... ऊर्फ सुगरणीचा सल्ला: फेण्या

फेण्या हा निव्वळ एक पदार्थ आहे अशी तुमची समजूत असेल तर ती आधी दूर करा. तो एक सांस्कृतिक उपक्रम आहे.

'बर्‍याच दिवसांत फेण्या नाही बा झाल्या...' अशा एखाद्या कुरकुरसदृश पुसट वाक्यानं त्याची सुरुवात होते. असल्या निरुपद्रवी वाक्यांकडे सुरुवातीच्या टप्प्यावर संपूर्ण दुर्लक्ष करायचं असतं हे आकाशवाणी जाणून असल्यामुळे ते वाक्य हवेतच विरतं. कुरकुरवाक्याला जन्म देणारी बोरही बाभळीच्याच गावची असल्यामुळे ती अजिबात खचून जात नाही. रागरंग, वातावरणातला दाब, तापमान, हवामान, वार्‍याची दिशा, मूड, वेळवखत आणि आसमंतातून मिळू शकणारा पाठिंबा पाहून पुन्हा एकदा, पण या खेपेला थोड्या ठाम आवाजात, त्याच वाक्याची डिलिवरी केली जाते. "बरेच दिवसांत फेण्या नाही झाल्या." (या वाक्याच्या शेवटी पूर्णविराम आहे. तरंगती तीन टिंबं नाहीत, प्लीज नोट.) टायमिंग जमून आलेलं असेल (घरातल्या सगळ्यांना रविवार सकाळ मोकळी असणे आणि अशी रविवार सकाळ बरोब्बर तीन-चार दिवसांच्या अंतरावर उभी असणे) तर वातावरणातून दुजोरा मिळतो आणि गाडी, 'किती तांदूळ भिजत टाकू?' या प्रश्नावर सरकते.

हा प्रश्न अत्यंत ट्रिकी आहे, लक्षात घ्या. फेण्यांच्या कार्यक्रमात नक्की कोण कोण कशा प्रकारची मदत करणार आहे, गिळायला कुणाकुणाला बोलावलं जाणार आहे, कधी नव्हे ते फेण्या वाळवण्याचा आचरटपणा आकाशवाणीच्या डोक्यात आलेला नाही ना, मंडळींचे डाएट प्लॅन्स कोणत्या टप्प्यावर आहेत, अशा अनेक उपप्रश्नांची उजळणी केल्यानंतर या प्रश्नाचं अचूक आणि सोईचं उत्तर सापडतं.

फेण्या वाळवायच्या असतील, तर प्रश्नच मिटला. मग त्या उपक्रमाला आपल्या दृष्टीनं तसाही काही अर्थ नसतो. म्हणजे वर्षात कधीतरी कुठल्यातरी संध्याकाळच्या बोअर आमटीभाताला टेकू म्हणून तळणाची तरतूद व्हावी; याकरता तांदूळ भिजवणं, धुणं, आंबवणं, वाटणं, ४ तास खर्चून त्याचे पापुद्रे शिजवणं आणि मग राखण वगैरे करून ते वाळवणं? कमॉन. याहून मी मेंदी सात वेळा गाळून घेऊन त्याचे कोन करीन आणि विकीन. मलमलीच्या फडक्यातून. त्यामुळे वाळवणाचा किडा कुणाला (कुणाला म्हणजे आकाशवाणीला. बाकी कुणी तितकं विकृत नाही. बाबांच्या माहेरून आलेल्या एका आजींनी एकदा 'हे काय? फेण्या वाळवाच्च्या नैत? नुसत्याच खायच्या?' असा प्रश्न विचारून स्वतःला ब्लॅकलिस्ट करून घेतलं होतं. त्यांना अत्यंत तुच्छ लुक देण्यात बाबा आघाडीवर असल्यामुळे आम्हांला त्यांचा आत्यंतिक अभिमान वाटला होता. असो.) चावला असेलच, तर तो तिथल्या तिथे ठेचावा लागतो. मग कुटुंबबाह्य असा पाचवा (वा अधिक) कोन रविवारी सकाळी उगवणार आहे(त) काय, याची सावध चौकशी. आपल्याला ओट्यापाशी उभं राहायला (हे 'ओट्यावर बैठक मारायला' असे वाचावे.) किती वेळ आहे, त्याचाही एक अंदाज. मग "३ किलो तरी तांदूळ टाक." इथून घासाघिशीला सुरुवात होते.

पुढे हे माप एका किलोवर घसरतं की वास्तववादी अशा दीड-दोन किलोंवर स्थिरावतं, हा तुमच्या आणि आकाशवाणीच्या बार्गेनिंग स्किल्सचा भाग आहे. मग तांदूळ भिजत पडल्याची खातरजमा करून घ्यायची आणि अधून मधून परमळणारा धान्य आंबल्याचा अनवट सुगंध अनुभवत रविवार सकाळीची वाट पाहायची, हा मोहक भाग वाटेत लागतो.

तांदूळ रोज रात्री चोळून चोळून धुवायचे असतात. पाणी बदलायचं असतं. तिसर्‍या रात्री ते गंधासारखे वाटायचे असतात. हे थोडे गद्य तपशील. विशेषतः वाटणाचा भाग. ते वाटताना मिक्सरच्या भांड्यात आधीच बरंच पाणी ठेवून चालत नाही. तसं केल्यास कण्या राहतात. तांदूळ आधी बारीक वाटून घेऊन मग त्यात हळूहळू पाणी घालायचं आणि प्रकरण गंधासारखं मऊ वाटून घ्यायचं. वाटतानाच मीठ घातलेलं उत्तम. मिक्सरच्या भांड्यावर फार लोड येता कामा नये, अशा बेतानं तांदूळ घालायचे. तसंच वाटणाच्या ४ ब्याच झाल्यानंतर थोडं थांबायलाही विसरायचं नाही. मिक्सर तापून रबर वितळलं आणि फेण्या बोंबलल्या असा अनवस्था प्रसंग ओढवू शकतो. हे सगळं करताना अ‍ॅप्रन किंवा गेला बाजार जुना पंचा चढवायला विसरायचं नाही. वाटण झालं की त्याकडे एकदा धन्य होऊन बघायचं.

मग किमान अर्धा लीटर तरी दुधाला - सायीसकट - विरजण लावायचं. आणि निवांत ऑफलाईन (हे 'ऑनलाईन' असे वाचावे.) जायचं. घरातल्या इतर सदस्यांमध्येही उत्कंठा असल्यामुळे कुणीतरी फेण्यांचा साचा आणि पत्रे हुडकून, धुऊन-पुसून समोर काढून ठेवलेले असतात. रविवारी सकाळी साताच्या आसपास उठून स्वैपाकघरात दाखल व्हायचं, बस. तुम्ही एकटे नसताच.

फेण्यांमध्ये जिरं घालायचं की मिरची वाटून घालायची, पांढरे तीळ हवेत की नकोत, नुसत्या मिठाच्याच छान लागतात... असा काहीतरी खल चालू असतो. सोबतीला आयता चहा. रविवारचे पेपर. रंगोली. बहुतेकदा या वादात आपलं बहुमोल मत घेऊन उतरायची गरज नसते. तिळांची सरशी होते आणि साचे लागू लागतात. पाण्याच्या थेंबाच्या आकाराचा एक, असे सात पातळ पत्रे एका संचात असतात. हे पत्रे एकमेकांना न चिकटता वाफवता यावेत असा साचा असतो. या पत्र्यांवर प्रत्येकी एक डावभर पातळ पीठ सोडणे आणि पत्रा हातानं गोल फिरवून ते पीठ त्या पत्र्याला साऽरखं लिंपणे हा कौशल्याचा भाग आहे. हा थर कमीजास्त जाडीचा झाला तर फेणी पत्र्यापासून सोडवताना आयमाय काढायची वेळ येते. असे दोन संच हाताशी ठेवलेले असतात. एक संच भरून विनाशिट्टीच्या कुकरात (किंवा मोदकपात्रात) वाफवायला ठेवायचा आणि पाच-सात मिनिटं कशीतरी कळ काढायची.

त्याचं झाकण निघालं की घरदार - पाहुणे असतील तर पाहुणेही. सुरुवातीला काही मंद पाहुणे लाजतात. पण हळूहळू त्यांची भीड चेपते आणि फेण्यांचं आकर्षण जिंकतं. आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करावं. येतात मागाहून. - ओट्याशी गोळा होतं. पत्रे वाटून घेतले जातात. नवशिक्या लोकांना पत्र्यापासून फेणी सोडवायला दुसरा पत्रा, सुरी, चमचा असलं काहीतरी आयुध लागतं. पण हे असलं काहीतरी वापरणं आमच्याकडे अपमानास्पद मानतात. शिजून चकाकी आलेली पात्तळ फेणी अशी नितळपणे सुटून येते आणि थेट तोंडात जाते! ती तशी सुटली नाही, तर 'कित्ती घाई तुम्हांला? शिजायला हव्ये!' असं करवादण्याचा पर्याय असतोच.

एकापाठोपाठ एक साचे शिजत जातात. सुरुवातीची क्षुधाशांती होईपर्यंत दरेक साच्यावर झडप घालून पत्र्यांची वाटणी होते. सोबत सायीचं दही आणि मीठ. गोडेतेल आणि मीठ. किंवा काहीच नाही. कधी सुरळीच्या वडीसारखी गुंडाळून घ्यायची आणि मग ती एकेक पदर सोडवत खायची. कधी तिची नीट घडीच्या पोळीसारखी घडी करून खायची. कधी आख्खंच्या आख्खं वर्तुळ तोंडात गडप करायचं... कधी दुसर्‍याकडचा पत्रा पळवायचा. आपले पत्रे राखायचे. अधून मधून ओट्यावर स्थानापन्न होऊन आकाशवाणीला सुट्टी द्यायची. सूचना ऐकणे, स्वीकारणे, परतवणे - असा खेळ खेळायचा. पुढच्या खेपेला फेण्या खायला कुणाला बोलवायचं त्याचे बेत करायचे. पुण्यातल्या तुळशीबागवासी सुपीक डोक्याच्या लोकांनी हे साचे विकायला काढेस्तोवर हाच उपद्व्याप पळसाच्या पानांवर 'एका वेळी तीन' अशा दरानं करत असत आणि वर फेण्या वाळवतही असत, त्याबद्दल गप्पा करून तेव्हाच्या मुलांची (आणि बायकांची) कीव आणि नवल करायचं. बाबांच्या माहेरच्या त्या आजींचा एकमतानं उद्धार करायचा. ऑफिसातल्या एका कोस्टल एलिमेंटनं मारे कौतुकानं कशा डबाभर फेण्या आणल्या, आणि बाकी प्रांतातल्या मंडळींना या गुळाची चव ठाऊक नसल्यामुळे तो डबा आपल्या उदरी कसा सद्गती पावला, त्याच्या कहाण्या कौतुकानं चघळायच्या. "कुणीसं दारावर येतं विकायला. पण एकेका फेणीचे तीन-तीन रुपये घेतात!" असेही पोट-अचंबे करायचे...

फेण्यांची चव, वास आणि पोत जितका महत्त्वाचा असतो, तितकीच ही कर्मकांडंही महत्त्वाची असतात.

हळूहळू आत्मे तृप्त होतात, तसतशी सोडवून घडी करून ठेवलेल्या फेण्यांची डिंगोळी साचत जाते. उशिरा उठलेले वा आलेले, आणि या प्रक्रियेतले रसगंध अनुभवण्याला मुकलेले, काही आळशी लोक नंतर या फेण्या खातात. कितीही फेण्या खाल्लेल्या असल्या, तरी "मला आमटीभाताशी थोड्या ठेव गं!" असे पुकारे होतात. "फार तहान तहान होते नाही?" "मग? आंबवलेला तांदूळ! मेल्यांनो, भाकर्‍या खाल का इतक्या? सगळं पीठ संपवलंत!" असे उद्गार निघतात. "एकदा मी वाळवणारच आहे थोड्या. हावरी कार्टी मेली!" असे संकल्प सुटतात...

बाकी स्वैपाकातलं काही हातून घडो ना घडो. पक्वान्नं तर मी तशीही विकतचीच खाणार. पण फेण्या नामक उपक्रमाचा वारसा मात्र मी माझ्याही स्वैपाकघरात नक्की चालवणार आहे.

तो काय निव्वळ पदार्थ थोडाच आहे?!

***

field_vote: 
4.8
Your rating: None Average: 4.8 (5 votes)

प्रतिक्रिया

कुठल्यातरी संध्याकाळच्या बोअर आमटीभाताला

याबद्दल प्रथम दिलगिरी व्यक्त करत असलात तर लेखाला हृद्य म्हणेन..

अरे, ब्रह्मानंदाला बोअर म्हणूच कसं शकतं कुणी ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डिपेंड्स. जर ती गोडमिट्ट सपक भटी चिंचगुळाची आमटी असेल तर बोअर हे संबोधनही स्तुतिपरच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तुमचं तर नुसत्या दिलगिरीवर भागणार नाही, खेदच व्यक्त करा अशी जळजळीत मागणी मी करत आहे.

माझ्या डोळ्यासमोर एक्झॅक्टली स्पीकिंग बादशाही बोर्डिंगची "ऑटोकम्प्लीट" फीचरवाली आमटीवाटी आहे.

आमटी चिंचगुळाची तर हवीच पण भातही आंबेमोहोराचा चिकट्टगोळा हवा..आणि तूप रवाळ साजूक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगदी अगदी! चिंचगुळाची आमटी आणि गोळा भात.. अहाहा अप्रतीम प्रकार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

या या ढेरेभट, बसा.. सरकून घेत आहे..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बादशाहीची आमटी चिंचगूळवाली असली तरी गोडमिट्ट नसते, म्हणूनच मलाही आवडते. कशी आवडत नाही ते नीट वाचा ओ गविशेट.

(बादशाही आमटीचा फ्यान) बॅटमॅन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

स्वारी. नो दिलगिरी. हृद्य नाही म्हणलात ('ण'च, 'णा' नव्हे) तरी चालेल. काय सपक प्रकार असतो आमटी म्हणजे, ह्यॅ! आमटीत आमटी किमान आख्ख्या मसुराची वा जिरंखोबरं लावून केलेली मुगाची तरी असावी, किंवा तिच्यात माठ-कैरी, मेथी-आमसूल, उडीदडाळ-कोथिंबीर असली घसघशीत पालेदार भर तरी पडलेली असावी. नपेक्षा फर्मास कुळथाचं पिठलं (हा स्वतंत्र विषय आहे, झिप्पो!) किंवा गेला बाजार बेसनाचं पिठलं तरी असावं. आमटी? चिंचगूळगोडामसाला या त्रिकुटाची आधीच मला नफरत आहे. त्यात ते तूरडाळीत जाऊन पडले की खल्लास. अगदीच क्वचित ती जमून येते. नाही असं नाही. पण तसं तर काय, साफ बंद पडलेलं घड्याळसुद्धा दिवसातून दोनदा बरोबर वेळ दाखवतं की. पुण्याच्या त्या 'श्रेयस'मध्ये आमटी खाण्याचा प्रसंग ओढवला होता एकदा. काय डाळीत गूळ म्हणता का गुळात डाळ? पाकवणी.

पण तुमच्या काही विशेष आठवणी आमटीत बुडलेल्या दिसतात. Wink तर माझा पास!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

..हाय कम्बख्त, तूने पीही नही (आमटी)..!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पूर्ण प्रतिसादाशी सहमत होऊनही असे म्हणावेसे वाटते, की एकदा बादशाहीमधील आमटी पिऊन बघा. आंबट-तिखटाची आवड माझ्याइतकी क्वचितच कुणाला असेल, पण मला तिथली आमटी आवडते. खोबरे वगैरे घालून मस्त गर्मागरम अशी ती आमटी असते. जण्रल घरातल्यासारखी पाकवणी किंवा बांग्लावणी आजिबात नसते.

आमच्या घरी चिंचगुळाची पाकवणी आमटी अनेक वर्षे केली जात असल्याने माझा त्या आमटीवर विशेष राग आहे. अलीकडे फरक पडलाय तेव्हा जरा अच्छे दिन आलेत असे म्हणावयास हर्कत नसावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हं.... कुठेसं आहे हे बादशाही?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

चिंगुला नावं ठेवण्याकरता तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

घोओओओओर अपमान

चार वर्षे पुण्यात राहून बादशाहीत एकदाच जेवलो आहे. कै खास वाटलं नै. ब्याचलरांची गरज भागवणारी मेस म्हणून ठीक आहे. पण मला जनसेवा आणि सुवर्णरेखा जास्त आवडले होते.

चिंचगुळाची आमटी खायची तर आशा बोर्डिंगातली जास्त चांगली होती. (गेलं ते आशा बोर्डिंग; आता आशा डायनिंग हॉल आहे).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

वेल, अगदी जगातभारी नसले तरी टिपिकल ब्राह्मणी स्वयंपाक सातत्याने त्या चवीचा खिलवणारी मेस म्हणून बादशाही मला तरी आवडते. घरच्यांना एकदा सहज नेले होते त्यांनाही आवडले. मातु:श्रींना आमटी विशेष आवडली होती असे स्मरते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

थत्तेचाचा चर्चा आमटीची चालली आहे, पूर्ण जेवणाची नव्हे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गोंदावल्याला गेल्या आहात काय? तिथली आमटी चाखली आहे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फारच लहानपणी. हे पुढचं मूर्तिभंजक. (अशा तीर्थस्थानांच्या ठिकाणी वा मठांमध्ये 'वा! काय त्या जेवणाची चव!' अशा प्रकारची स्तुतिसुमनं उधळली जातात, त्याकडे मी थोड्या साशंक नजरेनंच पाहते. त्यात बरेचदा (बरेचदा. कायम नव्हे. अपवाद असतातच.) भक्तांच्या वातावरणानं भारून जाण्याचा मोठा वाटा असतो. आणि 'जे जे साधं आणि सात्त्विक, ते ते बाय डिफॉल्ट उत्कृष्ट' या टिपिकल म.म.व. तत्त्वज्ञानाची फोडणी असते. त्यानं मला उचकायला होतं.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

मला तर गोंदवल्याच्या जेवणाची स्पेश्श्यालिटी म्हणून "तिथे वाढणार्‍या बायका सोवळ्याने वाढतात" असं सांगितलं होतं. सोवळ्याने वाढल्याने जेवण कस्काय पेशल होतं ते कै कळलं नै.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

जेवणाची स्पेश्श्यालिटी म्हणून "तिथे वाढणार्‍या बायका सोवळ्याने वाढतात" असं सांगितलं होतं.

ROFL

आणि शिवथरघळीत म्हणे मठातले संन्यासी जातीनं पंगतीत फिरत असतात आणि ध्यान केल्याशिवाय जेवूच देत नाहीत. पावसला त्या स्वरूपानंद का कुणाच्या मठात 'ओम् राम कृष्ण हरी' असं म्हणत गोल फिरायचं म्हणे. मग प्रसादाचं जेवण. कारण काय, तर कुणाचातरी जपाचा आकडा गाठायचा होता. अरे काये! असो. हे विषयांतर इथे नको.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

फुक्कट खाना है तो इत्ता तो बनताइच है ना.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

@मेघनाताई..

मी कोणत्याही देवस्थानात स्पेशली इंप्रेस होत नसूनही काही ठिकाणचं जेवण चांगलं असतं असा अनुभव आहे. त्यामागे इन जनरल काही कारणं असतातः

१. बहुतांश देवस्थानात हे भोजन तोंडी पडण्यापूर्वी ताटकळणे आणि कळंजणे यांची परिसीमा झालेली असते.
.....१.अ. इन्क्लुडिंग गोंदवले. तिथे तर उघडेबंब होऊन (पुरुषांना) जेवायला बसावे लागते आणि श्लोकांची दहाहजारी माळ लागते. समोर भात आमटी मीठ फेकत वाढपी जात असतात. पोटात भुकेचा जाळ असूनही श्लोकांपायी नियमानुसार संयम.. अशा पार्श्वभूमीवर शेवटी जे काही पोटात जाईल ते आत्मा थंड करणारेच वाटणार

२. बहुतांश ठिकाणी हे अन्न फुकटक्ष असतं. फुकट ते पौष्टिक हा नियम सर्वत्र लागू आहेच. Wink

३. चिपळूणच्या परशुरामाची खिचडी हा मात्र अगदी माझ्या आयडियल खिचडीच्या व्याख्येत बसणारा प्रकार असल्याने बशीभर तरी फस्त करायची इच्छा होतेच.

या सर्व बाबतीत देवस्थान असल्याचा इफेक्ट अनेकांवर असतो हा मुद्दा खास पटणीय आहे, पण तसं न मानणार्‍यांनाही काही ठिकाणचं जेवण उत्कृष्ट वाटू शकतं.

क्षः म्हणजे शक्त्यनुसार, इच्छेनुसार देणगी तुम्ही पेटीत टाकू शकता, किंवा १११ मधे साधा अभिषेक, २११ मधे स्पेशल अभिषेक इ इ इ...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तेच ते. चवबाह्य कारणं असतात. बादवे, मलाही बंगळूरच्या एका आडमार्गी साध्यासुध्या देवळात प्रसाद म्हणून मिळालेला ओंजळभर पुळियोग्रे अजूनही स्मरतो. तशी चव परत मिळाली नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

.अ. इन्क्लुडिंग गोंदवले. तिथे तर उघडेबंब होऊन (पुरुषांना) जेवायला बसावे लागते आणि श्लोकांची दहाहजारी माळ लागते. समोर भात आमटी मीठ फेकत वाढपी जात असतात. पोटात भुकेचा जाळ असूनही श्लोकांपायी नियमानुसार संयम.. अशा पार्श्वभूमीवर शेवटी जे काही पोटात जाईल ते आत्मा थंड करणारेच वाटणार

आता तरी असे उघडे होण्याची अट नाहीये.
गोंदवल्याचे उपासाचे जेवण पण चांगले होते मी एकदा जेवले होते ते. दाण्याची आमटी चांगली होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छे, मला काही त्या करणांमुळे आवडत नाही ती आमटी वा अश्या कुठल्याही ठिकाणांचं जेवण. आणि मी ही दोनदाच गेलोय गोंदावल्याला आणि ते ही फार पुर्वी आणि त्यातही दुसर्‍यांदा केवळ आमटी साठी Smile
शिर्डी आणि शेगाव इथे फार अगदी लहानपणी जेवल्याचं आठवतंय, मला नव्हतं आवडलं तिथलं जेवण (शेगावच्या कचोर्‍या मात्र आवडल्या होत्या, तसही मुळातच मला कचोरी प्रकार लै आवडतो).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भारी लिहिलय!! वाचूनच खावसं वाटतो हा प्रकार.
( पण जर हे कुरडयांच्या चिकासारखं असेल तर सॉरी )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

कुरडयाच त्या.. पण सेम माहोल कॅन बी अप्लाईड टु पोह्याचे पापड, उडदाचे डांगर, सांडगे, आंबोशी इ इ. अ‍ॅज पर अवर आवड.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कुरडया गव्हाच्या असतात. तांदळाच्या नव्हेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

लेखिकेने ठरवलं तर पाककृत्यांचे एक फर्मास पुस्तक निघून शैलीवरच तुफान खपू शकेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

नक्कीच !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सिद्धि

अगदी असेच म्हणते!! शेवयांवरचा लेख अजूनही आठवला ही हसू येते.

पाककृतीच का, कुठल्याही विषयावर असले तरी प्रथम शैलीवरच तुफान खपेल. पण पारंपारिक पाककृतींचं अशा इर्रेवेरेंट शैलीत पुस्तक वाचायला जाम आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वा मस्त. लहाणपणाची आठवण झाली....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काय वेळ आल्ये! मेघना पाककृती लिहित्ये! रुची कर गं काहीतरी. ... नाही चुकलं माझं.

बास. पुढच्या वेळेस ही सगळी उस्तवार करायलाही तुझ्याकडे येईन, पण फेण्या मिळाल्या पाहिजेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ऑपमॉन. घोर ऑपमॉन... आता फेण्या खाऊ घालीन, पण मज सुगरणीची मॉफी मागितल्यावरच! (याला उ:शाप असा की: इकडे येण्यापूर्वी रुचीकडून वर्षभरात किमान तीन तरी पाककृत्या लिहवून घे. मग मॉफी मॉफ.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

लेख भारी जमलाय. 'फेण्या - एक करणे' असं नाव शोभून दिसेल. पुस्तकाबाबत बॆटमॆनशी सहमत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगं दुष्ट बाई.
आता मला तो स्टॅण्ड आणून, फेण्या करायला शिकेपर्यंत थांबावे लागेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- नी

खुसखुशीत शैली आहे. मजा आली.
____
बाकी आमटी-भात हा बोअरींग होऊच शकत नाही याच्याशी सहमत. तरी इथे गोडा मसला मिळतो ते बरं आहे.चिंच-गूळ-गोडामसाला-मिरची (हवी तर) अन कोथिबिर घातलेली आमटी .... OMG!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

_^_
या असल्या पाकृचं पुस्तक लिहायचं खरंच मनावर घे बयो! धमाल आली.
फेण्या प्रकाराबद्दल मी फार निर्बुद्ध आहे, कौशल्याचा प्रकार दिसतो. भारतात येईन तेंव्हा प्रात्यक्षिक मिळेल काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

. पळसाच्या पानांचा वेगळा वास लागतो का फेण्यांना ?
. मिक्सरवर गुळागुळीत वाटून होईल यात शंका नाही पण पूर्वी मिक्सर नसताना फक्त पाट्यावरवंट्यावर इतके गुळगुळीत वाटता येत असे का ? नसल्यास काही युक्ती होती का ?
. तीळ, जिरं आख्खे घालायचे की वाटून ?
. गेल्या वेळी 'साटोपचंद्रिका' तर या वेळी 'पोट-अचंबे' हा शब्द आवडला आहे.
. पुस्तकाबद्दल वाल्गुदमानवाशी सहमत.
. फेणे झाले, फेण्या झाल्या. आता पुढला उपक्रम ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

. फेणे झाले, फेण्या झाल्या. आता पुढला उपक्रम

..येते काही महिने मेघनाताईंचा मुक्काम गोव्यात आहे असे ऐकले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

. पळसाच्या पानांचा वेगळा वास लागतो का फेण्यांना ?

- काही कल्पना नाही. आकाशवाणीवरही अनुभवाअभावी उत्तर मिळालं नाही. पण फेण्यांचा अंगचाच वास इतका तीव्र असतो, की पळसाचा वास येत असलाच तरी फार फरक पडत नसावा. उलट पूर्वी हे पत्रे स्टेनलेस स्टीलचे नसत. (तेव्हा ते धुऊन, कोरडे ठणठणीत वाळवून, तेलाचं बोट लावून ठेवावे लागत. तरी गंज पकडेच. मलाही ही आठवण आहे.) तेव्हा त्या 'कळकणे' या क्रियापदाची जाताजाता आठवण व्हावी, असा किंचित धातुसदृश वास त्या आंबलेल्या धान्याच्या वासात मिसळून येई आणि अजिबात नडतबिडत नसे. बाकी पळसाच्या पानांचा प्रयोग कुणी करून पाहिलाच, तर मलाही सांगा. कितीही छान वास येत असला, तरी मी त्या भानगडीत पडणं अवघड आहे मात्र.

मिक्सरवर गुळागुळीत वाटून होईल यात शंका नाही पण पूर्वी मिक्सर नसताना फक्त पाट्यावरवंट्यावर इतके गुळगुळीत वाटता येत असे का ? नसल्यास काही युक्ती होती का ?

- थेट आकाशवाणीवरून उत्तर प्रसारितः "म्हणजे? पूर्वी चटण्या नि वाटपं नसत का गुळगुळीत वाटत? न यायला काय झालं?"

. तीळ, जिरं आख्खे घालायचे की वाटून ?

- तीळ आख्खेच. जिरंही घातलं तर आख्खंच. पण दोन्ही एकदम घालत नाहीत. हे किंवा ते. कुणीकुणी खसखस घालतात. छान दिसेल, पण अजून प्रयोग करून पाहिला नाही.

. गेल्या वेळी 'साटोपचंद्रिका' तर या वेळी 'पोट-अचंबे' हा शब्द आवडला आहे.
. पुस्तकाबद्दल वाल्गुदमानवाशी सहमत.

- धन्यवाद.

. फेणे झाले, फेण्या झाल्या. आता पुढला उपक्रम ?

जरा वेणीफणी करीन म्हणत्ये. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

जरा वेणीफणी करीन म्हणत्ये.

माझं मत वेणीफणीलाच. रुचीकडूनही थोड्या टिपा घेऊ, काय म्हणतेस!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

थेट आकाशवाणीवरून उत्तर प्रसारितः "म्हणजे? पूर्वी चटण्या नि वाटपं नसत का गुळगुळीत वाटत? न यायला काय झालं?"
........अहो, चटण्या-वाटपांचा गुळगुळीतपणा नि फेण्यांसाठी लागणारा गुळागुळीतपणा हा सारखाच आहे काय ? माझ्या मते नसावा; म्हणून तर प्रश्न पडला. असो. उत्तर काही फार महत्त्वाचं नाही.

इतर उत्तरांसाठी आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्याचं काये, आकाशवाणीलाही पाटावरवंट्याचा अनुभव तसा जेमतेमच असावा, असा कयास. Wink बारीक वाटणं अशक्य नसणार. पण युक्तीबिक्ती तिच्याकडून मिळण्याचा संभव कमी.

बाबांना विचारलं तर त्यांची आठवण निराळं सांगते. हे भिजवलेले तांदूळ चौथ्या दिवशी उपसून सावलीत वाळवून घेत म्हणे. मग ते जात्यावर दळून पिठी घ्यायची नि ती वापरायची. कोकणात ओलं पीठ दळलं जातं ते फक्त आंबोळ्यांकरता. त्यामुळे जातं अधिक संयुक्तित वाटतं. पण मग आंबोळ्या करणारे लोक आंबोळ्यांचं पीठ कशावर नि कसं वाटत असत? की ते थोडं रवाळ चाले / लागे? कॉलिंग पिडांकाका आणि नंदन आणि जागू...

याच फेण्या करण्याचा एक कमी कटकटीचा नि वाळवण हमखास घडेल असा एक उपाय एक मावशीआजी वापरते. हे दळलेलं ओलं पीठ ती थेट शिजवून घेते. गव्हाचा चीक शिजवतात तसं, पण तितकं घट्ट होईस्तोवर नव्हे. ते शिजलं की ते स्वच्छ लुगड्याला वा धोतराच्या पानाला पातळ लिंपून ते कापड वाळवायचं. पूर्ण वाळलं की ते पिठापासून सहज सुटतं. त्या पापड्यांचे तुकडे जरा ओबडधोबड येतात. पण चव जवळचीच आणि व्याप कमी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

जात्यावर दळून पिठी घ्यायची नि ती वापरायची. त्यामुळे जातं अधिक संयुक्तित वाटतं.
...........हां !! आता कसं! पाट्यावरवंट्यापेक्षा जात्यावर निश्चितच मऊ भुकटी होईल. बाबांना धन्यवाद. आंबोळ्यांसाठीच्या कॉलिन्गलिष्टीत राही यांचेही नाव जोडत आहे. (जातं जाणं आणि मिक्सरचं येणं यांमधल्या काळात सार्वजनिक चक्क्यांचं उभं राहणं आहेच. तोही एक नंतरचा उपाय असू शकतो.)

<मुद्रितशोधन>संयुक्तिक नव्हे सयुक्तिक<मुद्रितशोधन>

मावशीआजींची कृती मस्त.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

<मुद्रितशोधन>अजूनही एक चूक आहे त्या शब्दात!<मुद्रितशोधन>

सार्वजनिक चक्क्यांमध्ये हे धुतलेले तांदूळ दळले जाण्याची शक्यता मला कमी वाटते. कारण ते थोडे ओलसर असत म्हणे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

पुण्यामुंबईत नॉर्मल कणिक दळण्याची चक्की शोधून सापडायची मारामार असली, तरी ओली-सुकी स्पेशल दळणे दळण्याच्या, कांडण्याच्या, अगदी उडदाच्या पापडाचं भिजवलेलं पीठ कुटून देणार्‍याही चक्क्या / गिरण्या / कांडपयंत्रे मध्यम आकाराच्या गावा-शहरांतून मुबलक आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

डु.प्र. का टा आ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

का बुवा? ( हे 'बुवा' कोणालाही उद्देशून नाही.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाप रे! बरंच कॉम्प्लिकेटेड आहे की!

पाकृंचं पुस्तक लिहिण्याचं खरोखर मनावर घेणे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

हे वाचून शाळेच्या दिवसांपासून डोक्यातील अडगळीमध्ये पडलेला श्लोक आठवला. जसा आठवला तसा येथे देतो, अचूकपणाची खात्री नाही.

दळे मुगदळे गूळपापडी
साखरफेण्या घीवर घारगि
मालपुवे अति नाजुक साजुक
अपूप बरफी....

कोणाला ह्या ओळी काय आणि कोठल्या आहेत ह्याची काही आठवण आहे काय असे विचारतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

महाराष्ट्र सारस्वतात रामदास व वामनपंडित यांच्या नंतरच्या एखाद्या प्रकरणात कुणा "पंडित" नामक कवीचा उल्लेख आलेला आहे. बहुधा त्याच चॅप्टरमध्ये असे वर्णन आहे असे आठवते.

"मुगदळ दळिया बुंदिलाडुते मिरवा" अशी काहीशी ओळ अंधुक आठवतेय. कुठल्यातरी पौराणिक कथेतल्या लग्नप्रसंगीच्या स्वयंपाकाचे वर्णन आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

नाही नाही वाघुळबुवा. तुम्ही म्हणताय तो श्लोक दुसर्‍या बाजीरावाच्या पंगतीतल्या कोण्या कवीने लिहिलेला आहे. हा श्लोक वेगळा आणि तो (कोल्हटकरांनी दिलेला) श्लोक वेगळा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हम्म, वेगळा असेलही-पण इफ आयॅम नॉट राँग, तो श्लोक बहुधा प्री-दुस्राबाजिरावकालीन असावा...सारस्वत चाळायचा कंचाळा आलाय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

नाही हो. नक्की दुसरा-बाजीराव-कालीनच आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खांडेकरांच्या 'गुदगुल्या' ह्या पुस्तकात या श्लोकाचा पाठभेद सापडला -

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वा, धन्यवाद नंदनशेठ!

@चार्वी: ओक्के, शोध घेतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

धन्यवाद नंदन. माझ्या डोक्यातली एक अडगळ साफ झाली.

मात्र तुन्ही जोडलेला उतारा पाहताच लक्षात आले की तो वि.स.खांडेकर ह्यांचा नाही. 'गुदगुल्या' हे पुस्तक संकलनात्मक आहे आणि अन्य लेखकांचे लेख येथे घेऊन त्यावर काही टिप्पणी केलेली आहे. आपण चर्चा करत आहोत तो श्लोक चिं.वि. जोशींच्या 'स्टेशनस्टाफची मेजवानी' ह्या अप्रतिम लेखातील आहे. तेथेच उल्लेखिल्यावरून कळते की श्लोक अमृतरायाचा आहे.

हा पूर्ण लेख माझ्या चांगल्या स्मरणात आहे. लेखाच्या शेवटी स्टेशनस्टाफला कळते की त्यांनी ताव मारलेले अन्न हैदराबादच्या कोणा नबाबाच्या घरच्या शादीतील उरलेले होते आणि ते तेथल्या कोणा मेहतर (भंगी) लोकांनी आपल्या बांधवांना पार्सलने पाठवले होते आणि तेच उष्टे शास्त्रीबुवा, स्टेशनमास्टर इत्यादि नाकांनी कांदे सोलणार्‍या लोकांनी नकळत जिभल्या चाटत खाल्ले.

ह्या गोष्टीवर आधारित एक विनोद माझ्या नेहमी तोंडामध्ये असतो. रेस्टॉरंटमधून परत येतांना नेहमीची 'डॉगी बॅग' घेऊन घरी येतो. दुसर्‍या दिवशी ते उघडतांना मी नेहमी 'चला आता नबाबांच्या मेजवानीतलं उरलेलं गोरगरिबांच्या तोंडात जाऊ द्या' असे म्हणतो.

ह्याच लेखात उल्लेखिलेले 'टारगट विनोद'वाले कोल्हटकर मात्र मी नाही. ते आहेत श्री.कृ.कोल्हटकर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अमॄतराय!

त्यांचे एकदोन कटाव वगळता काहीच वाचलेले नाही. Sad नवनीतात त्यांची फक्त तेवढ्यावर बोळवण केलीय-बाकी पानभर स्तुती केली असली तरीही. अमृतरायांच्या कविता कुठे वाचायला मिळतील?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

एकच माहीत आहे. आशा भोंसले यांनी गायलेले.
अजि म्यां ब्रह्म पाहिले.
कटिकरनटसम चरण विटेवरी (म्हणजे काय? कटिकर आणि सम समजले नट ऐवजी वेगळा शब्द आहे काय?)
उभे राहिले, अजि म्यां ब्रह्म पाहिले.
..
..
अमृतराय म्हणे ऐसी माऊली,
संकटां वारिले, अजि म्यां ब्रह्म पाहिले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद, हे पाहिले पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हे शब्द <कटिकरनटसम चरण विटेवरी> असे नसून <कटिकरनट समचरण विटेवरी> असे आहेत. विठ्ठलाच्या संदर्भात 'समचरणां'चा उल्लेख अनेक ठिकाणी येतो. तुकारामाने तो बर्‍याच जागी वापरला आहे. तो शब्द गूगलमध्ये घालून शोध घेतल्यास अनेक उदाहरणे दिसतील. 'विठ्ठला समचरण तुझे धरिते' हे गीत प्रसिद्धच आहे. 'समचरण समदृष्टि' असेहि विठ्ठलाचे एक वर्णन पाहिले. <कटिकरनट समचरण विटेवरी> ह्याचा अर्थ 'नटाप्रमाणे कटीवर हात ठेवलेला आणि समचरण असा विठ्ठल असा करता येईल. `समचरण`हा `पदकमल`अशा प्रकारचा गौरवाचा उल्लेख असावा असे वाटते.

अमृतरायांची (१७०८-१७५३) ह्यांची काही माहिती आणि पद्ये `महाराष्ट्रसारस्वता`मध्ये आहेत. ते औरंगाबादजवळचे आणि मध्वमुनीश्वरांचे शिष्य.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद अरविंद कोल्हटकर.
कसे काय लक्ष्यात नाही आले कोण जाणे. आणि 'समचरण सुंदर, कासे ल्याला पीतांबर' हे तर प्रसिद्धच आहे.
आणि मध्वमुनीश्वरांचे 'रामा तू माझा यजमान' हेही प्रसिद्ध आहे. त्यात शेवटी 'मध्वमुनीश्वर स्वामी रमापती' असा उल्लेख आहे आणि पुढे बहुतेक 'धरी माझा अभिमान' असेही असावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्ही 'स्टेशनस्टाफची मेजवानी'ची आठवण काढल्यामुळे जवळजवळ २० वगैरे वर्षांनी 'वायफळाचा मळा' पुन्हा वाचलं. मजा आली. आभार!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

बॅट्या, ढेरेशास्त्री, गुर्जी, प्रसाद, नीधप, शुचि, आदूबाळ

आभार. पुस्तकाचा प्रस्ताव विचाराधीन आहे. प्रतींची आगाऊ नोंदणी झाली, तर विचार कृतीत उतरेलही... Wink

रुची, ये तर खरी! प्रात्यक्षिकाचं काय घेऊन बसलीस, इन्शाल्ला, इरादे और भी हैं. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

प्र का टा आ

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काय सुरेख तलम फेण्या आहेत!
आमच्याकडे फेण्याबिण्या असले प्रकार कधी होत नसत. यासदृश खाल्लेला पदार्थ म्हणजे शेजारच्या मावशीच्या वाळवणातल्या अर्धवट वाळलेल्या साबुदाण्याच्या चीकवड्या/ पापड्या. त्या चानच लागत, पण हा मलमली प्रकार फारच मोहमयी दिसतो आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ते पानगी म्हणतात ते पण असच असत का ?

प्रकाश संतांच्या पुस्तकात पानगी चे उल्लेख वाचून पानगी खायची फार दिवसांची इच्छा आहे .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सिद्धि

मी लहानपणी मैत्रिणीकडे खाल्ली होती पानगी. बहुतेक हळदीच्या पानात लपेटलेली असावी का केळीच्या आठवत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

..हळदीच्या पानातले पातोळे.
..केळीच्या पानातली पानगी.

-कोंकणी (गवि)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पानगी याहून मोठी आणि जाड असते. किम्चित गोडसर असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही पानगी:

दुधात किंचित साखर घालून त्यात तांदुळाचं पीठ भिजवतात. नि केळीच्या पानाला ते पीठ फासून केळीच्या पानाच्या अर्धुकल्यानं झाकतात. मग तव्यावर भाजतात. पान चांगलं शेकलं, की पानगी उलटायची. मग पान आपोआप सुटं होतं. ते काढून घ्यायचं नि पानगी पुन्हा उलटायची. ती बाजू भाजली जात असताना वरचं सुटं होत आलेलं पान काढून घ्यायचं नि पानगी पुन्हा उलटून दुसरीकडूनही भाजून घ्यायची. मग लोणी / तूप + खाराची मिरची...

ताकातलीही चांगली लागते, तशीच जोंधळ्याच्या पिठाचीही.
(फोटोची लांबीरुंदी कुणीतरी धड करा बाबा.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

उत्कृष्ट..

पातोळ्यांमधे तांदूळपीठ आणि गूळ वापरतात. हळदीच्या पानाला लिंपून उरलेलं अर्धं पान वरुन बंद करुन इडलीप्रमाणे वाफवतात. (भाजत अथवा परतत नाहीत).

हळदीच्या पानाचा फ्लेवर नेमका हवा तसा सौम्य उतरतो. त्यासोबत बोळू म्हणून लोणी किंवा मुख्यतः नारळाचं घट्ट दूध घेतात.

पानगीबाबत केळ्याचं पान बळी दिल्याने खास काही फरक पडतो असं वाटत नाही. जरा ओलसरपणा राहतो, पण फ्लेवर एनहान्समेंट जाणवलेली नाही. उलट क्वचितप्रसंगी ते पान जास्त जळलं तर आक्ख्या पानगीला जळकट वास लागू शकतो. अर्थात टायमिंग साधलं तर पानगीही उत्तमच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला तो किंचित करपटलेला वास आवडतो! तसंच त्या केळीच्या पानामुळे तव्यावर पानगी भाजताना तिला तेलातुपाचा स्पर्शही करावा लागत नाही. या कारणामुळे काविळीच्या रुग्णाला पानगी मिळायची पथ्याची म्हणून. (वजा मिरची, लोणी. :()

बोळू या शब्दाच्या वापराकरता आभार.

पातोळे मात्र मला विशेष आवडत नाहीत. हळदीच्या पानाचा वास अशक्य थोर असला तरीही. त्याहून त्या वासासाठी मी धनंजयने मिपावर दिलेली केळीच्या सांदणाची पाकृ वापरीन. त्याने त्यात हळदीची पाने वापरून सांदणाचा स्वाद वाढवला आहे. (कुणी दुवा दील काय?!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

पातोळ्यांमधे तांदूळपीठ आणि गूळ वापरतात. हळदीच्या पानाला लिंपून उरलेलं अर्धं पान वरुन बंद करुन इडलीप्रमाणे वाफवतात. (भाजत अथवा परतत नाहीत).

+१

मोदकांचेच गुळचून सारण, पण पिठाचं प्रमाण जास्त - त्यामुळे पातोळ्यांना मोदकांएवढी लोकप्रियता नाही, हे खरं आहे.

धनंजय यांची सांदणाची पाककृती -
मूळ दुवा - www.misalpav.com/node/2753
(+मिपा उघडत नसल्याने cached आवृत्ती)

आणि हे फणसाचे सांदण

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मोदकाप्रमाणे सारण ? पिठाचं प्रमाण जास्त?

रत्नागिरी, गुहागर इत्यादि साईडलातरी पातोळ्यात सारण असल्याचं कधी दिसलेलं नाही. पातोळे हे फक्त उकडलेले गोडसर आणि सारणविरहीत असतात माझ्या आसपास जे काही बनवायचे त्यानुसार. तांदळाचं पीठ तंवशाच्या पाण्यात / रसात भिजवून उकडायचे पातळ थर.

तळकोंकणात किंवा गोवा-कारवारकडे व्हेरियंट असल्यास माहीत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या ठिकाणी दिसतेय पाकृ रत्नागिरी साईडची. त्यात एक कॉमेंटही आहे सारणाविषयी.

http://globalfoodcooking.blogspot.in/2014/08/blog-post_26.html

इथेही एक सापडली.. हीदेखील बिनसारणाची:

http://www.marathimati.net/patole-recipes/

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इंच का पिंच? आमच्याकडच्या पातोळ्यातही सारण नसतं. (आजोळः मु.पो. तळे, ता. खेड, जि. रत्नागिरी)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

तळकोकणात तर नक्कीच. कारवारी पद्धत अजून निराळी आहे, त्यात बहुतेक तांदळासोबत जाड पोहेही घालून पिठी अधिक भरडसर करतात.

मिपावर खास तुमच्यासाठी 'ज्योति प्रकाश' यांनी दिलेली पाककृतीही पहावी. त्यावर रेवतींच्या प्रतिसादात जी कृती दिली आहे, त्या प्रकारे तुम्ही म्हणताय का?

संपादन -
रत्नागिरीकडे केला जाणारा (पुल्लिंगी) पातोळा हा सारणरहित आणि तळकोकणात केल्या जाणार्‍या पातोळ्या (एकवचन - पातोळी, स्त्रीलिंगी) ह्या सारणधारिणी, असला भाषिक फरकही दिसतो आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हां मग शानबाग नावाच्या मैत्रिणीकडे, मी पातोळी खाल्ली होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद !
पानगीपुराण वाचून/बघून ( पोटभर जेवण झाले असूनही परत ) भूक लागली !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सिद्धि

हा सांस्कृतिक उपक्रम भारी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सहमत. (असेच म्हणतो).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आम्ही फेण्या सुकवून तळुन खातो.

१. त्या आम्ही सुकवलेल्या नसून कोणीतरी सुकवलेल्या असतात. त्या बाजारातून आणतो.
२. हल्ली मायक्रोवेव्हमध्ये भाजून खातो.
३. मेघनातैंकडून घेण्याची ऑफर देणार होतो. पण वरचे वर्णन पाहून त्यांच्याकडे फेण्या सुकण्याच्या स्टेजपर्यंत पोचण्याची शक्यता कमी दिसते. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

क्रमांक ३ यथायोग्य. (बाकी मुद्द्यांना अनुल्लेखाने मारण्यात येत आहे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

अहाहा! आमच्या शिंच्या कामात आमचं हे वराती मागून घोडं..

बरं

बाकी, आता घरी येशील तेव्हा थांब, मी केलल्या आमटीत तुला (किंवा तुझ्या पूर्वग्रहाला - डिपेंड्स घड्याळात तीच वेळ येतेय का) बुडवूनच मारतो! Wink
अमोलची सुचना आवल्डी. माझ्या घरी इडलीचा ग्रायंडर आहे. त्यात फेण्यांचं पीठ कष्ट न घेता रगडायचा विचार आहे - तोवर तुळशीबागेतून हाही साचा आणू - हाकानाका. माझ्या अंदाजाने अधिक टेस्टी पेक्षा दरवळ अधिक फर्मास सुटेल (शिवाय आंबेमोहोर तांदूळ असल्याने वासाची चिंताच नको)

==

दरवेळी शैलीला सलाम करून हात दुखू लागला आहे. पुस्तकाच्या दहा प्रती रिझर्व करतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सूचना कुठाय? शंका आहे. Biggrin

यंत्र आली की सोय येते. पदार्थ करून खाल्ला जाण्याची आणि पर्यायानं परंपरा टिकण्याची शक्यताही वाढते. शिवाय बदल हे परंपरेला तारकच. मग पर्याय असताना मुद्दाम पाऊल मागे का टाकावं? चवीत थोऽडा बदल होत असणारच. पण तसा तर अनेक अक्षरांच्या उच्चारणातही कारणपरत्वे होत आला आहे. पार्ट ऍण्ड पार्सल. (याबद्दल मतभेद आहेत हे मला ठाऊक आहे! ते जाणूनच... ;-))

आमटी ओरपायला येते!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

मस्तच लेख.
मागे एकदा चकल्यांची सुरम्य रेसिपी किंवा रेसिपी अंमलात आणण्याची रेसिपी टाकली होती. अगदी 'लगान बनताना' किंवा 'स्वदेश के पीछे' सारखी.
या स्टोर्‍यांचे एक पुस्तक व्हावे याच्याशी सहमत. किमान एखाद्या दैनिकात (लोकसता, म.टा. सारख्या. उगीच सामनाबिमना सारख्या वाचकाची दैना करणार्‍या नको) लेखमाला यावी. चुकल्या-माकल्या च्या धर्तीवर हसल्या-फसल्या पा.कृ. असे काहीतरी.
ता.क.- कोंकणात तांदुळाचे पीठ करताना नेहमीच तांदूळ धुवून (सावलीत) वाळवून मग दळत असत. केव़ळ आंबोळ्यांसासाठीच नव्हे तर एरवीही. म्हणजे मोदक, शेवया, घावन, पुरणपोळ्यांची पिठी वगैरेसाठीसुद्धा. अनारश्यांसाठी खलबत्त्यात कुटत असत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण मग जिकडे थेट तांदूळ भिजत टाकून दळायचे असत तिथे?

इथे थोडा घोळ:

१) आंबोळ्या प्रकार १: (सहसा भटांकडे) तांदुळाच्या पिठात ठेचलेली लसूण, खरटलेल्या मेथ्या, हळद, तिखट, मीठ घालून सरसरीत भिजवायचं आणि लगेच आंबोळ्या घालायच्या. यात पीठ आंबवत नाहीत. ('चुर चुर काय वाजतंय' या गोष्टीमधल्या या आंबोळ्या. जाळीदार आणि कडेला कुरकुरीत.)
२) आंबोळ्या प्रकार २: (सहसा अभटांकडे. नि हा प्रकार काळ्या वाटाण्याच्या मसालेदार उसळीसोबत वा कोंबडीच्या रश्शासोबत खातात.) तांदूळ, उडीदडाळ, मेथ्या असं भिजवायचं. इडलीप्रमाणे एक दिवस भिजवून रात्री वाटायचं. वाटताना थोडे सुके पोहे घालायचे. मीठही. आणि पुरेशी ऊब नसल्यास किंचित कच्चा कांदा घालून ते रात्रभर आंबवायचं. सकाळी बिडावर त्याच्या आंबोळ्या. त्या वाह्यात लुसलुशीत लागतात. करणारा हात कुशल असेल, तर एकही डाग न पडता पांढर्‍याफेक दिसतात नि तरी नीट शिजलेल्या असतात. कितीही वेळानं खाल्ल्या तरी त्या जराही तडतडीत लागत नाहीत.

दुसर्‍या प्रकारात पीठ कसं चालेल?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

पानगीसाठी आमच्याकडे जssरासे तूप आणि पुरेसे दूध घालून पीठ चांssगले फेसून घेतात. अळवडीसारखे पानाला लिंपता आले पाहिजे. मग अर्धा तास ते झाकून ठेवून देतात. यामुळे पानगी दडदडीत होण्यापासून बचावते. (हलकी होते.) अर्थात बचावाचे प्रयत्नच करायचे नसतील (म्हणजे रेसिपीमध्ये 'बचावाचे प्रयत्न' हा आय्टेमच नसेल) तर हा डिफेन्स मेकॅनिझ्म काही कामाचा नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पिडां मालिबुच्या देवळातील जेवण जेवलात की नाही? (आता पिडां म्हणणार शुचे मालिबुला जाऊन जाऊन गेलीस कुठे तर देवळात. धन्य आहे तुझी ;))

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाने