नंदा खरे, "उद्या"

उद्या नंदा खरे

'उद्या'चं चित्र

लेखिका - रोचना

अलीकडेच नंदा खऱ्यांची 'उद्या' ही कादंबरी वाचली. या कादंबरीचं 'डिस्टोपियन नॉवेल' असं वर्णन ऐकलं होतं. म्हणजेच, भविष्यकालाच्या गंभीर चित्रणातून जागतिक पातळीवर झपाट्याने होत असलेल्या सामाजिक, तांत्रिक, आर्थिक बदलांच्या दिशेवर तीव्र टीका. पण कादंबरीत प्रलयकथेसोबत युटोपियादेखील आहे. लेखक सध्याच्या मानवी संस्कृतीच्या घातक गतिमार्गाला आशावादी पर्यायही सुचवतो. या लेखात, कादंबरीत रेखाटलेल्या या व्यापक चित्राबद्दल, त्यातील शक्यतांबद्दल सुचलेले काही विचार, काही प्रश्न नोंदवले आहेत. याला समीक्षा किंवा परीक्षण म्हणण्यापेक्षा समविचारी पातळीवरून एका वाचकाने लेखकाशी घातलेला वाद, असं म्हणणं इष्ट होईल.

नजीकच्या भविष्यकाळातलं एक मोठं, वैश्विक पातळीवरचं साम्राज्यवादी जाळं हे या कादंबरीचं मुख्य पात्र आहे. या जाळ्यात जितक्या तांत्रिक सुखसोयी उपलब्ध आहेत, तितकीच तांत्रिक पातळीवर लोकांवर पाळत ठेवली जात आहे. प्रचंड सर्वेलन्स आहे. सर्वत्र क्यामेरे आहेत, चेहऱ्यांवरचे बारीक हावभाव ओळखण्याचं सॉफ्टवेअर आहे. 'अस्तित्व कार्डा'सारख्या तांत्रिक सेवांतून जीवनाचं, अस्तित्वाचं प्रचंड केंद्रीकरण, एकीकरण झालं आहे, आणि जीवनातला खाजगीपणा नष्ट झालेला आहे. संभाषण, देवाण-घेवाण, आणि एकूण वावर हे सगळं क्यामेऱ्यांना लक्षात घेऊनच करावं लागतं. साहजिकच, उच्च अधिकारी व श्रीमंतांसाठी 'क्यामेराफ्री' ठिकाणं मिळवणं हे एलीटपणाचं एक नवीन लक्षण होऊन बसलं आहे. सर्वेलन्स दैनंदिन जीवनात किती मुरलाय याचं वर्णन कादंबरीत काही ठिकाणी अगदी सहज आलं आहे, तर काही ठिकाणी थोडं ओढून-ताणून केल्यासारखं वाटतं. राज्यव्यवस्था आणि भांडवलदारांची म्हणावी तर स्वतंत्र वर्तुळं आणि उतरंडी आहेत, पण त्यांच्यातली रेषा धूसर आहे. त्यांच्यात एक 'रिवॉल्विंग डोर' आहे, म्हणजे लोकशाही तत्त्वाला धरून एकमेकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तयार केलेल्या पदांवर एकाच छोट्या, सत्ताधारी वर्तुळातली तीच तीच माणसं आलटून-पालटून बसतात. चेक्स ॲन्ड बॅलन्सच्या नियंत्रणप्रक्रियेला ते निरर्थक ठरवतात. राज्य कुठे संपतं आणि कॉर्पोरेशन कुठे सुरू होते, हे सांगणं अशक्य झालं आहे. तीच परिस्थिती संरक्षणव्यवस्था आणि सर्वेलन्स मधली. आम जनतेला पोलिसांकडून संरक्षण कमी, आणि तिच्यावर पाळत ठेवणं जास्त.


या सगळ्यात मुलींचं 'हंटिंग' होत असतं. स्त्रियांचं प्रमाण बरंच घटलेलं आहे, आणि ठिकठिकाणी श्रीमंतांना बायका-सुना-वेश्या म्हणून मुली पुरवण्यासाठी अनेक राजकीय दलं आणि अधिकारी गुंतलेले आहेत. पण सिस्टिमवर 'भरोसा' ठेवल्याशिवाय गत्यंतरही नाही, त्याशिवाय 'विकास' होणारच नाही असा कन्सेन्सस आहे. आणि म्हणूनच, या विश्वातल्या सर्वात मोठ्या कंपन्यांची नावं 'भरोसा' (ज्याला इंग्रजीत 'रिलायन्स' असा शब्द आहे) आणि 'विकास' अशी आहेत. वरील व्यापक चित्र विलक्षण जिवंत, बहुपेडी पात्रांतून उभं राहिलं आहे. वेगवेगळ्या प्रकरणांतून निरनिराळ्या पातळ्यांवर, खेड्यांपासून महानगरांपर्यंत, सगळेच समाजातले घटक या जाळ्यात कसे अडकले आहेत हे खऱ्यांनी कमालीच्या तपशिलात मांडलं आहे. किंबहुना त्या जाळ्याचं सर्वत्र प्रचंड आकर्षण आहे, शालेय शिक्षणापासून नोकरीपर्यंत मूल्यवृद्धीच्या मोहातून हे जाळंच आपलं ध्येय आहे असं मुलामुलींवर ठासवलं जात आहे. या स्वतंत्र प्रकरणात टिपलेली सामाजिक वर्तुळं, त्यांच्यातील व्यक्तिसंबंध आणि वातावरण, दैनंदिन जीवनाच्या छोट्या छोट्या बाबी खऱ्यांच्या बारीक निरीक्षणक्षमतेच्या द्योतक आहेत, आणि सर्वच स्वतंत्र लेखाचा विषय ठराव्यात अशा आहेत.

कथानकाची सुरुवात मुंबईकर लेखनिक-अनुवादक सुदीप जोशीच्या कथेने होते. महानगराच्या माणसांच्या लोंढ्यामधला हा एक सुशिक्षित, पांढरपेशा कामगार. त्याला तसं खाजगी जीवन नाहीच; पण त्याचं 'अस्तित्व' कार्ड हरवल्यावर खरोखरच त्याचं अस्तित्व डळमळल्यासारखं होतं, आणि आश्रयासाठी तो एका शिवसेनाछाप राजकीय दलात सामील होतो. विदर्भातल्या तिनखेडा गावात भाकरे गुरुजी कॉलेजच्या पोरापोरींना उच्चशिक्षणाचे, नोकरीच्या चांगल्या संधींची ओळख करून देत असतात. आपल्या मुलामुलींसाठी भाकरे गुरुजी बौद्धिक आणि मानसिक आधार आहेत. दुसरीकडे, हैदराबादकडे उच्चपदावरचे सरकारी सनदी अधिकारी जोडपं अनू आणि अरुण सन्मार्गी यशस्वी आणि सुखी आहेत - अनू कायम आंतरराष्ट्रीय दौऱ्यांवर, आणि अरुण 'एक्सप्रेशन रेकग्निशन' या नवीन तंत्रासाठी नावाजलेला. सानिका धुरू दिल्लीतली एक धाडसी पत्रकार, जी एक 'हटके' स्टोरी करण्यासाठी विदर्भाच्या जंगलातल्या एका गावात जाऊन राहते. तिथे ती निराळीच जीवनपद्धती अनुभवते, त्यावर पुस्तक लिहायचा निर्णय घेते. ही काही ठळक पात्रं आणि धागे.

या स्वतंत्र वाटणाऱ्या वर्तुळांमधले ओवरलॅप क्रमाने उलगडत जातात. सगळ्यांनाच अरुण सन्मार्गीचा मुलगा संजय गाठतो तसं, उच्च सनदी सेवा, अथवा मोठ्या कॉर्पोरेट पद गाठायचंय. पण बहुतेक जण सुदीप जोशीच्या किरकोळ चाकरीच्या लेव्हललाच अडकतात. ज्यात प्रथमदर्शनी संधीचा भास होतो, त्याच संधी शेवटी जागच्या जागी लोकांना ठेचतात. उदाहरणार्थ, नितीन भक्ते सारखा तिनखेड्यातला प्रतिभावंत इनोवेटर स्वतःला मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपनीशी जोडून घेतो, पण या नात्याबरोबर त्याची प्रतिभा आणि स्वायत्तता जुळवणं त्याच्यासाठी जीवघेणं ठरतं. आत्महत्यांचं प्रमाण वाढत जातं. हळूहळू सगळ्यांचीच स्वप्नं, स्वत:साठी आखून ठेवलेले यशाचे मार्ग, विस्कटू लागतात, व्यवस्थेवर ठेवलेला विश्वास ढळमळतो. कथानकातले निराळे धागे क्रमाने एकत्र आणण्याची शैली उत्कंठावर्धक आहे, आणि तिचा हिंसक उत्कर्षबिंदू विदर्भातल्या जंगलात घडतो. अत्यंत परिणामकारक शेवटातून आशा-निराशा दोन्ही ध्वनित होतात.

या जाळ्यातला सर्वेलन्स, बहुराष्ट्रीय कंपन्यांची अरेरावी, आणि जीवनाच्या एकूण अस्थिरतेविरुद्ध खऱ्यांनी अनेक मूलभूत प्रश्न मांडले आहेत - खऱ्या अर्थाने मुळं धरलेलं, मुक्त आणि स्वावलंबी जीवन म्हणजे नेमकं काय? राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि उत्पादनाच्या संदर्भात त्याचं स्वरूप कसं असावं? अशा स्वावलंबनाचे त्यांनी दोन पर्याय सुचवले आहेत - एक हिंसक नक्षलवादी, आणि एक अहिंसाप्रिय चारगाव कम्यून. त्यापैकी पहिल्याचा फक्त उल्लेख आहे; दुसरा कादंबरीचा केंद्रबिंदू आहे. मला चारगावची मांडणी वाचून अत्यंत उत्साह आणि अस्वस्थता, दोन्ही एकदम जाणवलं. मायकल पोलानच्या अ‍ॅन ओम्निवोर्स डिलेमा मधल्या 'पॉलिफेस फार्म'चं प्रकरण वाचून झालं होतं तसं वाटलं - कमालीची समरसता, कमालीचं कोऑर्डिनेशन, पृथ्वीवर निसर्गाशी आणि अन्य वनजीवनाशी इतक्या आपुलकीने, प्रामाणिकपणे जगणं खरोखर जमण्यासारखं आहे! चारगावात काही मंडळी आधुनिक जीवनाच्या काही सोयी आणि विज्ञान आत्मसात करूनही, सहभागी तत्त्व, शेती आणि शारीरिक श्रमांवर आधारित स्वायत्त जीवन जगायचा प्रामाणिक प्रयत्न करतात. काही जण या प्रकरणाला विलक्षण रोमँटिक म्हणून हिणवतील, पण त्याचं आकर्षणच त्याच्या आशावादात, त्याच्या शक्यतेच्या दाव्यात, आहे. इथे खऱ्यांची लेखनशैलीही मुंबई, हैदराबादमधल्या प्रकरणांपेक्षा संथ होत जाते.

अस्वस्थ होण्याचं मुख्य कारण असं, की चारगावकरांच्या बाहेरच्या जगाशी होणाऱ्या दैनंदिन, किरकोळ अथवा मध्यमस्तरीय संघर्षाची नीटशी कल्पना येत नाही. बाहेर शिकायला गेलेल्या मुलांनी परत न येणं, त्यावरून उठणारे वादविवाद, तंटे, जंगलातल्या जीवनाला उद्भवणारे धोके यांचा धावता उल्लेख आहे. मग लगेच थेट मोन्सागिलसारख्या जागतिक बायोटेक कंपनीशी झालेल्या संघर्षाकडे, आणि मग राज्यव्यवस्थेने कम्यूनवर केलेल्या 'ऑपरेशन'कडे झेप घेतल्यासारखं होतं. मोन्सागिल कंपनी (ही ज्या वेगाने सगळ्या स्थानिक ज्ञानसंपत्तीला गिळंकृत करू पाहते, त्यावरून हिचं नाव मोन्सागीळ हवं!) स्थानिक प्रजातींच्या बियाणांच्या शोधात आहे, तर 'भरोसा कॉर्प'ला तिथल्या जमिनीखालची खनिजं हवी आहेत. चारगावच्या स्वायत्ततेला त्यामुळे मूलभूत धोका आहे, आणि अपेक्षित तेच होतं : डेविड हरतो, गोलायथ जिंकतो. पण चारगावसारख्या असंख्य ग्रामीण समूहांना (ते अगदी आदर्श कम्यून किंवा उडिशातले, वेदांत कॉर्पोरेशनला विरोध करणारे नियमगिरीचे डोंग्री कोंड आदिवासी नसले तरी) कमीजास्त प्रमाणात आज सुप्त आणि सतत शहरी ओढीकडून धोका आहे. इंग्रजी शिक्षण हवं, मग शेती नकोशी किंवा कमीपणाची वाटणं, त्यात नफा न दिसणं, मग गाव लहान वाटणं, पुरेशा संधी नाहीत म्हणून निमशहरांत, मग मोठ्या शहरांत स्थलांतर, मग मुलांना संधी हव्यात म्हणून शहरातच राहणं. वर भारतात हवा तसा अभ्यासक्रम आणि साजेशी नोकरी नाही, म्हणून पश्चिमेकडे स्थलांतर वगैरे आहेच. या जोरदार एकमार्गी प्रवाहाविरुद्ध चारगाव उभं आहे; प्रत्येक क्षणी त्याच्या जोराचा सामना ते कसं करतं? तिथे इलेक्ट्रॉनिक्स बनवण्यासाठी मूल्यवान खनिजं सापडली नसती, 'भरोसा'चं तिथे लक्ष गेलं नसतं, तर चारगाव तसंच कितपत टिकलं असतं? मानवी समाजाच्या परिवर्तनचक्राला चारगावकरांनी कसं तोंड दिलं असतं? अशा समूहांना टिकवायला फक्त समविचारी लोक हवेत, की व्यवस्थेत काही बदल हवा? असे प्रश्न उपस्थित करणं म्हणजे आडवाटेनं या संकल्पनेला रोमँटिक तथा अव्यवहारी म्हणून बाजूला सारायचा प्रयत्न नव्हे. वर म्हटल्याप्रमाणे, ते या संकल्पनेबद्दल, त्यातल्या मानवी संस्कृतीच्या पर्यायी शक्यतांबद्दल आदर आणि आकर्षण असलेल्या दृष्टीकोनातून मांडलेले आहेत.

इथे सरकारी पोलिसांची फौज दारावर येऊन ठेपल्यावर कम्यूनमधल्या नागोदादा आणि दीदीचा संवाद अत्यंत विचारप्रवर्तक आहे. दीदी ही चारगावच्या संरक्षणाची जबाबदारी सांभाळणारी, नक्षलांशी संबंध ठेवणारी, पण दोन हात लांबच. (जाता जाता, नक्षलवादी चारगाववाल्यांना स्वतंत्र जगू देतील हे मला पटलं नाही.) चारगावनेच, अर्थात प्रत्येक स्थानिक समूहाने, स्वत: लढा देऊन आपली स्वायत्तता जपली पाहिजे असं तिचं म्हणणं असतं; राज्यव्यवस्थेचं तर नाहीच, पण नक्षलांचं संरक्षणही तिला नको असतं. पण सशस्त्र असण्याला पर्याय नाही असं तिचं मत. नागोदादांना मात्र चारगावच्या अहिंसक तत्त्वाला जपण्यासाठी जिवाची अंतिम किंमत देणं जास्त पसंत पडतं. शेवटी, कम्यून उद्ध्वस्त झाल्यावर दीदीलाच नवीन वाट शोधणं भाग पडतं - ती स्वतंत्र मार्ग निवडते की नक्षलांमध्ये सामील होते? नवीन वाट शोधणाऱ्यांमध्ये शहरी कारकून सुदीप जोशीदेखील आहे. अनेक कारणांमुळे तो तिनखेड्याजवळ नव्याने शेतकाम शिकायचा प्रयत्न करतो, नव्याने मुळं शोधतो, पण धड शेतकरी ना धड कारकून अशी त्याची दयनीय अवस्था होते. 'भरोशा'च्या उबदार मगरमिठीत गुदमरून, मोठा मानसिक आणि वैयक्तिक धक्का खाऊन, 'यशस्वी' अरुण सन्मार्गीही बाहेर पडतो. तिघं जाळ्याच्या बाहेर पुन्हा अस्तित्वाच्या शोधात निघतात. त्यांचं 'उद्या' काय होईल, याचा विचार लेखक वाचकावर सोडतो. गावाबाहेरच्या पसरत्या काँक्रीटच्या 'प्रगती'चं आणि नाक्याचं वर्णन, चहाचा स्टॉल, थकलेले तीन प्रवासी, आणि जीपखाली चिरडण्यातून जेमतेम वाचलेलं कुत्र्याचं पिल्लू. आज वाचलं, पण उद्या? सगळं दृश्य अगदी माशांसकट डोळ्यासमोर उभं राहतं.

मी त्याच क्षेत्रातली म्हणून की काय, भाकरे गुरुजींचं पात्र विशेष आवडलं. अत्यंत बारीकरित्या, सहृदयतेने रेखाटलेलं पात्र आहे. त्यांच्या अनुभवांतून, वर्‍हाडी भाषेतल्या स्वगतातून शिक्षणपद्धतीची बारीक चाचणी होते. पण भाकरे गुरुजींसारख्या प्रामाणिक आणि जाणत्या शिक्षकांचं आजच्या, सॉरी, उद्याच्या, शिक्षणपद्धतीत नेमकं काय योगदान आहे हे ठरवणं कठीण. त्यांच्या खटाटोपामुळे मुलंमुली याच जाळ्यात अडकतात - हे अपरिहार्य आहे का? का त्यांना खरोखर शिक्षण-नोकरीची व्यवस्था किती जीवघेणी आहे याची पूर्ण कल्पना नाहीये? Is he an allegory for the innocence and hope of education, or just another cog in the wheel - another brick in the wall?

मला प्रथम प्रथम 'उद्या'च्या मुंबईवर्णनापेक्षा सुदीपच्या बारीक भाषावापराने लक्ष वेधून घेतलं, कारण बहुभाषिकता, भाषेच्या बारीक-सारीक जागा ओळखणं, हा लाडका विषय. पण सुदीपचे प्रामाणिक, भाषिक व्यवहार पाहिले तर एक शंका सतत मनात राहते - अजून एका शतकानंतर, अर्थात 'उद्या', सुदीपच्या भाषाप्रभुत्वाची आणि इतक्या मोठ्या अनुवाद-व्यवसायाची गरज तरी काय असेल? की हा व्यवसाय फक्त इंग्रजीकरणाचा असेल - लोकलचं ग्लोबलीकरण करण्यात सगळं एक खिचडीफाइड जागतिक इंग्रजीछाप होणार नाही का? एकूण कादंबरीत भाषेच्या लकबींना इतकं अचूक पकडलं आहे की त्याबद्दल एक स्वतंत्र लेखच व्हावा. मला सगळ्याच बोली, खासकरून भाकरे गुरुजींची, वाचताना खूप मजा आली. पण म्हणूनच खऱ्यांनी ही बहुभाषिक शैली जाणीवपूर्वक, नेमकी का वापरली आहे याबद्दल कुतूहल वाटतं. वैश्विक, आर्थिक-सामाजिक एकीकरणातही भाषेचं वैविध्य कितपत कायम राहतं याचा शोध घेण्यासाठी? की भाषा हा अस्मितेचा मुख्य घटक असूनही, सामाजिक आणि आर्थिक स्वायत्तता जपल्यास ती बहुभाषिक वास्तवही जपू शकते का हे पाहण्यासाठी? भाषा जपण्यासाठी भाषावार प्रांतरचनेची गरज नाही; खऱ्या अर्थाने उत्पादनाची, आर्थिक-स्थानिक स्वायत्तता हवी, मग एकच का, बहुभाषिक वास्तव्यही जपलं जाऊ शकतं, असं काहीसं त्यांना सुचवायचं आहे.

कादंबरीत ठिकठिकाणी काही छोट्या, स्वतंत्र प्रकरणांतून लेखक त्यांचं विवेचन स्पष्ट करतात. यामुळे कादंबरी काहीशी 'एकसुरी' वाटली, तरी ती सध्याच्या आर्थिक-राजकीय व्यवस्थेवर कडक टीका आहे; तेच तिचं ध्येय आहे; त्यातच तिचं यश आहे. एरवी वाचलेल्या डिस्टोपियन कल्पविज्ञान कथांमुळे, आणि सुरुवातीच्या तांत्रिक 'सुधारणां'च्या वर्णनामुळे, तांत्रिक बदलांनी पूर्णपणे परिवर्तित असा भविष्यकाल मला अपेक्षित होता. पण शीर्षकच सुचवतं की हे काही फार पुढचं नाही, तर लवकरच येणारं (किंबहुना बऱ्याच प्रमाणात आत्ताच दिसणारं) दृश्य आहे. पण काही गोष्टी तशाच पाहून थोडा रसभंग होतो: अनू 'उद्या'देखील नवऱ्याचं नाव घेते, सेंट स्टीफन्स उद्याही आघाडीचं कॉलेज आहे, (आत्ताच अशोक युनिव्हर्सिटी सारखे खाजगी पर्याय उच्चस्तरीय दिल्लीकरांसाठी तयार होताहेत), त्या काळात ही लोक ग्रेस, तेंडुलकरच वाचतात, आणि ६०-७०च्या दशकातली गाणी गुणगुणतात. पण ही किरकोळ कुरकुर आहे. सर्वांनी वाचावी अशी ही गंभीर, वाचनीय आणि महत्त्वाची कादंबरी आहे.

नंदा खरे, 'उद्या', मनोविकास प्रकाशन, पुणे, २०१४.

field_vote: 
4.4
Your rating: None Average: 4.4 (5 votes)

प्रतिक्रिया

मी वाचलीतो आहे. किंबहुना त्यातला एखादा भाग वाचून झाला की सरळ बाजूला ठेवतो, आणि शांतपणे तो 'पचवायचा' प्रयत्न करतो. कधी तो भाग परतपरत वाचतो.

झट्दिशी वाचून खट्दिशी तुकडा पाडायची ही कादंबरी नाही.

पण एक मात्र निरीक्षण आहे. नाव "उद्या" असलं तरी त्यात जे आहे तो "आज" आहे. मूल्यवृद्धीची आस सर्वांनाच आहे, मूल्यर्‍हासाची भीतीही. महिकादळ, गवळी सेना आजच्या आहेत. मोन्सागिल (मोन्सॅन्टोवरचा वर्डप्ले), भरोसा (ओळखा पाहू कोण ते?) वगैरे कंपन्या तितक्याच ताकदवान आहेत. 'अस्तित्त्व' कदाचित एवढं ताकदवान झालं नसेल, पण यूआयडीची वाटचाल तिकडेच आहे.

काही दिवसांनंतर उरलेलं लिहीन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

हो, मी ही एकेक प्रकरण हळूहळू पचवत तशीच वाचली. दोन महिने तरी लागले.
तुमच्या दीर्घ प्रतिक्रियेच्या अपेक्षेत! मी अगदी मोजक्या विषयांवर लिहीलंय - कादंबरीतील तंत्रज्ञानाची चर्चा, स्टिग्लिट्ज आणि जनुकिय विवेचन, जंगलातली शेती, भाषा-बोली, या सगळ्या विषयांवर बरेच काही लिहीण्याजोगे, प्रश्न उपस्थित करण्याजोगे आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाव "उद्या" असलं तरी त्यात जे आहे तो "आज" आहे

सहमत.
अजून एक उदाहरण म्हणजे पुस्तकात उद्या दादर चे नामांतर 'दादर- विकास' असे झाले आहे.(विकास कॉर्पॉरेशन वरुन).
आज मुंबई मेट्रो वरील WEH चे Magicbricks WEH झाले आहे.
mweh

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हो, हे आजचेच दृश्य आहे.
कदाचित डिस्टोपिया आणि फँटसी या दोन साहित्यप्रकारांमध्ये हाच फरक असावा - दोन्हीही शुद्ध भविष्यकालाबद्दल नसून "आज"च्या परिस्थितीवरच भाष्य करतात. पण दोन्हींच्या साहित्यिक तपशीलात, मांडणीत फरक असतो. फँटसीत भविष्यकालाच्या / निराळ्या विश्वाच्या निराळेपणाचे तपशीलवार वर्णन असते, त्यातच त्याची साहित्यिक खासियत असते. डिस्टोपियाच्या रेखाटणीत आजच्या जगाच्या नकारात्मक बाबींना अधिक उग्र करून त्यांच्याशी संबंध अधिक प्रखरपण दाखवलेला असतो.

गार्डियन मधला हा लेख वाचला तर अरुण सन्मार्गी आणि गगनच्या विश्वाचेच वर्णन आहे, हे स्पष्ट होते.

The class to which I refer is not rising in angry protest; they are by and large pretty satisfied, pretty contented. Nobody takes road trips to exotic West Virginia to see what the members of this class looks like or how they live; on the contrary, they are the ones for whom such stories are written. This bunch doesn’t have to make do with a comb-over TV mountebank for a leader; for this class, the choices are always pretty good, and this year they happen to be excellent.

They are the comfortable and well-educated mainstay of our modern Democratic party. They are also the grandees of our national media; the architects of our software; the designers of our streets; the high officials of our banking system; the authors of just about every plan to fix social security or fine-tune the Middle East with precision droning. They are, they think, not a class at all but rather the enlightened ones, the people who must be answered to but who need never explain themselves.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला तर भरोसा आणि विकास या कंपन्यापण दिसतात!
Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

समीक्षावजा लेखन फारच आवडलं.

बाकी प्रतिसाद सवडीने.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पुण्य: 2
मी वाचलीतो आहे. किंबहुना त्यातला एखादा भाग वाचून झाला की सरळ बाजूला ठेवतो, आणि शांतपणे तो 'पचवायचा' प्रयत्न करतो. कधी तो भाग परतपरत वाचतो.

झट्दिशी वाचून खट्दिशी तुकडा पाडायची ही कादंबरी नाही.

अगदी सहमत. मला वाचायला जवळ जवळ 3 महिने लागले. आवडली.

माझे आक्षेप भाषेच्या अंगाने आहेत. पण एकूण प्रकरण जितकं छान हाताळलंय, कि मध्येच त्याबद्दल लिहिणं नको वाटतं.

रोचनाचं लेखन आवडलं. आज अधिक चांगल्या लेखांचा वार दिसतोय Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

भाषेच्या अंगाने कसले आक्षेप, जरा खुल के लिहा की!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नंदा खरयांच्या अंताजीची बखर / अंतकालाची बखर किंवा त्या आधीच्या लिखाणा मध्ये मनोरंजन आणि वैचारीकातेचे अतिशय स्वादिष्ट मिश्रण मिळते. पण "उद्या" मुळीच तशी वाटली नाही. भयंकर अंगावर येणारी हताश करणारी आणि पदोपदी सद्यास्थितील घटनांचे गांभीर्य एखाद्या हातोडीने डोक्यात ठोकावे त्या प्रमाणे लिहिलेली.

कुठेही नजाकत येऊ नये अशी काळजी लेखकाने घेतलेली आहे.

कदाचित orwell च्या १९८४ सारखा परिणाम साधायची महत्वाकांक्षा असावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अंताजीबद्दल सहमत. पण अंताजीच्या तुलनेत अंतकाळाची बखर अधिक गंभीर आहे. अंताजी, अंतकाळाची आणि उद्या अशा तिन्ही कादंबर्‍या एकत्र पाहिल्या तर खर्‍यांनी क्रमाने वाढत चाललेल्या राजकीय आणि आर्थिक सत्तेच्या केंद्रीकरणाचे निराशाजनक चित्र रचले आहे असे दिसते. अंताजीत (आणि अंतकाळातही) नागपुरकर भोसल्यांच्या स्थानिक राज्याबद्दल बरीच आस्था आहे; तशीच उद्यातही वैदर्भीय स्थानिक संदर्भ आहेच. पण त्याचे प्रादेशिक आणि जागतिक संबंध वाढतच जातात, आणि पेशवाईपासून इंग्रज सरकार मार्गे नव्या आर्थिक-राजकीय साम्राज्यापर्यंत पोहोचतात.

"उद्या" हताश करणारी आहेच; कोणी तिचं वर्णन "सरधोपट" असं केलेलं ही वाचलं. पण तिचा आशय उत्साहवर्धक नाहीच; डोळे खाडकन उघडावेत असाच तिचा उद्देश आहे. "संपादकीय" प्रकरणातले विवेचन कथानकातच गोवले असते तर ते अधिक प्रभावी, साहित्यिक रित्या अधिक परिणामकारक झाले असते का, हा विचार मला सारखा येत होता. कदाचित झाले असते. पण त्यामुळे विवेचनाचे गांभीर्य वाचकांपुढे पोहोचेल की नाही याबाबत कदाचित लेखकाच्या मनात शंका असावी.

पण नजाकत कुठेच नाही हे मान्य नाही. नजाकत अतिशय बारकाईने रेखाटलेल्या पात्रांमध्ये आहे, त्यांच्या पार्श्वभूमींच्या छोट्या छोट्या तपशीलांमध्ये, आणि भाषेच्या वैविध्यामधे आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रोचना या परीक्षणासाठी अनेक धन्यवाद.
कालच ब्लॅक मिररचा तिसरा सीजन पाहायला सुरुवात केली.
पहिल्या एपिसोड मध्ये व्यक्तींची रेटिंग सिस्टीम (उद्यातली मूल्यवृद्धी) किती टोकाची आणि सर्वव्यापक असेल याची झलक आहे. घाबरायला होतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

लेख आवडला.
नंदा खरेच्यां सर्वच कादबर्यांचा मी चाहता आहे.
उद्या' कादबंरी वर आदुबाळ यांच्या सारखेच माझे मत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मूळ कादंबरी वाचलेली नाही, पण हा उत्तम लेख वाचून (डिस्टोपियन कादंबऱ्यांविषयी फार अोढ नसूनही) ती वाचण्याचं ठरवलं आहे.

जाताजाता दोन मुद्दे:

(१) एखाद्या राज्यसंस्थेने नागरिकांच्या जीवनावर अतोनात पाहरा ठेवणं याचे परिणाम मला तितकेसे स्पष्ट वाटत नाहीत. ‘अविरत सर्वेलन्स’ ही कल्पना 1984 मध्ये आहे, आणि ‘उद्या’ मध्येही ती आलेली दिसते. माझं एक निरीक्षण सांगतो: काही कारणाने ब्रिटनमध्ये cctv कॅमेरे खूपच आहेत, नुसत्या लंडनमध्ये चारेक लाख आहेत असा आकडा ऐकून आहे. याचा अर्थ मी समजा लंडनमध्ये पाच तास हिंडून आलो, तर मी कायकाय पाहिलं, कुठल्या पबमध्ये गेलो, तिथे शू केली की नाही, नंतर हात धुतले की नाही, किती वेळा रस्ता चुकलो, जमेकन माणूस समोर बघून रस्ता अोलांडला की नाही, हे सगळं दाखवणारी पंचवीस तासांची अतिशय कंटाळवाणी फिल्म सहज काढता येईल. पण म्हणून लंडनमध्ये हिंडणारे लोक बिचकून वागताहेत असं मुळीसुद्धा वाटत नाही. ‘जो तो आपला ह्यात’ असतो, आणि लोक करायचं ते करतच असतात. यामागचं कारण असं की प्रत्येकावर सतत सर्वेलन्स ठेवण्यामुळे इतका प्रचंड डेटा तयार होतो की त्याचा फारसा उपयोग होत नाही. जर सगळ्यांवरच सतत नजर असेल तर ‘आपल्यावर नजर आहे’ ही जाणीव अतोनात धूसर होते, आणि स्वत:ची वागणूक ठरवताना माणूस ती विचारात घेईनासा होतो. (अर्थात 1984 मध्ये वेगळा प्रकार आहे. तिथे सर्वेलन्स घरात असतो, आणि that is a different ball game altogether.)

(२) ‘मूर्तिभंजक’ यांच्या मते कादंबरी क्रूड आहे, किंवा हातोड्याने डोक्यात ठोकावे तशी लिहिलेली आहे. आता मी ती वाचलेली नसल्यामुळे याच्याशी असहमत असण्याचं मला कारण नाही, आणि त्यांचं मत योग्य असेलही. पण मला एक वाटतं ते असं की ठराविक शैलीत लिहिण्याची किंवा ‘मागच्या वेळी जे केलं होते ते करण्याची’ अपेक्षा लेखकाकडून करू नये. पहिली कादंबरी फाउंटनपेनने लिहिल्यावर दुसरी हातोड्याने आणि तिसरी फावड्याने लिहिण्याचा अधिकार लेखकाला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

सर्वेलन्स चे दोन उद्देश्य असतात - एक, खासगीपणाचा हक्क काढून घेणे (म्हणजे तुम्हाला तुम्ही हात धुतले नाहीत हे गुपित ठेवायचं असलं तरी ठेवता येत नाही), आणि दोन, त्या माहितीचा कसा व कधी उपयोग होऊ शकेल याबद्दल अस्पष्टता. (म्हणजे कदाचित ते डिलीटही होईल, पण पुढे कधी तुम्ही हॉस्पिटलमध्ये नोकरीसाठी अर्ज भरला, तर तुमचे पर्सनल हाइजीन काही खास नाही याची जाणीव आगाऊच इंटरव्ह्यू कमिटीला मिळू शकेल).

दैनंदिन सर्वेलन्सचे परिणामही ही विविध असू शकतात, व आहेत - तुम्ही नियमितपणे हात धुवू लागता, कारण पुढे तुम्हाला हाइजीनबद्दल कधी विचारले जाईल याची खात्री नसते. बेसिनवर कॅमेरा नसलेल्या खास पबांचा एक निच मार्केट तयार होतो, त्यात बियार दुप्पट किमतीची असते, पण तुम्हाला ती परवडू लागते. तुम्ही कुठे काय विकत घेता, किती खर्च करता, व कशावर, क्रेडिट कार्ड न घेता रोख रकमेतूनच सगळे व्यवहार करता का, या सर्व माहितीवरून जसा क्रेडिट स्कोर तयार होतो, व त्यावरून तुम्हाला लोन मिळेल की नाही, घर घेता येईल की नाही, कधीकधी नोकरीही मिळेल की नाही, हे अवलंबून असतं, तसंच हात धुण्याच्या सर्वेलन्स मधून पर्सनल हाइजीनचाही स्कोर तयार होऊ शकतो; त्यावरून तुमचा हेल्थ इन्शोरन्स, मुलांच्या शाळेच्या फीज, नोकरीचा बोनस, बरेच काही अवलंबून राहू शकते. हे प्रथमदर्शनी वाटेल तितके अतिरेकी व अशक्य नाही.

१९८४ शी तुलना योग्यच आहे. बोथ आर अबौट द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ कन्सेंट. पण त्यातील हिंसक पद्धतींपेक्षा, आणि उघड दडपशाहीपेक्षा "उद्या" मधली प्रक्रिया "फ्री चॉइस", "फ्री मार्केट" आणि ग्राहक संस्कृतीवर आधारित आहे. संथ, प्रवाही आणि एकदिशी आहे. दैनंदिन पातळीवर माणसाचे अस्सल खासगीपण नष्ट करणारी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

‘जो तो आपला ह्यात’ असतो, आणि लोक करायचं ते करतच असतात.

तुम्ही हात धुतलेत की नाहीत हे फारसं महत्त्वाचं नाही. मात्र तुमच्या मागे जर कोणी हात धुवून मागे लागायचं ठरवलं, तर या बिग डेटामधले लहानसहान बाइट्स तुमच्याविरुद्ध वापरण्यासाठीचे कायदे असतात. म्हणजे तुम्हाला अटकच करायची असेल तर तुम्ही हात धुतल्यानंतर जेव्हा रस्ता क्रॉस केला तेव्हा सिग्नल पाळला होतात का? पुढे चालून जेव्हा तुम्ही तुमच्या कारमध्ये शिरलात तेव्हा ती कार बरोबर पार्क केली होती का? तुम्ही कारमध्ये शिरलात तेव्हा आधी एका बारमधून बाहेर पडलात, तेव्हा त्या बारमध्ये किती ड्रिंकं घेतलही होतीत?

मुद्दा असा आहे की ९९.९९ टक्के लोकांसाठी साठवलेल्या या डेट्यामधून त्यांना काहीही अपाय होत नाही हे खरं आहे. पण ज्या ०.०१ टक्के लोकांना टारगेट करायचं असतं त्यांच्यासाठी हे सगळं धोकादायक ठरू शकतं. जेव्हा अल कपोनला 'टॅक्स इव्हेजन'साठी पकडलं जातं तेव्हा सगळं चान चान असतं. मात्र सत्ताधाऱ्यांना विरोध करणं एवढाच 'गुन्हा' करणाऱ्या गणिताच्या प्रोफेसरला ट्रॅफिक व्हायोलेशनसाठी गजाआड करण्याचा प्रयत्न होईल तेव्हा काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नंदा खरयांच्या अंताजीची बखर / अंतकालाची बखर वाचले होते. ही पण कादंबरी मिळवून वाचायलाच हवी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख अतिशय आवडला, कोणतंही पुस्तक कसं वाचावं याचा परिपाठ आहे. पुस्तक वाचल्यानंतर ज्या अंगांनी विचार करायचा राहून गेला होता, त्या जागा इथे लक्ष्यात आल्या. उदाहरणार्थ, सुदीपच्या भाषिक प्रभुत्वाची आणि अनुवाद व्यवसायाची गरज उद्या असणार आहे का असा विचार सुचलाच नव्हता आणि सर्व्हेलन्सप्रकरणात लेखकाशी सहमत असूनही, त्या अंगाने फार विचार केला नव्हता आणि लेखकाने त्याच्यावर गरजेपेक्षा अधिक विवचन केले आहे की काय अशी शंका आली होती. भाकरे गुरुजींच्या प्रकरणातही त्यांच्याकडे एक तटस्थ निरिक्षक म्हणूनच पाहिले गेले होते पण त्यातून केलेलं शिक्षणपद्धतीतल्या उणीवांबद्दलचं भाष्य आणि त्यांच्यातल्या प्रामाणिक शिक्षकाची अस्वस्थता फार भिडली नव्हती. एकूणच समीक्षेपेक्षा (अतिशय चिकित्सक असूनही) रसग्रहणातून परिचय करून देण्याची शैली आवडली.

लेखाच्या निमित्ताने मी उद्याबद्दल इतरत्र लिहिलेला प्रतिसाद खाली चिकटवत आहे.

नंदा खरेंचं 'उद्या' अलिकडेच वाचलं. या पुस्तकाला नक्की कोणत्या साहित्यप्रकारात घालावे ते कळत नाही पण त्याने त्याच्या परिणामकारकतेत काहीच फरक पडत नाही. मानवतेसमोर उभ्या असलेल्या वेगवेगळ्या समस्यांच्या आणि बदलांच्या आलेखाला किंचितसे पुढे ताणून त्याआधारे उद्याचे चित्र रेखण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे असे म्हणता येईल. एक कथेचा भाग आणि त्याच्या पुढे त्यातल्या संदर्भांच्या अनुशंगाने केलेले विवेचन, चिंतन, स्पष्टीकरण अशी पुस्तकाची जी एकूण रचना आहे, ती इतर प्रस्थापित साहित्यप्रकारांशी फारकत घेणारी आहे. वाचकाचा हात धरून, त्याला आपल्या कथेमागच्या मोठ्या संकल्पना समजावून सांगत पुढे घेऊन जावे असा लेखकाचा प्रामाणिक उद्देश्य आहे असे दिसते. ज्यांना या संकल्पना पुरेश्या माहिती आहेत त्यांना त्यासंबंधी लेखकाची मांडणी वाचणे महत्वाचे वाटेल तर जे या कल्पनांशी काहीसे अपरिचित असतील त्यांना त्यातील धोक्यांच्या गांभीर्याची कल्पना येईल, हे मला फार लोकाभिमुख वाटलं. आपल्या व्यासंगाने, वैचारिक परिपक्वतेने वाचकांना भारून टाकण्याचा अथवा आपण मोठ्या उच्चासनावर बसण्याचा प्रयत्न न करता या महत्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकताना त्याचा वाचकवर्ग विस्तारित करण्याचा हा प्रमाणिक प्रयत्न आहे.
झपाट्याने वाढत असलेले नागरीकरण, बहुराष्ट्रीय कंपन्यांची जगावरची वाढती अनिर्बंध सत्ता, आपल्या खासगीपणाचे सतत होत असलेले आकुंचन, नैसर्गिक स्त्रोतांच्या हावेपोटी आणि त्याच्या वाटपातल्या असमानतेपोटी होणारे संघर्ष, समता-मैत्र-अभिव्यक्ती-संवेदनशीलता या मानवी मूल्यांना पायदळी तुडवत केवळ आर्थिक मूल्यवृद्धीकडे धावत असलेला समाज आणि त्यातून येणारे वैफल्य-नैराश्य, 'विकास' करण्याच्या प्रलोभनातून होत असलेले संपत्तीचे आणि अधिकारांचे कमाल केंद्रीकरण, अजस्त्र कंपन्याचे मिंधे असलेले शास्त्रज्ञ-विचारवंत-कलाकार, कमालीचा कोरडा-विमनस्क-बोथट झालेला सामान्य माणूस असे हे उद्याचे चित्र अनेकांना निराशावादी, भयाण वाटू शकते. पण यातली चिंताजनक गोष्ट अशी आहे की अनेक बाबतीत हे सद्य समाजाचेच काहीसे अतिशयोक्त चित्र आहे, हळूहळू तापणार्या पाण्यातल्या बेडकाप्रमाणे आपण त्याचे गांभीर्य दृष्टीआड करतो आहोत काय असा करडा सवाल लेखक या पुस्तकातून आपल्याला करतो आहे. हे अवास्तवतावादी भविष्यवेधी चित्रण नाही कारण त्यातल्या महत्वपूर्ण बदलांची सुरवात आज झालेलीच आहे आणि मानवजातीने आपल्या वागणूकीत काही विशेष फरक न केल्यास हे चित्र सत्य ठरण्याच्या शक्यता अतिशय दाट आहेत अशी धोक्याची घंटा लेखक वाजवतो आहे.
वेगवेगळ्या ढंगाच्या बोली भाषा आणि वेगवेगळ्या व्यक्ती स्वभावांचे चित्रण, आर्थिक घडामोडी, इतिहास, विद्यान-तंत्रज्ञान, तत्वज्ञान या सगळ्यावर मांड घालणारा खर्यांच्या विचारांचा आवाका थक्क करणारा आहे आणि भारतीय भूभागाबद्दल लिहितानाही त्यांच्या विचारांची वैश्विक जाणीव वाखाणण्यासारखी आहे. वाचताना काही तृटी जाणवतात, जसे की काही प्रकरणे अधिक लांबविल्यासारखी झाल्याने हातातून सुटतायत की काय आणि त्यांची परिणामकारकता कमी होतेय की काय असे वाटते. पण हे म्हणतानाही कदाचित त्या लांबवलेल्या प्रकरणात, त्यांना मांडायचा असलेला एखादा मुद्दा आपल्या हातून सुटला असेल की काय म्हणून पुन्हा एकदा वाचून पहावेसे वाटते. माध्यमांतून गवगवा होणार्या प्रकारचे हे पुस्तक नाही म्हणून हे पुस्तक मैत्रिणीने आवर्जून पाठविले नसते तर एका चांगल्या अनुभवाला मुकले असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुरेख, नेमका लेख! कादंबरी अद्याप वाचलेली नाही; पण हे परीक्षण वाचून, ती मिळवून वाचण्याचा मनसुबा अधिक पक्का झाला आहे. एकंदरीत, ही कादंबरी ऑर्वेलियन-१९८४-डिस्टोपियन शाखेपेक्षा फोर्डोत्तर काळातल्या 'ब्रेव्ह-न्यू-वर्ल्ड'शी दूरस्थ का होईना, पण अधिक साधर्म्य असणारी वाटते ('मिरांडा' राईट्स? ;)).(खुद्द 'ब्रेव्ह न्यू वर्ल्ड'मागची प्रेरणा ही युटोपियन कादंबर्‍यांची खिल्ली उडवणे, ही होती असं म्हटलं जातं.)

चारगावचे वर्णन वाचून सोलापूरजवळचे अंकोली आणि तिथला अरुण देशपांडे यांचा 'विज्ञानग्राम' हा प्रयोग (त्यातल्या मर्यादांसह) आठवला. बाकी भाषिक प्रयोगांबद्दल, जमल्यास अधिक सविस्तर वाचायला आवडेल. (खर्‍यांनी यात 'स्ट्रीम ऑफ कॉन्शसनेस' शैलीचा कुठे वापर केला आहे का? किंवा जाणीवपूर्वक विखंडित संवादांचा/भाषेचा?)

किंचित अवांतरः

चारगावात काही मंडळी आधुनिक जीवनाच्या काही सोयी आणि विज्ञान आत्मसात करूनही, सहभागी तत्त्व, शेती आणि शारीरिक श्रमांवर आधारित स्वायत्त जीवन जगायचा प्रामाणिक प्रयत्न करतात. काही जण या प्रकरणाला विलक्षण रोमँटिक म्हणून हिणवतील, पण त्याचं आकर्षणच त्याच्या आशावादात, त्याच्या शक्यतेच्या दाव्यात, आहे....अस्वस्थ होण्याचं मुख्य कारण असं, की चारगावकरांच्या बाहेरच्या जगाशी होणाऱ्या दैनंदिन, किरकोळ अथवा मध्यमस्तरीय संघर्षाची नीटशी कल्पना येत नाही.

साधारण याच संदर्भात, अलीकडला हा लेखही वाचनीयः
http://www.newyorker.com/magazine/2016/10/03/the-return-of-the-utopians

विशेषतः हा भाग -

Neither author is blind to the shortcomings of his subject. Jennings is attuned to the latent “terror and repression” in the utopian project. Reece has a sharp eye for the contradictions of communities that condemn the capitalist economy but are sustained by vibrant commercial enterprises. The founders of these communities—a colorful cast of prophets, dreamers, and narcissists—preach against private property and possessions as they jealously guard their own. “One thing we can say about the seductive visionaries who led the utopian movement in America,” Reece notes dryly, “is that they did not lead the most self-examined lives.”

Despite the caveats, the over-all tone of both books is enthusiastic, even laudatory. Set against the general opprobrium that has tarred utopia in the twentieth century, these are works of intellectual and political rehabilitation. Jennings laments “a deficit of imagination” in our era, and argues that, “uncoupled from utopian ends, even the most incisive social critique falls short.” Reece likewise ends his travels convinced “that things will only get worse if we don’t engage in some serious utopian thinking.”

...

One sign of how far political rhetoric has shifted in recent years is that when Reece and Jennings write about “secular communism” or the “communistic” tendencies of these projects they are writing in celebration, instead of lamenting an ideology that tyrannized vast swaths of the planet. Not long ago, utopianism was a mark of naïveté or fanaticism, or even of solidarity with political coercion; today, anti-utopianism is denigrated as a form of political cynicism and complicity with the global forces of oppression.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाचनाच्या यादीत भर घातल्याबद्दल धन्यवाद! रीसचे पुस्तक रोचक आहे; शोधून काढते. आकाश कपूरचे इंडिया बिकमिंगही वाचले नाही, पण ऑरोविलबद्दल मला खूप कुतूहल आहे, तेथे राहिलेल्या आणि नैसर्गिक आर्किटेक्चर, शेती वगैरे शिकलेल्यांच्या ओळखीतून त्या जागेबद्दल खूप ऐकलं आहे.

कपूरच्या लेखाबद्दल काही कुरकुरः सोवियत युनियन, टॉमस मोर आणि ओनाइडा, शेकर्स आणि ऑरोविल सारख्या "ऐच्छिक समूहां"चे एकत्र विवेचन काही पटले नाही. शब्द एकच राहिला म्हणजे संकल्पना आणि त्यांचा व्यापही तसाच राहातील असे नाही. कम्युनिस्ट युटोपियात सामाजिक संकल्पनेची जागा दडपशाहीने खूप लवकर घेतली - तिच्या प्रोपागांडाला सुरुवातीच्या युटोपियन विचारांशी जुळवणे धाडसाचे ठरेल. १९व्या शतकातील युटोपियन सोशलिस्ट प्रयोग व अमेरिकेतील ऐच्छिक समूहांचे एक वैशिष्ट्य होता त्यांचा ठरवून सीमित ठेवलेला आकार. कपूर हा सीमित आकार त्यांच्या अपयशाचे कारण ठरवतो, पण मला वाटतं हाच अशा ऐच्छिक समूह आणि राजकीय पातळीवरच्या सामाजिक परिवर्तनाच्या "युटोपीय" प्रकल्पांमधला मोठा, निर्णायक फरक असावा.

The issue isn’t just that these communities failed to achieve the lasting, epochal change that they often envisioned. Even at their height, they never reached a critical mass, remaining instead scattered and mostly minuscule attempts at social tinkering—Trialville, as one called itself, in an uncharacteristic burst of modesty. Oneida, at its apogee, numbered some three hundred people. Walking around the Twin Oaks settlement one day, Reece asks a man how far he thinks the community’s collectivist economy could grow. “I’d say it can’t go beyond a thousand people,” the man ventures....

अशा छोट्या समूहांमध्ये देखील सत्तासंबंध जिवंत आहेतच, हे कपूर दाखवून देतो, पण त्यांचे महत्त्व संकल्पनांच्या प्रयोगशाळा - Trialville - म्हणून जास्त आणि जगात किती लोकांपर्यंत यशस्वीरित्या पोहोचू शकले, यात कमी असावे. यामुळे साहजिकच अनुभवाला महत्त्व जास्त, आणि यशापयश मोजण्याला कमी असावे. म्हणून अशा प्रयोगांच्या उपयुक्ततेचे निकष, आणि कपूरने काढलेले निष्कर्ष - युटोपियापेक्षा मेलियोरिझम केव्हाही परवडला - तेवढे अर्थपूर्ण वाटत नाहीत.

उद्याच्या संदर्भात सांगायचे झाले तर इथल्या कल्पित कम्यूनमधेही स्थानिक पातळीवरच्या राहणीमानाचा आवर्जून स्वीकार आहे, आणि स्थानिक पातळीचा तात्त्विक पुरस्कार आहे - जास्त नाही, फार तर फार चार गावं, बस्स! त्याच्या स्थिरतेबद्दल अनेक प्रश्न उद्भवतात हे मान्य, आणि माझ्या मनात अजूनही त्यांबद्दल समाधान नाही. पण संपूर्ण जगालाच चारगावसारखे करायची स्वप्न इथे नाहीत.

मला अरुण देशपांडे यांच्या विज्ञानग्राम प्रकल्पाबद्दल अधिक जाणून घ्यायला आवडेल - एखादा दुवा? पुस्तक?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला अरुण देशपांडे यांच्या विज्ञानग्राम प्रकल्पाबद्दल अधिक जाणून घ्यायला आवडेल - एखादा दुवा? पुस्तक?

अनिल अवचटांच्या "कार्यरत" या पुस्तकामध्ये एक लेख आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

ओक्के. थॅंक्स!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'कार्यरत' या अनिल अवचटांच्या पुस्तकात देशपांडे यांचे विचार नि प्रयोग यांविषयी सविस्तर माहिती आहेच पण 'आम्ही तुमच्या पिशवीत मावतच न्हायी' हे खुद्द अरुण देशपांडे यांचे पुस्तकही बुकगंगावर मिळेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0