Skip to main content

विकीपिडीयाची वेडसर वळणं

(म्हंटली तर समीक्षा, म्हंटलं तर विडंबन या सध्याच्या ट्रेंन्डला अनुसरून)

चिंतित होते मम गोमाता
कुणी रूची ती बीफ शिजवितां
राग आवश्यक तिला कळवणं
विकीपिडीयाची वेडसर वळणं...

गोमातेवर तृप्ती नाही,
उंदीर, सापही पवित्र पाही
दुसर्‍यांच्या अन्नावर जळणं
विकीपिडीयाची वेडसर वळणं...

प्राणी पवित्र पण वनस्पती
पानी अमुच्या त्यांची निश्चिंती
जणू त्यांना काही जीवच नसणं
विकीपिडीयाची वेडसर वळणं...

माझा आहार अन् माझ्या श्रद्धा
तुम्हीही माना, बघा अन्यथा
हे तर निष्फळ कुल्ले बडवणं
विकीपिडीयाची वेडसर वळणं...

जो जे वांछिल तो ते खावो
उकरावा मग वाद कसा हो?
उरेल मग फदफदे शिजवणं
विकीपिडीयाची वेडसर वळणं...

विकीपिडीयाची वेडसर वळणं...
:)

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 16/10/2015 - 01:30

पिडांकाकांच्या लेखणीची तीक्ष्ण वळणं आवडली. (पण फदफद्याला नावं नका ठेवू. मला तेही आवडतं.)

तिरशिंगराव Fri, 16/10/2015 - 13:54

ते कुल्ले बडवणं.गोरिला छाती बडवतात याला पर्याय हा मनुष्याने शोधलेला दिसतो

असंच काही नाही. गोरिला स्वतःची छाती (कोण म्हणालं ते ५६ इंची) स्वतः बडवतो.
कुल्ले कुणाचेही बडवता येतात.

पिडां, हा फारच डांबिसपणा झाला हां!

चिमणराव Fri, 16/10/2015 - 19:16

"कुल्ले कुणाचेही बडवता येतात."-?
त्यात काय मजा नाय.स्वत्:चेच बडवण्यात जास्ती मजा.ऐकाऐका कित्ती मोठा आवाज वगैरे.{ =माझा हा लेख वाचलात का? वगैरे .}
या विडंबनाचं रसग्रहण व्हायलाच पाहिजे.कविला "xxx" मधून काय सुचवायचे आहे वगैरे वगैरे.ही कविता एक डेरिवटिव्ह आहे .प्रेरणा एक >>प्रेरणा दोन>>विडंबन.

रुची Fri, 16/10/2015 - 20:46

धन्य आहात! :-)

उंदीर, सापही पवित्र पाही

अहो गोगलगाय (अरे बापरे, त्यात 'गो' ही आहे आणि 'गाय' ही आहे!) विसरलात काय? बाकी फ्रेंचांनी त्यांच्या लाडक्या एस्कागो कडे पवित्र म्हणून पाहिलं तर गोगलगायीचा वंश सुरक्षित राहील का ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे खरी.

नंदन Fri, 16/10/2015 - 21:22

एक नंबर! 'शाकाहारी दहशतवाद' यावर मराठी विकीच्या सोज्ज्वळ पंगतीत जर कधी पान मांडले गेलेच ('आशा नाम मनुष्याणां...'), तर या कवितेलाही त्यात स्थान मिळायला हवं! ('पानी' अमुच्या त्यांची निश्चिंती ;))

अमुक Fri, 16/10/2015 - 22:08

'कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी' असं संत सावता माळी म्हणून गेले.
जरी खुद्द त्यांनी कांदा बुक्कीने फोडून मुळ्याच्या भाजीसोबत भाकरी खात आयुष्य घालवले असेल म्हणून काय झाले ! एक भाजी म्हणून आमच्या परम्प्रिय अळूच्या फदफद्याचा उपहास केल्याने तुम्ही आमच्या भावना दुखावल्या आहेत. हिरवे डांबीस कुठले !

राही Fri, 16/10/2015 - 22:41

In reply to by अमुक

बाय द वे, फदफदें की फतफतें?
पु.ल. देशपांड्यांनी काय म्हटले आहे?
('न'वी बाजूंना स्मरून)

पिवळा डांबिस Sat, 17/10/2015 - 00:09

पिडांकाकांच्या लेखणीची तीक्ष्ण वळणं आवडली. (पण फदफद्याला नावं नका ठेवू. मला तेही आवडतं.)

वळणं याचा मला कवितेत अभिप्रेत असलेला अर्थ हा वळणं = श्रद्धा, संस्कार असा आहे!
आणि अबाउट फदफदं, खा की, रोज अगदी तुझ्या पोटाला तडस लागेपर्यंत खा. आम्ही कुठे हरकत घेतोय? हाच तर मेन पॉईंटाचा मुद्दा आहे.
बाकी अळवालाही जीव आहे हो!! :)

बर्‍याच दिवसांनी लिहिते झाले

त्याचं काय आहे, म्यूज पाहिजे होतं ना चांगलं एखादं? ते मिळालं आणि मग कविता कशी (गोमूत्रासारखी) खळाळत बाहेर पडली!!! :)

कुल्ले बडवणं

हल्ली काय अवस्था आहे ते माहिती नाही पण आमच्या काळी गावात तालमी असत. तिथे माणसं व्यायाम करायला जायची. तिथे कुस्तीच्या हौद्यात कुस्तीगीर एकमेकांच्या अंगाला भिडण्यापूर्वी दंड आणि मांड्या थोपटून आव्हान द्यायचे. तो संदर्भ इथे वापरला आहे.

आमच्या परम्प्रिय अळूच्या फदफद्याचा उपहास केल्याने तुम्ही आमच्या भावना दुखावल्या आहेत.

तरी आमी त्या फदफद्यासाठी आम्हाला शक्य असूनही चित्रविचित्र उपमा आणि बीभत्स फोटो नाय टाकले. म्हणूनच सूज्ञ आणि समंजस शाकाहार्‍यांनी ह्या असल्या तालिबानी प्रचाराला आवरायची गरज आहे.
नाय तर आपुन तर काय, इचिभनं, कोयता काढून तयारच है!!! :)

'शाकाहारी दहशतवाद' यावर मराठी विकीच्या सोज्ज्वळ पंगतीत जर कधी पान मांडले गेलेच,... तर या कवितेलाही त्यात स्थान मिळायला हवं!

काकांना 'विकी डोनर' करतोस काय रे? आधी काकीला विचारून ये नाय तर तुझी रसद तुटायची!!
:)