रजनिनाथ हा नभी उगवला
आत्ताच कोजागिरी पौर्णिमा आहे असे चन्द्राकडे पाहून जाणवले आणि त्यावरून शूद्रकाच्या ’मृच्छकटिकम्’ मधील पुढील सुंदर श्लोक आणि त्याचे तितकेच सुंदर गो.ब. देवलकृत ’रजनिनाथ हा नभी उगवला’ हे मराठी भाषान्तर आठवले.
श्लोक आणि भाषान्तर असे आहे.
उदयति हि शशाङ्क: कामिनीगण्डपाण्डु:
ग्रहगणपरिवारो राजमार्गप्रदीप:|
तिमिरनिकरमध्ये रश्मयो यस्य गौरा:
स्रुतजल इव पङ्के क्षीरधारा: पतन्ति||
(कामिनीच्या भालप्रदेशासारखा गौर आणि ग्रहगणांनी वेढलेला असा चन्द्र उगवत आहे. चिखलामध्ये दुधाच्या धारा पडाव्या तसे त्याचे शुभ्र किरण अंधारामध्ये पडत आहेत.)
देवलकृत भाषान्तर:
रजनिनाथ हा नभी उगवला
राजपथी जणु दीपचि गमला।
नवयु्वतीच्या निटिलासम किती
विमल दिसे हा ग्रहगण भवती।
शुभ्रकिरण घनतिमिरी पडती
पंकी जेवि पयाच्या धारा॥
हे नाटयपद कोठल्यातरी खाजगी कार्यक्रमामध्ये गायले गेलेले येथे ऐका.
ललित लेखनाचा प्रकार
छोटा गंधर्व
यांच्या आवाजातील इथे ऐकता येईल. http://www.aathavanitli-gani.com/Song/Rajani_Nath_Ha_Nabhi
चंद्र, कमळ,मोती,भुंगा,मोर
चंद्र, कमळ,मोती,भुंगा,मोर यांना संस्कृत कवींनी बरेचदा वेठीस धरलं आहे.कोकणपट्टीत शरद ऋतू येईपर्यंत पाऊस पडून निखल होत असला तरी भारतवर्षात इतर ठिकाणचा चिखल श्रावणानंतरच नाहीसा होतो.शरदपुनवच्या दुधाच्या धाराविषयी शंकाच नाही पण त्या चिखलाविषयी होती.फारच झालं तर हे कवी धारा स्त्रियांच्या ( सुंदरच असणार )अंगावर पाडत होते.
या कवींनी निसर्गातील पक्षी ,प्राणी,वनस्पतींना दुर्लक्षून मारले आहे.शिवाय ते नुडल्ससारखे गुंतलेले संधियुक्त शब्द न तोडता गिळायचे हा संस्कृत भाषेचा अतिरेक होता.
खरे पाहता हे माझे काम नाही...
खरे पाहता हे माझे काम नाही आणि बेजबाबदार अनभ्यस्त विधानांपासून सर्व संस्कृत वाङ्मय आणि सर्व संस्कृत भाषेच्या रक्षणासाठी मी उडी घ्यावी इतका माझा अधिकारहि नाही. पण "या कवींनी निसर्गातील पक्षी ,प्राणी,वनस्पतींना दुर्लक्षून मारले आहे" असे बेधडक म्हणण्यापूर्वी अचरटमहोदयांचा ह्या क्षेत्रातील अधिकार आणि अभ्यास काय आहे हा प्रश्न मी विचारू शकतो. कलिदासाचे 'मेघदूत' वाचा आणि वर्षाकालाचे आणि त्याच्या निसर्गावरील, पशुपक्ष्यांवरील परिणामांचे अधिक यथार्थ आणि तरीहि काव्यात्म वर्णन तुम्हास अन्य कोठे आढळले आहे का ते पुराव्यानिशी मांडा असे मी त्यांना सांगतो.
नूडल्ससारखे गुंतलेले संधियुक्त शब्द संस्कृतात असले तर तसेच शब्द जर्मन, नॉर्वेजियन, स्वीडिश, आइसलँडिकमध्येहि असतात हे मला ठाऊक आहे. फ्रेंच उच्चार, इंग्रजी स्पेलिंग, रशियन जोडाक्षरे ही मला अगम्य वाटतात हे त्या त्या भाषांचे दोष का माझा अभ्यासाचा अभाव? जगातल्या सर्व गोष्टी माझ्या कोंबडीच्या पिलाच्या मेंदूला कळल्याच पाहिजेत, न कळल्या तर तो दोष माझा नाही, त्या त्या गोष्टींचा आहे असे मी का मानावे?
अजून एक गोष्ट लक्षात आली का? नीट वाचा, शरदामध्ये चिखल असतो असे शूद्रकाने अजिबात सुचविलेले नाही त्यामुळे त्यावरून त्याची खिल्ली उडविण्याचे काही कारण नाही. तो म्हणतो की अंधारामध्ये पडणारे चन्द्राचे शुभ्र किरण हे चिखलात पडणार्या दुधाच्या धारांसारखे आहेत. चिखल = अंधार आणि दुधाच्या धारा = शुभ्र किरण असा हा सरळसोट मामला आहे.
(हे टंकतांना 'ध्वन्यालोका'मधील एक वाक्य मला कैक वर्षांनंतर आठवले ते असे "योऽर्थः सहृदयश्लाघ्य: काव्यात्मेति व्यवस्थितः|"
सहृदय वाचकाला स्पर्शणारा अर्थ म्हणजे काव्य.)
फार मनाला लावून घेऊ नका :-)
फार मनाला लावून घेऊ नका :-)
कवी लोक अचाट (म्हणून कधीकधी न आवडणारे) आणि क्लिष्ट अलंकार वापरतात, अशी गमतीगमतीची तक्रार पारंपरिक आहे. बहुधा पूर्वीच्या कोण्या कवीनेही ती छानपैकी शब्दांत मांडली असावी.
त्यातही संस्कृत ही परकी वाटणे, त्यातील काव्ये मनाला न भिडणे, असे अनुभव अनेकांना येत असतील. उदाहरणार्थ -
(राजशेखराच्या कर्पूरमंजरीत सूत्रधार "संस्कृत सोडून नाटककाराने प्राकृतात हे नाटक का बरे रचले" प्रश्न विचारतो, त्याचे उत्तर देतो : )
परुसा सक्कअबंधा पाउअबंधो हि होइ सुउमारो
पुरिसमहिलाणं जेत्तिअं अंतरं तेत्तिअं इमाणं
संस्कृत रचना परुष-कठोर, तर प्राकृत रचना कोमल-सुकुमार असतात. पुरुष आणि स्त्री यांच्यात जितके अंतर असते, तितकेच या दोहोंत असते.
वाक्पतिच्या गउडवहो काव्यातील पुढील द्विपदीत संस्कृताचा उल्लेख नाही, पण प्राकृताच्या उल्लेखाची अध्याहृत तुलना संस्कृताशीच असावी (निरक्षर बहिर्या प्रियकराची निंदा नसावी) -
अमिअं पाउअकव्वं पढिउं सोउं अ जे न आणंति
कामस्स तंततंतिं कुणंति ते कह न लज्जंति
अमृत-से प्राकृत काव्य जे वाचू ऐकू शकत नाहीत, कामाचे तंत्र करताना ते कसे काय लाजत नाहीत?
-
(ता. क. "चिखलात दुधाच्या धारा" हे चित्र डोळ्यासमोर येता मला किळसेचा शाहारा येतो. माझ्या मतेसुद्धा ही उपमा रसभंग करणारी आहे. त्या मानाने "चिखलात कमळ", वगैरे, नेहमीच्या उपमा किळसवाण्या वाटत नाहीत. कारण ते कमळ स्वच्छ-सुंदर असल्याचा अनुभव खराखुरा असतो.)
कवि विरुद्ध विद्वान्...
कवि हे हलकीफुलकी भाषा वापरतात कारण तितकेच त्यांना कळते असा आरोप त्यांच्यावर वैयाकरण, नैयायिक आदि विद्वज्जन करतात त्याला एका कवीने असे उत्तर दिले:
येषां कोमलकाव्यकौशलकलालीलावती भारती|
तेषां कर्कशतर्कवक्रवचनोद्गारेऽपि किं हीयता||
यै: कान्ताकुचमण्डले कररुहा: सानन्दमारोपिता:|
तै: किं मत्तकरीन्द्रकुम्भशिखरे नाऽरोपणीया: शरा:?
कोमल काव्याच्या कुशलकलेची लीला ज्यांच्या वाणीत आहे ते कर्कश तर्कशास्त्राच्या वक्र भाषेत मागे पडतील असे का मानावे? ज्यांनी आपल्या प्रियतमांच्या स्तनांवर नखे उमटवण्याचा आनंद उपभोगला त्यांनी मदमत्त हत्तींच्या कुंभावर बाण मारू नयेत काय?
आपल्या प्रतिसादांची एक वहीच
आपल्या प्रतिसादांची एक वहीच करणार आहे. मी एक ते श्रीकृष्णाचे भजन (जे आपण पूर्वी माझ्या एका प्रतिसादास उपप्रतिसाद म्हणून दिले होते) ते शोधते आहे. नवनीतचोरम का कायसं म्हणजे लोणी चोरणारा, गोपिकांची वस्त्रे चोरणारा कान्हा, आमची पापेही तशीच चोरो (दूर करो) अशा अर्थाचे ते होते. नेटाने शोधून वहीत लिहायचे आहे. या वीकेंडला ते काम करीन. आपल्याला ते भजन आठवल्यास प्लीज द्याल का?
व्रजे वसन्तं...
व्रजे वसन्तं नवनीतचौरं गोपाङ्गनानां च दुकूलचौरम्।
अनेकजन्मार्जितपापचौरं चौराग्रगण्यं पुरुषं नमामि॥
श्रीराधिकाया हृदयस्य चौरं चौराग्रगण्यं पुरुषं नमामि॥
’हृदयस्य चौरं’ च्या ऐवजी ’हृदयकिशोरं’ हा पाठहि ऐकण्यामध्ये येतो. जसराज ह्यांनी गायलेले हे भजन येथे ऐकता येईल. रचना वल्लभाचार्यांची आहे असे जसराजच सुरुवातीला सांगतात.
मला आता कालिदासाचे मेघदूत
मला आता कालिदासाचे मेघदूत वाचायलाच पाहिजे.माझा संस्कृतचा काहीच ( अकरावीचा विषय सोडून )अभ्यास नाही.ठोकून देतो ऐसा जे असं माझं झालेलं दिसतंय.अंधार आणि प्रकाशाची कल्पना कळली.भाषांतरं वाचण्याशिवाय गत्यंतर नाही कारण त्या नुडल्सना बघून बाचकायला होतं.आपल्या अभ्यासाबद्दल टिपणी नाही.संस्कृत भाषेबद्दल अढी बसण्याचं कारण तो किचकटपणा घाबरवून सोडतो.
ज्या लोकांना संस्कृत येतं त्यांनी तिला सोपं करायला पाहिजे.एकूण कठीणच आहे.
माझ्या अचरट प्रतिसादासही न
माझ्या अचरट प्रतिसादासही न चिडता किती संयमित प्रतिसाद अरविंदरावांनी दिले आहेत ते वाचून आणखी काही लिहिण्याचा हुरुप आला.
भाषा जिवंत ठेवायची तर तिचा वापर केवळ शैक्षणिक न राहता जनसामान्यांत बोलली जायला हवी.एक मोटरसायकलची संस्कृत जाहिरात आठवली.बहुतेक 'डिस्कवर'.मंगळुरजवळच्या एका गावात तो पत्ता विचारत गाडी फिरवतो आणि त्या माणसास नगरजन संस्कृतात मार्गदर्शन ( direction )देतात.अशा काही चेहरा पांढरा ( गोरा ) करणे,साबण,वस्त्रे,शकट ( कार),दंतमंजन यांच्या जाहिराती संस्कृतात देतादेता आपल्या वारसास्थानांचे चित्रीकरण देणे गोडी उत्पन्न करेल.
मूळ श्लोक
मूळ श्लोक माहीत नव्हता. देवलांचे नाट्यगीत अनुवादित असेल असे जाणवतच नाही.