"राठोड"

त्या दिवशी संध्याकाळी हजरत निजामुद्दीनला जनरलचं तिकीट काढून आरक्षित डब्ब्यात चढलो तेव्हाच लक्षात आलेलं की खांडव्यापर्यंतचा किमान १६ तासांचा प्रवास आरक्षित डब्यातल्या सर्वात दुर्लक्षित जागेत बसून करावा लागणार आहे. कपाळाला गंध, हातात ४ वेगवेगळ्या खड्यांच्या अंगठ्या, अंगात काळा कोट आणि तोंडात खास बनारसी पानाचा तोबरा भरलेला TC दिसला. त्याला अत्यंत प्रेमाने, "देखो सरजी, कहां जुगाड हो रहा है तो" वगैरे विनवण्या करून पाहिल्या पण काही उपयोग नाही. शौचालयच्या बाजूच्या जागेत १६ तास काढता येतील इतका निर्ढावलेपणा शरीराच्या प्रत्येक अवयवांत आणला. तोवर गाडीने आग्रा सोडलं होतं. फारसा त्रास होत नव्हता. अगदी टिपिकल मध्यमवर्गीय असल्याने "परिस्थितीशी जुळवून घेणं"तसं माझ्या रक्तातच. त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे अक्ख्या डब्ब्यात जेवढे प्रवासी नसतील तेवढे प्रवासी "दरवाजा ते शौचालय" या भागात सहज सामावून घेतले जाऊ शकतात हे सुद्धा लक्षात आलं. एकेक स्टेशन घेत गाडी राजस्थानातल्या कुठल्याशा स्टेशनात शिरली तेव्हा रात्रीचा १ वाजला होता. अंगाचा पंचकोन किंवा षट्कोन करून मी एका कोपऱ्यात बसलेलो. टक्क जागा होतो. तेवढ्यात ते दोघे डब्ब्यात चढले.
ते दोघे. आधी तो आत शिरला. डार्क रंगाचा शर्ट, बाह्या कोपरापर्यंत खेचलेल्या, नजरेत एकाच वेळेला आत्मविश्वास, माज आणि तरीही अस्वस्थ भिरभिरणारे भाव. त्याच्या मागोमाग दुसरा. वयाने त्याच्यापेक्षा बराचसा मोठा. कदाचित फक्त वायानेच. दोघांच्या चेहऱ्यात बऱ्यापैकी साम्य. पण ते फक्त दिसण्यात. दुसऱ्याचा चेहरा तसा निर्विकार, डोळ्यांत फारशी चमक नाहीच असलंच तर कारुण्य. ते सुद्धा भरभरून नाही… त्याला आयुष्यात मिळालेल्या सुखाइतकच…अगदी कणभर.
माझ्याच पुढ्यात ते दोघे बसले. बाप-लेक. अगदी स्वाभाविकपणे मी त्या मुलाच्या बाजूला सरकलो आणि आमच्या गप्पा सुरु झाल्या.
"राठोड हैं हम." वाक्यावाक्यात एक प्रकारचा अभिमान आणि "राठोड"पणाची झलक. बोलता बोलता त्याने पाकीट काढलं. पाकिटात दहा-दहाच्या दोन जुनाट नोटा. आतमध्ये जपून ठेवलेला महाराणा प्रतापचा फोटो. "ये हैं हमारे वंशज और हमारे आदर्श. जिस दिन खुद का पैसा कामायेंगे उस दिन टेटू निकलवाएंगे "जय राजपुताना" नाम से. खून से रजपूत हैं हम" ऐकता ऐकता मी मधूनच त्याच्या बापाकडे पाहायचो. त्याच्या चेहऱ्यावरची निष्क्रिय असाहायता आणि डोळ्यांतली केविलवाणी चमक "राठोड"पणाशी कुठेच जुळायची नाही. बोलता बोलता त्याला तहान लागली. बापाकडे त्याने पाणी मागितलं. एक घोट प्यायला आणि म्हणाला, "ये तो गरम हैं. पाणी ठंडा चाहिये." बाप काहीच बोलला नाही… कदाचित सवयीनुसार.….
थोड्याच वेळात कुठल्याशा छोट्या स्टेशनात गाडी थांबली. सिग्नल लागला असावा म्हणून. त्याने पाण्याची बाटली घेतली आणि तो खाली उतरला. रात्री अडीच तीनची वेळ असावी. त्या टोकाला सार्वजनिक नळ होता. त्याने पाणी भरायला सुरुवात केली आणि गाडीने भोंगा दिला. निघण्याचा. इतका वेळ बसलेला त्याचा बाप उठला आणि दरवाजात आला. बापाच्या डोळ्यात काळजी होती. "किसने कहा था पाणी लेनेको??? आजा जल्दी ." शक्य तितक्या जोरात आणि अधिकाराने काही बोलेपर्यंत गाडीने वेग पकडला आणि नळासमोरून तो सुद्धा दिसेनासा झाला. पुढच्या दोन मिनिटांत बापाच्या डोळ्यांत मी राग, असहायता आणि हताशपणा सारं काही पाहिलं. "बिलकुल भी हमारी नहीं सुनता. हम जो कहे उसके ठीक उलटा करना हैं इसको. " वाक्य पूर्ण होतंय न होतंय इतक्यात मागच्या डब्ब्यातून तो आला. बापाने त्याला चार शब्द सुनावले. त्याने पाण्याची बाटली बापाला दिली आणि म्हणाला, "ये लिजिये. पिजीये…. ठंडे हो जाइये. हम गये वहां इसलिये ठंडा पानी मिला. बैठे रहके जिंदगीभर गरम पानी नहीं पिना हैं हमें." तो माझ्या बाजूला येउन बसला. माझ्या नजरेला नजर मिळवली आणि म्हणाला,"कभी कभी हमें लगता हैं घरमें सिर्फ हम ही राठोड हैं " या वाक्यावर त्याच्या बापाकडे पहायची माझी हिंमत झाली नाही.
कुठल्याशा स्टेशनात ते दोघे उतरले. जाताना म्हणालेला "फेसबुकपे हू मैं". मी काही त्याला पुन्हा शोधलं नाही. नावापुढे "राजे" आणि आडनावापुढे "पाटील" लावणारे पुष्कळ "पोरं" मी पाहतो कधी कधी मला त्यांच्यात तोच दिसतो. कधी कधी वाटतं आपला अंदाज चुकीचा असेल. फक्त एक प्रश्न मला राहून राहून सतावतो कि ऐन तारुण्यात असलेलं हे "राठोड"पण कायम राहील की आयुष्यातले उन्हाळे-पावसाळे बघून त्याचाही "बाप" होईल.

-अभिषेक राऊत

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

प्रतिक्रिया

लय भारी लिहिलंय. आवडलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

सुरेख लिहिलं आहे. अजून लिहीत जा हो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

छान !! आवडलं

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान.जेनरलच्या डब्यात विषय बरोबर काढता आला तर वेळ भराभर जातो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0