नळ जातो तेव्हा

नळ जातो तेव्हा

नळ जातो तेव्हा

लेखक - ज्युनिअर ब्रह्मे

आता मी कार्पोरेट फिल्डमधून बाहेर पडलोय. पण एकेकाळी मी तुमच्यासारखाच एखाद्या जगड्व्याळ यंत्रणेतला एक माणूस होतो; अप्रेझलच्या आशेनं दिवसेंदिवस साहेबासमोर लाचारीनं उभारणारा, ऐनवेळी साहेबानं प्रमोशन नाकारून त्याच्या कुणा गाववाल्याला दिलं तरी केबिनमध्ये खोटी स्माईल देत 'चलता है सर' असं म्हणणारा, नंतर डेस्कवर येऊन आपला सगळा राग डस्टबिनवर काढणारा, असा मी होतो.

बंगलोरहून नायर आला नसता तर अजूनही मी तेच करत राहिलो असतो.

नायर म्हणजे आमचा प्रॉस्पेक्टिव्ह क्लायंट. नाडकर्णींना कोणीही क्लायंट आला की आम्ही कोकरांनी त्याच्या अवतीभवती असावं असं वाटायचं, विशेषतः मी आणि झांबरेनं. आठ वर्षांपूर्वी नाडकर्णींची अशाच एका इन्सिडंटमध्ये डिमोशनवर रायपूरला बदली झाली होती. ही गोष्ट सत्तरदा सांगून त्यांनी आम्हांला काव आणला होता. कुणी येणार असलं की माझ्या पोटात गोळा यायचा. झांबर्‍या मात्र बिनधास्त असायचा. कुणी क्लायंट आला की हा बाकरवडी आणि आंबाबर्फी आणायला म्हणून जो गायब व्हायचा तो थेट पार्टी जाताना एअरपोर्टवरच उगवायचा. वर आणि आपण कसं रांगेत उभं राहून बर्फी मिळवली ते नाडकर्णींना रंगवून सांगायचा. झांबरे नसला की आलेल्या पाहुण्याचा एडीसी म्हणून उभं राहायची जबाबदारी माझ्यावरच यायची.

त्या दिवशी नायर आणि नाडकर्णींची मीटिंग चांगली झाली. नायरनं मला आणखी काही डॉक्युमेंट्स मागितली. त्याची कॉफी होईतो मी ती त्याला आणून दिली. अर्थात, ती बरोबर असावीतच असा नाडकर्णींचा आग्रह नसायचा, आमचाही नसायचा. कारण आमच्याकडे प्रत्येक माणसाकडे एकच इन्फर्मेशन वेगवेगळ्या आकड्यांत असायची. आणि कदाचित, कुणाचीच बरोबर नसायची. आम्ही महिन्याला एचओला जो स्टेटस रिपोर्ट पाठवायचो त्याबद्दल खात्री नसल्यानं एकाचवेळी चौघं-पाचजण रिपोर्ट पाठवायचो. एचओवाले त्यातला कुठलातरी एक रॅंडमली उचलायचे.

कॉफी पिऊन झाल्यावर नाडकर्णींनी नायरला आमचं ऑफिस दाखवलं. बिल्डिंगमधला अख्खा फ्लोअर आमच्या ताब्यात होता. चांगलं ३६०० स्क्वेअर फूटांचं ऑफिस होतं ते. राऊंड संपवून दोघं पॅसेजमध्ये आले तेव्हा अचानक नायरला पोटातली कॉफी रिकामी करायची भावना झाली. पॅसेजच्या शेवटी उजवीकडं लेडीज आणि डावीकडं जेन्ट्ससाठी टॉयलेट्स होती. प्रत्येकी दोन टॉयलेट्स, दोन युरीनल, दोन वॉशबेसिन असा सगळा दोनचा पाढा होता. तिथं बाहेर मोठी खिडकी असल्यानं त्या पॅसेजचा स्मोकींग झोन म्हणूनही आम्हांला उपयोग व्हायचा. नाडकर्णीसाहेब स्वतः त्याला तिकडं घेऊन गेले. अर्थात, पाठोपाठ मीही होतोच. नायर त्यानं कुठलीतरी असाइनमेंट कशी मिळवली हे सांगत होता. टाकी खाली करून वॉशबेसिनपाशी येत नायर म्हणाला, "देन्न आय वेण्ट स्ट्राईट्ट टू हिज बॉस यांड सेड…." असं म्हणत नळ सुरु करण्यासाठी नायरनं हात फिरवला पण त्याचा हात हवेत आंधळ्यासारखा चाचपडत फिरला. हाताला नळाचा स्पर्श झाला नाही म्हणजे काहीतरी चुकतंय असं वाटून नायरनं वॉशबेसिनकडं वळून पाहिलं तर काय? जिथं नळ असायला पाहीजे होता तिथं कुणीतरी लाकडी खुंटा ठोकून ठेवला होता. नाडकर्णी साहेबांनी शरमून लगेच स्वतः नायरला "हिअर यू आर, मिस्टर नायर." असं म्हणून शेजारचा नळ चालू करुन दिला.

हे नळ गायब होण्याचं प्रकरण नाडकर्णी मनावर घेतील असं वाटलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी झांबरे टॉयलेटवरुन नायर नाडकर्णींना काहीतरी खोचक शेरा मारुन गेला असं सांगत आला. आणि साडेनऊला आल्याआल्या नाडकर्णींनी मला केबिनमध्ये बोलावून घेतलं.

“जेबी, काल नायरच्या समोर काय लफडं झालं माहीताय ना?”

“हो सर, झांबरेनं सांगितलं मला. एअरपोर्टवर नायर काहीतरी बोलला म्हणून.”

“आणि हे असे नळ चोरीला जातात आणि आपण काहीही न करता गप्प बसतो. कारण आपल्या केआरएमध्ये ते नसतं ना.” ह्यातला 'आपण' म्हणजे नाडकर्णींच्या समोर उभा असणारा माणूस असायचा. एखाद्याशी खवचटपणे काही बोलायचं असलं तर नाडकर्णी खास आपण हा त्यांचा लाडका शब्द वापरायचे. “त्यामुळं गेले नळ चोरीला तर आपलं काय जातं, काय?”

तेवढ्यात साहेबांचा चहा घेऊन दिवाकर लंगडत लंगडत आला. नाडकर्णींनी एकदा त्याचा लंगडणारा पाय निरखून पाहीला. सुरुवातीला त्यांना नीट कळलं नाही म्हणून त्यांनी हळूच आपला उजवा हात उंचावून मग मनातल्या मनात वळून पाहून, स्वतःला दिवाकरच्या पोजमध्ये इमॅजिन करुन, दिवाकरचा उजवाच पाय लंगडा आहे याची खात्री करुन घेतली.

“उजवाच पाय हाय सायेब.” नाडकर्णींच्या मनातले विचार ओळखून गालातल्या गालात हसत दिवाकर त्यांना म्हणाला. ह्या दिवाकरचा काही भरवसा नव्हता. लंगडे आहोत म्हणून सांगून त्यानं आमच्या कंपनीत नोकरी मिळवलेली होती. तो आल्या दिवसापासून त्याचा उजवा पाय अधू नसून धडधाकट आहे असा डाऊट बर्‍याच जणांना होता. एकदा मी आणि झांबरेनं त्याला न लंगडता बाजारात पाहिलंही होतं. दुसर्‍या दिवशी त्याला विचारलं त्यावर त्यानं थंडपणे “काल माजा डावा पायबी दुकत होता. म्ह्नून दोनीबी पायांनी यकदमच लंगडत हुतो” असं स्पष्टीकरण दिलं होतं.

नाडकर्णींचा चहा होईतो मी त्यांना काही बोललो नाही. गरमागरम चहा पिला की ते थोडे निवतात हे मला सवयीनं माहीत झालं होतं. “मग जेबी, ह्यावर काय करणार आहेस?”
ह्यावर मी काय करु शकणार होतो? मला काय कंपनीनं डिटेक्टिव्ह म्हणूनही नोकरीला ठेवलं होतं का? कारण तशी आमची कंपनीही ग्रेट होती. प्रत्येक गोष्ट इनहाऊस करायचं त्यांना वेड होतं. हाऊसकीपिंगसाठी सगळ्या फ्लोअर्सची मिळून एक एजन्सी असताना आमच्या एचओनं आगाऊपणा करुन हे लफडं आमच्या गळ्यात मारलं होतं. मूळ कामापेक्षा या भानगडींत आमचा जास्त वेळ जायचा. तरी आम्ही हुशारीनं प्रत्येक कामाला नगाला नग उभे केले होते. दिवाकरनं नोकरीला लागताना पूर्वी त्याच्या काकाच्या प्लंबिंग मटेरियलच्या दुकानात काम केल्याचं सांगितलं होतं, त्या जोरावर प्लंबिंग आणि वायरिंगची जबाबदारी त्याच्याकडं आली होती; नाडकर्णींच्या रामा ड्रायव्हरला मारुन-मुटकून पार्किंग इनचार्ज बनवलं होतं आणि नवर्‍याच्या नोकरीची भीती दाखवून गणपत वॉचमनच्या बायकोला ऑफिसात झाडलोट करायचं काम दिलं होतं. हे असं असताना साहेबांनी ही माझीच जबाबदारी असल्यासारखी ही धोंड माझ्या गळ्यात का बांधावी ते मला कळलं नाही.

“आपण काय करु शकतो सर यावर?” मी शक्य तितका भोळा चेहरा करुन म्हणालो.

“जेबी, आय डोन्ट लाईक सच ॲटीट्यूड. उलट अशा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह गोष्टींत तुझं जास्त लक्ष पाहिजे. आय विश टू सी यू सिटींग इन माय चेअर, आणि तूच असा अंगचोरपणा केलास तर कसं व्हायचं?”

नाडकर्णींच्या ह्या बोलण्यानं का कुणास ठाऊक, माझ्यात आत्मविश्वासाचा संचार झाला, काही लोकांत भुताचा वगैरे होतो तसा. कदाचित त्यावेळी डोक्यावर झेब्र्याला वगैरे असतात तशी शिंगंही उगवली असतील.

मी उत्साहानं छाती पुढं करून त्यांना विचारलं, "सांगा सर, मी काय करू ते सांगा."

"दॅट्स बेटर. हे बघ, आय वॉन्ट यू टू गो टू द रूट्स ऑफ धिस फॉसेट बिझनेस. एक इन्व्हेस्टिगेशन टीम तयार करु. आणि या चोरीचा छडा लागेपर्यंत तू मला रोज तीनदा ब्रीफ कर."

दिवसातून तीनदा औषध घेतात तसं तीनदा ब्रीफ कर इथपर्यंत ठीक होतं, पण जेव्हा टीम निवडायची बात आली तेव्हा मी सटपटलो. आमच्या ऑफिसमधल्या लोकांचा अशा गोष्टीतला उत्साह दांडगा होता. प्रेझेंटेशनला सगळे पुढं, पण नंतर इंप्लिमेंटेशनला सगळे मागं. मागं एकदा ऑफिसची ट्रिप काढायची चर्चा झाली होती. कुलू मनाली, केरळ, गोवा वगैरे नेहमीचे स्पॉट आधी चर्चून झाले. कुणीतरी बाली-थायलंडही सुचवलं होतं. घाऊकमध्ये पासपोर्ट काढले तर स्वस्त पडतात अशी पुडीही कुणीतरी सोडली होती. अशीच चर्चा वाढत राहिली असती तर चंद्रावर जायच्या यादीत आमची नावं दिसली असती. पण हळूहळू एकएक नाव मागं पडत गेलं तसं सर्व उत्साही मंडळींनी माघार घेतली आणि शेवटी उरलेल्या तिघा फाऊंडर मेंबर्सनी खाली जाऊन समारोपादाखल भेळ खाल्ली होती. त्यामुळं टीम निवडायची म्हटल्यावर माझ्या अंगावर काटा आला. कुणी स्वेच्छेनं यायची शक्यताच नव्हती. मग मी आणि नाडकर्णींनी बसून टीम काढली.

"असं कर, झांबरेला घे तुझ्या टीममध्ये.'

"नको सर, आधीच झांबरे ऑफिसमध्ये कमी असतो."

"दॅटस व्हाय आय वॉन्ट हिम. तो आपल्यासाठी बातम्यांचा एक्सटर्नल सोर्स असेल. आणि नंदन नाडगौडाला घे."

"नको सर. त्याचा मामा एचओला आहे, माहीताय ना? उगाच तो मामाला फोन करुन सांगायचा आणि एचओवाले आपल्यामागं काहीतरी नवीन झक्कू लावायचे."

एचओचं नाव काढताच नाडकर्णींनी माघार घेतली. "तेही खरंच! मग, महेश देसाई कसा वाटतो?"

"सर, त्याची बायको प्रेग्नंट आहे. त्याचं कशातच लक्ष नसतं हल्ली."

"आं? हे मला माहीत नव्हतं. तशी काही लक्षणं दिसत नाहीत त्याच्यात." अचानक आपण काय बोलून गेलो ते कळून नाडकर्णींनी जीभ चावली. "जाऊदे, मग निहारीका?"

"सर, ती अज्जिबात तयार होणार नाही. ती आधीच नाही म्हणेल!"

खरंतर, निहारीकाला मी आधीच विचारलं होतं आणि माझं वाक्य पूर्ण होण्याआधीच ती फटकन नाही म्हणाली होती. ती दूर खराडीला एकटी राहायची, त्यामुळं तिनं संध्याकाळी थोडं उशीरापर्यंत थांबावं आणि मग आपण तिला घरी ड्रॉप करायचं वगैरे प्लॅन सगळ्यांनी करुन झाले होते. निहारीका आम्हां सगळ्यांना पुरून उरली होती.

नाडकर्णींनी चष्मा काढून त्याची काडी दातात धरत विचार केला. आणि म्हणाले, "असं कर, धुमाळला घे तुझ्या टीममध्ये. तसंही त्याच्याकडं फार काम नसतंच."
मी 'कशी नशिबानं थट्टा आज मांडली'टाईप चेहरा करुन मान डोलावली. खरंतर मला धुमाळ पाहिजेच होता. कोणत्याही कामाला नाही न म्हणणारा माणूस. आधीच ऑफिसची पेटी कॅश आम्ही त्याच्या गळ्यात मारली होती. त्याचा हिशेब ठेवताठेवता त्याला फेस आला होता. महिन्याला हजारपाचशे रुपये अक्कलखाती घालून तो दर महिन्याचं अकाऊंट कसंतरी क्लोज करायचा.

"आणि प्रीती शर्माला घे." प्रीती म्हणजे प्रत्येक ऑफिसमध्ये एक दीपिका पडुकोन असते तशी ही आमच्या ऑफिसची दीपिका. अत्यंत हुशार, बर्‍यापैकी सुंदर आणि कामाच्या नावानं बोंब असणारी ही पोरगी. स्वतःचं काम दुसर्‍याकडून करवून घेण्याची हुशारी तिच्या अंगी असल्यानं तिच्या कामात खोट काढणं आजवर नाडकर्णींनाही जमलं नव्हतं.

"आणि आपला दिवाकर."

"आं?" दिवाकरचं ह्या टीममध्ये काय काम असणार होतं? पण माझ्या चेहर्‍यावरचा प्रश्न वाचत नाडकर्णी म्हणाले. "असूदे, दिवाकर चलाख आहे. बारीक कावळ्याची नजर आहे त्याची."

आमच्या पाच जणांच्या कमिटीची मेल नाडकर्णींनी चौघांना पाठवून दिली. संध्याकाळीच पहिली किकऑफ मीटिंग झाली पाहिजे असं बजावून ते त्यांच्या कामाला लागले. बरोबर पाचच्या ठोक्याला सगळेजण मीटिंगरूममध्ये हजर झाले. कधी नव्हे ते काहीतरी जबाबदारीचं काम मिळाल्यानं दिवाकर विचारवंतासारखा प्रयत्नपूर्वक लांबट चेहरा करून बसला होता. झांबरे मीटिंगला चहाबरोबर खायला काहीतरी खायला पाहिजे होतं म्हणून कुरकुरत होता. मीटिंग जितकी महत्त्वाची तितकं खायला जास्त असलं पाहिजे अशी त्याची समजूत आहे. धुमाळ ह्या प्रकरणात आपल्याला कितीची टोपी लागणार असा विचार करत चिंताक्रांत चेहऱ्यानं बसून होता. प्रीती मीटिंगरूममध्ये आली तेच फोन कानाला लावून. आणि 'दोन मिनिटं' असा बोटांनी इशारा करत जे बाहेर गेली ते परत आलीच नाही. मी अजेन्ड्याच्या कॉपीज काढून आणल्या होत्या. मानपत्र वाचावं तसं दोन मिनिटात मोठ्ठ्यानं अजेंडा वाचून झाला. चहाचा कप अर्धा होईतो मीटिंग संपलीही होती. सगळे निघून गेल्यावर पंधरा मिनिटं प्रीतीची वाट बघून मीही बाहेर पडलो.

सकाळी परत नाडकर्णींची केबिन. आत गेल्यागेल्या नाडकर्णींचा पहिला प्रश्न.

"काय ठरलं काल?"

आता ह्या प्रश्नाचं उत्तर देणं तसं अवघड नव्हतं, पण तितक्यात झांबरे आत घुसला. नाडकर्णींनी हा प्रश्न आपल्यालाच विचारलाय असं समजून झांबरेनं तोर्‍यात "हो सर, काल झाली की मीटिंग." असं सांगून टाकलं.

"मग?" नाडकर्णी उत्तराची वाटच बघत होते.

"मग काय? नळ कधी चोरीला जातात त्याचा पॅटर्न शोधून काढला पाहिजे आधी."
"झांबरे, लेट्स फरगेट धिस ब्लडी पॅटर्न! आय वॉन्ट धिस थेफ्ट टू स्टॉप ॲट वन्स."

"तेच म्हणतोय मी सर. त्याचं काय आहे, की नळ कधी चोरीला जातोय हे कळलं तर नेमकं त्याच वेळी चोराला दबा धरुन पकडता येईल. नाहीतर आपल्याला आपली सगळी कामं सोडून वॉशरुमसमोर पहारा देत बसावं लागेल. आणि तसं केलं तर चोराला संशय येईल." झांबरे जणू मागच्या जन्मी शेरलॉक होम्सचा बाप असल्यासारखं सांगत होता.

"मग? पॅटर्न कसा एस्टॅब्लिश करणार? काही रेकॉर्ड आहे का तुमच्याकडं?"

"सर, धुमाळला सांगितलंय शोधायला. नळ कधीकधी विकत घेतलेत त्यावरुन आपल्याला नळ चोरीला कधी गेले ते बॅकट्रॅक करता येईल."

खरंतर झांबर्‍यानं धुमाळला असं काहीही सांगितलं नव्हतं. पण झांबरेची लोणकढी ऐकून नाडकर्णी खुष झाले आणि झांबरेची हाफ डे सुट्टी आऊटडोअर ड्यूटी म्हणून मंजूर झाली.

झांबरेनं सोडलेला धागा पकडून दोन दिवस मीही पॅटर्नच्या नावाखाली कुरतडून काढले. तोवर धुमाळनं खरंच जुनं रेकॉर्ड काढून तपासलं होतं. गेल्या बारा महिन्यात एकूण नऊदा (किंवा जास्तही असेल) नळ बदलल्याचं रेकॉर्ड मिळत होतं. मी सहज म्हणून जुनी बिलं पाहिली. सगळी बिलं 'हरकारे पलंबिंग मार्ट'च्या नावाची. मी धुमाळकडं प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं तर तो म्हणाला, "हरकारे म्हणजे आपल्या दिवाकरच्या काकाचं दुकान. आपल्याला बारा टक्के डिस्काऊंट आहे त्या दुकानात, शिवाय थोडीफार उधारीही चालते तिथं." उधारीचा विषय आल्यावर मी पुढं काही बोललो नाही, तुटपुंज्या पेटीकॅशमध्ये हे सगळं गाडं चालवायचा मीही कधीकाळी अनुभव घेतला होता.
तिसर्‍या दिवशी नाडकर्णीसाहेब वॉशरुममधून बाहेर पडताना त्यांना धुमाळ दिसला. लगेच त्याला पकडून नळाच्या रेकॉर्डबद्दल नाडकर्णींनी त्याला विचारलं तर सगळं रेकॉर्ड जेबीला आधीच दिलंय असं म्हणत त्यानं आपली मानगूट सोडवून घेतली. नाडकर्णींनी लगेच मला केबिनमध्ये बोलवून "आता काय, पुढचे नळ चोरीला जायची वाट पाहतोय का आपण?" असं खवचटपणे विचारलं.

आणि खरंच, वाट पाहायची वेळच आली नाही. दुपारीच नळ चोरीला गेल्याची तक्रार प्रीतीनं दिवाकरकडं केली. दरवेळी जेन्ट्स टॉयलेटमधला नळ जायचा तो ह्यावेळी लेडीज टॉयलेटमधला गेला होता.

नाडकर्णी हे ऐकून आता आमच्यावर भडकणार हे माहीत असल्यानं आम्ही लगेच कमिटीची इन्स्टंट ॲक्शन मीटिंग गुप्तपणे घेतली. सद्यस्थितीत नळांची चोरी रोखणे हे व्हिजन स्टेटमेंट असावं की मिशन स्टेटमेंट यावर आमचा बराच खल झाला. शेवटी शॉर्ट टर्म गोल म्हणून नळांची चोरी रोखणे आणि लॉंग टर्म गोल म्हणजे नळचोराला पकडणे अशी तडजोड झाली. आणि तातडीनं नवा नळ लावायचा निर्णय घेऊन मीटिंग संपली.

हे नळ बसवायचा म्हणजे एक वैतागच असतो. आधी दिवाकर कुरकुरत असतो, सतरांदा त्याला विनवून नळ बसवायला न्यायचं, मग बाहेर जाऊन सगळ्या फ्लोअरचं पाणी बंद करायचं, मग नळ बसवताना कुठं काथ्याच बरोबर बसत नाही, कुठं सीलिंग टेपच सापडत नाही वगैरे नेहमीचे टप्पे पार करत सकाळी हाती घेतलेला नळ कसाबसा जोडून होईतो दुपार उजाडते. वर दिवाकरचं "पलंबरच झालो आस्तो तर इक्त्या कामाचे शंबरतरी घ्येतले आस्ते." असं म्हणत तोंड वेंगाडत चहापाणी मागून झालं की नळ बसवण्याचा कार्यक्रम पूर्ण झाला असं समजायचं.

सकाळपर्यंत नाडकर्णींना ती बातमी पोचणार म्हणून मी धुमाळला ऑफिसला येतायेताच नळ घेऊन यायला सांगितलं होतं. तोही शहाणा स्वस्त पडतील म्हणून एकदम सहा घेऊन आला. मोठ्या ब्राऊन बॉक्समध्ये ते सहा नळ घेऊन तो लिफ्टमध्ये शिरला तर आत नाडकर्णी दत्त म्हणून उभे. साहजिकच, लिफ्टमधून बाहेर पडेपर्यंत नाडकर्णींना सगळी गोष्ट कळली होती. त्यांनी त्यांच्या केबिनमध्ये नळ कमिटीला ताबडतोब बोलावलं. धुमाळला मनातून शिव्या देत सगळे लगेच तिथं आले.

"जेबी, हे काय चाललंय? आणखी किती दिवस जुने रेकॉर्ड, चोरीचा पॅटर्न असल्या गोष्टीवर वेळ घालवणार आपण? आणि अजूनही चोर्‍या चालूच आहेत."

"पण सर...."

"आय डोन्ट वॉन्ट टू हिअर ॲन एक्सक्यूज. आय वॉन्ट ॲक्शन!" तळहातावर मूठ आपटत नाडकर्णी गरजले.

झांबरेनं मध्येच एन्ट्री मारली, "सर, ॲक्शन घेतलीय. कालच वॉशरुममध्ये सीसीटीव्ही बसवायची चर्चा झाली. आज संध्याकाळपर्यंत एकाचं कोटेशनपण येईल."

हे ऐकताच प्रीतीनं प्रश्नार्थक नजरेनं आमच्याकडं पाहिलं. ही असली काही चर्चा झालेली तिला माहीत असणं शक्यच नव्हतं, आम्हांलाही माहीत नव्हतं म्हणा. झांबरेनं नेहमीप्रमाणं एक पुडी सोडली होती. बरं, प्रीतीला हे मला माहीत नव्हतं असा कांगावा करायचीही सोय नव्हती कारण ती मीटिंग निम्म्यातनं सोडून जाते हे भांडं झांबरेनं फोडलंच असतं.
तरीही शेवटी, धीर करुन प्रीतीनं तोंड उघडलं.

"सर, या गोष्टीला माझा विरोध आहे.... म्हणजे आता लेडीज टॉयलेटमध्ये जायचीही भीती वाटेल. कुणी आपल्याला पाहतंय हे फीलिंग म्हणजे…."

नाडकर्णींनी दोन मिनिटं डोळे मिटून थोडा विचार केला आणि म्हणाले, "बरोबर आहे तुझं प्रीती. कुणाचीही प्रायव्हसी जपलीच पाहीजे आपण. जेबी, असं करा त्याऐवजी, पॅसेजमध्ये कोण जातो कोण येतो यावर पाळत ठेवा."

"पण सर, असं कोण जातो हे बघायला आपल्याला कसं जमणार? म्हणजे त्यासाठी एक निराळा वॉचमन ठेवावा लागेल." मी नाडकर्णींना विरोध करत म्हणालो.

नाडकर्णींनी थोडंस त्रासिक नजरेनं माझ्याकडं पाहिलं आणि म्हणाले, "तेही बरोबर आहे. मग असं करु. एक रजिस्टर मेन्टेन करु. वॉशरुमला जाताना कुणीही आपलं नाव आणि जाण्याची वेळ त्यात नोंदवून मगच आत जायचं."

"व्हेरी गुड आयडिया सर, तसंच एम्प्लॉई नंबर आणि मोबाईल नंबरही लिहायला लावू, म्हणजे इन केस ऑफ इमर्जन्सी....."

झांबरेचं वाक्य मध्येच तोडत नाडकर्णी म्हणाले, "झांबरे, तिथं जाणार्‍या प्रत्येकाला इमर्जन्सीच असणार ना? आं? तुमचं उगाच आपलं काहीतरी!" साहेबांनी झांबरेला असं झाडल्यावर बाकीच्या सगळ्यांना मनात नाही म्हटलं तर थोड्याश्या गुदगुल्या झाल्याच.

तासाभरात, टॉयलेटच्या दरवाज्यात ठेवायचं रजिस्टर, ते ठेवायला एक स्टूल आणि "आत जाण्यापूर्वी नोंद करा" अशी त्रैभाषिक सूचना असलेला बोर्ड घेऊन दिवाकर गेला आणि बरीच ठाकठोक करुन बोर्ड लावून आला. लंचनंतर नाव न लिहीता वॉशरुमला जाणार्‍या नाडकर्णींना 'खबरदार जर टाच मारुनी'वाल्या सावळ्याच्या आविर्भावात हटकून 'सर, नाव लिवूनच मंग आत जायाचं' असं सुनावत त्यांची शाबासकीही घेतली पठ्ठ्यानं.

ह्या रजिस्टरचा रुबाब दीड दिवस टिकला. तिसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा एक नळ गायब झालेला दिसला.

दरवेळी नळचोर नळ चोरल्यावर त्याजागी लाकडी खुंटी ठोकून जायचा. आमचे पूर्वीचे चोर अगदीच सभ्य होते; ते आपलं नळ चोरला की व्यवस्थित प्लग लावून जायचे. नंतर अर्धसुसंस्कृत चोरांचा जमाना आला, ते प्लगऐवजी लाकडी खुंटी ठोकू लागले. आता तर पारच भुरट्या चोरांचा जमाना आला असावा. कारण यावेळी चोरानं फक्त मुळापासून नळ उखडून पाईप तसाच भुंडा ठेवला होता. असं केल्यावर खरं तर पाणी वाहून वॉशरूममध्ये तळं साचलं असायला पाहिजे होतं, पण ह्या चलाख चोरानं पाण्याचा व्हाल्व बंद करुन मग नळ चोरला होता. एकतर चोर टेक्निकली भलताच साऊंड असावा किंवा नळात कलि शिरला तसा त्याच्याही मनात कलि शिरलेला असावा.

मी नळ गेलेला पाहताच दिवाकरच्या मागं लागून नाडकर्णी येईपर्यंत नळ बसवायची खटपट केली, पण दिवाकरनं पान्यानं शेवटचा पेंच आवळून "झालंच बगा ह्या नळाचं काम तमाम" असं म्हणायला आणि नाडकर्णी वॉशरुममध्ये यायला एकच गाठ पडली. बरीच वर्षं टॉप मॅनेजमेंटमध्ये काढल्यानं आमचे चेहरे बघूनच काय चुकलंय ते नाडकर्णींनी ताडलं. लगेच पुन्हा केबिन.

"जेबी, हे असं किती दिवस चालणार? आर वी मेकिंग एनी प्रोग्रेस?"

नेमका त्या दिवशी झांबरे आला नव्हता. त्याच्या शेजारच्या बिल्डिंगमधल्या कुणीतरी पोलिसातला रिटायर्ड कुत्रा घेतला होता, तो मिळतो का ते पाहायला झांबरे गेला होता. त्यामुळं, वेळ मारुन न्यायची जबाबदारी माझ्यावरच आली. "सर, रजिस्टर तर मेन्टेन करतोय…"

"हेल विथ रजिस्टर. चोर रजिस्टरमध्ये सही करुन आत जाईल का? ही साधी गोष्ट कळायला पाहीजे होती आपल्याला? कुण्या शहाण्याची आयडिया होती ही?"

"झांबरेची, सर." साहेब कितीही चुकला तरी त्याला कुणीतरी बळीचा बकरा मिळतोच हे कार्पोरेट सत्य माहीत असल्यानं मी झांबरेचं नाव बोलून गेलो.

"आता आपण पुढं काय करायचं ठरवलंय?"

"सर, आता आपणच आपल्याकडून जमेल तितकी पाळत ठेवली पाहीजे." कधी नव्हे ते धुमाळ बोलला.

"राईट. जितके लोक व्हॉलंटरीली पुढं येतील तितके घ्या. बाकीच्यांना मी सांगतो."

"सर, तसं कुणीच तयार होणार नाही," प्रीतीनं सरळ सांगून टाकलं,

"त्याऐवजी, आपण असं केलं तर?"

"कसं?"

"वॉशरुमच्या कोपर्‍यातच आपला स्मोकिंग झोन आहे. तर आपल्या सगळया स्टाफला स्मोकिंग करायला उत्तेजन दिलं तर? म्हणजे तिथं कायम कुणीनाकुणी राहील आणि चोराला चान्सच मिळणार नाही."

नाडकर्णींनी कपाळावर हात मारुन घेतला.

ऑफिशियली नसलं तरी अनऑफिशियली अशी पाळत ठेवायचं आम्ही सगळ्यांनी ठरवलं.

दुपारी दिवाकर उगाच "काय सायेब, लई कामात हाय का?" असं म्हणत माझ्या डेस्कपाशी येऊन दोनतीनदा घुटमळून गेला. नंतर मी सहज एक चक्कर टाकून यावी म्हणून वॉशरुमकडं निघालो असताना त्यानं मला एकटा गाठला.

"सायेब, एक सांगायचं होतं."

"बोल दिवाकर." आता हा पैसे मागणार का ही शंका माझ्या मनात, त्यामुळं आपल्या कुठल्या खिशात पैसे नाहीत हे आठवायच्या प्रयत्नात मी होतो. म्हणजे वेळ पडली तर तो खिसा उलटा करुन दाखवता आला असता.

"सायेब, आपल्या प्रीतीम्याडम हायेत ना…."

"हं, त्यांना काय झालं?"

"काई न्हाई, दुपारी मी त्येंना वॉशरुममदून भायेर पडताना पायलं."

"मग त्यात काय? त्यांनी वॉशरुममध्येच राहायला पाहिजे होतं का?"

"तसं न्हाई सायेब, मी त्येंना ज्येन्टस वॉशरुममदून भायेर पडताना पायलं."

हे जरा मला समजायला अवघड गेलं. प्रीती जेन्ट्स टॉयलेटमधून बाहेर कशी पडेल? म्हणजे बाहेर पडण्यासाठी आधी तिला तिथं आत जावं लागेलच ना? मी दिवाकरला यावर खोदूनखोदून विचारलं. पण प्रीतीमॅडम जेन्ट्स टॉयलेटमधून बाहेर पडलेलं मी बघितलं एवढंच तो परतपरत सांगत राहीला.

खरं तर मी हा विषय सोडून द्यायला पाहिजे होतं, पण असल्या विषयांत झांबरेला गती होती. म्हणून हळूच मी झांबरेला विचारायचं ठरवलं. झांबर्‍या दुपारनंतर निवांतपणे उगवला.

चार वाजता कॉफी प्यायच्या निमित्तानं मी झांबरेला बाहेर काढलं. कॉफी पितापिता अगदी सहज वाटावं अशा सुरात त्याला विचारलं, "काय रे, हल्ली प्रीतीचं कुणाशी जास्त जुळतं रे?"

कॉफीचा कप खाली ठेवून माझ्याकडं साशंक सुरात पाहात झांबरेनं विचारलं,

"तुला कशाला पाहिजे? तूपण तिच्यामागं लागलास का?"

"नाही रे, सहज आपलं विचारलं. अपडेट्स असाव्यात म्हणून."

"आजवर कधी नाही विचारलंस. आज अचानक का बरं?" झांबरेच्या डोळ्यात संशयाचे काळे ढग जमा व्हायला लागले होते.

"अरे, अगदी सहजच." मी तरीही सराईत गुन्हेगारासारखं अजून तोंड उघडलं नव्हतं.

"हल्ली ती ना, विक्की अहलुवालियाबरोबर असते. त्याला पार घोळात घेतलाय तिनं." झांबरेनं माहिती पुरवली. हा विक्की अहलुवालिया म्हणजे पंजाबी माणूसही बावळट असू शकतो याचा नमुना होता. मी त्याचं नाव ऐकून नुसताच सुस्कारा टाकला.

"अरे, मी खरंच सांगतोय," पुढं झुकत झांबरे दबक्या आवाजात म्हणाला,"आज त्याच्या मानेवर पुसटसा गुलाबी डाग बघितलास का? त्याचा कलर आणि प्रीतीच्या लिपस्टिकचा कलर सेम टू सेम आहे."

झांबरेनं इतक्या विश्वासानं हे सांगितल्यावर मात्र इतका वेळ दाबून ठेवलेलं रहस्य माझ्या पोटात राहिलं नाही. मी प्रीतीला जेन्ट्स टॉयलेटमधून बाहेर पडतानाचा किस्सा सांगून टाकला. या प्रकरणाच्या मुळाशी आपण जायचं असेल तर प्रीतीवर पाळत ठेवली पाहिजे यावर त्याचं आणि माझं एकमत झालं.

झालं, झांबरे शेरलॉक आणि मी वॅटसन, असे आम्ही दोघंही आयरिन ॲडलरच्या मागावर निघालो.

ऑफिसमध्ये गेल्यावर मी कुठल्यातरी रिपोर्टचं काय झालं असं विचारण्याच्या निमित्तानं अहलुवालियाच्या डाव्या मानेवर असलेला पुसट डाग बघून घेतला. आणि मग पेन्सिल मागायच्या निमित्तानं प्रीतीपाशी जाऊन तिच्या लिपस्टिकची शेड चेक केली. एकदम परफेक्ट मॅच! प्रीती पेन्सिल देत असताना तिच्या जीन्सच्या उजव्या खिशात काहीतरी फुगीरशी वस्तू आहे असं दिसत होतं. प्रीतीला संशय येईल म्हणून मी त्याकडं जास्त निरखून पाहिलं नाही. पण पुढं गेल्यावर झांबरेला सांगितलं. संध्याकाळी झांबरे प्रीतीच्या खिश्यातली फुगीर वस्तू म्हणजेच नळ असू शकते असं सांगत आला.

आणि दहा मिनिटांनी दिवाकर वॉशरुममधला नळ चोरीला गेल्याचं सांगत आला.

आता मात्र माझी खात्रीच पटली. ह्या सगळ्या नळचोरीमागं प्रीतीच असणार. आणि या कटात अहलुवालिया तिला सामील होता. दुसर्‍या दिवशी सकाळीच नाडकर्णींना हे सांगून दोघांचा बुरखा उघड करायचा असं आम्ही ठरवलं.

ऑफिसमधून बाहेर पडतापडता झांबरेच्या डोक्यात काय आलं कुणास ठाऊक. मला अचानकच तो म्हणाला, "काय रे, सरांना सांगण्याआधी आपण प्रीतीचं कन्फेशन घेतलं तर?"

"ते कशाला?"

"म्हणजे, असं बघ. आपण चोर पकडलाच पाहिजे असं नाही, नाडकर्णींना फक्त नळचोरी थांबवायची आहे. आणि प्रीतीला आपण तिला पकडलंय इतकंच कळू दिलं तर आपलाही फायदा आहे, होय की नाही?" डोळे मिचकावत झांबरे म्हणाला. त्याची ही मांडवली करायची सवय मला माहीत होती, म्हणून मी त्याच्याशी जास्त वाद घातला नाही. "मी येतोच दोन मिनिटांत" असं म्हणत झांबर्‍या पुन्हा ऑफिसात शिरला.

आता वाटतं की मी त्या दिवशी त्याला अडवायला पाहिजे होतं.

दुसर्‍या दिवशी सकाळी घरातून निघायला मला उशीर झाला. किचनसिंकचा नळ मुळापासून उखडून ताराच्या हातात आला. प्लंबिंगगुरु दिवाकर यांच्या तालमीत मिळालेल्या शिक्षणाचा वापर करुन मी तो बसवायचा प्रयत्न केला, पण त्याचे आटे निम्म्यातून तुटल्यानं तो परत बसत नव्हता. शेवटी तिथं तात्पुरता बोळा कोंबून बाहेर पडलो. घरातून निघताना तारानं नळ माझ्या हातावर ठेवला आणि येताना तसलाच नळ घेऊन या म्हणून बजावलं.

हे सगळं आटपून ऑफिसला पोचायला मला जरा उशीरच झाला. मी जागेवर बसेपर्यंत दिवाकर मला साहेबांनी केबिनमध्ये बोलावलंय हे सांगायला आला. केबिनमध्ये झांबरेला आणि त्याच्याशेजारी रडत असलेल्या प्रीतीला पाहिलं तेव्हा कालची गोष्ट आठवली. तोवर मी ते सगळं विसरुनच गेलो होतो.

मी केबिनमध्ये पोचताच झांबरेनं दरवाजा लावून घेतला. नाडकर्णी चष्म्याची काडी चावत माझ्याकडं बघत होते. प्रीती मान खाली घालून रुमालानं डोळे टिपत होती.

माझ्याकडं रोखून बघत नाडकर्णी जेव्हा म्हणाले, "जेबी, मला हे तुझ्याकडून अपेक्षित नव्हतं." तेव्हा मला काहीतरी चुकतंय याचा अंदाज यायला हवा होता. पण मी उत्साहाच्या भरात काल आपण कसा चोर शोधून काढला हे सांगत गेलो. माझं बोलून संपेपर्यंत झांबरेनं माझ्यासाठी रदबदली करायचे प्रयत्न निष्फळ झाले.

झालं इतकंच होतं, की आदल्या दिवशी संध्याकाळी झांबरेनं प्रीतीला जेन्ट्स टॉयलेटमध्ये जाण्याबद्दल खुलासा विचारायचा प्रयत्न केला. प्रीतीनं लगेच चिडून नाडकर्णींकडे तक्रार केली. झांबरेनं दिवाकरची साक्ष काढली तर ऐनवेळी दिवाकरनं 'असं कसं नक्की सांगता येईल? सगळ्यांनीच एकसारख्या रंगाच्या जीन्स घातल्या असल्यानं ओळखण्यात चूकही झाली असेल. त्यामुळं आपण केवळ शक्यता वर्तवली होती.' असा विश्वामित्री पवित्रा घेतला. प्रीतीच्या पॅंटच्या खिशातली फुगीर वस्तू म्हणजे फोनचा चार्जर निघाला. अहलुवालियाच्या मानेवरचा गुलाबी डाग त्याला झालेल्या जखमेवर त्यानं लावलेल्या अमृत मलमाचा होता. झांबरेची अशी सगळीकडून कोंडी झाल्यावर तो नेहमी करतो तेच त्यानं केलं.

झांबरे हे सगळं मला जेबीनं सांगितलंय असा कबुलीजबाब देऊन मोकळा झाला. सकाळी नाडकर्णींनी मला "जेबी, हे तुझ्याकडून अपेक्षित नव्हतं." असं म्हणण्यामागं ही सगळी पार्श्वभूमी होती.

मी माझी बाजू स्पष्ट करायचा बराच प्रयत्न केला. पण टॉयलेटमध्ये सीसीटीव्ही लावण्याचा प्रयत्न करणे, मुद्दाम संध्याकाळी उशीरा मीटिंग घेऊन लेडीजना ताटकळत ठेवणे, कलिग्जचं चारित्र्यहनन करणे अशी गुन्ह्याची कलमं माझ्याविरुद्ध उभी राहात गेली.
मला सकाळसकाळी भर एसीत घाम फुटला. घाम पुसायला मी रुमाल बाहेर काढायला गेलो तर, बरोब्बर ओळखलंत, तारानं दिलेला किचनचा नळ हातात आला. नाडकर्णींनी तिथून पुढं हे प्रकरण जास्तच सिरीयसली घेतलं. किचनसिंकचा आणि वॉशबेसिनचा नळ वेगवेगळा असतो असं सांगूनही त्यांचं समाधान झालं नाही.

मग काय? आणखी काही आरोप नकोत म्हणून मीच स्वेच्छेनं राजीनामा द्यायला तयार झालो. राजीनाम्याची तयारी दाखवल्यावर नाडकर्णींनी उदारपणे गेलेल्या बारा नळाचे मिळून नऊ हजार तीनशे वीस रुपये माझ्या नावावर डेबिट टाकणार नाही असं सांगितलं.
शेवटी, घरचा मोडका नळही तिथंच टाकून मी तातडीनं ऑफिस सोडलं. दिवाकर मला खालीपर्यंत पोचवायला आला होता.

बाहेर पडतापडता दिवाकरनं अगदीच न राहवून मला विचारलंच,"सायेब, एक इचारू?"

"बोल रे बाबा."

"ह्यो कालचा नळ कोन चोरला आसंल हो?"

दिवाकरनं हा प्रश्न मला थोडा आधी विचारला असता तर माझ्यापुढचे बरेच प्रश्न सुटले असते असं तेव्हा मला वाटून गेलं. अपयश आणि अपमानाच्या या प्रसंगातही माझ्या बुद्धीला दिवाकरच्या प्रश्नामागची खोच कळली. ‘हरकारे पलंबिंग मार्ट’ नावामागचं बिंग अशा प्रकारे फुटलं, पण फार उशीरा. ‘द किड’मध्ये जॅकी कूगन खिडक्यांच्या काचा फोडतो आणि नंतर चार्ली चॅप्लिन येऊन काचा बसवून पैसे मिळवतो, त्या ट्रिकची आठवण झाली. एमबीए फर्स्टला आम्हांला आपली बाजारपेठ कशी क्रिएट करावी यावर लेक्चर द्यायला आमच्या कॉलेजनं हार्टफर्डहून लेक्चरर आणला होता. हार्टफर्डवाल्या त्या फर्ड्या वक्त्यापेक्षा दिवाकर हरकारेच्या काकाला धंद्यातलं हे रहस्य अधिक चांगल्या प्रकारे कळलं होतं.

संतापाच्या भरात "हरामखोरा, आता जातोस का?" असं म्हणत मी त्याच्या अंगावर धावून गेलो तसं 'जातो जातो' असं ओरडत तो ऑफिसमध्ये पळाला. आणि पळाला तेही दोन्ही पायांवर.

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
4.333335
Your rating: None Average: 4.3 (3 votes)

प्रतिक्रिया

ज्यु ब्रम्हे पेश्शल! छान!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

कथा आवडली पण प्रीतीवरचा संशय? अन ती का गेलेली जेन्टस्मध्ये? ते नाही कळले.
.
हां कळलं जीन सेम होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वा वा वा जु ब्र... एकच नंबर. मी तुमचा लै मोठा फ्यान आहे बर्का.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

भारी!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

लेख आवडला. बर्‍याच ठिकाणी फुटलो. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या धमाल लेखाचं अस्मादिकांनी केलेलं वाचन: नळ चोरीला जातो तेव्हा
सौजन्यः कला

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चक्रपाणि

आमच्या हाफिसने या 'कला'ला पॉर्नोग्राफिक साईट म्हणून क्लासिफाय केल्याने बघता येत नाहीये ह बघुन ह ह पुवा झाली
या साईटवर त्यांना काय पॉर्न दिसलं असावं बर! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आज पुन्हा कथा वाचली. मस्तए.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.