Skip to main content

बालभारतीचे बारावी साठी मानसशास्त्राचे पाठ्यपुस्तक ….मानसिक गुलामगिरीची परिसीमा.

बालभारतीचे बारावी साठी मानसशास्त्राचे पाठ्यपुस्तक ….मानसिक गुलामगिरीची परिसीमा.

भारताला स्वातंत्र्य १९४७ साली मिळाले. ब्रिटीश आपल्या भूमीत चालते झाले . पण त्यांनी आपल्या शिक्षणात आणि त्या अनुषंगाने आपल्या विद्वानांमध्ये जी भारतीय संस्कृती बद्दल हीनत्वाच्या भावनांची बीजे पेरून ठेवली आहेत ती नष्ट होण्याची गोष्ट तर सोडाच पण आता त्याचा समृद्ध वृक्ष झाला आहे कि काय अशी शंका अनेक कारणामुळे येते. त्याचेच एक प्रातिनिधिक उदाहरण म्हणजे बालभारतीचे हे बारावीसाठी तयार केलेले मानसशास्त्राचे पाठ्यपुस्तक .

हे पुस्तक वाचल्यावर सकृतदर्शनी असे वाटते कि हे एखाद्या इंग्रजी पुस्तकाचे भाषांतर असावे.शिक्षण मंडळाने आणि त्यांच्या संपादक मंडळाने काही निश्चित विचार करून आणि प्रयत्न करून हे पाठ्यपुस्तक लिहिले असावे असे अजिबात वाटत नाही .
गोऱ्यालोकांचे सर्व काही बरोबर आणि भारतीय संस्कृतीचे सर्व काही चुकीचे अशी भावना आपल्या मनात निर्माण करण्याचे महत कार्य जे मेकौले (Thomas Macaulay)पासून सुरु झाले आहे ते आज सुद्धा तेवढ्याच जोमाने आपलेच बंधुभगिनी करीत आहेत याचा संताप प्रत्येक सुबुद्ध नागरिकाला येणे अतिशय गरजेचे आहे ...आणि त्या साठीच हा लेख.
मानसिक गुलामगिरीची हि परिसीमाच म्हणावी लागेल कि आपलेच विद्वान आमच्या बारावी सारख्या संवेदनशील वयातील मुलांना अश्या गोष्टी मानसशास्त्राचे पाठ्यपुस्तक या माध्यमातून शिकवतात
मी असे का म्हणतो ?

१.० या पूर्ण पुस्तकात मानसशास्त्रावर काम केलेल्या एकाही भारतीयाचे नाव नाही !
मानसशास्त्र या विषयावर काम केलेल्या एकाही भारतीयाचे नाव या पाठ्यपुस्तकात का नसावे ? बाहेरच्या जगाबद्दल माहिती करून देणाऱ्या शास्त्रांना विज्ञान आणि आपल्या मनातील आणि अंतर्मनातील विश्वाचे रहस्य उलगडून दाखवणारे ते ज्ञान हे आपले पूर्वज सांगत होते ते काय फक्त झोपेत सांगत होते काय ? आपल्या लोकांनी यावर काहीच विचार केला नाही ?
खरे तर मनाचा शोध अगदी प्राचीन काळापासून सुरु आहे. उपनिषदे ,भगवद गीता आणि वेद या मध्ये मानवी विचारांचा आणि भावनांचा सखोल विचार आढळतो . वेद , पातंजली पासून ते चार्वाक ,गौतम बुद्ध, रामदास स्वामी , ज्ञानेश्वर ,विवेकानंद ,टिळक यांनी मना बद्दल किती गहन विचार मांडले आहेत .
'योग: चित्तवृत्ती निरोध:' असे योगाची व्याख्या करतात यातील हे चित्तवृत्ती काय आहे ?
चरक संहितेत मनोव्याधी वर खूप खोलवर विचार केला गेलेला आहे ...याचा निर्देश या पाठ्यपुस्तकात का नसावा ?
का आपले ऋषी हे शास्त्रज्ञ नव्हते असे या पाठयपुस्तक लिहिणाऱ्या विद्वानांचे म्हणणे आहे ?

२.० शिथिलीकरण प्रतिक्रिया ..(चौकट ३.४.१.) बेन्सन यांनी दिलेली. तसेच ध्यानाबद्दल माहिती .
मानसिक ताण व्यवस्थापन या प्रकरणात तर मानसिक गुलामगिरीचा कळस गाठला आहे . यात बेन्सन यांनी दिलेली शिथिलीकरण प्रतिक्रिया एका चौकटीत दिली आहे. यात श्वासावर लक्ष केंद्रित करून शिथिलीकरण कसे करावे हे सांगितले आहे . योग समजणाऱ्या कुणालाही कळेल कि ही प्रतिक्रिया म्हणजे बुद्धाने सांगितलेली विपश्यना ही ध्यान पद्धती आहे. म्हणजे हा बेन्सन खरा … आणि बुद्ध खोटा ? बुद्धाचे नाव घ्यायला हे पुस्तक लिहिणाऱ्या विद्वान मंडळीना लाज वाटली कि काय ?
३.४.२ ध्यानाच्या पद्धती .
ध्यान हि संकल्पना पूर्णतः भारतीय आहे या बद्दल तरी कुणाचे दुमत असू नये. पण इथेसुद्धा मंडळाला पातंजली किवा बुद्ध यांचे नाव घ्यावे असे का वाटले नाही ?
३.० हे पाठयपुस्तक भारतीय ….ते शिकणारे भारतीय पण यातील उदाहरणादाखल दिलेली चित्रे गोऱ्या समाजाची ?
ही काही उदाहरणे पहा !
चौकट १.३ …. बुद्धीगुणांकात सुधारणा. ….यात सर्व मुले कुठल्यातरी युरोपिअन किवा अमेरिकन शाळेतील दाखवली आहेत .
आकृती ३.१.१ व्यक्तीचा ताणाचा अनुभव पुलावरून जाणाऱ्या ट्रक शी करता येईल …
यात पुलावरून जाणारा ट्रक सुद्धा परदेशी दाखवला आहे …. भारतात देशी बनावटीचे ट्रक सुद्धा नाहीत कि काय ?
आकृती ३.५.२. मित्रांकडून मिळणारा सामाजिक आधार ...ही सर्व चित्रे गोऱ्या लोकांची आहेत ...आपल्या कडे काय मित्र नाहीत ?
आकृती ७.२.१ गोंगाट . यात काही लोक गोंगाटापासून वाचण्यासाठी कानावर हात ठेवलेली दाखवली आहेत ….आता हि सुद्धा गोरी का ? आपल्या कडे का गोंगाटसुद्धा नाही ?

ही सर्व उदाहरणे मी फक्त प्रातिनिधिक म्हणून घेतली आहेत . बाकीची सर्व चित्रे अशीच परकीय आहेत .
मुद्दा हा कि यांना उदाहरणे सुद्धा भारतीय देता येऊ नयेत ? मला माझी मी पहिल्यांदा सांगितलेली शंका खरी वाटते ...कुठल्यातरी इंग्रजी पुस्तकाची पूर्ण नक्कल केली आहे !

४.० भारतीय शास्त्रज्ञ जरूर आहेत .
अगदी वेदकाळात किवा बुद्धकाळात जायचे नाही असे ठरवले तरी थोडासा गुगल शोध घेतला तरी आजच्या काळातील भारतीय मानसशास्त्रज्ञ सापडतात. श्री नरेंद्रनाथ सेन गुप्ता ,श्री गुनामुद्दीन डेव्हिड ,श्री संजय कक्कर आणि अगदी आजच्या काळातील श्री आनंद नाडकर्णी आणि असेच बरेच ...यांनी या क्षेत्रात खूप काम केले आहे ...यांना अगदी उल्लेख ही का नसावा ?

म्हणून माझे असे मत झाले आहे कि या सर्व विद्वान मंडळीना ज्यांनी हे पाठ्यपुस्तक लिहिले आणि या पुस्तकाला मान्यता देणाऱ्या मंडळाला या मानसिक गुलामगिरीतून कुणीतरी बाहेर काढायची गरज आहे.
हे असे शिक्षण घेतल्यानंतर आपल्या तरूण तरुणींना भारताचा आणि आपल्या संस्कृतीचा काय अभिमान वाटणार ? मग ही अशी मंडळी परदेशी जाऊन स्थाईक झाली आणि त्याच संस्कृतीचा अभिमान बाळगायला शिकली तर त्यात त्यांचा काय दोष ?

आपण फक्त इतकेच म्हणू शकतो कि लॉर्ड मेकौले ने जे ध्येय आपल्या डोळ्यासमोर ठेवले होते ते साध्य झाले.
“ …...आपण एक असा वर्ग निर्माण करायला पाहिजे कि जो रक्ताने आणि रंगाने तर भारतीय असेल पण त्याची आवड निवड ,मते ,संस्कार आणि बुद्धिमत्ता इंग्रजी लोकांसारखी असेल …...आणि जे बाकीच्या सर्व लोकांपर्यंत पाशिमात्य ज्ञान पोचवतील ….”
(We must at present do our best to form a class who may be interpreters between us and the millions whom we govern, --a class of persons Indian in blood and colour, but English in tastes, in opinions, in morals and in intellect. To that class we may leave it to refine the vernacular dialects of the country, to enrich those dialects with terms of science borrowed from the Western nomenclature, and to render them by degrees fit vehicles for conveying knowledge to the great mass of the population.- Lord Thomos Macaulay in 1835. )

भारताला स्वातंत्र्य मिळून इतक्या वर्षानंतर सुद्धा आपण मानसिक दृष्ट्या स्वतंत्र झालो नाही आणि आपण अजूनही इंग्रजांच्या चमच्याने दुध पितो आहोत हीच खरी शोकांतिका आहे.

Jayant Naik .

समीक्षेचा विषय निवडा

-प्रणव- Tue, 03/07/2018 - 13:23

ते शिकणारे भारतीय पण यातील उदाहरणादाखल दिलेली चित्रे गोऱ्या समाजाची ?

याचं एक कारण हे असावं की भारतीय लोकांच्या "स्टॉक इमेजेस" (stock images) इंटरनेटवर पुरेशा उपलब्ध नाहीयेत. पाश्चात्त्य लोकांचेच फोटो ऑनलाईन सापडल्यामुळे ज्याने कोणी डिझाईन केले आहे त्याने जे फोटो ऑनलाईन सापडले ते वापरले असावेत. वर्तमानपत्रामध्ये सुद्धा बऱ्याचदा वेस्टर्न लोकांचे प्लेसहोल्डर फोटो याच कारणामुळे दिसतात.

म्हणजे भारतीय लोकांच्या स्टॉक इमेजेसची अनुपलब्धता आणि त्याचबरोबर हवे ते फोटो स्वतः काढण्याचा आळशीपणा किंवा मग त्याचे बजेट नसणे ही कारणे असू शकतात.

चिमणराव Wed, 04/07/2018 - 18:58

पाठ्यपुस्तक मंडळ किंवा इतर सरकारी/ निमसरकारी संस्थांतील कर्मचाय्रांस ( हाच शब्द बरोबर वाटतो) काहीही स्वत:चे डोके चालवून पायावर कुह्राड मारून घ्यायची नसते. विषय संपतो.

'न'वी बाजू Wed, 04/07/2018 - 20:52

वेद , पातंजली पासून ते चार्वाक ,गौतम बुद्ध, रामदास स्वामी , ज्ञानेश्वर ,विवेकानंद ,टिळक यांनी मना बद्दल किती गहन विचार मांडले आहेत .
'योग: चित्तवृत्ती निरोध:' असे योगाची व्याख्या करतात यातील हे चित्तवृत्ती काय आहे ?

बरोबर, परंतु कदाचित बारावीच्या पुस्तकात निरोधचा उल्लेख नको म्हणून (सर्वनाशे समुत्पन्ने तत्त्वावर) संपूर्ण उल्लेखच टाळला असेल. (जणू काही बारावीच्या मुलांना निरोध ठाऊकच नसते.)

आकृती ७.२.१ गोंगाट . यात काही लोक गोंगाटापासून वाचण्यासाठी कानावर हात ठेवलेली दाखवली आहेत ….आता हि सुद्धा गोरी का ? आपल्या कडे का गोंगाटसुद्धा नाही ?

आहे. 'आपल्याकडे' गोंगाट आहे. किंबहुना, पाश्चात्य जगताच्या तुलनेत 'आपल्याकडे'च गोंगाट पुष्कळ अधिक आहे, असाही दावा करता येईल.

परंतु, गोंगाटाला कानावर हात ठेवणे हे गोरीच लोके करू जाणोत. 'आपली' लोके हे कधीच करणार नाहीत. किंवा, तुलनेने क्वचितच करतील. 'आपल्या' लोकांना काय, गोंगाटाची सवयच असते.

म्हणूनच गोंगाटाला कानावर हात ठेवणाऱ्या 'आपल्या' लोकांची चित्रे दुर्मिळ. म्हणून गोऱ्या लोकांचे चित्र छापावे लागले असेल.

भारताला स्वातंत्र्य मिळून इतक्या वर्षानंतर सुद्धा आपण मानसिक दृष्ट्या स्वतंत्र झालो नाही आणि आपण अजूनही इंग्रजांच्या चमच्याने दुध पितो आहोत हीच खरी शोकांतिका आहे.

आपण अजूनही इंग्रजांनी आणलेला चहा पितो, तो चालतो. इंग्रजांच्या चमच्यातल्या दुधानेच कसली आली आहे एवढी शोकांतिका?

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 07/07/2018 - 17:23

आनंद नाडकर्णींचं नाव बरंच आहे; मात्र त्यांनी केलेलं संशोधन काय आहे? त्याबद्दल मला काहीच माहीत नाही.