Skip to main content

विवेकनिष्ठतेच्या वाटेवर

श्रद्धा विसर्जन

पृथ्वीवरील चराचर सृष्टी व सर्व नैसर्गिक घटना निसर्ग नियमानुसार घडत असताना व हे नियम कुणीही बदलू शकत नाही, त्यावर आक्रमण करू शकत नाही, त्याचे उल्लंघन करू शकत नाही, ही परिस्थिती माहित असूनसुद्धा सुशिक्षित माणसांसकट सर्व फल-ज्योतिषाच्या नादी का लागतात? आत्मा, पुनर्जन्म, मोक्ष अशा भ्रामक कल्पनावर विश्वास का ठेवतात? अंत्यसंस्कारात दहावे-बारावे-तेरावे, मासिक श्राद्ध करून सहस्रावधी रुपये व्यर्थ का घालवतात? दहा रुपये किंमतीचा निरुपयोगी पत्र्याला पाचशे रुपयांना विकत घेऊन श्रीयंत्र म्हणून त्याची पूजा का करतात? लक्ष्मी प्रसन्न होईल असे त्यांना का वाटते? माणसाची बुद्धी इतकी रसातळाला कशी जाते? असे अनेक प्रश्न त्यांना पडतात. व या प्रश्नांच्या उत्तरांचा शोध घेताना श्रद्धा हो एकमेव कारण असू शकेल या निष्कर्षापर्यंत ते पोचतात. आणि यासंबंधात सुचलेल्या लेखांचा हा एक अप्रतिम संग्रह आहे.

या पुस्तकातील काही लेख लेखकाच्या वैयक्तिक अनुभवावर बेतलेले आहेत. त्यांना भेटलेल्या व्यक्ती, त्यांच्याशी झालेला संवाद, त्यांनी श्रद्धेच्या पुष्ट्यर्थ केलेला वाद-प्रतिवाद, वादातील तार्किक दोष इत्यादीवर नेमके बोट ठेवलेले चर्चा स्वरूपातील हे लेख अत्यंत वाचनीय आहेत. हे लेख वाचत असताना ही मंडळी इतके अतार्किक वाद कसे काय करू शकतात याचे आश्चर्य वाटू लागते. काही लेख विवेकवादाशी संबंधित संकल्पनेवर संवादाच्या स्वरूपात लिहिलेले आहेत. संवादाच्या स्वरूपातील लेख वाचत असताना लेखक आपल्या मनातील प्रश्नांचेच उत्तरं देत आहेत की काय असे वाटते. हे संवाद वाचत असताना त्या त्या विषयावरील तर्कसंगती ( व विसंगती) पटकन लक्षात येतात. लेखकाने लिहिलेल्या ओवीच्या स्वरूपातील काही कविताही या पुस्तकात समाविष्ट केलेले आहेत. त्याचप्रमाणे प्रा. वालावलकर यांऩी मराठी वृत्तपत्रांसाठी वेळोवेळी लिहिलेले पत्रसुद्धा यात आहेत. या प्रकारे विवेकावादासारख्या गंभीर विषयावर विविध शैलीतील कथा, संवाद, लेख, कविता, स्फुट लेख वाचताना वाचक नक्कीच हरवून जातो.

काही स्वतंत्र लेखात प्रा. य. ना. वालावलकर अंधश्रद्धांच्या संदर्भातील अनेक संकल्पनांचा ऊहापोह घेत सामान्यांच्या मनात असलेल्या समजुती-गैरसमजुती, वर्षानुवर्षे पाळत आलेल्या रूढी-परंपरा यातील गुणदोष वाचकांपुढे मांडतात. सर्वधर्म समभाव, विश्वास-श्रद्धा-निष्ठा, आत्मा आणि मानवी मेंदू, सत्य आणि श्रद्धा, निरीश्वरवाद्यांना शिक्षा, ज्ञान व श्रद्धा, श्रद्धावंताचे तत्वज्ञान इत्यादी लेखातून परमेश्वरावर विश्वास ठेवणाऱ्यातील अंतर्गत विसंगती प्रकाशात आणतात. मुळात देव, धर्म, श्रद्धा, आत्मा, पुनर्जन्म, मोक्ष, परलोक इ.इ. ज्ञानाचे विषय नाहीतच. त्यामुळे त्यावरील चर्चा, वाद-प्रतिवाद, तर्कसंगती लावण्याचा वृथा प्रयत्न व या संकल्पनामागील भूमिका इत्यादी गोष्टी फोल ठरतात, यावर लेखकानी भर दिला आहे. अनेक वेळा काही ‘बुद्धिवंत’ उपनिषद, वेद, दर्शन, वा भगवद्गीता यासारख्या ग्रंथांच्या आधारे आत्मा, परमात्मा यासारख्या पारलौकिक संकल्पनांच्या अस्तित्वाविषयी, त्यांच्या सुसंबद्धतेविषयी तावातावाने वाद घालत समोरच्याला नामोहरम करण्याच्या प्रयत्नात असतात. लेखकानी यातील काही लेखातून त्याच ग्रंथातील इतर काही परिच्छेद व श्लोक यांच्या आधारे या वादाच्या मुद्द्यातील विसंगती व प्रत्यक्ष चर्चेतील मुद्द्यांना बगल देवून केलेले स्पष्टीकरण किती तकलादू आहे हे दाखवून देतात. मुळात वाद घालणारे आपल्याला मुद्द्यांना पुष्टी देणारेच उतारे निवडलेले असतात हे लक्षात येऊ लागते. त्यामुळे वाद फिका पडतो. गीतेतील श्रद्धावान् लभते ज्ञानम् हे गीतावचन न पटणारे आहे याबद्दल लेखकाच्या मनात शंका नाही. श्रद्धा हे ज्ञानप्राप्तीचे साधन नाही. शिवाय श्रद्धा हा मानवजातीला जडलेला सर्वात भीषण आणि गंभीर रोग आहे असे लेखकाचे स्पष्ट मत आहे.

श्रद्धेचे विश्लेषण करत असताना लेखकाला पारंपरिक श्रद्धा (उदा. सोमवारी शिवपिंडीवर बेलपत्रे वाहावी), गतानुगतिक श्रद्धा ( उदा. लालबागचा राजा नवसाला पावतो), आशावती स्पर्धा (उदा. श्रीयंत्राचे पूजन केले तर धनप्राप्ती होते) व भयोद्भव श्रद्धा (उदा. मृतांचे अंत्यसंस्कार केले नाही तर त्याचा अतृप्त आत्मा कुटुंबाला पीडा देतो) असे चार प्रकार करावेसे वाटतात. . लेखक या सर्व श्रद्धाप्रकारांच्या बाबतीत विचारपूर्वक व तर्कसुसंगत भूमिका घेत आहेत. अंधश्रद्धांचा उपहास या लेखात अंधश्रद्धावर घाला घालत असताना लेचापेची भूमिका न घेता चेष्टा, टवाळी, खिल्ली, अवहेलना अशा गोष्टींचा सर्रास उपयोग करावा असे लेखकाचे मत आहे. फक्त हा उपहास अंधश्रध्दांचा असावा व कोणत्याही व्यक्तीचा नसावा हा इषारा ते देवू इच्छितात.

अजून एका लेखात लेखक स्वतःची भूमिका मांडत असताना सश्रद्धांना वैज्ञानिक दृष्टिकोनाचा स्वीकार करण्यास सांगणे यात गैर काही नाही, कारण तो घटनादत्त अधिकार आहे अशी मांडणी करतात. जरी उपासनेचे वा आपल्या मताप्रमाणे श्रद्धा बाळगण्याचे स्वातंत्र्य घटनादत्त असले तरी योग्य काय व अयोग्य काय हे सांगण्याचे अभिव्यक्ति स्वातंत्र्यही घटनेने आपल्याला दिलेले आहे याचे स्मरण लेखक करून देतात. यावरून प्रा. य. ना. वालावलकर श्रद्धा-अंधश्रद्धांच्या विरोधात इतक्या तळमळीने, इतक्या पोटतिडिकीने इतकी वर्षे का लिहित आहेत याची कल्पना येऊ शकते.

या पुस्तकातील काही लेख संवादाच्या प्रश्नोत्तरांच्या स्वरूपात असून त्यावरून श्रद्धा, निष्ठा, निरीश्वरवाद, राशीभविष्य, भाविकांची मानसिकता, नैतिकता, धर्माचे आकर्षण, आस्तिकांची मानसिकता इत्यादी विषयावरील वाद- संवाद वाचत असताना या संकल्पनामागील बारकावे कळू लागतात. व लेखकांची ही मनोरंजक पद्धतीने केलेले सादरीकरण वाचनीय ठरू लागते. खोचक प्रश्न व त्यांना दिलेली अचूक उत्तरं यातून विषय समजून घेण्यास मदत होते. म्हातारीची गोष्ट व इंदीची गोष्ट या कथेतूनही लेखक अंधश्रद्धा विरोधी संदेश देत आहेत.

या पुस्तकाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे लेखकानी लिहिलेल्या ओवीच्या स्वरूपातील श्रद्धेविषयीच्या कविता असेल. मुळात अशा विवेकी विचार केंद्रित विषयावर अभंगाच्या शैलीत निरूपण करता येऊ शकते हेच मुळात आश्चर्यजनक कल्पना आहे. लेखकांचे मरणभय, आत्मा पुनर्जन्म, अध्यात्म-विज्ञान समन्वय, श्रद्धा आख्यान, आनंददायी इहलोक इत्यादी कविता वाचताना कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय लेखकानी पोचवले आहे हे लक्षात येऊ लागते.

प्रा. वालावलकर यांनी अंधश्रद्धेच्या विरोधातील लढ्यात प्रत्यक्षपणे मैदानात उतरलेले नसले तरी या लढ्याला जे सैद्धांतिक पाठबळ लागते ते पुरवण्यात नेहमीच पुढाकार घेत आलेले आहेत. यासाठी ते सातत्याने वेगवेगळ्या मराठी दैनिकात पत्र लिहून श्रद्धाविरोधी भूमिका सामान्य वाचकापर्यंत पोचवत आले आहेत. व या पत्राद्वारे जनमत तयार करण्यात ते काही प्रमाणात यशस्वी झाले आहेत. या पुस्तकात त्यांनी वेळोवेळी लिहिलेल्या पत्रं समाविष्ट केले असून ते श्रद्धाविरोधातील एका प्रकारे स्फुट लेख आहेत असे म्हणता येईल. पत्रांच्या आशयाला मुख्यत्वे करून त्या त्या वेळच्या वृत्तपत्रातील बातम्या वा लेखांचा संदर्भ आहे. त्यात काही गोष्टींचे स्पष्टीकरण दिलेले असल्यामुळे वाचकांना बातम्यातील वा एखाद्या आस्तिक लेखकाच्या लेखातील भूलथापा पटकन लक्षात येतात. ज्ञान म्हणजे नेमके काय, पुनर्जन्माची संकल्पना, धार्मिक विधींचा स्तोम, साडेसाती निवारणासाठी सुरक्षाकवच, आत्महत्येचे कोडे, वास्तवाचा स्वीकार, ज्योतिषशास्त्राचा फोलपणा, वैचारिक प्रगती, प्रसारमाध्यमांची जबाबदारी, ईश्वराचा निर्दयपणा, अज्ञानाचा उदोउदो, निरुपयोगी यज्ञ, सत्यनारायण पूजा, वैदिक धर्म इत्यादीबद्दलची पत्रातील मांडणी जणू स्फुटलेखच वाटतात. व हे लेखन वाचताना समाजमानस कसा आहे, समाजाची दिशा कशी हवी, या गोष्टी स्पष्ट होत जातात. यातील काही पत्रं प्रकाशित झालेले नसतीलही. परंतु या सर्व पत्रांना एक श्रद्धाविषयक दस्तावेज म्हणून बघता येणे शक्य झाले आहे. याच पुस्तकातील लेखकाचे मित्र, भालचंद्र काळीकर यांनी लिहिलेले तीन लेखसुद्धा वाचनीय आहेत.

अनेकांना श्रद्धेविना जीवन अशक्य आहे असे वाटत असते. अशावेळी लेखक श्रद्धाविसर्जन करण्यास सुचवतात, हे त्यांना कदापि रुचणार नाही. कदाचित पुस्तकाचे शीर्षक अंधश्रद्धा विसर्जन असे चालले असते, परंतु श्रद्धा विसर्जन योग्य नाही असे सश्रद्ध सुचवतील. परंतु लेखकाच्या मते अंधश्रद्धा निर्मूलन करायचे तर कोणीतरी दाभोलकरांसारखा प्रबोधनकार लागतो. पण आपले श्रद्धा विसर्जन मात्र प्रत्येकाला स्वतःहून पुढाकार घेऊन करायचे असते. त्यासाठी भावनेवर मात करत बुद्धिनिष्ठपणे विचार करत राहिल्यास हे काम सोपे होईल. या विवेकनिष्ठतेचा खडतर मार्गावर चालण्यासाठी हे पुस्तक नक्कीच मदत करू शकेल.

विवेकाची चाड असलेल्या प्रत्येकाच्या संग्रही असायला हवे असे हे पुस्तक आहे.

श्रद्धाविसर्जन
लेः प्रा. य. ना. वालावलकर
वरदा प्रकाशन प्रा. लि. पुणे
पृ. सं 256, किंमत 300 रु.

समीक्षेचा विषय निवडा

भांबड Sat, 08/09/2018 - 13:07

एकच औषध सगळ्या रोगांवर चालेल का? विवेकाची चाड असण्याची टक्केवारी किती असावी?

'न'वी बाजू Sat, 08/09/2018 - 15:43

विवेकाची चाड असलेल्या प्रत्येकाच्या संग्रही असायला हवे असे हे पुस्तक आहे.

विवेकाची चाड असलेल्या एखाद्याने जर हे पुस्तक संग्रही ठेवले नाही, तर नक्की काय होईल?

प्रभाकर नानावटी Sat, 08/09/2018 - 19:04

In reply to by 'न'वी बाजू

तसा काही फरक प़डणार नाही...
परंतु विवेकी विचारांच्या विरोधाचा पवित्रा घेणाऱ्यांच्या बरोबर वादृ-विवाद करण्यास हे पुस्तक नक्कीच उपयोगी पडेल असे मला वाटते.
चू.भू.दे.घे,

'न'वी बाजू Sat, 08/09/2018 - 19:22

In reply to by प्रभाकर नानावटी

(खास करून प्रस्तुत कारणाकरिता) तीनशे रुपये लेखकाच्या (/प्रकाशकाच्या/ज्याला किंवा ज्यांनाज्यांना म्हणून त्या तीनशे रुपयांचा काही अंशसुद्धा मिळतो, त्याच्या किंवा अशा सर्वांच्या) बोडक्यावर (अथवा कलेक्टिव बोडक्यांवर) घालणे हाच मुळात मला अविवेक वाटतो.

(अवांतर १: तीनशे रुपये देऊन तर सोडाच, परंतु प्रस्तुत पुस्तक घेण्याकरिता लेखकाने किंवा अन्य कोणी तीनशे रुपये वा अन्य कोणतीही रक्कम कोणत्याही चलनात मला देऊ जरी केली, तरीही हे पुस्तक मी घेणार नाही.)

(अवांतर २: मंगेश सपकाळांना पुस्तक छापून ते तीनशे रुपयांना विकण्याची आयडिया सुचविली पाहिजे. म्हणजे निदान इथे तरी ते लेख टाकणार नाहीत.)

'न'वी बाजू Sat, 08/09/2018 - 19:43

In reply to by प्रभाकर नानावटी

परंतु विवेकी विचारांच्या विरोधाचा पवित्रा घेणाऱ्यांच्या बरोबर वादृ-विवाद करण्यास हे पुस्तक नक्कीच उपयोगी पडेल असे मला वाटते.

'टॉकिंग पॉइंट्स'साठीच घ्यायचे असेल, तर मग आमच्या 'फॉक्स न्यूज़'मध्ये नक्की काय वाईट आहे? (किंवा गेला बाजार संघाच्या 'बौद्धिकां'मध्ये?)

आय मीन, दुसऱ्याच्या (दुसऱ्याने दिलेल्या) 'टॉकिंग पॉइंट्स'ची पोपटपंची करण्यापेक्षा, स्वतःच्या बुद्धीने स्वतंत्र विचार करणे हेच विवेकाचे आद्य लक्षण तथा पहिली पायरी नव्हे काय?

'न'वी बाजू Sun, 09/09/2018 - 02:33

In reply to by प्रभाकर नानावटी

गुरुदेवांचे 'इन ट्यून विथ द ट्यून' आपण (तरी) वाचले आहेत काय?

(की आपणच लिहिले आहेत? गुरुदेव स्वप्नात आले, आणि म्हणाले, 'लिही', म्हणून?)

("आणि, 'हू आर यू?'" हा जिभेवर आलेला प्रश्न तोंडातल्या तोंडात गिळला आहे.)

चिमणराव Sat, 08/09/2018 - 19:55

कुणी पाच रुपयांचा रेघोट्या काढलेा पत्रा पाचशे रुपयांस **यंत्र म्हणून विकतो,
कुणी विवेकाने भरलेले पुस्तक तीनशे रुपयांस विकतो.
तर कुणी कशासाठी शिर्डीला अधुनमधून जातो.
ठीक आहे. एवढेच.
--
मला श्रद्धाळू लोकांबद्दल फार आदर आहे. ऐतिहासिक पुरावे त्यामुळेच निर्माण झाले. इहलोक सोडून परलोकात गेल्यावर सुखात कमतरता पडू नये म्हणून पिरॅमिड्स, कबरी, चांगल्या वस्तू ठेवल्या आहेत.

'न'वी बाजू Sun, 09/09/2018 - 02:27

In reply to by चिमणराव

कुणी विवेकाने भरलेले पुस्तक तीनशे रुपयांस विकतो.

मला श्रद्धाळू लोकांबद्दल फार आदर आहे.

चर्चवाल्यांचे एक बरे असते. ते बायबल (किंवा इतर धार्मिक प्रचारकी मटीरियल) फुकटात वाटतात, विकत नाहीत. किंवा (त्या 'हॅरी क्रीस्नः' वाल्यांसारखे) बायबल फुकटात दिल्यानंतर मग 'स्वैच्छिक' वर्गणी उकळत नाहीत.

यांनी तसे करावे. तीनशे रुपयांना (वा कोठल्याही अन्य किमतीला) पुस्तक विकू नये. (यांना यांच्या मताचा प्रसार करायचा, तर त्याची किंमत ज्यांच्यांत प्रसार करायचा, त्यांनी काय म्हणून द्यायची? हे म्हणजे जुन्या रेडिओ लायसन्स रेजाइमसारखे झाले!) पुस्तक फुकट वाटावे. अगदी दारोदार जाऊन वाटावे. (पुस्तक छापायला वगैरे खर्च येतो, तो समविचारी प्रचारकांत आपापसात वर्गणी काढून भागवावा. म्हणजे एवढीच हौस असेल तर.)

म्हणजे मग काय होईल, की यांनी अगदी आमच्या दारी येऊन आमच्या हातांत पुस्तक जरी थोपविले, तरी त्यांची पाठ फिरल्यावर ते कचऱ्याच्या पेटीत टाकावयास आम्हांस काही वाटणार नाही. (आमच्या दारी येणाऱ्या चर्चवाल्यांशीही आम्ही असेच वागतो. ते जे काही बडबडतात, ते शांतपणे ऐकतो, ते जे काही हातात थोपवितात, ते शांतपणे घेतो, नि ते गेल्यावर एकदा का आतली कडी लावून घेतली रे घेतली, की तो सगळा ऐवज तितक्याच निर्विकारपणे कचऱ्याच्या पेटीत टाकून मोकळे होतो.)

असो.

बिटकॉइनजी बाळा Sat, 08/09/2018 - 19:55

. आणि यासंबंधात सुचलेल्या लेखांचा हा एक अप्रतिम संग्रह आहे.

सुचलेल्या?????
अहो डॉकिन्सच्या end of faith सरळसरळ कॉपी वाटतेय हे पुस्तक! अप्रतिम म्हणे!!

राही Sat, 08/09/2018 - 20:32

In reply to by बिटकॉइनजी बाळा

यनावाला यांनी अंधश्रद्धेचा वैचारिक विरोध हे आपले जीवितकार्य मानले आहे. याविषयी ते सातत्याने लिहीत असतात. वैचारिक बैठक पक्की करण्यासाठी विरोधी आणि समविचारी अश्या दोन्ही बाजूंचा अभ्यास असावा लागतो. या अभ्यासात चर्चा, वादविवाद आणि भरपूर वाचन यांचा समावेश असतो. तेव्हा उपरोल्लेखित पुस्तक त्यांनी नक्कीच वाचलेले असणार. यनावालांचे विचार हे डॉकिन्सची नक्कलच आहे असे मानण्याचे कारण नाही. अंधश्रद्धानिर्मूलन या किंवा अन्य कोणत्याही समान ध्येयासाठी काम करणाऱ्या अनेक लोकांचे विचार सारखेच असणार. आणि ते वेगवेगळ्या वेळी अनेकांना सुचलेले असणार. या विचारमंथनात आदानप्रदानाचा भाग असतोच. तेव्हा हे चौर्य नव्हे.

'न'वी बाजू Sun, 09/09/2018 - 01:51

In reply to by राही

यनावाला यांनी अंधश्रद्धेचा वैचारिक विरोध हे आपले जीवितकार्य मानले आहे.

ही आपली वैयक्तिक श्रद्धा, किंवा कसे?

..........

(कोठल्याही बऱ्यावाईट गोष्टीस 'जीवितकार्य' वगैरे मानणाऱ्या कोणत्याही व्यक्तीकडे तथा (अशा व्यक्तीच्या वा व्यक्तीसंबंधीच्या) अशा प्रकारच्या दाव्याकडे मी अॅट द व्हेरी लीस्ट साशंकतेने, लवणस्फटिकदृष्टीने तथा स्केप्टिकली पाहातो. अॅट द व्हेरी लीस्ट. आता ही माझी डोळस अश्रद्धा म्हणावी, , किंवा कसे, मला कल्पना नाही.)

याउपर, या एकंदर 'जीवितकार्य' बिझनेसबद्दल मला काही शंका आहेत. बोले तो, कोणीतरी एखादी गोष्ट आपले 'जीवितकार्य' वगैरे बनवणे, हे त्या व्यक्तीस आयुष्यात करायला दुसरे बरे उद्योग नसण्याचे वा न सापडण्याचे (किंवा, इतर बऱ्या उद्योगांत फारसे यश न मिळाल्याचे) द्योतक असावे काय? आय मीन, एखाद्याला एखादी गोष्ट करणे योग्य वाटले, तर ती तो करेल, जमेल तेव्हा नि जमेल तितकी करेल. (आणि अवश्य करावी.) परंतु टू द एक्स्कलूजन ऑफ एव्हरीथिंग एल्स काय म्हणून करेल? मला एखादे काम करायला आवडते, म्हणून मी ते (आवडीने) करतो, इथवर ठीकच. परंतु माझ्या आयुष्याचे हेच एक असाइन्ड काम आहे, माझे आयुष्यात दुसरे काही काम नाही आणि याच कामाकरिता मी या जगात आहे, हा काय प्रकार आहे? हा (आत्म-)गौरव कशासाठी? कोणी असाइन केले तुम्हाला/तुमच्या आयुष्याला हे मिशन? देवा(च्या अस्तित्वा)वर विश्वास नसणे ठीकच, परंतु, अशी "डिव्हाइन मिशने" (देवाच्या अभावी) स्वतःच स्वतःला असाइन करून तुम्ही फक्त देवाची जागा स्वतः घेऊ पाहाताय काय, स्वतः (सब्स्टिट्यूट) देव बनू पाहाताय काय? मग नास्तिकतेचा (खोटा) दावा तरी कशासाठी? म्हणा ना सरळ, "मी देव आहे" म्हणून! आम्ही मानणार नाही कदाचित, परंतु तुमच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा आदर अवश्य करू. (कारण ती अभिव्यक्ती निदान प्रामाणिक तरी असेल.)

(अंधश्रद्ध लोक तुमच्या 'मी (सब्स्टिट्यूट) देव आहे' या (प्रामाणिक) दाव्याला भुलून तुमच्या मागे येतील, हीच जर भीती असेल, तर काइंडली डू नॉट वरी अबाऊट देम. 'अमूकतमूक माझे जीवितकार्य आहे' या तुमच्या दाव्याला भुलून आजमितीससुद्धा येत नाहीत काय? त्यांची चिंता केलीयेत कधी?)

('जीवितकार्य' वगैरे शब्द आपण कै. वगैरे झाल्यावर लोकांनी आपल्याबद्दल म्हणायला वगैरे ठीकच असतात. परंतु म्हणून ते आपणच नि आपल्या हयातीतच आपल्याबद्दलच उच्चारायचे नसतात. असो.)

............

'(आता ही माझी डोळस अश्रद्धा म्हणावी,) आणि म्हणूनच प्रशंसनीय समजावी' वगैरे भानगडींत मी शिरलेलो नाही, याची कृपया नोंद घ्यावी. तसेही मला या विवेकवादी वगैरे मंडळींच्या प्रशंसेची वा सर्टिफिकिटाची किंमत नाही, आणि गरज तर नाहीच नाही. आय हॅव माय ओन सप्लाय ऑफ सेल्फ-एस्टीम, विच इज़ क्वाइट अॅडिक्वेट फॉर मी, थँक यू.

'(आता ही माझी डोळस अश्रद्धा म्हणावी,) आणि म्हणूनच अनुकरणीय समजावी' वगैरे भानगडींत मी शिरलेलो नाही, याची कृपया नोंद घ्यावी. अनुकरण बोले तो (स्वतःचे डोके न वापरता) दुसऱ्याने केल्यासारखे करणे. (खास करून, कोणीतरी 'तसे करणे चांगले असते' म्हणाले म्हणून.) अनुकरण ही विवेकाच्या ऱ्हासाची पहिली पायरी, घसरलेले पहिले पाऊल! (उलटपक्षी, कोणीतरी जर एखादी कृती स्वतंत्र विचाराने केली, तर मग ती कृती अगदी हुबेहूब माझ्याच कृतीसारखी जरी निघाली, तरी ती 'अनुकरण' कशी?) 'अनुकरणीय' हा शब्द विवेकवाद्यांकरिता वस्तुतः अॅनाथेमा असावयास हवा!

म्हणजे, मरणोत्तर अस्तित्वावर आपला विश्वास असल्यास. अन्यथा, 'गचकल्यावर' असा शब्द योजण्यास मला प्रत्यवाय नाही.

कसे असते ना, की लोकांना असल्या शब्दांचा ध्वनी जाम आवडतो. म्हणून त्यांचा वारंवार उच्चार करून ते आपापली मने रिझवतात. अँड आय से दे आर एंटायटल्ड टू देअर बिट ऑफ एंटरटेनमेंट. आफ्टर ऑल, हू आर वी टू डिनाय देम देअर प्लेझर? एस्पेशियली व्हेन वी आर डेड? इन एनी केस, हाउ कॅन वी गो अबाऊट डूइंग सो, ईव्हन इफ वी वाँटेड टू, वन्स वी आर डेड? (सो व्हाय बॉदर?)

डिस्क्लेमर: माझे कोणतेही 'जीवितकार्य' वगैरे नाही.

चिमणराव Sun, 09/09/2018 - 07:00

In reply to by 'न'वी बाजू

मी आणि नबा लेखकमहाशयांचे शेजारी असतो तर बरं झालं असतं.
जॅागिंगला सकाळी भेटलो असतो आणि काही गप्पा मारल्या असता.
( मग त्यांनी जॅागिंगची वेळ बदलली असती.)

राही Sun, 09/09/2018 - 23:35

In reply to by 'न'वी बाजू

'जीवितकार्य' हा शब्द अवजड आणि समजायला कठिण वाटत असेल तर आपण 'आयुष्यात करावयाचे असे इच्छिलेले प्रमुख काम' (इथे यापुढे आकप्रका) म्हणू. कसें?
तर आकप्रका हे स्वेच्छित असते. ते पोटापाण्यासाठीचे किंवा सक्तीचे नसते. त्याची व्याप्ती आणि दर्जा मापाने मोजून (बोले तो मापे काढून) फायदा नसतो. ते व्यक्तिसापेक्ष, व्यक्तिनिहाय असते आणि ते करणाऱ्यास क्वान्टिटी आणि क्वालिटी अन्य व्यक्तींसमान राखण्याची सक्ती नसते. शिवाय ते अन्यवर्ज्यही नसते. माने की आकप्रकासहित इतर अनेक कामे केली जाऊ शकतात.
असते एकेकाची प्याशन्. कोणी त्याकडे लवणस्फटिक दृष्टीने अथवा तुरटीस्फटिकदृष्टीने किंवा फॉर् द्याट म्याटर अन्य कुठल्या वक्री दृष्टीने पाहतें यामुळे लेखलेखकाला, लेखोल्लेखित पुस्तकलेखकाला किंवा पुन्हा फॉर द्याट म्याटर कुणालाही का फरक पडावा?
पोटापाण्याच्या चाकरीव्यतिरिक्त अन्य बहुतांशी सगळीच कामे स्वत:च स्वत:ला असाइन करावी लागतात. आणि ही वरील (तळटीप: लेखात वर्णिलेली) प्रकारची, पदरचे चार चव्वल खर्ची घालायला लावणारी मिशने ही निव्वळ स्वेच्छा असते. कोणी देव येऊन कानात सांगत नसतो की हे नास्तिका, त्वां हे कार्य करावेंस. आणि देव नेमका नास्तिकाच्या कानातच भुणभुण का करेल? की नास्तिकापाठी ब्रह्मदेव असे काही आहे? अशा तऱ्हेने देव भेटण्याची शक्यता असेल तर आस्तिक पटापट नास्तिक होतील की. कसें?
ही इच्छा लेखनातून किंवा व्याख्यानातून प्रगट करण्यास भारतीय कायद्याची आडकाठी नाही. बोले तो प्रोज़िलिटाय्ज़ेशनलाही नाही. मग अहिंसक आणि कमीत कमी उपद्रवी (ऎक्चुअली बोले तो निरुपद्रवी) आकप्रकाला कशी असेल?
आणि कै. झाल्यावरच त्या कै.च्या बाबतीत 'जीवितकार्य' हा शब्द वापरायचा हे कैच्याकै लॉजिक कुठून मिळाले?
जाऊ दे. शेवटी आम्ही ऐसीकरेंच. (सध्याच्या इष्टायलीने :) फुकाच्या फापटपसाऱ्याचे फाटे फोडणारच.

चिमणराव Mon, 10/09/2018 - 05:39

In reply to by राही

कै• झाल्यावर कार्याची नसली तरी जीवितकार्य शब्दाची प्रखरता वाढते. ( काम कार्य बनते आणि बऱ्याच गोष्टी वलय 'हेलो' बनतात.

प्रकाश घाटपांडे Sun, 09/09/2018 - 09:30

In reply to by राही

यनावाला यांनी अंधश्रद्धेचा वैचारिक विरोध हे आपले जीवितकार्य मानले आहे.

अगदी सहमत आहे. त्यात निरिश्वरवादाचा प्रचार व प्रसार हे देखील अंतर्भूत आहे.

राजेश घासकडवी Mon, 10/09/2018 - 05:44

In reply to by गब्बर सिंग

तुम्ही खरोखर उत्तराची अपेक्षा करताय? कसे काय?

काही लोक अमुकतमुक बकवास म्हणतात, काही लोक विवेक सांगणं आणि श्रद्धा विकणं एकच म्हणतात तसलंच हे विधान. मागून काय उत्तर मिळणार आहे का? गौतम बुद्धाने सांगितल्याप्रमाणे शेवटी असल्या अपेक्षा ठेवणं हेच दुःखाचं मूळ आहे.

खुशालचेंडु Mon, 10/09/2018 - 18:48

In reply to by गब्बर सिंग

अगदी योग्य प्रश्न.

हिंदू आस्तिक षडदर्शने. आस्तिक या अर्थी की वेद अपौरुषेय आणि वेदप्रामाण्य मानणारे.
सांख्य आणि योग किंचित मतभिन्नता पण ईश्वर नामक कुणी कर्ता मानत नाहीत. सेश्वर कृती केवळ ज्ञानप्राप्तीपर्यंत मानतात.
न्याय वैशेषिक केवळ तर्क आणि बुद्धी मानणारे. नव्यन्यायातील प्रमुख गंगाधर शास्त्री ज्ञानात मोक्ष स्पष्ट नोंदवतात्
पूर्व मिमांसा कर्म स्वर्गप्राप्तीसाठी आवश्यक पूण्य मानते. देवांना सुद्धा कर्माची आवश्यकता स्वर्गात रहाण्यासाठी. पूण्य खल्लास मनुष्य जन्म घ्या अन करा कर्म.
उत्तर मिमांसा अनेक द्वैत अद्वैत उपविभाग. ते सुद्धा एका मर्यादेनंतर ईश्वर नाकारतात.

आता बौद्ध आणि जैन दर्शने ईश्वर मानत नाहीत हे जगजाहीर्

लोकायत अथवा चार्वाक ऐसीकरांना नवीन नाही.

ईश्वर मानणारे कोणते भारतीय दर्शन आहे? मला तरी अल्पमतीला दिसले नाही.

प्रकाश घाटपांडे Tue, 11/09/2018 - 09:42

In reply to by खुशालचेंडु

आता बौद्ध आणि जैन दर्शने ईश्वर मानत नाहीत हे जगजाहीर्

पण त्यांनी बुद्धाला व महावीराला ईश्वर करुन टाकले आहे.

खुशालचेंडु Tue, 11/09/2018 - 14:34

In reply to by प्रकाश घाटपांडे

ईश्वर करणे वेगळे आणि ईश्वर असणे वेगळे
डाव्यांनी मार्क्सला ईश्वर/देव/आदर्श इत्यादी केलेच ना

खुशालचेंडु Tue, 11/09/2018 - 14:33

In reply to by बॅटमॅन

ईश्वर म्हणजे निर्माता या अर्थाने ब्रह्म आहे का? ईश्वर हा द्वैतरुपाने असतो तसे ब्रह्म आहे का?

बॅटमॅन Tue, 11/09/2018 - 14:40

In reply to by खुशालचेंडु

ईश्वर म्हणजे निर्माता अशा अर्थाने ब्रह्म आहे. द्वैतरूपाने नाही हे मान्य.

पण मग द्वैतमताचे काय? मध्वाचार्य वगैरे? त्यात ईश्वर द्वैतरूप नाही?

खुशालचेंडु Tue, 11/09/2018 - 14:41

In reply to by बॅटमॅन

मोक्षामधे एकरुप होणे अभिप्रेत आहे ना? त्याअर्थी त्या क्षणाला अद्वैतच होणार
साधना द्वैतरुपाची

बॅटमॅन Tue, 11/09/2018 - 16:00

In reply to by खुशालचेंडु

चूक. इथे पहा.

https://hinduism.stackexchange.com/questions/511/how-does-dvaita-philos…

साधना करा, काहीही करा. पण परमात्म्यापेक्षा तुम्ही वेगळेच राहणार असे द्वैतमत सांगते.

खुशालचेंडु Tue, 11/09/2018 - 16:13

In reply to by बॅटमॅन

Madhva, therefore, regards Mukti as a complete self-
expression, self-manifestation and self-realisation, in short, a
complete unfolding of the self in all its promise and potency :

Realisation of truth does not mean abolition of the plurality
of the world but only a removal of the false sense of separateness
and independence
. It is a new insight that changes the face of the
world and makes all things new.

बॅटमॅन Tue, 11/09/2018 - 16:26

In reply to by खुशालचेंडु

Realisation of truth does not mean abolition of the plurality
of the world

आणि

but only a removal of the false sense of separateness
and independence.

हे पाहिले तर मृत्युलोकातल्यापेक्षा ॲडव्हान्स्ड परंतु शेवटी "परमात्म्यापेक्षा वेगळी" स्थिती येईल असेच द्वैतमत आहे असे दिसते.

गब्बर सिंग Wed, 12/09/2018 - 07:37

In reply to by खुशालचेंडु

हिंदूंचे सर्व तत्वज्ञान निरीश्वरवादानेच भरलेले आहे. अजुन काय प्रसार करणार?

.

ईश्वर मानणारे कोणते भारतीय दर्शन आहे? मला तरी अल्पमतीला दिसले नाही.

.
.
भगवद्गीता घ्या. त्यातले खालील श्लोक पहा -
.
अजोऽपि सन्नव्ययात्मा भूतानामीश्वरोऽपि सन्।
प्रकृतिं स्वामधिष्ठाय संभवाम्यात्ममायया
.
मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु।
मामेवैष्यसि सत्यं ते प्रतिजाने प्रियोऽसि मे।।18.65।।
.
.
(१) ईश्वर स्वत: सांगतो आहे की मी सर्व प्राण्यांचा ईश्वर आहे.
(२) अर्जुना, मला नमस्कार कर व माझा भक्त हो
.
.
माझे इंटरप्रिटेशन खालीलप्रमाणे -
.
(अ) भग्वद्गीता हे हिंदू तत्वज्ञान आहे.
(ब) त्यानुसार ईश्वर आहे व तो स्वत:च सांगतोय की मी ईश्वर आहे.
(क) ईश्वर हा अर्जुनापेक्षा भिन्न आहे. नैतर ईश्वर कोणाला सांगतोय की "माझा भक्त हो, मला नमस्कार कर" म्हणून ???
.
.

खुशालचेंडु Wed, 12/09/2018 - 12:32

In reply to by गब्बर सिंग

भगवद्गीतेमधील केवळ एक दोन श्लोक उचलून तुम्ही इंटरप्रिटेशन करु नये अशी मी अपेक्षा केली तर ते तुम्हाला चुकीचे वाटणार नाही असे मी समजतो

त्याच गीतेत कृष्णाच्या तोंडी मी हे आहे मी ते आहे मी असा आहे तसा आहे हे सुद्धा आहे. तोच सर्वत्र आहे आणि अनेक ठिकाणी अर्जूना मी व तु वेगळे नाही हे सुद्धा सांगतो.

समग्र आकलन करुन विचार करा एक दोन श्लोक उचलून नका करु.

मग तुमच्यात आणि इतरांच्यात फरक काय असे आम्हास वाटेल्

सामो Wed, 12/09/2018 - 13:19

In reply to by खुशालचेंडु

गणपती अथर्वशीर्ष घ्या, देवी अथर्वशीर्ष घ्या.
जे काही तत्व आहे ते मीच आहे
कर्ता-धर्ता-हर्ता मीच आहे
मीच ब्रह्मा-विष्णू-शिव आहे, वरुण, सूर्य चंद्रादिक मीच आहे.

अशाप्रकारचे आपणच "ईश्वर" आहोत वगैरे उल्लेख देवी अथर्वशीर्षात आहेत तर डिट्टो तेच उल्लेख तू अमका आहेस , तू तमका आहेस - असे गणपती अथर्वशीर्षात आहेत.

राही Tue, 11/09/2018 - 16:41

In reply to by खुशालचेंडु

" हिंदूंचे सर्व तत्त्वज्ञान निरीश्वरवादानेच भरलेले आहे"
असे जर आहे तर वालासाहेब हिंदूंना त्यांच्या धर्माची सांप्रत विस्मृतीत गेलेली मूळ तत्त्वेच समजावून सांगत असून नंतर घुसलेल्या पुराणपोथ्या आणि आनुषंगिक कर्मकांडे यांपासून परावृत्त करीत आहेत.

खुशालचेंडु Tue, 11/09/2018 - 18:55

In reply to by राही

तसं असेल तर त्यांनी ते जाहीर कबुल करावे. आम्ही त्यांचा उदो उदो करु !
मात्र त्यांना हिंदू या शब्दाबद्दलच तिटकारा आहे त्याला आम्ही काय करु?

तसेही त्यांचे जे काही कार्य चालले आहे ते ज्गजाहिर आहे आणि ते केवळ निरिश्वरवादाचा प्रसार इतके साधे आणि सरळ नसून त्याला अनेक आयाम आहेत ज्यांचा प्रमुख उद्देश केवळ हिंदूंची नालस्ती आणि मी काय तो शहाणा हाच आहे आणि तेच त्यांचे जिवितकार्य आहे.

धर्मराजमुटके Tue, 11/09/2018 - 13:49

In reply to by राही

सहमती. फक्त थोडीशी दुरुस्ती.
यनावाला यांनी अंधश्रद्धेचा वैचारिक विरोध हे आपले जीवितकार्य मानले आहे. त्यांच्या मते कोणतीही श्रद्धा ठेवण्याचे काहीच कारण नाही. श्रद्धा आणि अंधश्रद्धा असा भेदाभेद ते मानत नाहीत.

स्वधर्म Mon, 10/09/2018 - 15:37

In reply to by बिटकॉइनजी बाळा

End of Faith हे पुस्तक डॉकिन्स यांचं नसून ते सॅम हॅरीस यांचं अाहे. मी त्याचं अॉडीअो बुक ऐकलं अाहे. तसंच सॅम हॅरीस यांनी त्यांच्या पुस्तकाचा बराच भाग ईस्लामी धर्मांधांबद्दल खर्च केला असून हिंदू धर्माबद्दल त्यात खूप विस्ताराने काही मांडणी केल्याचे अाठवत नाही, त्यामुळे यनांचे पुस्तक हॅरीस यांच्या पुस्तकावरून ढापले अाहे, याच्याशी सहमत नाही.

बिटकॉइनजी बाळा Mon, 10/09/2018 - 17:23

In reply to by स्वधर्म

पुस्तक कोणाचे आहे हा मुद्दाच नाहीये.
चौकडीतल्या कोणाचेही पुस्तक घ्या. नास्तिक्याचा आधुनिक वाटेवरून जाताना ते चार क्रुसेडर्स लागतातच.

हिंदू धर्माबद्दल त्यात खूप विस्ताराने काही मांडणी केल्याचे अाठवत नाही

खूप विस्ताराने म्हणजे कसे? "फलज्योतिष बंडल आहे", "मांजर आडवं गेल्याने झ्याटही वाकडं होणार नाही" छाप?
अंधश्रद्धा निर्मूलन वाल्यांच्या कृतिप्रधान अजेंड्यापेक्षा वेगळे काही हे पुस्तक देणार आहे का? काही हिंदू-भारतीय परंपरांचा मुलामा देऊन हॅरिस-डॉकिन्स यांच्या संकल्पनांचा क्रॅश कोर्स ठरणार आहे? श्रद्धा या विषयाबद्दल सखोल (भारतीय असं किंवा) ओरिजिनल असं काही सॉलिड या पुस्तकात आहे का? परीक्षण वाचून किंवा प्रकाश घाटपांड्यांनी दिलेल्या लिंकावाचून मला तरी हा कॉन्फिडन्स आलेला नाही.

लेखकाच्या जीवितकार्याचा कोणताही पाणउतारा करायचा हेतू नाही. उलट त्यांना पाचएकशे वर्षं आयुष्य लाभावं आणि मेंदूत चिपा घातलेला व्हल्कन समाज आसिंधूहिमाचल पाहायला मिळो हीच सुप्त इच्छा आहे.

ऐसीचा प्रतिसाद-चिकित्सा कोशंट खाली आणायचाही उद्देश्य नाही.

ज्यांना विवेकवाद आणि त्याचे पोस्ट-पोस्ट ट्रुथ परिणाम तपासायचे नाहीत त्यांना "४२" हा आकडा लखलाभ असो!

स्वधर्म Mon, 10/09/2018 - 17:57

In reply to by बिटकॉइनजी बाळा

>> पुस्तक कोणाचे आहे हा मुद्दाच नाहीये.
अहो एका पुस्तकाविषयी बोलताना, निदान दुसर्या पुस्तकाचा केलेला उल्लेख चुकीचा नसावा, म्हणून दुरूस्त केला, इतकेच.

पण तुंम्ही
>> सुचलेल्या?????
अहो डॉकिन्सच्या end of faith सरळसरळ कॉपी वाटतेय हे पुस्तक! अप्रतिम म्हणे!!

असं म्हणता, अाणि मग
>> …लेखकाच्या जीवितकार्याचा कोणताही पाणउतारा करायचा हेतू नाही. 
असंही म्हणता. काय समजायचं मग?
यना यांचे जालावरील लेखन व उदाहरणे अत्यंत बाळबोध असून त्या पायरीवरील अंधश्रध्द लोकांनाच उद्देशून ते पुस्तक असावे, असे मला वाटते.

बाकी, ते ४२ चं काय म्हणत अाहात ते समजले नाही.

मिहिर Mon, 10/09/2018 - 20:53

In reply to by बिटकॉइनजी बाळा

ज्यांना विवेकवाद आणि त्याचे पोस्ट-पोस्ट ट्रुथ परिणाम तपासायचे नाहीत ...

पोस्ट-पोस्ट ट्रुथ म्हणजे काय? विवेकवादाचे पोस्ट-पोस्ट ट्रुथ परिणाम कोणते?

प्रभाकर नानावटी Wed, 12/09/2018 - 14:52

In reply to by बिटकॉइनजी बाळा

हा प्रतिसाद वाचत असताना मला ‘सुधारक’कार आगरकर यांच्या धर्म संकल्पना आली कोठून? या लेखातील काही वाक्यांची आठवण झालीः

ज्या प्रौढ लोकांच्या मनांत विशिष्ट धर्मकल्पना कायम होऊन गेल्या आहेत, व ज्यांचे वर्तन तदनुरोधाने होत आहे, त्यांच्या मनावर असल्या चर्चेचा विशेष परिणाम होण्याचा संभव नाही हे खरे आहे. पण आमचे असले निर्णय तसल्या लोकांकरिता लिहिलेलेच नसतात. ज्या तरुण वाचकांच्या धर्मकल्पना दृढ झाल्या नसतील; ज्यांच्या बुद्धीत साधकबाधक प्रमाणांचा प्रवेश होऊन त्यांचा विचार होणे शक्य असेल; व विचाराअंती जे बरे दिसेल त्याप्रमाणे आम्ही आपल्या वर्तनांत थोडा बहुत तरी फेरफार करू अशी ज्यांना उमेद असेल, त्यांच्याकरिताच हे लेख आहेत. असले लेख एकदा लिहून टाकले म्हणजे आपले कर्तव्य आटपले असे कदाचित् मोठमोठ्या तत्वशोधकांस म्हणता येईल; कारण ते रात्रंदिवस नवीन तत्वांच्या शोधात व्यग्र झालेले असतात. पण इतरांनी केलेल्या शोधांचे ज्ञान करून घेऊन त्यांचा लोकात प्रसार करणे हे ज्या आमच्यासारख्यांचे नम्र कर्तव्य आहे त्यांनी नवीन नवीन वाचकांच्या फायद्याकरिता असले लेख फिरून फिरून लिहिले पाहिजेत; त्यास कंटाळता कामा नये.
आमच्या धंद्यांत आणि शिक्षकाच्या धंद्यात विशेष फरक नाही. नवीन पिढीच्या तरुण लोकात राजकीय, सामाजिक व धार्मिक विचांरांचा प्रसार करणे व प्रत्येक वर्षी नवीन विद्यार्थ्यांस विवक्षित विषयांचा माहिती देणे यात पुष्कळ साम्य आहे. भेद इतकाच की, शिक्षक आपले काम तोंडाने करतो; व आमच्यासारख्याला ते टाकाने करावे लागते, पण एक वेळ सांगितलेले विचार पुनःपुन्हा सांगणे हे दोघानाही सुटत नाही.

सुज्ञास जास्त सांगणे न लगे!

खुशालचेंडु Fri, 14/09/2018 - 11:57

In reply to by प्रभाकर नानावटी

आगरकर म्हणजे तेच ना इंग्रजी राज्य हे देवाने आपल्याला सभ्य आणि सुसंस्कृत बनवण्यासाठी धाडले आहे आणि समाजात सुधारणा होण्यासाठी आपण पुन्हा पुन्हा आंग्लराणीला विनंती आणि अर्ज करुन आम्हाला सुधारा अशी आळवणी करणे हीच स्वातंत्रयासाठीची धडपड योग्य आहे असे मानत होते ? मग एकंदर आविर्भाव अगदी साजेसा आहे.

प्रभाकर नानावटी Wed, 12/09/2018 - 14:48

In reply to by बिटकॉइनजी बाळा

1.सॅम हॅरिसच्या End of Faith या पुस्तकाची अनुक्रमणिका वाचल्यास त्या पुस्तकातील आशयाशी श्रद्धाविसर्जनातील आशय अजिबात जुळत नाही असे मला वाटते.

2.अप्रतिम संग्रह' हे माझे वैयक्तिक मत असून आपल्याला हे संग्रह अप्रतिम वाटत नसेलही. कदाचित माझे मत व्यक्तिसापेक्ष असण्याची शक्यता आहे.

प्रकाश घाटपांडे Sun, 09/09/2018 - 09:24

हे लेख वाचत असताना ही मंडळी इतके अतार्किक वाद कसे काय करू शकतात याचे आश्चर्य वाटू लागते.>>>
याच उत्तर पुन्हा श्रद्धा असच आहे.

अनेक वेळा काही ‘बुद्धिवंत’ उपनिषद, वेद, दर्शन, वा भगवद्गीता यासारख्या ग्रंथांच्या आधारे आत्मा, परमात्मा यासारख्या पारलौकिक संकल्पनांच्या अस्तित्वाविषयी, त्यांच्या सुसंबद्धतेविषयी तावातावाने वाद घालत समोरच्याला नामोहरम करण्याच्या प्रयत्नात असतात. लेखकानी यातील काही लेखातून त्याच ग्रंथातील इतर काही परिच्छेद व श्लोक यांच्या आधारे या वादाच्या मुद्द्यातील विसंगती व प्रत्यक्ष चर्चेतील मुद्द्यांना बगल देवून केलेले स्पष्टीकरण किती तकलादू आहे हे दाखवून देतात. मुळात वाद घालणारे आपल्याला मुद्द्यांना पुष्टी देणारेच उतारे निवडलेले असतात हे लक्षात येऊ लागते.>>>
अगदी खर आहे. अंनिस मधे देखील संतांचे दाखले आपल्याला अनुकूल असलेलेच वेचले जातात. त्या संतांचे मान्य नसलेले साहित्यातील भाग हे सोडून दिले जातात. तुकारामांचे उपलब्ध साहित्यापैकी फारच थोडे अभंग हे अनुकूल आहेत.

फक्त हा उपहास अंधश्रध्दांचा असावा व कोणत्याही व्यक्तीचा नसावा हा इषारा ते देवू इच्छितात. >> हाच तर मुद्दा आहे. अंधश्रद्धाचे उगमस्थान मेंदुच असल्याने त्यावरील हल्ला हा त्याला स्वत"च्या अस्तित्वावरील हल्ला वाटतो. याचे कारण पुन्हा मेंदुच.

वालावलकर म्हणतात श्रद्धा व अंधश्रद्धा यात एकच फरक आहे पहिला शब्द दोन अक्षरी आहे व दुसरा चार अक्षरी. हे खरेच आहे. आमच्या मते अंधश्रद्धा म्हणजे पिवळा पितांबर. असो जोपर्यंत जगात अनिश्चितता आहे तोपर्यंत अंधश्रद्धा या ना त्या स्वरुपात राहणारच आहेत हे भाकीत आम्ही केव्हाच वर्तवले आहे

प्रकाश घाटपांडे Sun, 09/09/2018 - 09:35

सश्रद्ध असूनही माणूस विवेकी असू शकतो हा मुद्दा अनेकदा चर्चिला गेला आहे. पण यनावालांना ते तितकेसे पटत नाही. माणसाच्या सर्वायवल साठी अंधश्रद्धा कामाला येतात हे नाकारता येत नाहि. दाभोलकर त्याला शॊक अबसॊर्बर म्हणायचे

प्रकाश घाटपांडे Sun, 09/09/2018 - 09:38

अंगारकी चतुर्थी
http://mr.upakram.org/node/3844

गॅस गणराज
http://mr.upakram.org/node/3941

गुरुविण कोण लावितो वाट
http://mr.upakram.org/node/3789

विवेकवाद अध्यात्म आणि आत्मघात
http://mr.upakram.org/node/3719

कपिलाश्रमातील घृतोत्पादन प्रकल्प
http://mr.upakram.org/node/3665

नरसोबाच्या वाडीचा यज्ञ (इ.स १८९०)
http://mr.upakram.org/node/3645

त्या मोरयाची कृपा
http://mr.upakram.org/node/3597

महाकाव्याचा विषय
http://mr.upakram.org/node/3579

ज्ञानेश्वरील अकरा ओव्या
http://mr.upakram.org/node/3526

चालविली भिंती मृत्तिकेची
http://mr.upakram.org/node/3474

बुद्धीदाता
http://mr.upakram.org/node/3379

अध्यात्मिक प्रवचन
http://mr.upakram.org/node/3356

बिनडोकपणाचा कळस
http://mr.upakram.org/node/3362

देव धर्म आणि गाजरचित्रे
http://mr.upakram.org/node/3323

उदकी अभंग रक्षिले
http://mr.upakram.org/node/3313

अशी एक शक्यता केवळ तर्क
http://mr.upakram.org/node/3276

भयसूचक बातमी
http://mr.upakram.org/node/3216

चंद्राचा पुष्य नक्षत्रात प्रवेश
http://mr.upakram.org/node/3161

ईश्वरे तृणे करुन रक्षण केले
http://mr.upakram.org/node/2928

यात आश्चर्य ते काय?
http://mr.upakram.org/node/2883

हा खेळ बाहुल्यांचा
http://mr.upakram.org/node/2820

गूढ आश्चर्यकारक अनुभव
http://mr.upakram.org/node/2525

कार्यकारण भाव
http://mr.upakram.org/node/2503

विवेकवादी लेखनावर आक्षेप
http://mr.upakram.org/node/2580

भ्रमाचा भोपळा
http://mr.upakram.org/node/2388

सामान्य समज (कॉमनसेन्स)
http://mr.upakram.org/node/2450

सदसद्विवेक बुद्धी
http://www.misalpav.com/node/17008

दैव जाणिले कुणी |
http://www.misalpav.com/node/17364

अस्तंगत होणार्‍या अंधश्रद्धा
http://www.misalpav.com/node/21383

शिव शिव रे काऊ | हा पिंडाचा घेई खाऊ |
http://www.misalpav.com/node/24886

अध्यात्म-विज्ञान समन्वय ?
http://www.misalpav.com/node/33424

मंत्रसामर्थ्य
http://www.misalpav.com/node/33686

भावना दुखावणे
http://www.misalpav.com/node/33757

माझी भूमिका
http://www.misalpav.com/node/33826

आस्तिक वैज्ञानिक
http://www.misalpav.com/node/33950

सहप्रवासी: बावीस आस्तिक -एक नास्तिक
http://www.misalpav.com/node/34081

मरणकल्पना, आत्मा, पुनर्जन्म
http://www.misalpav.com/node/34344

श्री.जपे यांचा युक्तिवाद
http://www.misalpav.com/node/34727

विज्ञानदिनाच्या निमित्ताने
http://www.misalpav.com/node/35123

श्रद्धावंतांचे तत्त्वज्ञान
http://www.misalpav.com/node/41229

अठ्ठावीस लक्ष रुपये
http://www.misalpav.com/node/41400

आनंददायी इहलोक
http://www.misalpav.com/node/41497

श्रद्धेमुळे विकृती
http://www.misalpav.com/node/41567

भाव तेथे(च) देव:......यनावाला
http://www.misalpav.com/node/41667

मानवी ज्ञानभांडार
http://www.misalpav.com/node/41745

श्रद्धावान् (न)लभते ज्ञानम् ।.
http://www.misalpav.com/node/41821

विश्वास-श्रद्धा-निष्ठा: यनावाला
http://www.misalpav.com/node/41913

निरीश्वरवाद्यांना ईश्वर शिक्षा का करीत नाही ?...
http://www.misalpav.com/node/42032

मूलभूत नीतितत्त्वे
http://www.misalpav.com/node/42134

खुशालचेंडु Sun, 09/09/2018 - 13:29

विवेकवादाचा प्रसार करणारे सुद्धा आपली जाहीरात करतात. ज्याचा माल चांगला तो खपणार.

सामो Sun, 09/09/2018 - 14:04

सामान्य माणसाला अतार्किक आणि अचाट असे अनुभव येत नाहीत. परमहंस योगानंद, स्वामी विवेकानंद सारख्या ज्यांना हे अनुभव आलेले असतात ते काळाच्या पडद्याआड गेलेले असतात. त्यामुळे एक तर अशा विद्न्याननिष्ठ तसेच श्रद्धेवर कोरडे ओढणाऱ्या प्रश्नांना उत्तर देता येत नाही.
_____________
आजच परमहंस योगानंद यांचे, 'Man's eternal quest' नावाचे पुस्तक घेउन त्याचे वाचन सुरु केले. हे इतके नावाजलेले, प्रसिद्ध आणि निरोगी (मेंटली फिट) लोकं जेव्हा 'गुरु', 'आत्मा', 'ईश्वर' आदिबद्दल बोलतात तेव्हा यनावालांवर विश्वास ठेवायचा की परमहंसांवरती असा प्रश्न पडतो. मला खात्री आहे कोणितरी सल्ला देईलच की "अहो ना परमहंस ना यना, तुमचा अनुभव महत्त्वाचा."
योगानंदांनीही काही वैचारीक बैठकच मांडलेली असते =
की 'पाश्चिमात्यांची विषयलोलुपता (meterialism) आणि पौर्वात्यांची "राहीते अनंते तैसेची रहावे" ही समाधानी वृत्ती यांचा जर सुवर्णमध्य गाठता आला तर उत्तम.'कनक-कांता(सेक्स)-मद्य' आदि ईश्वराने तुमची परीक्षा पहाण्यासाठी पेरलेल्या कसोटी आहेत. जगात सुष्ट-दुष्ट हा मायेचा खेळ त्या जगन्नियंत्याने मांडलेला पसारा आहे, जग हे स्वप्न आहे, कधीतरी आपण स्वप्नामधुन, जागृतावस्थेत येऊ.

परमाहंस योगानंदांनी कधी 'नागबळी/ पितृपक्ष/कडक मंगळ' आदि विषयावर लिहील्याचे स्मरत नाही. हां या वर उल्लेख केलेल्या पुस्तकात 'Do ghosts exist?' म्हणुन एक उतारा आहे. ते पान बसमध्ये निसटुन गेले आणि माझे वाचायचे राहीले.पण त्यातील् एक वाक्य ओझरते दिसले -जे की 'Tramp souls ' अर्थात पृथ्वीचा आवरणाच्या अगदी निकटतम अतृप्त आत्मे या विषयाबद्दल होते.
मग सामान्य माणसाला प्रश्न पडतो, परमहंस योगानंद खोटं बोलतील का? त्यांच्यासारख्या हुषार व्यक्तीचे हे भ्रमच असतील का?
अजुन एक म्हणजे वेळोवेळी योगानंदांनी उल्लेख केलेले 'पुनर्जन्माचे दाखले'
विवेकानंदांनीदेखील 'कालीमातेच्या प्रार्थनेचे एक स्तोत्र' रचलेले आहे. मग हे असे अत्यंत बुद्धीमान् लोक, स्वत: काही श्रद्धा का जोपासतात?' या प्रश्नाचे उत्तर सापडतच नाही.

प्रकाश घाटपांडे Sun, 09/09/2018 - 14:43

In reply to by सामो

मग सामान्य माणसाला प्रश्न पडतो, परमहंस योगानंद खोटं बोलतील का? त्यांच्यासारख्या हुषार व्यक्तीचे हे भ्रमच असतील का?>>> जग हिच एक माया नाही का बरे! :)

खुशालचेंडु Sun, 09/09/2018 - 15:14

काही जण माझ्यावर विश्वास ठेवा असं सांगून पोट भरतात्
काही जण त्याच्यावर विश्वास ठेवू नका असं सांगून पोट भरतात

'न'वी बाजू Sun, 09/09/2018 - 19:18

In reply to by खुशालचेंडु

...श्रद्धा काय नि अश्रद्धा काय, दोहोंचाही बाजार मांडता येतो. (आणि योजक तत्र दुर्लभ वगैरे काहीही नसतात.)

(आता यावर 'मार्केट फोर्सेस'संंबंधातील 'हेच कसे योग्य आहे' हे सुचविणारी गब्बरीय कमेंट अपेक्षित.)

गब्बर सिंग Mon, 10/09/2018 - 09:34

In reply to by 'न'वी बाजू

(आता यावर 'मार्केट फोर्सेस'संंबंधातील 'हेच कसे योग्य आहे' हे सुचविणारी गब्बरीय कमेंट अपेक्षित.)

.
उत्तम वाक्य.
.
चित्रपट हे मस्त उदाहरण आहे.
.
चित्रपट हे प्रकरण बहुतांश वेळा असत्याधारित असते.
चित्रपट पाहणाऱ्या बहुतांश लोकांना हे माहीती सुद्धा असते की ते असत्याधारित आहे म्हणून.
(अंधश्रद्धा पाळणाऱ्या बहुतेकांना हे माहीती नसते की ती अंधश्रद्धा आहे - असं जर म्हणायचं असेल तर मात्र आमचा कुर्निसात घ्यावा)
इतकेच नव्हे तर चित्रपट इंडस्ट्री ही अनेक दुकानांनी भरून वाहत आहे. अनेकांची रोजीरोटी त्यावर चालते.
.
कोणत्या कोनातून बघितले की चित्रपट ही अंधश्रद्धा नाही असे वाटते ? - यावर विचार करत आहे (गेले अनेक महिने).
.
.

चिंतातुर जंतू Mon, 10/09/2018 - 14:05

In reply to by गब्बर सिंग

कोणत्या कोनातून बघितले की चित्रपट ही अंधश्रद्धा नाही असे वाटते ? - यावर विचार करत आहे (गेले अनेक महिने).

तुमचं माहीत नाही; आमचा कोन अगदी सरळ आहे. सल्लू सिक्स-पॅक दाखवतो (आणि दीपिका ओटीपोट) यात धंदा आहे. (कपुरांची नसली तर) यात श्रद्धा कसली? ह्या न्यायानं अख्खी सेक्स इंडस्ट्री श्रद्धा आहे असं उद्या तुम्ही म्हणाल. :-)

राही Mon, 10/09/2018 - 07:37

In reply to by 'न'वी बाजू

जेव्हा शुचिताईंनी 'त्रिवार' हा शब्द एकदा लिहिला तेव्हा त्यांनी सत्य हा शब्द मनात त्रिवार उच्चारलेला असणार. दोनदा लिहिला म्हणजे सहावार सत्य झाले. आणखे एकदा ' त्रिवार' लिहिले असते तर सत्यांची लांबण लागून ते नऊ वार झाले असते.

'न'वी बाजू Mon, 10/09/2018 - 07:51

In reply to by राही

लांबण लागून नऊ वार झाल्याने (सत्य) पातळ तर नसते ना झाले? मग वचने किं दरिद्रता?

राजेश घासकडवी Sun, 09/09/2018 - 22:35

पुस्तकाची ओळख करून दिल्याबद्दल आभार.

हे पुस्तक न वाचताच यनावालांसारख्या व्यक्तीवर उगीचच 'खरंच ते विवेकवादी आहेत?' 'हे पुस्तक म्हणजे रेघोट्या ओढलेला पत्रा' 'कोणी श्रद्धा विकतो तर कोणी विवेक विकतो, सगळे पोटाचे धंदे आहेत' असल्या खालच्या दर्जाच्या प्रतिक्रिया आल्याचं पाहून वाईट वाटलं.

यनावाला, त्यांना माफ करा, कांकि त्यांना कळत नाही ते काय करत आहेत.

चिमणराव Mon, 10/09/2018 - 08:03

पुस्तकाची ओळख करून दिल्याबद्दल प्रभाकर नानावटींचे आभार.
माझ्यासारख्या अश्रद्धाने श्रद्धावानांचेही कौतुक केलं आहे. त्यांचे महत्त्व आहेच.
आज शिर्डीला देशाच्या कानाकोपऱ्यातून किती रेल्वे सुरू झाल्यात पाहा.रोड ट्रान्सपोर्ट,हॅाटेल इंडस्ट्री फोफावत आहे. विमानतळ झालाच. इकनॅामी सुधारत नसली तरी श्रद्धेतून समाजवाद पसरतो - संपत्ती वाटली जाते आहे. भले समाजवादाला धर्माचरणाचे वावडे असो.

'न'वी बाजू Mon, 10/09/2018 - 08:27

In reply to by चिमणराव

गंमत पाहा.

आज शिर्डीला देशाच्या कानाकोपऱ्यातून किती रेल्वे सुरू झाल्यात पाहा.रोड ट्रान्सपोर्ट,हॅाटेल इंडस्ट्री फोफावत आहे. विमानतळ झालाच. इकनॅामी सुधारत नसली तरी श्रद्धेतून समाजवाद पसरतो - संपत्ती वाटली जाते आहे. भले समाजवादाला धर्माचरणाचे वावडे असो.

या सर्वांत (ज्यांच्या नावावर हा सर्व उपद्व्याप चालतो, त्या) साईबाबांचे प्रत्यक्ष, हेतुपुरस्सर योगदान नक्की किती? (किंबहुना, (हे सर्व) त्यांच्या (ज्या काही असेल त्या) उद्दिष्टाशी दूरान्वयाने तरी निगडित असावे काय?)

('कल्पवृक्ष भलत्यांसाठी लावुनिया बाबा गेला, वैभवाने बहरून आला, याल कशाला बघायाला?')

साईबाबांचा गुळाचा गणपती झाला असावा काय? (ही पर्सनली डझ नॉट सीम टू हॅव मेड एनी मनी औट ऑफ धिस स्कीम. अॅट लीस्ट, नॉट टू माय स्कँटी नॉलेज.)

गब्बर सिंग Mon, 10/09/2018 - 10:08

In reply to by 'न'वी बाजू

या सर्वांत (ज्यांच्या नावावर हा सर्व उपद्व्याप चालतो, त्या) साईबाबांचे प्रत्यक्ष, हेतुपुरस्सर योगदान नक्की किती?

.

('कल्पवृक्ष भलत्यांसाठी लावुनिया बाबा गेला, वैभवाने बहरून आला, याल कशाला बघायाला?'

.
नचिकेताची ष्टोरी आठवली.
.

गब्बर सिंग Mon, 10/09/2018 - 10:29

In reply to by 'न'वी बाजू

माझ्या या प्रतिसादाची कॉपी इथे डकवतोय.
.
.
पण बॉलिवूड हे भारतीय प्रेक्षकांना "जे हवं आहे" ते विकण्याच्या धंद्यामधे आहे. उदा. "पैशापेक्षा माणूस श्रेष्ठ" वगैरे डायलॉग्स हे बहुतांश भारतीय लोकांना ऐकायला व पहायला खूप आवडतात. मग भारतीय चित्रपटांनी ते तसं दाखवलं तर त्यात चूक काहीच नाही. खरंतर पैसा व त्याचा अभाव यांचा चित्रपटसृष्टीने (आणि राजकारण्यांनी) अत्यंत मस्त वापर पैसा मिळवण्यासाठी केलेला आहे. पण आपल्याकडे ऐहिक बाबी धनसंपत्ती वगैरे ह्या अध्यात्मानुसारच अनिष्ट मानल्या गेलेल्या आहेत. गोंदवलेकर महाराज सुद्धा पैशाला "पैका" म्हणत असंत. त्याबद्दल त्यांना विचारले असता ते म्हणाले की जी गोष्ट अगदीच बिनमहत्वाची, कःपदार्थ आहे तिला असे संबोधतो.

नचिकेताची ष्टोरी सांगतात की नचिकेताला विश्वाच्या उत्पत्तीबद्दल जिज्ञासा होती. तो आपल्या पिताश्रींकडे गेला व त्यांना विचारले की विश्वाच्या उत्पत्तीबद्दल मला सांगा. पिताजींनी समोरच्या वटवृक्षाकडे बोट दाखवून म्हंटले की याचे बीज घेऊन ये. नचिकेत धावतपळत गेला व वडाचे फळ घेऊन आला. त्यातले बीज बाहेर काढले. वडाचे बीज आकाराने जेमतेम खसखशीएवढेच असते. नचिकेताने ते बीज फोडले. "छ्या !! आत काहीच नाही" म्हणाला. पिताजी त्यास म्हणाले की ह्या "काहीच नाही" ("nothing") मधून हा वटवृक्ष निर्माण झालेला आहे हे लक्षात ठेव.

"पैसा वाईट", "धट्टीकटी गरीबी व लुळीपांगळी श्रीमंती", "साधी राहणी व उच्च विचारसरणी" च्या गप्पा मारायच्या, "लोक पैशाच्या मागे लागलेले भोगवादी" असं बोंबलायचं आणि मग प्रत्यक्षात पैश्याच्या मागे लागायचं हा सामान्य भारतीय माणसाचा आवडता उद्योग असतो. शुभलाभ असं सांगणारी परंपरा असूनही लक्ष्मी ला वाईट म्हणायचं आणि मग लक्ष्मी नाही म्हणून रडायचं. एकतर ज्याच्याकडे लक्ष्मी आहे त्याला शिव्या घालायच्या आणि काही जमलं नाही तर त्याच्याकडून लक्ष्मी ओरबाडून घ्यायची. मागून वा ओरबाडून मिळत नसली की "माणूसकी राहीली नाही" किंवा "शोषण शोषण" असा कंठशोष करायचा. अमिताभचे अनेक चित्रपट हे ह्या "पैसा वाईट, माणूस श्रेष्ठ" संकल्पनेभोवती फिरतात. उदा. त्रिशूल. पण चित्रपटाच्या शेवटी सगळे हिरो-हिरॉईन्स श्रीमंत झालेले दाखवतात. भारतीयांच्या या मानसिक दुभंगलेपणामधूनच निर्माते लोक बक्कळ पैसा बनवतात.
.
.
Capitalists make money out of this "nothing".
.

सामो Mon, 10/09/2018 - 10:00

शेवटी निष्कर्ष हाच निघतो की आस्तिक आणि नास्तिक यांचे मेंदू भिन्न भिन्न रीतीने wired असतात. जे अनुभव आस्तिकांना येतात, ज्या विषयांत आस्तिक रुचि घेतात, अस्तिकांना मन::शांती मिळते ते विषय नास्तिकांना अपील करत नाहीत.
बाकी मेंढी मेंटॅलिटी मात्र सर्वत्र सापडते आस्तिक काय अन नास्तिक काय. अमका म्हणतो म्हणुन माझा कल तिकडे झुकतो मेंटॅलिटी.
_________________________
बाकी ही नास्तिक जमात रुक्षच असावी. सध्या मी काही जालावर ओव्या शोधुन काढल्यात. सीतेच्या वनवासाच्या ओव्या वाचुन आमच्या आस्तिकांच्या भाविकांच्या डोळ्यात पाणी येतं. अमचं आतडं तुटतं. हा असा भावनेचा ओलावा, नास्तिकांकडे नसावा असे वाटते. आम्हाला नास्तिक हे एलिअन (परग्रहवासी) वाटतात हे फक्त माझं म्हणणं नाही तर असे संदर्भ मी वाचलेले आहेत.. उदा - कोणी अब्राहम कावुर होते का, कट्ट्र नास्तिक ? त्यांच्याबद्दल अतिशय कडवट भावनेचे एक वाक्य , आस्तिकाकडुन लिहीले गेलेले माझ्या वाचनात आलेले होते.
तर असो ....
या आम्हाला गलबलविणाऱ्या ओव्या -

सीता चालली वनवासा सया जाती सवाकोस
फिरा बायांनो ग माघारी शिरी माझ्या आहे वनवास

सीताबाईचा पदर अडकला चिल्हारीला
स्वप्न पडले रामाला सीता लागली वनाला

सीता ग सीता ग म्हणून राम कवटाळीईतो झाड
बोललेत मारवती सीता डोंगराच्या आड

सीताबाई गरभीन हिला महिना पाचवा
हिला महिना पाचवा हिरव पातळ नेसवा

'न'वी बाजू Mon, 10/09/2018 - 10:28

In reply to by सामो

बोललेत मारवती सीता डोंगराच्या आड

वाक्याचा अर्थ समजायला थोडा वेळ लागला, याला कारण अर्थातच आमचे भाषावैविध्याचे ज्ञान त्रोटक पडले, हेच आहे. दुर्दैवाने, दुसरा शब्द हा क्रियापदस्वरूपी सादर आल्याने काही भलताच, चित्रदर्शी अर्थ क्षणभर मनश्चक्षूंसमोर तरळून जाऊन क्षणिक गोंधळ उडाला खरा, परंतु त्वरितच सत्यार्थप्रकाशाच्या लखलखाटात काय तो उलगडा झाला.

असो चालायचेच.

प्रकाश घाटपांडे Mon, 10/09/2018 - 13:01

In reply to by सामो

शेवटी निष्कर्ष हाच निघतो की आस्तिक आणि नास्तिक यांचे मेंदू भिन्न भिन्न रीतीने wired असतात. जे अनुभव आस्तिकांना येतात, ज्या विषयांत आस्तिक रुचि घेतात, अस्तिकांना मन::शांती मिळते ते विषय नास्तिकांना अपील करत नाहीत.

सहमत आहे. परंतु मेंदुत केमिकल लोच्या होउन नास्तिकाचा अस्तिक वा उलट ही होउ शकते.

सामो Mon, 10/09/2018 - 21:31

In reply to by प्रकाश घाटपांडे

परंतु मेंदुत केमिकल लोच्या होउन नास्तिकाचा अस्तिक वा उलट ही होउ शकते.

सोलह आना सच बात!

पुंबा Mon, 10/09/2018 - 10:34

https://indianexpress.com/article/india/this-9-year-old-indian-shreyas-…

“It was by a Panditji from Odisha where we had made his kundli. Shreyas was born on January 9, 2009, and Panditji had said that 9 is very lucky and the timing of his birth and other things suggest he would earn name and fame,” Anju says.>
Anju laughs, throwing her head back, and leaves it to Jitender to begin. “The astrologer had told my wife that the boy’s last name should phonetically start with ‘Ra’. She thought a lot. We are Rajputs, and she came up with Royal,” he says. His legs dangling from the sofa, Shreyas says, “Well, chess is a royal game.”

गब्बर सिंग Mon, 10/09/2018 - 14:10

In reply to by पुंबा

बुद्धी, आर्थिक, सामाजिक स्तर या सगळ्याचे कोरिलेशन विवेकाशी लावणे किती अशक्यकोटीतले आहे हे यातून कळते.

,
म्हंजे विवेक या शब्दाचा अर्थ काय आणि विवेक म्हंजे काय हे कोणालाही समजलेले नसण्याची शक्यता बळावते. अन्यथा कसं कळणार की ज्यांना कळलाय ते ..... ?
.
विवेक म्हंजे नेमकं काय ? - हा प्रश्न उपस्थित होतो.
.
व ज्यांना विवेक म्हंजे काय हे कळलेय त्यांना तरी ते कळलेय का ?
.

चिमणराव Mon, 10/09/2018 - 18:41

In reply to by गब्बर सिंग

>>विवेक म्हंजे नेमकं काय ? - हा प्रश्न उपस्थित होतो.
.>>

तुम्ही आजारी पडता, औषधोपचार सुरू होतात. अॅन्टिबाइओटिक्सचा पूर्ण कोर्स झाल्यावरच जंतू जिओमेट्रीक प्रग्रेशनमध्ये खात्मा होऊन बरे होण्यास सात/पंधरा/एकवीस दिवस लागणार असतात. मध्येच कुणी श्रद्दावान मावशी,आजी अंगारा लावते.
तुम्ही तो विवेका'ने लावून घेता. तेव्हा खोलीचे छत हीच एकमेव दिसणारी गोष्ट, आप्तेष्टांचे सल्ले हे ऐकू येणारे आवाज असतात.
अंगारा लावणे/न लावणे यावर वाद घालणे निष्फळ आहे हे विवेक सांगतो.

सामो Mon, 10/09/2018 - 22:08

In reply to by चिमणराव

च्रटजी ते झाले एक उदाहरण. विवेकाची व्याख्या इतकी रिलेटिव्ह (वैयक्तिक/केस बाय केस बदलणारि) आहे ना. की विवेकाचे मूल्यमापन करता येणे कठीण आहे.
अशक्य म्हणत नाही. कठीण् म्हणते कारण हे डाटा सायन्स्वाले शिंचे सग्गळं मोजतात.
_____________
दत्तात्रेयांनी एका ललनेच्या हातातील बांगड्यांचा आवाज ऐकला आणि त्यावरुन हा बोध घेतला की, २ घटक एकत्र आले की घर्षण (बोले तो कॉन्फ्लिक्ट) अनिवार्य आहे. दत्तात्रेय सन्यासी होते.
या बोधाला विवेक म्हटले तर आपण ९०% सामान्यजन, अविवेकीच ठरतो की नाही?

चिमणराव Mon, 10/09/2018 - 13:01

ज्योतिषी वराहमिहिर म्हणतो की कुंडलीत राजयोग असला की लगेच छत्रचामर जातकाच्या डोक्यावर येतातच असे नाही. किंवा हत्ती ज्याच्या गळ्यात माळ घालेल तो राजा होतो असेही नाही. बऱ्यापैकी सत्ता-संपत्ती मिळवतोच.

-प्रणव- Mon, 10/09/2018 - 13:08

बुकगंगावर नाही सापडले हे पुस्तक. कुठून मागवायचे?
वरती जी लेखांची यादी दिली आहे तेच सर्व लेख आहेत का काही वेगळं सुद्धा मटेरियल आहे?

प्रभाकर नानावटी Tue, 11/09/2018 - 15:23

In reply to by -प्रणव-

हे पुस्तक वरदा प्रकाशनकडे ( 9970169302 किंवा 020-25655654) मिळू शकेल.
वर उल्लेख केलेली यादी व पुस्तकातील अनुक्रमणिका वेगवेगळे वाटतात. आशय काय आहे हे तपासायला हवे.

भांबड Mon, 10/09/2018 - 21:55

रेकी ही श्रद्धा आहे की कला की भ्रम?

सामो Mon, 10/09/2018 - 22:21

In reply to by भांबड

मागे एकदाच फुकट रेकी वर्कशॉपमध्ये रेकी केलेली होती .
The practitioner cleansed my aura without touching me but by moving hands around my body.
मला अत्यंत (खरोखर) बरे वाटलेले होते. सायकॉलॉजिकल असू शकते.
_________________
अजुन एक मैत्रिण होती तिने एकदा १९९७ मध्ये रेकी सारखं काहीतरी सुरु केलं. माझा हात हातात घेउन आणि मला हुडहुडी भरली होती. हींव भरुन आलेलं. तो अनुभव unpleasant होता.
_____________________
हे सायकॉलॉजिकल असू शकते. पण खात्रीने ते सायकॉलॉजिकलच आहे असे मी तरी म्हणु शकत नाही.

सामो Mon, 10/09/2018 - 23:25

जगा आणि जगू द्या!!!
______________

तावातावाने वाद घालत समोरच्याला नामोहरम करण्याच्या प्रयत्नात असतात.

बरोबर आहे आस्तिकच तावातावाने वाद घालतात. नास्तिक नाही घालत ते अतिशय सौजन्यशील, मृदू भाषेतच बोलतात. त्यांच्याकडुन बोलण्याचे धडे घेतले पाहीजेत.

______________

माणसाची बुद्धी इतकी रसातळाला कशी जाते? असे अनेक प्रश्न त्यांना पडतात. व या प्रश्नांच्या उत्तरांचा शोध घेताना श्रद्धा हो एकमेव कारण असू शकेल या निष्कर्षापर्यंत ते पोचतात.

बरोबर आहे आस्तिकांची बुद्धी रसातळाला गेलेली आहे.
___________________

अंत्यसंस्कारात दहावे-बारावे-तेरावे, मासिक श्राद्ध करून सहस्रावधी रुपये व्यर्थ का घालवतात?

करेक्ट त्याऐवजी गेलेल्या व्यक्तीच्या शोकात डिप्रेशन येईपर्यंत ते थांबत का नाहीत आणि मग त्रास सुरु झाल्यावरती काउन्सिलर्स्च्या बोडक्यावर ते सहस्त्रावधी रुपये का उधळत नाहीत? खरं तर आपली व्हल्नरेबिलिटी झाकू नका. अगदी नागडे व्हा. विदीर्ण व्हा. कोणताही मानसिक आधातर घेऊ नका. आणि मग असे रक्तबंबाळ तुम्ही काउन्सिलर्स्च्या पायऱ्या झिजवा. कारण काये ना ते शास्त्रिय आहे. आणि काहीही शास्त्रिय हे उच्चच असतं. काहीही अशास्त्रिय ते वाईट मग किती का ते जगात वावरण्याकरता लागणारं उसनं अवसान असो.
___________________

सर्व फल-ज्योतिषाच्या नादी का लागतात?

करेक्ट. आजगातील घटनांवर विशेषत: दुर्दैवी घटनांवर्, आपल्या प्रियजनांना होणाऱ्या अपघात/रोग/मरण आदिवर , या जगात फारसं नियंत्रण नसतं. हे एकदा मुकाट्यानी मान्य करुन डिप्रेस व्हा आनि जा ना काउन्सिलर कडे. मग द्या पैसे. निदान ते शास्त्रिय तरी आहे.
________________________

आत्मा, पुनर्जन्म, मोक्ष अशा भ्रामक कल्पनावर विश्वास का ठेवतात?

हो ना! नास्तिकांनी केव्हाच सिद्ध केलेले आहे की या भ्रामक कल्पना आहेत त्यात तथ्य नाही.
__________________

अंधश्रद्धांचा उपहास या लेखात अंधश्रद्धावर घाला घालत असताना लेचापेची भूमिका न घेता चेष्टा, टवाळी, खिल्ली, अवहेलना अशा गोष्टींचा सर्रास उपयोग करावा असे लेखकाचे मत आहे.

बाकी हे टेक्निक मस्त आहे. हा उपहास नाही. खरच उत्तम सुचना आहे.
_________________
बाकी नानावटींनी केलेली समीक्षा मस्तच आहे. विशेषत: हा शेवटचा उतारा.

अनेकांना श्रद्धेविना जीवन अशक्य आहे असे वाटत असते. अशावेळी लेखक श्रद्धाविसर्जन करण्यास सुचवतात, हे त्यांना कदापि रुचणार नाही. कदाचित पुस्तकाचे शीर्षक अंधश्रद्धा विसर्जन असे चालले असते, परंतु श्रद्धा विसर्जन योग्य नाही असे सश्रद्ध सुचवतील. परंतु लेखकाच्या मते अंधश्रद्धा निर्मूलन करायचे तर कोणीतरी दाभोलकरांसारखा प्रबोधनकार लागतो. पण आपले श्रद्धा विसर्जन मात्र प्रत्येकाला स्वतःहून पुढाकार घेऊन करायचे असते. त्यासाठी भावनेवर मात करत बुद्धिनिष्ठपणे विचार करत राहिल्यास हे काम सोपे होईल. या विवेकनिष्ठतेचा खडतर मार्गावर चालण्यासाठी हे पुस्तक नक्कीच मदत करू शकेल.