Skip to main content

'चावदिवस', नॉस्टॅल्जिया आणि दिवाळी ..

विद्यार्थीदशेत असताना दोनदा मोठ्ठी सुट्टी मिळायची __ 'लाँग व्हेकेशन'! मे महिन्यामध्ये आणि दिवाळीमध्ये. स्वाभाविकच आम्ही या सुट्ट्यांची डोळ्यांत प्राण वगैरे आणून वाट पहायचो. या सुट्ट्या परिक्षेनंतर येत, एक सुट्टी सहामाही परिक्षेनंतर आणि दुसरी वार्षिक परिक्षेनंतर.मग केवळ या सुट्ट्यांसाठी आम्ही अभ्यास करायचो म्हटलं तरी हरकत नाही. अभ्यास काय चटकन व्हायचा पण सुट्टी काही केल्या चट्कन यायची नाही तिच्यासाठी खूप वाट पहावी लागायची अगदी चातकाप्रमाणे !

माझं घर तळकोकणात आणि आजोळ उत्तर कर्नाटकात. तसे पाहिले तर हे दोन्ही भाग प्रेमळ, हौशी आणि उत्सवप्रिय. उत्तम आदरातिथ्य ही येथील संस्कृती आणि प्रेम, जिव्हाळा हा स्वभावधर्म ! (शिवाय दोन्ही निसर्गरम्य परिसर) अशा अनेक सद्गुणांनी युक्त प्रदेशात, अशा गोतावळ्यात बालपण जाणे याहून सुख ते काय असू शकतं? साहजिकच दिवाळी अशा वातावरणात साजरी होणे म्हणजे आम्हा बाळगोपाळांसाठी नुसती चंगळ असायची!

आमच्या घरी व आजोळी साजरी केली जाणाऱ्या दिवाळीत अगदी थोडा फरक असायचा. सिंधुदुर्गात 'नरक चतुर्दशी' हा दिवस 'चावदिवस' म्हणूनच ओळखला जातो. या दिवशी भल्या पहाटे उठून एक 'गरंडेल बॉम्ब' फोडायचा घराच्या भोवती, अंगणात सगळीकडे पणत्या, मेणबत्ती लावायचा, हौसेने गवत, लाकूडफाटा यांपासून बनवलेला नरकासुर जाळणे हा एक महत्वाचा कार्यक्रम असे. 'नरकासुर' बनवणे हा लहान मुलांचा आवडीचा उद्योग. यातही चढाओढ असायची. आपण 'नरकासुर' मित्रमंडळींनी बनवलेल्या नरकासुराहून भारी कसा होईल याकडे प्रत्येकाचं लक्ष. नरकासुर जाळण्याबरोबरच 'कारीट' फोडणे हाही एक यादिवशी महत्वाचा असणारा भाग. कारीट पायांनी फोडत जोरजोरात 'गोयंदा गोयंदा' असं ओरडायचं. जाम मजा यायची. अभ्यंगस्नान वगैरे उरकल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे पोहे खाणे ही खास प्रथा. पोहे खाण्याच्या या प्रथेमुळेच कदाचित या दिवसाला 'चावदिवस' म्हणत असावेत. गूळपोहे, तिखट पोहे, दह्यातले पोहे, दडपे पोहे काय काय प्रकार पोह्यांचे नुसती मज्जा! या दिवशी दुसरी न्याहरी नाहीच, 'फक्त पोहे' मालवणीत यांना 'फ़ॉव' म्हणतात. हे फॉव खाणे ही इथली ओळख. शेजाऱ्या-पाजाऱ्यांना बोलावून पोहे खाऊ घालणे गप्पा मारणे यात दिवस आनंदात निघून जायचा. विशेष म्हणजे फटाके फार कमी प्रमाणात वाजवले जायचे. 'फुलबाजा' व भुईचक्र यांची फर्माईश अधिक.

नरकासुर

माझं आजोळ उत्तर कर्नाटकात म्हणजे दांडेलीजवळ. आजोळ म्हटलं की वीक पॉईंट असतो, जरा नाजूक विषय असतो मीही त्याला अपवाद नाहीच. 'सुट्टी पडली की आजोळी पळणे' हे त्यावेळी एक सूत्र बनल्यासारखं होतं. मे महिना व दिवाळीची सुट्टी आलटून पालटून घरी व आजोळी साजरी व्हायची. दिवाळीत आजोळी असलो की मग काही विचारूच नका! एकतर 'मुलीची मुलं ' हा आजीचा वीक पॉईंट आणि आजी म्हणजे आमचा! मग काय? लाड एके लाड.. आधीच हे असे आम्ही लाडात न्हाऊन निघायचो त्यात दिवाळी म्हणजे या लाडाचा परमोच्च बिंदू, परिसीमाच ! इकडे एक अत्यंत मजेशीर प्रथा असते. नरक चतुर्दशीचा आधीचा दिवस ''बुधा कळ्ळू '' म्हणून ओळखला जातो. या दिवशी चोरी करायची असते आणि गंमत म्हणजे चोर सापडला की त्याला पोहे खाऊ घालायचे असतात. या चोरीमध्ये परसातील काकडी, शहाळी चोरण्यापासून ते अगदी वरवंटा लपवून ठेवणे, पाळण्यातलं छोटं बाळ लपवणे वगैरे गोष्टींचा अंतर्भाव होतो. हा एक प्रकारचा 'फनी गेम' असतो आणि विशेष म्हणजे त्याचा कुणीही गैरफायदा घेत नाही. दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे उठून शेजारी तसेच गावातील नातेवाईकांकडे जाऊन पोहे खाणे हा कार्यक्रम. इथेही वेगवेगळ्या प्रकारचे पोहे केले जातात हे दोन्हीकडच्या प्रथांमधील साम्य! आम्ही कोकणी आदरातिथ्य जाम भारी करतो पण इथे पाहुणचार करण्यात ही मंडळी एक पाऊल पुढे जाणवतात. पोह्यांवर ताव मारतानाच तुपासोबत 'कडबू' खाणे ही एक मेजवानी असते. चिवडा लाडू, चकली, शंकरपाळी हे नेहमीचे यशस्वी कलाकार दिमतीला असतातच. पोहे खाणे व गप्पा मारणे हा या दिवसाचा अघोषित एककलमी कार्यक्रम! सुट्टी असल्याने मामेभावंडं घरी असायची यांच्यासोबत त्यांची केळीची बाग हुंदडणं, केळीच्या पानाच्या जाड देठापासून ''फट फट फट फट' असा आवाज करणारं खेळणं बनवणं, जायच्या यायच्या रस्त्यात असणाऱ्या इंगळीच्या बिळातून त्यांना बाहेर काढून मारणं अशा अनेक गंमतीजमती या दिवाळीच्या योगाने अनुभवता येत. पूर्ण दिवाळी अशा धामधुमीत, खादाडीत जात असे. सुट्टी संपल्यावर शाळा सुरू होणार असल्याने सुट्टीचा अधिकाधिक आनंद लुटत असू, दीपोत्सव हा आनंदोत्सव होत असे.

अजूनही या प्रथा चालू आहेत पण कितीही केलं तरी ते बालपण, ती मस्ती, तो माहौल आठवत राहतो. नॉस्टॅल्जियाला 'स्मरणरंजन' असा शब्द वापरलाय कुणीतरी,किती योग्य शब्द आहे. या भरभरून जगलेल्या क्षणांचे स्मरण करून त्यात आनंद मानणे हेच आपल्या हातात राहतं वेळ कधीच निसटून जाते.

आता ती वेळ निघून गेली आहे हे खरं असलं तरी मन कधी कुणाचं ऐकत नाही ऐकणार नाही. ते भूतकाळात जात राहील, तिथे रमत राहील. शायर मुबारक अंसारींचा आशावादी शेर अशा वेळी आठवत राहतो,

''न कोई ख़्वाब न मंज़र न कोई पस-मंज़र
कितना अच्छा हो जो बचपन की फ़ज़ा लौट आए ''

©अनिल विद्याधर आठलेकर, सिंधुदुर्ग
भ्रमणध्वनी : ९७६२१६२९४२

Node read time
4 minutes
4 minutes

राजेश घासकडवी Sun, 11/11/2018 - 21:20

वपुंच्या एका कथेत, एक मुलगा त्याचं पेन हरवलं म्हणून रडत असतो. नायक त्याला आपलं नवं कोरं पेन खिशातून काढून देतो, आणि म्हणतो, 'राजा, पेन हरवलं म्हणून काय रडतोयंस? माझं तर आख्खं बालपण हरवलं आहे.' त्याची आठवण झाली.

'न'वी बाजू Mon, 12/11/2018 - 09:09

सर्वप्रथम, लेख छान आहे.

हॅविंग गॉटन दॅट औट ऑफ द वे...

न कोई ख़्वाब न मंज़र न कोई पस-मंज़र

उर्दूत फ़लसफ़ा म्हणजे फिलॉसॉफी आणि बोरियत म्हणजे बोअरडम होते, इतपत ऐकीव माहिती आहे.

तद्वत, पस-मंज़र बोले तो पुसी-क्याट असावी काय?

१४टॅन Mon, 12/11/2018 - 13:44

खुसखुशीत शंकरपाळ्यासारखा लेख. वाचता वाचता त्या काळात हरवून जायला होतं. शिवाय ते टाटोळा म्हणजे

केळीच्या पानाच्या जाड देठापासून ''फट फट फट फट' असा आवाज करणारं खेळणं

'श्यामची आई'नंतर इथेच पहायला मिळालं. बऱ्याच नवीन नवीन गोष्टी वाचायला मिळाल्या. पुलं, दाण्डेकर, माडगूळकर, खानोलकर इ.नी ह्या प्रथांबद्दल काहीच लिहीलं नाही ह्याचं आश्चर्यही वाटून गेलं. सिंधुदुर्गाहून अप्रगत आणि (त्यामुळेच) नेत्रसुखद असा जिल्हा महाराष्ट्रात नाही.

गवि Mon, 12/11/2018 - 14:13

In reply to by १४टॅन

श्यामची आई'नंतर इथेच पहायला मिळालं.

फटाक्यांना पैसे नाहीत म्हणून श्यामच्या (आणि पुरुषोत्तमच्याही) आईने पुरुषोत्तमला पिटुकनळी करुन दिली आणि त्रिसुळे पाडून दिली. पिटुकनळीत त्रिसुळ घालून तो बार काढीत असे. ती संपल्यावर त्यात पारिंग्याचा पाला घालून वाजवीत असे. निराळ्या फटाक्यांसाठी त्याने हट्ट धरला नाही.

असा उल्लेख आहे. खुद्द कोंकणाशी अत्यंत परिचित असूनही हे मला समजलं नव्हतं / नाही. ( काय प्रकारचं यंत्र, काय आवाज आणि कसा निघत असेल ते.)

१४टॅन Mon, 12/11/2018 - 14:20

In reply to by गवि

"अण्णा, मला टाटोळा काढून दे. मी फटफटे करतो." हे ते वाक्य. पुस्तकाच्या शेवटच्या 'ग्लॉसरी'त 'टाटोळा' समोर इथे आठलेकरांनी लिहीलेलं वर्णन 'अर्थ' म्हणून दिलेलं आहे.

गवि Mon, 12/11/2018 - 14:28

In reply to by १४टॅन

हो. हा उल्लेख देखील आहे. आठवला. बाबुल्या म्हणाला असा उल्लेख आहे.

पण त्यात पुरेसं समजण्यासारखं होतं. ते केळीची पानं काढत असतात.

अन्य एका प्रकरणात गरिबी आल्यावर ती पिटुकनळी येते तो न समजलेला उल्लेख आधी नोंदवला होता.

गवि Mon, 12/11/2018 - 14:53

In reply to by १४टॅन

या पुस्तकाचं भरपूर वाचन बरीच वर्षं घडलं आणि वाक्यही कायमची मनात राहिली. रोचक आहे.

त्यात परिस्थिती अत्यंत उत्तम ते अत्यंत बिघडत जाताना श्यामचे वडील हे पात्र अगदी म्हणजे फारच अक्षम असल्याचं जाणवतं. म्हणजे अगदी फ्री फॉल.. प्रॅक्टिकली काहीच उत्पन्न नाही असं वर्षानुवर्षे चाललं होतं की काय असं वाटतं.

मग वडील कामाला बाहेर गेले, शेतावर गेले वगैरे उल्लेख वाचून अगदीच शंका येते की खूप काळ कर्ज, आणखी कर्ज, आजारी होत चाललेली बायको चार आठ आण्यासाठी मोलाची कामं करते, झिजून मरते त्यांनतरही दुर्वांची आजी स्वैपाक करून देते, तिलाही तेल मीठ सुद्धा मिळत नाही घरात. इत्यादि. तर यांनी काहीच सावरलं नाही का काळानुसार?

विशेषतः अगदी वाईट दिवस आल्यावर सासरे घरी येऊन समजावतात की शेत जमीन विकून आधी कर्जमुक्त व्हा. नंतर जप्ती आली तर काहीच उरणार नाही.. तो अत्यंत शहाणपणाचा सल्लाही ते वडील धुडकावून लावतात आणि अपमान करून सासरेबुवांना परत पाठवतात. आणि श्यामची आईदेखील पतीची बाजू घेत वडिलांना सुनावते.

पुढे काय वेगळं होणार होतं?

१४टॅन Mon, 12/11/2018 - 15:26

In reply to by गवि

ममव घरांत पिढ्यान्पिढ्या हे पुस्तक म्हणजे 'सुसंस्कारांचा मानदंड' समजण्यात येतं. ह्या बीटवीन्दलाइन्स अनेक दशकं कोणी वाचल्याच नाहीत काय्?

गवि Mon, 12/11/2018 - 15:39

In reply to by १४टॅन

हे पुस्तक म्हणजे 'सुसंस्कारांचा मानदंड' समजण्यात येतं.

इज इट?

खूपच कायच्या काय मानदंड आहे.

मी त्याकडे एक त्या काळचा फोटोग्राफ म्हणून बघतो. सेम विथ स्मृतिचित्रे. त्यातही खूप रोचक निरीक्षणं करता येतात.

असो. हे अवांतर विषय आहेत.

१४टॅन Mon, 12/11/2018 - 16:23

In reply to by गवि

मुंजीत, परिक्षा पास झाली की, थोडक्यात वय ४ ते १० मधील मुलांना मराठी पुस्तक द्यायचं म्हणजे श्यामची आई, असं समीकरण होतं. अजूनही चेपुवर ह्याच्यातल्या 'संस्कारांच्या' नावाने गळे काढणारे लोक आहेत.
अतिअवांतर: मला सानेगुरुजींची सगळीच पुस्तके निरर्थक वाटतात.

पुंबा Mon, 12/11/2018 - 17:22

In reply to by गवि

मी त्याकडे एक त्या काळचा फोटोग्राफ म्हणून बघतो. सेम विथ स्मृतिचित्रे. त्यातही खूप रोचक निरीक्षणं करता येतात.

स्मृतीचित्रे, श्यामची आई आणि गावगाडा ही तीन पुस्तकं ह्याबाबतीत अफाट आहेत.

पुंबा Mon, 12/11/2018 - 17:19

In reply to by १४टॅन

ममव घरांत पिढ्यान्पिढ्या हे पुस्तक म्हणजे 'सुसंस्कारांचा मानदंड' समजण्यात येतं.

यात संस्कार म्हणजे श्यामचे बाबा वागतात किंवा ज्या धारणांनी जगतात ते नव्हे तर आई श्यामला जशी घडवू पाहते ते असा माझा समज आहे. श्यामच्या मनात करूणा, सहवेदना, आदर, श्रमप्रतिष्ठा, माफक समता(तत्कालानुरूप) आदी सदगुणांचं रोपन करण्याचा त्याची आई कसा प्रयत्न करते हा सुसंस्कार पुर्वीच्या ममव घरांत अपेक्षित असावा. हे गुणच आज ममवंमध्ये सदगुण मानले जात नाहीत आणि फक्त 'प्रॅक्टिकलपणा', पैशाचे म्यानेजमेंट(इर्रिस्पेक्टिव्ह ऑफ स्रोत), फटकळपणा, कातडीबचाऊपणा, दुसऱ्याच्या वेदनांप्रती पॅसिव्हनेस आदी 'कालोचित(!)' मूल्ये महत्वाची मानली जातात तेव्हा मानदंड वगैरे गोष्टी मोठ्ठा विनोद म्हणून विसरणंच ठीक. साने गुरूजींना हीन लेखणं हा नवा ममव ट्रेंड कदाचित तुम्हाला ठाऊक नसेल.

गवि Mon, 12/11/2018 - 17:37

In reply to by पुंबा

त्या आईच्या संस्कारांविषयी देखील शंका आहेत. तत्कालीन संदर्भात पाहिलं तर त्या बऱ्याचशा बाजूला पडू शकतात हे खरं आहे. पण तरीही स्मृतिचित्रे, श्यामची आई यात त्यावेळच्या लोकांच्या पर्सनॅलिटीज, पती पत्नी किंवा तत्सम जवळच्या वन टु वन रिलेशन्सची खोली (किंवा तिचा अभाव) पण त्याचवेळी सोशल रिलेशनशिपमध्ये नेटवर्क घट्ट (घरात दूर दूरचा गोतावळा नेहमीसाठी हक्काने मुक्काम ठोकून असलेला, कोणाचीही पोरं शिकायला कोणाकडेही), घरातल्या मृत्यूबद्दल अगदी बालमृत्यूबद्दलही लिहिता बोलताना बराच सहज अप्रोच वगैरे.

बऱ्याच विचित्र गोष्टी दिसतात. पण वर्णन करता येत नाही. अशी काळ उघडा करणारी पुस्तकं हा वेगळ्या धाग्याचा विषय आहे.

पुंबा Mon, 12/11/2018 - 17:48

In reply to by गवि

तत्कालीन संदर्भात पाहिलं तर त्या बऱ्याचशा बाजूला पडू शकतात हे खरं आहे.

नाही. ज्या काळात श्याम वाढत असतो त्या काळातसुद्धा हळवेपणा हा पुरूषांमधला दुर्गुण मानला जाई. आईला मदत करणे वगैरे गोष्टी मुले करत नसत, ऐदीपण हा गुण मुलांमध्ये आवश्यक स्किल असल्यासारखा दिला जाई. ती करते ते संस्कार त्या काळाच्या मानाने क्रांतीकारीच आहेत.

१४टॅन Mon, 12/11/2018 - 18:01

In reply to by पुंबा

हे गुणच आज ममवंमध्ये सदगुण मानले जात नाहीत आणि फक्त

ह्या आणि ह्यापुढच्या वाक्यांसाठी श्यामच्या आयाच जबाबदार नाहीत काय? खरोखर 'चंद्रमौळी झोपडी' आणि 'मीठभाकरी'चेच संस्कार मुलांवर करायचे होते तर 'खूप शिक, मोठ्ठा साहेब हो' हा संदेश मध्ये आणावाच कशाला?

करूणा, सहवेदना, आदर, श्रमप्रतिष्ठा, माफक समता(तत्कालानुरूप) आदी सदगुणांचं रोपन

ममवंचं एक बरं असतं, की ते अगदीच कमरेचं सोडून कधीच डोक्याला गुंडाळू पाहत नाहीत. तुम्ही लिहीलेल्या मूल्यांचा अक्षरश: abuse करुन फायदे ओरपणारी, कांगावे करणारीच जास्त माणसं आजूबाजूला असल्यामुळेच

'कालोचित(!)' मूल्ये

एकाएकी

मूल्ये महत्वाची मानली जातात

ह्यात नवल ते काय?

हे गुणच आज ममवंमध्ये सदगुण मानले जात नाहीत

हे वाक्य अगदीच एकांगी आहे. घरोघरी दिवाळं निघालेले श्यामचे बाबा दिसल्यामुळे नवीन श्यामच्या आयांनी श्यामांवर 'असे' संस्कार केलेले आहेत. अहो, स्वत: पुलं जिथे लिहून गेले की 'श्रीमंतीइतके धट्टेकट्टे कोणीही नाही हे कळेपर्यंत लुळेपांगळे होऊन गेलो' तिथे बिचाऱ्या ममवंची काय कथा?

साने गुरूजींना हीन लेखणं हा नवा ममव ट्रेंड कदाचित तुम्हाला ठाऊक नसेल.

तो त्यांना हीन लेखण्याचा ट्रेंड नाही. सानेगुरुजींच्या स्वातंत्र्यलढ्यातल्या सहभागाला हीन लेखणं कोणासही शक्य नाही. त्यांच्या लिखाणातली मूल्यं मात्र जुनाट भासत असल्याने त्यांचं लिखाण हीन लेखणं, ही कालौघाचीच निष्पत्ती आहे.

पुंबा Mon, 12/11/2018 - 18:42

In reply to by १४टॅन

ममवंचं एक बरं असतं, की ते अगदीच कमरेचं सोडून कधीच डोक्याला गुंडाळू पाहत नाहीत. तुम्ही लिहीलेल्या मूल्यांचा अक्षरश: abuse करुन फायदे ओरपणारी, कांगावे करणारीच जास्त माणसं आजूबाजूला असल्यामुळेच

खरं आहे. जेव्हा ही मूल्ये सुसंस्कार म्हणून मानली जात तेव्हाही पोरांना जगताना विरोधाभास जाणवत असेलच.

हे वाक्य अगदीच एकांगी आहे. घरोघरी दिवाळं निघालेले श्यामचे बाबा दिसल्यामुळे नवीन श्यामच्या आयांनी त्यांच्यावर 'असे' संस्कार केलेले आहेत. अहो, स्वत: पुलं जिथे लिहून गेले की 'श्रीमंतीइतके धट्टेकट्टे कोणीही नाही हे कळेपर्यंत लुळेपांगळे होऊन गेलो' तिथे बिचाऱ्या ममवंची काय कथा?

आई ज्या संस्कारांचा आग्रह श्यामच्या बाबतीत धरते त्याचा आणि त्याच्या बापाचं दिवाळं निघणं याचा काय संबंध! बापाचा ऐदीपणा ही श्यामच्या आजीची चूक आहे. पुस्तकात आईने संस्कारीत केलेला श्याम तरूणपणी नक्कीच बापाप्रमाणे ऐदी झाला नसावा.

सानेगुरुजींच्या स्वातंत्र्यलढ्यातल्या सहभागाला हीन लेखणं कोणासही शक्य नाही. त्यांच्या लिखाणातली मूल्यं मात्र जुनाट भासत असल्याने त्यांचं लिखाण हीन लेखणं, ही कालौघाचीच निष्पत्ती आहे.

आजिबात जुनाट नाहीत. करुणा, सहवेदना, स्त्रैण मानला गेलेला कळवळा हा करूणेचाच धाकटा भाऊ, श्रमप्रतिष्ठा, स्वाभिमान हे सार्वकालिक मूल्ये आहेत, उपयोगी आहेत, त्यांच्या अभावी जगाचे जे होतेय ते भयानक आहे. साने गुरूजी हा माणूस भाबडा म्हणून टाळणे योग्य नाही असे माझे वै. म.

अस्वल Mon, 12/11/2018 - 23:31

In reply to by पुंबा

लंबक थोडा झुकलाय, तो झुकू दे.
आधी साने गुरुजी म्हणजे काय प्रश्नच नाही म्हणून लोकं सगळं छान म्हणायचे.
आत कदाचित साने गुर्जी म्हणजे बोगस असं म्हणतील, तर म्हणू द्यायला पाहिजे
मग थोड्या वर्शांनी साने गुरूजींना लोक नीट समजून घेतील.

अडगळीत टाकून देऊन विसरण्यापेक्षा टीका केलेली उत्तम.
-----------
मलाही शामची आई मुंजीतच मिळालं होतं, फार फार भावनांनी ओथंबलेलं वाटल्याने माझी वेवलेंग्थ जुळली नाही. शिवाय मला तेव्हा ज्यूल्स व्हर्नही मिळाला होता.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 13/11/2018 - 01:24

In reply to by अस्वल

माझी मुंज न झाल्यामुळे मला 'श्यामची आई' सिनेमा बघून समाधान मानावं लागलं.

पुंबा Tue, 13/11/2018 - 17:02

In reply to by अस्वल

आत कदाचित साने गुर्जी म्हणजे बोगस असं म्हणतील, तर म्हणू द्यायला पाहिजे

म्हणू द्यायला हरकत नाहीच. माझ्या काही भावना-बिवना दुखवत नाहीत.
माझा मुद्दा मूल्यांच्या बाबतीत आहे. मूल्यांची चिकित्सा व्हावी. सध्याचा काळ पोस्ट ट्रूथ आहे असा बोलबाला सर्वत्र होतोय. माझ्या मते हा काळ पोस्ट-करूणासुद्धा आहे. वर उल्लेखलेली मूल्ये ही कधी नव्हेत इतकी रिलेव्हंट आहेत.

अस्वल Wed, 14/11/2018 - 03:49

In reply to by पुंबा

माझा मुद्दा मूल्यांच्या बाबतीत आहे. मूल्यांची चिकित्सा व्हावी- वर उल्लेखलेली मूल्ये ही कधी नव्हेत इतकी रिलेव्हंट आहेत.

द्याट तो आय ॲग्री.

गवि Tue, 13/11/2018 - 11:43

In reply to by पुंबा

तिचे तुम्ही उल्लेखलेले संस्कार चांगले आहेत पण मला त्या आईच्या पात्रात प्रचंड निगेटिव्ह थिंकिंग दिसतं. पोरं कायमची डिप्रेशनची शिकार होतील इतकं. शिवाय पतीची बाजू घेत असली तरी पतीविषयीचा प्रत्येक उल्लेख अत्यंत निराशापूर्ण.

वडील तात्पुरते घर बांधले आहे, पुढे मोठे बांधू असं लोकांना सांगत होते, पण आई म्हणे आता यांच्याकडून मोठे घर केव्हा बांधून होणार? मला आता मोठे घर देवाकडे गेल्यावरच मिळेल.

तुझे आजोबा काशीला जाऊन आले आहेत, हे देखील नाशकापर्यंत गेले आहेत. माझे जाणे कुठले होणार आणि मला कोण नेणार, घराचे अंगण, तुळशी वृंदावन (इत्यादि) हेच माझी काशी..

आकाशात तारा तुटलेला दिसताच तुझ्या आईच्या आयुष्याचा तारा लवकरच तुटेल असे तर सांगत नाही ना तो तारा? मला वर देवाकडे न्यायला तर आला नाही ना तो तारा? वगैरे असं मुलांना विचारणं.

तोंडाला चवच नसते, आल्याचा तुकडा घेऊन कसेतरी घास ढकलायचे. आला दिवस दवडायचा. त्याची इच्छा.

घरात विष खायला दिडकी नाही, फास लावायला सुतळीचा तोडा नाही..

अहेवपणी अब्रूनिशी सौभाग्यासाहित मला घेऊन जा ही विनंती तर मोजण्यापलीकडे वेळा.

गरिबांच्या स्वप्नांना मातीतच मिळावे लागते. तू वडिलांचे ऐक.

आता अगदी जगावेसे वाटत नाही.

ही आणि अशीच सगळी वाक्ये. आणखीही पुष्कळ मिळतील. श्यामची आई असा धागा कधी निघाल्यास बघता येईल.

लहान मुलांच्या मनाचं काय होत असेल कोण जाणे. इतक्या निराशावादी पार्श्वभूमीवर संस्कार दिले तरी कितपत positivity असेल याविषयी शंका येते.

अस्वल Tue, 13/11/2018 - 03:03

ममवचा विषय निघालाच आहे तर-

जीएंच्या "माणूस नावाच बेटा" नावाच्या अस्सल कथेत एक "केतकरशास्त्री" नामक गूळकाढू आणि गळेपडू पात्र त्यांनी उभं केलं आहे.
(संजोपरावांनी ही अख्खी कथाच इथे टाकली आहे ती वाचता येईल. )
ही अख्खी कथा मध्यमवर्गीय मराठी माणसाचा परीघ किती छोटा आणि नीरस असतो त्यावर उत्तम प्रकाश टाकते, असं आपलं माझं मत. कथेचा नायक दत्तू जोशीचं रटाळ जगणं आणि त्यातून आलेलं फ्रस्ट्रेशन इ. जीएंनी पकडलं आहे. ममवत्त्वाबद्दल जीएंचं मत दत्तू जोशीच्या रूपाने त्यांनी बोलून दाखवलं असावं असं वाटत रहातं.

तर त्यातल्या केतकरशास्त्रींबद्दलची ही काही वाक्यं-
१.

समोरील ख्रिश्चन स्मशानभूमी, दूरचे दिवे, वरील दोनचार चांदण्या यातून नाही म्हटले तरी चमचाभर मंगल बुवा काढणार! मांगल्य म्हणजे तर शास्त्रीबुवांचा अगदी हातखंडा. म्युनिसिपालिटीचे साफसफाई पथक डी ड़ी. टी. मारत जाते त्याप्रमाणे ते ठिकठिकाणी पचक पचक मांगल्य टाकत जात असत. आणि तेही विशिष्ट शिक्क्याचेच मांगल्य बरं का! आपल्या संस्कृतीत अगदी हातमोज्यात हात बसवल्याप्रमाणे बसणारे शास्त्रीबुवा भयंकर संस्कृतिवाले. टमरेल घेऊन जाताना ते उजव्या हातात असावे की डाव्या हातात असावे हे ते संस्कृतीला वाट पुशीत ठरवत असत. एक पतंग पंधरा मिनिटे उडत ठेवण्याइतका लांब उसासा त्यांनी सोडला व ते म्हणाले, "सगळीकडे मांगल्य भरून राहिलं आहे."

२.

उद्याच्या रविवारी मी मुलांना कथा सांगणार आहे. तेवढाच एक दिवस आनंदात जाईल माझा. मुले ही देवाची फुले! आनंदाने जगचि डुले" बुवा आता चक्क हुंदका देणार असे त्याला वाटले. कारण त्यांचे शब्द तर अश्रूंनी भिजलेच होते. बुवा पंधरवडा महिन्याने कथा सांगत. कुठेही. मुले बसतील तेथे. मुले बसतील त्या धरणीमातेवर. आभाळाच्या निळ्या छायेखाली. देवाच्या हिरव्या चवऱ्यांच्या छायेत.

'विशाल पवित्र हिमालयाच्या पायथ्याशी गाढवाची दोन पिले होती. एकाचे नाव माणिक (मानेला उजव्या बाजूला हिसका), दुसऱ्याचे नाव मोती (आता डाव्या बाजूला हिसका). फार फार प्रेमळ. एकत्र हसायची, एकमेकांच्या खांद्यावर खांदा टाकून खूप रडायची, मने शुद्ध करून घ्यायची. असा जिव्हाळा, तसा जिव्हाळा. फार प्रेमळ, गोजिरवाणी, अगदी तुमच्यासारखी..."

पुढे जीए म्हणतात -

आणि या असल्या गोष्टी कुणापुढे? तर घरी, पुस्तकात फक्त सेन्सॉरशमनार्थच वस्त्रार्थे किंचित चड्डी घातलेल्या अमेरिकन नटींचे पौष्टिक फोटो ठेवणाऱ्या पोरांपुढे!

मिसळपाव Tue, 13/11/2018 - 03:35

In reply to by अस्वल

सन्जोपरावांचं नाव घेतलंत म्हणून विचारतो - मी गेल्या महिन्याभरात ईथे आणि मिपावर त्याना व्यनि पाठवला होता. सहजच. "बरे आसां?" विचारायला. काही उत्तर नाही आलं. तुमचा काही संपर्क आहे का त्यांच्याशी?

मिसळपाव Tue, 13/11/2018 - 17:37

In reply to by अबापट

व्यनि पाठवला आहे त्याना. जमलं तर बघा म्हणावं. आणि चार ओळींचा खुशाली विचारणारा निरोप आहे, धडपड करून, तोशीस घेउन बघावा असा नाही!! काही कारणाने व्यनि/ईमेल बघत नसले तर नुसतं "खुशाल आहात ना? मंटोची पुस्तकं वाचणं जमलं का?" एव्हढं विचारा त्याना माझ्यातर्फे. धन्यवाद.

अबापट Tue, 13/11/2018 - 20:21

In reply to by मिसळपाव

कुणाचा निरोप आहे सांगू ? तुमचं काय नाव गाव ?जाहीर सांगायचं नसेल तर मला व्यनि करून सांगा .. फोनवर निरोप पोचवेन..

अस्वल Wed, 14/11/2018 - 03:51

In reply to by अबापट

तुम्हाला मोठी माण्सं उगाच नाही म्हणत!
व्यनी करतो!
असो, आठलेकरांच्या धाग्यावर अवांतर नको. नाहीतर ते पुढल्यावेळी फोन नंबर देणार नाहीत.

आदूबाळ Tue, 13/11/2018 - 21:51

अशी काळ उघडा करणारी पुस्तकं हा वेगळ्या धाग्याचा विषय आहे.

मस्त विषय आहे. होऊन जाऊ दे, गवि.

मी नुकतंच ऑर्वेलचं 'डाऊन अँड आऊट इन पॅरिस अँड लंडन' वाचलं. त्यातही असा काळ उघडा केलेला आहे. मीही दोन पिंका टाकीन तुमच्या धाग्यावर.

गवि Tue, 13/11/2018 - 22:11

In reply to by आदूबाळ

"आमचा जगाचा प्रवास" हे पार्वतीबाई चिटणवीस यांचं पुस्तकही, एक काहीशी उच्च, एलिट, श्रीमंत, वेगळी पण प्रवासाची आवड असलेली लाइफस्टाइल दाखवणारं. या आणि वर चर्चा झालेल्या पुस्तकांत साधारण १८६० ते १९२० असा काळ (रेंज) आहे.

चिमणराव Wed, 14/11/2018 - 18:45

१) कट्ट्याला लोणावळा मध्यवर्ती? एक झालाय ,तो कसा वाटला? दहा ते चार वेळ मिळतो मुंबईकडच्यांना. ( रेल्वेमुळे सोय एवढंच.)
२)'डाऊन अँड आऊट इन पॅरिस अँड लंडन' ७७ मध्ये वाचलय ब्रिटिश कॅा लायब्रीतून॥ शिवाय चर्चिलचे दोन खंड वल्ड वॅारचे. विलियम हॅझलिट हा एक लेखक गद्यात पद्य लिहितो हे कळलं.
३) मला "लोखंडी रसत्यावरचे रथ,
बदलापूर ( पहिले मराठीतले शहरवर्णन असेलेले),
मुंबई ते काशी बोटीने ,
आणि आमची काशीयात्रा (न जाता टिपणांवरून लिहिलेली)
हे वाचायची फार उत्सुकता आहे.

'न'वी बाजू Wed, 14/11/2018 - 19:01

In reply to by चिमणराव

मुंबई ते काशी बोटीने

???

कसे काय बुवा? कोणत्या मार्गाने?

(मालगाडीवर बोट टाकून तर नाही ना?)

एक जुना सरदारजी विनोद आठवला. स्वातंत्र्यानंतर कश्मीरवरून जे युद्ध झाले, तेव्हा भारताचे संरक्षणमंत्री होते सरदार बलदेवसिंग. सरदारजी. त्यांना एका वर्तमानपत्री मुलाखत्याने कश्मीरची हालहवाल विचारली.

"काही नाही, ठीक आहे, परिस्थिती तशी आटोक्यात आहे, आपले आर्मीचे बहादुर जवान चांगली कामगिरी बजावताहेत, एअरफोर्सवालेसुद्धा त्यांना चांगली साथ देताहेत, आणि गरज पडलीच तर आपली नेव्हीसुद्धा तिकडे पाठवून देऊच की! चिंता कशापायी?"

चिमणराव Thu, 15/11/2018 - 19:32

In reply to by नंदन

वाराणसी, प्रयाग(अलाहाबाद), कानपूरला काळी मिरी होत असती तर तिकडे गंगेतही आता ट्राफिकजाम झाले असते बोटींचे.

-----
हे दिवाळीत पोहे खाणे प्रकरण त्यावेळी येणाऱ्या नवीन भाताच्या पोह्याचे कौतुक असणार. गिरणीले गरमागरम पोहे खाल्ले आहेत. फार छान लागतात.

राजेश घासकडवी Wed, 14/11/2018 - 18:57

लोकहो, कट्टा, भेटी वगैरे गोष्टींची चर्चा करण्यासाठी इतर धागे आहेत ते वापरा. किंवा खरडफळ्यावर बोला ही विनम्रसे विनंती.
- हुकुमावरून.