पॅरिसमधल्या पर्यावरण शिखरपरिषदेची (COP21) सांगता १२ डिसेंबर २०१५ ला झाली. त्या दिवशी UNFCCC (United Nations Framework Convention on Climate Change) मधल्या १९५ देशांनी आणि युरोपियन राष्ट्रसंघटनेने ‘पॅरिस करार’ एकमुखाने मान्य केला. या करारांतर्गत जागतिक इंधन वापर (emissions) कमी करून हरितगृह-वायूंवर (greenhouse gas) नियंत्रण आणणे मान्य केले गेले. ‘जागतिक तापमानवाढीमुळे जगाच्या पर्यावरणासाठी निर्माण झालेल्या संकटाला सामोरे जाण्यासाठी झालेला एक ऐतिहासिक करार’ असा माध्यमांतून बोलबाला झाला, आणि त्याचप्रमाणे त्याच्या मर्यादांची आणि यशापयशांचीही चर्चा झाली.