दोन 'प्राचीन' पुस्तकांबद्दल

संकल्पना

दोन 'प्राचीन' पुस्तकांबद्दल

- नंदा खरे

तुला भीती ही कसली वाटते रे? (चित्रपट : नई देहली)

साल आहे १९१४. बरंचसं जग वेगवेगळ्या साम्राज्यांमध्ये वाटलं गेलं आहे. त्या साम्राज्यांचे मालक देश बहुतांशी लोकशाही राज्यव्यवस्था वापरतात, पण अनेक जागी औपचारिक राजकारणीही आहेत. मग आलं 'सर्व युद्धांना संपवणारं युद्ध' (The war to end all wars), ज्याला आज पहिलं महायुद्ध म्हणतात. त्या युद्धाच्या चार वर्षांतच एक मोठा राजवंश मारला जाऊन रशियात एका वेगळ्याच नमुन्याची राज्यव्यवस्था घडली, साम्यवादी. रोमानॉफांना मारण्याने इतर राजवंश बरेच अस्वस्थ झाले. होता काय हा साम्यवाद? ईश्वरदत्त राजेशाहीला मारून टाकणारा? बरं, महायुद्धानंतर अनेक देशांमध्ये नवनवे राजकीय पक्ष घडू लागले, आणि त्यांच्या नावांमध्ये समाजवाद हा शब्द असायचा; साम्यवादाची सौम्य आवृत्ती ती.

असा एक पक्ष १९१९ साली इटलीत उपजला. त्याचा नेता बेनिटो मुसोलिनी कधीकाळी समाजवादी पक्षाचा सदस्य होता, पण आता त्यानं एक नवं प्रतीक घडवलं. एक दांडक्यांची मोळी, प्रत्येक दांडकं दुबळं, पण मोळी भरभक्कम. एक कुऱ्हाडीचं पातंही मोळीबाहेर डोकावायचं, इटालियन भाषेत मोळीला 'फॅशेस', fasces म्हणतात, त्यामुळे ते प्रतीक वापरणारे झाले फाशिस्ती. इंग्रजीत याचं झालं 'फॅसिस्ट'. पुढे १९२३मध्ये जर्मनीत अॅडॉल्फ हिटलरनं नॅशनल सोशलिस्ट उर्फ नाझी पक्ष काढला, पण त्याला पाय रोवून उभं राहायला एक दशक लागलं. हा पक्षही फॅसिस्टांसारखा होता (म्हणजे काय ते नंतर पाहू). स्पेनमध्ये एक समाजवादी पक्ष निवडणूक जिंकला, पण सेनाधिपती जनरल फ्रँको यानं निर्वाचित सरकार उलथवून सत्ता काबीज केली. एक तीव्र, हिंस्र यादवी युद्ध सुरू झालं (१९३६-३९). मुसोलिनी आणि हिटलरचे पक्ष फ्रँकोच्या बाजूनं उभे झाले, तर रशिया (यूनियन ऑफ सोव्हिएत सोशलिस्ट रिपब्लिक्स, USSR) आणि जगभरातले उदारमतवादी निर्वाचित सरकारच्या पाठीशी गोळा झाले. फ्रँको फॅसिस्ट-नाझी आधारानं जिंकला. तिकडे पूर्वेला जपान जास्त जास्त साम्राज्यपिपासू होत गेला. त्या देशात राजा होता (आजही आहे), पण खरी सत्ता सेना, राजकीय पक्ष आणि मोठे उद्योजक यांच्या एका 'महागठबंधना'च्या हातात होती; मोळीच ती! दुसरं महायुद्ध एकीकडे ब्रिटन, फ्रान्स, अमेरिका (मित्र राष्ट्रं) आणि दुसरीकडे इटली, जर्मनी, जपान (दोस्त राष्ट्रं) असं लढलं गेलं. फ्रँकोचा स्पेन तटस्थ राहिला.

दोन महायुद्धांमधल्या काळात आपला शत्रू नंबर एक कोणता ते ठरवणं ब्रिटन, अमेरिका यांना अवघड जात होतं. उदारमताच्या लोकांना USSRचा साम्यवादी प्रयोग मोहवत होता, तर राज्यकर्त्यांना ते रशियन 'साम्राज्य' आणि स्पर्धक वाटत होतं. उदारमतवाद्यांना फॅसिस्ट, त्यांचं युद्धकौशल्य घाबरवत होतं. ब्रिटनमध्ये ऑस्वाल्ड मोस्ले, अमेरिकेत ह्यूई लॉंग उघडपणे फॅसिस्ट होते. त्यांना फारसा जनाधार नव्हता, पण तसा सुरुवातीला मुसोलिनी आणि हिटलरलाही नव्हता. तेव्हा जनाधार सहज वाढून आपल्याकडे फॅसिझम येईल, अशी भीती ब्रिटन, अमेरिकेतही अनेकांना वाटत होती.

सिंक्लेअर लुईसचं 'इट कांट हॅपन हियर' (१९३५) हे पुस्तक या पार्श्वभूमीवर लिहिलं गेलं. लुईस (१८८८-१९५१) हा नोबेल पुरस्कार (१९३०) मिळवणारा पहिला अमेरिकन साहित्यिक; समाजवादी पण तरीही लोकप्रिय! त्यानं आपल्या डिस्टोपियन (Dystopian, कु-न-स्थानी किंवा कुनस्थानी) कादंबरीतून "हॅः! इथे नाही येणार फॅसिझम" असं म्हणणाऱ्यांना "हो! इथेही होईल तसं!" अशी शक्यता दाखवून दिली. गोष्ट अशी -

१९३६ साली फ्रँकलिन डेलानो रूझवेल्ट (डेमोक्रॅट) आणि सीनेटर विंथ्रॉप (रिपब्लिकन) यांना हरवून एक बर्झेलियस 'बझ्' विंड्रिप राष्ट्राध्यक्ष होतो. त्याच्या जाहीरनाम्याचं मुख्य कलम असतं, "प्रत्येक अमेरिकन माणसाला वर्षाला पाच हजार डॉलर्स!". त्याचा मुख्य जनाधार असतो 'मिनिट मेन' हे खाजगी सेनेसारखं दळ. अमेरिका ब्रिटनपासून स्वतंत्र झाली तेव्हा मिनटाभरात युद्धाला सज्ज होणारे स्वातंत्र्यसैनिक असत. त्यांचं मिनिट-मेन हे नाव विंड्रिपनं कल्पकतेनं वापरलं.

एका लहान खेड्यातल्या लहान वृत्तपत्राचा संपादक डोरेमस जेसप हे कादंबरीचं मध्यवर्ती पात्र आहे. तो अशा झटपट रंगारी राजकारणाला विरोध करतो. पण विंड्रिप लवकरच विरोधच नव्हे, मतभेदही बेकायदेशीर ठरवतो. एव्हाना मिनिट मेनचं रूपांतर 'कॉर्पो' (कॉर्पोरेट) दळांमध्ये होतं, कारण राजवट सरकारांसारखी गलथान न वागता कॉर्पोरेशन्ससारखी कार्यक्षम वागू लागते! स्त्रियांना चूल आणि मूल येवढ्यापुरतंच काम उरतं, आणि त्या रोजगार मागेनाशा होतात. यानं बेरोजगारीही कमी होते आणि सेना आणि उद्योगगृहंही खूष होतात. जेसपवर खोटेनाटे आरोप, जुजबी तुरुंगवास वगैरे होतो, आणि अखेर तो इतर अनेकांसारखा कॅनडात पळून जातो.

पण सत्तेच्या प्रचंड केंद्रीकरणातून भांडणं उभी राहतात. आधी कॉर्पोप्रमुख सॅरॅन्सन विंड्रिपला पदच्युत करतो आणि मग जनरल हाईक सॅरॅन्सनला हटवून सर्वेसर्वा होतो. लुईस काही खऱ्या व्यक्ती (उदा. रूझवेल्ट) काही काल्पनिक व्यक्ती (उदा. विंड्रिप) अशा मिश्रणातून ठाम निष्कर्ष काढतो की 'इथेही तसं घडू शकतं'!

प्रकाशनाच्या वेळी लुईसची कादंबरी गाजलीच, पण आज ती परत चर्चेत आहे, कारण आज पुन्हा 'तसं' काहीतरी घडायची शक्यता काही लोकांना दिसते आहे. पण सगळ्यांना माहीत आहे की दुसऱ्या महायुद्धानं फॅसिझम संपवला. मग आज त्या युद्धानंतर सत्तरेक वर्षांनी...?

फॅसिझम किस चिडिया का नाम है?

आहे काय, सॉरी, होती काय फॅसिझम? इटली, जर्मनी, जपान, स्पेन, प्रत्येक देशात फॅसिझमच्या जराजरा वेगळ्या आवृत्त्या होत्या. 'अ ग्राफिक गाईड टु फॅसिझम' (आयकन, १९९३) हे पुस्तक स्टुअर्ट हूडनं (Stuart Hood) लिहिलं आणि लित्झा जांशनं (Litza Jansch) चित्रित केलं. पुस्तकात चौदा लक्षणांची एक यादी भेटते, जी बहुतेक लक्षणं फॅसिस्ट राजवटींमध्ये दिसतात. आपण ही यादी जरा 'आवळ' रूपात पाहू.

फॅसिस्ट पक्षांना विस्तृत जनाधार असतो, मुख्यतः निम्न वर्गांतून. पक्षाबाहेरचं आयुष्य हतबलतेचं, काहीसं बकाल असं असल्यानं त्यांना आज्ञा देणारी पिता-प्रतिमा आवडते. पक्षात कार्यकर्ते आज्ञाधारक, काहीसे सैनिकांसारखे होतात. यासाठी एरवीच्या लोकशाही संकेतांबद्दल तुच्छता असलेला, ते संकेत धुत्कारणारा. मसीहा भासणारा नेता पक्षाला आवडतो.

मध्यमवर्गी बूर्झ्वा लोकशाहीबद्दल, विचारवंतांबद्दल त्यातही 'डाव्यां' (म्हणजे जे काय असेल ते!) बद्दल फॅसिस्ट राजवटींना तीव्र द्वेष असतो. गंमत म्हणजे, फॅसिस्ट घोषणा मात्र डाव्या, समतावादी वगैरे असतात; जरी प्रत्यक्ष धोरणं स्थितिवादी, काँझर्व्हेटिव्ह असतात. विचारवंतांबद्दलच्या अॅलर्जीमुळे विवेकापेक्षा तात्कालिक भावनांवर बेतलेली 'मेरी मर्जी' धोरणे जास्त महत्त्वाची मानली जातात.

स्त्रियांना 'शबला' म्हणत गौण स्थानांवरच ठेवलं जातं. श्रमिक, शेतकरी यांच्याबद्दल कौतुकानं बोलत नागर आयुष्य काहीसं भ्रष्ट आणि 'स्त्रैण' मानलं जातं. जुनी प्रतीकं नव्यानं जागवून काहीशा गूढवादी, मिस्टिकल वागणुकीतून स्मरणरमणाला वाव दिला जातो.

बलपूजन भरपूर असतं, ज्यामुळे हिंसा वर्ज्य मानली जात नाही. उलट तिचा वापर, वापराची धमकी, ही रास्त हत्यारं मानली जातात. त्यासाठी एक 'शत्रू'ही लागतो!

तर हा लक्षणांचा संच फॅसिझमचं चित्र रेखतो.

लुईस लिहीत होता १९३५ साली, जेव्हा मुसोलिनी आणि हिटलर नुकतेच सत्ता गाजवू लागले होते. ज्या ह्यूई लाँगच्या भीतीनं लुईस लिहीत होता तो कधी सत्तेत आलाच नाही. पण 'मोठा शत्रू कोण?' या प्रश्नाचं स्वतःचं उत्तर लुईसनं स्पष्ट रूपात दिलं; 'फॅसिझम!' आणि या लुईसला भयावह वाटणार्या राजवटी दुसऱ्या महायुद्धानं नष्ट केल्या. मग आज, प्रकाशनानंतर ऐंशीपेक्षा जास्त वर्षांनी लुईसचं पुस्तक का वाचलं जातं आहे?

कम्युनिझमच्या भीतीनं येते....

दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटन आणि त्याहून जास्त अमेरिका यांना कम्युनिझम भेडसावू लागला. तोही इतका, की शेवटचा फॅसिस्ट फ्रँको याला त्याच्या मृत्यूच्या (१९७५) जरा आधी तेव्हाच्या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निक्सननं 'निष्ठावान मित्र' म्हणून वाखाणलं!

कम्युनिझम वाढतही होताच. वसाहतींवर वचक ठेवणं अवघड होत गेल्यानं सर्व साम्राज्यं विरून फाटू लागली. भारत (१९४७), चीन (१९४९) यांच्या पाठोपाठ अनेक जुन्या वसाहती नवस्वतंत्र राष्ट्रं म्हणून पुढे येऊ लागली. त्यांना जुन्या साम्राज्यांचं प्रेम नव्हतं. भारत, इजिप्त, युगोस्लाव्हिया धडपडून तटस्थ राहू पाहत होते, तर चीनसकट बरीच राष्ट्रं कम्युनिझमची कास धरत होती. सोबत स्वतःला समाजवादी म्हणवणारी राष्ट्रंही धरली तर १९५० साली जगातल्या अडीच अब्ज माणसांपैकी चौतीस टक्के साम्यवादी-समाजवादी होती. १९७८ साली सव्वाचार अब्जांपैकी एकोणचाळीस टक्के त्या वर्णनातली होती. फार कशाला, पश्चिम युरोपातही समाजवादी-साम्यवादी प्रभाव वाढत होता, आणि भांडवली व्यवस्थेवरची नाराजीही वाढत होती.

बर्टोल्ड ब्रेख्तची ही कविता पाहा -
सर्वांत जास्त उपभोगणारे। समाधान शिकवतात.
करवसुली करणारे। त्याग मागतात.
पोटभर जेवलेले भुकेल्यांना। सुंदर भविष्याची स्वप्नं दाखवतात.
देशाला गर्तेकडे नेणारे सांगतात। राज्य करणं फार अवघड.

अमेरिकन प्रस्थापित वर्गाला, एस्टॅब्लिशमेंटला, कम्युनिझमनं घाबरवलं नसतं तरच नवल! प्रस्थापित वर्ग म्हणजे 'एक इतरांना सामील करून न घेणारा (exclusive) बलवानांचा गट, जो सरकारवर, समाजावर खाजगी करार व निर्णयांमधून राज्य करतो.' आणि ही व्याख्या आहे अमेरिकन हेरिटेज डिक्शनरीतली. तर या एस्टॅब्लिशमेंटची कधी ना कधी USSRशी पंगा घ्यावा लागणार आहे, अशी खात्री पटली. तो संघर्ष कसा जिंकायचा हे तपासायला भरपूर साधनं देऊन 'थिंक टँक्स' घडवले गेले. बरं, हा संघर्ष थेट अणुयुद्धापर्यंत जाऊ शकला असता, त्यामुळे 'खात्रीनं एकमेकांचा सत्यानाश', 'म्युच्युअली अशुअर्ड डिस्ट्रक्शन' (MAD) वगैरे वेड्या शक्यताही थंडपणे तपासणं आवश्यक होतं.

असा विचार करणाऱ्यांमध्ये एक हर्मन कान (Kahn) म्हणून होता, ज्यानं 'आपण' आणि 'ते' एकेक पायरी चढत 'आंचक्यासारखं बुद्धिहीन युद्ध' या पातळीला, spasm or insensate war ला कसे पोचू याचं चित्र रेखलं. त्याची ही भयकारी शिडी, लॅडर ऑफ टेरर, चव्वेचाळीस पायऱ्यांची होती. या वरकरणी 'विचारी' विश्लेषणाची टिंगल करणारा एक क्रूर-विनोदी चित्रपट १९६४ साली घडला. त्या 'डॉ. स्ट्रेंजलव्ह, ऑर हाऊ आय लर्न्ट टु लव्ह द बाँब' चा लेखक-दिग्दर्शक होता स्टॅन्ले क्यूब्रिक. नटांपैकी पीटर सेलर्स आणि जॉर्ज सी. स्कॉट यांनीही पटकथा लिहिण्यात भाग घेतला होता. त्यातला डॉ. स्ट्रेंजलव्ह/हर्मन कान एकदोनदा 'चुकून' अमेरिकन राष्ट्राध्यक्षाला 'माईन फ्यूरर' असं संबोधतो, जो शब्दप्रयोग प्रत्यक्षात हिटलरला संबोधण्याला वापरला जात असे! तर क्यूब्रिक आणि मंडळी सुचवत होती की अमेरिका फॅसिस्ट होते आहे!

.... फ्रेंडली फॅसिझम

पण हे होतं बाहेरच्या शत्रूबद्दल. घरातल्या मतभेदांचं, अंतर्गत संघर्षांचं काय? एक बरट्रॅम ग्रोस (Bertram Gross) (१९१२-१९९७) नावाचा राज्यशास्त्री बेरोजगारीचा अभ्यासक होता. कधीकाळी 'पूर्ण रोजगार', फुल एंप्लॉयमेंट देणारे कायदे रचायला ग्रोसला बोलावलं गेलं होतं. त्यानं कानच्या भयकारी शिडीचं एक घरेलू रूप रचलं. ती शिडी चौदाच पायऱ्यांची आहे, तीन ठोक पातळ्यांमध्ये विभागलेली. तिच्या 'आपण' आणि 'ते' यांची जागा सरकार आणि अंतर्गत विरोधक घेतात.

सौम्य सुरुवातीला सरकार प्रजेवर पाळत ठेवून अडचण वाटणाऱ्या व्यक्तींची 'डॉसियर्स' (फाईली) व पुढे ब्लॅकलिस्टा घडवतं. विरोधक संपावर जाण्यापर्यंत बिथरतात.

मध्यम संघर्षातही 'जान-माल का खतरा' नसतो. सरकार धरपकड, कोर्टकचेऱ्या करत लोकांना तुरुंगात टाकू लागतं. विरोधक जन-सुनावण्या, लोक-अदालत करत माणसं पळवू लागतात, किडनॅप करू लागतात.

मग दंगेधोपे, आगी लावणं, बंडखोरी व तिचं दमन असं होतहोत समाज यादवी युद्धापर्यंत जातो.

ग्रोसला आजही अमेरिकन समाज पहिल्या दोन पातळ्यांमध्ये घुटमळताना दिसतो; आज म्हणजे १९८० साली, कारण ग्रोसनं त्या साली आपलं 'फ्रेंडली फॅसिझम' (साऊथ एंड प्रेस) हे पुस्तक लिहिलं.

एकतर नैसर्गिक संसाधनांत अमेरिका इतर जगापेक्षा श्रीमंत आहे. तिथलं दारिद्य्रही बियाफ्रा-इथिओपिया पातळीचं नसतं. दुसरं म्हणजे कोणत्याही युरोपीय देशापेक्षा लोकसंख्येच्या प्रमाणात अमेरिकेत पोलीसही जास्त आहेत, आणि तुरुंगांमध्येही जास्त माणसं आहेत. दमन आहे, पण ते विरोधाला उद्रेकापर्यंत जाऊ देत नाही. म्हणजे ग्रोसलाही क्यूब्रिकसारखी अमेरिका फॅसिस्ट होताना दिसते, पण ते फॅसिझम 'मैत्रीपूर्ण' वाटू शकते! दोन्ही मोठे पक्ष, डेमोक्रॅट्स आणि रिपब्लिकन्स आहेत प्रस्थापित वर्गातलेच. प्रजा बिथरलीच तरी एकूण सुबत्तेनं, थोड्याफार तुरुंग भरण्यानं स्थिती आवाक्यात ठेवता येते.

एक वेगळाही मुद्दा आहे. हिटलर म्हणाला होता, "चलाख आणि संतत प्रचारतंत्राच्या वापरानं लोकांना स्वर्गही नरकप्राय असल्याचं पटवून देता येतं आणि अत्यंत खत्रूड आयुष्यही स्वर्गासमान भासवता येतं." हिटलरच्या काळात वृत्तपत्रं, लाऊडस्पीकरवरून दिलेली भाषणं आणि रेडिओ हीच प्रॉपगँडाची साधनं होती. ग्रोसनं पुस्तक लिहिलं तेव्हा या यादीत टीव्हीही सामील झाला होता. आज? आज इंटरनेट-स्मार्ट फोन्समुळे सोशल मीडिया राज्यकर्त्यांना उपलब्ध आहे. ग्रोसच्या भयकारी घरेलू शिडीची पहिलीच पायरी पाहा; प्रजेवर पाळत ठेवून खाजगीपण भेदणं. ग्रोस फेलीशिया लँपर्टची १९७१ साली कुठेतरी उद्धृत केलेली 'डिप्रायव्हसी' ही कविता वापरतो.

तुम्हाला एकटं, उपेक्षित असणं,
दखल घेतली न जाणं जाणवतं आहे,
घाबरू नका. तुमचा आत्मा
प्रचंड डेटा-बँक्समध्ये साठवलेला आहे.

आणि तुमच्या आत्म्याचं विश्लेषण करून तुमच्या गळी काहीही उतरवायची तंत्रं आज ग्रोसलाही सुचणार नाहीत इतकी प्रगत पातळी गाठत आहेत. हिटलर मात्र द्रष्टाच, की त्याला स्वर्गाचा नरक, नरकाचा स्वर्ग करता येतो हे सुचलं.

ही प्रचारतंत्रं वापरून अमेरिकन एस्टॅब्लिशमेंट सांगते तरी काय? ते मात्र दुसऱ्या महायुद्धापासून आजपर्यंत बदललेलं नाही!

साम्यवाद-समाजवाद 'दुष्ट', 'गॉडलेस' आहेत. भांडवलवाद(च) स्वातंत्र्य देतो. भांडवलवादाची दमनकारी अंग आता उरलीत कुठे!

अर्थात, तपशील बदलताहेत. जास्त तांत्रिक भाषा वापरत प्रचार जास्त वैज्ञानिक असल्याचा भास उत्पन्न केला जातो आहे.

जसं, अर्थव्यवस्थेत तेजी असणं चांगलं, आणि मंदी असणं वाईट. आणि तेजी-मंदीचं माप एकच आहे, 'सकल घरेलू उत्पाद' ('उत्पादन' नाही!) ऊर्फ जीडीपी. तो वाढताच हवा, तोही जास्तजास्त वेगानं. मंदीची झुळूकही नको! आता ग्रोस आहे रोजगार-बेरोजगारीचा अभ्यासक. 'पूर्ण' रोजगार घडवणं अशक्यप्राय आहे हे जाणणारा. बेरोजगारी, मंदी सुसह्य पातळीला ठेवणंच जमतं, हे मानणारा. तो विल्यम सफायरचं १९७४चं मत सांगतो.

कोणताच शाहणा राजकारणी मंदीबद्दल बरं बोलणार नाही. पण उद्योगांची उत्पादकता वाढवणं, ग्राहकांना 'मेरी मर्जी' खरेदीकडून (impulse buying) सांभाळूनच खरेदी करण्याकडे वळवणं, महागाईला चाप लावणं, यांसाठी मंदीसारखं हत्यार नाही.

अर्थशास्त्र!

पण अर्थव्यवहाराचा असा विचार करणं भोळसट आणि दुष्ट मानलं जाऊ लागलं. वाट्टेल ते करून तेजी घडवणंच शाहाणपणाचं मानलं जाऊ लागलं. आणि हा विचारव्यूह घडतानाच ग्रोस लिहीत होता. १९७५मध्ये "लोह-स्त्री' मार्गरेट थॅचर ब्रिटनची पंतप्रधान झाली, थेट डझनभर वर्षांच्या कारकीर्दीसाठी. १९८० साली रॉनल्ड रेगन अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाला, आठ वर्षांसाठी. आज डॉनल्ड ट्रंपच्या हेतूंबद्दल, क्षमतांबद्दल जशा शंका व्यक्त केल्या जातात. तशा १९८०च्या आधी रेगनबद्दल व्यक्त व्हायच्या. ग्रोसचं पुस्तक त्याच शंकांचा भाग होतं. थॅचर-रेगन दोघांनीही भांडवलवादाची एक जालीम आवृत्ती स्वीकारली, की सरकारनं मोठ्या कॉर्पोरेशन्सना मदत करत जीडीपी वाढवत न्यायचा असतो. ह्या भूमिकेला नवभांडवलवाद, नवस्थितीवाद वगैरे नावं आधी वापरून पाहिली गेली. मग नवउदारमतवाद, निओलिबरॅलिझम (निओलिब) हे नाव रुजलं. थॅचर-रेगन सत्तेतून पायउतार होताहोताच USSRचं विघटन झालं, चीननंही गुपचूप साम्यवाद सोडून निओलिब धोरण स्वीकारलं. आता आपल्या अर्थनीतीला वेगळं नाव देणंही अमेरिका-ब्रिटनला गरजेचं वाटेनासं झालं. उलट तिलाच "अर्थशास्त्र' म्हटलं जाऊ लागलं, की इतर काही नीती रचणं अशास्त्रीय, अवैज्ञानिक ठरावं. यासाठी अर्थशास्त्र हे निसर्गविज्ञानासारखं, भौतिकी, रसायनशास्त्र, जीवशास्त्र यांच्या दर्जाचं असल्याचं ठसवलं जाऊ लागलं.

यात एक अडचण आहे. अर्थव्यवहार माणसं आणि समाज घडवतात; त्यामुळे ते नैसर्गिक नसून कृत्रिमच असतात. त्यांमध्ये अमुक केलं तर तमुक होईल का, या दर्जाचे प्रश्न असतीलही, पण महत्त्वाचे प्रश्न काय करणं चांगलं, काय करणं वाईट, अशा नमुन्याचे असतात. ते सोडवायला राज्यशास्त्र, नीतिशास्त्र वगैरेंची मदत लागते. लागतेच. त्यामुळे अर्थशास्त्र स्थलकालनिरपेक्ष नसतं. सोपंही नसतं. एकोत्तरीही नसतं. तसा विचार करून पाहिलं तर निओलिब धोरण हे 'अर्थशास्त्र' मानणं अविवेकी, काहीसं गूढवादी, खूपसं फॅसिस्ट ठरतं. कारण निओलिब व्यवस्था उद्योजक-जमीनदारांसाठीच रचलेली असते.

ग्रोसनं १९८० साली पुस्तक लिहिलं कारण अनेकांना रेगन कितपत शाहाणपणानं देश सांभाळेल याबद्दल शंका होत्या. वॉटरगेट प्रकरणानंर निक्सननं राजीनामा देणं, मग जेरल्ड फोर्ड अमेरिकेचा 'अनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष' होणं, मग जिमी कार्टरची काहीशी भोळसट, बरीचशी अयशस्वी राजवट, असं होऊन नट असलेला रेगन राष्ट्राध्यक्ष झाला. एका हत्येच्या प्रयत्नातून वाचून, मुख्यतः गोल्फ खेळत त्यानं आठ वर्षं ते पद सांभाळलं. त्याची अर्थनीती शुद्ध निओलिब होती. दुबळं USSR, कम्युनिझमवरचा विश्वास घटत असलेला चीन, थॅचरचा दमदार ब्रिटन, या पार्श्वभूमीवर रेगनचा कार्यकाळही फार वाईट वाटत नसे. त्याची वृत्ती मैत्रीपूर्ण फॅसिझमचीच होती, पण ती ग्रोसला जेवढी दुखली तेवढी इतरांना दुखली नाही.

लांडगा आला रे आला!

लुईस युरोपकडे बघत लाँगला घाबरून फॅसिझमचा धोका सांगून गेला. ग्रोस जास्त काटेकोर विश्लेषणातून रेगनच्या न दुखणाऱ्या फॅसिस्ट वृत्तीवर प्रकाशझोत टाकून गेला. आज रेगनपेक्षा बऱ्याच उठवळ डॉनल्ड ट्रंपला भिऊन लुईस-ग्रोस नव्यानं वाचले जात आहेत. खरी किती भीती आहे नव्यानं फॅसिस्ट राजवटी अवतरण्याची? की नुसतेच लुईस-ग्रोसपंथी "राजा! वैऱ्याची रात्र आहे! जागा राहा!" असे ओरडतात?

लुई डी बँडाईस (१८५६-१९४१) हा अमेरिकेतला सर्वोच्च न्यायाधीश, (आपल्या कृष्ण अय्यर आणि वि.म.तारकुंडे वृत्तीचा) लोकशाही समर्थक म्हणतो (१९४१ साली)
या देशात लोकशाही तरी असेल किंवा मूठभरांच्या हातात प्रचंड श्रीमंती तरी. दोन्ही असणं मात्र शक्य नाही.

थोर तत्त्वज्ञ कार्ल पॉपर (१९०२-१९९४) १९७४मध्ये म्हणाला.
'इथे नाही होऊ शकत' हे नेहेमीच चुकीचं असते. हुकूमशाही कुठेही उद्भवू शकते.

कारण? डब्ल्यू. एच. हॅस्टी सांगतो (1967)
लोकशाही ही प्रक्रिया आहे, स्थिती नाही. ती सहज गमावता येते, पण पूर्णपणे कमावता मात्र कधीच येत नाही. सततचा संघर्ष हाच तिचा गाभा आहे.

तेव्हा लांडगा दारात उभा आहेच. ओरडत राहणे हे आपलं कर्तव्यही आहेच, कधीच 'संपलं!' असं न म्हणू देणारं.

(संक्षिप्त स्वरूपात पूर्वप्रकाशित)

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

खणखणीत चोख लेख!

योगायोगाने आजच ही बातमी वाचली:
https://timesofindia.indiatimes.com/india/85-of-indians-trust-govt-27-wa...

-- 65% support a government comprising an elite of technical experts
-- 53% say military rule would be a good thing for the country
-- 55% of Indians support autocracy in one way or the other. In fact, more than one-fourth (27%) want a "strong leader".

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

लेख वाचून 'बर, मग निश्कर्ष काय, पुढे काय' अशी प्रतिक्रिया उमटली. हा लेख विस्कळीत, मुद्दे एकापुढे एक माडल्यासारखा मला तरी वाटला. जी माहिती आहे तीच पुन्हा पुन्हा लिहिली आहे.
नंदा खरेंकडून अधिक ठोस लेखाची अपेक्शा होती.

अंताजीच्या बखरीपासून अनंत खरेंचा चाहता व आसुचा ते जीवंत असेतोवर नियमित वाचक असलेला एक वाचक

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दोन पुस्तकांचे धागे धरून उलगडलेला पट आवडला.

कुठची पुस्तकं कधी पुन्हा वाचली जातात यावरून जनमानसातल्या भीतींविषयी काहीतरी मांडणी करता येईल असा विचार तरळून गेला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0