वेलबेकची बत्तीशी वठेल काय?

गांधीजींना म्हणे कोणीतरी विचारलं, "व्हॉट डू यू थिंक ऑफ वेस्टर्न सिव्हिलायझेशन?" आणि ते म्हणे म्हणाले, "इट वुड बी अ गुड आयडिया!"' आता गांधीजींना जॉन रस्किन, विल्यम मॉरिस, टॉल्स्टॉय वगैरेंचं प्रेम होतं. ख्रिस्ती धर्माबद्दल आदर होता. त्या धर्मातल्या काही प्रार्थनाही गांधींजींच्या आश्रमांमध्ये म्हटल्या जात. तेव्हा जर गांधीजींनी वरच्या प्रश्नोत्तरांतला कठोर विनोद केला असेलच, तर ते मैत्रीतल्या चिडवा-चिडवीसारखंच असणार. तसं करायची विनोदबुद्धी गांधीजींमध्ये नक्कीच होती. एक हेही लक्षात घ्यावं, की त्या विनोदाला हिंदुत्ववाद्यांचा प्रतिसाद जास्त असतो तर गांधीवाद्यांचा कमी. हे अर्थात माझं निरीक्षण आहे. आकडेवारीनं सिद्ध होणार नाही.

पण मुळात पाश्चात्य असं लेबल लावता येईलशी काही सभ्यता-संस्कृती आहे का? बर्फाळ स्कँडिनेव्हियाचे रहिवासी भूमध्यसागरी ग्रीस-इटलीतल्या लोकांसारखे वागतात का? ख्रिस्ती धर्मही पश्चिमेला कॅथलिक-प्रॉटेस्टंट आहे, तर पूर्वेला ग्रीक ऑर्थोडॉक्स. मग? भारतात तरी पाश्चात्य याचा अर्थ इंग्रज-अमेरिकन संस्कृती असाच घेतला जातो. ते दोन देश तरी एका सभ्यतेचे भाग आहेत का? की 'टू नेशन्स डिव्हायडेड बाय वन लँग्वेज' हे वर्णन जास्त खरं आहे?

या आणि असल्या प्रश्नांना 'तेज' करणारी एक कादंबरी (दोन हजार) पंधरा सालच्या सुरुवातीला फ्रान्समध्ये प्रकाशित झाली. कादंबरीमागची प्रेरणा हे प्रश्न विचारण्याची नाही, पण भारतात तिचं आकलन मात्र या प्रश्नांसोबत करून घेणं सोपं जातं.

***

जगातल्या प्रमुख धर्मांपैकी तीन धर्म ग्रंथाधारित (रिलिजन्स ऑफ द बुक) आहेत : यहुदी (ज्यू), ख्रिस्ती आणि इस्लामी. हिंदू, बौद्ध व इतर धर्म असे एखाद्या ग्रंथापुढे, पीठापुढे नतमस्तक होणारे नाहीत. पण माणसं कित्येक वर्षं आपलं मूळ स्थान सोडून इतरत्र जात आहेत. आपले मूळ धर्म जिथे फारसे लोकप्रिय नाहीत अशा देशांत जाऊन रुजत आहेत. आज यामुळे तीन देशांचे धार्मिक आकार कसे घडले आहेत ते टक्केवारीत पाहू.

फ्रान्स इंग्लंड अमेरिका
ख्रिस्ती धर्माच्या आवृत्त्या ६०.० ५९.५ ७०.६
मुस्लिम ६.० ४.४ ०.९
धर्माला महत्त्व न देणारे ३३.० ३२.८ २२.८
इतर : १.० ३.१ ५.७
एकूण लोकसंख्या ६.४ कोटी ६.६ कोटी ३२ कोटी

वरकरणी फ्रान्स व इंग्लंड बरेच सारखे वाटतात, पण ते खरं नाही. धर्माला महत्त्व न देणाऱ्यांमध्ये तीन वर्ग पडतात : अज्ञेयवादी (agnostic), नास्तिक (atheist) आणि 'मला काय त्याचं' (indifferent to religion). पहिले दोन वर्ग धर्म नाकारतात. फ्रान्समधले सर्व ३३.०% याप्रकारचे आहेत. इंग्लंडात २५.६% धर्म नाकारतात, तर ७.२% धर्म कोणता याला महत्त्व देत नाहीत. अमेरिकेत १५.७% धर्म नाकारतात, तर ७.१% इंडिफरंटली वागतात.

म्हणजे अज्ञेयवादी-नास्तिकांबाबत फ्रान्स (३३.०%) हा देश इंग्लंड (२५.६%) आणि अमेरिका (१५.७%) यांच्यापेक्षा बराच पुढे आहे. यात फ्रेंचांच्या उदारमतवादाचं स्थान महत्त्वाचं आहे. मानवाधिकार ही संकल्पना आणि तिच्या मागचा मानवतावाद यांचं मूळ फ्रान्समध्ये आहे, तर इंग्लंड-अमेरिकेनं त्या संकल्पना घडवलेल्या नसून फक्त स्वीकारल्या आहेत.

सोबतच फ्रान्समध्ये मुस्लिमांचं प्रमाणही इंग्लंडपेक्षा थोडं जास्त आणि अमेरिकेच्या तर कैक पटीनं आहे. यात या देशांचा साम्राज्यवादी इतिहास महत्त्वाचा आहे. फ्रेंच साम्राज्यात अल्जीरिया, मोरोक्को हे मुस्लिमबहुल देश संख्येनं महत्त्वाचे आणि फ्रान्सच्या जवळ आहेत. इंग्लंडच्या साम्राज्यात संख्येनं सर्वांत मोठा भारत होता; तिथेही मुस्लिमांची संख्या कमी नव्हती. अमेरिकेचं साम्राज्य लहानसंही होतं, आणि तेही मुख्यतः दक्षिण अमेरिका या ख्रिस्ती व मुस्लिमेतर धर्म मानणाऱ्या क्षेत्रात होतं.

या देशांमध्ये मुस्लिम फक्त जुन्या वसाहतींमधून आलेले नाहीत. राजकीय निर्वासित हाही एक मोठा वर्ग आहे. आपापल्या देशांतून हाकलल्या गेलेल्यांना आश्रय देणाऱ्यांमध्ये फ्रान्स आघाडीवर आहे. जसं, इराणच्या लोकांमध्ये पुढे प्रिय झालेला आयातोल्ला खोमेनी फ्रान्समध्ये कित्येक वर्षं होता.

आणि आज तर उपजीविकेसाठी गरीब देशांतून श्रीमंत देशांत जाणारेही संख्येनं मोठे आहेत. या बाबतीत फ्रान्स, इंग्लंड, अमेरिका यांच्यात फार फरक नसावा, अमेरिकेचा आकार टक्केवारीत या प्रकारच्या लोकांना नगण्य ठरवतो, तरीही.

मुद्दा काय, तर फ्रान्समध्ये अज्ञेयवादी-नास्तिक आणि मुस्लिम या दोन्हींचं प्रमाण इंग्लंड-अमेरिकेपेक्षा बरंच जास्त आहे.

***

अमेरिकेला नेहमी एक शत्रू लागतो. तो सैतानी दुष्ट आहे, असं सांगत त्याचा बंदोबस्त करण्याच्या नावाखाली अमेरिका आपला आर्थिक साम्राज्यवाद पुढे रेटत असते. हे चित्र दुसऱ्या महायुद्धानंतर तरी खरं आहे. शीतयुद्धाच्या काळात खलनायकाचं पद सोव्हिएत रशियाला बहाल केलं गेलं. १९८९मध्ये सोव्हिएत संघ फुटल्यावर काही काळ शत्रू शोधण्यात गेला. ९/११च्या हल्ल्यानंतर इस्लामी मूलतत्त्ववादी खलनायक झाले आहेत, पण चित्र गोंधळाचं आहे. सौदी अरबस्तान मूलतत्त्ववादी असूनही खलनायक नाही. पाकिस्तान मूलतत्त्ववादी लोकांना मदत करूनही खलनायक नाही. सद्दाम हुसेनचा इराक मात्र मूलतत्त्ववादी नसूनही खलनायक झाला. ठेचलाही गेला. आज आयसिसकडे खलनायकत्व गेलं आहे. या तर्कदुष्ट कोलांटउड्यांमध्ये इंग्लंड अमेरिकेची पाठराखण करतो आहे. फ्रान्स तशी पाठराखण करत नाही, पण त्यांचा उदारमतवाद मात्र इस्लामी मूलतत्त्ववाद्यांसाठी खलनायक आहे! अखेर 'काफिर' याचा अर्थ गैर-इस्लामी असा नाही. तो आहे पाखंडी असा, नास्तिक असा!

यामुळे एकीकडे अमेरिकेशी झुंजत असतानाच इस्लामी मूलतत्त्ववादी एक-दोन ठोसे फ्रान्सलाही मारत असतात.

***

एकोणीसशे पन्नासच्या दशकात एक स्कारामूश (Scaramouche) नावाचा तलवारबाजीचा चित्रपट ('स्कारामूश'चा विकिपीडीया दुवा) बराच लोकप्रिय होता. नायक आधी सर्वार्थानं दुबळा असतो आणि एका सबळ सरदाराकडून अपमानित होतो. मग मात्र तो एका तमाशातला सोंगाड्या (= स्कारामूश!) म्हणून काम करत प्रस्थापितांची टिंगलटवाळी करू लागतो. काळ असतो फ्रेंच राज्यक्रांतीनंतरचा, पण नेपोलियननं सत्ता बळकावण्याआधीचा. तमाशातून शेरेबाजी करत, उपहासगर्भ पत्रकं लिहीत नायक तलवारबाजीही शिकतो आणि अखेर दुष्ट सरदारावर मात करतो. पात्रांचे संवाद आणि नायकाची पत्रकं अत्यंत चटपटीत (पण पोरकट!) ढंगानं प्रस्थापितांची मापं काढतात. फ्रान्सची ही परंपराच आहे, मानवातावादाच्या उदात्त कल्पनांना उपहास आणि विनोदाचा उतारा पुरवणारी.

अशाच वृत्तीचं एक साप्ताहिक आहे. 'शार्ली एब्दो' (Charlie Hebdo) नावाचं, मुख्यतः व्यंगचित्रांवर बेतलेलं. प्रस्थापित वर्गाच्या उदारमतवादाची टर उडवणारं एक दुभंग व्यंगचित्र असं :

शार्ली एब्दो व्यंगचित्र

डावीकडच्या चौकटीत एक पाठमोरा चित्रकार एका ज्यू रॅबायचं (धर्मगुरूचं) चित्र रेखाटतो आहे आणि एक महाकाय मूठ त्याला भुईसपाट करते आहे. उजवीकडे एका इस्लामी मौलवीचं तसंच चित्र काढलं जातं आहे, पण आता एक महाकाय ओंजळ चित्रकाराला झेलते-जपते आहे. पहिल्या भागाखाली शब्द आहे 'ज्यूद्वेष' (Antisemitism), तर दुसऱ्या भागाखाली आहे 'अभिव्यक्तिस्वातंत्र्य' (Freedom of Expression). म्हणजे शार्ली एब्दो गोरे, ख्रिस्ती, अज्ञेयवादी-नास्तिक वगैरेंच्या पोकळ उदारमतवादाला लक्ष्य करायला घाबरत नाही. प्रस्थापितवर्ग आहे तो - ज्यूंची टिंगल वाईट मानणारा, पण मुस्लिमांची टिंगल सुसह्य, स्वागतार्ह मानणारा.

पण अशाच भावनेनं शार्ली एब्दो इस्लामचीही टिंगल करतो. तो 'वर्ग' उदारमतवादी नाही. स्वतःची टिंगल त्याला सहन होत नाही. आणि त्या वर्गानं हे शार्ली एब्दोला ठामपणे जाणवून दिलं आहे. अकरा साली शार्ली एब्दोच्या ऑफिसांवर बाँब टाकले गेले. पंधरा साली बंदूकधाऱ्यांनी हल्ला करून बारा जणांना मारलं, तर अकरा जण जखमी झाले. दोन्ही वेळा प्रेषित मोहंमदाची टिंगल हे कारण होतं. दुसरा हल्ला करणारे पकडले गेले. ते अल्-कायदाच्या येमेनी शाखेचे सदस्य असलेले दोन भाऊ होते.

***

हा दुसरा हल्ला ७ जानेवारी २०१५ला झाला. त्याच्या काही तास आधी मिशेल वेलबेक (Michel Houellebecq - आडनावातल्या 'ल' चा उच्चार पूर्ण करायचा) या फ्रान्समध्ये विख्यात लेखकाची 'सूमिसिऑं'(Soumission) ही कादंबरी प्रकाशित झाली होती. आज तिचं 'सबमिशन' (Submission) हे इंग्रजी भाषांतरही उपलब्ध आहे. 'सबमिशन' ही शरणागतीच्या, म्हणजे सरेंडरच्या (Surrender) जरा आधीची स्थिती आहे. पूर्वी कुस्तीत हरणारे पहेलवान 'आय सबमिट' म्हणून पराभव कबूल करत असत. हा शब्दच्छल वाटेल, पण 'सबमिशन आणि सरेंडर ह्या दोन संकल्पनांमधला भेद, कादंबरीला नाव देताना वेलबेकला अभिप्रेत असावा.

वेलबेक स्वतःचं वर्णन "शून्यवादी (nihilist), प्रतिक्रियावादी (reactionary), तुच्छतावादी (cynical), वंशवादी (racist), निर्लज्ज स्त्रीद्वेष्टा (shameless misogynist) आणि कोणतंही वैशिष्ट्य नसलेला शैलीहीन लेखक ( an unremarkable author with no style)", असं करतो. मला फ्रेंच येत नाही आणि मी वेलबेकची इतर पुस्तकं वाचलेली नाहीत. 'सबमिशन' वाचताना मला तो शैलीहीन वाटला नाही, आणि त्याच्यात काही वैशिष्ट्यं नाहीत असंही वाटलं नाही. यामुळे त्यानं वापरलेली इतर विशेषणंही बहुधा अतिशयोक्त असावीत. पण खरंखोटं करायचा मार्ग मला तरी बंद आहे.

***

गोष्ट थोडक्यात अशी :

साल २०२२. फ्रान्समध्ये निवडणूक होऊ घातलेली आहे. निवेदक सोरबोन विद्यापीठातला फ्रेंच साहित्याचा अभ्यासक-अध्यापक आहे. त्याचं विशेष अभ्यासाचं क्षेत्र म्हणजे उइसमॉंस(Huysmans) हा एकोणिसाव्या शतकातला लेखक. हा बहुधा समलिंगी वृत्तीचा होता व उदारमताकडून काहीशा धार्मिकतेकडे गेला. पण वरकरणी तरी निवेदकाला उइसमॉंसचा कंटाळा आला आहे. तो बऱ्याच तटस्थतेनं वेगवेगळ्या पक्षांच्या लोकप्रियतेचे आकडे ऐकतो आहे आणि सोबतच सांगतो आहे, "एखाद्या टॉवेलनं घ्यावा तितपतच मी राजकारणात रस घेतो"'!

पण फ्रेंच राजकीय व्यवस्था बदलत असते. मारीन ला पेनचा (ही खरी व्यक्ती आहे!) राष्ट्रीय आघाडी हा स्थितिवादी पक्ष सर्वांत पुढे असतो. याच्या मागे असतो https://en.wikipedia.org/wiki/Socialist_Party_(France). यानंतर मात्र मुस्लिम बिरादरी (Muslim Brotherhood) हा (काल्पनिक) पक्ष असतो. आणि शेवटी यूनियन फॉर अ पॉप्युलर मूव्हमेंट (यूएम्पी) हा 'न घर का न घाट का' या वर्णनाचा पक्ष असतो निवेदक यानं जरासा(च) अस्वस्थ होतो, आणि जास्त तपशिलात जाऊ लागतो.

'खरी' राष्ट्रीय आघाडी म्हणजे थोडा ट्रंप - थोडी शिवसेना असा पक्ष आहे. बेकायदेशीर परक्यांना हाकलायचं, कायदेशीर परक्यांना फ्रान्समध्ये येणं कठीण करायचं, युरोपीय यूनियन सोडायची, करभार कमी करायचे आणि धर्माबद्दल सेक्युलर राहायचं, ही 'राआ'ची धोरण-व्यवस्था आहे.

समाजवादी आपल्याकडच्या लोहिया-समाजवादी नमुन्याचे, महाराष्ट्रीय समाजवाद्यांपेक्षा जास्त डावे.

मुस्लिम बिरादरी सौम्य पण ठाम मुस्लिम. आयसिस सोडा, ती ओवैसींच्या 'एमायएम'इतकीही कर्मठ वाटत नाही. तिचा नेता चेहेऱ्यानं आनंदी, वागण्यात सौम्य पण आग्रही, आपलं म्हणणं इतरांना पटवून देण्यात कुशल, सर्वच लोकांना आपला वाटणारा, केवळ मुस्लिमांना नव्हे. खरं तर मला सुचणारं भारतीय 'समकक्ष व्यक्तिमत्त्व' सांगायचा मोह होतो आहे, पण त्यानं माझ्यावर देशद्रोहाचा शिक्का मारला जाईल. नकोच ते.

तर निवेदक काय होणार आहे ते शोधू लागतो. एका सहकाऱ्याचा नवरा आपल्या 'आयबी'सारख्या खात्यात असतो, देशांतर्गत हेरगिरी करणाऱ्या. एक-दोन सहकारी सत्तेजवळ असतात. एक जण राष्ट्रीय आघाडीपेक्षाही कर्मठ उजव्या भूमिपुत्र देशीवादी गटाशी जुळलेला असतो. तुलना करायचीच, तर गुलाल चित्रपटातल्या राजपुताना गटाशी करता येईल. सर्व अनौपचारिक खबरी-चौकशा सांगतात की काहीतरी नवं उभं राहणार आहे.

आणि होतंही तसंच; राष्ट्रीय आघाडीला समाजवादी घाबरतात आणि लोकप्रियतेत आपल्याशी सर्वांत जवळच्या मुस्लिम बिरादरीशी हस्तांदोलन करतात. सत्तेवर येतात.

राष्ट्रीय आघाडी एक मोठा निदर्शन-मोर्चा काढतेही, पण फ्रेंचांमध्ये सांसदीय लोकशाही आतपर्यंत पुरेपूर रुजलेली असते. त्यामुळे मोर्चावर सौम्य लाठीमार, थोडं हवेत, थोडं माणसांवर फायरिंग वगैरे होतं खरं, पण अखेर सारं काही शांत शांत होतं.

निवेदक मात्र बदलाचा धुरळा बसेपर्यंत पॅरिस सोडून देशाच्या अंतर्भागात जातो. ही 'चिंतन-फेरी'ही फार कल्पक नसते. तो खूपसा उइसमॉंसनी एका पुस्तकात चितारलेल्या क्षेत्रात जातो. निवेदकाची शुद्ध अकादमीय मर्यादा यातून वेलबेक अधोरेखित करतो

***

एकूणच वेलबेक फार काटकसरीनं लिहितो. एक तुकडा पहा -

"एका मशिदीला अपवित्र करण्यावरूनचा संघर्ष मागे आठवडाभर चालला होता. हा संघर्ष अत्यंत हिंस्र होऊन अनेक माणसं मेल्याचा दावा पुढच्याच दिवशी, एका देशीवादी वेबसाईटनं केला; गृह-मंत्रालयानं त्याचं तात्काळ खंडन केलं. नेहेमीप्रमाणे राष्ट्रीय आघाडीच्या आणि मुस्लिम बिरादरीच्या नेत्यांनी गुन्हेगारी कृत्यांचा तीव्र निषेध केला. दोन वर्षांपूर्वी हा संघर्ष सुरू झाला तेव्हा माध्यमांनी जोरदार दखल घेतली होती. पण आता असल्या घटनांची फारशी चर्चा होत नाही. ती शिळी बातमी होते."

आता याला समांतर भारतीय अनुभव तुम्हीच तुमच्यापुरते शोधा. कोणाला खैरलांजी आठवेल, तर कोणाला कोपर्डी. डेरा सच्चा सौदा, सोनी सोरी, बिनायक सेन वगैरे बहुधा आठवणार नाहीत. मागे पद्मजा फाटकांनी ज्यादाच संवेदनशील माणसांबद्दल एक 'बिनपाठीचं कासव' म्हणून रूपककथा लिहिली होती तसेही लोक असतात, पण प्रमाणानं जास्त असतो ती आपण गेंड्याच्या कातडीची माणसं, खरं ना?

निवेदकाचा देशीवादी स्नेही सांगत असतो,

"असं पहा, देशीवादी गट एकसंध नव्हताच. ती एकमेकांशी न पटणाऱ्यांची मोळी होती. कॅथलिक, राजवंश पुन्हा यावासा वाटणारे, नव-ख्रिस्तपूर्व धर्म पूजणारे, अत्यंत डावीकडचे सेक्युलॅरिस्ट ... पण जेव्हा युरोपीय भूमिपुत्र आले तेव्हा सगळंच बदललं. ते थेट (फ्रेंच) प्रजासत्ताकवादी भूमिपुत्रांच्या उत्तरादाखल घडलेले लोक, एक थेट एकत्रीकरणाची भूमिका मांडणारे. 'आम्ही युरोपचे मूळनिवासी आहोत. मुस्लिमांच्या वाढत्या व्याप्तीच्या विरोधात आहोत. अमेरिकन कंपन्या, भारतीय आणि चिनी भांडवलशहा वगैरे आमचा वारसा विकत घेणाऱ्यांच्या विरोधात आहोत.' ते हुशार लोक होते. ते जेरोनिमो, कोशीज आणि स्थित-बसवराज (Geronimo, Cochise, Sitting Bull हे अमेरिकी मूलनिवासी नेते होते) यांना उद्धृत करत होते. आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे त्यांची वेबसाईट अत्याधुनिक होती. सुंदर डिझाईन, चटपटीत जिंगल्स. त्यानं नवे सदस्य मिळाले, तरुण सदस्य."

आता यात कुणाला शिवसेना भाजपपुढे का हतबल झाली हे दिसलं, तर तो योगायोग समजावा! आणि पुढे
--

"ते म्हणतात की, एखाद्या अतिशायी अस्तित्वावरचा (= ईश्वरावरचा) विश्वास काही जनुकीय फायदा मिळाल्याचं दाखवतो. तीन ग्रंथबद्ध धर्म मानणाऱ्यांना अज्ञेयवादी आणि नास्तिकांपेक्षा जास्त मुलं होतात. त्यांच्यात स्त्रीशिक्षण कमी असतं. सुखवाद (= उपभोगवाद) आणि व्यक्तिवाद कमी असतात. आणि हा अतिशायीवाद जीन्सद्वारा मुलांमध्ये जात असतो. धर्म बदलणारे, कुटुंबसंस्थेची मूल्यं नाकारणारे, हे सांख्यिकीच्या दृष्टीनं नगण्य असतात."

तर काय, इथे दिनानाथ बात्राही दिसू शकतात आणि मानवाधिकार, नागरिकाधिकार यांची पहिली सुस्पष्ट मांडणी करणारा समाजच मागे वळतानाही दिसू शकतो, तेही 'वैज्ञानिक' भाषा वापरून .

***

पण निवडणुका जिंकणारी समाजवादी-मुस्लिम बिरादरी युतीही फार सुखात नसते. जर युती केली नाही तर राष्ट्रीय आघाडी जिंकणार या उघड सत्यानंच दोघांना एकत्र आणलेलं असतं, असंही नसतं. आर्थिक बाबतींत दोघांची धोरणं समांतर असतात. आंतरराष्ट्रीय व्यवहारांबाबतही दोघांचे दृष्टिकोण जवळपास सारखेच असतात. हो, मुस्लिम बिरादरी जास्त इस्रायलविरोधी असते, पण हेही समाजवाद्यांना गंभीर वाटत नसतंच.

खरा वादाचा मुद्दा असतो शिक्षणक्षेत्राचा. समाजवादी परंपरा शिक्षणाला महत्त्व देणारी आणि शिवाय शिक्षक-यूनियन्सवर उभी असलेली. मुस्लिम बिरादरीचे हेतू दोनच : जन्मदर वाढवून आपल्या गटाला बहुसंख्य करणं, आणि सर्व नव्या पिढीत आपली मूल्यं रुजवणं. या दोन हेतूंपुढे अर्थव्यवस्था विकसनशील करणं वगैरे बाबी त्यांना तुच्छ वाटतात. तशीही युती घडलेली असते ती 'हडळीला नाही नवरा, वेताळाला नाही बायको' अशा स्थितीतून. तर बिरादरीला शिक्षणक्षेत्र देऊन टाकायला समाजवादी तयार होतात.

***

सूत्रं अशी --

प्रत्येक फ्रेंच मुलाला सध्याच्या शिक्षणासोबत मुस्लिम शिक्षण देणाऱ्या मदरशांमध्ये जाण्याचा पर्यायही असेल.
मुलगे-मुली सहशिक्षण बंद होईल.
मुलींना होम-इकॉनॉमिक्स (आपल्या भाषेत होम सायन्स) हा मुख्य विषय शिकवून गृहकृत्यदक्ष केलं जाईल. काही थोड्यांना कला आणि साहित्यही शिकू दिलं जाईल. मुलींना लवकरात लवकर लग्न करायला उत्तेजन दिलं जाईल.
सर्व शिक्षक लवकरात लवकर मुस्लिम केले जातील. मुलींना नोकऱ्या देणं बंद होईल, ज्यामुळे पुुरुषांची बेकारीही बंद होईल.
सर्व विश्वविद्यालयांना प्रायोजक शोधून त्यांचं खाजगीकरण केलं जाईल. सौदी अरबस्तान व इतर तेल-श्रीमंत देश अर्थातच प्रायोजकांमध्ये बहुसंख्य असतील.
मदरशांमधनं मिळणारं शिक्षण (प्रायोजित) स्वस्त असेल, आणि बरेच गरीब तिकडे वळतील.
होता होता स्त्रीशिक्षणातले बदल आणि नव्या पिढीवरचा वाढता मुस्लिम प्रभाव यांतून विवाहसंस्थाही बदलेल. एरवीचे नागरी विवाह राहतीलच, पण मुस्लिमांना बहुपत्नीकत्वाचीही परवानगी असेल.

***

तर पुन्हा एकदा नव्या ऑटोमन साम्राज्याची पायाभरणी होईल. यावेळी केंद्र मात्र इस्तंबूल न राहता पॅरिस असेल.

***

निवेदक त्याच्या चिंतन फेरीत खरं तर फारसं चिंतन करत नाही. ज्या तऱ्हेनं उइसमॉंस उदारमतवादाकडून धार्मिकतेकडे गेला ती भौगोलिक वाट फक्त तो वापरतो. परत येईपर्यंत त्याची नोकरी गेलेली असते. कुलगुरू सांगतो की तो मुस्लिम झाल्यास सर्व जुन्या हक्कांसोबत नोकरी परत मिळेल. शिवाय दोन (तरी) बायका करता येतील, एक घर चालवायला तर दुसरी शेजसंगतीला.

काहीच विरोध न करता निवेदक या 'परिस्थितीच्या रेट्याला' शरण जातो.

***

पुस्तक प्रकाशित झाल्यावर काही तासांतच शार्ली एब्दोवर दोन बंदूकधाऱ्यांनी हल्ला केला, व दोन डझन माणसं हताहत झाली.

शार्ली एब्दोच्या मुखपृष्ठावर वेलबेक

शार्ली एब्दोचा जो ताजा अंक घडवला जात होता त्याच्या मुखपृष्ठावर वेलबेक होता. तो दारूडा व बाईलबाज दाखवण्याचा प्रयत्न होता. तो म्हणताना दाखवलं होतं, "२०१५मध्ये माझे दात पडतील आणि २०२२मध्ये मी रमजान पाळेन!"

हा योगायोग होता की वेलबेकच्या येऊ घातलेल्या पुस्तकाच्या कथासूत्राच्या चर्चेनं येमेनी आतंकवादी बिथरले, हे स्पष्ट नाही.

पुस्तकातल्या बहुतेक घटनांमध्ये वेगवेगळ्या दर्जांची दारू आहे. मुस्लिम फ्रान्समध्ये हे कसं चालेल यावर पुस्तक मतप्रदर्शन करत नाही; अगदी दूरान्वयानंही.

पुस्तकात अनेकानेक संभोगदृश्यं आहेत. ती कहाणीचा मार सौम्य करायला योजली आहेत का, हेही मला कळलं नाही. बहुधा असावं तसं. मुळात कडू औषधाचं ते (मला कडूच वाटलेलं) शर्करावगुंठन असावं.

***

पण शार्ली एब्दोवर हल्ला करण्यात जर वेलबेक-शरणागती हे कारण असेल, तर मात्र येमेनी बंधू चुकले असं म्हणावं लागेल.

हल्ला व्हायचाच तर तो समाजवाद्यांकडून होणं जास्त योग्य ठरलं असतं. खरं तर फ्रान्सची सारी उदारमतवादी-मानवतावादी वृत्ती खवळून उठणं सर्वांत विवेकी ठरलं असतं! एक मत असंही आहे की कादंबरीतून वेलबेकनं मारीन ल पेनला एक वाढदिवसाची भेट दिली!

हो, मला तरी वेलबेक म्हणताना दिसतो ते असं --

"कशाला तुमच्या मानवाधिकार आणि मानवतावादाच्या, स्वातंत्र्य-समता-बंधुभावाच्या गमजा मारता? तो वारसा सांगणारे तुमचे नेते सत्तेत येण्यासाठी वाट्टेल ते करतील! स्त्रीपुरुष समतेचा बळी देतील. एकूणच समतेचा बळी देतील. बंधुभावाची अतिशय दुबळी आवृत्ती कवटाळतील. स्वातंत्र्य? ते तर दृष्टिपथातही नसेल!"

आणि या मोबदल्यात कमवाल काय? पुरुषसत्ता! रोजगार! सुरक्षित जीवन!

स्त्रिया म्हणतील, “घालूया बुरके-बुर्कीनी. नाहीतरी घराबाहेर पडताना नटायचं-मुरडायचं कशाला! शेजेवर तर नाजूक, रत्नजडित 'लँजरी' लेवून त्या टोण्याला सगळं आपल्या मनासारखं करायला लावूच! कुणी सांगितलंय ऑफिसातलं राजकारण आणि ताणतणाव झेलत बसायला! तरुणपणी त्या स्वयंपाकिणीला मान देत राहूया. वय वाढलं की ती कसरत एखाद्या तरणीवर सोडून मस्त वाट्टेल ते खातपीत 'कंफर्टेबल फिगर' घडवत मुलाबाळांवर, म्हाताऱ्यावर राज्य करूया. ते गृहिणी-सचिव-सखी-मैत्रीण एकाचवेळी करण्याचा ताण कशाला? पाळीपाळीनं दर वयाला योग्य ती भूमिका साकारत राहूया!"

***

आणि जसजशी जगाची लोकसंख्या वाढेल, वेगवेगळ्या नैसर्गिक घटकांचा, संसाधनांचा तुटवडा तीव्रतर, तीव्रतम होत जाईल तसतशी ही अदूरदृष्टी जास्तजास्त तात्कालिक लाभ द्यायला लागेल. ग्रंथबद्ध, एका डोक्यानं चालणारे, सर्व स्वातंत्र्य नाकारणारे, श्रेणीबद्धतेलाच सुरक्षितता मानणारे स्वार्थी समाज टिकतील. सर्वांना सारखं वागवू पाहणारे, "आभाळाला आजोबा अन् जमिनीला आजी मानून त्यांच्या कुशीत गुण्यागोविंदाने आनंदाने" राहू पाहणारे दुबळे ठरतील. ते फक्त स्वप्नं पाहत राहतील : "चंद्रसूर्य फिके पडतील असे सचेत कार्य" करण्याची. ते स्वप्नं पाहतील "एक तीळ सर्वांनी करंडून" खाण्याची. आणि ते "माणसावरच सूक्त रचावे, माणसाचेच गाणे गावे माणसाने" हे तर स्वप्नातलं स्वप्न ठरेल, जाग आल्यानंतर न आठवणारं.

***

विल्यम बट्लर येट्स या आयरिश-इंग्लिश कवीची 'द सेकंड कमिंग' नावाची एक प्रसिद्ध कविता आहे. शेवटच्या ओळी आहेत –

And what rough beast, its hour come round at last
Slouches towards Bethlehem to be born?

वेलबेकच्या पुस्तकाचं एक परीक्षण 'Slouching towards Mecca' या नावाचं होतं. 'द सेकंड कमिंग' हा शब्दप्रयोग ख्रिस्ताच्या पृथ्वीवर पुनरागमनासाठी केला जातो. परीक्षक म्हणताना दिसतो की यावेळी ख्रिस्ताऐवजी नवा मुस्लिम प्रेषित येईल, असं वेलबेक सुचवतो आहे.

पण मला त्याच कवितेतल्या आधीच्या दोन ओळी जास्त जाणवतात –

The best lack all conviction, while the worst
Are full of passionate intensity

आजची उदारमतवाद्यांची स्थिती नेमकेपणानं मांडणाऱ्या या ओळी सध्याच्या 'वक्तृत्वा'च्या महापुराचंही वर्णन त्याच नेमकेपणानं करतात!

***

वेलबेक स्वतःसाठी जी विशेषणं वापरतो ती पुन्हा आठवतो : शून्यवादी, प्रतिक्रियावादी, तुच्छतावादी, वंशवादी, निर्लज्ज स्त्रीद्वेष्टा. ती सर्व आपल्यापैकी प्रत्येकाला लागू पडतात. जर आपण वरवरचा एकदोन नॅनोमीटर वर्ख खरवडला, तर! फारच थोडी माणसं त्या वर्खातून कवच घडवू शकतात. इतरांमध्ये प्रमाणानं सर्वांत जास्त ते गेंड्याची कातडीवाले. ही कातडी फारतर चिखलाचे थर स्वीकारते, वर्खाचे नाही.

आणि वेलबेकनं हे स्पष्टपणे लिहिणं मला तरी शून्यवादी तुच्छतावादी वगैरे वाटत नाही.

***

आता मुळातच उदारमतवादाची, मानवतावादाची परंपरा नसलेल्या भारतीयांनी वेलबेकचं पुस्तक का वाचावं? वाचलंच समजा, तर त्यातनं काय घ्यावं?

गेली तीनचार वर्षं भारतातले उदारमतवादी, जगभरातले उदारमतवादी अत्यंत अस्वस्थ आहेत. त्या अस्वस्थतेच्या कारणांमध्ये जागतिक घडामोडीही आहेत आणि स्थानिकही. तुर्कीतली फसलेली राज्यक्रांती, 'ब्रेग्झिट' आणि ट्रंपही आहेत; आणि भारत-पाकिस्तान कुरबुरी, इंडियन सायन्स काँग्रेसमधलं छद्मविज्ञान, नालंदा विश्र्वविद्यालयातून अमर्त्य सेन वगैरेंची झालेली गच्छंती, नवनवी तर्कदुष्ट गठबंधनं आणि आघाड्या, सारं काही आहे. बरेच जण याला जगभरात येऊ घातलेल्या अंधःकारयुगाची चाहूल मानतात.

मीही उदारमतवादी आणि मानवतावादी आहे. मलाही हे सारे अपशकून वाटतात. येऊ घातलेल्या काळाबद्दल अस्वस्थ, अनाश्र्वस्त करतात. खरं तर मला जास्तच काळजी वाटते, की हे आणखी एका अंधःकारयुगानं संपणार नाही. वेलबेकचं एक पात्र जनुकीय बाबींचा उल्लेख करतं. जर पितृसत्ताक, संघटित धर्मवादी जीन्स वाढत जाणार असतील, तर येणारं युग टिकाऊ अंधाराचं असेल. हा वरवरचा निष्कर्ष ठरेल. मोदी-जावडेकरांपासून ट्रंपपर्यंत सगळे हवामानबदल आणि तापमानवाढ यांना क्षुल्लक मानतात. मी मात्र फार वर्षं त्या प्रकारावर नजर रोखून आहे. आणि उत्क्रांतीवरही.

आणि मला वेलबेकची भीती मनुष्यप्राणी नष्ट होण्यात परिणत होईल असं वाटतं. तशाही आज अस्तित्वात असलेल्या जीवजातींपेक्षा पृथ्वीवर कैक कोटी वर्षं वावरून नष्ट झालेल्या जीवजाती संख्येनं कैक पट आहेत. तर जेमतेम लाखेक वर्षांपूर्वी घडलेली तुमची माझी जीवजात टिकेल का?

अधिक वाचनासाठी काही दुवे -
१. The Road from Saddam Hussein to Donald Trump
२. Slouching Toward Mecca - Mark Lilla
३. The Second Coming
४. छद्मविज्ञानाचा कुटिरोद्योग

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

बरीच उदाहरणं ,संदर्भ,मतं दिलेली आहेत. शेवटच्या परिच्छेदातल्या प्रश्नांचे उत्तर नाही देऊ शकत.

धर्म आणि सत्ता लादण्याच्या गोष्टी आहेत. मुंग्या,माकडे ते मनुष्यापर्यंत. एवढंच मला माहित आणि ठाम विश्वास आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख अन त्या अनुषंगाने लेखकाने मांडलेले विचार वगैरे आवडले.

वेलबेकच्या पुस्तकाचं एक परीक्षण 'Slouching towards Mecca'२ या नावाचं होतं. 'द सेकंड कमिंग' हा शब्दप्रयोग ख्रिस्ताच्या पृथ्वीवर पुनरागमनासाठी केला जातो. परीक्षक म्हणताना दिसतो की यावेळी ख्रिस्ताऐवजी नवा मुस्लिम प्रेषित येईल, असं वेलबेक सुचवतो आहे.

मार्क लिलाचे परिक्षण वाचून तसे वाटले नाही*. उलट लिलाचे लेख वाचल्यास मिशेल अन त्याच्या विचारांतील (विशेषतः सद्यकालिन पुरोगाम्यांच्या टिकेतील) साम्य दिसून येईल. एक उदा.: The End of Identity Liberalism

परिक्षणातून उद्धृतः

Houellebecq’s critics see the novel as anti-Muslim because they assume that individual freedom is the highest human value—and have convinced themselves that the Islamic tradition agrees with them. It does not, and neither does Houellebecq. Islam is not the target of Soumission, whatever Houellebecq thinks of it. It serves as a device to express a very persistent European worry that the single-minded pursuit of freedom—freedom from tradition and authority, freedom to pursue one’s own ends—must inevitably lead to disaster.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

पुस्तक परीक्षणाच्या माध्यमातून सद्यपरिस्थितीवर टिप्पणी करणारा लेख आवडला.

वर नाइलने दिलेल्या लेखात लेखिकेने एक वाक्य लिहिलेलं आहे It also encourages the fantasy that the Republican right is doomed to demographic extinction in the long run — which means liberals have only to wait for the country to fall into their laps.

थोडक्यात अशिक्षित, परंपरावादी, गरीब, धार्मिक, घसरत्या बहुसंख्येचे गट एकत्र येऊन 'त्या लोकांपासून आपलं, आपल्या संस्कृतीचं रक्षण करायला हवं' असं म्हणून आपल्या बहुसंख्येचं असलेलं-नसलेलं बळ वापरून बिनलिबरल, कंझर्व्हेटिव्ह राज्यकर्त्यांना गादीवर बसवतात. जसजशी वर्षं जातील तसतसं त्यांचं बळ अर्थातच कमी होईल, कारण समाज अधिक सुशिक्षित, अधिक भिन्न चेहेऱ्यांचा, सुखवस्तू आणि बिनधार्मिक होत जाणार आहे. त्यामुळे अर्थातच बिनलिबरल लोकांची संख्या घटत जाईल. हे मला निश्चितच मान्य आहे. पण पाच वर्षांपूर्वी मी जितका आशावादी होतो तितका आता राहिलेलो नाही. भारतात मोदींना बहुमत, इंग्लंडमध्ये ब्रेक्झिटचा विजय, अमेरिकेतली मी जवळून पाहिलेली ट्रंपची निवडणूक आणि फ्रान्समध्ये येऊ घातलेल्या उजव्या पक्षाची सत्ता हे पाहून मला माझी या डेमोग्राफिक ट्रांझिशनबद्दलची खात्री थोडी खिळखिळी झालेली आहे. ती मुळापासून उखडलेली नसली तरी पुढच्या किती वर्षांत हे होईल याबद्दलचे अंदाज थोडे पुढे गेलेले आहेत.

या पुस्तकातून मुस्लीम असो किंवा निओनाझीवादी असो, लिबरल विचारसरणीला विकासाची भूल दाखवत प्रतिगामी शक्ती आपलं डोकं वर काढतील आणि ज्या स्वातंत्र्यांना फ्रेंच जिवाभावाचं मानतात, त्यांचाच विनाश करू शकेल ही भीती अधोरेखित केलेली आहे. तशी भीती वाटण्याचे दिवस आहेत हेही खरंच. ऐसीवर घेतलेल्या लहानशा सर्व्हेमध्येही नोटबंदीमुळे जनता हैराण झाली तरीही निवडणुकांत भाजपाला त्याचा काही तोटा होणार नाही, कदाचित फायदाच होईल असं मत पुढे आलेलं आहे. ते पाहून अशी भीती का निर्माण होईल याबद्दल समजून घेता येतं. अजूनही मी पुरेसा आशावादी असल्यामुळे मी त्या भीतीच्या आधारी गेलेलो नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या लेखाचा आणि त्यावर आलेल्या प्रतिक्रियांचा बॅकप विदागारातून मिळाला नाही. पण गूगल माऊलीच्या कृपेनं, तीन प्रतिक्रियांसकट पुन्हा प्रकाशित केला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0