भाई : पु. लं.चे चुकीचे व्यक्तिचित्रण

Bhai Marathi Movie Poster

'बालगंधर्वां'पासून सुरू झालेली बायोपिकची कमाल मराठी चित्रपटसृष्टीत गाजत आहे. पैसा आणि समीक्षा दोन्ही निकषांवरही हे चित्रपट बऱ्यापैकी यशस्वी झालेले दिसतात. मात्र, सिनेमाऐवजी 'व्हरायटी एंटरटेनमेंट' असेच या चित्रपटांचे स्वरूप आहे. बालगंधर्व, काशिनाथ घाणेकर, पु. ल. या कलावंतांची लोकप्रियता आणि नॉस्टाल्जिया पाहता प्रेक्षकाला त्यांच्या कलाकृतींचे तुटक-तुटक का होईना दर्शन घडवा आणि गल्ला जमवा असे या चित्रपटांचे स्वरूप आहे. यात निर्माते यशस्वी झालेले दिसतात. नुकताच प्रदर्शित झालेला 'भाई' चित्रपट पु. लं. चे व्यक्तिमत्त्व पोहोचवण्यात पूर्वार्धात बव्हंशी अयशस्वी ठरतो.

पु.लं. ची जडणघडण कशी झाली, लेखक म्हणून ते कसे विस्तारत गेले याचे कुठलेही दर्शन 'भाई' या चित्रपटात घडत नाही. ज्या काळात ते वाढले तो काळ राजकीय, सामाजिक, वैचारिक चळवळींचा होता त्याचा मागमूसही चित्रपटात नाही. अनेकदा हे कोणत्या दशकात घडतेय, ४० की ५० की ६० हे कळत नाही.

चित्रपटाची मांडणी अशी आहे : प्रयाग हॉस्पिटलचा प्रसंग, सुनीताबाईंना पु.लं.चे आप्तमित्र येऊन भेटतात वगैरे. मुळात बायोपिकमध्ये आणि विशेषतः पु.लंं च्या बायोपिकमध्ये पहिली वीसेक मिनिटे या प्रकारे एकेक संबंधितांचा परिचय करून द्यायची गरज नव्हती. बायोपिकचा फायदाच हा असतो की तुम्हाला अनेक गोष्टी गृहीत धरता येतात. पु.लं.च्या आयुष्यात कोणती माणसे होती हे मराठी माणसांना तरी माहीत आहे. मग लहानपणापासूनचा पु. लं.चा हजरजबाबीपणा, त्यांची संगीताबद्दलची ओढ, त्याला उत्तेजन देणारे वडील आणि तक्रार करणारी आई, मग पहिले लग्न, नंतर मग शिक्षकाची नोकरी, अधूनमधून संगीत देणे, कोट्या करणे, हास्य-विनोद करत बोलणे, सुनीताबाईंची गाठ, त्यांचा करारीपणा, दुसरे लग्न त्या लग्नाची भली मोठी गोष्ट, मग सिनेमा इंडस्ट्रीमध्ये प्रवेश, माडगूळकरांबरोबर संगीत, त्यांची चाल देणे वगैरे-वगैरे दाखवत सिनेमा भाईंचे अर्धे जीवन समोर ठेवायचा प्रयत्न करतो. या पुढचा उरलेला अर्धा भाग ८ फेब्रुवारीला प्रसिद्ध होणार आहे.

अर्थात, काही गोष्टींची उत्तरे नव्या भागात मिळतील, असं आपण मानूच. पण तरीही समोर जे काही तिशी, पस्तिशी-चाळिशीपर्यंतचे भाई दिसतात, त्यांच्यात लेखन गुण आहेत. ते सिनेमा, नाटकात अभिनय करतात आणि महाराष्ट्रातील एक लोकप्रिय कलावंत होण्याच्या वाटेवर आहेत. मध्यमवर्गीय मराठी माणसाचे सूक्ष्म निरीक्षण मांडत पु.ल. सतत मध्यमवर्गाच्या वृत्तीवर बोट ठेवत आले आणि मध्यमवर्गालाही ते आवडले. उदा. 'दुपारी साध्या वरणाबरोबर फोडणीचा भात आणि रात्री साध्या भाताबरोबर फोडणीचे वरण' या शब्दांत मध्यमवर्गाचे टिपिकल खाण्याचे वर्णन पु. ल. करतात. 'तुझे आहे तुजपाशी', नाटकातल्या या वाक्याला दाद मिळते, तर असे पु.लं. दोन-अडीच तासांत साकार करणे कठीण होते. म्हणून दिग्दर्शकाने 'टाइम प्लीज' म्हणत दुसरा भागही मागितलाय. पण पहिल्या भागात पु.ल. समोर येतात ते सतत आईबरोबर सर्व थोरामोठ्यांसमोर धूम्रपान करणारे, सतत स्वत: कोट्या करून आपणच त्यावर हसणारे, प्रसंगी त्यामुळे जीभ चावणारे, बावळट ध्यान वाटणारे, संवेदनाशून्य असे.

चित्रपटात त्यांच्या दोन्ही लग्नांवर इतका वेळ घालवलाय की सिनेमाचे नाव 'दोन लग्नांची गोष्ट' ही चालले असते. बरे ज्या पु.लं.नी अजरामर असे विनोद आणि व्यक्तिरेखा दिल्या त्या दाखवून विनोद साधण्याऐवजी चित्रपटात अनेक उसने विनोदी प्रसंग आणि कोट्या आहेत. उदा. 'करीन मी क्षमा', म्हणजे क्षमा या स्त्री पात्राचे काम किंवा बाबासाहेब पुरंदरेंच्या भेटीत विनोद साधण्याचे प्रसंग. रजिस्टर लग्नाचा प्रसंग. पु.लं.चे अन्य विनोद पुरेसे नव्हते काय?

एक प्रसंग असा आहे ज्यात 'अंमलदार'सारखे नाटक पु. लं. एका रात्रीत लिहून काढतात. पण ते नाटक स्वतंत्र नसून रूपांतरित आहे याचा उल्लेख नाही. एका रात्रीत नाटक लिहिणे आणि एका नाटकाचे रूपांतर करणे यात फरक आहे की नाही? आणि शिवाय, 'मी प्रवेश लिहून ठेवला आहे' असे भाईंना सांगावे का लागते? एका रात्रीत प्रवेश लिहिण्यामागचे नाट्य, अस्वस्थता आणि आव्हान चित्रपटात दिग्दर्शक कुठेच एक्स्प्लोर करत नाही. थोडक्यात झाले आहे असे की, ज्या गोष्टीमुळे महाराष्ट्राने भाईंना डोक्यावर घेतले आहे त्या गोष्टी चित्रपटात आढळून येत नाहीत. त्यांची दोन लग्ने किंवा त्यांची इतर कलावंतांशी असलेली मैत्री एवढीच त्यांची ओळख नाही.

चित्रपटाच्या शेवटाकडे कुमार गंधर्व, भीमसेन आणि वसंतराव देशपांडे यांची जुगलबंदी आणि भाईंचे पेटीवादन दाखवले आहे. हे सारे इतके श्रवणीय आहे की, ते पडद्याबाहेरही लोकांना आवडलेच असते. पण पडद्यावर ते दाखवून प्रेक्षकांना सिड्यूस करायची संधी दिग्दर्शकांनी सोडलेली नाही. बरं, वसंतराव देशपांडे सोडले तर इतर दोघांशी मैत्री ही सगळ्यांशी कुठे तरी भेटीगाठी क्रमाक्रमाने झाली असणार त्यालाही चित्रपटात वाव मिळाला नाही. त्यामुळे छोट्या गोष्टींना मोठे महत्त्व आणि मोठ्या गोष्टींना लहानसा भाग अशी काही तरी विभागणी चित्रपटाची झालेली आहे.

सिनेमात कलात्मक स्वातंत्र्य घ्यावेच लागते, पण अंतू बर्वाच्या प्रवेशात अंतू दारू पितोय, असे दाखवून काय साधले गेलेय? तिथे दारूमुळे प्रवेश उंचीवर गेलाय आणि कोकम सरबत दाखवले असते तर प्रसंग पडला असता काय? याच प्रकारे सुनीताबाईंच्या आत्मचरित्रातील पु.लं.नी आणि त्यांच्या बंधूंनी डाळिंब खाण्याचा प्रसंग येथे पुरता बदलून वापरला आहे आणि अगदी ट्रॅजिक करून टाकला आहे.

एखादा लेखक मोठा होतो तेव्हा मित्र, समकालीन, संपादक-समीक्षक यांचे, त्यांच्याशी झालेल्या चर्चेचे त्यात काही योगदान असते. इथे काय तर 'धनुर्धारी'तला तुझा लेख चांगला आहे, असे प्राध्यापक म्हणतात. आटोपला वाङ्मयप्रवास!

नाटकातले पु.ल. दाखवताना चित्रपटात 'एकच प्याला'मधील भगीरथाच्या भूमिकेत पु. ल. दाखवले आहेत. यात पु. लं.ना भूमिका आहे ती केवळ प्रश्न विचारण्याची? हा पु. लं.च्या अभिनयाचा नमुना दाखवणारा प्रवेश आणि त्यातला अभिनय पाहून अभिनय सम्राट चित्तरंजन कोल्हटकर त्यांना भेटायला येतात. हे शक्य आहे, पण पटत नाही. केवळ रेखाटनात्मक म्हणतात तसे हे पु.लं.चे चित्रण आहे. पु. लं.ची भूमिका साकारणारा सागर देशमुखचा अभिनय आणि दिसणे सुसह्य आहे. तेंडुलकर, नेमाडे हे लेखक अन्य भाषिक भारतीयांना माहीत आहेत, त्याप्रमाणे पु.ल. नाहीत. हा चित्रपट पाहून एक विनोदाचा अट्टहास करणारा गमत्या माणूस अशी काहीशी प्रतिमा अन्य भाषिक मंडळींची होऊ शकते. त्या अर्थाने हा चित्रपट पु. लं.चे चुकीचे चित्रण करतो.

सिनेमात नाथा कामत, अंतू बर्वा, रावसाहेब अशा तीन कलाकृती दिसतात. त्याच का, असे न विचारता त्या चित्रपटाला काय देतात हे पाहायचे तर नाथा कामत अगदीच येऊन गायब होतो. अंतू बर्वा शोकात्म वाटतो. रावसाहेब थोडी गंमत आणतात.

चित्रपटात तीनदा, 'विनोद पुरे हां' असे वाक्य येते ही गोष्ट काय दाखवते? हशा येतो तो तळीरामाच्या वाक्यांना आणि 'नाटके करा चांगली', या थेटर कर्मचाऱ्याच्या वाक्यांना. महाराष्ट्राला ज्याने हसायला शिकवले त्याच्या वाट्याला त्यांच्यावरील सिनेमात चार चांगले विनोद येऊ नयेत हे दुर्दैव.

एवढ्या ढोबळपणामुळे तपशिलांची अपेक्षा गैरच ठरते. सुनीताबाईंची खादीची साडी इथे तलम रूप घेते, नाथा कामतची, हिराबाई बडोदेकरांची घाईगर्दीची देहबोली त्या काळात होती का? असे प्रश्न नकोतच. चित्रपटासाठी भरपूर संशोधन केले गेलेय वगैरे दावे आपण ऐकले आहेत, पण ते संशोधन काय होते हा खरेच संशोधनाचा विषय ठरावा.

शशिकांत सावंत
('दिव्य मराठी'मध्ये पूर्वप्रकाशित)

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

बास राव. वैताग आला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

Me Too

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

महेश मांजरेकर उत्तम व्यावसायिक आहेत- संधीचं सोनं करायला त्यांना जमतं.
पुलंच्या जन्मशताब्दीनिमित्त सर्वत्र पुल आहेत, तेव्हा त्यांना जमेल तितकं आणि जमेल तेवढ्या लवकर क्याश करून घ्यायची बेष्ट आयडीया म्हणजे चित्रपट आणि तोही २ भागांत.
पुलभक्त येऊन बघणार, पेप्रात वगैरे श्या घातल्याने बाकीचे लोक कुतुहलाने येऊन "काय ते दारू सिग्रेटी आहे ते बघू तरी" म्हणून बघणार. विन-विन.
.
ट्रेलर पाहिले. मराठीतले सगळे कलाकार घेऊन त्यांना जुन्या कलाकारांची भूमिका द्यायची असा थोडा "ओळखा पाहू" खेळ आहे खरा.
त्यापेक्षा सगळे एकत्र येऊन पुलंच्या वाढदिवसाला "दिवानगी दिवानगी दिवानगी है" असं म्हणून नाचायचं तरी.
.
असो. चित्रपट पाहिला नाही तेव्हा त्यावर नो कॉमेंट्स.
-----
खर तर पुलंवर चित्रपट काढण्यापेक्षा मांजरेकरांवरच चित्रपट काढायला पाहिजे. तेव्हा मांजरेकरांच्या जन्मशताब्दी वर्षात कुणीतरी त्यांच्यावर "सोन चिडिया" नावाचा चित्रपट काढावा अशी माझी मनापासून इच्छा आहे.
संदर्भ- मांजरेकरांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटातलं त्यांनीच गायलेलं हे "सुमधुर" गाणं.

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुलभक्त येऊन बघणार, पेप्रात वगैरे श्या घातल्याने बाकीचे लोक कुतुहलाने येऊन "काय ते दारू सिग्रेटी आहे ते बघू तरी" म्हणून बघणार. विन-विन.>>>> अगदी अगदी मी बी म्हनुनच पघितला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

दोन लग्नं झाली?
फिल्म्स डिविजनच्या त्यांच्यावरच्या पटात ( युट्युबवर आहे) श्रेयस आणि प्रेयस यांचा उल्लेख ते करतात ते कोण? संदर्भ काय) नाव व पैसा? की मुलांची नावं?
सिनेमा पाहिला नाही, मत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दोन लग्नं झाली?

होय. त्रोटक माहितीप्रमाणे, अगोदर एक लग्न (बहुधा आई-वडिलांनी ठरवलेल्या मुलीशी) झाले होते. (अर्धवट आठवणीप्रमाणे, मुलीचे नाव सुंदराबाई दिवाडकर की कायसेसे असल्याचे कोठेसे वाचले होते, परंतु या मुद्द्यावर बिगटाइम चूभूद्याघ्या.) मात्र, ही प्रथमपत्नी लग्नानंतर अल्प कालावधीतच काही आजारामुळे वारली. सुनीताबाई त्यानंतर बहुत काळानंतर भेटल्या असाव्यात. (चूभूद्याघ्या.)

श्रेयस आणि प्रेयस यांचा उल्लेख ते करतात ते कोण? संदर्भ काय) नाव व पैसा? की मुलांची नावं?

पु.लं.ना मुले असल्याचे माहितीत नव्हते. (बहुतकरून नसावीत.) चूभूद्याघ्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रयाग हॉस्पिटलचा प्रसंग, सुनीताबाईंना पु.लं.चे आप्तमित्र येऊन भेटतात वगैरे.

ही नक्की काय भानगड आहे?

याच प्रकारे सुनीताबाईंच्या आत्मचरित्रातील पु.लं.नी आणि त्यांच्या बंधूंनी डाळिंब खाण्याचा प्रसंग येथे पुरता बदलून वापरला आहे आणि अगदी ट्रॅजिक करून टाकला आहे.

हीदेखील नक्की काय भानगड आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुल शेवटच्या आजारात प्रयाग हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले होते ( एक मोठा प्रिंट मीडिया इव्हेंट झाला होता बहुधा) जब्बार पटेल अधिकृत प्रवक्ते असल्यासारखे वावरत असावेत तेव्हा. सगळ्या लोकांना अधिकृत बातम्या तेच देत. जब्बार पटेल . Smile
सिनेमामध्ये तिथे लोकं भेटायला येत आहेत हाच प्रसंग काही काल्पनिक ( व्यक्ती आणि वल्ली मधील) आणि काही खऱ्या ( भा र भि जो) व्यक्तींसोबत दाखवला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फि०युट्युब पट आवडला कारण त्यात सर्व जुने त्यावेळचे फोटो आहेत पार्लेवगैरेचे. फास्ट घटना आहेत ,पावणे दोन तास.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बरेच मुद्दे पटले.

डाळिंब सोलतांना सगळे सोलून झाल्याशिवाय खायचे नाही ह्या सुनीताबाईंच्या अट्टहासापाई इतरांनीच येता जाता दाणे खाऊन टाकले, असा उल्लेख "आहे मनोहर तरी" मध्ये आहे. त्यावेळीच नेमकं गरोदरपणामुळे पोटात काही राहत नव्हतं, आणि त्यात भाईंनी कुठलीच चौकशी केली नाही, किंवा त्या दिवसांमध्ये बायकोच्या तब्येतीकडे दुर्लक्ष केलं, असा अनुभव सुनीताबाईंनी मांडला आहे, हे खरं. पण त्यात डाळिंब प्रसंगात स्वतःच्या अट्टाहासाची प्रांजळ कबुली दिली आहे,आणि भाईंचा "आत्ममग्न" स्वभावही प्रेमळपणे समजून घेतला आहे. "माझी मूळची बंडखोर वृत्ती होती, तरी भाईंचा मुळात समजूतदार स्वभाव असल्यामुळे आमचं जमलं, आणि टिकलं..." हे हि प्रांजळपणे लिहिलंय. पण सिनेमाच्या प्रसंगावरून दोन्ही व्यक्ती एकांगी समोर येतात.

नवरा म्हणून भाई कसे होते हे दाखवलं, पण लेखक म्हणून कसे होते ते कळत नाही. इतकंच काय, त्यांना अंतू/नाथा/रावसाहेब ह्या व्यक्ती प्रत्यक्ष भेटल्या हे दाखवून त्यांच्यातल्या लेखकाचे श्रेय कमीच केले असे वाटते.
सिल्विया प्लाथ आणि एमिली डिकिन्सन वर चरित्रपट झाले, त्यांची ओळख लेखिका म्हणून, लेखिकेच्या भावविश्वातून फार चांगली घडवून आणली असं वाटतं. अर्थात, आपल्याला जितकी पुलं विषयी जास्त माहिती, तितका चित्रपट खटकणार...असं हि असेल. पण ह्या दोन्ही कवयित्रींच्या लेखनाची मी कदाचित पुलंच्या लेखनापेक्षाही जास्त पारायणं केली असतील.

शिवाय, दिग्दर्शकाला संपूर्ण स्वातंत्र्य असतांना त्याने काय नेमके "वेचले" आहे, आणि त्यातून काय संदेश मिळतो, प्रसंगांच्या साखळीतून नेमकं काय दाखवायचं आहे, चित्रपटाचा "टोन" काय आहे, काहीच समजत नाही. दिग्दर्शकाच्या दिशादर्शक दृष्टीकोणाची "चौकट" इथे अगदीच गुळमुळीत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सिनेमा पाहीलेला नाही. प्रतिसाद आवडला. सिल्व्हिया प्लाथ यांच्या कविता वाचलेल्या नाहीत. एकदा पुस्तक चाळून ठेवल्याचे स्मरते. एमिली डिकिन्सन तर न वाचलेली व कविता आवडणारी व्यक्ती दुर्मिळ असावी.
पुस्तक विश्वाच्या पुढील भेटीत प्लाथ नक्की नीट वाचेन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बराचसा सहमत आहे. मुख्यतः हा मुद्दा चित्रपटाचा सगळ्यात मोठा दोष आहे -

पु.लं. ची जडणघडण कशी झाली, लेखक म्हणून ते कसे विस्तारत गेले याचे कुठलेही दर्शन 'भाई' या चित्रपटात घडत नाही. ज्या काळात ते वाढले तो काळ राजकीय, सामाजिक, वैचारिक चळवळींचा होता त्याचा मागमूसही चित्रपटात नाही. अनेकदा हे कोणत्या दशकात घडतेय, ४० की ५० की ६० हे कळत नाही.

तसंच संगोरामांच्या लेखातल्या ह्या मुद्द्याशीही सहमत आहे -

अशा एकेका वाक्याच्या विनोदासाठी एकेक पात्र येतं आणि विनोद होताच निघून जातं. नंतर त्या पात्रांचं आणि पुलंचंही काय होतं, कोण जाणे!

अशा प्रसंगांतून पुलंविषयी त्रोटक माहिती मिळते, पण त्यांच्याविषयीच्या ज्ञानात भर पडत नाही. उदा. मर्ढेकर पुलंना शिकवायला होते, त्यांच्या एका कवितेला पुलंनी चाल लावली ती त्यांना खूप आवडली, अशी माहिती मिळाली. बरं मग? तसंच गदिमा 'नाच रे मोरा'ला चाल लावतायत आणि पुलं त्यात सहभागी आहेत, असं दिसतं. बरं मग? असे एकामागोमाग एक लोक येत राहतात. आणि सगळ्या प्रसंगांत असंच होतं. पुलं हे केवळ पाचकळ विनोद करणारे एक पोरकट इसम होते असा समज होतो. बरं मग मर्ढेकर-गदिमा, मो.ग. रांगणेकर-चित्तरंजन कोल्हटकर, कुमार-भीमसेन अशा वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या लोकांनी त्यांना जर जवळ केलं असेल, तर तो त्यांचाही बावळटपणाच असणार. आणि पुलंना डोक्यावर घेणारा महाराष्ट्रही बावळटच असणार. म्हणजे एकंदरीत उजेडच म्हणायचा. तसा असायलाही हरकत नाही, पण सिनेमात पुलंविषयीच्या किंवा ममव संस्कृतीविषयीच्या गंभीर चिकित्सेलाही अजिबातच जागा नाही.

बाकी ढोबळ तपशीलात तर खूपच चुकारपणा केला आहे. साधी पुलंच्या आईची नऊवारी साडीही नीट दाखवता आलेली नाही. कोरी करकरीत स्टार्च केलेली साडी तिच्या बोंग्यामुळे ममव घरातली वापरातली साडी वाटतच नाही. घरातलं सामान, कपडे, शबनम पिशव्या कोणत्याही गोष्टीवर ती विशिष्ट काळातली वाटावी ह्यासाठी कष्ट घेतलेले नाहीत.

आणि धंद्याचं गणित म्हणावं तर चित्रपट तसा विशेष चाललेलादेखील नसावा. डेक्कन किंवा कोथरुडासारख्या ठिकाणी तिसरा आठवडा आणि प्राइम-टाईम खेळ रिकामे चालले आहेत.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||