भाषा आणि स्मृती : सैद्धान्तिक व्यूह

Language and Memory
प्रस्तावना
भाषिक स्मृतीचा विचार या लेखात दोन पातळ्यांवर केलेला आहे. मेंदूतील भाषेची साठवण या अर्थाने भाषिक स्मृतीचा उलगडा पहिल्या भागात केला आहे. भाषिक स्मृती सामाजिक पातळीवर समजून घेताना, विशेषतः भाषेच्या संदर्भात, कोणते सैद्धान्तिक पेच आपल्या समोर उभे राहतात याचा विचार दुसऱ्या भागात केलेला आहे.

१. भाषिक स्मृती आणि मेंदूचे कार्य
भाषिक स्मृती असा विषय मी हाताळणार आहे. या अनुषंगाने विषयाचा खुलासा करतो. भाषिक स्मृती असे म्हणत असताना स्मृती अन्य प्रकारची असू शकते हे लक्षात घ्यायला हवे. म्हणजे जशी चवीची, वासाची, स्पर्शाची इत्यादी स्मृती असते, तशीच भाषेची! अर्थात, परत पंचाईत आलीच की भाषेची म्हणजे मराठी, तेलुगू, इंग्रजी, अरबी अशा भाषांची स्मृती, की कोणत्याही एका भाषेच्या माध्यमातून साठवलेली स्मृती? यांपैकी एखादी भाषा येते असे आपण जेव्हा म्हणतो तेव्हा आपण कोणत्या तरी स्मृतीबद्दल बोलत असतो, का आपण कोणत्याही स्मृतीबद्दल बोलत असतो तेव्हा अटळपणे कोणत्या ना कोणत्या भाषेच्या माध्यमातून साठवलेल्या स्मृतीबाबतच बोलत असतो? अजूनच मूलभूत प्रश्न : भाषानिरपेक्ष स्मृती म्हणून काही अस्तित्वात असते का?

भाषा म्हणजे काय, या प्रश्नाच्या उत्तरावर शेवटच्या प्रश्नाचे उत्तर अवलंबून आहे. भाषेची आपली व्याख्या किती व्याप्त आहे त्यावर भाषानिरपेक्ष स्मृती असते की नाही ते ठरेल. उदाहरणार्थ, वास आठवतो तेव्हा वास कसा होता हे भाषेत सांगता येते; म्हणजेच, जे जे स्मृतीत आहे त्या सगळ्यासाठी भाषिक अभिव्यक्ती शक्य आहे. त्यामुळे स्मृती आणि भाषिक स्मृती या वेगळ्या नसतात असे म्हणता येईल. पण पुन्हा, भाषेत सांगता येणे म्हणजे भाषेतच उपलब्ध असणे नव्हे, असा युक्तिवाद करता येईल; मग स्मृती आणि स्मृतीची भाषिक अभिव्यक्ती असे दोन भाग करावे लागतील! असे म्हणत असताना भाषा आणि स्मृती यांच्या व्याख्या हाताशी तयार असणे आवश्यक आहे हे नक्की!

प्रत्येक बोध किंवा ज्ञान हे शब्दाद्वारेच होत असतात; समग्र बोध हा शब्दावरच आधारित असतो; त्या व्यतिरिक्त बोध असा काही नसतो, अशी एका टोकाची भूमिका! या भूमिकेत भाषा आणि बोध या गोष्टी भिन्न राहात नाहीत. अर्थातच यात भाषेची व्याप्ती खूपच मोठी आहे. याच्या विरुद्ध टोकाची भूमिका अशी की शब्दांची जुळणी ज्यामुळे शक्य होते असा ज्ञानात्मक ऐवज म्हणजे भाषा. यात बोध आणि भाषा यांची वरीलप्रमाणे घट्ट सांगड घातलेली नसते. या दोन भूमिकांच्या आधारे आपण आधुनिक भाषाविज्ञानातील विविध सिद्धांतने समजून घेऊ.

यात पडण्याआधी मराठी भाषेतील ‘स्मृती’, ‘स्मरण’, ‘आठवण’ हे शब्द आणि इंग्रजीतील ‘मेमरी’ या शब्दांतील फरक लक्षात घेणे उपयुक्त ठरेल. आजघडीला आंतरराष्ट्रीय पातळीवर न्यूरोसायकॉलजीत जे संशोधन चालते त्यात मेंदूची संरचना आणि कार्य यांचा अभ्यास होतो. त्यांची सांगड मनोवैज्ञानिक प्रक्रिया आणि वर्तन यांच्याशी घातलेली असते. त्यात ‘मेमरी’ हा शब्द सर्रास वापरला जातो. इथे ‘मेमरी’ या शब्दाला तांत्रिक अर्थ आहे. ‘मेमरी’ आणि ‘स्मृती’ हे शब्द सजातीय, म्हणजे एकाच मुळाचे आहेत. अर्थात वैज्ञानिक परिभाषेनुसार कोणतीही माहिती जेव्हा सांकेतिक स्वरूपात नोंदवून, साठवून हवी तेव्हा वापरली जाते, तेव्हा तिला ‘स्मृती’ म्हटले जाते. या संदर्भात मराठीत ‘स्मृती’ हा शब्द वापरात आहे. पण त्याचबरोबर हेही लक्षात घेतले पाहिजे, की ‘आठवण’ आणि ‘स्मृती’ हे शब्द वैयक्तिक, भावनिक आणि सांस्कृतिक इत्यादी संदर्भांतही सर्रास वापरले जातात. उदाहरणार्थ, ‘स्मृतिभ्रंश’ आणि ‘स्मृतिविलास’ किंवा ‘नामस्मरण’, ‘स्मृतिशेष’ इत्यादी शब्दांत ‘स्मृती’ या शब्दाचा संदर्भ वेगवेगळा आहे. वैज्ञानिक लेखनात मात्र तो उपरोक्त, म्हणजेच ‘सांकेतिक नोंदणी, साठवण आणि वापर’ या अर्थी वापरला जातो. ‘स्मृतिभ्रंश’ या शब्दात हा वैज्ञानिक अर्थच अपेक्षित आहे.

भाषा आणि मेंदू यांच्यातील संबंधांचा अभ्यास करणारी ज्ञानशाखा म्हणजे न्यूरोलिंग्विस्टिक्स. मराठीत त्यासाठी ‘मस्तिष्कलक्ष्यी भाषाविज्ञान’ असा शब्द वापरता येईल. आजघडीला मेंदूचा अभ्यास विविध साधनांच्या साहाय्याने करता येतो. एक काळ असा होता, की मानवी मेंदूतील भागांची कार्ये अभ्यासण्यासाठी केवळ बाह्य मानवी वर्तनावर अवलंबून राहावे लागे. त्यापुढे प्रगती होऊन आज मेंदूतील भागांच्या रासायनिक घडणीबाबत आपल्याला बऱ्यापैकी माहिती झालेली आहे. ही प्रगती वैद्यकशास्त्रासाठी जितकी उपकारक ठरलेली आहे तितकीच भाषा आणि ज्ञान यांबाबतच्या संशोधनासाठीही. या अनुषंगाने सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा की स्मृती आणि बुद्धिमत्ता यांचा साठा करणारी अशी कोणतीही जागा मेंदूत नसते. मेंदूत ज्या मज्जापेशी कार्यरत असतात त्यांच्या विशिष्ट कार्याला स्मृती आणि बुद्धिमत्ता ही नावे दिली गेलेली आहेत. मेंदूचा अमुक एक भाग फक्त स्मृतीचा साठा करतो असे स्थानिक कार्यवाटप नसते, तर एकुणात मेंदूत अनेक प्रक्रिया घडत असतात; त्याच्या काही कार्यांना आपल्या भाषेत नावे आहेत. उदाहरणार्थ, बुद्धिमत्ता, स्मृती, विश्लेषण- कार्यकारणसंबंधांच्या आधारे युक्तिवाद, इत्यादी कार्ये; त्यांच्या नावातून कोणत्याही स्थानाचा ठोस असा निर्देश अभिप्रेत आजच्या न्यूरोसायकॉलजीत नाही.

१.२ स्थानिकीकरणाचा सिद्धान्त
याबाबत अजून एक महत्त्वाची बाब अशी, की मेंदूचे आकलन स्थानिकीकरणाच्या सिद्धांतावर आधारलेले होते. म्हणजे मेंदूच्या अमुक कार्याचे कारक मेंदूतील अमुक स्थान असा समज होता. हा सिद्धा्न्त पूर्णपणे खंडित झालेला नसला तरी आजघडीला स्थानिकीकरणाला तितके महत्त्व राहिलेले नाही. कारण, मेंदूतील काही भाग काही कार्ये मुख्यत्वेकरून हाताळत असतात हे जरी अनेक बाबींत खरे असले, तरीही इतर भाग ही कार्ये करूच शकत नाहीत असे नसते, हे कालांतराने उघड झालेले आहे. स्मृतिभ्रंश होतो तेव्हा गेलेली स्मृती कालान्तराने परतदेखील येताना आढळते. हे शक्य होते त्यामागचे कारण म्हणजे स्मृतीचे कार्य बजावण्याचा विशेषाधिकार किंवा क्षमता विशिष्टच पेशींना नसते, तर आसपासच्या इतरही पेशी ते कार्य बजावायला लागतात. थोडक्यात, पेशींमधील कार्यवाटप नेहमीकरता निश्चित झालेले नसते तर त्यात बदल शक्य असतात. याबाबत जिज्ञासू वाचकांनी ‘स्थानिकीकरण विरुद्ध समक्षमता’ हे सिद्धान्त पाहावेत.

उदाहरणार्थ, अपघातात एखाद्या व्यक्तीचे डोळे जातात तेव्हा न दिसण्याचे कारण मज्जापेशींतील बिघाड नसून डोळ्यांतील यंत्रणा बिघडलेली असू शकते. पूर्वी पाहण्याचे कार्य करणाऱ्या पेशी अशा प्रसंगी नुसत्या बसून न राहता त्या दुसऱ्या ज्ञानेंद्रियाचे काम स्वीकारतात आणि ऐकणे, हुंगणे इत्यादी विविध कार्यांत त्या सहभागी होतात. दुसरे उदाहरण म्हणजे द्वितीयभाषांची विस्मृती. एखाद्या व्यक्तीने आत्मसात केलेल्या अगर शिकलेल्या द्वितीयभाषा जातात, असा भाषाभ्रंशही संभवतो. अशा प्रसंगी भाषांचा विसर पडला तरीही तो कायमस्वरूपी असतो असे नसते. तर, कालांतराने त्या भाषांच्या आकलनाचे कार्य इतर पेशी करू शकतात. अनेकदा द्वितीयभाषांची स्मृती परत आल्याचेही आढळते. हे सारे शक्य होते, कारण स्थानिकीकरण निश्चित स्वरूपाचे, एकदा-ठरले-की-ठरले-मग-काहीही-बदल-नाही या स्वरूपाचे नसते, तर त्यात लवचीकता असते. तेच कार्य या नाही तर दुसऱ्या पेशी करू शकतात; या पेशींवरचा अमुक कार्याचा भार कमी झाला तर त्या दुसरे कोणतेतरी कार्य करू शकतात, इत्यादी. अशी कार्यलक्ष्यी भूमिका मानवी मेंदू घेत आलेला आहे, हे संशोधनांती समोर आलेले आहे.

यासोबतच हे लक्षात घेतले पाहिजे की स्थानिकीकरणाचा दावा पूर्णपणे फोल ठरवण्यात आलेला नाही. पंचज्ञानेंद्रियांच्या संवेदनांची स्थाने मेंदूत बऱ्यापैकी सुनिश्चित स्वरूपाची असतात, तर त्या पलीकडील ज्ञान किंवा बोधप्रक्रिया मात्र एकवटलेल्या नसतात. उदाहरणार्थ, भाषा, अवकाश अगर पाण्यात होणारा संचार, कार्यकारण, विश्लेषण इत्यादी प्रक्रिया अनेक स्थानांच्या समन्वयाने होत असतात. मेंदूतील अमुकच पेशी हे काम बघतात असे एकास एक कार्य मांडता येत नाही.

भाषा आणि मेंदू यांसंबंधी वरील विवेचनावरून हे स्पष्ट आहे की भाषा मेंदूत एका ठिकाणी एकवटलेली नसते. अर्थात, अभिव्यक्ती, बोलकेपणा इत्यादी व्यक्तिमत्त्वाचे विशेष अनेकदा विशिष्ट स्थानाशी जोडलेले असल्याचे पाहण्यात आले आहे. एखाद्या व्यक्तीची न्यूरोसर्जरी झाली की अनेकदा ती व्यक्ती इतर बाबतींत पूर्वीसारखी असते, पण कधी बोलकेपणा कमी होतो, कधी उत्स्फूर्त अभिव्यक्ती अशक्य किंवा क्षीण झाल्याचे आढळते, इत्यादी. यात अफेजियाचे (Aphasia) प्रकार असू शकतात. तेव्हा “असं असं होऊ शकतं,” हे अनेकदा सर्जन आधीच सांगतात. ते त्यांना सांगता येते ते एका ढोबळ स्थाननिश्चितीमुळेच!

१.३ मेंदूवरील शस्त्रक्रिया आणि बधिरीकरण
मेंदूवर केल्या जाणाऱ्या सर्जरीच्या वेळी मेंदूच्या ज्या भागातून एखादा ट्यूमर काढायचा असतो तो भाग अर्थातच बधीर केला जातो. या बधिरीकरणाचा इतिहास थोडा जाणून घेऊ आणि मग भाषिक सिद्धांतनातील स्मृतीकडे वळू. शरीराच्या उजव्या भागातील हालचालींचे केंद्र डाव्या मेंदूत असते आणि डाव्या भागातील हालचालींचे उजव्या भागात, हे आपल्याला शालेय पाठ्यपुस्तकात शिकल्याचे आठवतच असेल. भाषेबाबत असे म्हणतात की, ती मेंदूच्या डाव्या भागाद्वारे हाताळली जाते. अर्थात, हे काही काटेकोरपणे निश्चित झालेले नसते कारण भाषा काही पंचज्ञानेंद्रियांपैकी एक नाही; ती एक विकसित समन्वयनिष्ठ व्यवस्था आहे. त्यामुळे सर्जरी करत असताना भाषिक केंद्रांना धक्का न लागू देता सर्जरी पार पाडणे महत्त्वाचे असते. तेव्हा ज्या व्यक्तीवर सर्जरी करायची आहे तिच्या मेंदूच्या दोन्ही भागांत भाषा विखुरलेली आहे, की एका भागात भाषेचा ऐवज जास्त हाताळला जातो आहे, हे पडताळणे आवश्यक असते. त्यासाठी एका भागाला बधीर करून भाषिक क्षमतांची चाचणी केली जाते.

यासाठी वादा नामक जपानी संशोधक-डॉक्टरने इंजेक्शनवाटे देता येईल असे एक बधिरीकरणाचे द्रव्य विकसित केले. त्याद्वारे मेंदूचा अर्धा भाग बधीर केला जातो आणि भाषिक क्षमता कितपत आहेत हे बघितले जाते. व्यक्ती भाषिक कार्ये व्यवस्थित पार पाडत असेल, तर बधीर न केलेला अर्धा मेंदू भाषा हाताळू शकतो आहे, असा निष्कर्ष काढून उर्वरित भागावर सर्जरी करणे धोक्याचे नाही असे ठरवले जाते. यालाच वादाची चाचणी असे म्हटले जाते. याचा आपल्या विषयाशी काय संबंध? तो असा, की भाषिक कार्य काही अंशी स्थानपरत्वे निश्चित असते, तर त्याचप्रमाणे ते काही अंशी विखुरलेलेदेखील असू शकते, हे समजून घेणे. आधी बराच काळ असा समज दृढ होता की मेंदूच्या केवळ डाव्या भागातच भाषिक कार्य होत असते. पुढे दोन्ही भागांत समान वाटणी झाल्याचे आढळले, आणि अनेकदा तर एकच भाग दोन्ही भागांचे काम करू शकतो असेदेखील आढळून आले. या साऱ्याचा आशय असा की प्रगत कार्ये (पंचज्ञानेंद्रियांपलीकडील) मेंदूत विखुरलेली असतात आणि एकच एक भाग त्यांचा कारक नसतो. म्हणजेच, भाषिकस्मृती किंवा भाषिक ऐवज अमुक एकाच ठिकाणी एकवटलेला नसतो, तर समग्रपणे केले जाणारे ते कार्य असते.

१.४ भाषा : भाषाविज्ञानातील दृष्टिकोन
भाषा म्हणजे काय, या प्रश्नाच्या उत्तरावर भाषाविज्ञानात बराच ऊहापोह झालेला आहे. नोआम चॉम्स्की यांनी भाषेच्या जैविक अधिष्ठानाबाबत जोरकसपणे मांडणी केली. भाषा आत्मसात होणे हे मनुष्यप्राण्यांत विशेषकरून होत असते कारण आपल्या जैविक घडणीतच भाषेचा अंतर्भाव असतो अशी त्यांची भूमिका होती. खरे तर हा त्यांचा गृहीतपक्षच होता. तर, ज्ञाननिष्ठ भाषाविज्ञान चॉम्स्की यांच्या भूमिकेच्या अगदी विरुद्ध भूमिका घेत, ‘भाषेला जैविक अधिष्ठान नसते तर उपलब्ध ज्ञानात्मक क्षमता आणि समाजीकरण यांच्या समन्वयातून भाषा विकसित होत असते’ असे मांडते. या अंगाने स्टिव्हन पिंकर यांचे रसाळ लेखन उल्लेखनीय आहे. तसेच, याच अंगाने ‘कनेक्शनिस्ट मॉडेल’ नावाची एक भूमिका आहे; तीदेखील विविध ज्ञानशाखांत घेतली गेली आहे. अनेक साधे घटक एकत्र येऊन, त्यांच्या जुळणीतून एखादी गुंतागुंतीची व्यवस्था निर्माण होऊ शकते ही त्या भूमिकेमागील मर्मदृष्टी आहे. भाषादेखील अनेक सुट्या ज्ञानेंद्रियांच्या जुळणीतून, बाह्य प्रेरणेतून आकाराला येते असे म्हटले जाते.

थोडक्यात, भाषेला वाहिलेला असा एक साठा स्मृती म्हणून मेंदूत असतो असे भाषिक सिद्धान्तात मानले जात नाही. किंबहुना, स्मृतीच जर एक कार्यात्मक विशेषण किंवा गुणधर्म म्हणून गणली जात असेल तर ‘कार्यासाठी साठा’ अशी कल्पना साहजिकच संभवत नाही. (कार्यात्मक विशेषण किंवा गुणधर्म : इथे आठवण किंवा स्मृती ही ‘साठवण’ किंवा ‘साठा’ या अर्थाने घेतली जात नाही तर आठवणे, स्मरण करणे हे बुद्धीचे एक कार्य, एक काम म्हणून पाहिले जाते. स्मृती म्हणजे कोणताही कोश किंवा संचय नसून ती आठवण्यातील एक कृती आहे आणि एकूणच स्मृती ही ऐवज नसून मेंदूचे एक कार्य असते असे आजच्या विज्ञानानुसार स्मृतीचे आकलन आहे. स्मृती हे कोणतेही स्थळ, जागा, साठा नसून तो मेंदूचा कार्यात्मक गुणधर्म आहे, मेंदूच्या एका कार्याचे नाव म्हणजे स्मृती असे स्मृतीचे आत्ताचे आकलन होय.) शिवाय, भाषा हे एक प्रगत कार्य मानल्यास त्यात स्मृतीची कल्पना उपस्थित करण्याची गरज भासतच नाही. इथे महत्त्वाची बाब ही की भाषा म्हणजे साठ्याच्या स्वरूपातील ऐवज नसून ती एक समग्र संवेदनांच्या समन्वयातून उपस्थित होणारी क्षमता असते. वरील परिच्छेदात चर्चिलेला भाग हा या क्षमतेचे अंकन जनुकीय स्वरूपात किंवा शरीररचनेच्या दृष्टीने मेंदूच्या संरचनेत कसे झालेले असते याबाबत होता. या भाषिक क्षमतेचा आविष्कार व्यक्तीच्या जीवनातील आरंभीच्या काही वर्षांत जोरकसपणे होत असतो; नंतर मात्र त्याचा जोर ओसरतो, त्यामुळे भाषा आत्मसात करणे या सुरुवातीच्या काळात न झाल्यास पुढे अशक्य नाही, तरी कठीण होत जाते.

हेलन केलरच्या आयुष्यावरील ‘ब्लॅक’ हा चित्रपट पाहिल्याचे आपल्याला आठवत असेल. त्यात ती कारंज्यातून पडणाऱ्या पाण्यात हात घालते आणि तिचे शिक्षक ‘पाणी’ या आशयाचे चिह्न हाताच्या साहाय्याने करताना दाखवलेले आहेत, ते दृश्य आठवा. हाच तो क्षण जेव्हा तिला पहिल्यांदा कळते की जगातील वस्तूंचा निर्देश चिह्नांद्वारा करता येऊ शकतो. भाषिक क्षमतेच्या विकासात हे लक्षात येणे हीच मोठी कलाटणी असते. भाषा शिकणे (म्हणजे आज तुम्ही या वयात एखादी नवी भाषा शिकता तेव्हा) आणि आत्मसात करणे यात फरक असा की शिकत असताना भाषा नावाची गोष्ट जगात असते हे आपल्याला माहीत असते, त्यापैकी एखादी भाषा आपल्याला नीट येतही असते; पण आत्मसात होत असताना बाळांना हे माहीतही नसते की भाषा म्हणून काहीतरी जगात असते. शब्द आणि अर्थ यांची सांगड असते हे एकदा प्रस्थापित झाले की पुढील मार्ग हा जुळणीचा, सुसंगती शोधत भाषेच्या समुद्रात वाट काढत जाण्याचा असतो! सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आत्मसातीकरण अबोधपणे होत असते. शिकत असताना व्याकरण जसे जाणतेपणी शिकले जाते तसे आत्मसात होताना होत नसते. हे बाळवयातच सोपे असते कारण ‘निर्णायक वया’चा गृहीतपक्ष – म्हणजेच काही विशिष्ट वयापर्यंतच भाषिक क्षमता आत्मसातीकरणासाठी सुलभपणे उपलब्ध असते. यासंबंधीचा अजून एक गृहीतपक्ष म्हणजे ‘भाषिक क्षमता उपजतचअसते’.

१.४.१ स्मृती : समज-गैरसमज
१.४.१.१ मेंदूतील स्मृती विरुद्ध संगणकातील स्मृती
भाषा आणि स्मृती समजून घेताना किंवा एकूणच मेंदूची कार्यपद्धती समजून घेताना आपण एखादे रूपक वापरून मेंदूचे कार्य समजून घेत नाही आहोत ना, ह्याबद्दल सतत सावध राहायला हवे. उदाहरणार्थ, संगणकीय मेमरी आणि आपल्या मेंदूतील मेमरी यांत साम्य कल्पून मेंदूबाबत विचार केल्यास त्यातून मेंदूबाबत काही ठोस माहिती हाती लागत नाही. कारण आपण वर पाहिल्याप्रमाणे मानवी मेंदूत स्मृती हे एक कार्य आहे आणि संगणकशास्त्रात मात्र मेमरीला ठोस भौतिक साठा म्हणून स्थान आहे, हा फरक लक्षणीय आहे. शिवाय, उगाच संगणकीय परिभाषेत मेंदूबाबत बोलल्याने आपण मेंदूबाबत बोलत आहोत असा भास होतो. त्यामुळे याबाबतीत सावध राहायला हवे. वर आपण कनेक्शनिस्ट मॉडेल्सचा उल्लेख केला, त्याचा वापर आर्टिफिशिअल इन्टलिजन्समध्येही केला जातो. पण ते एक सैद्धांतिक प्रारूप आहे. मेंदूच्या कार्यपद्धतीबाबत समजून घेताना अशा रूपकांबाबत सावध राहायला हवे, हे नक्की१०!

१.४.१.२ अल्झायमर्झ आणि बहुभाषकता
भाषा, बहुभाषकता आणि मेंदूबाबत अजून एक मोठा गैरसमज म्हणजे अनेक भाषा येत असतील तर अल्झायमर्स होण्याची शक्यता कमी असते. एक चटकदार बातमी म्हणून अनेक इंग्रजी, मराठी वृत्तपत्रांत यावर अनेकदा रकानेच्या रकाने येत असतात. पण त्याला काही आधार नाही. तुम्हाला अनेक भाषा येत असतील तर ती चांगलीच गोष्ट आहे, पण म्हणून तुमची अल्झायमर्सची चिंता मिटली किंवा शक्यता कमी झाली असे काही नाही! मुळात एकभाषक व्यक्तीचा मेंदू आणि बहुभाषक व्यक्तीचा मेंदू यांत किती फरक असतो यावर संशोधन चालू आहे; पण बहुभाषकतेमुळे अल्झायमर्सची शक्यता कमी होते याबाबत काही ठोस पुरावा हाती आलेला नाही. बहुभाषकाच्या मेंदूतील सेरेब्रल कॉर्टेक्समधील जास्त मज्जापेशी वापरल्या जातात, असे मानले जाते. या पेशी वापरात असल्याने अल्झायमर्समध्ये होणारा पेशींचा क्षय किंवा पेशी निकामी होणे कमी होत असावे असा अंदाज आहे, पण त्याबाबत ठोस पुरावा काही नाही.

२. भाषिकस्मृती : सामाजिक-सांस्कृतिक पैलू आणि पेच
२.१ भाषिक अखंडता किंवा सातत्य : एक पेच
मेंदूतील भाषेचे स्थान यावर आता आपण बराच ऊहापोह केलेला आहे. आता भाषिकस्मृती, भाषा आणि अस्मिता या सामाजिक, मानसिक, वैयक्तिक पातळीवर कशा प्रकारे ओळख निर्माण करतात ते पाहू. भाषिक-सातत्य हा एक गहन तात्त्विक प्रश्न आहे. तो नेमका काय ते आपण आधी समजून घेऊ. कालक्रमात एखादी भाषा ‘भाषा’ म्हणून नावारूपाला, आकलनाला येते ती कशी असा तो प्रश्न आहे. ज्ञानेश्वरकालीन मराठीच्या आधी मराठीचे सातत्य असणारच आणि श्रवणबेळगोळच्या शिलालेखाआधीदेखील मराठीचे अस्तित्व असणारच. अलीकडेच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा अशी मागणी आहे. त्यांनी तर हे सातत्य इ. स. पूर्व दुसरे ते इ. स. दुसरे शतक इथवर नेलेले आहे; कारण तत्कालीन गाथासप्तशती (गाथासत्तसई) हा महाराष्ट्री प्राकृतातील ग्रंथ मराठीतील आद्य ग्रंथ म्हणून गणला आहे. म्हणजे आद्य शिलालेख नंतर, आणि आद्य ग्रंथ आधी अशी काहीशी आपली पंचाईत होणार! अशीच पंचाईत मल्याळम या भाषेने ओढवून घेतलेली आहे. त्यांच्या भाषेचे जनक श्री. एळुत्तच्चन्‌ सोळाव्या शतकातले तर आद्य ग्रंथ सातव्या आठव्या शतकापर्यंत जातो! एक अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी काय काय हिकमती या भाषकांच्या इतिहासकारांनी आणि समित्यांनी लढवल्या आहेत हे एक दिव्यच आहे!

असा घोळ उपस्थित होतो तो भाषिक-सातत्य या घटिताच्या अपूर्ण आकलनामुळे. एक गोष्ट आपण ध्यानात घेतली पाहिजे की कालक्रमात एका संवादपद्धतीला अमुक एक भाषा म्हणून नाव देण्याचे काम आज आपण आधुनिक काळात बसून करत आहोत, पण जुन्या काळात लोकमानसात भाषांचे, त्यांच्या नावांचे आकलन तसेच होते का, याबाबत आपल्याला ठोस काही माहीत नसते. ज्ञानेश्वर काळात मराठी होती हे ज्ञानेश्वरीतील काही अवतरणे देऊन सांगता येईल; परंतु महाराष्ट्री प्राकृतापर्यंत आपला विस्तार नेणे हे अती होते कारण केवळ नावात महाराष्ट्री आहे म्हणून काही ती प्राकृत मराठीशी नाते सांगत नाही. पैशाची, शौरसेनी, इत्यादी तत्कालीन प्राकृत भाषा आजच्या महाराष्ट्र नामक भूभागात समाविष्ट होऊ शकतात म्हणून काही त्यांनाही मराठीची आदिम अवस्था मानता येत नाही.

भाषिक सातत्य तत्त्वतः विरोधाभासात्मक आहे.११ एखादी भाषा आज असते म्हणजे भूतकाळातही ती असायलाच हवी, पण आज आपल्याला आपली अमुक एक भाषक म्हणून जी स्वतःची ओळख जाणवते तशी ती भूतकाळात आपल्या पूर्वजांना होती का, हा खरा प्रश्न आहे. थोडक्यात, भाषिक सातत्य तत्त्वतः अटळ असायला हवे पण अस्मितेच्या दृष्टीने, आपली अमुक एक ओळख सांगण्याच्या दृष्टीने भाषिक-सातत्य जशास तसे लागू होत असते का, हा प्रश्न विचारात घ्यावा लागेल. आज भाषिक-अस्मिता जशा स्पष्ट आणि तीक्ष्ण आहेत तशा पूर्वीच्या काळात नसूदेखील शकतात. अस्मिता ज्यांवर रचली जाते अशा इतर अनेक गोष्टी असू शकतात आणि भाषा हा बऱ्यापैकी आधुनिक घटक मानता येईल, कारण ‘एक देश एक भाषा’ इत्यादी कल्पना युरोपीय राष्ट्रकल्पनेतून आलेल्या आहेत. भारतात भाषिक-अस्मिता कशा आकाराला आल्या याचे ३००-४०० वर्षांपूर्वीपर्यंतचे चित्र आपल्याकडे फारसे स्पष्ट नाही; किंबहुना, भारताचा भाषिक इतिहास यावर फारसा प्रकाश अजूनही पडलेला नाही.

२.१.२ भाषा : अनेक बोलींचा समुच्चय
भाषिक अस्मिता लक्षात घेताना अजून एक गोष्ट समजून घ्यायला हवी - ती म्हणजे भाषा हे नाव कोणकोणत्या बोलींना दिले जाते! मराठी हे नाव केवळ एका बोलीचे नाव नाही तर विविध बोलींना एकत्र आणण्याचा१२ भाग त्यात असतो. राष्ट्राच्या आणि प्रशासनाच्या कल्पनेतच अशा स्वरूपाचे सपाटीकरण अनिवार्य असते, आणि एका मर्यादेपलीकडे वैयक्तिक ओळख, अस्मितांची दखल घेणे या व्यवस्थेत अशक्य असते. तर भाषिक अस्मितांच्या अनुषंगाने यात महत्त्वाचा मुद्दा असा, की या एका छत्राखाली आणलेल्या बोली कधीही आपली अस्मिता खूर करून वेगळे होण्याचा प्रस्ताव मांडू शकतात. भारताच्या भाषावार प्रांतरचनेच्या समीक्षेमध्ये हा मुद्दा महत्त्वाचा आहे आणि विचारातदेखील घेतला गेलेला आहे.
आपल्यासमोर मराठी भाषिक अस्मिता हे उदाहरण असताना आपण हे लक्षात घ्यायला हवे की ‘मराठी’ हे नाव आपण अनेक बोलींना एकत्रितपणे दिलेले आहे. यातून एखादी बोली सरळसरळ विलग होऊन स्वतंत्र भाषेचा दर्जा मागू शकते याचे भान आपल्याला एरवी नसते; पण साठच्या दशकातील गोव्यातील कोकणीचे उदाहरण ताजे आहे. थोडक्यात, एका छत्राखाली अनेक अस्मिता आपण भाषा म्हणून बांधून ठेवलेल्या असतात. कालौघात यातील किती वेगवेगळ्या अस्मिता बाहेर पडतील हे सांगणे कठीण आहे. अर्थातच या भाषिक अस्मितांना पोषक असे राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक वातावरण आणि अस्मितांची पार्श्वभूमी हवीच असते. या सगळ्यामध्ये एक सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक घटक म्हणून भाषिकस्मृती स्वतःचे असे एक खास कार्य बजावत असते.

या न्यायाने बोलींना (अर्थात बोलीभाषकांना!) खरे तर निर्णय घ्यायचा असतो की आपण कोणत्या भाषेसोबत आहोत अथवा आपणच एक स्वतंत्र भाषा म्हणून उदयाला येऊ इच्छित आहोत. भाषिक अल्पसंख्यांक अनेकदा एखाद्या बहुसंख्याक भाषागटाशी हातमिळवणी करून नांदत असतात. उदाहरणार्थ, तुळूभाषक सरसकटपणे कानडीशी हातमिळवणी करून नांदत आहेत; जवळजवळ प्रत्येक तुळूभाषक कानडीचाही भाषक आहे. तुळूनाडूच्या मागणीला म्हणावा तसा जोर मिळालेला नाही याची कारणे राजकीय आणि भौगोलिक स्वरूपाची आहेत. अलीकडेपर्यंत तुळूला कानडीचीच एक बोली लोक मानत होते. आता मात्र तुळू अस्मिता बऱ्यापैकी स्वीकारली गेलेली आणि स्थिरावलेली आहे.

गोरखालॅंडचे उदाहरणदेखील काही अंशी भाषिक स्वरूपाचे आहे. उत्तर बंगालमधील भाग हा नेपाळी भाषक आहे आणि कागदोपत्री तिथले लोक अनुसूचित जमातीत मोडणारे आहेत. त्यांचा संघर्ष जितका सांस्कृतिक आणि एथनिक स्वरूपाचा आहे तितकाच तो भाषिक स्वरूपाचादेखील आहे असे म्हणता येईल. (ethnicच्या सविस्तर अर्थासाठी दुवा पाहा. raceसाठी पाहा. मराठीत दोन्हींसाठी वंश हा शब्द वापरता येईलच. वर्ण हा देखील प्रसंगी रेसार्थी वापरता येईल. मुळात इंग्लिशच्या ऑंटॉलजीत मराठीला बसवण्याचा प्रकार परिभाषा ठरवताना होताना दिसतो. तो टाळायला हवा. आजघडीला एथनिक म्हणत असताना रेशियल या अर्थी कमी आणि प्रादेशिक, सांस्कृतिक भेद या अर्थी जास्त अपेक्षित असतो. अर्थात, भिन्न प्रदेशातील लोक समान एथ्निसिटी सांगूच शकतात, पण त्या तपशिलात जाण्याची इथे गरज नाही. थोडक्यात, वर्ण आणि वंश दोन्ही शब्द ‘रेस’साठी पर्यायी म्हणून, पण एथ्निसिटीसाठी काहीच नाही अशी पंचाईत मराठीत आहे. सांस्कृतिक गट, उपसंस्कृती, उपराष्ट्रीयता, राष्ट्रक असे शब्द फार विचार न करता माझ्या मनात आले, पण अर्थातच ते त्रोटक आहेत. त्यामुळे मूळ इंग्रजी शब्द वापरला आहे.)

नेपाळी भाषकांची घनता तिथे जास्त आहे आणि तरीही बंगाली (बांगला) भाषा त्यांच्यावर लादलेली आहे. तेलंगणाचे उदाहरणदेखील या अंगाने बघता येईल. महाराष्ट्रातील उप-प्रादेशिक अस्मिता या केवळ सांस्कृतिक-ऐतिहासिक, सामाजिक, आर्थिक विषमतेतून जन्माला आलेल्या नसून त्या समांतरपणे भाषिक स्वरूपाच्यादेखील आहेत.

किंबहुना, एखाद्या प्रदेशाची पिछेहाट होते तेव्हा भाषिक भेदभाव हा केला जातोच. प्रशासन, राज्य या यंत्रणा नकळतपणे हा भाषिक भेदभाव पसरवत असतात, कारण भाषिक प्रमाणीकरण नावाची गोष्टच या उपभाषिक बोलींना गौण लेखत असते. सर्व बोलींचा समान आदर होईल, अमुक एक व्यक्ती अमुक प्रकारे बोलते म्हणून तिला हीन किंवा उच्च लेखले जाणार नाही ही लोकशाहीनिष्ठ जाणीव भाषेच्या बाबतीत आपल्या संस्कारांत रुजलेली नाही, कारण भाषिक प्रमाणीकरणाने भाषेच्या आणि बोलींच्या बाबत आपल्या मनात एक विशिष्ट प्रकारची अभिरुचिव्यवस्था (कशाला चांगले, कशाला वाईट म्हणायचे त्याची व्यवस्था) निर्माण केलेली आहे आणि भाषिक स्मृती या अंगानेदेखील विकसित झालेली आहे. थोडक्यात, भाषिकस्मृती आपल्या समाजाला एका साहजिक इतिहासक्रमातून प्राप्त झालेली नसते तर एक राजकीय भूमिका घेऊन भाषिकस्मृती आकाराला आणली जात असते.

- चिन्मय धारूरकर
(लेखक भाषाविज्ञानाचे प्राध्यापक आहेत.)
तळटिपा

१. आठवण हा शब्द सर्वाधिक अनौपचारिक असा शब्द आहे. त्याच बरोबर याला साहित्यिक, ललित, वैयक्तिक, भावनिक असे संदर्भ येतात. स्मरण हा बहुतकरून आध्यात्मिक, भक्ती इ संदर्भात जास्त येतो. अर्थात स्मरणपत्र हे लेटर आव्ह रिमाइंडरचा पर्याय म्हणून येतो तेव्हा समासातच येतो. समासाबाहेर स्मरण शब्दाचे अनौपचारिक व्यवहारात आढळ दुर्मीळ आहे.

२. इथे या शब्दाची व्युत्पत्ती पाहता येईल.

३. Localization versus equipotential theories या शब्दांनी शोध घ्यावा. शिवाय पाहा वेई (२०००) मधील पारादि
(२०००: ३६५) हा लेख.

४. Aphasia याला मराठीत वाचाघात, वाग्विकृती इत्यादी शब्द आहेत. मुळात भाषिक क्षमता वेगवेगळ्या अंगांनी क्षीण होण्याच्या विकृतीला अफेजिया म्हणतात. याच्या तीव्रता आणि कोणती भाषिक क्षमता क्षीण होते (बोलणे, ऐकणे इ०) यानुसार वाचाघाताचे प्रकार पाडले जातात.

५. Wada test या शब्दांनिशी शोध घ्यावा. अनेक लोक याचा उच्चार 'वाडा' असा करतात. तो इंग्रजीच्या स्पेलिंगवर आधारित आहे. जापानी भाषेत ट-वर्गातील ध्वनी नाहीयेत, त्यामुळे व्यक्तिनाम वादा असेच आहे.

६. Hypothesis साठी हा मराठी शब्द. वि० का० राजवाडे यांनी अभ्युपगम हा शब्द सुचवलेला होता. तो काही अंशी प्रचारात आहे. मला वाटतं गृहीतपक्ष हा सोपा, सुटसुटीत आणि मराठी मनाला समजणारा आहे.

७. भाषिक स्मृतीला असे भाषिक क्षमतेचे वळण दिल्यावर आपण या भाषिक क्षमतेसंबंधी अजून एक महत्त्वाचा गृहीतपक्ष समजून घेत आहोत.

८.Critical Period Hypothesis

९. Innateness Hypothesis. उक्त दोन्ही गृहीतपक्षांबद्दल मराठीतून वाचण्यासाठी पाहा मालशे (२००९ : ४-५, ८८-९०)

१०. यासंबंधी सविस्तर वाचण्यासाठी पाहा: https://aeon.co/essays/your-brain-does-not-process-information-and-it-is...

११. आज एखादी भाषा अस्तित्वात आहे म्हणजे भूतकाळात – काल-परवा-वर्ष-दशक-शतक इ- आधीदेखील ती अस्तित्वात असायला हवीच. असे आपण किती मागे जाऊ शकतो याला काही अंत नाही. भाषेचा उगम हा गृहीत धरावा लागत असला तरी ऐतिहासिक काळातील इथून भाषा सुरु झाली अशा एका बिंदूप्रत जाणे कठीण असते. त्यामुळे भाषिक सखंडता [ऐतिहासिक पुरावा हा खंडशः उपलब्ध असतो, उदा० एखादा ग्रंथ, पुढे २००-३०० वर्षे काहीच नाही, पुन्हा एखादा ग्रंथ, पुन्हा काही नाही इ०] हे ऐतिहासिक पुराव्यातून निर्माण झालेले वास्तव असले तरी तर्कतः त्यात अखंडता कल्पावी लागते. अर्थातच या अखंडतेसह आपण अनंतकाळ मागे जाऊ शकतो आणि त्या मागे जाण्याला ठोस भौतिक ऐतिहासिक पुराव्याचा आधार असेलच असे नाही. या अर्थी भाषिक सातत्य किंवा अखंडता एक पेच उपस्थित करते.आदिमभाषेची कल्पना आणि भाषिक अखंडतेचा पेच मराठीतून सविस्तर समजावून घेण्यासाठी पाहा धारूरकर (२०१३अ) आणि धारूरकर (२०१३ आ)

१२.जरा नकारात्मक शब्द वापरायचा तर सपाटीकरणाचा
सन्दर्भ :

धारूरकर चिन्मय (२०१३ अ) ‘प्राचीनतमभाषा आणि आदिमभाषा’ [सोस्यूर यांच्या कोर्समधील अंतिम प्रकरणाचे सटीप मराठी भाषांतर] भाषा आणि जीवन वर्ष ३१ अंक २ पावसाळा. पुणे: मराठी अभ्यास परिषद. पृ. १८-२५.
धारूरकर चिन्मय (२०१३ आ) ’भाषेचे मायपण’ अक्षर दिवाळी अंक. मुंबई : अक्षर प्रकाशन. पृ. १०१-१०४.
पारादि, मिशेल (Paradis Michel) (२०००) ‘Language Lateralization in Bilinguals: enough already!’ वेई (२०००: ३६५).
मालशे मिलिंद (२००९) आधुनिक भाषाविज्ञान : सिद्धान्त आणि उपयोजन. मुंबई : लोकवाङ्मय गृह.
वेई ली (Wei Lee) (२०००) The Bilingualism Reader. Routledge: London and New York.

field_vote: 
4.5
Your rating: None Average: 4.5 (2 votes)

ऐसीवर स्वागत!
स्मृतीला सुरुवात करून नंतर बरेच मुद्दे आले आहेत. मेंदूत कुठे साठवली आहे,एकाच ठिकाणी नसून सर्व ठिकाणी भाषेची स्मृती साठवली आहे का चाचण्या करतात लिहिलं आहे. - ते पापुद्र्या स्वरुपात असेल. तुमचे बधिर करणारे औषध अगदी खालच्या थरात जात नसेल.
स्मृतिभ्रंश झाला की नवीन वरच्या थरातलं पुसलं जातं, आताआताचं आठवत नाही पण खूप जुनं आठवतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख आवडला.

शांतपणे, रवंथ करत वाचण्यासारखं मराठीत फारसं सापडत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मजकूर माहितीपूर्ण आहे.
वाचक म्हणून सुचवणी आहे, की दोन लेख वेगवेगळे द्यायला हवे होते.

अथवा म्हणूया की दोन्ही संलग्न आहेत, आणि त्यांचा एकत्र विचार व्हावा, अशी लेखकाची इच्छा आहे. प्रस्तावनेत दोन मितींचा उल्लेख केलेला आहे, त्या मितींचा काय परस्परसंबंध आपण लेखातून जाणला त्याचा इतिसारांशही शेवटी द्यायला हवा.

संपादकांना विनंती : लेखकाला विचारून "हाराष्ट्री" सुधारून "माहाराष्ट्री" असे करून घ्यावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद चांगला विषय ऐसीवर आणल्याबद्दल. भाषा आणि स्मृती ह्या लेखामध्ये अनेक उपविषय दडलेले आहेत.
मानवी भाषा हे जगाच्या आकलनाचे प्रतिबिंब असते. पण भाषेशिवाय विचार करता येतो का या प्रश्नाचा अनेकांनी घेतलेला धांडोळा, विचार व्यक्त करण्याचे भाषा हे साधन असते आणि विचार भाषेच्या चौकटीने बाधलेला असतात या उत्तराशी येऊन ठेपते.
या लेखाच्या निमित्ताने या क्षणी मला दोन गोष्टी आठवतात. – एक रत्नकर मतकरींची अब्द अब्द ही कथा. एका अपघाता फक्त आजोबा व त्यांची एक वर्षाची नात बचावतात. पण आजोबांची वाचा गेलेली असते आणि या परिस्थितीत ते एक प्रयोग करायचं ठरवतात, नातीला कोणतीही भाषा न शिकवता केवळ टेलीपथीच्या आधारे वाढवायचं, त्यासाठी ते दूर आडगावी जाऊन राहतात आणि अनेक वर्षांनंतर अचानक काही पर्यटकांच्या संपर्कात ती नात धाडकन येते आणि भाषिक भडिमारात गुदमरून जाते.. हे सगळं आजोबांच्या निवेदनशैलीतून व्यक्त होतं.
दुसरे दनि दिदरो या फ्रेंच तत्ववेत्याचे लेत्र स्युर लेझाव्हग्ल म्हणजे आंधळ्यांच्या विषयावर लिहिलेले पत्र. त्यात त्यांनी नव्यने विकसित झालेल्या तंत्रज्ञानामुळे जन्मांधांना शस्त्रक्रियेद्वारे दृष्टी प्राप्त झाल्यावर त्यांचे आधीचे वस्तूंचे स्पर्शाधिष्ठित आकलन केवळ दृष्टीद्वारे प्रस्थापित होऊ शकते का मुद्दा उपस्थित केला. (त्या लेखाची व्याप्ती बरीच मोठी होती पण या संदर्भात एवढंच)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक3
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सातत्याच्या संदर्भात काही मुद्दे/प्रश्न : १०० वर्षांपूर्वीची मराठी भाषा ही आजच्या मराठी भाषेपेक्षा निराळी होती हे आपण सोदाहरण दाखवून देऊ शकतो. काळ जसजसा मागे सरकत जाईल तसतशी ही प्रक्रिया अवघड होत असावी असा माझा अंदाज आहे. परंतु भाषेचा मूळ सांगाडा ( ज्याला भाषाशास्त्री लोक syntax आणि इतरही अनेक संज्ञा देतात) हा बदलला नसावा. मराठी भाषेच्या या मूळ सांगाड्याच्या रचनेविषयी काही सोप्या भाषेत लिहिता येईल का ? तसेच या आधारे आजच्या मराठी मुलांना , जागतिकीकरण , इतर भाषांचे प्रभाव असे सर्व घटक विचारात घेऊन भाषा शिकवण्यासाठी काही नवीन मॉडेल/उपक्रम यांची आवश्यकता आहे का ?

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Observer is the observed

लेख हळूहळू वाचला आणि आवडला. मस्त लिहिले आहे. अजून लिहायला पाहिजे होतं ही एकमेव तक्रार व्यक्त करून खाली बसतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं