शास्त्रीय नृत्याचं 'रील'करण

#संकल्पनाविषयक #समाजमाध्यम #ऐसीअक्षरे #दिवाळीअंक२०२४

शास्त्रीय नृत्याचं 'रील'करण
- प्रिया बंगाळ
भाषांतर : सई केसकर आणि उज्ज्वला

भारतीय उपखंडाला नृत्याची समृद्ध परंपरा आहे. त्या परंपरेला तिचा असा एक स्वतंत्र इतिहास आहे आणि तो वेगवेगळ्या सामाजिक स्थित्यंतरांशी जोडलेला आहे. गेल्या शंभर वर्षांतच घडलेला एक महत्त्वाचा बदल म्हणजे नृत्यकला सरंजामी आश्रयातून आणि मंदिरांच्या आवारातून बाहेर येऊन रंगमंचापर्यंत पोहोचली. नृत्यकला ही आपल्या राष्ट्राची सांस्कृतिक ओळख झाली. आणि अलीकडे, रंगमंचापासून जागतिक भांडवलशाहीने तयार केलेल्या समाजमाध्यमांपर्यंत या कलेचा प्रवास झाला आहे.

भारतातील 'संगीत नाटक अकादमी' ही केंद्रीय संस्था भारतीय कला आणि संगीताच्या प्रसार आणि संवर्धनाचं काम करते. या संस्थेने वेगवेगळ्या भारतीय नृत्यांपैकी आठ प्रकारांना 'शास्त्रीय' नृत्यांचा दर्जा दिलेला आहे. कथक, भरतनाट्यम, कुचिपुडी, ओडिसी, कथकली, मोहिनीआट्टम, मणिपुरी आणि होत्रीय (Sattariya) हे ते आठ नृत्यप्रकार. 'शास्त्रीय' ही संज्ञा आपण युरोपीय देशांकडून घेतली, जिथे त्यांचे 'बॅले' नृत्य शास्त्रशुद्ध पद्धतीने शिकवला जाणारा, विशिष्ट पद्धतीच्या हालचाली असणारा एक अवघड नृत्यप्रकार मानला जातो. अशाच प्रकारे, काही भारतीय नृत्यप्रकारांनाही 'शास्त्रीय' दर्जा मिळावा यासाठी स्वातंत्र्योत्तर काळात संगीत नाटक अकादमीने प्रयत्न केले. ही नृत्यं जगभरात भारताची ओळख होतील आणि भारताच्या समृद्ध कलासंस्कृतीचे आधुनिक जगाला दर्शन घडेल हा त्यामागचा उद्देश होता. या नृत्यप्रकारांना भारतीय सरकारचाच आश्रय मिळाला. संगीत नाटक अकादमी, भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद अशा संस्थांनी, दूरदर्शन या त्या काळी उपलब्ध असलेल्या माध्यमाने, आणि सरकारी निधीतून चालवल्या जाणाऱ्या काही शिक्षण संस्थांनी या नृत्यांचा हिरीरीनं प्रसार केला. त्यातून अनेक नर्तक-नर्तिका नावारूपाला आले आणि या नृत्यांची सर्वसामान्य भारतीय जनतेला आणि पाश्चिमात्य प्रेक्षकालाही ओळख झाली.



शर्मिला बिस्वास यांच्या सौजन्यानं

१९४७ ते १९९० हा काळ देशात विविध राष्ट्रीय संस्था, व्यवस्था घडवण्यात गेला. पण स्वातंत्र्यानंतरच्या नवीन उमेदीचा बहर ओसरल्यावर देशाच्या आर्थिक परिस्थितीकडे लक्ष देण्याची वेळ आली. १९९१ साली भारताची अर्थव्यवस्था परकीय गुंतवणुकीसाठी खुली झाली तेव्हा अनेक परकीय प्रभाव आपल्या संस्कृतीवर झपाट्यानं होऊ लागले. याचा परिणाम कलाक्षेत्रावरही झाला. आंतरजालाच्या सहज उपलब्धतेमुळे एखादा शास्त्रीय नृत्याचा कार्यक्रम बघायला लोकांना नाट्यगृहात जायची गरज उरली नाही. ज्यांना नृत्यात रुची आहे असे लोक सहज आपल्या संगणकावर ते बघू लागले. याची पुढची पायरी म्हणजे समाजमाध्यमं. समाजमाध्यमांनी मात्र शास्त्रीय नृत्यकलेचा चेहरामोहरा असा काही बदलून टाकला आहे, की तो बदल नेमका कोणत्या दिशेला आणि कसा झाला आहे हे अजूनही पूर्णपणे सांगता येणार नाही. फेसबुक, इन्स्टाग्रामसारख्या माध्यमांवर नृत्यकलेचे एक वेगळे जगच आता तयार झाले आहे, जिथे नवोदितांबरोबरच नृत्यकलेतील 'दिग्गज' मानले जाणारे कलाकारही सहज सापडतात.

नर्तक/नर्तकी सहसा समाजमाध्यमांचा वापर काही ठरावीक हेतूने करतात. त्यांच्या कामाची ओळख करून देण्यासाठी; त्यांच्या आगामी कार्यक्रमांची आणि नृत्यवर्गांची जाहिरात करण्यासाठी; समाजमाध्यमांसाठी म्हणून एका ठरावीक साच्यात बसणाऱ्या कलाकृती सादर करण्यासाठी. शिवाय, त्यांच्या क्षेत्रातल्या इतर कलाकारांशी व संयोजकांशी ओळख व्हावी, त्यांचं काम बघायला मिळावं आणि आपलं काम त्यांना दिसावं यासाठीही समाजमाध्यमांचा उपयोग केला जातो. समाजमाध्यमांचे हे विविध उपयोग बघितल्यावर लक्षात येतं की समाजमाध्यमांनी नृत्यकलेच्या क्षेत्रात एक प्रकारची लोकशाही प्रस्थापित केली आहे. जशी ती इतर क्षेत्रांत दिसते तशीच इथेही दिसून येते. समाजमाध्यमं हातात येण्याआधी, एखाद्या नृत्यकाराचा 'नावारूपाला' येण्याचा प्रवास फार वेगळा असायचा. नृत्यकलेच्या क्षेत्रातील महत्त्वाच्या व्यक्तींच्या वर्तुळात वावर असणं आणि त्यांच्या मर्जीत राहणं याला अनन्यसाधारण महत्त्व होतं. त्यामुळे ज्यांच्याकडे आर्थिक किंवा सामाजिक सत्ता नाही अशा लोकांसाठी आपली कला रंगमंचावर जाहीरपणे सादर करणं ही एक महाकठीण गोष्ट होती. समाजमाध्यमांनी हा प्रश्न बऱ्याच प्रमाणात सोडवला, किंवा सोपा केला. आज आर्थिक किंवा सामाजिक सत्ता नसतानाही कलाकार माध्यमांवरून नावारूपाला येऊ शकतो. कलाकारांच्या हातात आज पूर्वीपेक्षा जास्त सत्ता आहे. आणि ती सर्वांसाठी समानही आहे. मुंबईतील प्रसिद्ध भरतनाट्यम नर्तक, वैभव आरेकर म्हणतात :

"आज आमच्या क्षेत्रातल्या कितीतरी तरुण आणि उत्कृष्ट नृत्यकारांना केवळ समाजमाध्यमांमुळे प्रसिद्धी मिळाली आहे. त्यांपैकी काही त्यांची प्रतिभा सात्यत्यानं दाखवू शकले आहेत, तर काहींना ते जमलेलं नाही. पण (समाजमाध्यमांमुळे) या क्षेत्रात बदल झाला आहे हे मात्र नक्की. एखाद्याचा शोध घेऊन ते काय काम करताहेत हे बघणं आता अगदीच सोपं झालं आहे. पूर्वीची व्यवस्था आता नक्कीच राहिली नाही. नृत्य क्षेत्रातल्या सगळ्याच कलाकारांकडे आता पूर्वीपेक्षा जास्त सत्ता आहे. हा बदल चांगलाच आहे."



आरेकर, 'सिंधू' या पुण्या-मुंबईत होणाऱ्या नृत्योत्सवाचं आयोजनदेखील करतात. त्याबद्दल सांगताना ते म्हणतात :

"आमच्या प्रयोगांची वर्तमानपत्रांत जाहिरात करणं हे फार खर्चिक काम असायचं. आता आम्ही आमच्या कार्यक्रमांच्या जाहिराती फक्त समाजमाध्यमांवरून करतो. त्यामुळे आम्हाला आमच्या हातात असलेल्या निधीचा प्रत्यक्ष कार्यक्रमासाठी वापर करता येतो. समाजमाध्यमांवर प्रभावीपणे जाहिरात केली तर लोक हमखास तिकिटं काढून येतात याचा आम्हाला चांगला अनुभव आला आहे. याचा आमच्या क्षेत्राला फायदाच झाला आहे."

वैभव आरेकर
वैभव आरेकर (फोटोश्रेय : ईशा पिंगळे)

नेहमीच्या पठडीतल्या 'नृत्य उत्सवांच्या' बाहेरचं असं काही ज्यांना हवं आहे, जे नवीन प्रेक्षक शोधू बघताहेत, त्यांनाही समाजमाध्यमांचा उपयोग झाला आहे. दिल्लीस्थित ओडिसी नृत्यांगना सोनाली मिश्रा त्यांच्या समाजमाध्यमांच्या वापराबद्दल सांगतात:

"समाजमाध्यमं मला कायम बाहेरच्या मोठ्या जगाशी जोडून ठेवतात असं वाटतं. मी नृत्योत्सवांच्या मुख्य प्रवाहात नसले तरी कलाकार म्हणून जगाला माझी ओळख करून देण्यासाठी मला एक निश्चित अशी जागा आहे, माझा असा एक आवाज आहे. ज्यांना माझं काम आवडतं त्यांच्याशी संपर्क साधण्याचे साधन माझ्याकडे आहे."

चेन्नईतून विरजा आणि श्यामजीत किरण ही जोडी, भरतनाट्यम शैलीत पारंगत आहे. विरजा मांढरे सांगतात :

"फेसबुकमुळे आम्हाला जगभरातून अनेक विद्यार्थी, सहकारी आणि नृत्य आयोजक भेटले आहेत. समाजमाध्यमांमुळे आमची व्यावसायिक वर्तुळं झपाट्याने वाढली आहेत. आता फेसबुक इतकं लोकप्रिय झालं आहे की एखाद्याला ईमेल करण्यापेक्षा फेसबुकवरून निरोप पाठवला तर लवकर उत्तर येतं! सुरुवातीला समाजमाध्यमांबद्दल आम्हालाही शंका होती पण आजच्या जगात ती अपरिहार्य आहेत हे लवकरच आमच्या लक्षात आलं."

विरजा यांचं हे विधान आपल्या काळाचा आरसाच ठरतं. समाजमाध्यमं आता कलाकारांच्या आयुष्याचा भाग झालेली आहेत. त्यांना ती मनापासून आवडत असतील किंवा नसतीलही. पण त्यांना टाळून पुढे जाता येणं दिवसेंदिवस अवघड होत चाललं आहे.

विरजा आणि श्यामजीत
विरजा आणि श्यामजीत किरण. (चित्रश्रेय : शिबु कुट्टी)

काही कलाकारांसाठी तर समाजमाध्यमं हेच त्यांनी नृत्यक्षेत्रात येण्याचं कारण आहे. उदाहरणार्थ, बहामाजमधल्या नासो शहरातला कार्लितो कातालानो हा ओडिसी नर्तक केवळ समाजमाध्यमांवर शिकून या क्षेत्रात प्रवेश करता झाला. १९९५ साली जन्माला आलेल्या कार्लितोची पिढी अगदी लहानपणापासून 'ऑनलाईन' आहे. कार्लितोही लहान वयातच आंतरजालावरून विविध माध्यमे वापरू लागला. १०-११ वर्षांचा असताना त्याने भरतनाट्यम नृत्याचा एक कार्यक्रम जालावर बघितला आणि बघताक्षणी तो त्या शैलीच्या प्रेमात पडला. त्यापूर्वी तो कधीही भारतीय संस्कृतीच्या संपर्कात आला नव्हता किंवा प्रत्यक्ष आयुष्यात त्याला कोणी भारतीय मित्र-मैत्रिणी नव्हते. केवळ ऑनलाइन उपलब्ध असलेल्या भरतनाट्यमच्या ध्वनिचित्रफीती पाहून कार्लितो आपापले धडे गिरवू लागला. त्याने हस्तमुद्रा व भरतनाट्यम शैलीचं प्राथमिक ज्ञान एका भरतनाट्यम कलाकाराच्या ब्लॉगद्वारे मिळवलं. नंतर तो ओडिसी नृत्यप्रकार ऑनलाइन पाहून त्या शैलीच्या हालचाली शिकला. पुढे काही दिवस टम्बलर नावाच्या जालीय मंचावर तो भारतीय नृत्यकारांच्या एका गटात सहभागी झाला.



टम्बलरवर त्याला भरपूर प्रोत्साहन मिळालं असं तो सांगतो. २०१९ साली तो अमेरिकेतल्या अटलांटा शहरात गेला. तिथं त्यानं पहिल्यांदाच प्रत्यक्ष 'जडरूपात' असलेल्या खऱ्याखुऱ्या गुरूकडून नृत्याचे धडे घेतले – सुप्रसिद्ध ओडिसी नृत्यांगना बिजयनी सत्पथी यांच्या तीन दिवसीय कार्यशाळेत! त्याच्या या 'एकलव्या'सारख्या तपश्चर्येचं बिजयनी यांना फार कौतुक वाटलं आणि त्यांनी ते फेसबुकवर जाहीर व्यक्तदेखील केलं. एका मुलाखतीत त्या म्हणाल्या की, कार्लितोचे नृत्य पाहीपर्यंत त्यांचा ओडिसी नृत्य ऑनलाइन शिकणे-शकवणे याला विरोध होता. पण कार्लितोच्या साधनेनं त्यांचं मत बदललं आणि मग कोव्हिड काळात ऑनलाइन वर्गांची प्रथा त्यांनी खुल्या दिलाने स्वीकारली. आता कार्लितो त्यांचा नियमित दूरस्थ शिष्य असून तो इन्टाग्रामवर बिजयनी सत्पथी यांच्या इतर शिष्यांशी जोडला गेला आहे. एरवी त्याच्या देशात राहून भारतीय नृत्यशैली व इतर नर्तकांशी संपर्क केवळ अशक्यप्राय होता. कार्लितोला ही आवड निर्माण होणे, जोपासता येणे आणि जाणकारांचे प्रेम, आपुलकी मिळणे हे केवळ दोन्ही ध्रुव जवळी आणणाऱ्या आंतरजालामुळेच शक्य झाले.

ज्यांच्या कलेला वाव मिळणं एरवी अशक्यप्राय होतं त्यांना समाजमाध्यमांनी मंच मिळवून दिलाच. पण पूर्वी ज्यांचे आवाज हेतुपुरस्सर बंद करून टाकले जात होते त्यांचीही बाजू या माध्यमांमुळे आपल्याला समजली. जरी या आठ 'शास्त्रीय' नृत्यांना त्यांचा स्वतःचा असा स्थानिक, सांस्कृतिक इतिहास असला, तरी त्यांच्या 'शास्त्रीय' दर्जाला एक कटू इतिहासही आहे. स्थानिक पातळीवर पारंपरिकरीत्या जे जे समाज हे नृत्यप्रकार जिवंत ठेवत होते त्यांची ओळख या 'शास्त्रीय'करणात पुसून टाकली गेली. जेव्हा नृत्यकला राष्ट्राची ओळख होऊ लागल्या, तेव्हा त्यांचा संबंध 'नाट्यशास्त्रा'शी जोडला गेला. मुळात भारतीयांच्या विस्मृतीत गेलेलं नाट्यशास्त्र ब्रिटिशांनी एकोणिसाव्या शतकात पुन्हा शोधून काढलं. त्याआधी स्त्रीच्या 'नर्तकी' असण्याला भारतातील सर्व समाजांत अजिबात मान्यता नव्हती. 'चांगल्या घरच्या बायका' नाच करत नसत. त्या काळच्या व्हिक्टोरियन नैतिकतेला नृत्याच्या या चेहऱ्याची साहजिकच अडचण होऊ लागली.

भरतनाट्यम नृत्यांगना नृत्या पिल्लै यांचा जन्म भरतनाट्यम सादरीकरणाची परंपरा असलेल्या इसईवेल्लालर समाजात झाला. एकोणिसाव्या शतकात भरतमुनींवरून 'भरतनाट्यम' असं नामकरण होण्याआधी या समाजाच्या अनेक पिढ्यांतील स्त्रिया 'सादिर' या नावाने याच शैलीत नृत्य सादर करत असत. या शैलीला एकोणिसाव्या शतकाच्या अंतापर्यंत या दोन्ही नावांनी ओळखलं जायचं. नृत्या पिल्लै यांचे आजोबा, गुरु स्वामीमलाइ के. राजरत्नम पिल्लै हे प्रख्यात नृत्यशिक्षक (नटुवनार) होते. १९४७ साली मद्रास देवदासी ॲक्ट या नावानं प्रसिद्ध असलेला 'प्रेव्हेन्शन ऑफ डेडिकेशन' हा कायदा संमत झाला. या कायद्यानं या समाजातल्या बायकांचं नृत्य सादरीकरण बेकायदेशीर ठरवलं. त्याच वेळी या नृत्याला 'शास्त्रीय' 'अभिजात' कलेचा दर्जा मिळाल्यानं आणि तेव्हा जोमात चालू असलेल्या राष्ट्रबांधणीच्या उत्साहाच्या भरात ही नृत्यशैली उच्चवर्णीय आणि सधन स्त्रियांमध्ये लोकप्रिय होऊ लागली. नृत्या पिल्लै यांच्या आजोबांनी अनेक ब्राह्मण स्त्रियांना नृत्याचे धडे दिले पण त्यांच्या समाजातल्या स्त्रियांनी या नृत्यापासून दूर राहावं याकरिता त्यांचं प्रबोधन होऊ लागलं. आज भरतनाट्यमचं जाहीर सादरीकरण करणाऱ्या या समाजातल्या काही मोजक्याच स्त्रियांपैकी नृत्या एक आहेत. त्या स्वयंप्रेरणेनं आणि विचारपूर्वक भूमिकेतून या कलेचा अभ्यास आणि प्रसार करतात. त्यांच्या समाजमाध्यमांवरून त्या त्यांच्या कलेबद्दल आणि त्यांच्या समाजातल्या स्थानाबद्दल भरभरून बोलतात. त्यांच्या पूर्वजांवर आणि त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडतात. नृत्यविश्वात असलेल्या जातीय भेदभावाविरुद्ध त्यांची ठाम भूमिका त्या मांडत राहतात. यात त्यांना आलेले व्यक्तिगत अनुभवदेखील त्या निर्भीडपणे मांडतात.

समाजमाध्यमांमुळे लोकांना मुख्य प्रवाहात सहसा न आढळणाऱ्या काही अपरिचित नृत्यप्रकारांचीही ओळख झाली. जसे, केरळी नाट्यप्रकार कुडीआट्टम, कलरीपयत्तु किंवा छाऊसारख्या युद्धनृत्यांची ओळख झाल्यानं कलाकारांची क्षितिजं रुंदावली.



कपिला वेणू (कुडीआट्टम)

नृत्य व कलाकार आता आपापल्या बंदिस्त जगतात वावरत नाहीत. अशा प्रकारच्या वैविध्याला एकाच ठिकाणी आणणारी समाजमाध्यमं मग साहजिकच कलाकारांमध्ये त्यांच्या सृजनशीलतेला पोषक असा संवाद घडवून आणतात.

आरेकर म्हणतात :

"माझ्या हातातल्या समाजमाध्यमांचा वापरही मी वेगवेगळ्या पद्धतीनं करतो. उदाहरणार्थ, एखादं दीर्घ सादरीकरण बघण्यासाठी मी यूट्यूब वापरतो. इन्स्टाग्रामवर नॅशनल थिएटर कंपनी, किंवा पिना बॉशसारखे उच्च दर्जाचे पाश्चात्य नृत्यकार, किंवा आपल्या कुडीआट्टम नाहीतर भरतनाट्यमची एखादी उत्कृष्ट क्लिप दिसली की मी आवर्जून यूट्यूबवर त्यांचं दीर्घ सादरीकरण शोधून बघतो. हे असं वेगवेगळ्या माध्यमांवर बघितल्यानं कधी तरी आपसूक मनात जुळून येतं आणि माझ्यातल्या नृत्य दिग्दर्शकाला प्रेरणा देऊन जातं. पूर्वी एखाद्या कलाकाराचं सादरीकरण ते तुमच्या शहरात आले किंवा आपण त्यांच्या ठिकाणी गेलो तरच बघायला मिळायचं. पण आज तुम्हाला उत्कृष्ट आणि तुमच्या विषयाला आणि आवडीला पूरक असं साहित्य ऑनलाईन उपलब्ध आहे. त्यातून खूप काही शिकता येतं. हे केवळ समाजमाध्यमांमुळेच शक्य झालं आहे."

या माध्यमांवर वावरणाऱ्या नृत्य कलाकारांची संख्या दिवसेंदिवस वाढतेच आहे त्यामुळे आता या समुदायानं भौगोलिक सीमाही पार केल्या आहेत.

"काही वर्षांपूर्वी चेन्नई, बंगलोर किंवा पुण्यात काय चाललं आहे हे मला माहिती नसायचं. ही शहरं माझ्यापासून फार दूर नाहीत तरीही. आता कोण, कशावर, कुठे काम करतंय हे फक्त राष्ट्रीयच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवरची अद्ययावत माहितीही मला असते.", आरेकर सांगतात.

प्रख्यात ओडिसी नृत्यांगना आणि नृत्यदिग्दर्शिका शर्मिला बिश्वास (कोलकाता) सांगतात :

"समाजमाध्यमांमुळे कलाकारांमधल्या भौगोलिक भिंती कोसळल्या. समाजमाध्यमांवर सहज एकत्र येता येत असल्यानं त्यांच्या सहकार्यातून अनेक नवनवीन प्रकल्प सहज जन्माला येतात. वॉरियर फाउंडेशनचं 'प्रतिरूप', भुबनेश्वरच्या ओडिसी रिसर्च सेंटरनं घेतलेल्या मार्गदर्शन कार्यशाळा आणि अजून अशाच इतर ऑनलाईन उपक्रमांतून निर्माण झालेल्या उत्तम कलाकृती आता प्रत्यक्ष रंगमंचावरही सादर होत आहेत ."

समाजमाध्यमांवर कधीही, काहीही सादर करता येऊ शकतं. यामुळे कलाकारांना स्वतःबद्दल आणि आजूबाजूच्या जगाबद्दल केलेली विनोदी निरीक्षणं मांडण्याचा अवकाशही मिळाला आहे. कर्नाटकातले पार्श्वनाथ उपाध्ये हे भरतनाट्यम नर्तक त्यांच्या इन्स्टाग्राम खात्यावरून अशी नर्मविनोदी सादरीकरणं करत असतात. त्यांच्या चाहत्यांना ती बेहद्द आवडतात. या चाहत्यांच्या यादीत नृत्यविश्वातील अनेक दिग्गजांचा समावेश आहे. त्यांच्या बिंदू नावाच्या काल्पनिक शिष्याबरोबरचे विनोदी संवाद लोकप्रिय आहेत. बिंदूच्या माध्यमातून उपाध्ये आजच्या नृत्यविश्वातल्या घडामोडींवर उपरोधिक तरीही हलकी फुलकी टिप्पणी करत असतात.

हे सगळं जरी उत्साहवर्धक असलं, तरी आज बहुतांश नृत्यकर्मी आज समाजमाध्यमांचा वापर सतत लोकांच्या नजरेत, डोळ्यांसमोर असण्याच्या आणि लक्षात राहण्याच्या अशा एकाच ध्यासानं करताना दिसतात. आकर्षक वेशभूषा, चित्तवेधक नेपथ्य, वेगवेगळ्या प्रसिद्ध पर्यटनस्थळांवर जाऊन केलेलं चित्रीकरण हेच इन्स्टाग्रामवर राजरोस बघायला मिळतं. अशा प्रकारच्या रील केवळ जास्तीत जास्त लोकांचं लक्ष वेधून घेता येईल या उद्देशानं केलेल्या असतात. मात्र त्यात सौंदर्यदृष्टी, तर्क किंवा कलात्मकता असेलच असं नाही. तरीही, लोकांचं लक्ष वेधून घेतल्यानं पुढील गणिती अल्गोरिदमला चालना मिळते आणि ते उत्तरोत्तर मिळणारे 'लाईक्स' खाऊन 'व्हायरल' होतं. पण याचीही चटक लागते आणि त्यामुळे आज नृत्यकर्मींचा अधिकाधिक वेळ या रील करण्यात जात आहे . याचा परिणाम अर्थातच त्यांच्या नृत्याच्या गुणवत्तेवर होत आहे. छोट्या, लक्षवेधक रील वर सतत काम केल्यानं प्रत्यक्ष रंगमंचावर सादर करायच्या त्यांच्या दीर्घ रचनांवर विपरीत परिणाम नक्कीच होत आहे.

"नृत्य आता केवळ नेत्रसुखद हालचालींची शृंखला होऊ लागलं आहे" असं प्रख्यात मोहिनआट्टम नृत्यांगना, संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळालेल्या डॉ. नीना प्रसाद म्हणतात. "आमच्या नृत्यप्रकाराचं वैशिष्ट्य त्यातली समर्पणाची, विनयाची भावना आहे. या नृत्याचा पोत 'नैसर्गिक' हालचालींचा आहे. पण लोकांच्या डोळ्यात भरावं अशा एकाच उद्देशानं सादर केलेल्या नृत्याची शरीरभाषाच वेगळी असते. असं नृत्य एक प्रकारचा कृत्रिमपणा लेवून येतं."



महाराजा स्वाती तिरुनाल यांची रचना सादर करताना नीना प्रसाद

न्यूयॉर्कस्थित नृत्य दिग्दर्शिका माया कुलकर्णी याला माध्यमाच्या लोकशाहीकरणातून उद्भवणारी ल. सा. वि. (लघुत्तम सामायिक विभाजक) समस्या असं म्हणतात.

कलाकारांकडून होणारे सादरीकरण आणि प्रेक्षकांकडून मिळणारा वेळ या दोन्हींचा दर्जा खालावला आहे. नृत्य बघण्याची क्रिया आता सौंदर्यपूर्ण सखोल अनुभूतीऐवजी ६० सेकंदांच्या रिळाद्वारे मिळणारा क्षणिक आनंद होऊन बसली आहे. नर्तक आपली ऊर्जा या माध्यमाद्वारे स्मार्टफोनच्या पडद्यावरील बहुसंख्य प्रेक्षकांना रिझवण्यात खर्ची घालत आहेत. समाजमाध्यमांमुळे एकंदरीतच नृत्य म्हणजे सुंदर अंगयष्टी, मोठाल्या उड्या, गिरक्या, जलद पदन्यास असा दिपवून टाकणारा प्रकार झाला आहे. परिपूर्ण रेखीव, ठसा उमटवण्यासाठीच बेतलेल्या हालचालींमध्ये ना उत्स्फूर्तता असते ना अंतर्मुख करण्याचं सामर्थ्य – खरी कला त्यातून निर्माण होत असते.

"जेव्हा कलाकारांना एखाद्या नृत्यप्रकाराचा आकृतीबंध व त्यातील हालचाली बिनचूक जमतात तेव्हा त्यांना वाटतं आपण जिंकली," कुलकर्णी म्हणतात. "आणि प्रेक्षकांना वैविध्य हवं असतं, त्यांना एक नाच पाहायचा असतो. त्याद्वारे त्यांना अंतर्मुख होणं, विचार करणं, बदलणं असं काही नको असतं. त्यांना फक्त दृश्यात्मक करमणूक हवी असते." भारतीय अभिजात नृत्यशैली पुष्ट होण्यासाठी त्यांना प्रेक्षक हे केवळ बघे असून भागत नाही. ते रसिक, सहृदयी असावे लागतात. म्हणजेच त्यांनी खुल्या दिल्याने कलात्मक अनुभूतीला सामोरे जाऊन तल्लीन व्हावं अशी अपेक्षा असते. अशा जाणकार, संयमी प्रेक्षकांअभावी एकल नृत्यातून हळूहळू उलगडत जाणारे, सूक्ष्म व नाजूक भावना दर्शवणारे प्रयोग दिवसेंदिवस कमी होत आहेत. अगदी प्रस्थापित कलाकारही तशा प्रकारचे सादरीकरण करताना फारसे दिसत नाहीत.

समाजमाध्यमांमुळं प्रत्यक्ष नृत्यमैफिलींच्या विश्वावर अनेक प्रकारे परिणाम होताना दिसत आहेत. सौम्या राजाराम या बोस्टनमध्ये राहणाऱ्या भरतनाट्यम नृत्यांगना म्हणतात,

"नृत्यमहोत्सवांचे आयोजक मला अनेकदा विचारतात की मी समाजमाध्यमांवर का वावरत नाही. त्यांच्या दृष्टीने जर एखादा कलाकार समाजमाध्यमांत सहज दिसत असेल, तर अशा कलाकारांची मैफल (यशस्वीपणे) आयोजित करणं त्यांना सोपं जातं. गेली काही वर्षं मी समाजमाध्यमांत अधिक वावरत आहे, पण या साऱ्यांत पुष्कळ वेळ व शक्ती खर्च होते, मग नृत्यासाठी वेळ कमी पडतो."

असंच, पण दुसऱ्या बाजूनं येणारं मत सोफिया सालिंगारोस या न्यू यॉर्क सिटी इथे राहणाऱ्या भरतनाट्यम कलाकारही व्यक्त करतात. त्यांना इन्स्टाग्रामवर ५९ हजार ४०० जण प्रेक्षक म्हणून लाभले आहेत. इतर भारतीय शास्त्रीय नृत्यकारांच्या तुलनेत ही संख्या बऱ्यापैकी मोठी आहे. त्या समाजमाध्यमांकरता बाहेरच्या चित्रीकरणाची व्यवस्थित आखणी करून ठेवतात.

"आठवडाभर मी कपडे, ठिकाण, कॅमेरे कसे कुठे लावायचे वगैरेची योजना आखते. मग शनिवार-रविवार वेळ असतो तेव्हा प्रत्यक्ष चित्रण." मात्र समाजमाध्यमांवरच्या लोकप्रियतेवर प्रेक्षागृहातील सादरीकरण यशस्वी होत नाही याची सोफिया सालिंगारोसना जाणीव आहे. "छोटंसं रीळ बनवायला नाचणं सोपं असतं. पण पूर्ण दीड तास प्रेक्षकांना खिळवून ठेवणं, संपूर्ण मार्गम् अथपासून इतिपर्यंत उत्तम प्रकारे निभावणं म्हणजे मैफलीचा कलाकार होणं."

सालिंगारोस उत्तर अमेरिका व भारतात रंगमंचीय मैफली करतात.

या क्षेत्रातील जुन्या जाणत्या गुरूंना मात्र समाजमाध्यमांवर दिसण्यासाठी जो वेळ व परिश्रम खर्ची पडतात त्याची चिंता वाटते. सराव, कार्यक्रम, शिकवण्या, प्रशासकीय कामे आणि कधीकधी अर्थार्जनासाठी काही वेगळे काम करत असतील तर ते – अशा सर्व बाजूंनी कलाकार आधीच व्यग्र असतात.

"वाचन, सराव यावर घालवण्याचा वेळ ही समाजमाध्यमं खाऊ लागतात." हे शर्मिला बिश्वास नमूद करतात.

रील तयार करण्यात घालवलेला वेळ सखोल काव्यात्म कल्पनांचा विचार करण्यात, आपले नृत्य अधिक प्रभावी करण्यात वापरता येऊ शकतो. आरेकरांनाही समाजमाध्यमांमुळे येणारा व्यत्यय, लक्ष विचलित होणं, एकाग्रता साधता न येणं या बाबींची चिंता वाटते.

"आजकाल कलाकार व प्रेक्षकांमध्ये आढळणारी बाब म्हणजे एकाग्र चित्ताची वानवा – शरीर आणि मनाचं एका ठिकाणी असणंच कमी झालं आहे. मी माझ्या शिष्यपरिवाराला थोडीफार शिस्त लावण्याचा प्रयत्न करतो, पण ही समस्या आहे, हे वास्तव आहे. लोकांना भरपूर पाहायचं आहे, पण त्याची खोली समजून घ्यायची नाहीये."

सखोलतेचे महत्त्व कमी होणं हे अनेक कलाकारांच्या, विशेषतः जे या कलेशी समाजमाध्यमपूर्व काळापासून जोडलेले आहेत त्यांच्या चिंतेचं कारण आहे. जर आयते प्रेक्षक आणि त्यांचा तत्काळ लाइक्स आणि वाहवा याद्वारे प्रतिसाद मिळत असेल तर कलाकारांना सखोल विचार करायची गरजच काय!

समाजमाध्यमांवर शास्त्रीय नृत्यं लोकप्रिय राहणारच आहेत. ती वेधक, चित्ताकर्षक, प्रभावी, अगदी आपणही शिकावीशी वाटायला लावणारी आहेत आणि ती अल्गोरिदमच्या अदृश्य दोरीने सतत झुलतच राहतील. नृत्यदिग्दर्शक अश्या नृत्याच्या मागणीला बळी पडत आहेतच. नृत्यमहोत्सवाच्या आयोजकांनाही त्यांची भुरळ पडली आहे. हल्ली समूहरचना करून लक्ष वेधून घेणाऱ्या कार्यक्रमांना मागणी वाढत आहे. पण खरं तर या नृत्यप्रकारांचा आत्मा एकल सादरीकरणात आहे. इंग्लंड-अमेरिकेतल्या भारतीय वंशाच्या लोकांच्या हातात आर्थिक आणि सामाजिक सत्ता आल्यापासून ते भारतीय शास्त्रीय नृत्यप्रकारांच्या अर्थकारणाचा भाग झाले आहेत. काही वर्षांपूर्वी इंडियन रागा या नावाच्या अमेरिकेतील कंपनीचे २ ते ५ मिनिटांचे शास्त्रीय नृत्याचे व्हिडिओ बरेच लोकप्रिय झाले. हालचाली शास्त्रीय नृत्याच्या, पार्श्वसंगीत आधुनिक पाश्चिमात्य वाद्यमेळाचं किंवा संमिश्र, आणि चित्रण वेगळ्याच कुठल्यातरी ठिकाणी – अगदी वाळवंटातदेखील. त्या व्हिडिओंमधल्या अनेक तरुण कलाकारांचा आता अमेरिका व भारतातल्या नृत्यमहोत्सवांत सहभाग असतो.

या साऱ्यात नृत्य या कलेचं काय होणार? सोफिया सालिंगारोस म्हणतात,

"मला नाही वाटत आयोजक मला बोलावतात तेव्हा माझे इन्स्टाग्रामवर किती फॉलोअर्स आहेत हे पाहून मग ठरवतात. माझं नृत्य लोकांना आवडते म्हणून मला सादरीकरणासाठी बोलावतात."

मांढरे म्हणतात, "ही केवळ आयुधं आहेत. फक्त समाजमाध्यमांवरची लोकप्रियता खरी नाही. कला व तिचा रियाझ यालाच अंतिमतः अर्थ आहे."

सोनाली मिश्रांना वाटतं :

"यांतल्या बऱ्याच गोष्टी हा निव्वळ नृत्य व कलाकारी या गोष्टी व्यापारी वृत्तीने विकणारा फुगा आहे. तुम्ही त्यात सहभागी झालंच पाहिजे असं मुळीच नाही. त्याबाहेर राहूनही तुम्ही कलाकार म्हणून तुमचे अस्तित्त्व शाबूत ठेवू शकता."

नृत्यदिग्दर्शकांना परिस्थिती आशादायक वाटते, मात्र त्यांची भिस्त आपल्या कलेशी इमान राखण्यावर आहे. माया कुलकर्णी म्हणतात, "साजरं दिसणं आणि सौंदर्य यात फरक आहे. काव्यात्मतेची खोली व सौंदर्य यांचा शोध घेणे हे माझ्या कलेचे ध्येय आहे. निव्वळ लक्ष वेधून घेण्यासाठी काही करण्यात मला स्वारस्य नाही."

माया कुलकर्णी
माया कुलकर्णी. (चित्रश्रेय : साबू आदित्यन)

शर्मिला बिश्वासांच्या मते "शेवटी मी काही तंत्रकुशल व्यक्ती नाही. माझे नृत्य हा प्रेक्षकांशी साधलेला व्यक्तिगत आणि खाजगी संवाद आहे."

वैभव आरेकरांना स्फूर्ती आतूनच मिळते असंच वाटतं. त्यासाठी त्यांना वाचन, चित्र, शिल्प प्रदर्शनांना भेटी देणं, नाटकं पाहणं, नृत्याचे कार्यक्रम पाहणं आणि एकूणच जीवन भरभरून जगणं आवश्यक वाटतं.

"प्रेक्षकांसमोर रंगमंचावर सादर केलेल्या माझ्या कार्यक्रमातला काही भाग मी समाजमाध्यमांवर टाकतो. मुद्दाम इन्स्टाग्राम किंवा फेसबुकसाठी व्हिडिओ तयार करण्यात मला रस नाही. हे इन्स्टा-आर्ट टिकेल असं मला वाटत नाही. निदान मी तरी त्या वाटेला जाणार नाही. हे असे ४०, १५, अगदी ३ सेकंदाचे व्हिडिओ हा भलता प्रकार माझ्यासाठी नाही ."

विसाव्या शतकाच्या सुरुवातीला नृत्यकला आंतरगृहांतून रंगमंचावर आली, तेव्हा तिचं खासगी, अंतर्मुख सादरीकरण अधिक लोकाभिमुख झालं. यामुळे नृत्यकर्मी कलेचा आस्वाद घेण्यापेक्षा हळूहळू कलेच्या प्रदर्शनाला महत्त्व देऊ लागले. आता एकविसाव्या शतकात समाजमाध्यमांमुळे होणारी स्थित्यंतरं अजून पुरती उलगडलेली नाहीत, पण इथेही ती स्थित्यंतरं स्वतःकडे नेणाऱ्या आतल्या, आध्यात्मिक प्रवासापेक्षा बाह्य प्रदर्शनाकडे झुकणारी आहेत. समाजमाध्यमांचा कला, आविष्कार आणि प्रेक्षक यांवर किती आणि कसा परिणाम होईल ते काळच ठरवेल.

तळटिपा :

सुरुवातीला, १९५०च्या दशकात संगीत नाटक अकादमीनं भरतनाट्यम, कथक, मणिपुरी आणि कथकली या चार नृत्यप्रकारांना शास्त्रीय नृत्यांचा दर्जा दिला. त्यांत १९६० च्या दशकात ओडिसी आणि कुचिपुडी यांची भर पडली. मोहिनीआट्टम १९७० च्या दशकात आणि होत्रिय अगदी अलीकडे म्हणजे २००० साली.
युरोपात ज्याला 'क्लासिकल' म्हणतात तशा प्रकारच्या कलांसाठी त्यातल्या त्यात जवळ जाणारा शब्द म्हणून 'शास्त्रीय' या शब्दाची निवड झाली. 'शास्त्रांतून' आलेल्या अशा अर्थानं.
भरतनाट्यम शैलीत, एखाद्या कार्यक्रमात सादर होणाऱ्या कलाकृतींच्या क्रमाला 'मार्गम' म्हणतात.

ऋणनिर्देश

  • सुप्रिया नायक (नवी दिल्ली)
  • सपना गोविंदन (बॉस्टन)
  • कार्लितो कातालानो (बहामाज)
  • सोनाली मिश्रा (नवी दिल्ली)
  • विरजा आणि श्यामजीत किरण (चेन्नई)
  • सोफिया सालिंगारोस (न्यू यॉर्क)
  • माया कुलकर्णी (न्यू यॉर्क)
  • वैभव आरेकर (मुंबई)
  • शर्मिला बिश्वास (कोलकाता)
  • डॉ. नीना प्रसाद (तिरुअनंतपुरम)
  • सौम्या राजाराम (बॉस्टन)

लेखिकेचा परिचय :

प्रिया बंगाळओडिसी नृत्यांगना आहेत. त्या अमेरिकेतील बॉस्टन, मॅसेच्युसेट्स इथे कार्यरत आहेत. त्या ओडिसी नृत्याचं सादरीकरण करतात आणि विविध गटांतून ओडिसीचा प्रसारही करतात. त्यांनी क्षिप्रा मेहरोत्रा आणि गुरु मधुस्मिता मोहंती (ओडिशा डान्स अकादमी, भुबनेश्वर) यांच्याकडून ओडिसी नृत्याचं शिक्षण घेतलं आहे. त्यांचं सध्याच्या कामासाठी त्यांना मॅसॅच्युसेट्स कल्चरल काउन्सिल आणि न्यू इंग्लंड फाउंडेशन ऑफ आर्टस् यांकडून शिष्यवृत्ती मिळाली आहे. ओडिसी शिकण्याआधी प्रिया यांनी अनेक वर्षं भरतनाट्यमचं या नृत्यप्रकाराचं शिक्षण घेतलं आहे.

प्रिया बंगाळ
field_vote: 
0
No votes yet