅन्क गॉड," म्हणत तिला मी मिठी मारली.

"आईला सांगितलंस तू?" घाबरून तिनं मला विचारलं. "नाहीतर ती माझ्या आईला सांगायची, नि मग..."
"इट्स ओके. काही नाही सांगितलंय मी तिला." मी म्हटलं. आई स्वैपाकघराच्या दारातून आमच्याकडे बघत उभी होती. तिनं मला खूण केली. मी मेट्सीला म्हटलं, "चल, तुला घरी सोडते."

"अरे, मेट्रोना," आईच्या ऑफिसातून बाहेर येत शेरलॉक म्हणाला, "मग? नाही ना दिवस गेलेत?"

थोडक्यात - निकोटीन पॅचेस्‌बद्दल बोलायची वेळ आलीय. आईला नको बोलू दे, पण मी बोलणारेय.

क्रमश:

***

१. ’टाईम वॉर्प’ला समांतर काही शोधणं मला आचरट नि अनावश्यक वाटलं. नि तो उल्लेख तसाच्या तसा ठेवणंही. तो गाळल्यामुळे युजिनियाचे सांस्कृतिक संदर्भ दाखवण्याची संधी मी गमावली हे मला मान्य आहे, पण तरी उपलब्ध पर्याय बघता मी तितकं पाप माझ्या शिरावर घ्यायचं ठरवलं. म्हणून मी ’बघता बघता’ वापरून पळ काढला! कुणाला काही अजून चांगला पर्याय सुचला, तर त्याचं स्वागत आहे.
२. भाषांतरासाठी लेखिकेची संमती आहे. तरीही यातल्या सगळ्या बलस्थानांचं श्रेय लेखिकेचं आहे आणि मर्यादांचं वा चुकांचं अपश्रेय माझं आहे, हे इथं नमूद करते.
३. हे भाषांतर AO3 (Archive Of Our Own) वर थे नि माझ्या ब्लॉगवर इथे पाहता येईल.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

प्रतिक्रिया

मस्त
सुरेख अनुवाद. छान तंद्री लागली वाचताना

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

धन्यवाद जाई. मलाही खूप मजा येते आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

वाचते आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

टाईम वॉर्पची लिंक दिली नसती तर मी भलत्याच टाईम वॉर्पमधे गेले असते.

भाषांतराकडे भाषांतर म्हणून न पहाता स्वतंत्र कलाकृती म्हणून पाहिल्यास टाईम वॉर्पचा प्रश्नच येणार नाही.

मूळ लिखाणही आवडलंच आणि भाषांतरही मस्त होतंय. वाचते आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

भाषांतराकडे निरनिराळ्या प्रकारे पाहिलं जाऊ शकतं. मूळ मजकुरापासून नेमकं किती स्वातंत्र्य घ्यायचं, १०० टक्के भाषांतर करायचं की नाही, संकल्पनांचं भाषांतर करायचं की स्पष्टीकरण द्यायचं की गरज नसल्यास त्या सरळ कापून टाकण्याचं स्वातंत्र्य घ्यायचं... एक ना दोन.
एवढं सगळं सांभाळून उत्तम भाषांतर / अनुवाद करणं किती कठीण असतं, ते मी सध्या अनुभवतेय!
प्रतिसादाबद्दल आभार. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

मस्त! शेरलॉकचा तर्क वाचताना 'बेनेडिक्ट'च्या शेरलॉकच्या बोलण्याची ढब जाणवली. मुळ सांहितेत माहित नाही पण अनुवादकारावर 'होम्सचा' प्रभाव कमी होत 'शेरलॉक'चा प्रभाव वाढत चाललेला वाटतोय Wink

एकूणच प्रकार आवडला असल्याने मजा येतेय!

मुळ संहिता वाचली नाही पण पॅन केक्सना 'धिरडी' केलंय का? असं असेल तर का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

तर्कशुद्ध कारण काही नाही. पॅनकेक्सचं 'धिरडी' असं भाषांतर याआधी कुठेतरी वाचनात आलं होतं नि ते खटकलं नव्हतं म्हणून कदाचित. चुकीचं आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

चुक असं नाही पण ते दोन पूर्णतः वेगळे पदार्थ आहेत - अगदी वेगळ्या चवीचेही (दिसायला काहिसे जवळ जाणारे आहेत म्हणा)
त्यामुळे मला पॅन केक्सना 'पॅन केक्स' म्हटले असते तर अधिक आवडले असते.
समांतर उदाहरण द्यायचे तर हे पिझ्याऐवजी भाषांतर करताना थालिपिठ किंवा उत्तपा वापरण्यासारखे झाले

(बाकी ह्या सुचना टिका या अर्थाने न घेता सुचवणी म्हणून बघशील या खात्रीने जाहिर देतो आहे)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

>>(बाकी ह्या सुचना टिका या अर्थाने न घेता सुचवणी म्हणून बघशील या खात्रीने जाहिर देतो आहे)
अर्थात! नाहीतर भाषांतर प्रकाशित कशाला करायचं?!

धिरड्यांबद्दलः हो का? मी खाल्लेले पॅनकेक्स तरी ऑथेन्टिक नव्हते किंवा ते पॅनकेक्स तरी नव्हते! मी बदलते वेळ मिळाला की लगेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

>>पॅन केक्सना 'धिरडी' केलंय का? असं असेल तर का?<<

मोल्सवर्थदेखील तेच म्हणतो. मला वाटतं की दोन्हींमध्ये साधर्म्य आहे - पीठ न मळता ते ओतता येईल इतकं ओघवतं करणं वगैरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

इतका वेळ नुसतीच आठवणीवर नि अनमानधपक्यावर वेळ मारून नेली होती. आता कोश पाहिला. सोहोनी म्हणतातः अंडी, दूध व गव्हाचे पीठ यापासून तयार केलेली पातळ केक (पॅनमध्ये तळलेली). हे तर धिरडेच आहे की. हां, पदार्थाचे भाषांतर करायचे नाही, असे ठरवले तर गोष्ट वेगळी. पण मला ते टाळायचे काही कारण दिसत नाही.
त्यामुळे पॅनकेक = धिरडे हे तसेच ठेवते आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

ओके.
मग मी घरी जे धिरडे खातो त्यात अंडे नसतेच शिवाय ते गोडही नसते. मी ज्या अमेरिकन व्यक्तीकडे (त्याचा घरीच बनवलेला) पॅनकेक खाल्ला होता तो गोडसर होता - शिवाय त्यावर मॅपल सिरप वगैरे घालून खाल्ला होता.. त्यामुळे माझा (गैर?)समज झाला असेल. स्वारी!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

पॅनकेक गोडच असतात असं नाही. उदाहरणार्थ इथे अनेक अगोड पर्याय दिले आहेत. अंड्याचा वापर पॅनकेक हलका आणि जाळीदार होण्यासाठी केला जातो. आपल्याकडे त्यासाठी शाकाहारी पर्याय लागतो - म्हणून हलक्या जाळीदारपणासाठी आंबोळी/उत्तप्पे/डोसे वगैरे आंबवलेल्या पिठाचे करतात किंवा धिरड्याच्या पिठात ताक घालतात. अमेरिकेतही 'बटरमिल्क पॅनकेक्स' केले जातात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

मेघना,
फारच मस्त अनुवाद केला आहेस, वाचतांना असं वाटलंच नाही की अनुवादित असेल.

पुढचे भाग कधी येतील?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आभार. पुढच्या भागांबद्दल काही सांगणं कठीण, कारण मी अजूनही प्रचंड प्रमाणात शेरलॉक फॅनफिक वाचत असले, तरी अनुवादाला फारच कमी - शून्य मिनिटे - वेळ आहे सध्या. कधीतरी.... करू!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन