Skip to main content

मृगया

मला ही कथा जमली आहे की नाही हे माहीत नाही. पण या कथेतून कोणत्याही श्रद्धा-विश्वासाचे-नात्याचे मुखवटे न घेतलेल्या नर-मादी या नात्यातल्या primal (आदिम) आकर्षणाचे, आणि सुप्त मनातून, वरती येणारे, तर्क अन बुद्धीच्या कसोटीवर घासून पहाता येणारे, आसक्तीचे कंगोरे मला दाखवायचे होते. अनेक अनामिक भावनां अचानक जाणवल्याने, उडालेली गोंधळाची स्थिती मला खरं तर शब्दांतून explore करायची होती. या rawness करता रानटी लोकांची पार्श्वभूमीच योग्य वाटली. अर्थात तुम्हा सर्वांना Read between the lines करावे लागेल. मला ते कंगोरे दाखवायचे होते ते ना भडक भाषेतून, ना काव्यमय भाषेतून अन तरीही त्यांचा rawness कसा टोकदार करायचा ते काही जमलं नाही. कारण शृंगारातील उत्तानपणा टाळायचा तर होता पण तरीही एकमेकांचे साद-प्रतिसाद अधोरेखीत करावयाचे होते. मला वाटतं कथा अगदी फसलेली नाही पण हे देखील मान्य आहे की मनासारखी जमलेली नाही.
.
अनंत मृगया लीलया पार पाडलेल्या त्या तरुण व्याधाकरता जर ही मृगया हातची गेली असती तर फार मोठा फरक पडणार नव्हता. पण यावेळेस कोणत्या तरी अनामिक कारणामुळे, स्वप्रेरणेमुळे त्याला भरीस पडावेसे वाटले. अन त्याचा हट्ट अनाठायी नव्हता. सकाळपासून मृग शोधून दमलेल्या, त्याला दुपारी कधी नव्हे ते हा मृग दिसला होता. धनुष्याच्या प्रत्यंचेवरती विषारी टोकाचा बाण खोचून त्याने या मृगाचा वेधही घेतला होता. अन वायूच्या वेगाने धावणारा, पाय जमिनीवर न पडणारा तो मृग अडखळून, धाय मोकलून भुईवरती असहाय पडला होता. त्याच्यात अजुनही धुगधुगी होती, जीवनेच्छा, जिजीवीषा होती. तोंडास फेस आलेला , आचके देणारा तो शेवटचे क्षण मोजत पाय झाडत पडला होता. व्याध त्या मृगाजवळ जाऊन बाण काढणार तो बाजूच्या विशाल वृक्षामागून त्याच्यासारखीच भिल्ल स्त्री विजेच्या वेगाने धावत आली अन मृगावरती पाय रोवून उभी राहीली.
.
सर्वात प्रथम व्याधाचे लक्ष वेधले ते त्या तरुण स्त्री च्या आव्हान देणार्‍या डोळ्यांकडे. जाळीतील करवंदासारख्या, तिच्या काळ्याभोर डोळ्यात काय नव्हते? क्रोधाची ठिणगी अन आव्हानाचे स्फुल्लिंग होते, चित्त्याची सावधता अन मोहफुलाची मादकता होती.उन्मत्त सौंदर्य ओसंडून वहाणार्‍या त्या स्त्रीच्या अंगावरती तोकडी वस्त्रे होती. हरीणशावकाच्या मऊ कातड्याने तिचे खालचे शरीर जेमतेम झाकलेले होते अन वरती ती फक्त मोठ्या पसरट, रक्तवर्णी फुलाच्या माळा ती ल्याली होती. तिचे स्वतःचे ओठ रक्तवर्णी पुष्प उलल्याप्रमाणे भरीव होतेच पण शरीर उन्हातान्हाने रापून कृष्णवर्णी शिसवासारखे झाले होते. घर्मबिंदू गळ्यावर, स्तनांवर डवरुन येऊन ती दवबिंदूनी न्हालेल्या कृष्णवर्णी अन रानटी फुलासम दिसत होती. मोकळे सोडलेले तिचे केस, अंगास चिकटले तर होतेच पण आत्यंतिक उत्तेजित झाल्याने तिचे स्तन वरखाली होत होते. एखाद्या उन्मादक पण मत्त वनदेवीप्रमाणे ती त्याला भासली.
.
तरुण व्याध अनिमिष नेत्रांनी तिच्याकडे पहात राहीला पण क्षणभरच कारण तिने पहीले शब्द उच्चारले - हा मृग माझा आहे. मी नेणार.
तिच्या आवाजात सर्पाचा फुत्कार होता की मोहफुलांचा गोडवा याविषयी त्याचा निर्णय होइना. तिच्या आवाजाने, त्याच्या शरीरातून एक उष्ण वीज खेळली हे मात्र सत्य होते.
व्याधाला हसू आले व तो म्हणाला - तुझा कशावरुन? याच्या अंगात तर मी मारलेला दोन जिव्हेचा सर्पिल बाण रुतला आहे.
त्या व्याध स्त्रीने त्याच्याकडे परत उद्दाम आव्हान फेकले - द्वंद्व करण्यास मी तयार आहे. जो जिंकेल , हा मृग त्याचा.
अन त्या क्षणी त्याच्यातल्या नराला उत्कटतेने वाटून गेले ते म्हणजे अशा उद्दाम स्त्रीला काबूत आणण्याची, तिला वेसण घालण्याची, तिच्यावर स्वामित्व गाजवण्याची इच्छा. अन का कोणास ठाऊक तो विचार त्याला स्वस्थ बसू देइना.
.
तो तिला नखशिखान्त निरखत म्हणाला - द्वंद्वाने मृगया जिंकली जात नाही. असे काहीतरी बोल ज्यायोगे हा मृग माझाही होईल अन तुझाही.
माझी हो. तुला तिथे नेईन जिथे मोहाचे असंख्य वृक्ष तर आहेतच पण जिथे विपुल पशूधन आहे, माझा तांडा आहे, पर्णकुटी आहे. माझ्या तांड्यातील लोक तुला आनंदाने स्वीकारतील. त्याच्या बोलण्यावर ती व्याध स्त्री थरारल्यासारखी झाली. एका भिल्ल जोडप्याने वाढवलेल्या तिने, पित्याखेरीज अन्य पुरुष पाहीला नव्हता. एक तर वनदेवासारखा दिसणारा ह पुरुष पाहून, ती संभ्रमात पडली होती अन तिला तिच्या भावना सुधरत नव्हत्या, त्यातून त्याच्या आवाजातू मध ठिबकतो आहे असे काहीसे तिला वाटत होते अन त्याच्या हास्यामुळे, त्याच्या शब्दागणिक, तिच्या शरीरातून र्ठिणग्या उमटत होत्या. त्याच्या डोळ्यातील गारुडाबद्दल ती सावध अन साशंक होती. स्वतःच्या अस्तित्वाला काहीतरी अनाम धोका तिला जाणवत होता. एक तर ती नाही तर तो असे राहून राहून वाटत होते अन असे का वाटते याचा तर्काने तिला थांग लागत नव्हता. याठिकाणी तिचे मृगयेचे सर्व कौशल्य निष्फळ ठरत होते. स्वतःच्याच मनातील भावना तिला खरच उमजत नव्हत्या.
.
अन स्वत:च्या विचारांत ती अशी बेसावध असतानाच, व्याधाने पुढे येऊन तिचा हात पकडला.तिच्या मागे हात नेऊन गच्च पिरगाळत तो म्हणाला - ये चल. तुला भरपूर दारु देइन, शिकार करुन तुझ्या पायाशी आणून टाकेन. हरीणाच्या तर कातड्यांची रास रचेन. एवढे बोलून तो थांबला तर नाहीच तिच्या मानेचे चुंबन घेतघेत त्याने तिच्या मानेवरती दंतव्रण उमटविले.
या आवेगाने तिला भोवळ आले की त्याच्या धिटाईचे आश्चर्य वाटले, त्याच्याबद्दलच्या अनाठाइ भीतीस साकारत्व आले की तिलाही त्याची आसक्ती वाटली? या सरमिसळ झालेल्या भावना तिला उमगेनात. जाळ्यात सापडलेल्या चंदेरी मासोळी सारखी ती व्याकुळ तर झालीच पण सर्प ज्याप्रमाणे केवड्याच्या पानांकडे ओढला जातो तद्वत काहीशी ओढ तिला जाणवली. त्याचा रासवट गंध तिला जाणवला अन त्या गंधाने ती एकाच वेळी सावध झाली अन आसक्तदेखील. नेमक्या याचवेळी, सर्पाच्या डोळ्यांनी भारुन जाऊन, त्याच्याकडे आपण होऊन जाणार्‍या पक्ष्याच्या पिल्लाची तिला आठवण का यावी? मोठ्या प्रयत्नांनी प्रतिकार करत उसने अवसान आणत, त्याला दूर लोटत ती म्हणाली, "दूर हो, दूर हो, मला हा खेळ मान्य नाही. द्वंद्वाला तू घाबरतोस." यावर व्याध उत्तरला - "आमच्या तांड्यात स्त्रियांशी द्वंद्व खेळले जात नाही. मला तू हवी आहेस. आत्ता या क्षणी."
.
खरे तर तिला त्याच्या बोलण्याचा राग यायला हवा होता पण तसा तिला आला नाही. अन क्रोध का येत नाही याचे असीम आश्चर्य तिला वाटल्यावाचून राहीले नाही. ती एक पाऊल मागे सरुन म्हणाली- "मला तुझी भीती वाटते. तुझ्यात काहीतरी घातक आहे. नक्की काहीतरी घातक आहे."
यावर व्याध मनापासून हसला.
पुढे ती म्हणाली -"अन आश्चर्य आहे, की तरीही मला तुला परत भेटावेसे वाटते. परत सूर्य डोईवर येइल, तेव्हा तू मला इथेच भेट. तेव्हा मी निर्णय देईन."
.
तिच्या या विनंतीस अनिच्छेने का होईना मान देऊन, व्याध परत फिरला हा विचार करतच की उद्या येताना कोणत्या प्राण्याचे कातडे तिच्या पायावर ठेवायचे. मृगया झाली होती.

Node read time
5 minutes

ललित लेखनाचा प्रकार

5 minutes

काव्या Thu, 21/05/2015 - 23:28

In reply to by विवेक पटाईत

आपल्या उस्फुर्त प्रतिसादाबद्दल, धन्यवाद पटाईतजी.
.
जी ए कुलकर्णी यांची "कांचनमृग" ही अतिव अतिव सुंदर कथा झपाटल्यासारखी परत परत वाचली. "व्याध अन मृगया" हे त्यातील शब्द आहेत. वर्णनातीत कल्पनेतून जी एं नी ती कथा रंगवलेली आहे. अप्राप्याचा ध्यास अन ते प्राप्त होऊन लुप्त झाले की येणारे असमाधान..... अफाट आहे ती कथा. पण माझ्या कथाबीजाचा अन जी एंच्या कथाबीजाशी काहीही संबंध नाही.
____

वरील कथेतही मला स्त्रीचे भाव चटकन रंगविता आले. तिच्या भावना शब्दात मांडताना विचारांत एक प्रवाहीपणा होता, सचोटी होती. पण पुरुषाला नक्की काय वाटतं - Possession & control की याव्यतिरिक्त काही ते कळू शकले नाही. मला या कथेत ना सात्विकतेचा शुभ्र रंग हवा होता ना गुलाबी रंगाची हळूवारता. अतिशय raw अन मन ढवळून काढणारी रक्तवर्णी अन प्रामाणिक आसक्ती दाखवायची होती. तशी उपमा फक्त सर्पाचीच सुचत गेली , अन्य सुचल्या नाहीत :( स्वतःच्या मर्यादा परत एकदा प्रखरतेने कळल्या. तिचे surrender देखील मला लांबवायचे होते पण काय भर घालायची ते सुचेना.

ॲमी Mon, 25/05/2015 - 00:41

In reply to by काव्या

आवडली कथा!
काही कमतरता आहेत असे मलातरी वाटत नाही पण तुझं समाधान होइपर्यंत अजून वर्कआऊट करू शकते.
मराठी आंजावर इरॉटीका वाचल्याचे आठवत नाही. रुपाली जगदाळेंनी एक टेलीफोन सेक्सबद्दल कथा लिहिलेली पण ती इरॉटीका नव्हती बहुतेक...

सामो Sun, 10/03/2019 - 11:42

In reply to by काव्या

मला या कथेत ना सात्विकतेचा शुभ्र रंग हवा होता ना गुलाबी रंगाची हळूवारता. अतिशय raw अन मन ढवळून काढणारी रक्तवर्णी अन प्रामाणिक आसक्ती दाखवायची होती.

The White Rose - John Boyle O’Reilly, 1844 - 1890

The red rose whispers of passion,
And the white rose breathes of love;
O, the red rose is a falcon,
And the white rose is a dove.

But I send you a cream-white rosebud
With a flush on its petal tips;
For the love that is purest and sweetest
Has a kiss of desire on the lips.

नगरीनिरंजन Fri, 22/05/2015 - 11:00

कथा आवडली.
जीएंचं वर्णन अफाट असतंच पण त्यांची उपमा/रुपके द्यायची पद्धतही वेगळीच आहे.
उदा.

पण सर्प ज्याप्रमाणे केवड्याच्या पानांकडे ओढला जातो तद्वत काहीशी ओढ तिला जाणवली.

हे वाक्य त्यांनी कदाचित "केवड्याच्या धुंद वासाची लखलखती सर्पओढ तिच्या अंगातून सळसळत गेली." असे लिहीले असते.

पुरुषाला काय वाटते:
मला वाटते प्रत्येक नव्या मृगयेच्या वेळी पुरुषाला स्वतःला उधळून देण्याची ओढ जाणवते. मृगया पूर्ण होईपर्यंत पझेशन/कन्ट्रोल ही भावना नसते. नैसर्गिकरित्या स्त्रीला पझेशनची भावना जास्त असते असे मला वाटते.

काव्या Fri, 22/05/2015 - 15:03

In reply to by नगरीनिरंजन

मला वाटते प्रत्येक नव्या मृगयेच्या वेळी पुरुषाला स्वतःला उधळून देण्याची ओढ जाणवते. मृगया पूर्ण होईपर्यंत पझेशन/कन्ट्रोल ही भावना नसते. नैसर्गिकरित्या स्त्रीला पझेशनची भावना जास्त असते असे मला वाटते.

होय स्त्रीकरता सुरक्षितता अन सातत्य अतिशय हवे असते - असे वाटते. अन त्यात तिला स्वतःला क्लेशदायक पॅरॅडॉक्स हा आहे की टेम होणारी व्यक्ती कदाचित तिलाही तितकीशी अपील होत नाही. - बहुतेक असे असावे. असे पाहण्यात आहे.

अंतराआनंद Sat, 23/05/2015 - 09:27

In reply to by काव्या

स्त्रीकरता सुरक्षितता अन सातत्य अतिशय हवे असते - असे वाटते. अन त्यात तिला स्वतःला क्लेशदायक पॅरॅडॉक्स हा आहे की टेम होणारी व्यक्ती कदाचित तिलाही तितकीशी अपील होत नाही.

परफेक्ट

तिरशिंगराव Fri, 22/05/2015 - 11:12

कथा आवडली. ननिंचा प्रतिसाद खूपच आवडला.

पुरुषाला फक्त मृगया होईपर्यंतच तीव्र आकर्षण असते. एकदा का मृगया झाली की त्याचे डोळे दुसर्‍या सावजाच्या शोधात असतात. म्हणून पझेशन ची भावना कमी असते.

रुची Fri, 22/05/2015 - 23:56

काव्या, तुमचा शब्दसंग्रह छान आहे, तुम्हाला इरॉटिका विषयात रस आहे आणि शक्यतो इतरत्र त्यात न सापडणार्या भावभावनांच्या, शारीर-अशारीर प्रेरणांच्या गुंतागुंतीची जाणीव आहे. तुम्ही अशी जुन्या वळणाच्या मराठीत लिहिलेल्या इरॉटिकाची मालिका का नाही लिहीत?

.शुचि. Tue, 22/09/2015 - 19:20

In reply to by रुची

तुम्ही अशी जुन्या वळणाच्या मराठीत लिहिलेल्या इरॉटिकाची मालिका का नाही लिहीत?

सध्या अन्य बर्‍याच प्रकारची ललीते हँडल करते आहे. पण एरॉटीका परत लिहीनच :)

रुची Sat, 23/05/2015 - 00:02

खरं बोलतीयेस का तू? Sad

अर्थातच, प्रामाणिकपणे लिहिलंय मी ते!

.शुचि. Sun, 08/05/2016 - 02:20

माझीच आहे. परत वर काढते आहे कारण अनेक दिवसांनी मी ही कथा परत मनसोक्त एन्जॉय तर केलीच पण नवे सदस्यही आहेत. त्यांनीही वाचावी.