Skip to main content

काळ उघडा करणारी पुस्तकं

या धाग्यातून सुरू झालेल्या चर्चेचं फलित.

कोणतंही ललित लेखन देश-काळ-परिस्थितीच्या त्रिकोणाला टेकून उभं असतं. ललित लेखनाच्या प्रकाराप्रमाणे या त्रिकोणाचं महत्त्व कमीजास्त होतं. उदाहरणार्थ, प्रवासवर्णनात जास्त महत्त्व, त्याखालोखाल कथा-कादंबरीत, आणि कवितेत बहुदा सर्वात कमी. 'अपूर्वाई'च्या प्रस्तावनेत पुल म्हणतात, की हे प्रवासाच्या वर्णनापेक्षा प्रवासात असलेल्या माझंच वर्णन जास्त आहे. त्यांचं वाक्य आत्मचरित्र लिहिण्याच्या अनुषंगाने येतं, पण खरं तर ते पुल या व्यक्तीने पाहिलेल्या १९६०च्या दशकातल्या इंग्लंडचं, आणि त्यातल्या पुल या व्यक्तीच्या वावराचं चित्र आहे. तसंच, 'शाळा' कादंबरीत पौगंडावस्थेतल्या एका मुलाने अनुभवलेल्या आणिबाणीकालीन उपनगरीय आयुष्याचं चित्र आहे. देश, काळ, परिस्थिती. यावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे भाष्य करणाऱ्या पुस्तकांना आम्ही म्हणतो आहोत 'काळ उघडा करणारी पुस्तकं'.

आपण जगतो त्याच काळाची व्याप्ती प्रचंड मोठी असते. 'आपल्याला आपला भवताल, समकाल कळला आहे' असं म्हणणारा माणूस खोटं तरी बोलत असतो किंवा मूर्ख तरी असतो. समकाल नेहेमी तुकड्या-तुकड्यांतच समजून घ्यावा लागतो. काळ उघडा करणारी पुस्तकं हे तत्कालाचे तुकडे आहेत असं म्हणता येईल. आणि ते तुकडे आपल्याला कधी चकित करून जातात, कधी हळहळवतात; पण समकाल समजून घ्यायला मदत नक्की करतात.

काही उदाहरणं पाहू.

'श्यामची आई'मध्ये मुख्य पात्र आई असली तरी ती कादंबरी तत्कालीन कोकणस्थ ब्राह्मण कुटुंबातल्या पितृसत्ताक पद्धतीवर चांगलाच झगझगीत प्रकाश टाकून जाते. त्यात परिस्थिती अत्यंत उत्तम ते अत्यंत बिघडत जाताना श्यामचे वडील हे पात्र अगदी म्हणजे फारच अक्षम असल्याचं जाणवतं. म्हणजे अगदी फ्री फॉल.. प्रॅक्टिकली काहीच उत्पन्न नाही असं वर्षानुवर्षे चाललं होतं की काय असं वाटतं. मग वडील कामाला बाहेर गेले, शेतावर गेले वगैरे उल्लेख वाचून अगदीच शंका येते की खूप काळ कर्ज, आणखी कर्ज, आजारी होत चाललेली बायको चार आठ आण्यासाठी मोलाची कामं करते, झिजून मरते त्यांनतरही दुर्वांची आजी स्वैपाक करून देते, तिलाही तेल मीठ सुद्धा मिळत नाही घरात. इत्यादि. तर यांनी काहीच सावरलं नाही का काळानुसार? विशेषतः अगदी वाईट दिवस आल्यावर सासरे घरी येऊन समजावतात की शेत जमीन विकून आधी कर्जमुक्त व्हा. नंतर जप्ती आली तर काहीच उरणार नाही.. तो अत्यंत शहाणपणाचा सल्लाही ते वडील धुडकावून लावतात आणि अपमान करून सासरेबुवांना परत पाठवतात. आणि श्यामची आईदेखील पतीची बाजू घेत वडिलांना सुनावते. वडिलांच्या अविचारी कृत्यांमुळे अधोगती होताना स्पष्ट दिसत असताना श्यामची आई मात्र श्यामच्या वडिलांना प्रपादतदेखील नाही - विरोध करणं दूरची गोष्ट.

गोडसे भटजींच्या 'माझा प्रवास'मध्ये गोडसे भटजी मुळात प्रवासाला निघाले पैसे कमावायला. गोडसे भटजी क्रमपाठी ब्राह्मण होते. त्यांचं उत्तरेत जाऊन पैसे मिळवायचं 'बिझिनेस मॉडेल' आज आपल्याला चमत्कारिक वाटेल. दानधर्म करणाऱ्या धनिक राजेरजवाड्यांच्या आश्रयाला जायचं, तिथे आपली छाप पाडून काही मोलिक वस्तू (किंवा थेट पैसे) दानात मिळवायचे. म्हणजे : 'अर्थव्यवस्थेत भर घालणारं कोणतंही काम न करता धनवान होणे' हा गोडसे भटजींच्या बिझिनेस मॉडेलचा पाया होता! त्यांना काही पैसे मिळालेही, मग ते लुटले गेले. कधी मिळवलेले पैसे तसेच सोडून अंगावरच्या वस्त्रानिशी पळ काढावा लागला. पैसे मिळवायचं उद्दिष्ट अखेरीस पूर्ण झालं नाही. पण त्यांचे आर्थिक चढ-उतार त्या काळच्या अर्थकारणावर चांगलाच प्रकाश टाकतात.

तुम्हाला अशी कोणती 'काळ उघडा करणारी पुस्तकं' आठवतात? आणि कोणत्या अनुषंगाने? त्याबद्दल इथे बोलूया का?

***

यातल्या काही 'काळ उघडा करणाऱ्या पुस्तकां'वर सविस्तर लिहायचं डोक्यात आहे. आम्ही काही जण एकेक पुस्तकावर लिहून सुरुवात करू. कोणाला यात सहभागी व्हायचं असेल तर स्वागतच आहे! काळ, विषय, भाषा - कशाचंच बंधन नाही. पण 'लेख' म्हणावाइतकं लेखन सविस्तर असावं अशी आशा आहे.

साधारणपणे महिन्याला एक, याप्रमाणे २०१९मध्ये ऐसीवर चालणारी ही मासिक लेखमाला व्हावी अशी योजना आहे. बघूया.

चर्चा करण्यासाठी हा धागा आहेच.

लेखांक पहिला - Down and Out in Paris and London - जॉर्ज ऑरवेल
लेखांक दुसरा - श्यामची आई - साने गुरुजी
लेखांक तिसरा - माझा प्रवास - विष्णुभटजी गोडसे
लेखांक चौथा - मुंबईचा वृत्तांत - बाळकृष्ण बापू आचार्य, मोरो विनायक शिंगणे

Node read time
3 minutes
3 minutes

बॅटमॅन Wed, 21/11/2018 - 21:06

अशी अनेक पुस्तकं सांगता येतील, विशेषत: आत्मचरित्रपर पुस्तकं.

जीवनसेतू बाय सेतुमाधवराव पगडी
दिवस असे होते बाय विठ्ठलराव घाटे
आहिताग्नी राजवाडे आत्मवृत्त
आत्मपुराण बाय महादेवशास्त्री जोशी
स्मरणगाथा बाय गोनीदा
आयदान बाय उर्मिला पवार
प्रथमपुरुषी एकवचनी बाय पु भा भावे
मी कारखानदार कसा झालो बाय "धनी" वेलणकर
आणि अजून इतरही अनेक पुस्तके..स्नॅपशॉटच पाहिजे असतील तर वरील पुस्तके म्हणजे मस्तपैकी हाय रेझोल्यूशन स्नॅपशॉट्स आहेत. फोटोशॉपचाटच आजिबातच नसेल असे म्हणवत नसले तरी लै खिळवून ठेवणारे स्नॅपशॉट्स हे मात्र आहेच.

नितिन थत्ते Thu, 22/11/2018 - 10:19

पुणेरी हे श्री ज जोशींच्या वर्तमानपत्रांतील लेखांचे संकलन असलेले पुस्तक आहे. पण ते लेख जेव्हा लिहिले गेले त्या काळाचं चित्रण नाही. त्यांच्या बालपणच्या किंवा तारुण्यातल्या काळाचे चित्रण आहे. पण त्यांनी पुण्यातली माणसे आणि संस्था यांच्याविषयी लिहिले असल्याने ते वैयक्तिक असले तरी त्यात त्या काळाचे बऱ्यापैकी चित्रण आहे.
फक्त ते समकालीन नाही एवढाच त्याचा दोष.

गवि Thu, 22/11/2018 - 11:47

In reply to by नितिन थत्ते

बरीचशी पुस्तकं अशी नंतर आठवणी या रूपातच लिहिली गेली आहेत. अगदी श्यामची आईसुद्धा. श्यामची आई हे अगदी सत्य आत्मचरित्र नसलं तरी साने गुरुजींच्या कोंकणातल्या बालपणीच्या घटनाच त्यात आहेत असं वाचलं आहे.

सुनील Fri, 23/11/2018 - 16:33

In reply to by नितिन थत्ते

श्री ज जोशी यांच्या बहिणीच्या लग्नाच्या आदल्या दिवशी गांधींची हत्या झाली आणि त्या लग्नाची फरफट झाली. त्यादिवशीच्या पुण्याचे फार छान चित्रण बहुधा याच पुस्तकात आहे.

पुंबा Thu, 22/11/2018 - 11:38

मस्त धागा.
विंग्रजी चालत असेल तर बेंजामिन फ्रँकलिनचे आत्मचरित्र आठवते.
मी आता वि. ग. कानेटकरांची 'पुर्वज' आणि 'आणखी पुर्वज' ही दोन पुस्तके वाचत आहे. त्यात तुम्ही म्हणता आहात त्या तत्कालिन स्थळ, काळ, परिस्थिती, लोकसमजुती, समाजव्यवहार फक्कडपणे आलं आहे. काळाचा पट १८७० ते १९२०.

गवि Thu, 22/11/2018 - 11:52

चिं.वि. जोशींची चिमणराव सीरिज ही तशी काल्पनिक असली तरी काळ स्पष्ट दाखवते. हा एक दणदणीत ऐवज आहे. गुंड्याभाऊ त्यातला काहीसा मॉडर्न. त्या काळच्या तुलनेत मॉडर्न गोष्टी गुंड्याभाऊशी रिलेटेड आहेत आणि चिमणराव हा तुलनेत काँझर्वेटिव्ह मनुष्य असूनही तो गुंड्याभाऊचा अनेकदा सुप्तपणे हेवा करताना दिसतो असं मला जाणवतं.

पुंबा Thu, 22/11/2018 - 12:31

In reply to by गवि

विचाराने गुंड्याभाऊ अधिक कॉन्झर्व्हेटिव्ह वाटतो. चिमणराव जुजबी का होईना लिब्रलपणा दाखवतो(जसे बायकोचे ऐकणे, अंडी वगैरे प्रकार घरात करू देणे, पोरांचे मत विचारणे वगैरे). गुंड्याभाऊ हिंदूत्ववादी देभ.(बहुतेक मुंजेवादी) आहे. चिमणरावाला गुंड्याभाऊचा हेवा वाटतो तो त्याची आईसुद्धा गुंड्याचीच भलामण करते, जे चिमणरावाला जमत नाही ते गुंड्याभाऊ करतो याचा.

अभ्या.. Thu, 22/11/2018 - 13:06

अर्थातच आचार्य अत्र्यांचे 'मी कसा झालो'.
तत्कालीन सासवड, पुणे, मुंबई, प्रेस व्यवसाय, शिक्षकी व्यवसाय, त्या काळचे फ्रॉडस (मी आरोपी कसा झालो), मराठी फिल्म इंडस्ट्री, साहित्यिक आणि त्यांचे वाद् आणि मुख्य राजकारण आणि नेते सगळ्यांचाच गोषवारा टिपिकल अत्रे स्टाईलीत.

अस्वस्थामा Fri, 23/11/2018 - 16:11

In reply to by अभ्या..

अत्र्यांचं 'कर्हेचे पाणी' हे जास्त चांगल्या तर्हेने त्या काळाचं वर्णन करतं. खासकरून सामाजिक आणि राजकिय डिटेल्स एकदम भारी आहेत.

नितिन थत्ते Thu, 22/11/2018 - 13:11

बंध अनुबंध हे कमल पाध्ये यांचे आत्मचरित्र स्वातंत्र्योत्तर सुरुवातीच्या काळाचे चांगले चित्रण करते. लेखिकेचे पती प्रभाकर पाध्ये हे प्रत्यक्ष राजकारणाशी संबंधित असल्याने तेव्हाच्या (निदान समाजवाद्यांच्या) राजकारणाविषयी बऱ्यापैकी माहिती मिळते.

गवि Thu, 22/11/2018 - 13:29

हे स्पष्ट करायला हवं की जुनी किंवा ठराविक काळातली पुस्तकं आहेत म्हणजे त्यात त्या काळाचा फोटोग्राफ दिसत असेलच असं नाही. नुसत्या प्रसिद्ध स्थळांचं / रस्त्याचं त्या वेळी कसं दिसायचं हे वर्णन वेगळं आणि त्या काळात लोकांचे परस्पर संबंध कसे होते, व्यवहार कसे होते, ताणेबाणे कसे होते, मनोरंजनाच्या कल्पना / उद्योग काय होते, पापपुण्याचं काय होतं? असं बरंच काही. हे वेगळं.

चिमणराव Thu, 22/11/2018 - 13:34

१) पण लक्षात कोण घेतो - ह ना आपटे.
आठवीत वाचण्याचा प्रयत्न केलेला पण अर्धवट सोडावा लागला. ठोकळा. आता आठवत नाही काय होतं त्यात.
२) श्री ज जोशी - मी पुण्याहून लिहितो की - वाचत असे. आठवणी होत्या?
३) प्रिया तेंडुलकरने काही अनुभव ( एर हॅास्टेस असतानाचे) लिहिलेत. पण लेख होते. पुस्तके?
४) गारंबीचा बापू?
५) कल्याणी - जयवंत दळवी हे समकालीन घटना कादंब्रीत आणत असावेत.
६) व्यंकटेश माडगुळकरांच्या कथा.

नीधप Sun, 25/11/2018 - 11:06

In reply to by चिमणराव

३) प्रिया तेंडुलकरने काही अनुभव ( एर हॅास्टेस असतानाचे) लिहिलेत. पण लेख होते. पुस्तके?
पंचतारांकित

कासव Thu, 22/11/2018 - 14:05

प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची ‛कथा वक्तृत्वाची’पण असंच एक वाटतं.

चिंतातुर जंतू Thu, 22/11/2018 - 14:26

लव्हाळी - श्री. ना. पेंडसे. दुसर्‍या महायुद्धाच्या काळातला मुंबईतला मराठी मध्यमवर्ग ह्यात खूप रोचक पद्धतीनं चितारला आहे. मराठी कादंबरी खूपशी व्यक्तिगत नात्यांत घुटमळत राहते, पण इथे मात्र एका विशिष्ट ऐतिहासिक-राजकीय परिस्थितीत (युद्ध) गिरगावातला मध्यमवर्ग आपली राजकीय-सामाजिक मतं घडवताना किंवा घोटताना दिसतो. विशेष म्हणजे त्याच वेळी आजही मध्यमवर्गाला कदाचित लागू पडतील अशी काही शाश्वत मूल्यंही त्यात हळूहळू दिसायला लागतात. उदा. फार मोठी स्वप्नं न पाहता छोट्या जिवाचं जगणं.

आदूबाळ Thu, 22/11/2018 - 20:44

In reply to by चिंतातुर जंतू

सहमत सहमत. एकदम आवडतं पुस्तक आहे.

त्यातली एक रोचक आठवण : 'लव्हाळी'तला नायक सर्वोत्तम सटकर एकदा विमा काढतो. आणि आपल्या कनिष्ठ मध्यमवर्गीय विचारसरणीप्रमाणे त्याला 'ॲसेट' समजतो!

-------
श्रीना मुख्यत: कोकणी-प्रादेशिक लेखक म्हणून ठाऊक असले, तरी त्यांच्या जवळजवळ ५०% कादंबऱ्या मुंबईत घडतात. काही कादंबऱ्यांमध्ये - विशेषत: 'हत्या'** आणि 'कलंदर'मध्ये - युद्धपूर्व गिरगाव आणि नयनमनोहर दादर (!) यांचं झकास चित्रण आहे. किंबहुना 'लव्हाळी'चा सर्वोत्तम सटकर दूर सस्त्यात जागा घ्यावी म्हणून 'परळ व्हिलेज'ला जावं की काय असा विचार करत असतो!

**'हत्त्या' नव्हे. 'पित्याला'मधला 'त्या'

मनीषा Fri, 23/11/2018 - 15:43

मला गोनिदांचे "तांबडफुटी" आठवते आहे. कोकणातील वातावरण, जीवनशैली अगदी डोळ्यासमोर येते.

दूसरे "आनंदी-गोपाळ" -- लेखक आत्ता आठवत नाहीयेत. परंतु स्वतंत्र्यपूर्व काळातील कथानक आहे. आणि सत्यकथा असल्याने अनेक संदर्भ देखिल लक्षात येतात.

आणखी एक म्हणजे श्रीमती शांता शेळके यांनी अनुवादीत केलेले "चौघीजणी" .
पुस्तक पुष्कळ मोठ्ठे आहे, परंतु त्या विविक्षित कालखंडातील कौटुंबिक आणि समाज जीवनाचे सुरेख चित्रण केलेले आहे.

हंसा वाडकर यांचे "सांगत्ये ऐका" बद्दल पण लिहीता येईल.

सुनील Fri, 23/11/2018 - 16:28

In reply to by मनीषा

आणखी एक म्हणजे श्रीमती शांता शेळके यांनी अनुवादीत केलेले "चौघीजणी"

हे लुइझा मे अल्कॉट यांच्या लिट्ल विमेनचे रुपांतर. १९ व्या शतकातील अमेरिकन समाजाचे चित्रण (यादवी युद्धातील् उत्तरेकडील राज्यांचे).

पण गॉन विथ द विन्डमध्ये दक्शिणेकडील राज्यांचे चित्रण यापेक्शा अधिक चांगल्या प्रकारे आले आहे.

मनीषा Fri, 23/11/2018 - 17:41

In reply to by सुनील

अशी तुलना करणे जरा अवघड आहे.

कारण "चौघीजणी" मधील चार बहीणी, त्यांचे कुटंबिय ह्यांची परिस्थिती, जीवनमूल्ये आणि गॉन विथ द विंड मधली स्कार्लेट, तिचे आयुष्य,तिला ज्या प्रसंगाना सामोरे जावे लागते, ते एकमेकांहून सर्वस्वी भिन्न आहे.

लिटिल वुमेन मध्ये कथानक संथगतीने पुढे जाते आणि नाटकीय प्रसंग कमी घडतात.
या उलट गॉन विथ द विंड मधे पहिल्यापासूनच वेगवान आणि नाटकीय प्रसंगाची मालीका सुरू होते.

परंतु वातावरण निर्मिती, समाज आणि व्यक्तीचित्रणारतील तपशील ,बारकावे इ. दोन्ही कादंबऱ्यांमधे विपुल प्रमाणात, सहजतेने (म्हणजे कथानकाच्या ओघातच, कथेचा भाग म्हणून) आणि रेखिवपणे येते, असं मला वाटतं.

राही Fri, 23/11/2018 - 19:25

अशी अनेक पुस्तके आहेत, असतात. ललित साहित्य हे त्या त्या काळाचा आरसाच असते. जुन्या कादंबऱ्या उदा. दत्त रघुनाथ कवठेकर, वा. म. जोशी, ना. सी. फडके, वि स. खांडेकर यांच्या सामाजिक कादंबऱ्यांतून त्या त्या काळचे वातावरण आणि मूल्ये यांचे प्रतिबिंब दिसतेच. गंगाधर गाडगिळांचा कडू आणि गोड हा कथासंग्रह, गोखले, माडगूळकर, शंकर पाटील यांचे बहुतेक साहित्य हे त्या त्या काळाचे प्रतिनिधित्व करते. मात्र ललित साहित्यापेक्षा आत्मचरित्रे आणि प्रवासवर्णने यातून तो काळ अधिक ठळकपणे दिसतो. रा भि. जोशी, अनंत काणेकर यांची प्रवासवर्णने, सरस्वतीबाई अकलूजकर यांचे त्यांची कन्या सरोजिनी वैद्य यांनी संकलित केलेले आत्मवृत्त, डॉ. लीला रानडे - गोखले यांचे आत्मवृत्त, डॉ. रखमाबाई - एक आर्त हे मोहिनी वर्दे यांचे पुस्तक, सुमा करंदीकर, वासंती गाडगीळ, यशोदा पाडगावकर यांनी लिहिलेली सहजीवनवृत्ते, या सर्वांतून तो काळ आणि समाज डोकावत राहातो.
ह. मो. मराठे यांची आत्मपर दोन पुस्तके, भीमसेन जोशींच्या मुलाने लिहिलेले पुस्तक अशी अनेक आठवतात.
आणखी अनेक आहेत. नोंदी पाहिल्यावर कदाचित लिहीन.
वरती बॅट्मन यांच्या प्रतिसादातली पुस्तकेही प्रातिनिधिक आहेत. तसेच कमल पाध्ये यांचे ( श्री थत्ते यांनी सुचवलेले ) बंध अनुबंधही. या वरून भाऊ पाध्ये आठवले. यांची सर्वच पुस्तके त्या काळाचे आणि तत्कालीन एका समाजगटाचे नेमके रूप दाखवतात. झोपडपट्टीवरची सर्वच पुस्तके- माहीमची खाडी, चक्र वगैरे अशीच प्रखर वास्तवदर्शी आहेत

उज्ज्वला Fri, 23/11/2018 - 21:36

चांगला विषय. काळाचा पट दर्शवणारी मुख्य पुस्तकं म्हणजे चरित्रं आणि आत्मचरित्रं. पण ललित साहित्यात काळाचे प्रतिबिंब उमटलेली कित्येक उदाहरणं आहेत. बऱ्याच जणांनी बऱ्याच लेखक, पुस्तकांचा उल्लेख केलेलाच आहे. ‘शाळा’सारखे आणीबाणीच्या दिवसांचा संदर्भ असलेले लेखन जसे आहे त्याचप्रमाणे स्थलवर्णन आणि काळाचे नेमके संदर्भ न देताही अभावितपणे काळाची चौकट अधोरेखित झालेले लेखनही आहे. श्री. ज. जोशींच्या घरी गॅस आला कारण त्यांची नायिका आता स्टोव्ह न पेटवता गॅस पेटवते यावरून ठणठणपाळाने त्यांची फिरकी घेतली होती. स्वातंत्र्योत्तर आणि प्रकाशनपूर्व म्हणजे जेमतेम वीसपंचवीस वर्षांचा काळ सिंहासन, मुंबई दिनांक या कादंबऱ्यांत येतो. ‘आत्मकथा’ नाटकात आणीबाणीत उघडा पडलेला वयोवृद्ध लेखक आहे. ‘दुस्तर हा घाट’ मधला काळही वनमाळीच्या वडिलांचे ब्रिटिश उच्चार व धोतर हा पेहराव, त्यांचा झालेला बालविवाह, नमू अस्थानी हसायला लागल्यावर वनमाळीने विचारलेला आणि त्या दोघांनी मिळून पूर्ण केलेला ‘हसायला काय झालं, ‘’इथे कोणी नागडं नाचतंय का’’ हा प्रश्न आणि त्यावर डोळ्यांत पाणी येईपर्यंत हसणं, कानेटकरांच्या ‘प्रेमा तुझा रंग कसा’मध्ये कोळशाची वखार चालवणारे बापलेक आहेत. ‘‘आपलं बुवा असं आहे’’ या नाटकातले क्रिकेटपटूंचे संदर्भ, भारताची नीचांकी धावसंख्या झालेल्या डावात अकराव्या क्रमांकावर येऊन डाव सावरण्याची फँटसी... जुन्या नाटकांमध्ये संगीत संशयकल्लोळमधील पात्रांचे पेहराव (आणि भाषा), संगीत शारदा – एकच प्यालाचे नव्याने सादरीकरण (गाण्यांसह, शिवाय, पुनर्लेखन) झाले - पण जरठ-कुमारी विवाह हा विषय कालबाह्यच झाला.1
शिवाय सगळ्यात मोठी कालमर्यादेची चौकट ही इंटरनेट, मोबाइल फोनसारख्या नवतंत्रज्ञानाच्या आधी प्रकाशित झालेल्या सर्वच लेखनाला त्या संदर्भांचा सर्वस्वी अभाव या अर्थाने लागू होते.

1. दूरदर्शनवर एकदा संगीत शारदा (अर्थात संपादित आवृत्ती) झाली होती. तेव्हा एका प्रवेशाच्या सुरुवातीला मूळ नाटकात नुसतंच “आपण सगळ्या इथे आनंदाने जमल्या आहोत खऱ्या, (पण बिचाऱ्या शारदेची अवस्था..)” असं काहीसं आहे. तर तिथे त्यांनी डोकं लढवून सगळ्याजणी नवऱ्याचं नाव घेत आहेत असा प्रसंग घुसडला. एकजण म्हणाली, “तुळशीला घालते पळी पळी पाणी”… त्यावर दुसरीची प्रतिक्रिया अगदी अठ्ठीछाप होती. “कसली चिकट आहे ही ! पळी पळी पाणी !” हेल अगदी कॉलेजकन्यकेचा. पार वाट लागली त्या काळाची.

नितिन थत्ते Fri, 23/11/2018 - 23:01

ललित साहित्यात कुठल्याही काळाचे वर्णने कितपत रिलाएबल असेल याबाबत देवदत्त यांचा लेख वाचल्यावर शंका उत्पन्न झाली. सदर लेख हा उपहासात्मक असला तरी त्यात 'ललित लेखनात कैच्याकै लिहिले जाते' यावर प्रकाशझोत टाकलेला आहे.

अस्वल Sat, 24/11/2018 - 10:41

In reply to by नितिन थत्ते

हे बरोबर आहे.
पण मॅगास्थेनिसच्या प्रवासवर्णनातसुद्धा त्याने बरंच काही "फेकलं" आहे असं वाचलंय- सोन्याच्या मुंग्या आणि विचित्र प्राणी इ.
तरीही प्रवासवर्णनं - मॅगास्थेनिस, इब्न बतूता, ह्यू-एन-त्संग(माफी!) वगैरे मातबर लोकांनी लिहीलेल्या गोष्टी खऱ्या समजाव्यात काय?
----
स्मरणगाथेची अक्षरश: पारायरणं केलेली आहेत. इतक्या सहससोप्या भाषेत लिहिलेलं आणि इतकी पकड घेणारं पुस्तक दुर्मिळ.
-----
९०तली मुंबै/भारत ह्यावर प्रकाश टाकणारी "मॅक्सिमम सिटी (सुकेतू मेहता) आणि व्ही.एस. नायपॉल ह्यांची २ पुस्तकं ह्यांचा समावेश व्हावा.

'न'वी बाजू Sat, 24/11/2018 - 23:02

In reply to by नितिन थत्ते

फ्रेडरिक फोरसाइथच्या 'नो कमबॅक्स' या लघुकथासंग्रहात 'देअर आर नो स्नेक्स इन आयर्लंड' नामक एक लघुकथा आहे. (इच्छुकांनी तिचा जरूर लाभ घ्यावा.) तीत, उत्तर आयर्लंडमध्ये स्थलांतरित झालेला एक पंजाबी हिंदू शेतमजूर असतो. एका गोऱ्या आयरिश शेतमालकाच्या शेतावर राबत असतो. शेतमालक अर्थातच त्याला चांगली वागणूक देत नसतो. एके दिवशी शेतमालकाने याचा असाच काही विशेष अपमान केल्यावर हा चिडतो, नि शेतमालकाचा खून करण्याचा बेत रचतो. पण खून करणार कसा? शेवटी तो आपल्यावर तर उलटू नये! खूप विचार केल्यावर त्याला युक्ती सुचते. काय तर म्हणे, लीजेंडनुसार आयर्लंडमध्ये सर्प नाहीत. सबब, याला जर आपण सर्पदंश घडवून आणला, तर कोणाला मृत्यूच्या कारणाबद्दल संशयसुद्धा येणार नाही, नि आपल्यावर बालंट येणार नाही.

आता, सर्पदंश घडवून आणायचा कसा? म्हणून तो सर्वप्रथम लंडनला सावकारी करीत असलेल्या आपल्या सरदारजी मित्राकडे जातो, नि त्याच्याकडून भरपूर पैसे उधार घेतो. नंतर खोलीवर जाऊन, आपल्या मोहिमेस यश मिळावे म्हणून देवीच्या मूर्तीसमोर (की तसबिरीसमोर? नक्की तपशील विसरलो.) मनोभावे पूजा करतो, नि मग थेट मुंबईचे विमान गाठतो. मुंबईस पोहोचल्यावर ग्रांटरोड पुलाखाली सापांचे एक दुकान असते, तेथे जातो, नि तेथल्या चटर्जी नावाच्या गुजराती दुकानदारांकडून कोटाच्या खिशात मावू शकेल असा परंतु जालीम विषारी असा एक (तुलनेने अज्ञात जातीचा) साप विकत घेतो. तो घेऊन आयर्लंडला जातो, नि हळूच शेतमालकाच्या कोटाच्या खिशात (अर्थात, कोटात शेतमालक नसताना) तो साप सोडून देतो. दुसऱ्या दिवशी जे व्हायचे, तेच होते. शेतमालक कोट चढवतो, नि दिवसाभरात कधीतरी सहज खिशात हात घालतो, नि सर्पदंशाने ताबडतोब मरण पावतो. अर्थात, कोणालाही संशय येत नाही, कारण... देअर आर नो स्नेक्स इन आयर्लंड.

तरीही, पुरावा नष्ट करणे हे कधीही आवश्यक. म्हणून मग आपला कथानायक, शेतमालकाच्या मर्तिकाची धामधूम चालू असताना, हळूच त्या मेलेल्या शेतमालकाच्या खिशातून साप काढून घेतो, नि (त्यास मारून टाकण्याऐवजी) त्यास शांतपणे शेतात सोडून देतो. (आफ्टर ऑल, तो कृतज्ञ असतो, इ.इ.) मात्र, सोडण्यापूर्वी, तो सापास डोक्यावर थोपटतो, नि त्यास उद्देशून म्हणतो, "मित्रा, तू मला खूप मोठी मदत केलीस, त्यामुळे माझा कार्यभाग साधला, त्याबद्दल मी आभारी आहे, ऋणी आहे. तुला आता मी मोकळा सोडतो. मात्र, तुझ्या नशिबी आता मृत्यू येईपर्यंत एकाकी, जोडीदारविहीन जीवन आहे, संततिसुखही तुझ्या नशिबात नाही. कारण... देअर आर नो स्नेक्स इन आयर्लंड!" (किंवा असेच काहीतरी. नक्की शब्द आता आठवत नाहीत. गरजूंनी स्वतः तपासून पाहावेत.)

पण... अहो आश्चर्यम्! तो साप नसतोच मुळी. सापीण असते. आणि, कर्मधर्मसंयोगाने तेव्हा गरोदर असते. थोड्याच वेळात ती (आपल्या कथानायकाच्या अज्ञानात) शेतातच प्रसूत होऊन अंडी घालते, नि शेतात - नि व्यापक आयर्लंडात - पसार होते!

थोडक्यात, टिपिकल चालू (आणि/किंवा अडाणचोट - परंतु फ्रेडरिक फोरसाइथाकडून हे अपेक्षित नव्हते - असो चालायचेच.) पांढऱ्या लेखकाने टिपिकल अडाणचोट पांढऱ्या वाचकवर्गाकरिता लिहिलेली टिपिकल कथा. आता, हिला जर कोणी 'काळ उघडा करणारी' म्हणून जर वाचू लागले, तर मग मात्र कठीण आहे!

अधिक काय लिहावे?

..........

होय, तोच तो, 'द डे ऑफ द जॅकल१अ' वाला.

१अ अतिअवांतर: यावरून आठवले. आम्ही हायस्कुलात असताना पुण्यातील जोशी-अभ्यंकर खून प्रकरण हे चालू घडामोडींत मोडत होते. नुकताच आरोपींचा तपास लागला होता, नि प्रकरण कोर्टात प्रविष्ट होऊ घातले होते. तशातच आमची मराठी माध्यमाची हायस्कूल असल्याकारणाने आमच्यातील अनेकांची इंग्रजीची तोंडओळख ही तुलनेने अलिकडचीच तथा ऑनगोइंग प्रोसेस होती. अशा प्रसंगी, आमचा एक वर्गसन्मित्र jackal या शब्दाचा उच्चार (अर्थात मुद्दाम) 'जक्कल१ब' असा करीत असे, त्याची आठवण झाली.

१ब प्रकरणातील प्रमुख आरोपी तथा माष्टरमाइंडचे आडनाव.

याबद्दल पुन्हा कधीतरी. किंवा, इच्छुकांनी तथा खाजाळूंनी स्वतः गुगलून पाहावे.

ही खोली बोले तो त्याच्या मित्रांची खोली, की तो लंडनमध्ये तात्पुरता जेथे टेकलेला असतो, ती खोली, की उ. आयर्लंडमध्ये तो जेथे राहात असतो, ती खोली, हा तपशील विसरलो. परंतु कोठलीही का असेना, लंडनमधलीच खोली असावी (आयर्लंडमधली नव्हे), हे लॉजिस्टिकली (तथा लॉजिकली) सयुक्तिक वाटते. अर्थात, या लघुकथेत तसेही फारसे लॉजिक नसल्याकारणाने, या मुद्द्यावर अधिक विचार करण्याची फारशी आवश्यकता नाही. उगाच उल्लेख केला, इतकेच.

या पूजेचे जे वर्णन आहे, ते हिंदूच काय, परंतु कोणत्याही धर्माच्या पूजाविधीशी मिळतेजुळते नाही. पण चालायचेच. फोरसाइथ बाबा की जय! सस्पेन्शन ऑफ डिसबिलीफ झिंदाबाद!

नितिन थत्ते Sun, 25/11/2018 - 08:21

In reply to by 'न'वी बाजू

हा जक्कल आमच्या शाळेतील एका बाईंचा सख्खा भाऊ होता अशी कुजबुज तेव्हा ऐकल्याचे स्मरते. त्या बाई अशा काही "मजा म्हणून" मुलांना झोडणे वगैरे प्रकार करत नसत. तेव्हा ती कुजबुज खरी नसूही शकेल.

पिऱ्या मांग Mon, 26/11/2018 - 23:41

In reply to by नितिन थत्ते

या बाईंनी एकदा ऑफ पिरियडला आल्या असताना कुठल्याशा पौराणिक कथेच्या माध्यमातून आम्हाला 'द बर्ड्स अँड द बीज' बद्दल माहिती देण्याचा प्रयत्न केला होता, आणि मग फारच बोलून गेले की काय असं वाटून 'हे सगळं मी तुम्हाला सांगितलं हे घरी सांगू नका बरं' अशी आग्रही विनंती केली होती, एवढंच आठवतंय. कारण त्या आम्हाला कधीच नव्हत्या.

पिऱ्या मांग Sat, 24/11/2018 - 03:10

इसापनीती.
इसवीसनपूर्व समाजातल्या नीतीअनीतीच्या कल्पनांवर हे पुस्तक प्रकाश पाडतंच, पण त्याहीपेक्षा मला ते त्या काळात पशुपक्षी बोलत होते याची नोंद म्हणून जास्त महत्त्वाचं वाटतं.

'न'वी बाजू Sun, 25/11/2018 - 23:23

In reply to by पिऱ्या मांग

मला तर सर्वच पौराणिक कथा (केवळ 'आपल्या'च नव्हे. ग्रीकरोमनयहुदीख्रिस्त्यादींच्यासुद्धा.) या मानवी (तथा पाशवीसुद्धा) पुनरुत्पादनक्रियेतील उत्क्रांत्यात्मक बदलांचे डॉक्युमेंटेशन म्हणून उपयुक्त तथा महत्त्वपूर्ण वाटतात. तूर्तास प्रचलित असलेली लैंगिक पुनरुत्पादनक्रिया ही तुलनेने बरीच अलीकडची असावी. किंवा, जुनी असलीच, तर इतर बहुविध पर्यायी प्रक्रियांबरोबरच अशीच आणखी एक पद्धत म्हणून सहप्रचलित असावी.

कोणाला आकाशातून पक्ष्याने टाकलेले काही खाद्यच खाऊन संतति काय होते, कोणाला कोणाचा चुकून पाण्यात पडलेला घामच गिळून दिवस काय जातात, कोणास कोणाचा केवळ बुभुःकारच ऐकून पावले जड झाल्याची धारणा काय होते (ऑडियो-सेन्सॉरि पुनरुत्पादन?), कोणास दुसऱ्या कोणी केवळ जाणल्यावरच त्या प्रस्तुत जाणकारास यथाकाल अपत्यप्राप्ति घडवून काय देतात (टेलिपथिक पुनरुत्पादन?), तर कोणास केवळ दैवी हस्त(?)क्षेपानेच अनाघ्रातपणीसुद्धा गर्भधारणा काय होते (रिमोट कंट्रोल्ड पुनरुत्पादन?), न् काय न् काय.

मात्र, आजकाल अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पुनरुत्पादनपद्धतींचे दाखले ऐकण्यात येत नाहीत. (अर्थात, तशा पद्धतींनी कोणी करतसुद्धा असेल, तर आम्हांस कशास सांगावयास येईल, ही बाब अलाहिदा. पूर्वीच्या काळी डॉक्युमेंटेशनला महत्त्व होते; खाजगीपणाच्या भंपक कल्पनांपायी नसत्या गोष्टींत गोपनीयता नव्हती. पण अर्थात कालाय तस्मै, इ.इ.) याबाबत आमची थियरी अशी आहे, की मानवाची वानरांपासून उत्क्रांती होत असताना जेणेकरून अवापरामुळे त्याची शेपूट हळूहळू नष्ट होत गेली, इतकी की आजमितीस तिचे नामोनिशाणसुद्धा आढळत नाही, तद्वत, या इतर सर्व पर्यायी मार्गांनी प्रजननक्षमता ही उत्क्रांतीच्या रेट्यात अवापरामुळे हळूहळू लुप्त झाली असावी. आणि म्हणूनच, तूर्तास आहे त्या एकमेव मार्गाविषयीसुद्धा मानवी स्त्रीपुरुषांनी जर औदासीन्य दर्शविले, तर ही उरलीसुरली क्षमतादेखील कदाचित लोप पावेल, अशी भीती वाटते. आणि म्हणूनच, बंधुभगिनींनो, ही उरलीसुरली क्षमता वाया जाऊ देऊ नका, तिचा मनसोक्त नि पुरेपूर वापर करून तिचे संगोपन-संरक्षण-संवर्धन-सं... (Conservationला मराठीत काय शब्द आहे? शिंचा आयत्या वेळी विसरलो. सं-ने सुरू होतो.) ते काय ते करा, असे माझे तुम्हां सर्वांस कळकळीचे आवाहन आहे. मानवजातीचे भवितव्य - नव्हे, अस्तित्वच - तुमच्यावर निर्भर आहे. Do it, for humanity's sake!

..........

ग्रीक पौराणिक कथांबद्दल अगदी वरवरची जरी ओळख असेल, तरी आणखी एक धारणा होते, ती म्हणजे, त्यांच्यात लैंगिक संबंधांबाबत फारसे विधिनिषेध नसावेत. कारण, (वयोमानपरत्वे दगा देत जाणाऱ्या स्मृतीपायी आता तपशील विसरलो, परंतु) कोणीही कोणाबरोबरही संबंध ठेवल्याचे दाखले सर्रास आढळतात. अपवाद फक्त स्वतःच्या वैवाहिक जोडीदाराचा. कदाचित, कोण जाणे, वैवाहिक जोडीदारांनी परस्परांशी संबंध ठेवणे निषिद्ध असावे; त्यांनी बहीणभावासारखे राहाणे अपेक्षित असावे. (बहीणभावांतील संबंधांबाबत काही निषेध असतीलच, याबद्दल निश्चित खात्री नाही - बहुधा नसावेतच (चूभूद्याघ्या) - त्यामुळे उपमा अंमळ चुकलीच, परंतु ते असो.) बरोबरच आहे म्हणा - जगात संबंध ठेवण्यालायक इतके लोक असताना जोडीदाराबरोबरच कशाला ते संबंध ठेवायचे! खास करून विवाहबाह्य संबंध निषिद्ध नसताना! आणि, जगात एक तरी विशुद्ध, निरामय, निष्काम नाते नको काय?

पण म्हणजे, याचा अर्थ, विवाह ही मूलतः लैंगिक संबंध फॅसिलिटेट करणारी संस्था नसून उलटपक्षी लैंगिक संबंधांवर प्रतिबंध आणणारी संस्था असावी, अशी जी आमची जुनीच शंका होती, तिला यातून पुष्टी मिळते. (बोले तो, लैंगिक संबंधांबद्दल विधिनिषेध नसताना फॅसिलिटेशनची मुळात गरजच काय?) गंमत म्हणजे, हे विधिनिषेध नसणे आणि तद्जन्य मुक्तता-स्वातंत्र्य हे कालपरत्वे केवळ ग्रीकांतच नव्हे, तर एकंदरीत दुनियाभरच (मुळात असले तर) लोप पावत गेले; विवाहसंस्थेत मात्र यत्किंचितही फरक पडला नाही - ती पुरातन ग्रीकांच्या जमान्यात होती, तश्शीच आजमितीससुद्धा आहे. (काय करणार?)

असो.

३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 25/11/2018 - 23:50

In reply to by 'न'वी बाजू

लैंगिक शिक्षणाचा आणि मुक्ततेचा भाग म्हणून पोरापोरींना खगोलशास्त्र शिकवावं. खगोलशास्त्र म्हणजे सूर्यमाला कशी तयार झाली आणि ताऱ्यांच्या केंद्रात चालणारं आण्विक फ्यूजन वगैरे नाही; तारकासमूह, त्यांच्या ग्रीक आणि भारतीय कथा वगैरे.

चिमणराव Mon, 26/11/2018 - 12:08

In reply to by 'न'वी बाजू

जवळजवळ लेखच झाला की नबा - >>मला तर सर्वच पौराणिक कथा (केवळ 'आपल्या'च नव्हे. ग्रीकरोमनयहुदीख्रिस्त्यादींच्यासुद्धा.) ~~~>>

सध्या खफवर इसापनिती आली आहे. हत्ती,अस्वल, मांजरे. पाल झोपली आहे.

राही Sun, 25/11/2018 - 08:15

होय. प्राचीन काळी हिंदुस्थानात/ भारतवर्षात/ आर्यावर्तात पशुपक्षी बोलत होते याचा हा सज्जड पुरावा आहे. पुढे पापे वाढली आणि प.प. बोलायचे थांबले. अनेकांची बोलती बंद झाली.
ता. क. : ईसाप म्हणजे मूळ ईशवर. काही काही संस्कृती मुळमुळीत असतात. त्यांना ' अरेतुरेकारे' असा ठणठणीत झणझणीत मर्दानीपणा पेलत नाही. ते ' र' उच्चारतही नाहीत. म्हणून तिथे 'ईशवर''चा 'ईशव' झाला आणि कालांतराने 'ईसप'.

देवदत्त Mon, 26/11/2018 - 00:04

अमुकचे 'स्वातंत्र्य' ही कादंबरी आठवली. आणीबाणीचे थेट संदर्भ असल्यामुळे काळ कोणता हे लगेच कळते.

तसं फास्टर फेणेच्या गोष्टींमधेही पानशेतचं धरण फुटणं वगैरे संदर्भ असल्याने काळ लक्षात येतो.

चिमणराव Mon, 26/11/2018 - 12:13

>>>तारकासमूह, त्यांच्या ग्रीक आणि भारतीय कथा वगैरे.>>

रोहिणीसह २७नक्षत्रे आणि चंद्र ही पौराणिक भारतीय कथा असावी. बाकी कथा बाळशास्त्री जांभेकरांनी जोडल्या ना?

चिंतातुर जंतू Mon, 26/11/2018 - 17:23

महेश एलकुंचवारांचं 'पार्टी' नाटक हे काही माझं आवडतं नाटक नाही. तरीही, ह्या धाग्याच्या अनुषंगानं त्याचा उल्लेख करायला हवा. त्या काळातली नक्षलबारी चळवळ, आदिवासींमध्ये जाऊन काम करण्याची इच्छा असलेले आदर्शवादी तरुण, व्यवस्थेतल्या प्रस्थापितांचा भ्रष्टाचार, गावाकडून मुंबईत आलेल्या माणसाला बावळट ठरवून त्याची चेष्टा करणं, धंदेवाईक कला - कलेसाठी कला - जीवनासाठी कला वगैरे अनेक समकालीन गोष्टी त्यात येतात. मला ते नाटक कालबाह्य आणि बावळट वाटायचं, पण आजही सोशल मीडिआवर, विशेषतः मराठीत जे वाद आणि तेदेखील ज्या हिरिरीनं चालतात ते पाहून नाटक कालबाह्य आणि बावळट नाही; उलट मराठी माणूस अजूनही कालबाह्य आणि तितकाच बावळटसारखं बडबडत बसलाय आणि म्हणून नाटक वास्तवाचा आरसा आहे, असा निष्कर्ष आता काढायला हवा असं वाटतं.

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 26/11/2018 - 20:19

In reply to by चिंतातुर जंतू

मराठीत चालणारे कोणते वाद? विषयांची काही उदाहरणं?

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 26/11/2018 - 20:46

In reply to by आदूबाळ

माझी धाव लता मंगेशकर, गौरी देशपांडे यांच्यापुढे जाईना.

चिंतातुर जंतू Tue, 27/11/2018 - 15:31

In reply to by अस्वल

चौथी नवता म्हणजे काय?

तुम्हाला अडगळीत गेलेले गाडगीळ माहीत नव्हते म्हणून तुम्ही ममव परीक्षेत नापास झालात. आता चौथी नवता पण माहीत नसेल तर मराठी इंटुक परीक्षेतही नाापास झालात. ये क्या हाल बना रक्खा है! कुछ लेते क्यों नही?

चिंतातुर जंतू Tue, 27/11/2018 - 16:20

In reply to by 'न'वी बाजू

मलादेखील अडगळीतले गाडगीळ, चौथी नवता ठाऊक नाही.
सपशेल नापास.

फेल्युअर असण्यातच धन्यता मानायची असते माणसानं. लुळ्यापांगळ्या श्रीमंतीपेक्षा धट्टीकट्टी गरिबी वगैरे...

मारवा Tue, 27/11/2018 - 21:39

In reply to by अस्वल

चौथी नवता म्हणजे श्रीधर तिळवे या नावाने दिव्य मराठीत काही वर्षांपुर्वी एक सदर चालवत होते. त्यात त्यांनी या विषयाच विवेचन केलेलं आहे. अतिशय वेगळ्या पद्धतीची अशी फिलॉसॉफीकल मांडणी /दर्शन आहे /समीक्षा वगैरे वगैरे आहे.. श्रीधर तिळवे हे कवि ही आहेत. ऐसी अक्षरे वर त्यांचे लेख आलेले आहेत. त्यांची एक अतिशय भन्नाट रोचक दिर्घ मुलाखत ऐसीकराने घेतलेली ऐकावयास मिळेल. जुन्या दिव्य मराठीच्या रविवार पुरवणीत सदर मिळेल. त्यांचे एक भाषण झिझेक च्या एंड ऑफ आयडियॉलॉजी या विषयावर मुंबई येथे झालेले पण ऐकावयास मिळेल रोचक आहे
एकदा जरुर ट्राय करा एक वेगळ स्टीम्युलेटींग असं मटेरीयल मिळेल.
त्यांच्या कविता पण काही काही दमदार आहेत एकदम अस्सल

राजु परुळेकरांची एक गमतीदार कमेंट श्रीधर तिळवेंच्या साहित्यावर आहे ती अशी काहीशी आहे की सगळ सगळ सांगुन झाल्यावर जस एखादा कुशल सेल्समन म्हणतो की .................
असो
श्रीधरजींची आवडलेली एक कविता

तीन तास सिनेमा भाड्याने घे
तीन तास टाईम पास कर
एक शरीर प्रेम बुचकळून टाक
एक शरीर एनर्जी पास कर
हजार फूट एसेलवर्ल्ड भाड्याने घे
हजार फूट स्पेस पास कर

जिथे आयुष्यच अवघे रिळासारखे होते पास
तिथे कोण तुला देईल स्थिरस्थावर विश्रांती
उपग्रहांच्या रहाटगाडग्यात कसा फिक्स राहील
तुझ्या करमणुकीचा दोर
कशी थांबवशील ही आयुष्याची भ्रमंती

तू एका ट्रेनमधून दुसऱ्या ट्रेनमध्ये
दुसऱ्या ट्रेनमधून पुन्हा तिसऱ्या
अनुभवत सर्वत्र डिस्पोजेबल गर्दी
शूट करत प्रत्येक स्टेशनवर नवे चेहरे नव्या टपऱ्या

हे विश्वच जिथे टपोरी अनरिवायंडेबल फिल्मसारखे
तिथे तुझ्या डोळ्यांचा कॅमेरा
टिपणार तरी काय
जपणार तरी काय

मुसाफिरा
प्रत्येक शॉटगणिक जिथे तुझा रोल बदलतो
तिथे तुझ्या अस्तित्वात
स्थिरावणार तरी काय
आणि टिकणार तरी काय

ब्लॉग लिंक्
http://shridhartilve.blogspot.com

anant_yaatree Tue, 27/11/2018 - 12:24

अशे कशे तुमी भोळे
(ऐसीवर किती काढले पावसाळे?)
जी कमेंट कुणासही न कळे
तिलाही इथे "मार्मिक" मिळे

हलकल्लोळसिंग हत्ती Tue, 27/11/2018 - 13:39

रविंद्र पिंगे यांच्या पुस्तकातून कोकणातील वातावरण डोळ्यासमोर उभे राहते. तसेच गो.नी.दांची पडघवली मध्ये.

हलकल्लोळसिंग हत्ती Tue, 27/11/2018 - 13:42

एलकुंचवारांच्या वाडा चिरेबंदीमध्ये विदर्भातील पार्श्वभूमी डोळ्यासमोर उभी राहते. फार नाही पण तिथली भाषा, रितीरिवाज यांच्या उल्लेखातून.

आदूबाळ Tue, 01/01/2019 - 15:30

साधारणपणे महिन्याला एक, याप्रमाणे २०१९मध्ये ऐसीवर चालणारी ही मासिक लेखमाला व्हावी अशी योजना आहे.

पहिला लेखांक प्रकाशित झाला आहे : १९२७ पॅरिस | गतशतकातल्या महत्त्वाच्या टप्प्यावरचं हॉटेलजीवन

उज्ज्वला Thu, 03/01/2019 - 14:25

पहिला लेखांक चांगलाच आहे. फक्त त्यावर आलेल्या पहिल्या प्रतिक्रियेप्रमाणेच त्यात आलेलं वातावरणाचं वर्णन स्थानिकपेक्षा सार्वकालिक अधिक आहे व त्या अर्थाने ते कितपत काळ उघडा करणारे लेखन होते असे वाटून गेले. मी बऱ्याच वेगवेगळ्या शब्दांच्या आधारे रेस्टॉरंट्स व हॉटेलबाबतचे फ्रान्समधील कायद्यांचा इतिहास मिळतो का ते पाहिले. पण सध्या लागू असलेले सगळे कायदे याच शतकातले आहेत. एकीकडे मिशलँची तारांकनाची पद्धत सुरु होऊन शंभर वर्षं उलटून गेली आहेत पण साध्या अतारांकित हॉटेल रेस्टॉरंटसना कोणते निकष कधीपासून पाळावे लागतात याची नेमकी माहिती मिळाली नाही.
पुण्यात FDAने ऑक्टोबर २०१८मध्ये वैशाली रुपाली गुडलकसारख्या चांगला लोकाश्रय असलेल्या ठिकाणांना अस्वच्छतेबाबत नोटीस दिली होती.
भटारखान्यांची दृष्टीआडची सृष्टी ही स्वतःच्या नावाने उघड करू न धजणे हे मात्र कालसापेक्ष आहे.

उज्ज्वला Mon, 06/04/2020 - 16:50

लॉकडाऊनच्या काळात हल्ली दूरदर्शन जुनी नाटकं दाखवतंय, किंवा ती पाहायला मी घरी आहे.
आज कानेटकरांचं सूर्याची पिल्ले पाहिलं.
हे नाटकही आता कालबाह्यच झाले आहे. शिवाय त्यातल्या अर्कचित्रात्मक व्यक्तिरेखा फारशा भावत नाहीत. तसल्या प्रकारचा भाबडेपणा आणि दांभिकपणा आता कालबाह्यच झाला आहे त्यामुळे एकूण नाटक कंठाळी आणि कंटाळवाणे वाटते.