Skip to main content

अन्नासाठी दाही दिशा...

अन्नासाठी दाही दिशा...

(भारतातील सधन आणि औद्योगिक कुटुंबातील मी एक सून. कुटुंबाच्या व्यवसायातच राहण्यापेक्षा आपण आपली वेगळी वाट काढली तर आपल्या कर्तृत्वाला अधिक वाव मिळेल अशा अपेक्षेने १९६६ साली आम्ही दोघांनी आमच्या तीन मुलांसह कॅनडाची वाट धरली. तेथे मी केलेल्या धडपडीची ही कहाणी.)

१९६६ मध्ये कॅनडाकडे जायचे ठरले. नशीब काढले हो, परदेशात निघाली, मजा न् काय अशी बोलणी आम्ही ऐकत होतो. आम्ही तर दिल्लीपण पाहिली नव्हती. कौतुकाची अशी फुले झेलत मुलांसह कॅनडामध्ये पोहोचल्यावर पहिल्यांदाच पाहिलेला बर्फ बघून ’शंकराला बेल वाहते वाकून आणि हिमराशी बघते डोळा भरून’ असा उखाणा घ्यायचेच काय ते राहिले होते.

सुरुवातील नव्या नवलाईचा आणि स्वस्ताईचा, मुबलकपणाचा अनुभव घेण्यात काही महिने गेले आणि नंतर हळूहळू परिस्थितीचे चटके बसू लागले. ’तू पण आता जरा हातपाय हलवायला सुरुवात असे ’ह्यां’नी मला हळूच सुचविले. नव्याने लागलेली टीवीची संगत सोडून नोकरीचे काही जमते का बघण्याची वेळ आली इतके मला समजले.

मराठी घेऊन डिग्री घेतलेली, इंग्लिशची सवय नाही. जे काय बोलता येत होते त्यामध्ये शुद्ध मराठी आवाज आणि तर्खडकरी भाषान्तर ऐकू यायचे. ड्रेसेस कधी वापरले नव्हते. ह्या सर्व अडचणी लक्षात घेऊन घराबाहेर न पडता बेबीसिटिंगचे घरगुती काम करायचे ठरवले. एका दिवसातच रडकी बहीण आणि गुंड भावाच्या जोडगोळीने सळो की पळो करून सोडले. पैसे न मिळवता उपाशी राहीन पण लोकांची ही कवतिकं गळ्यात घेणार नाही ह्या शपथेबरोबर हा गृहोद्योग संपला.

नंतर नोकरी आली ती ओकविलच्या हॉस्पिटलात हाउस-कीपिंग खात्यात. अर्ज भरण्याची पहिलीच वेळ. शिक्षणाबरोबरच येत होते ते सगळे अर्जात लिहिले. स्वच्छता विभागात काम मिळाले. ते जमत होते. काम करता करता पेशंट मंडळींना कुंकू, हत्ती, साप, नाग वगैरे सामान्यज्ञान पुरवत मैत्री जमत होती. शत्रुत्व होते ते दोरीच्या फरशी पुसण्याने. ते करीत असता आणि आडवे-उभे फराटे मारत असता सुपरवायजर दबा धरून बसलेली असायची. आम्ही दोघी एकमेकींना वैतागवत होतो. अखेर मानभावीपणे माझ्या खांद्यावर हात ठेवून आणि माझे अर्जावर लिहिलेले शिक्षण कामाच्या गरजेहून जास्त आहे अशी सबब पुढे करून तिने मला हातात नारळ दिला.

नंतर मिळाला टोमॅटो कॅनिंगचा हंगामी जॉब. स्वत:च्या मुलाबाळांइतकेच टोमॅटोवर प्रेम करून त्यांना हाताळणार्‍या इटालियन बायकांच्या धावपळीत मी मागे पडले. हंगाम संपला आणि त्याचबरोबर ती रसरशीत लालबुंद कारकीर्दहि संपली.

मग गेले एका घडयाळांच्या कंपनीत. तेथील सुपरवाझर जरा ’हाच’ होता. चक्क माझ्या कमरेला हात घालून Come on Babe करत त्यानं मला सार्‍या कारखान्याची टूर दिली. भीतीनं माझ्या पोटात उठलेला कंप त्याला नक्कीच जाणवला असणार. इतर बेबीजच्या मानाने हे काम निराळे आहे हे त्याला कळले असावे. एका मशीनवर मला काम मिळाले. आजूबाजूला घडयाळाच्या भागांची पिंपे. मी मन लावून पायात गोळा येईपर्यंत मशीन चालवत असे पण पायतले गोळे आणि काउंटरचा आकडा ह्यांचा मेळ बसत नसे. कारण मी खरेपणाने मशीन चालवीत असे. गांधीबाबाच्या सत्य-अहिंसा देशातली ना मी! बाकीच्या बायका मशीनवर नुसता पाय ठेवून काउंटरचा भरणा करीत होत्या. कामावरून डच्चू मिळायला नेहमीचीच सबब - शिक्षण. लग्नासाठी सांगून आलेल्या मुलीला सरळ नकार सांगण्यापेक्षा पत्रिका जुळत नाही हे कारण पुढे करण्यासारखेच.

आता काय? नेहमीचाच भेडसावणारा प्रश्न. एका कारवॉशमध्ये ’मदत हवी’ ही पाटी वाचून आम्ही तिकडे धावलो. मला गाडीत बसण्याची माहिती होती पण ती धुणे वगैरे ज्ञानाची कधी जरूर पडली नव्हती. हे अमूल्य ज्ञान घ्यायचे ठरवले.

शनिवारी गरजू विद्यार्थी कामाला येत. त्यांच्याबरोबर राहून त्यांना मदत करायची, त्यांना टॉवेल द्यायचे, धुतलेली गाडी कोरडी करायची, गर्दी नसेल तेव्हा टॉवेल धुवून ठेवायचे हे काम. एक दिवशी हातात साबण आला. प्रमाण माहीत नाही. दिली अर्धी बाटली ओतून. फेसामध्ये टॉवेल दिसेनासे झाले. घाबरून गडबडीने मशीनचे दार उघडले. धरण फुटल्यासारखा फेस बाहेर आला. ’फेसच फेस चहूकडे ग बाई गेले टॉवेल कुणीकडे’ अशी माझी स्थिति झाली आणि तोंडाला फेस आला. मालक मात्र ह्या कानापासून त्या कानापर्यंत हसत होता ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब.

तुम्ही मंडळींनी गाडी चालवून अपघात केले असतील पण मी ’न धरी चाक करी मी’ अशी असूनहि एक अपघात केला. मला गाडी चालवता येत नाही, कारवॉशमध्ये गाडी असतांना गाडी सोडून जाऊ नका असे मी गिर्‍हाइकांना सांगत असे तरीहि एकाने घाईघाईने गाडी सोडली आणि तो बिल चुकते करायला धावला. इकडे गाडी ट्रॅकच्या अखेरीस आलेली. ती गॅरेज सोडून रस्त्यावर धावली आणि दुसर्‍या गाडीवर प्रेमाने आदळून तिला ओरबाडून गेली. थोडया वेळाने उंच्यापुर्‍या पोलिसाच्या सावलीने मी वर पाहिले. त्या सावलीच्या चौकशांनी आणि उलटयासुलटया प्रश्नांनी मला रडूच फुटले. कनवाळू मालकाने माझी बाजू घेऊन मला सोडवले.

ऐन थंडीमध्ये सहा महिने काम करून जॉब टिकवला पण ओकविलच्या म्युनिसिपालिटीला गावातले सगळे रस्ते सोडून आमच्या कारवॉशच्याच रस्त्याची दुरुस्ती करण्याची लहर आल्याने मालकाचा धंदा मंदावला आणि माझा हा जॉब संपला.

नोकर्‍या जात होत्या आणि मिळत होत्या. उमेद आणि कुटुंबाला हातभार लावण्याची जिद्द संपत नव्हती. दर वेळी नोकरी गेली की ’हे’ समजूत घालत पण ’नोकरी हवी’ हेहि त्यांच्या चेहर्‍यावर मला दिसे आणि मी नव्या शोधाला लागत असे.

कोणाच्यातरी ओळखीने ह्युमिडिफायरच्या फॅक्टरीत जॉब मिळाला. मालकाने जॉब देण्यापूर्वी फोन करून मी कामावर साडी वगैरे नेसून येणार नाही ह्याची खात्री करून घेतली. माझ्या अर्जावर ह्यावेळी मी शिक्षण लिहिले नाही. लिहितावाचता येते, साक्षर आहे, अंगठेबहाद्दर नाही इतकीच माहिती पुरवली.

कामाला लागल्यालागल्या तेथील मंडळींनी माझे दुसरे बारसे करून माझे ’ज्योत्स्ना’चे ’जोसी’ करून टाकले. आतापर्यंतच्या सर्व नोकर्‍यांमध्ये जास्ती म्हणजे ताशी दीड डॉलर मिळणार असे कळल्यावर ’अजि म्या ब्रह्म पाहिले’ असा भाव माझ्या चेहर्‍यावर आला. येथील पॅकिंग ह्यूमिडिफायर एकत्र जुळवणे, इतर बायकांपेक्षा मी अधिक उंच म्हणून पेंट लाइनचा जॉब, प्रेसवर्क, वेल्डिंग अशी अंगमेहनतीची कामे शिकले.

चार लोकांमध्ये माझ्या जॉबबद्दल बोलावे असे मला वाटत नसे. आपली सगळीच मंडळी तेव्हा तेथे नवीन आलेली. नोकरीच्या कल्पनाहि येतांना बरोबर घेऊन आलेली. माझ्या प्रकारचे काम इतर कोणी बायका करत नसत. त्यांना मी असले अंगमेहनतीचे काम करते हे नवलच होते. पुरुष मंडळींना मात्र मी वेल्डिंग करते आणि प्रेस चालवते ह्याचे अप्रूप वाटायचे.

हा जॉब मात्र चांगला चालला. एक दोन नाही तब्बल तेवीस वर्षे चालला. वरच्या मॅनेजमेंटचे आम्हाला काही ठाऊक नव्हते. १९८९ साली सप्टेंबरच्या सुखद हवेत फॅक्टरीचे दार उघडण्याची वाट पहात आम्ही कॉफीचे घोट घेत बसलो होतो. तेवढयात सिक्युरिटी गार्ड बाहेर आला आणि कंपनीला टाळे लागल्याची बातमी त्याने आम्हास दिली. कॉफीच्या कपात आम्ही अश्रू ढाळले. तेवीस वर्षांचा माझा आधार एका क्षणात मातीमोल झाला.

आता वय वाढलेले. ह्या वयात दुसरे काही जमेल का ह्याविषयी साशंकता. सुरुवातीला ’कॅनेडियन’ अनुभव नाही म्हणून तर आता विशिष्ट ’कॅनेडियन’ अनुभव नाही म्हणून आम्ही कोल्हापूरच्या नंदीप्रमाणे तीळभर पुढे आणि गहूभर मागे अशी जगबुडीची वाट पहात खोळंबलेले.

सुरवातीला ’जमणार नाही’ म्हणून ऑफिस कामाच्या वाटेला गेले नव्हते पण इतक्या वर्षांनंतर तेच करावे लागले. कॅनडा लाइफ इन्शुअरन्समध्ये सध्या जॉब मिळाला आहे आणि तेथे रोज नव्या गोष्टी शिकत आहे. सध्याची झटापट टर्मिनलवर ई-मेलचे मेसेजेस देण्याघेण्याची आणि औषधांची नावे, तोंडातल्या दातांची सांकेतिक नावे लक्षात ठेवण्याची आहे. हे सगळे करून दिवसाअखेरीस समोर टर्मिनलवर कॅनडा लाइफचे पेलिकन पक्षाचे बोधचिह्न दिसले की मला अजून एक दिवस सुरळीत गेल्याचे जाणवून हलकेहलके वाटते.

मंडळींनो, ही माझी वटवट ऐकून तुम्ही कंटाळलाहि असाल पण इतक्या वर्षांनंतर हे सगळे बोलल्याने माझे मन हलके झालेले आहे. माझी आई लहानपणी व्यंकटेशस्तोत्र म्हणत असे. त्यातील ओळ मला पुन्हापुन्हा आठवते - अन्नासाठी दाही दिशा, आम्हा फिरविशी जगदीशा!

(हे सर्व लेखन सुमारे अडीच दशकांमागे मी आमच्या मराठी मंडळात वाचून दाखविले होते. त्यालाहि आता खूप वर्षे झाली. कालान्तराने आमच्या तिन्ही मुलांनी उत्तम शिक्षण घेऊन आपापली यशस्वी आयुष्ये सुरू केली. आज मला तरुण नातवंडे आहेत. मुंबईतील चाळीपासून आयुष्याला सुरुवात केलेली मी. एक अमेरिकन सून, एक कॅनेडियन जावई आणि नातसूना अशा पुढील पिढ्यांच्या विस्ताराचे आता मलाच आश्चर्य वाटते आणि ह्या विस्ताराला मी अंशत: कारण झाले हे समाधानहि वाटते.)

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

नंदन Fri, 01/01/2016 - 06:47

परिचित विषय असूनही लेख आवडला. नर्मविनोदी शैलीतला, अजिबात पाल्हाळ वा सेल्फ-पिटीला बळी न पडता लिहिलेला. अधिक वाचायला आवडेल.

adam Fri, 01/01/2016 - 14:32

In reply to by नंदन

परिचित विषय असूनही लेख आवडला. नर्मविनोदी शैलीतला, अजिबात पाल्हाळ वा सेल्फ-पिटीला बळी न पडता लिहिलेला

तंतोतंत.
धडपड्या , उत्साही लोकांबद्दल आदर वाटतो.
.
.

अधिक वाचायला आवडेल.

+१

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 01/01/2016 - 21:25

In reply to by नंदन

लेखन आवडलं. एवढ्यात संपलं म्हणून हळहळच वाटली. आणि तुमच्या कर्तबगारीबद्दल आदरही वाटला.

पिवळा डांबिस Fri, 01/01/2016 - 14:23

मनापासून आवडला.
तुम्ही अजिबात वाईट वाटून घेऊ नये.
आमचा अमेरिकेतला पहिला जॉब, ज्यात झाडू मारली आहे.
नाही म्हणजे जॉब टायटल झाडूवाला असं नव्हतं, टायटल होतं, 'मॅनेजर', क्वालिफिकेशन पी.एचडी.!
पण तेंव्हा हाताखाली कुणीच नव्हतं...
पहिला दिवस संपताअखेर, आमचा अमेरिकन बॉस आमचं काम कसं चाललंय हे बघायला आला.
आणि दिवसभरात इतर लोकांनी टाकलेले कागदाचे बोळे बघून मला काहीही एक शब्द न बोलतां तो स्वतः हातात झाडू घेऊन (त्याचं टायटल डायरेक्टर!) जमीन साफ करायला लागला!
तेंव्हापासून मी मनाशी खूणगाठ बांधली की टायटल गेलं गाढवाच्या गां*त, आपल्या वर्क स्टेशनची साफसफाई आपल्यालाच केली पाहिजे, इथे 'झाडूवाले' नसतात!!
:)

बाकी,

आतापर्यंतच्या सर्व नोकर्‍यांमध्ये जास्ती म्हणजे ताशी दीड डॉलर मिळणार असे कळल्यावर ’अजि म्या ब्रह्म पाहिले’ असा भाव माझ्या चेहर्‍यावर आला.

क्या बात है! सर्व नव्या नोकरीइच्छुकांनी याची नोंद घेतली पाहिजे!!!!

गौरी दाभोळकर Fri, 01/01/2016 - 18:08

जोसी ताई, खूप छान लिहलं आहे. मी एकदाच बफेलो विश्वविद्यालयात सफाई कामगाराच्या नोकरीकरता गेले होते. तिथल्या कृष्णवर्णीय बाईने मला जो काही लुक दिला की मी पृष्ठभागाला पाय लावून पळाले होते. तुम्ही एवढे सगळे केले...धन्य आहे. कारुण्य आणि विनोदी शैली आवडली. आत्मचरित्र लिहायला घ्या.

राही Fri, 01/01/2016 - 22:39

नव्या वर्षाच्या सुरुवातीला असा उमेदभरला लेख बरा वाटला वाचायला. नेमकेपणा आणि नर्मविनोद आवडला.

जेपी Sun, 03/01/2016 - 21:26

माफ करा..
पण "अन्नासाठी दाही दिशा'.याची पुढची ओळ कदाचीत"आम्हा फिरवसी जगदिशा"अशी आहे वाटत.तुमी तुमच्या मर्जीने परदेशात गेलात.भारतात काय उपाशी होतात का?उगाच लै कष्ट पडले का
उत्तर नाय दिले तरी चालेल.

अरविंद कोल्हटकर Mon, 04/01/2016 - 00:10

In reply to by जेपी

झोळी घेऊन 'भिक्षां देहि' करत फिरणार्‍यालाच 'अन्नासाठी दाही दिशा' ही ओळ वापरायला परवानगी आहे असा अत्यंत संकुचित अर्थ घ्यायचे ठरविले तर वरच्या शेरेमारीमध्ये काही तथ्य आहे असे म्हणता येते. अन्यथा परदेशांचा - विशेषतः समृद्ध देशांचा - उल्लेख दिसला की त्यावर तुटून पडायचे ह्या मुक्तपीठ परंपरेतील अडाणी बडबडीपलीकडे ह्या शेरेमारीला काही किंमत द्यावी असे वाटत नाही.

उपाशी बोका Mon, 04/01/2016 - 07:19

खूप छान लिहिले आहे, हे मुद्दाम सांगण्यासाठी हा प्रतिसाद देतोय. कुठल्याही कामाची लाज न वाटता ते मनापासून करावे, हे शिकण्यासारखे आहे.

तिरशिंगराव Mon, 04/01/2016 - 19:10

लेखन पारदर्शी आणि प्रामाणिक आहे. पण 'अन्नासाठी दाही दिशा' म्हणू नका हो. तुम्ही अन्नासाठी तिथे गेला नव्हता. नवीन क्षितिजे धुंडाळायला गेला होता. त्यासाठी लागणारी जिद्द, धडाडी तुम्ही दाखवलीत, हेच कौतुकास्पद आहे. अजूनही लिहा.

मेघना भुस्कुटे Tue, 05/01/2016 - 13:22

काय मस्त लिहिलं आहे हो! 'कस्से बाई कष्ट काढले...' हा सूर जरा म्हणून नाही! धमालच आली. अजून लिहा ना, अजिबातच कंटाळा नाही आलेला.