Skip to main content

..कोणी कसाब झाले,कोणी कलाम झाले..

..कोणी कसाब झाले,कोणी कलाम झाले..

हातात हात आले,ह्रदयात नाम झाले
ती सोबतीस आली,कामात काम झाले

शिकवण समान होती,त्यांची जरी तरी ती..
कोणी कसाब झाले,कोणी कलाम झाले..

ऐटीत कार गेली,मंत्रीमहोदयांची..
शिस्तीत चालणारे,ट्राफिक जाम झाले..

सारेच चोर होते,पण एकला पळाला
त्याच्या फरार नावे,नंतर इनाम झाले

रावण नको म्हणुनि,ज्यांना पसंत केले
ते ही पुढे परंतु,पुरते हराम झाले

त्यांचीच सर्व दु:खे,त्यांनाच छान विकली
पाहुनि खूश तेव्हा,पब्लिक तमाम झाले

शेजारुनि निघाली,अवखळ बदाम राणी
खिडकित त्वरित गोळा,सारे गुलाम झाले

रस्ते अरूंद झाले,शेतात फ्लॅट आले,
गुत्तेहि बार झाले,विकसित ग्राम झाले

+ कानडाऊ योगेशु

.शुचि. Wed, 18/05/2016 - 21:19

फारच मार्मिक! खरं तर सर्वच द्विपंक्ती सुरेख आहेत.
.

ऐटीत कार गेली,मंत्रीमहोदयांची..
शिस्तीत चालणारे,ट्राफिक जाम झाले..

.

शेजारुनि निघाली,अवखळ बदाम राणी
खिडकित त्वरित गोळा,सारे गुलाम झाले

.

रस्ते अरूंद झाले,शेतात फ्लॅट आले,
गुत्तेहि बार झाले,विकसित ग्राम झाले

पिवळा डांबिस Wed, 18/05/2016 - 22:51

रस्ते अरूंद झाले,शेतात फ्लॅट आले,
गुत्तेहि बार झाले,विकसित ग्राम झाले

क्या बात है!

शिकवण समान होती,त्यांची जरी तरी ती..
कोणी कसाब झाले,कोणी कलाम झाले..

तसंच,

वेदान्त एक होता, त्यांचा जरी तरीही..
कोणी विवेकानंद, कुणी आसाराम झाले..

चालायचंच!
:)

कानडाऊ योगेशु Wed, 18/05/2016 - 23:32

सर्व प्रतिसादकांना धन्यवाद.

@पिडांकाका,
कुठल्या विशिष्ठ विचारसरणीला टारगेट करायच्या हेतुने तो शेर लिहिला नाही. कसाब कलाम वृत्तात चपखल बसले म्हणुन लिहिले इतकेच. नसले बसले असते तर अजुन कोणाला बसवले असते नाहीतर सोडुन दिले असते :)
(तसेही खाली रावण/राम संबंधित शेर आहेच.)

पिवळा डांबिस Thu, 19/05/2016 - 01:16

In reply to by कानडाऊ योगेशु

कुठल्या विशिष्ठ विचारसरणीला टारगेट करायच्या हेतुने तो शेर लिहिला नाही.

आय नो! तसा मी ही तुमच्यावर आरोप करीत नाही.
फक्त तो शेर वाचल्यावर मला 'आरसा' आठवला, आणि उडदामाजी काळेगोरे असं वाटलं, इतकंच. :)
गजल फक्कड आहे, गैरसमज नसावा...