उदरभरण नोहे : हल्ली कुठे आणि काय खाल्ले? -१२
आपण रोजचे जेवण जेवतोच, पण त्याच बरोबर वेगवेगळ्या हॉटेलांमध्ये नवनवीन पदार्थ चाखत असतो. हॉटेलांतच नाही तर सणासुदीच्या निमित्ताने किंवा कधी सहज लहर आली म्हणून किंवा कधी एखादा जिन्नस स्वस्तात मिळाला म्हणून घरीच काहीतरी नवा, सुग्रास पदार्थ बनतो. हा धागा अशाच तुम्हाला आवडलेल्या/नावडलेल्या पदार्थांवर चर्चा करण्यासाठी आहे. इथे हल्ली तुम्ही कुठे आणि काय खाल्ले? ते तुम्हाला आवडले का? असल्यास का? नसल्यास का? जर हा पदार्थ घरी स्वतः बनवला असेल / त्याची पाकृ माहित असेल तर तो कसा बनवला? जर हा हॉटेलात खाल्ला असेल तर ते हॉटेल कुठे आहे? पदार्थाची किंमत काय होती? हॉटेलचा अॅम्बियन्स कसा होता वगैरे हवं ते लिहू शकता. पदार्थाचा फोटो असेल तर उत्तमच. अर्थातच हे फक्त खाण्याबद्दल नाही, तर पिण्याबद्दलही आहे
आधीच्या भागात १००+ प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा सुरू करत आहोत.
============
मुंबईपुण्यात कुठे 'आफ्रिकन' पद्धतीचं जेवण मिळणारी हॉटेल्स आहेत का? नॉर्थ आफ्रिकनही चालतील पण अभिप्रेत आहे ते इथिओपियन वगैरे स्टाईल. इथिओपियन जेवणाची प्रशंसा परदेशी राहिलेल्यांकडून खूप ऐकलीय.
माहौल
हे जेवणाचे झाले. माहौल साधारण असा. (आमच्या गावच्या जुन्या आणि जाणत्या हबशी खाणावळीच्या फारा वर्षांपूर्वीच्या परंतु बर्यापैकी कन्शिष्टण्ट अनुभावावर आधारित.)
एखाद्या रविवारी दुपारी खाणावळीत टपकावे. आतल्या कुठल्याश्या खबदाडीत गायब झालेला/ली वेटर/वेटराणी साधारणतः अर्ध्यापाऊण तासानंतर जर काही कारणाने अवतरला/लीच, आणि त्याच्या/तिच्या दृष्टिक्षेपात जर तुम्ही चुकून आलातच, तर तो/ती तुम्हाला "बसवतो/ते". बसविण्याची व्यवस्था म्हणजे एका मोठ्या रंगीबेरंगी मोढ्याभोवती मांडलेले लहान मोढे. त्या लहान मोढ्यांवर बसायचे. त्यानंतर साधारणातः तासाभराने तो/ती तुमची ऑर्डर घ्यायला येतो/ते. ऑर्डर दिल्यानंतर मग दोनतीन तासांनी एकाच प्रचंड अॅल्युमिनियमच्या थाळीवर एका प्रचंड इंजेर्याचे आवरण (हा इंजेरा खाण्यासाठी नव्हे, तर फक्त ताटावरण म्हणून. अर्थात नंतर खाल्ला तरी चालतो.), आणि त्यावर तुमच्या जितक्या जणांचे असेल, तितक्या जणांचे जेवण वाढून आलेले असे त्या मधल्या मोठ्या मोढ्यावर ठेवले जाते. या एकाच थाळीतून तुम्ही सगळ्यांनी जेवायचे. बाजूला एका छोट्या थाळीत गुंडाळी करून ठेवलेले छोटे इंजेरे - हे त्या थाळीतल्या इंजेर्यावरून वाढून आलेल्याबरोबर खायचे. नंतर दोनतीन तासांनी त्या वेटर/वेटराणीला आपल्याकडे कोणी गिर्हाईक आले होते याची चुकून आठवण आलीच, तर तो/ती (त्या दडलेल्या जागेतून बाहेर येऊन) बिल देणार. अन्यथा तुम्हीच निघण्यापूर्वी प्रामाणिकपणे बिल देण्यासाठी "आता कुठे लपला/ली हा/ही?" म्हणून त्याला/तिला शोधायला निघायचे.
एकंदरीत उत्तम जेवण (मसालेदार, पण माफकच), परंतु निवांत कारभार.
---------------------------------------------------------------------
(तळटीपा सवडीने.)
विठ्ठल वडा
ठाण्याहून कोकणात जाताना सकाळी लवकर फक्त चहा घेऊन निघायचे आणि पनवेलच्या पुढे कुठेतरी चहा-नाश्त्यासाठी ब्रेक घ्यायचा, हा नेहेमीचा शिरस्ता.
गेल्या वीकांतालाही असाच निघालो. पनवेलच्या पुढे, पळस्प्याला थांबू असा विचार होता. पण 'दत्त' कडे ही झिम्माड गर्दी!! पार्किंगलाही जागा नव्हती. मग तसाच पुढे निघालो. कर्नाळ्याला कामताकडेही गर्दी होती पण पार्किंगला जागा दिसली. थांबलो.
आत शिरलो आणि एक जाहिरात बघितली - तुम्ही आमचा विठ्ठल वडा खाउन पाहिलात काय? प्रश्नार्थक मुद्रेने इतरांकडे पाहिले. सर्वांचीच मूकसंमती दिसली म्हणून विठ्ठल वडाच मागवला.
नेहेमीचाच बटाटवडा, जरा चेचलेला आणि त्यावर दही, शेव आणि लसणाची चटणी!!
पदार्थ दिसत होता बरा. खेरीज, गरमागरम वड्यावर थंडगार दही हे कॉम्बिनेशनही मजेशीर वाटत होते. मात्र वॅल्यू फॉर मनी विचाराल तर, साठ रुपये ही किंमत जरा जास्तच वाटली!
बर्याच वर्षांनतर विठ्ठल कामताने स्वतःची सिग्नेचर डिश बनवलेली दिसते. सगळ्या फ्रॅन्चायजींमध्ये मिळते की नाही, हे बघायला हवे.
विठ्ठल कामताच्या हाटेलांत
विठ्ठल कामताच्या हाटेलांत सगळीकडे मिळते. मी पुण्याहून नगरला, सातार्याला आणि सोलापूरला जाताना/येताना खाल्ला आहे हा 'विठ्ठल बटाटा वडा'... त्याला स्पेसिफिकली 'विठ्ठल बटाटा वडा' एवढे लांबलचक नाव देण्यामागे, कदाचित 'विठ्ठलवडा' हे नाव अश्लीलतेच्या जवळ जाते हे एक कारण असावे. ;-)
ही पहा ती घनाकृती वरिजनल
ही पहा ती घनाकृती वरिजनल नानकटाई.
आता पॅकिंग लुक मॉडर्न झालाय. जुन्या बेसिक एका रंगातला लोगो आणि पिशवीत पॅक केलेली बासुंदी हा नॉस्टॅल्जियाचा विषय आहे.
जनरली द.प.महाराष्ट्रातल्या
जनरली द.प.महाराष्ट्रातल्या मुख्य बसस्टँडांवर नक्कीच.
पण आमचं सगळं जुनं. जुनी माहिती, जुन्या आठवणी. आऊटडेटेड झालं असू शकेल.
शेवटचं यळगूड दूध कोल्ड्रिंक कोल्लापूर स्टँड एण्ट्रन्सजवळच्या सुप्रसिद्ध छोट्या लाकडी पोष्टॉफिससदृश खिडकीतून दहा वर्षांपूर्वी प्यायलं.
जंगल जिलेबी
आमच्या प्रभातफेरीच्या मार्गावर वड,पिंपळ,कडुलिंब,चिंच,बहावा,गुलमोहोर अशा अनेक वृक्षांसह चिचबिलाई उर्फ विलायती चिंचेच्या झाडांची रेलचेल आहे.या रानमेव्याला हिंदीत "जंगल जिलेबी" असे मजेशीर नांव असल्याचं नुकतंच कळलं.
जंगल जिलेबी आवडत असली तरी, आवडत्या आणि हादडता येणाऱ्या फळांमध्ये तिचा समावेश होत नाही. जांभूळ किंवा सुपारी जशी घशात अडकते आणि जीव जातो की काय असा तोठरा बसतो तसंच चिचबिलाईचे दुसरेच अर्धवर्तुळ घशाखाली उतरत नाही असा आजवरचा अनुभव आहे.बाजारात प्रथमच या रानमेव्याचं दर्शन झाल्यावर भुरळ पडून हौसेने आणला तरी तो संपवण कष्टप्रद असतं .त्यामुळे या झाडांची रेलचेल असूनही थोडासा प्रयत्न केल्यास ताजा जिलब्यांचा मोसमी खजिना आपल्याला फुकट उपलब्ध आहे हा विचार कधी मनाला शिवला नव्हता. मागच्या महिन्यात, मंगल प्रभाती एका सुफलीत वृक्षाखालून जाताना, अवचित एक बाळसेदार ,गोंडस जिलेबी टपकली. उकलून बघताच शुभ्र ,गुटगुटीत गरावर एका बाजूला गुलाबी रेषांची जाळी, मोहजाल पसरवून मला खुळावत होती. तोंडात टाकताच रसाळ,मधुर आणि दळदार गराचा स्वाद जिभेवर झिरपत गेला आणि अकल्पित आनंदाची पर्वणी जाहली.
तेंव्हापासून प्रभातफेरीतली १५/२० मिनिटं रोज झाडं पिंजून, जिलब्या हेरून काठीने किंवा हाताने तोडून तर कधी श्रीयुत जोशी जीवावर उदार होऊन कंपाउंडच्या भिंतीवर चढून काढायचे. घरी येईपर्यंत त्यातल्या अर्ध्या चिंचा दोघांनी फस्त करायच्या हा आमचा गेला महिनाभराचा जोडधंदा झाला होता.हेरलेल्या झाडापैकी दोनच झाडाच्या जिलेब्या मधुर जीवनरसाने ओतप्रोत होत्या बाकीच्यांचा गर कोरडा ,सेमी तुरट आणि अलिप्त होता.
जंगल जिलब्यांचा मौसम आता संपल्यात जमा आहे. काल आशाळभूतासारखे आम्ही झाडाकडे पहात होतो तेंव्हा एक निवांत पोपट जिलबी खात बसला होता. घ्या मेल्यांनो, म्हणून त्याने एक टपोरी जिलबी आमच्याकडे फेकली हो शप्पथ !
चिचबिलाई आणि जंगल जिलेबी ही
चिचबिलाई आणि जंगल जिलेबी ही नावं छान आहेत- माझ्यासाठी नवीन. इंग्लिश इमलीचे (असं आम्ही म्हणायचो याच चिंचेला) झाड शाळेत होतं आणि या मेव्यासाठी तिथे सगळ्यात आधी पोहोचून चिंच मिळवायची स्पर्धाच असायची. गेल्याच वीकएंडला पुण्यात कँपात याचं एक झाड चिंचांनी लगडलेलं पाहिलं.
चिंचांचा मोसम गेला म्हणता तर तुतीचे झाड हेरा- सध्या त्याचा सीझन चालू आहे.
हम्म्म्म्...
का कोण जाणे, पण यात तो डोसा आणि ते चिकन ६५, दोहोंचाही सत्यानाश होईल असे वाटते.
(कदाचित डोशाऐवजी इथियोपियन इंजेरावर खपून जाईलही, कोण जाणे. पण तरीही ते काहीसे अगेन्ष्ट न्याचरल ऑर्डर जाईल, असे वाटते. बहुधा मनात पक्के बसलेले सांस्कृतिक संकेत आड येत असावेत. कदाचित इंजेर्याला इंजेरा (किंवा डोशाला डोसा) आणि चिकन ६५ला चिकन ६५ न म्हणता दोहोंना काही वेगळ्या नावाने संबोधून हे काँबिनेशन दिले, तर खपेलसुद्धा. पण डोशावर फक्त तो बटाट्याच्या भाजीचा लगदाच पडू शकतो, हे जे काही चित्र डोक्यात फिट्ट बसलेले आहे, ते सुखासुखी असा कशाचाही स्वीकार करू देत नाही. (तरी बरे, मी शक्यतो सादा डोसाच खातो.))
चिकन ६५ डोसा! उद्या आमरसभात म्हणाल. परवा श्रीखंडपाव. तेरवा... जाऊद्या!
असतीलही.
असतीलही. आणि असोत बापडे. मला ती कल्पना झेपत नाही, एवढेच.
(फॉर द्याट म्याटर, चिकन डोसा एकदा - एकदाच! - खाल्ला आहे. झेपला नव्हता, एवढेच आठवते. असो.)
ता. क.:
अंडा डोसा (पिठातच अंडे फोडून घालणे)
प्यानकेक, व्याफलाच्या ब्याटरात अंडे असतेच. त्याबद्दल अडचण नाही. पण तेच अंडे डोशाच्या ब्याटरात घालण्याची कल्पना (कोठेतरी प्रचलित असली तरीही) करवत नाही.
ता. ता. क.:
केरळात चिकनामटनाबीफाबरोबर आप्पे खातात, ते चांगले लागतात. पण डोशात चिकन गुंडाळण्याची कल्पना का कोण जाणे, पण कशीशीच वाटते.
डोक्यात फिट्ट
पण डोशावर फक्त तो बटाट्याच्या भाजीचा लगदाच पडू शकतो, हे जे काही चित्र डोक्यात फिट्ट बसलेले आहे, ते सुखासुखी असा कशाचाही स्वीकार करू देत नाही.
बरोबर!
याला कारणीभूत दोन जमाती - तामिळ्नाडूतील द्रावीडी चळवळीमुळे महाराष्ट्रात आलेले शुद्ध शाकाहारी तामिळी ब्राह्मण आणि ठिकठिकाणी शुद्ध शाकाहारी खानावळी उभारलेले उडपीकर शेट्टी!! (उडपीकर स्वतः मांसाहारी बर्रका!)
त्यामुळे जोवर दक्षिणेतील अन्य समाजाशी संबंध येत नाही तोवर सर्वसाधारण मराठी मंडळींना दक्षिणी म्हणजे शाकाहारी असाच समज डोक्यात फिट्ट असतो.
बाकी कोकणात डोसासदृश असलेली आंबोळी मांसाहारी पदार्थासमवेत खायची प्रथा आहेच!
पिंपळे सौदागर(पुणे
पिंपळे सौदागर(पुणे�) भागात मी जावईबापू सुशीला कांदापोहे अशी पाटी असलेली खाण्याची गाडी पाहिली. बंगळूरू मधील पारंपारिक खाद्यसंस्कृती बद्दलही लिहिले आहे.
योगर्ट आईस्क्रीम
योगर्ट आईस्क्रीम विथ शुगरकोटेड क्रश्ड आमंड्स टॉपिंग
हा सगळ्यात छोटा कप होता. यावर वेगवेगळे नटस किंवा कुकीज सॉस, चॉको सॉस इ. टॉपिंग्ज्स मिळतात.
याहून मोठे कप्स आहेत त्यावर याशिवाय वेगवेगळी फ्रुट्स घेता येतात. उदा. पीच, स्ट्रॉबेरी .. इ.
कॉम्बिनेशन आपण सिलेक्ट करायचं.
नाशिकचा 'श्रीकृष्ण' वडापाव
नाशिकचा 'श्रीकृष्ण' वडापाव देखील फार 'वर्ल्ड फेमस' वगैरे होता एकेकाळी, हा तोच असावा का असं क्षणिक वाटलं. पण एवढ्यात त्या वडापावला नाशाकातच फार चांगले दिवस नाहीत असं ऐकून आहे.
वडा(पाव) म्हंटलं की बालगंधर्वचा आधी डोळ्यासमोर येतो आणि आमच्या गरवारे कालेज समोरील बिपीनचा.
ह्या बिपीन स्नॅक्स शेजारीच तशीच टपरीवजा 'प्रभाकर' नावाची छोटेखानी बेकरी होती, तिथे 'अंडा-बन-मस्का' मिळायचं. उकडलेल्या दोन अंड्याच्या फोडी बन-मस्क्यात पसरवून त्यावर तिखट-मीठ भुरभूरलेलं असायचं. स्वस्तात मस्त प्रकार होता तो. आमच्या सारख्या बॅचलर्स भुक्कडांना तर पौष्टीक परवणीच होती ती :)
(जरा जास्त पैसे खर्चायची हौस-कम-खाज असली की समोरच्या 'पॅरा'मधले इराणी मस्के-वजा पदार्थ हदडायचो...शिवाय'शिग्रेटीचा वास'आणि धुकेबाज रोमँटीक अँबियन्स येकदम कॉम्प्लीमेंट्री)
मी पण 'पॅरा'चा रेग्युलर
मी पण 'पॅरा'चा रेग्युलर ग्राहक होतो. (माझ्या माहितीप्रमाणे ढेरेशास्त्रीही होते.)
धुराचे ढग, रंग ओळखता न येणार्या भिंती, कोणाच्याही टेबलावर रँडमली जाऊन बसणे, कितीही दंगा केला तरी कोणाला त्रास न होणे, हिशोब जमवत बसलेले रेल्वे बुकिंग एजंट, दाढ्यांचे खुंट वाढलेले वेटर/मालक ... कहर प्रकार आहे पॅरा.
Prabhakar was hot.... so hot
Prabhakar was hot.... so hot that माझ्या एका मित्राने त्याच्या would be girl friend ला पहिल्यांदा बाहेर नेताना lets meet at Prabhakar असे आमंत्रण दिले होते.( हा भोटम पणा ऐकून आम्ही उर्वरित गडबडा लोळलो होतो ) paradise चे वातावरण रोमँटिक वाटणारे आपणच प्रथम... आणि एकटेच बहुधा :)
सनराइज ते पॅराडाइज
>>जरा जास्त पैसे खर्चायची हौस-कम-खाज असली की समोरच्या 'पॅरा'मधले इराणी मस्के-वजा पदार्थ हदडायचो...शिवाय'शिग्रेटीचा वास'आणि धुकेबाज रोमँटीक अँबियन्स येकदम कॉम्प्लीमेंट्री
पॅराडाइजमध्ये अनेकदा गेलेलो आहे. सिगारेटपिते मित्र बरोबर असतात तेव्हा जायची वेळ मुख्यतः येते. पूर्वी डेक्कनवर सनराइज (उच्चभ्रू), गुडलक (मध्यम) आणि लकी (निम्न) अशी इराण्यांची प्रतवारी असे. (शिवाय लकडी पूल ओलांडला की रीगल) ह्या सर्वच ठिकाणी सिगारेटी चालत असत. त्यामुळे मित्र प्रतवारीनुसार निवड करत. आता सनराइज-लकी बंद पडले, रीगल इराणी राहिलंच नाही आणि गुडलकमध्ये फारच फॅशनेबल टोणग्या-टोणगींची गर्दी असते त्यामुळे चिक्कार वेळ बसून गप्पा मारण्यासाठी पॅराडाइज हा एकमेव पर्याय आहे.
Sunrise च्या मालकाचं kp मधे
Sunrise च्या मालकाचं kp मधे abc फार्मस च्या आवारात shisha cafe बऱ्याच वर्षापासून आहे. ऊत्तम मेनू. आणि योग्य दिवशी तिथे असाल तर एखादा live जॅझ परफॉर्मन्स )!!! लै भारी. ( सध्या चालू आहे का नाही ते माहित नाही पण काही काळापूर्वीपर्यंत पुणे जॅझ अँड blues क्लब तिथून चालायचा )
पुण्यातल्या माश्यांच्या खानावळी
निसर्ग, फिश करी अँड राईस किंवा मासेमारी यांच्या अतिकिमती आणि तेवढ्याच फालतू जेवणाला शह देणार्या खानावळी कोणत्या?
१) आयम लायन (बावधन) अतिशय लिमिटेड सिट्स आणि दर्जेदार खाणं. सोलकढी अप्रतिम. (किमती खूप वाजवी मात्र नाहीत, पण मोजलेल्या पैशांच्या लायकीचं चांगलं नॉनव्हे़ज नक्कीच खायला मिळतं).
२) मे बी सत्कार, सिंहगड रोड?
३) मालवणी गजाली (बाणेर रोड) : अजिबात फिरकू नका.
कलिंगा केव्हाही छान आहे त्या
कलिंगा केव्हाही छान आहे त्या निसर्गपेक्षा. निसर्गचा एवढा उदोउदो का असतो हे एक कोडंच आहे.
'आय अॅम लायन' बद्दल मी ही एवढ्यात बरेच चांगले रिव्हू ऐकून आहे, जावेच एकदा.
कोथरुडचं 'फिश ओ फिश' आणि बाणेर-पाषाण लिंक रोडवरचं 'सॅफरन' दोन्ही फिश-डिशेससाठी चांगले आहे असे ऐकून आहे, पण अजून जाणे झाले नाही.
ठाण्यातील लुईस-वाडीतल्या 'हेमंत-स्नॅक्स' मधे जे मासे (मासे-थाळी) मिळतात, ते केवळ लाजवाब :P...
रास्ता कॅफे!
गेल्या शनिवारी बाणेर-रोडच्या 'रास्ता कॅफे' मधे जाणं झालं. फारच मस्त अनुभव.
अॅम्बीयन्स टिपीकल युरोपियन कॅफेज मधे असतो तसा आहे, आजू बाजुने आणि मधे झाडं आणि त्यामधे टेबल्स. म्युझिक आवाजाने 'लाऊड' म्हणावं असं होतं पण लावलेली गाणी कर्णकर्कश्श नव्हती त्यामुळे ते चालून गेलं. कंपाऊंडच्या भींतीवर ट्रायबल चित्रे (फार रंगरंगोटी न करता काढलेली) आकर्षक होती.
मुळ-मुद्दा जेवण :) ते चविष्टच होतं. थाई करी, चिंच-मिरची मधे ग्रिल्ड केलेले पनीर, ग्रिल्ड कॉटेज-चि़झ -कोथिंबीर रॅप्स आणि ह्या सगळ्यावर कडी म्हणजे 'पेस्तो पिझ्झा' - अफलातून होता पिझ्झा, कमालिचा थिन-क्रस्ट. मॉकटॅल्स ही छान - आमची मॉकटेलची चोखंदळ पिदाडी पाहून त्यांनी एक मो़कटेल ट्राय करायला दिलं -काँम्प्लीमेंट्री :)
त्यांची खासियत म्हणजे बहुतेक सर्व ग्रिल्ड, रोस्टेड पदार्थ हे 'क्ले-ओव्हन/मातिच्या भट्टीत' बनवलेले असतात. त्यामुळेच तो पिझ्झा आणि ते ग्रिल्ड पनिर अफलातून होतं. शिवाय 'याना' मधे मिळणार्या 'चिझ गार्लिक ब्रेड' नंतर प्रथमच तेवढंच उत्तम गार्लिक ब्रेड मिळालं :)
त्या क्ले-ओव्हन चा फोटो - अंजावरून साभार. हे क्ले-ओव्हन अगदी मधोमध आहे त्यामूळे त्या थंडगार खुल्यावातावरणात एक मस्त उब जाणवत होती :)

नाही, रास्ता कॅफे असंच आहे
नाही, रास्ता कॅफे असंच आहे नाव. इंग्रजीमधे ते Raasta Cafe असं आहे. "R" नंतर दोन "a" असल्याने सापडलं नसावं तुम्हाला.
ही झोमॅटॉची लिंक https://www.zomato.com/pune/raasta-cafe-baner
अध्यात्मका ! (मधुमका )
पावसाळा आणि मक्याची कणसं यांचं उबदार नातं आहे.बाहेर झिरमिर पाउस पडतो आहे ,वातावरणात आल्हादक गारवा आहे अशावेळी शेगडीवर भाजलेली मक्याची कोवळी कणसं, तूप- मीठ आणि कधी लिंबू लावून खाणे सुखदायक आहे.आता हातगाड्यांवर सर्रास मिळणारी तिखटमीठ, (अ)चाट मसाले आणि अमूल बटर लावलेली कणसं खाणे मला जमत नाही.मक्याचे वडे, उपमा किंवा कटलेट हे क्वचितच होणारे खटाटोपाचे पदार्थ फारच चवदार लागतात. ( पण इतके कष्ट कोण करेल प्रभो ! ) कधीतरी हॉटेलात खाल्लेल्या मिक्स भाजीत आढळलेल्या बेबी कॉर्नची चव किंवा स्वीट कॉर्न सूप मधून स्वीट कॉर्नचा स्वाद वेगळ्याने कळत नाही.मक्केकी रोटी हा खुसखुशीत प्रकार मस्त लागतो.बऱ्याच पदार्थात कॉर्न फ्लोर गुप्त रुपात वावरतो हे ज्ञान यथावकाश प्राप्त झालं शिवाय चीनी लोकं सर्वात्मका खातात असे पु.लंनी सांगून ठेवलंच आहे.असा मर्यादित मकानुभाव असूनही मधुमक्याबद्दल कुतूहल होतं आणि त्याने माझ्या स्वयंपाकघरात अजून प्रवेश केला नव्हता.
मधुमका हा गोग्गोड शब्द गेल्या काही वर्षात अनेक वेळा वाचनात येऊनही हे नक्की काय प्रकरण आहे याची कल्पना नव्हती.आता विविध एक्झोटिक भाज्या आणि फळे नागपुरातही मिळू लागल्याने स्वीट कॉर्न म्हणजेच मधुमका याचा शोध लागून अकस्मात ज्ञानदीप प्रज्वलित झाला.सात किंवा आठ वर्षांपूर्वी प्रथमच बाजारातून स्वीट कॉर्नची २ कणसं विकत आणली. अनेक मुलायम पडदे दूर केल्यावर तलम, रेशमी केसर पांघरलेले टप्पोरे ,रसभरीत ,लोभस ,पिवळे दाणे शिस्तीत दाटून बसलेले दिसले.जाळपोळ करून त्यांना गॅसवर भाजून काढावेसे वाटेना म्हणून २/३ मिनिटे मायक्रोव्हेवमधून काढले आणि वाफाळत्या कणसाला तूप -मीठ लावून खायचे दात रुतवले.दाणे चावताना क्रंची मंची मंजुळ नाद येऊ लागला. रसाळ दाण्यातून दाट,सुमधुर दुधाचे चिमुकले घट माझ्या जिभेवर झिरपू लागले आणि चित्तशुद्ध होऊन अद्ध्यात्मिक आनंदाची अनुभूती जाहली.अवघे कणीस संपेपर्यंत मी निर्वाणाला पोहोचले होते.साध्या मक्याच्या कणसाबद्दल तात्काळ विरक्तीची भावना दाटून आली. वरणभाताशिवाय इतका सोज्वळ,सात्विक ,निष्पाप असा अन्य पदार्थ खाल्ल्याचे मला आठवत नाही.साध्या कणसापेक्षा मोठे असल्याने एक कणीस खाऊन पोट भरले आणि तृप्तीची ,समाधानाची जाणीव फक्त उरली.
स्वीट कॉर्न उर्फ मधुमक्याचे दाणे काढणे सोपे आहे.हे दाणे घालून उपमा,पोहे अतिशय रुचकर लागतात.गाजर आणि फ्रेंच बीन्सच्या शेंगा घालून चविष्ट स्वीट कॉर्न सूप सुद्धा करता येते.
लोकहो ,खरं सांगू का हे पदार्थ छान लागत असले तरी तूप -मीठ लावलेले वाफाळते कणीस म्हणजे साक्षात झेन ! अध्यात्मिक अनुभूतीमुळे जीवनात आनंदाचे डोही आनंद तरंग !
क्रीमरोल हा पदार्थ मला आवडतो,
क्रीमरोल हा पदार्थ मला आवडतो, परंतु तो नेहमी असा फ्लेकी-खुसखुशीतच असतो असे वाटलेले तोवर क्यांपात हुसेनी बेकरीत महिन्याभरापूर्वी मऊ क्रीमरोल खाण्याचा सुखद योग आला. एक पीस वट्ट सहा रुपये फक्त! आणि आत क्रीमची कंजूषीही आजिबात नाही. एमजी रोडला प्यारलल रोडमध्ये कसा कोणजाणे अवचित घुसलो आणि भुकेची आठवण आली तशी योगायोगाने ही बेकरी समोर उभी ठाकली. दणदणीत शिफारस क्रीमरोलप्रेमींना.
बाकीचेही बरेच पदार्थ होते पण मी फक्त क्रीमरोलच खाल्ला म्हणून त्याची शिफारस इतकेच.
आमचं विस्कॉन्सिन अनेक
आमचं विस्कॉन्सिन अनेक गोष्टींकरता प्रसिद्ध आहे - चीझ, हार्ले-डेव्हिडसन , बीअर.
पैकी परवा ४/५ प्रकारची चीझेस विकत घेतली. काल पोळीच्या मध्ये किसून एक चीझ घातले. फेंट चव आली. मुळातच त्याला खूप फेंट चव होती आणि म्हणूनच ते निवडले होते.
हनी-सिराचा चीझ ला तिखट चव आहे. ते निवडले नाही.
द हेग खाद्यभ्रमंती-१
पॅलेइस नोर्ड आइंडं नामक राजवाड्यापासून जवळच एक "इस्तंबूल रेस्टॉरंट" नामक तुर्की हाटेल आहे. तिथे खालील पदार्थ गेले काही दिवस रिपीट मोडवर हादडले:
व्हेजिटेरियन लह्मजुन (उच्चारी लॅह्माजुन, मेनूत "तुर्किश पिझ्झा".)
चिकन घालून लह्मजुन
बकलावा
अतिउत्तम.
डेन हाख सेंट्रालपासून जवळच एक 'लक्सर' नामक इजिप्शियन हाटेल आहे तिथे डोनर विथ एक्स्ट्रा पिटा प्लस त्यांचे सॉसेस इ. मस्त.
अॅम्स्टरडॅममध्ये इथिओपियन जेवण. चिकन-चीज एकत्रवाली एक डिश (विथ टेंडर लेगपिसेस), अंडे ग्रेव्हीवाली दुसरी डिश, बटाटा विथ बीन्स तिसरी डिश, घासफूस आणि इंजेरा नामक आंबोळी. आंबोळी जरा जास्तच आंबटढाण होती हे एक सोडल्यास अतिउत्तम.
चीजः नेहमीचे डच चीज (६ महिने वय), जिरा फ्लेवर्ड चीज आणि शेळीच्या दूधवाले महात्मा गांधी चीज. गांधी चीजसोबत पिस्ते इ. घातलेले सलाड मौजे एन्स्खेडे मुक्कामी चाखले. अप्रतिम.
ब्रेडः आर्टिझनल ब्राऊन ब्रेड २ च खाल्ले, आवडले पण अजून व्हरायटी ट्राय केली नाही.
फळे: स्ट्रॉबेर्या भारतातल्यापेक्षा चांगल्या वाटल्या. प्लम उत्तम, ग्रॅनी स्मिथ सफरचंदही छानच, रेड करंट नामक फळे लालबुंद परंतु आंबटढाण त्यामुळे सँडविचात खायला छान.
उत्तेजक पेयः जिंजर एल हे पेय जाम आवडले...
सद्या
आमच्या शहरातील एका केरळी रेस्तराँत ओणम पेश्शल 'सद्या' हादडायचा आज योग आला. एरवी तिकडे गेलो की न चुकता तळलेली माशाची तुकडी आणि अप्पम् मागवलं जातं, पण आजचा बेत संपूर्ण शाकाहारी होता. भौगोलिक साधर्म्यामुळे अर्थातच कोकणी पद्धतीच्या शाकाहारी जेवणाशी भरपूर साधर्म्य होतं.
आधी केळीचं आडवं पान मांडलं गेलं. मग मीठ, केळ्याचे वेफर्स, वेलची केळं, तर्हेतर्हेच्या चटण्या-लोणची, एक खाज्यासारखा तोंडीलावण्याचा प्रकार (शर्करा उप्पेरी), पापड, काकडीची कोशिंबिर, अननस आणि इतर दोन प्रकारच्या पचडी असले ज्युनिअर खेळाडू आले. तदनंतर केरळी अवियल, केळफुलाची भाजी, भोपळ्याची भाजी, कोबीची सढळ हस्ते खोबरं घातलेली भाजी, चवळीची एक निराळ्या प्रकारची उसळ, आंब्याची दह्यातली भाजी असा जामानिमा आला. थेट अनसाफणसाच्या भाजीची याद दिलवणारीही एक भाजी होती, मात्र फणसाशिवाय (हाय रे कर्मा!). यातून मोकळ्या राहिलेल्या जागेत पेजेच्या तांदळासारख्या जाड भाताचा ढीग आणि सांबार येऊन विसावले.
साधारण ताट असं दिसत होतं. (फोटो इंटरनेटवरून. दुवा)

पाहताना भाऊगर्दी वाटत असली तरी, प्रत्येक पदार्थाला न्याय देण्याइतपत तुम्ही उदरमतवादी असलात की झालं! :)
यानंतर तीन प्रकारची पायसम् आली. एक तर थेट मनगणंच होतं, दुसरं तांदळाच्या खिरीसारखं आणि तिसरं जाड गव्हाचं. तिन्ही खासच. दुर्दैवाने वर्षातून एकदाच ओणम येतो.
banquet
विकीवरूनः
Sadhya (Malayalam: സദ്യ, Sanskrit: सग्धिः, Sagdhiḥ) is a variety of pure vegetarian dishes traditionally served on a banana leaf in Kerala, India.[1] Sadhya means banquet in Malayalam. It is a feast prepared mainly by men, especially when needed in large quantities, for weddings and other special events.
During a traditional Sadhya celebration people are seated cross-legged on mats. Food is eaten with the right hand, without cutlery. The fingers are cupped to form a ladle. A normal Sadhya can have about 24-28 dishes served as a single course. In cases where it is a much larger one it can have over 64 items in a Sadya like the Sadya for Aranmula Boatrace (Valla Sadhya)
बाकी अशीच गुजराती/राजस्थानी/काठियावाडी थाळी परिचित आहेच; तसाच हा काश्मिरी प्रकारः https://en.wikipedia.org/wiki/Wazwan

फुल्ल आफ्रिकन क्विझिनचं
फुल्ल आफ्रिकन क्विझिनचं अद्याप महीत नही, पण पॉप टेट्सचा आफ्रिकानो फिश, आफ्रिकानो चिकन आणि वेज आफ्रिकानो हे 'आफ्र'लातून टेस्टी असतात.