बागकामप्रेमी ऐसीकर - २०१७
या वर्षी काय-काय पेरलंय/पेरणार?
मी (गावठी वाणाचे) टोमॅटो, भेंडी, (कमी तिखट जातीच्या) मिरच्या, कुर्जेटं आणि बेझिल लावले आहेत. फुलांमध्ये या वर्षी लिल्यांचे कंद लावलेले उगवून आले, फुलंही आली आहेत. ग्लॅडीओलाचे कंद उगवून आल्येत, पण फुलं यायला वेळ आहे. गेल्या वर्षी लावलेल्या झिनियाची फुलं तिथे टाकली होती, त्याची तीन झाडं उगवून येत आहेत. जर्बेराची दोन झाडं थंडीत टिकली, तीही फुलायला लागल्येत. सगळ्यांचे फोटो सवडीनं.
आजच गेल्या वर्षी लावलेल्या स्ट्रॉबेरीची दोन फळं आणि मोगऱ्याची तीन फुलं मिळाली. या वर्षी सायली (स्टार जाझ्मिन) लावली, त्यांचे फोटो.
वा | स्ट्रॉबेरी .. मस्तच
वा | स्ट्रॉबेरी .. मस्तच
माझ्या बाल्कनी गार्डनची अवस्था अंम्मळ बरी नाहीये. गेले ५-६ महिने जरा दुर्लक्ष झाले.
मिरच्या येतायत चांगल्या. कोथिंबिर दोनदा तिनदा चांगली झालेली. कुणी सांगितल पक्षी खाउन जातात म्हणे. आता परत थोडी दिसते आहे.
कढीपत्त्याला आणि बेझील ला परत नविन पालवी फुटली आहे.
मोगऱ्याला अजून काही नाही . मधे ३-४ फुले आली होती.
तांबड्या भोपळ्याचा वेल भरपूर वाढलाय, कळ्या आणि फुले पण येतात, पण अजून फळ नाही धरले.
भिंती लगत लावलेले मनीप्लॅन्ट (याला मराठीत काय म्हणतात्?) खूप पसरले आहे. जाळीच झालीय. मला ते काढायचय, पण सध्या त्यावर बाळ- बाळंतिण (सनबर्ड) असल्याने थांबलीय . :)
फोटो आहेत्... नंतर देईन इथे .
ओवा आणि टोमॅटो पण लावलेत्.. हळू हळू वाढतायत, पण अजून दाखविण्या इतके नाही झाले.
फुलं.
बरीच वर्षं मोगरा आणि अनंत या दोन भारतीय फुलांची फार आठवण येत होती. आकर्षक रंगांची पण गंध नसणारी फुलं दिसायला छान असली तरी आपल्या बागेत वासाची फुलं हवीतच, असं वाटत होतं. दोन वर्षांपूर्वी मोगऱ्याचं रोप एका मैत्रिणीनं पाठवलं; आता एकाची दोन झाल्येत. आज अनंताचं झाडही लावलं. (किती टिकतंय ते बघू; कारण त्याला थोडी सावली मिळालेली बरी, असं जालावर वाचलं. पण मी ते लख्ख उन्हात लावलंय. भरपूर फुलांच्या हव्यासासाठी. त्यासाठी रोज पाणी घालण्याचे कष्टही करायला मी तयार आहे.)
हे आज बनवलेलं अनंत यज्ञकुंड. (विटा कमी पडल्यामुळे तिथे कुंडी आणि खणताना बागेत सापडलेले दगड लावल्येत. पण ते बघितल्यावर, एका बाजूनं दोन कोरफडीच्या कुंड्या वाईट दिसणार नाहीत, असं वाटतंय. शिवाय आजूबाजूच्या गवताचं तिथे आक्रमण होऊ नये म्हणूनही उपयोग होईल.)
अनंताला किंचित आम्ल असणारी जमीन चांगली असं वाचनात आलं. शिवाय सतत ओलसर मुळं असावी लागतात. म्हणून दारच्या लाईव्ह ओकाची काही पानं जपून ठेवलेली होती, जमिनीवर आच्छादन म्हणून. ती मातीवर पसरली. या पानांचं विघटन सहज होत नाही; किमान तीनेक वर्षं लागतात म्हणे. पानांमुळे म्हणे, जमिनीचं पीएच कमी होतं (आम्लता वाढते), अशी जालमाहिती. म्हणून पानांचा तीनेक इंचांचा थर मातीवर पसरला. मग दिसायला बरं म्हणून विकतचं आच्छादन त्यावर पसरलं. ही आरास पसरू नये हेसुद्धा यज्ञकुंडाचं प्रयोजन.
गवताचा एक छोटा भाग पूर्ण रिकामा करून तिथे शेवंतीचा वाफा बनवायला सुरुवात केली आहे. अजून रिकामी जागाच जास्त आहे. पण उन्हाळ्यात फुलं कमी झाली की आहेत त्या झाडांची छाटणी करून, त्यातून नवीन रोपं बनवेन. नवरात्रीच्या सुमारास बाजारात नवीन झाडं येतील. ती तेव्हा विकत घ्यायची नाहीत; दुकानातल्या झाडांचा बहर ओसरला की तीच झाडं कमी किंमतीला मिळतात. तेव्हा विकत घ्यायची. पुढच्या वर्षी झाडांना पुन्हा बहर आला की मग फोटो काढून आंजावर मिरवायचं.
शेवंतीच्या बियाही दुकानात मिळाल्या. पण त्यांतली एकही उगवून आली नाही. माझंच काही तरी चुकलं असणार. कोणी हा प्रयोग केला आहे का?
कॅटनिप
सगळ्यात महत्त्वाची कुंडी दाखवायची राहिलीच होती. कॅटनिपची. बऱ्याच मांजरींना या झाडाचा वास आवडतो. शेवंती, पुदीन्याच्या जातीचं हे झाड असतं. पानांचा वास साधारण च्युइंगगमची आठवण करून देणारा असतो. मांजरी ही पानं खात नाहीत, पण तो वास अंगाला लागावा म्हणून पानांवर अंग घासणं, पानांची शिकार करणं वगैरे प्रकार करतात. आमच्या तिर्रीबाईंनाही हा प्रकार आवडतो. त्यामुळे दोन आयताकृती कुंड्यांमध्ये बिया पेरल्या होत्या.
त्यांतली एका कुंडीतली दोन झाडं तिनं मारामारी करताना पार मोडूनतोडून टाकली होती. मला वाटलं होतं की संपली आता ही झाडं. म्हणून दुसऱ्या कुंडीतही बिया पेरल्या. पण त्या झाडांना पुन्हा पालवी फुटली आहे.
आमच्या बाईंना आपण होऊन त्या झाडांची फार आठवण येत नाही. मी कुंडीत सोडलं की तिथे त्या रमतात. कधी तिला गिफ्ट म्हणून मी दोन-चार पानं खुडून घरी आणते. त्यामुळे झाडंही उंच, किडकिडीत होण्याऐवजी अंगानं भरतील, अशी आशा आहे.
हा धागा बन्द का पडला आहे
हा धागा बन्द का पडला आहे ?
या संस्थळाचा शोध मला या 'बागकाम' च्या धाग्यामुळेच लागला. गेले अनेक महिने इथे येऊन अत्तापर्यंतच्या सगळ्या बागकामाच्या धाग्यांची कीतीतरी पारायणे केलेली आहेत. पिवळा डंबिस, रोचना , अदिती, शुचि ,ॠषिकेश ई. सर्वाचे प्रतिसाद खूप आवडले.
हे धागे वाचून बागकामाचे खूपच वेड लागले आहे. इथुन प्रेरणा घेऊन ३ एक महिन्यापुर्वी बागेत मिरच्यांच्या बिया पेरल्या होत्या. अता मिरच्या यायला सुरवात झालेली आहे. सध्या पुण्यात आघारकर मधे परसबागेचा कोर्स पण करत आहे.
इथे परत सगळ्या बागकाम प्रेमींनी लिहायला सुरवात करावी अशी विनंती आहे.
कालच अनंताला पहिलं फूल आलेलं
कालच अनंताला पहिलं फूल आलेलं दिसलं. पण बऱ्याच बारक्या कळ्या जळलेल्या दिसत आहेत
मालकिण बाई, माझा हाच प्रश्न होता जुन्या धाग्यावर्. कळ्या खुप लागतात पण त्या त्यांच्या मुळाशीच काहीतरी होऊन उन्मळुन पडतात किंवा काळ्या पडतात्.
एकुण कळ्यांमधली १०% सुद्धा फुले होत नाहीत.
त्याचा संबंध उन्हाशी नाहीये तर कुठल्यातरी बॅक्टेरीया व्हायरसशी आहे.
माझ्या कडच्या एका झाडावर ( कुंडीतल्या ), मी खुप कष्ट घेउन कळ्या मध्यम आकाराच्या झाल्यावर त्यांच्या देठाना हातानी बुरशीनाशक औषध चोळुन आणि तिथला भाग स्वच्छ केला. तेंव्हा बरीच फुले आली. पण हे दरवेळेला करणे अशक्य आहे.
दोन प्रश्न. फोटो नंतर कधीतरी...
आम्हीही खूप लावल्याहेत वनस्पती. घराला रंग दिल्यावर रंगांच्या डब्यांत, कुंड्यांत, डब्यांत मिळेल ते झाड लावलं. चिकूची अफाट रोपं आहेत. एका डब्यात फक्त खतच खत असल्याने जे क्काय पण टाकू ते उगवतं. त्या एकट्या डब्यात सुमारे साताठ चिकू, ३-४ लिच्या इत्यादी उगवलंय. आंबे ३ ते ४. चाफा, गुलाब, हळद, आलं (आदूबाळ आलं आलं बर्का :P) लिंबू, कडीपत्ता, मरवा( सध्या स्वर्गवासी) , मोगरा, जास्वंद इत्यादी खच्चून लावलेलं आहे. सगळ्यात फेव्हरीट कृष्णकमळ. चांगल्या दांडग्या कुंडीत वेल लावून तो खिडकीच्या ग्रिलवर चढवलाय.
कंपोस्टही करायला ठेवलंय, पण ते कसं करायचं नक्की हे कळत नाही. एका बादलीत माती, ओला कचरा, गांडूळ खत, आणि वर माती असे थर हा प्रकार करून झाकून ठेवलाय. Smells to holy hell and back when opened.
खालील प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडून हवी आहेत बा-
१. ते खत तयार व्हायला काय केलं पायजे? उघडी ठेवावी का बादली? पाणी घालत रहावं का?
२. मरवा नावाला इतका का जागतो? मरव्यांचं जेनोसाईड अग्गदी ठरलेलं आहे. ते का होत असावं?
फिरवलं नाही म्हणून
कंपोस्ट ढवळत राहा. पिळून काढलेल्या ओल्या, सुती कापडाइतपतच आर्द्रता कंपोस्टात ठेवा. वास येतोय तोवर तर कंपोस्ट उघडंच ठेवा. खूप पाणी असेल तर रद्दी, पुठ्ठा, वाळकी पानं चारा त्याला.
मी दीड वर्षापूर्वी गोळा केलेली पानं प्लास्टिकच्या पिशव्यांत भरली होती. त्यतून थोडा स्वयंपाकघरातला कचरा घातला. थोडं पाणी. पिशव्यांना भोकं पाडली आणि वरून तोंड बंद केलं. त्याचं कंपोस्ट आता वापरायला तयार आहे. फाॅरम्युला : खूप कोरडा कचरा, थोडा ओला कचरा.
आणि झाडांचे फोटो लवकर दाखवा. मग ऐसीदेवता प्रसन्न होईल.
अनेकानेक धन्यवाद!
ते ढवळणं वगैरे म्हणजे नरकयातना आहेत. करतो. तेही करतो. पाणी मीही नाही टाकलंय म्हणा... एकदा पेपरात वाचल्याचं आठवत होतं की कोणी एकाने फक्त ओला कचरा (मातीगिती नाही) ठेवून त्यात जाता येता पाणी घालत राहिल्यावर कंपोस्ट लवकर तयार झालं म्हणे!
हा माझ्या एकेकाळच्या मरव्याचा फोटू. फार काही दिसत नाहीये... पण टाकेन सवडीने बाकीचे.
भटोबा, तुमच्या रसिक
भटोबा, तुमच्या रसिक प्रतिसादाखाली कंपोस्टाला कसं वाचवायचा असा प्रतिसाद देताना मलाही अंमळ यातनाच झाल्या. पण समजून घ्या.
कंपोस्ट फार ओलं असेल तर ढवळायला त्रास होईल. कंपोस्टचा वास चांगला नसणं, याचा अर्थ तिथे anaerobic श्वसन होतंय; ऑक्सिजन कमी मिळतोय. ज्वलनाच्याजागी आंबण्याची क्रिया होत्ये. गुड लक.
मलाही कंपोस्टची पाककृती समजायला थोडा वेळ लागला. शिशिरात गळणाऱ्या पानांचं कंपोस्ट करायचंच, चार वर्षं लागली तरी हरकत नाही, असं ठरवल्यामुळे पाककृती समजली. मी ही पानं ढवळत नाही, म्हणूनच त्यात ओला कचरा फार घालत नाही. त्यामुळे त्याला वेळ खूप लागतो. घरचा इतर ओला कचरा ज्या कंपोस्टरात घालते त्यालाही काही महिन्यांपूर्वी वास येत होता. त्यात चिकार पानं घालून ते सगळं ढवळत राहिले. आता वास गेलाय; कंपोस्ट होण्याची प्रक्रिया फार जलद होत्ये असंही नाही. पण आतला ओला कचरा काही दिवसात ओळखू येईनासा होतो; वाईट वास अजिबातच नाही; कागद जिरायला मात्र बराच वेळ लागतो.
शिशिरात गळणाऱ्या पानांचं
शिशिरात गळणाऱ्या पानांचं कंपोस्ट करायचंच, --
ती आणि वाळलेली पानं यांमधलं सेल्युलोज /लाकूड विघटन करण्याचं काम वाळवी जलद करते. वाळवींची विष्टायुक्त माती पुदिना वगैरे हर्बझसाठी उत्तम खत असते. अशी माती मला मुंम्ब्र्याच्या डोंगरावर मिळाली होती एकदा.
एरवी गळलेली पानं कुजवायला एक वर्ष लागते. हेच लीफ मोल्ड. नाजुक फुलझाडे,हँगिग टाइपसाठी उत्तम.
ढवळलं बरं का
आज अगदी सगळं धैर्य गोळा करुन ते ढवळायला गेलो. बुरशी लागल्ये जबरदस्त. एक फांदी घेऊन घुसळ-घुसळ-घुसळलं. आधी लालमातीही टाकली होती, आता सगळं मिश्रण काळं काळं झालंय. फक्त २ आठवड्यांत. गांडूळखताचा प्रताप असावा. ते अगदीच ओंजळभर टाकलेलं. सुकवलेला बचकभर कांदा टाकला होता, जो तसाच आहे बराचसा. निर्माल्य अर्धं कुजलंय. वास भयानक. ते एरोबिक श्वसन व्हावं म्हणून बादलीचं झाकण जsरा उघडं ठेवलं, तर घरातही बसवेना. आजूबाजूला जमलेली वाळकी करकरीत पानं उचलून टाकली. आता बघू काय होतंय ते.
कंपोस्टचा वास
कंपोस्टला भयानक वास मारणं हा कदाचित गांडूळ खताचा परिणाम असेल. माझ्या घरी गेली कित्येक वर्षं मी बाल्कनीतच सगळा ओला कचरा जिरवतो. पुण्यात कुणी तरी कोरडी मातीसदृश मिश्रण देतात. ते कंपोस्टचा स्टार्टर म्हणून वापरलं होतं. पहिले काही आठवडे त्याची काळजी घ्यावी लागली - विशिष्ट कचरा न टाकणे वगैरे. एकदा तयार झाल्यावर मात्र अजिबात काही करावं लागत नाही. उघड्या कुंड्यांमध्ये मी घरचा सगळा ओला कचरा रोज टाकतो. काही दिवसांत वरच्या ताज्या थराखाली खत तयार होतं तेव्हा उकरून खालचा थर काढून मी सोसायटीच्या बागेत नेऊन टाकतो. वास वगैरे येत नाही. कुंडीला रोज थोडं उन मिळतं, पण पावसाळ्यात तेदेखील मिळेल ह्याची शाश्वती नाही. तरीदेखील वास मारत नाही.
गांडूळ खताला स्वत:चा असा
गांडूळ खताला स्वत:चा असा काही वास नव्हता. त्यातलं कायतरी रीअॅक्ट होऊन वास येत असावा. कुजलेल्या निर्माल्याला मात्र भयानक घाण वास आणि काळंकुट्ट पाणी सुटतं. तो वास जाणवतो कंपोस्टाच्या वासात जाणवतोच, पण कंपोस्टाचा अजून भयानक आहे. अहो, घराबाहेर ठेवलेल्या बादलीच्या झाकणाची, जेमतेम झुरळ जाईल इतकी फट उघडी ठेवली, तर घरात बसवेना. मुळात मिश्रण जरा जास्तच ओलं आहे हेही आहेच. तरी नशीब, माशांची डोकी वगैरे नाही टाकली. एकदा तो प्रयोग अफाट यशस्वी झाला होता खरा. प्रचंड सुपीक झालेली माती. सध्या इथे ते परत केलं तर उत्साही माऊ काय काय करतील सांगता येत नाही.
जैववैविध्य
>>तरी नशीब, माशांची डोकी वगैरे नाही टाकली. एकदा तो प्रयोग अफाट यशस्वी झाला होता खरा. प्रचंड सुपीक झालेली माती. सध्या इथे ते परत केलं तर उत्साही माऊ काय काय करतील सांगता येत नाही.<<
माझ्या कचराकुंडीत ती असतात. शिवाय, प्रसंगी काही "She/He Who Cannot Be Named" धर्तीचा कचरा असू शकतो. तरीही वास येत नाही. कारण मला नक्की माहीत नाही, पण कदाचित पहिल्यापासून कचरा उघडा ठेवल्यामुळे हवा खेळती राहिली हा घटक महत्त्वाचा असेल. राहता राहिल्या मांजरी वगैरे - त्याबद्दल मी फार काळजी करत नाही, कारण माझं उद्दिष्ट मुळात कंपोस्ट करण्याचं नसून कचराविल्हेवाटीची जबाबदारी नगरपालिकेवर न टाकता निसर्गावर टाकण्याचं आहे. मांजरी, कावळे, वगैरे माझ्याही कचऱ्यात तोंड घालतात, पण त्यांचं मी स्वागतच करतो.
+१
कचराविल्हेवाटीची जबाबदारी नगरपालिकेवर न टाकता निसर्गावर
अगदी!
तोंड घालायला हरकत नाही हो, वासाला आहे. आणि आमच्याइकडे सगळे कॉंक्रिट/डांबरी रस्ते. तर माऊंनी मुंबई जी हागणदारीमुक्त झालेली आहे ते भलतंच मनावर घेऊन त्या डब्याचा वापर करू नये ही इच्छा असते.
नोव्हे-जानेवारी काळात
नोव्हे-जानेवारी काळात निरनिराळ्या ठिकाणी ,शाळांत विज्ञान प्रदर्शने भरवली जातात. चारचार विद्यार्थी गटाने एखादं उपकरण ( सायकलवर मोबाइल चार्जिंग/)एखादं संयंत्र ( कचरा -सांडपाणी विल्हेवाट -खत निर्मिती इत्यादी) मांडून ठेवतात. छानछान पुठ्ठ्यांच्या डब्यांच्या टाक्या,नळ्या पाइप लावून पाट्या लिहिलेल्या असतात. मी मुद्दामहून काही विचारतो. उत्साहाने माहिती देतात. गर्दी होतेय कुठे म्हटलं की शिक्षिका लगेच मागे येऊन उभ्या राहतात. या खता गॅसला किती वेळ लागतो वगैरे विचारून आनंदावर पाणी पाडत नाही.
मज्जा असते.
गंध
सध्या कंपोस्टाला भीषण वास असेस्तोवर मांजरी तिकडे फिरकणारही नाहीत. आपल्याला सुसह्य वाटणारा कॉफीचा वास बहुतेकशा मांजरींना आवडत नाही. जवळ एखादं सीसीडी असेल तर तिथून वापरलेली कॉफी पूड आणून कंपोस्टावर शिंपडून ठेवा. पण वास येणाऱ्या कंपोस्टात आधी वर पालापाचोळा पसरा. (स्टारबक्समध्ये वापरलेली कॉफीपूड कंपोस्टासाठी फुकटात देतात. सीसीडीवाल्यांनी काचकूच केली तर त्यांना हे सांगून कदाचित काही फायदा होईल.)
अमेरिकेत अजूनही 'हागणदारीमुक्त गाव' ही उपयुक्त संकल्पना आलेली नाही. त्यामुळे परसदारात फिरताना मला जरा काळजी घ्यावी लागते. पालापाचोळा वापरून, तो 'मालमसाला' मी कंपोस्टरातच ढकलते. हा 'मालमसाला' एखाद दिवसात कोरडाही होत असेल, उचलणंही सोपं होतं.
कंपोस्ट- परत
आज मनाचं पाठ्यपुस्तक करून ते कंपोस्ट उपसायला घेतलं. अवघा मराठवाडा आनंदून जाईल इतके बुरशीचे ढग साचले होते. काठी घेतली भक्कम, आणि ढवळ-ढवळ-ढवळलं. आर्द्रता बर्रीच आहे अजून. सगळ्या मिश्रणाला एक काळा रंग आलेला आहे. थोडासा तो कांदा, आणि दोन-तीन पानांचे अवशेष दिसतात. काळ्याकुट्ट सुतरफेणी सदृश माल आहे बराच. वास तर जीवघेणाच आहे अजूनही. घरात नारळाच्या शेंड्या होत्या, त्या पिंजून-पिंजून टाकल्या. आता गणपतीनिमित्ताने अजून येतील त्याही टाकेन. पण भुसभुशीत मातीसारखं खत होण्याच्या पायरीपासून हा प्रकार बराच दूर आहे हे नक्की. आता हे मी उघडंच ठेवलंय,घरात फार काही वास येत नाही. पाहू.
१४टॅन, ढवळाढवळ आणि वासापासून
१४टॅन, ढवळाढवळ आणि वासापासून सुटका करायची झाल्यास प्रथम तुमचा उद्देश १) घरातला ओला कचरा वापरणे, २)मोठ्या झाडांची पडलेली वाळलेली पाने उपयोगात आणणे हे ठरले की जालावरचे how to ~~~ लेख वाचलेत की काय करायचे ते लक्षात येईल॥ तीच माहिती इथे देत नाही कारण सविस्तर आहेच.
वनफॅारटॅन,
वनफॅारटॅन,
१)चिकू,लिंबू,आंबा यांची यांची रोपं हौस म्हणून ठीक आहेत. १३-वर्षानंतर फळं लागतील. कलम आणा. नारळाला दुसरा उपाय नसतो.
२)मरव्याला गारवा आणि फिल्टर्ड उन लागते.मुळांशी पाणी साचायला नको.
३)कंपोस्ट तयार करून वापरायचे तर चार महिने लागतात.त्याऐवजी घरातला ओला कचरा वापरणे हा हेतू असल्यास वेल भाज्या लावा.ते ओला कचरा कुजताकुजता खातात. वास न येता वापरण्याची युक्ती आहे.
४)कृष्णकमळाचा मांडव करून त्या खालच्या जागेत इनडॅार प्लान्टस टांगा. मरवाही चांगला येईल.
अनेकानेक धन्यवाद अचरटबाबा!
१) माझी आजी वनवासी कल्याण आश्रमाचं बरंच काम करते. अशी बरीच रोपं झाली की ती घेऊन जाते आणि तिथे(पाड्यांवर) लावून टाकते. मी प्रचंड पर्यावरणवादी असल्याने माझ्याच्याने बिया, कोयी टाकवत नाहीत. दिसल्या की पेरल्या. मग ती रोपं स्थलांतरित.
२) हां, कळलं. इथे गारवा अजिबात नाही. उन्हाळ्यात गरम भयानक होतं. भयानक. उन, पडलं तर पडलं. दिवसातून जेमतेम २-३ तास. आर्द्रता १००% च्या आसपास असते.
३) हां, करुन पाहतो. भोपळा, कारलं वगैरेच ना?
४) ते कृष्णकमळ तेव्हढं वाढायला तपं जायचीएत अजून. साधारण ५ मीटर वाढलंय ते, आणि फार जाड खोडाचंही नाहीये.
अवांतर
आमच्या घरी ऊन फार कमी येत, घर रस्त्या लगत असल्याने लोकांची ये जा आणि धुरळा ही बराच असतो.
गच्चीत ऊन येतं, तिथे बऱ्यापैकी वाढतात झाडं. कमी उन्हात कोणती रोपं लावू शकतो?
तसंच पुण्याला जसे कोर्स आहे तसे मुंबई मध्ये असल्याची कुणाला माहिती आहे का?
१) माझ्याकडे बॅल्कनितच काहीना
१) माझ्याकडे बॅल्कनितच काहीना काही रोपे असतात. त्यांचे नशिब चांगले असले तर चांगल्या घरी पडतात. रिठा,हिरडा,भोकर,निंबोणी उपयुक्त झाडे आहेत. रोपे सहज होतात. यांच्या फळांना मागणी असते. आता तोरणाची ( वाटाण्यापेक्षा मोठी पांढरी फळे )रोपे आहेत. बोरवर्गातले झाड.तुमची आजी चांगला छंद लावून आहे.
२) कंपोस्टची पद्धत-मोठ्या कुंडीत/( मोठ्या माठात कापून )कारल्याचा वेल मध्यभागी न लावता कडेला लावायचा. दोरी आधाराची अगोदरच असावी वेल फार जलद वाढतो. एका दोनचार किलोची प्लास्टिक बॅग घेऊन त्यात ओला कचरा ओला करून वरपर्यंत भरा. उलटी करून वेलाच्या बुंध्यापासून दूर मातीवर बसवा. दोनचार भोके खाली म्हणजे आता वर पाडा. वेलाला पंचवीसेक पानं आल्यावर हे करायचं आहे. कचरा कुजत जाउन काळं पाणी मातीत मुळांना मिळत जाते आणी वेलाची मुळे तिथे घुसतात. पिशवीला अजिबात हलवायचं नाही॥ चारपाच दिवसांनी भोकातून किंचिंत पाणी टाका. वासवगैरे न येता काम होते. वेलवर्गिय पडवळ,दुधी कारली ,भोपळा यांच्या मुळांना कुजणाय्रा गोष्टीचा उबदारपणा मानवतो,चालतो. माशी भोकातून आत जाऊन अंडी घालू नये म्हणून एका कापडाने झाकणे.
२) फुले छान आहेत
३) रस्त्याकडच्या बॅल्कनित काचा लावल्या असल्या तर शोभिवंत गवत लावता येईल
>>पुण्याला जसे कोर्स आहे तसे
>>पुण्याला जसे कोर्स आहे तसे मुंबई मध्ये असल्याची कुणाला माहिती आहे का?>>
१) मराठी विज्ञान परिषद,चुनाभट्टी रेल्वे स्टेशन पूर्व पंधरा मिनिटांवर आहे.
२) कालिना ( कुर्ला - सांताक्रुज रोड) मुंबई युनिवर्सिटी -गरवारे -
या दोन ठिकाणी मराठीत, नॅशनल कॅालेज बांन्द्रा येथे इंग्रजित कोर्स आहेत. सर्टिफिके मिळते. फी अंदाजे दहाबाराहजार रुपये. पाच सहली असतात यात पाच नर्सरीला भेट.
( केवळ सर्टिफिकेट आणि एका ठिकाणी नवीन ओळखी होतात हा फायदा. अन्यथा नॅशनल बुक ट्रस्टची वेजटबल्स।गार्डन फ्लावर्स,ट्रिज,रोज ही साठ पासष्ट रुपयाला मिळणारी पुस्तके आणून आपण प्रयोग करावेत. याच पुस्तकांतील माहितीच्या फोटोकॅापिज देतात कोर्सला. खतं ,माती, हंगाम,पेरणी,काढणी,निगा,रोग,औषधं,झाडांच्या जाती सर्व काही आहे.)
मराठी बागकामाच्या पुस्तकांत याच पुस्तकातून काढलेली माहिती दिलेली असते.
युटुब विडिओंमध्ये तिसांत एखादा कामाचा असतो
**जिजामाता उद्यान ( राणीचा बाग), भायखळा इथे फेब्रुअरी च्या १-२आठवड्यात तीन दिवसांचा बागकाम कोर्स फुलटाइम असतो मुंबई मनपालिकेतर्फे. इनडॅार प्लान्ट्स,गार्डन डिझाइनिंग, बोनसाय,मेडसिनल प्लान्टस,मोठी झाडे,फलवृक्ष,कलमं करणे इत्यादी माहिती प्रात्यक्षिकांसह असते. शुक्रवार-शनि-रविवार.
पहिल्या दिवशी येऊनही प्रवेश घेता येतो. फी पाच शे रुपये. नाव न नोंदताही तिन्ही दिवस मंडपात बसता येते नि:शुल्क. ओळखी होतात.
माझ्या नवीन घराभोवती सुमारे
माझ्या नवीन घराभोवती सुमारे १००० स्क्वेअरफीट जागा बागस्वरुपात रिकामी आहे. त्यात चाफा, पेरु, पिंपळ आणि निलगिरी ह् आगोदरच अस्तित्वात आहेत. (कोणी लावले कोण जाणे).
तर आता..
कोणती झाडं तोडून टाकावीत?
कोणती झाडं, भाज्या, फळझाडं १००० स्क्वे फुटात लावता येतील?
शेवगा, लिंबू, कढीलिंब ही तीन किमान गरजेची झाडं मनात आहेत.
पावसाळा जोरात सुरु झालाय. लवकर झाडं / वेली/ भाज्या इ. सुचवा.
अभिनंदन गवि
यातल्या बहुतेकशा भाज्या मी घेतल्या आहेत. सोप्या असतात, हे खरंच.
उन्हाळी, फळभाज्यांसाठी दिवसभर थेट सूर्यप्रकाश लागतो. पाल्यासाठी कमी सूर्यप्रकाश पुरतो. पालक, अळूसाठी कमी उजेड पुरेल. मेथीचं मला माहीत नाही. इथे पालक आणि मेथी थंडीत पेरतात; तुम्हालाही तसं करता येईल. थंडीत पालक, मेथी, मुळा, बीट, कॉलीफ्लावर या भाज्या लावायच्या. उन्हाळ्यात टोमॅटो, मिरची, वांगं, भेंडी, भोपळा, काकडी.
झाडांची पानं गळत असतील तर तीही गोळा करून वापरता येतील. स्वयंपाकघरातला सगळा कचरा कंपोस्टात जिरवता येईल. जालावर म्हणतात की दुग्धोत्पन्न पदार्थ आणि मांसाच्या गोष्टी कंपोस्टात टाकू नका. पण तुमचा कंपोस्टर बंद होत असेल तर बिनधास्त टाका कंपोस्टात.
एकदम एवढी भाजी-शेती करणं शक्य नसेल तर दर मोसमात थोडं थोडं करत काम वाढवत न्या. टोमॅटो, भेंडी आणि मिरची या तीनही भाज्या वाढवणं अगदी सोपं आहे.
पिंपळ
गवि, अभिनंदन.
चाफा आणि पेरू यांचा फार विस्तार आणि सावट होत नाही. चाफ्याची छाटणी करून त्याचा पसारा बेताचा ठेवता येतो. पेरू जर फार जुना असेल आणि धरत नसेल तर कापून टाकून त्याऐवजी हव्या त्या जातीचे पेरू कलम बागेत आपल्याला हव्या त्या ठिकाणी लावता येईल. पिंपळ मात्र काढून टाका. फार आक्रमक असतो. प्लंबिंग् लाइन्स, भिंतीतले सांदीकोपरे कुठेही रुजतो. फार सावट होते. मोठा पिंपळ तोडायला धार्मिक कारणास्तव मजूर मिळत नाहीत. एखादी मोठी फांदी घरावर येत असेल तर स्वखर्चाने ती तोडून त्याची विल्हेवाटही निदान मुंबईत तरी स्वत:च लावावी लागते. घर मुंबईबाहेर असेल तर ठीक आहे. नारळ वगैरे अजिबात लावू नका. लावलेत तर सिंगापुरी बुटकी जात लावा. नारळ पाडणे हे एक फारच कटकटीचे काम आहे. नारळ सोलून नंतर त्यातली सोडणे, काथ्या, इत्यादिची विल्हेवाट लावणे अतिशय खर्चिक आणि मुख्य म्हणजे फार कटकटीचे असते मुंबईत. अलीकडे हा असा कचरा कचरापेट्यांत टाकता येत नाही. आणि मुळात अलीकडे बऱ्याच ठिकाणी कचरापेट्याच नाहीत (मुंबईत.)
आमच्या येथे होळीच्या आधी झाडांवर असलेली सर्व अर्धीकच्ची कशीही फळे चोरीला जातात. वॉचमन चा उपयोग नसतो.
पारिजात
एखाद्या चांगल्या वाढलेल्या पारिजातकाच्या झाडाखाली जर मातीची जमीन असेल, म्हणजे concrete नसेल तर तिथे बिया पडून छोटी छोटी रोपे उगवत असतात. पण असे झाड आसपास नसल्यास नर्सरीत रोपे मिळतातच . आवळ्याचे झाड फार वाढत नाही आणि वाढले तरी छाटून आटोक्यात ठेवता येते . बेल उंच वाढतो पण छाटता येईल .देवचाफ्याच्या फांद्यांचे फूट दीड फूट लांबीचे तुकडे सहज जगतात. नाही तर नर्सरी आहेच. इतर चाफ्याम्ची रोपेही नर्सरीत असतातच .
हो भेटतात कि नर्सरी मध्ये.
हो भेटतात कि नर्सरी मध्ये. आमच्या घराच्या पार्किंग मध्ये मी लावली आहेत थोडीफार झाडे
१. ७ गुलाबांची झाडे ज्यात पिवळा पांढरा गुलाबी आणि लाल गुलाब आहेत
२. २ पारिजातकांची झाडं एकदम गेट एन्ट्री लाच
३. १ सोनचाफा अन एक पुडी चाफा
४. १ अनंत
५. २ ख्रिसमस ट्री
६. १ जाई चा वेल
७. १ ब्रम्हकमळ
८. १ जसवंद
९. १ इच्छा ( हे कुंडीत येत, ह्याची एक काडी आणून लावली कि काही दिवसांत सगळ्या कुंडीभर पसरत )
अजून आहेत, पण घरी पाळायची वेळ झाली, नंतर ...
Update:
१०. ४ तुळस
११. १ कडिपत्ता
१२. २ फायकस (मराठी नाव नै माहित, पण डेरेदार असतं)
१३. १ कोरफड
१४. चिमकुर्याचे चार-पाच गड्डे, टँडर्ड भाषेत आळू
१५. १ लिंबोनी
अपकमींग:
गेल्या तीन सुट्टयांपासून कुलरच्या छीद्र पडलेल्या ट्रे मध्ये मिरच्या अन् कोथिंबीरीची लागवड करायचा विचार चालुय. ह्या रविवारी नक्की करेन म्हणतो. तीनेक पोते माती आणावी लागेल चांगली एवढच
टिकोमा ला घंटीफुल / पुष्प
टिकोमा ला घंटीफुल / पुष्प म्हणतात.
भेटणे हे भेट होणे / घेणे याच्याशी निगडीत आहे. माणसं भेटतात. मिळणे हे सापडण्याशी, हरवलेला माणूस मिळू शकतो, इतर माणसं भेटू शकतात.
बाकी इतर गोष्टी (वस्तू, वेळ, ठिकाण इ इ) मिळतात. जेव्हा बाकीच्या गोष्टी मानवी आहेत असा विचार करुन लिहीलं जातं ( उदा. गोष्टींमध्ये बरेचदा प्राणी पक्षी भेटतात ) तेव्हा भेटणं हे वापरणं बरोबर असतं.
@बॅटमॅन - मला काही तुमच्या इतकं मुद्देसुद पटवून देता येतं नाही. पण यही सिला दिया आपने अपनी दोस्ती का???
अशुद्ध!
भेटणे हे भेट होणे / घेणे याच्याशी निगडीत आहे. माणसं भेटतात. मिळणे हे सापडण्याशी, हरवलेला माणूस मिळू शकतो, इतर माणसं भेटू शकतात.
वऱ्हाडी बोलीत हे अशुद्ध आहे. नंदा खरेंची माहितीपर पुस्तकं, लेखन वाचलंय का? मराठीच्या इतर बोलीभाषांत काय शुद्धाशुद्ध हे मला माहीत नाही.
एखादी वस्तू 'भेटणे' हे
एखादी वस्तू 'भेटणे' हे पूर्णपणे, कोणत्याही बोलीभाषेत, आणि प्रमाण मराठीतही अशुद्ध आहे.
चूक. भेटणे हे रूप अनेक बोलीभाषांत दिसतं. व्हेरियसली स्पीकिंग- नगर, मराठवाडा (बीड), सोलापूर, विदर्भ(अमरावती), इ. ठिकाणच्या लोकांच्या तोंडून ऐकलेले आहे. एखादे शब्दरूप भाषेत असले तर त्याचे रेकॉर्डिंग झाले पाहिजे, निव्वळ शुद्धाशुद्धतेच्या कल्पनांनी त्याला लाथाडणे बरोबर नाही. शुद्धाशुद्ध वगैरेचा उपयोग फक्त प्रमाणभाषेपुरता. त्यापलीकडे नाही.
ह्याने भाषा संपन्न होत
ह्याने भाषा संपन्न होत नाही काय???
भेटणे या एकाच क्रियापदाने होते वाटतं?
अधिकाधिक लोकं चुका करतात म्हणजे ते बरोबर आहे म्हणणं म्हणजे फारच झालं.
पाणी पिलं असंही बरेच लोकं म्हणतात (बोली भाषेत आणि बरेच लोकं) म्हणजे ते बरोबर आहे असं कुठे आहे?
अधिकाधिक लोकं चुका करतात
अधिकाधिक लोकं चुका करतात म्हणजे ते बरोबर आहे म्हणणं म्हणजे फारच झालं.
पाणिनी आणि पतंजली या लोकांच्या मते हेच बरोबर आहे.
शुद्ध आणि अशुद्धाच्या नक्की व्याख्या आर्बिट्ररी आहेत. सध्याच्या प्रमाण मराठी बोलीत व लिखाणात भेटलं, पिलं वगैरे रूपे त्याज्य आहेत हे खरेच. पण प्रमाण बोलीत असं नसतं हे सोडल्यास अर्गुमेंट काय आहे दुसरं?
एक साधे उदाहरण देतो. कोणे एके काळी मराठीत अॅ ऑ वगैरे 'चुकीचे' स्वर नव्हते (प्वॉट दुकतं वगैरे म्हणणाऱ्यांना येड्यात काढायचे.) तेच इंग्रज आल्यावर अधिकाधिक अॅ ऑ वाले शब्द लिहायची गरज भासली. अखेरीस 'चुकीचे' स्वर दर्शवायला वेगळी अक्षरचिन्हे बनवावी लागली.
कोंणें एंकें कांळीं मराठींत सगळींकडें अनुस्वांर द्यांयचें, तें आतां देंत नांहींतं. कालौघात अनुस्वारांचे प्रमाण बोलीत आणि त्यापाठोपाठ लेखनात कमी झाले. ई सब तो होतेही रहता हय. त्याला चूकबरोबर म्हणणे हे जरा रोचकच आहे.
@गौराक्का
प्रमाणभाषेपुरते हे विवेचन ठीकच आहे, पण त्यापलीकडे नाही. आपल्याकडे शुद्धाशुद्धाच्या कल्पनेचे फार स्तोम माजवतात. प्रमाणलेखनापुरते ते ठीक आहे. त्यापलीकडे त्याची दादागिरी नको. इनफॅक्ट अशी अनेक रूपे असणे म्हणजे भाषेच्या वैविध्यपूर्ण वैभवाचे द्योतक आहे. एवढा तो संस्कृताचे व्याकरण रचणारा पाणिनीही "अमुक तमुक शब्द आमच्याकडे असा तर पलीकडे असा उच्चारतात" असे म्हणतो, शुद्धअशुद्ध ठरवायच्या भानगडीत पडत नाही. मग इतरांनी का पडावे?
का हो , मग उठ सुट माझ्या
का हो , मग उठ सुट माझ्या चुका काढायला बऱ्या जमतात तुम्हाला?
मी पण म्हणते की आमच्याकडे अस्संच बोलतात म्हणून.
किमान व्याकरण शुद्ध भाषेत बोलावं / लिहावं ही अपेक्षा चुकीची कशी असू शकते?
"अमुक तमुक शब्द आमच्याकडे असा तर पलीकडे असा उच्चारतात" असे म्हणतो
हे उच्चारण्यावरुन झालं नाही का?
आमच्यात बाई उच्चारणं आणि वापरणं ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. गॉथमवाल्या पुणेकरांनी नवीन कायदे केले असतील तर ठाऊक नाही बॉ...
का हो , मग उठ सुट माझ्या
का हो , मग उठ सुट माझ्या चुका काढायला बऱ्या जमतात तुम्हाला?
बास का आता. लंपन डायलेक्टीत असे बोलत नाहीत इतकेच म्हणालो बस्स.
मी पण म्हणते की आमच्याकडे अस्संच बोलतात म्हणून.
अवश्य म्हणा, त्या दाव्याला मी कै विरोध करणार नाही.
किमान व्याकरण शुद्ध भाषेत बोलावं / लिहावं ही अपेक्षा चुकीची कशी असू शकते?
आता कुंतलत्वग्विच्छेदन केल्याबद्दल शिव्या खाईनच, पण तरी....
व्याकरणशुद्ध म्हणजे नक्की कशी? प्रमाण बोलीप्रमाणे असं म्हणायचंय का?
हे उच्चारण्यावरुन झालं नाही का?
आमच्यात बाई उच्चारणं आणि वापरणं ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. गॉथमवाल्या पुणेकरांनी नवीन कायदे केले असतील तर ठाऊक नाही बॉ...
उच्चारल्याशिवाय वापरणं म्हणजे लेखी. लेखन हे प्रमाणभाषेतच असावे की नसावे हा वेगळा मुद्दा. पाणिनीला उच्चाराद्वारे वापरणे हे अभिप्रेत होते.
पारिजात
एखाद्या चांगल्या वाढलेल्या पारिजातकाच्या झाडाखाली जर मातीची जमीन असेल, म्हणजे concrete नसेल तर तिथे बिया पडून छोटी छोटी रोपे उगवत असतात. पण असे झाड आसपास नसल्यास नर्सरीत रोपे मिळतातच . आवळ्याचे झाड फार वाढत नाही आणि वाढले तरी छाटून आटोक्यात ठेवता येते . बेल उंच वाढतो पण छाटता येईल .देवचाफ्याच्या फांद्यांचे फूट दीड फूट लांबीचे तुकडे सहज जगतात. नाही तर नर्सरी आहेच. इतर चाफ्याम्ची रोपेही नर्सरीत असतातच .
चिकू
प्रत्यक्ष चिकू फळ लागायला किती वर्षं लागतात कोण जाणे
मी विक्रमगडच्या दिवेकरांकडून आणले होते. पहिली तीन एक वर्षे कैच होत नव्हते. झाड होते तस्सेच.
नंतर जे वाढू लागले ते थांबायचे नाव घेत नाही. दरवर्षी छाटावे लागते. शेजारचा अनंततर ऊन न मिळाल्याने गेला.
चिकूची फळे मात्र रसाळ, गोमटी!
शेजारचा अनंततर ऊन न
शेजारचा अनंततर ऊन न मिळाल्याने गेला
काय सांगताव, मी अनंत उन्हात ठेवला म्हणून पिवळा पडायला लागला होता, सावलीत ठेवला कि जरा बरा दिसतोय आताशा.
आज अनंताचं झाडही लावलं. (किती टिकतंय ते बघू; कारण त्याला थोडी सावली मिळालेली बरी, असं जालावर वाचलं. पण मी ते लख्ख उन्हात लावलंय. भरपूर फुलांच्या हव्यासासाठी. त्यासाठी रोज पाणी घालण्याचे कष्टही करायला मी तयार आहे.)
अदितीतैच पण हेच म्हणणं आहे
मोठे झाड तोडायचे असेल तर
मोठे झाड तोडायचे असेल तर परवानगी घ्यायला लागते.
काही महिन्यांपूर्वीच पुण्यात आमच्या (म्हणजे आई-बाबांच्या) बागेतील झाड तोडायच्यावेळी अनुभव आला. त्या खात्यातील लोकांनी झाड तोडू दिले नाही. परवानगीशिवाय तोडले (स्वत:च्या खाजगी बागेतील, तरी ही ..) कारवाई करू असे सांगितले,
आयो.... ख्खर्र की काय?
आयो.... ख्खर्र की काय?
चंदनाची झाडं तोडायला मनाई आहे हे माहीत होतं...
आमच्या घरासमोर एक वठलेला आंबा होता, तो तोडायला पाचशे रुपये द्या असं एका खाकी डगल्याने सांगितलं, आईने हाकलून घातला त्याला. मग पावसाळ्याआधी बिएमशी वाल्यांनी स्वतःहून कापला तो आंबा.
१) टुच्चेश यांनी झाडाला
१) टुच्चेश यांनी झाडाला बाटाची चप्पल बांधावी अशी विनंती करतो. पॅरगनच्या प्लास्टिकपिविसी चपलेने नजरलागणेनिवारण होत नाही असं समजणारा नास्तिक आहे.
२)कचरा कुजवणे प्रक्रिया बॅल्कनीतबागवाल्यांना सतावू शकते.
३)एका कापडी( पॅालिएस्टर)पिशवीत माशांची डोकी,माती घालून टांगून ठेवल्यास प्रश्न सुटेल असं वाटतं. या प्रॅाजिक्टचा मला अनुभव नाही पण सुचलं
रत्नांग्रीजवळच्या ऐसीकरांना
रत्नांग्रीजवळच्या ऐसीकरांना /अथवा तिकडे गेल्यास रे स्टेशनपासून जवळच्या बिएसएनेल स्टॅापजवळचा अनिरुद्धबाबांचा आश्रम बागेसाठी अवश्य पाहावा.
इमारतही चर्चटाइप अतिसुंदर आहे.
२)राजस्थान- उदयपूर -सज्जनबागही पाहा.
३)ठाणे कोपरीब्रिज-सर्विसरोड)-पूर्व-दत्ताजी साळवी उद्यान हे मुंबई ठाणे परिसरातील एकमेव उत्कृष्ट उद्यान आहे. केशर वेलचीसोडून सर्व झाडे आहेत. नऊ ते साडेचार बंद असते. रचनाकार विजय पाटिल. ( फोन:8652323222 )
टुच्चेश यांनी झाडाला बाटाची
टुच्चेश यांनी झाडाला बाटाची चप्पल बांधावी अशी विनंती करतो
ते काऊन हो? एवढ्या बाटा च्या चपला आणायच्या म्हणजे चप्पल लोन काढावं लागेल कि. त्याच्यावर उतारा म्हणून बाटा ची चप्पल घालून बागकाम केलं तर चालू शकेल का?
@बॅटमॅन - मला काही तुमच्या इतकं मुद्देसुद पटवून देता येतं नाही. पण यही सिला दिया आपने अपनी दोस्ती का???
काय राव असं असतं का कुठे ? असो, चिल्ल्ल्ल ...
एक रानकांदा कंपाउंड च्या बाहेर लावला कुंडीतला काढून. एवढा माजला कि चक्क सिमेंट ची कुंडी फोडून बाहेर आला. शेळी पण खात नै त्याला. तसे भरपूर प्रयॊग केले कंपाउंड च्या बाहेर झाडं लावल्याचे, गणेशवेल, सदाफुली, इच्छा इ. इ. लावून बघितले, पण छ्या, तारेची जाळी सुद्धा पडतात हो शेळ्या. कंपाउंड च्या बाहेर झाडांना प्रोटेक्शन लावणं म्हणजे शेळीचं शेपूट, धड माश्याही वारता येत नाही अन...
सागरगोटा उत्तम. आजीने
सागरगोटा उत्तम. आजीने अंबरनाथला हे कुंपण केलेले. एका बाजूला रस्ता होणार होता तिकडे हे लावले. रानडुकरसोडून कोणताही प्राणी याच्या राक्षसी काटेरी वेलात घुसत नाही.
छोट्या कच्च्या मडक्यात एकेक गोटा पेरावा आणि पाणी द्यावे. २१ दिवसांनी उगवेल. रोपे वितभर झाली की पाचसहा फुटांवर मडकं फोडून लावावे आणि बोरीच्या फांद्यांनी झाकावं. सहा महिन्यांत भरमसाठ वाढ होईल.
नर्सरीवाले सागरगोटे विकतात ( शंभर रु किलो)
सागरगोट्यांना गजगेही म्हणतात॥
सागरगोट्यांना गजगेही म्हणतात॥ मोठ्या करंजीसारखी फळे येतात.पण मुरड आणि वर काटे असतात. मे महिन्याच्या शेवटी करंज्या उघडून गजगे खाली पडतात अन पावसात आणखी वेल येतात. मामाच्या गावी सांगलीजवळच्या ओढ्यात असायचे. पुर्वी अंगण सारवायलं शेण लागायचं ते कोल्हाटी मुली आणून देत. त्याबदली त्यांना भाकय्रा ,आमटी मिळायची. शेण नको गजगे आण म्हटलं की गजगे आणायच्या. तर सुटीत उन्हातून मोरांच्यामागे हुंदडताना या वेली दिसल्या. पण पुढच्या भागातले गजगे अगोदरच कुणी नेलेले. मग काय आत घुसून काठीने काही करंज्या ओढल्या. काटे संभाळत बाहेर आलो. घरी या गमतीचं चांगलच बक्षीस मिळालं॥ मार नाही पडला पण गडाचे दरवाजे सात दिवस बंद झाले.
- रिकामपणचे लहानपणचे उद्योग।
-अगोदर कुठेही प्रकाशित नाही
अय्यो खरोखरीचं झाड आहे का
अय्यो खरोखरीचं झाड आहे का काय?
मला वाटलं गम्मत करताय... याला बिट्टी म्हणतात का? पोरी सागरगोटे खेळायला वापरतात ते? मी झाड पाहीलं नाही कधी पण आईच्या तोंडून ऐकलंय.
शास्त्रिय नाव काय आहे? किंवा झाडाचं फोटु वगैरे काही असेल तर टाका की..
पोरी सागरगोटे खेळायला वापरतात
पोरी सागरगोटे खेळायला वापरतात ते- होय पण बिट्ट्या* नव्हे.
*(पिवळी मोठी फुले,बारापंधरा फुट उंच होते. बिट्टी शिंगाड्याच्या आकाराची असते)काटे नसतात पण फांदीत चिक असतो.
आमच्या घराच्या जवळच एक वेल पसरला आहे त्याचा फोटो उद्या आणतो.
शा नाव /search/caesalpinia bonducella/Guilandina bonduc/
कन्नड: गज्जिकेकायि
बिट्टी
बिट्टी म्हणजे Nerium oleander. शास्त्रीय नाव Cascabela thevetia. मराठीत पिवळी कण्हेऱ. अगदी गुलाबी/तांबड्या कण्हेरीसारखंच झाड असतं. पण फुलं मात्र पूर्ण वेगळी. ही फुलं आम्ही कानांमागे खोचायचो. फळातल्या बिया गजग्यांसारख्या दिसत असल्या तरी आम्हांला त्या वापरू दिल्या जात नसत. हे झाड खूप विषारी असतं असं मोठी माणसं सांगत. फुलं देखील हाताळू दिली जात नसत.
पिवळ्या कन्हेरीप्रमाणेच
पिवळ्या कन्हेरीप्रमाणेच नेहमीची कन्हेरही विषारी असते. विशेषत: कन्हेरीच्या बिया आणि मुळ्या विषारी असतात. रासायनिक किटकनाशके येण्यापूर्वीपर्यंत आत्महत्या करण्यासाठी कन्हेरीच्या मुळ्या कुटून त्याचा रस प्राशन केला जात असे. कन्हेरीचे फोक भुते काढण्यासाठी वापरले जात. पछाडलेल्या महिलांना कन्हेरीच्या फोकांचा मार दिला जात असताना मी लहानपणी पाहिले आहे. वांड मुलांना कन्हेरीच्या फोकांची भीती घातली जायची.
बिट्टीचा मध
अगदी अगदी. आमच्या शाळेलगत काही झाडं होती बिट्टीच्या फुलांची. सकाळी शाळेत येताना वा मधल्या सुट्टीत पडलेल्या फुलांच्या देठाच्या घुमटाकडचा भाग अंगठा नि तर्जनीच्या नखांत चिमटायचा नि ती चिमटी तशीच देठाच्या टोकापर्यंत सरकवत न्यायची की एखादा थेंब बाहेर येई. तो चाखायचा. अतिशय मधुर चव!
कालांतराने फुलं विषारी असतात वगैरे ऐकलं. तेव्हा आश्चर्य वाटलं होतं.
सुंदर तू ही फुलांचे दवणिय
सुंदर तू ही फुलांचे दवणिय फोटो टाकू लागलीस का?
अरे या बागकामाने कुठे नेऊन ठेवलीये आमची अदिति? ;)