सुगरण..

दोनतीन हॉटेलं वाईट निघाल्यामुळे आता पुढचं किमान बरं निघावं अशी इच्छा होती. लाऊंज, बिस्त्रो, फाईन डाईन, कॅफे अशा टाईपच्या हॉटेलिंगमधून ब्रेक घेऊन एखाद्या झणझणीत आणि खानावळवजा ठिकाणावर धाड टाकायची ठरवली.

कुठेतरी ऐकलेल्याच्या आठवणीवरून पुण्यात पेरुगेट पोलीस चौकीजवळ असलेलं सुगरण गाठायचं ठरवलं आणि गल्ल्या शोधत तिथे पोहोचलोसुद्धा..

एका गाळ्याएवढा एंट्रन्स दिसत होता. माझ्यासारख्या प्रशस्त माणसाला बसायलातरी पुरेशी रुंदी असलेली जागा आत असेल का असं वाटत वाटत आत शिरलो. वरती बोर्ड लावला होता त्यावर "सुगरन्स कोल्हापुरी नॉनव्हेज" असं लिहिलं होतं.

entrance
दारातच असलेल्या काउंटरवर "क्षमस्व, जेवण संपले" अशी पुणेरी आहारगृहात आवश्यक अशी लहानशी पाटी ठेवली होती. सुदैवाने "जेवण संपले" ची बाजू आतल्या दिशेने होती. याचा अर्थ जेवण चालू होतं. माझं नशीब चांगलं होतं.

आत शिरलो तर एक जेवणाची छोटी खोली दिसली. त्यात बसायला काहीशी जागा होती.

Outer room

पण ती खोली ओलांडून आत जाताच बरीच ऐसपैस अंगणासारखा मोठ्ठा ओपन एअर जेवणाचा एरिया दिसला.

inner area

स्थानापन्न होऊन मेनूकडे नजर टाकली. "सुगरण"चं ब्रीदवाक्य असं होतं की, "फक्त तिखट म्हणजे कोल्हापुरी नव्हे, कोल्हापुरी ही एक चव आहे.." हे वाक्य मेनूवरही होतंच.

मेनू छोटाच होता. बराचसा भर कोल्हापुरी पद्धतीच्या चिकन आणि मटणावर दिसत होता. फिशचाही वेगळा सेक्शन होता. थाळी किंवा आवडते पदार्थ वेगवेगळे मागवण्याची सोय दिसत होती.

-गावरान चिकन करी
-गावरान चिकन फ्राय
-गावरान चिकन हंडी
-गावरान चिकन बिर्याणी
-पापलेट आणि सुरमई फ्राय
-पापलेट आणि सुरमई करी

व्हेज लोकांसाठी थाळीचा ऑप्शन अजिबातच नव्हता. एखाद दोन व्हेज भाज्या आणि त्यासोबत चपाती, एवढ्यामधेच व्हेजवाल्यांची सोय केली होती. याचाच अर्थ व्हेज व्यक्तीला इथे घेऊन येण्यात काहीही अर्थ नाही.

पुरेपूर कोल्हापूर किंवा अन्य कोल्हापुरी हॉटेलांतली नॉनव्हेजवाल्यांनाही मोहात पाडेल अशी व्हेज थाळी आठवली. पुरेपूर कोल्हापूरवाल्या व्हेज थाळीचा फोटो इथे उगीच रेफरन्ससाठी.

purepoor thaali veg

नॉनव्हेज थाळीचे मात्र इथे भरपूर प्रकार होते. अधिक संशोधनांती असं लक्षात आलं की मला हवेसे वाटणारे त्यातले पदार्थ एकत्र करुन तिथे ऑलरेडी एक "कोल्हापुरी स्पेशल थाळी" होतीच.

मग टेस्टिंग सुरू झालं..

सोलकढीने सुरुवात. इथे स्टीलच्या साध्या ग्लासातून थंड सोलकढी समोर आली.

solkadhi

या सोलकढीला मी दहापैकी अकरा मार्क्स देऊ इच्छितो, कारण इतकी परफेक्ट सोलकढी मिळणं हे भाग्याचं लक्षण आहे. नॉर्मली मिरमिरणारी, आंबट होत चाललेली, अति तिखट किंवा पाणी वेगळे झालेली अशी असण्याची शक्यता बरीच असते. पण अशी ताजी एकजीव आणि घशाला परफेक्ट हवी तेवढीच "लागणारी" सोलकढी फार कमी वेळा प्यायलो आहे.

मग एक चिकन फ्राय मागवून पाहिलं.

chickenfry

मऊ शिजलेलं चिकन. पण मसालेदार आणि चमचमीत टेस्ट होती. केएफसीवर पोसलेल्या जिभांना झटका देणारं हे रसरशीत फ्राईड चिकन होतं.

मग एकामागून एक ट्रायल्स चालू झाल्या. सुकं मटण.. हेही अत्यंत मस्त मऊ शिजलेलं होतं. रबरासारखं वातड चिकन किंवा मटण शिजवणार्‍या हॉटेलांविषयी कायमची अढी मनात बसते आणि उलट नीट आवश्यक तेवढं शिजलेलं मांस वाढणार्‍यांविषयी मनात कायमची आवड तयार होते.

सुक्के मटण:

frymutton

गरमागरम कोल्हापुरी मटणरस्सा:

rassa

मटणात मसाल्याचं आणि तेलाचं प्रमाण सढळ होतं.. पण आवडेल इतकंच. ढप्पळभर तवंग नाही. जस्ट परफेक्ट.

या दोन्ही मटणांत कोल्हापुरी चव अगदी पुरेपूर उतरली होती. त्यासोबत भाकरी आणि चपातीचा ऑप्शन होता. मटणासोबत जाडजूड आणि गरम चपाती हा माझा नेहमीचा चॉईस असल्याने तोच घेतला. चपाती (अशा सणसणीत प्रकाराला पोळी म्हणवत नाही) ही अगदी गरम आणि मटणासोबत लागते तश्शी जाड पण खुसखुशीत होती. मटणरस्सा जरा तिखट होता. पण कोल्हापुरात अनेक ठिकाणच्या खानावळींमधे यापूर्वी खाल्लेला रस्सा आठवून त्यामानाने हा बराच स्केल डाऊन केलेला वाटला.. आणि ते चांगलंच होतं. खातानाच आगीचा बंब बोलावण्याची इच्छा होणे ही माझ्यामते चांगल्या अन्नाची खूण नव्हे. त्या तिखटानेही मजा यायला हवी.. जीव घाबरा होऊ नये..

या कसोटीला इथलं मटण उतरलं.

पांढरा आणि तांबडा रस्सा हा कोल्हापुरी जेवणाचा जीव. तो इथे अनलिमिटेड उपलब्ध होता. वाफाळणारा गरमागरम रस्सा पुन्हापुन्हा आणून वाढत होते. तांबडा रस्सा अफलातून टेस्टी होता. पांढर्‍या रश्श्यामधेही एरवी हमखास कमी किंवा जास्त पडणारी लवंग इथे योग्य प्रमाणात घातलेली होती आणि त्याचा सुखद होईल इतपतच स्वाद आणि चटका घशाला लागत होता.

तांबडा आणि पांढरा रस्सा:

pandharaa_rassaa

थाळीमधे भाताचेही एकदोन ऑप्शन्स होते.

बराच वेळ हे झणझणीत खाल्ल्यावर तोंड भाजल्यामुळे काहीतरी गोड मागवण्याची इच्छा झाली. तसं वेटरला बोलल्यावर मला त्याने स्पष्ट सांगितलं की इथे कोणतीही स्वीटडिश मिळत नाही. काही म्हणजे काही नाही.. हवे तर कोल्ड्रिंक घ्या.

यांना बहुतेक आपली झणझणीत चव जिभेवर दीर्घकाळासाठी घेऊनच गिर्‍हाईक हॉटेलबाहेर पडावे अशी इच्छा असावी. काहीच गोड नाही हे काही मला आवडलं नाही.

या उपरिनिर्दिष्ट बर्‍याचश्या डिशेसचं कॉम्बिनेशन असलेली ही स्पेशल मटणथाळी:

thaalee

या थाळीत छोट्या वाटीत खिमाही देतात. तो काही मला खास उल्लेखनीय वाटला नाही.

व्हेज लोकांसाठी खानापूर्ती. पनीर बटर मसाला:

pbm

हे ठिकाण रेकमेंड करण्याविषयी:

नॉनव्हेज अन्न अत्यंत टेसदार. पैसा वसूल.

किंमती अत्यंत वाजवी. सर्वात उच्च थाळीही दोनशेमधे. बाकीच्या थाळ्या शंभर ते दीडशे.

मात्र, व्हेज पार्टनर सोबत असेल तर इथे जाऊ नका. लहान मुलांनाही फारसं झेपेल असं वाटत नाही. "पुरेपूर कोल्हापूर्"मधे खास लहान मुलांसाठी थाळी मिळते. हे सुगरणवाल्यांनी घेण्यासारखं आहे.

स्वीटडिश नसल्याने आग आग होत असलेलं तोंड घेऊन बाहेर पडावं लागतं. ते आवडत असेल तर पसंद अपनी अपनी.. पण तरी हे लक्षात ठेवा आणि सोबत एखादी आंबावडी, चॉकलेट वगैरे ठेवून आत जावा.

बाकी "सुगरण" हंड्रेड परसेंट रेकमेंडेड....

शिवाय या लिखाणानिमित्ताने आपल्या माहितीतली अशीच झणझणीत झटका ठिकाणं सांगून सर्वांना मजा आणावी ही विनंती...

..................

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

बराच वेळ हे झणझणीत खाल्ल्यावर तोंड भाजल्यामुळे काहीतरी गोड मागवण्याची इच्छा झाली. तसं वेटरला बोलल्यावर मला त्याने स्पष्ट सांगितलं की इथे कोणतीही स्वीटडिश मिळत नाही.

असली फालतू वैशिष्‍ट्ये काही हॉटेलवाले हटकून बाळगून असतात..
आपल्याला तर बुवा साधं जेवण झालं तरी काहीतरी गोड लागतं.
नुसती साखर पण चालते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोल्हापुरी म्हणजे तिखटपणा नव्हे हे खरं, पण कोल्हापुरीला स्वतःचा असा एक लाल रंग हवा. कोल्हापूर हे 'डावं' आहे त्याही दृष्टीनं. तो रंग इथं दिसत नाही. तो हवा.
कोल्हापुरी हाटेलात चिकन फ्राय? तेही असल्या चॉकलेटी रंगाचं? छ्या... कोल्हापुरी म्हटलं की फक्त सुकं. आणि उरलेला रस्सा. तो लिटरच्या मापात प्यावा, ते पदार्थ किलोच्या भाषेत जिरवावेत.
पांढरा रस्सा म्हणून समोर जे येतं, ते पांढरं आहे यात प्रश्न नाही. म्हणूनच ते थोडं गंडलेलं आहे.
खिम्यात मजा नसेल तर ही थाळी कोल्हापुरी म्हणता येणार नाही. हा कोल्हापुरी या शब्दाचा वृथा वापर आहे.
आता हे आणि असंच काहीही असूनही चव कोल्हापुरी जमली असेल तर या गोष्टी माफ करून तिथं जाऊन पाहतो.

स्वीटडिश नसल्याने आग आग होत असलेलं तोंड घेऊन बाहेर पडावं लागतं. ते आवडत असेल तर पसंद अपनी अपनी.. पण तरी हे लक्षात ठेवा आणि सोबत एखादी आंबावडी, चॉकलेट वगैरे ठेवून आत जावा.

याबद्दल मात्र कोल्हापुरी संस्कृतीनं तुमच्यावर अब्रूनुकसानीचा किंवा बदनामीचा दावा केला पाहिजे. मटणानंतर अंबावडी, चॉकलेट? ह्या... पार अब्रू काढली राव तुम्ही...
हे असलं जेवण झाल्यानंतर १२०-३०० (तेही स्टार किंवा कश्मिरी सुगंध न लावता, चटणी न वापरून केवळ खणखणीत किमाम (याला किवाम असंही म्हणतात असं ऐकलंय) असं बनारसी पान किंवा दिलीप साधा जर्दा घातलेलं सुक्या काताचं पुणे पान हवं. त्यानं तो तिखटपणा अंगांगात जळत गेला पाहिजे. मग मस्त लोटीभर पाणी प्यावं, एखादं छानसं पुस्तक घ्यावं हाती आणि आडवं पडून (तेही जमलं तर खळ्यातल्या घरात) ते वाचता-वाचता छातीवर पडावं. बास्स.
आता असं जेवण घेण्याआधी आमचे काही मित्र मद्यपान करतात, करू इच्छितात. परमेश्वर त्यांना क्षमा करतोच. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जबरी प्रतिसाद.. विशेषतः चॉकलेट, आंबावडीचा भाग.

श्रामो, अहो कोल्हापुरात पूर्वी राहिलेलो असलो आणि खाल्लेलं असलं तरी मी मूळचा किंवा अ‍ॅडाप्टेड कोल्हापुरी मुळीच नाही हो. मी कोंकणी कम मुंबईकरच आहे.

त्यामुळे अशी अस्सल कोल्हापुरी माहिती दिल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे.. आणखी काही ठिकाणंही सुचवा, ऑथेंटिक.. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आम्हाला झणझणीत जेवणानंतर प्यायला लागतो,चहा!
बर्‍याच मांसाहारी हाटिलात जेवणापूर्वी किंव जेवताना प्यायच्या द्रव्यांची सोय असते पण आमच्या जेवणानंतरच्या चहाची सोय नसते हो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

झणझणीत जेवणानंतर गोड खाणे मला रुचत नाही. त्या झणझणीतपणाचा अपमान वाटतो. Wink हं! पण मीठा पान मात्र हवेच. कोणी त्यालाच स्वीट डिश म्हणत असेल तर म्हणो बापडे!

असो. मी मटण खात नसल्याने कोल्हापुरी जेवणाचा खरा आनंद मला घेता येईल असे वाटत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गवि ओळख आवडली
मटण खात नसल्याने पंचाईत झाली आहे
चिकनचे काय पर्याय आहेत का तिकडे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

सचित्र ओळख आवडली. ओळख वाचून एकदा जायला हवे असे वाटते आहे. पुण्यात 'नागपूर' नावाच्या उपहारगृहाविषयीही बरेच ऐकून आहे. कोणी आजकाल तिकडे गेले असल्यास वृत्तांत कळवावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी कोल्हापुरला गेले होते तेव्हा माहीती नसल्याने जेथे चप्पल घेतली त्यालाच विचारलं तेव्हा त्याने एका लॉजचा पत्ता दिला. तिथे पोळ्या वगैरे अन्न एकदम ताजं छान होतं पण विशेष वेगळं काहीच वाटलं नाही. आता पुढच्या वेळी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुन्हा एकदा निषेध !!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चाखून पहायच्या यादीत अजून एक भर पडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सर्वात आधी निषेधास अनुमोदक.

गविजी,
हे असले लेख फोटूसकट लिहिण्याचं पाप कुठे फेडाल हो? Sad

असो.
(व्यावसायीक सुचना: असे लेख लिहिणार्‍या लोकांस ते रेस्त्राँ वाले स्पाँसर कर्तात म्हणे? ह्या "सुग्रन"ने -काय ते दिव्य मराठी मिंग्लीश! सुग्रन्स म्हणे- केलं नसेल तर तुम्ही पुण्याबाहेरची हाटेलं शोधा पाहू..)

घरी जाऊन पिठलं खाण्याच्या बेतात असलेला : आडकित्ता

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-