रंगमयी...रसमयी बाणाची कादंबरी!!

रंगमयी .... रसमयी बाणाची कादंबरी !!

'बाणाची कादंबरी' व त्यावरील 'रसमयी' या दोन पुस्तकांचे वाचन एक समृद्ध अनुभव होता. बाईंनी या भाषांतरासाठी अहोरात्र ९ वर्ष मेहनत घेतली. ते काम सर्वोत्तम होण्यासाठी हजारो पुस्तकं, संदर्भ ग्रंथ, यापूर्वी इतरांनी यावर लिहिलेलं, त्यांची मतं, लेख, शब्दकोश जे जे शक्य ते ते धुंडाळल्यावर.त्यांचा आवाका किती वाढला असेल. जीवनदृष्टी किती समृद्ध झाली असेल. असे वाटल्यावाचून राहवत नाही. खरं सांगते. यानंतर मी जे जे वाचेल त्याची तुलना माझ्या नकळत या पुस्तकांशी होईल. आता सटर- फटर वाचवलं जाणार नाही.इतकी मी त्याच्यांशी समरस होऊन गेले. बाईंच्या सांगण्याप्रमाणे'' बाणाला तुम्ही स्पर्श केला की त्याच्यात तुम्ही गुंतून पडलात असे समजावे. त्याच्या इतका आव्हाने देणारा, आव्हाने पेलणारा आणि मानवी जीवनाच्या विविध वयातील विविध समस्यांत आपल्याला गुंतवून टाकणारा लेखक विरळा''. हे अगदी खरं आहे.

बाणाच्या कादंबरीत अनेक वर्णनं आहेत. सावरीच्या झाडाचं वर्णन, जांबाली मुनींच्या आश्रमाचे वर्णन, विंध्याटवीच वर्णन, उज्जयिनी नगरीचे वर्णन, राजभवनाचे वर्णन, अंत:पुराचे वर्णन. उपवर कन्या जिथे राहतात ते वर्णन. कादंबरी, महाश्वेता, विलासवती, पत्रलेखा, कादंबरीच्या संख्या, चांडाळ कन्येच्या रूपाचं वर्णन, नगरीतल्या इतर तरुण स्त्रियांचं वर्णन, सूर्योदयाचं वर्णन, दुपारचं वर्णन, तिन्हीसांजेच वर्णन, रात्रीच वर्णन, पावसाळ्याचं वर्णन, पावसाळा संपल्यानंतरच वर्णन, शून्य वनाचं वर्णन, अच्छोद सरोवराचे वर्णन. इतर सरोवरांची वर्णनं, राज्याच्या सैन्यदलाचं वर्णन, अलंकाराचे वर्णन, पुरुष पात्रांचे वर्णन, त्यात राजा तारापीड, शुकनास, पुंडरिक, कपिंजल, वैशंपायन, चंद्रापीड, जाबाली, पोपट मारणारा शबर, चण्डिकेच्या मंदिरातील पुजारी. इतकी सुंदर वर्णनं आहेत. त्यातली एखाद दोन इथे दिली आहेत तर इतर दुसऱ्या लेखात आहेत. सिनेमात कस एक दृश्य जाते दुसरे येते. तशी ही वर्णनं आहेत. आजच्या या डिजिटल युगात आपण याला ' टाईम लॅप्स' म्हणू शकतो. आज सहा शब्दात कविता, गोष्ट सांगण्याच्या काळात ही कादंबरी एक भारूड वाटेल. पण तस नाही. दीर्घ काव्य, दीर्घलेखन लिहायला तो पट रंगवायला लेखणीचं सामर्थ्य लागते. नाव ठेवणं सोप्प आहे. बाण व बाणपूत्र सोडा. आपण दुर्गाबाईंच्याही जवळपास कुठं पोहोचत नाही. (मी हे माझ्या बाबतीत बोलतीय )

माझ्या आयुष्यातली सुरुवातीची २४ वर्ष अजिंठा आणि वेरूळ परिसरात गेली. जे त्या वयात अंगात भिनते, ते आपण घडतो. ते पुढील आयुष्यात काहीसं बाजूला पडेल पण त्याच विस्मरण होणार नाही. कोजागिरी, त्रिपुरारी, होळी पौर्णिमा, वैशाखी पौर्णिमा, अमावास्येच्या घट्ट काळोख्या रात्री, धुवांधार पावसात, कडक उन्हात, मार्गशीर्षाच्या गारठ्यात, लेणी पाहिलीच नाहीत तर अनुभवली. स्पर्श केला. बोलले. हसले. रडले. कळकळीत दुपारी कातळाच्या उबदार गरम स्पर्शाने सुखावले तर गारठ्याच्या शिरशिरीने शहारले. चांदण्या रात्री वाऱ्याच्या झुळुकीबरोबर येणाऱ्या अगणित गंधात नाहताना ताऱ्या - नक्षत्रांची शोभा उघड्या डोळ्यात साठवली आहे. आजही भर गर्दीत डोळे मिटले की मनाने लेण्यात पोहोचलेली असते. कैलासाच्या गवाक्षातून दिसणारा सूर्यास्त, वडाच्या झाडाच्या नक्षीतून दिसणारे गाव, घरं, मैलोनमैल पसरलेली रानं आणि येळगंगेच्या तटेवरचा ध्यानस्थ घृष्णेश्वर. पावसाच्या पाण्याने तुडूंब भरलेली पाण्याची टाकी, शेवाळं आलेलं काळेशार पाणी, टाक्याच्या खोल पायऱ्या, आणि त्यातल्या काळ्यामिट्ट बेंडक्या, मधाची मोठं मोठी पोळी, हळुवार झिरपत, ठिपकत असलेली पाण्याची धार, नाहीतर अफूट छताला चिटकलेले थेंब, वस्ती नसलेला कुबट, कोंदट वास. हे सगळं लेणी पुराण सांगायचं कारण, बाणाच्या कादंबरीचा काळ व अंजिठा लेण्याच्या निर्मितीचा काळ एकच. त्यामुळे ही कादंबरी वाचताना मी एका लेण्यांतून दुसऱ्या लेण्यात प्रवेश करत होते.

अंजिठ्याची लेण्यातील रंगीत चित्रं ,वेरूळच्या लेण्यातील १ते १६ मधली औरंगजेबाच्या उद्धवस्तातून वाचलेली काही चित्रं, सुतार झोपडीतला मृदूंगाचा नाद, घरातली खूप रंगीबिरंगी काचेची झुंबरं, दिव्याच्या प्रकाशात झुलणाऱ्या हंड्या, पोथ्या, पुराणातली रंगीत चित्रं, पाल्हाळीत रंगवून ऐकलेल्या गोष्टी. गेरूने काढलेली चित्रं. कुंकुवाच्या नागाच्या वेटोळ्या रांगोळ्या, जन्माष्टमीचे मातीचे गोकुळ, पोळ्याचे बैल, मातीचे गणपती. येळगंगेच्या पात्रातल्या वाळूच्या हरतालिका, दसऱ्याचा शेणातला रावण. कळत नकळत रंगकला मनात झिरपत राहिली. आजूबाजूचं गच्च जंगल, तऱ्हे तऱ्हेची रानफुलं.नदी. स्वच्छ हवा. थंडगार बिन पंख्याची माळवदं. एक नजर आली. मग मुलाचं १२ वर्षाचं चित्रकलेचं शिक्षण.

कादंबरीत केलेला रंगाचा वापर

रंग वेडा बाण अनेक रंगानी भरलेली पिचकारी घेऊन रंगपंचमीचा खेळ संपूर्ण कादंबरीत खेळतो. त्याच्या प्रकाशाच्या आवडीमुळे ते आले आहे आणि सूर्यप्रकाश हे सगळ्याचे मूळ. प्रभात, दुपार, तिन्हीसांज आणि रात्रीच्या सगळ्या रंगात तो लाल रंगाचा मुबलक वापर करतो. तिन्हीसांजेच्या ज्या विविध छटा तो रंगवतो. त्याला तोड नाही. बाईंना बाणाची रंगाबद्दलची ओढ जाणवली. तशीच ती रंगवृष्टी रवींद्रनाथांनी गौरवली आहे. लाल रंग बाणाला फार प्रिय. पाटल, पद्मराग, अरुण, लोहित, मंजिष्ठ, पिंजर, आरक्त, कपिश, इतक्या लाल रंगाच्या छटांचा वापर करतो. (पिंजर - कुंकू ) हा शब्द बाणानेच प्रथम वापरला आहे. रंगाचे उपजत भान हा बाणाच्या वृत्तीचा एक भाग होता. सातव्या शतकात त्याने समृद्ध भारत पहिला होता. वयाच्या १४ व्या वर्षापासून तो बाहेर फिरत होता वेगवेगळ्या क्षेत्रातली त्याची मित्र मंडळी होती (त्याचे सविस्तर वर्णन मी दुसऱ्या लेखात दिले आहे. ) रंगाच्या विविध छटांची उधळण त्यानं दिवसाच्या प्रत्येक प्रहराकरीता केली आहे ती इथं दीर्घ स्वरूपात कादंबरीत जशी आहे तशी दिली आहेत

प्रभात वर्णन :- पहाटेच्या लालीने आकाश रंगलं होतं. कमलिनींच्या मधाने लालसर झालेल्या वृद्ध हंसाप्रमाणे तांबूस चंद्र आकाशगंगेचा तट सोडून पश्चिमसागराच्या किनाऱ्यावर उतरत होता. दिशा फाकत होत्या. सारं आकाश सारं क्षितिज पूर्ण वाढलेल्या हरणाच्या केसांप्रमाणे फिकट पिवळं झालं होतं. हत्तीच्या रक्ताने लाल झालेल्या सिहांच्या पिंगट आयाळी सारखी सूर्यकिरणं प्रथम दिसत होती. मग ती तापलेल्या लाखेच्या तंतूसारखी लाल झाली आणि लांबत गेली. मग माणकांच्या सळ्यांचा झाडूच होऊन त्यांनी आकाशाच्या फरशीवरती रचून ठेवलेल्या तारा - पुष्पांच्या राशी झाडून टाकल्या. त्या वेळी उत्तरेकडचे नक्षत्ररुपी सप्तर्षिमंडळ संध्या - उपासनेसाठी मानस सरोवराच्या काठी उतरलं. पश्चिम समुद्राची पुळण प्रात : काळी पांढरी झाली होती. तिच्यावरती उकललेल्या शिंपल्यातले मोती विखुरल्यामुळे ती फार शोभिवंत दिसत होती; जणू काही सूर्याने आपल्या किरणांना आकाश झाडून खाली लोटल्यामुळे त्या ठिकाणी ताऱ्यांचाच खच पडला होता.

वनातल्या वृक्षातून दवबिंदू खाली ओघळत होते. वनात निजलेले मोर जागे झाले. सिंह जांभया देऊ लागले. हत्तीणी मद आलेल्या हत्तींना जागे करू लागल्या आणि सार वन तुंडुंब केसरानी भरून फुललेल्या फुलांच्या ओंजळी भरून आपल्या पल्लवांत घेऊन उदयगिरीवर उभ्या असलेल्या सूर्याला अंजली अर्पण करू लागलं. गाढवाच्या केसासारख्या धूसर अशा तपोवनातल्या अग्निहोत्रातुन निघालेल्या धुराच्या रेषा झाडांच्या शेंड्याना भिडल्या. तेव्हा वनदेवींच्या प्रासादाच्या शिखरावर पारव्यांची रांगच बसली आहे असं वाटलं.

तिन्ही सांजेच वर्णन :- (१)सूर्य पश्चिम समुद्रात जाऊन पडला. त्या वेळी त्याच्या पडण्याच्या वेगाने वर उडालेले पाण्याचे शिंतोडे आकाशातले तारे झाले. आकाशातून उतरणाऱ्या दिनलक्ष्मीच्या पायातलं माणकांचं नुपूर गळून पडावं आणि त्यांचं मधलं छिद्र त्याच्याच लाल प्रभेने भरून जावं त्याप्रमाणे आपल्यावर फेकलेल्या किरणांपासून दूर झालेलं सूर्यबिंब आकाशातून खाली उतरलं आणि आकाशाच्या विरहाच्या दु :खाने आर्त स्वर काढीत पाखरांचे घोळके घरट्याकडे धाव घेऊ लागले. (२) दिवस लांबल्यामुळे रोषाने लाल झालेल्या कामिनीच्या दृष्टीमुळे आकाशही तांबूस होऊ लागले. वृद्ध हिरव्या पारव्याप्रमाणे हिरवे घोडे असलेल्या सूर्याने आपला प्रकाश आवरून घेतला. सूर्याच्या विरहाने मिटलेल्या कमळांची पद्मवनं हिरवळली, कुमुदवन शुभ्रावली, दिशांची मुखं लालावली. निशामुख निळावलं. दिनलक्ष्मीशी फिरून आपला संयोग होईल या आशेने अनुरागाने आणि लालिमेने रंगलेल्या आपल्या किरणासमवेत भगवान सूर्य हळू हळू दिसेनासा झाला. तत्काळ कादंबरीच्या अनुरागाच्या उचंबळल्या सागरासारख्या लालेलाल सांध्यरंगाचा पूर समस्त जिवलोकावर लोटला. (३)स्नान करून वर आलेल्या मुनींनी सूर्याला अर्ध्य देण्याचा विधी करतेवेळी जो रक्तचंदनाचा अंगरंग पृथ्वीवर दिला साक्षात तोच अंगरंग रविराजाने पृथ्वीवरुन आकाशात उचलून घेतला आणि आपल्या अंगाला लावल्यामुळे तो तांबडालाल झाला.

रात्रीचं वर्णन :- संध्या लुप्त झाल्यानंतर तिच्या विनाशामुळे दु :खी झालेल्या रात्रीने अंधाराचं जणू काळं मृगचर्मच आपल्याभोवती लपेटून घेतलं.दिवस सरत आला. पिकलेल्या प्रियंगुच्या (चारोळी ) मंजिरीच्या रेणूंच्या पिंजरीने रंगून लालभडक झालेलं सूर्यबिंब आकाशात लोंबकळू लागलं. कुसूंभ्याच्या फुलांच्या दाट लाल रंगाने रंगलेल्या नाजुकशा तलम रेशमी वस्त्रासारख्या अस्तकालीन उन्हाने आता साऱ्या दिशा सोडायला आरंभ केला. चकोर पक्षाच्या डोळ्यातल्या बुबुळासारखी लाल पिंगी कांती असणाऱ्या पिंगट रंगाने सारं आकाश भरून टाकलं. आकाशातली निळाई कुठल्या कुठं नाहीशी झाली. रानरेड्यासारख्या काळ्या कुळकुळीत रंगरूपाचा रात्रीचा अंधार तारांगणाच्या अंतरिक्षाचा अफाट विस्ताराचा काळोख भरून संकोच करीत होता. दाट काळोखाने हिरवा रंग झाकून टाकल्याने झाडांच्या रांगा आणखीच गर्द झाल्या होत्या. रात्रीच्या दवबिंदूच्या जाळीमुळ थंडगार नि जड झालेला, वेली झाडं यांच्या झाड्या हलवणारा वारा वाहू लागला. रानफुलांच्या घमघमाटामुळे अवघा आसमंत दरवळून निघाला आणि रात्रीच्या पहिल्या प्रहारातच पक्षी गाढ झोपी गेले. अजून एका ठिकाणी रात्रीच्या वर्णनात त्याने काय लिहिलं आहे ते "दाट भस्माच्या उटीने पांढरा झालेला नी मृगाजिनाने अर्थ झाकलेला अंबिकेचा जणू डावा स्तनच असा तो धूर्जटी शिवाच्या जटेतला चुडामणी तारकापती भगवान चंद्रमा आकाशात उगवला’’.

बाणाला जसा सूर्यप्रकाश प्रिय होता तशीच कमळें ही प्रिय होती. लाल, पांढरी, निळी, गुलाबी व सोनेरी कमळे त्यानं रंगविली आहे. लाल रंगाच्या केशरी, गुलाबी, शेंदरी, किरमिजी रक्तासारख्या लाल भडक वगैरे सर्व छटा कादंबरीत येतात. दुर्गाबाईंनी ' रसमयी' या स्वतंत्र पुस्तकात दोन प्रकरणे रंगावर व प्रतिबिंबावर चितारली आहेत.(त्यातला काही भाग इथे देत आहे ).

१. उज्जयिनी नगरीत सूर्याचे किरण मोठे शोभिवंत विविध प्रकारचे दिसतात. शेंदरी फरशीवर पडले की ते जणू साध्य रंगासारखे लालभडक दिसतात. पाचूच्या चबुतऱ्यावर किंवा वेदिकांवर पडले की ते कमळ वेलीवर लोळल्यासारखे वाटतात. वैडूर्य मण्यांच्या भूमीवर पडले की ते आकाशबाहेर फैलावल्यावर वाटतात.काळया आगरुच्या धुऱ्याच्या वेटोळ्यावर पडले की ते अंधाराचे कवच भेदायला निघालेल्यासारखे वाटतात. सुबक, घाटदार नारींच्या मुखावर पडले की ते फुलत्या कमळांना चुंबत आहेत असे वाटते. स्फटीकाच्या भिंतीच्या प्रभेमुळे ते जणू पहाट - चांदण्याच्या गाभ्यातूनच बाहेर पडलेले वाटतात. पांढऱ्या पताकांच्या रेशमी वस्त्रावर पडले की ते जणू पल्लवित होतात. नीलमण्यांच्या वातायनाच्या विवरात ते शिरले की जणू ते सूर्य किरण राहूच्या मुखाच्या गुहेत शिरल्यासारखे भासतात.

२. त्या म्हताऱ्या भिल्लाने अजून उडण्याचं त्राण आले नाही अशा पोपटाच्या पिल्लांना फांद्याच्या फटीतून आणि घरट्यातून ओढून काढून जणू ती सावरीची फळंच आहेत अशी पकडू लागला. त्यांच्यातल्या काही पिलांना जन्मून इतके थोडे दिवस झाले होते की त्यांच्या अंगावरच्या गर्भाची लाली ओसरलीही नव्हती; आणि ती सावरीच्या लाल फुलांसारखी दिसत होती. काही पिलांना नुकतेच पार फुटू लागल्यामुळे ती काळाच्या नव्या दलाप्रमाणे दिसत होती: तर काही पिलं रुईच्या फळासारखी दिसत होती. काहींच्या चोचीची टोकं नुकतीच लालवटू लागल्यामुळे ती किंचित उमललेल्या कमळांच्या कळ्यांच्या पाकळ्यांच्या टोकासारखी गुलाबी दिसत होती. काहींची डोकी नुसती कापत होती.

३. दिग्विजयाच्या वेळी चंद्रापीडाला सर्व दिशा आपल्या प्रतापाच्या अग्नीने लाल झाल्या सारख्या वाटतात. सगळी पृथ्वी लाल रंगात न्हाहून निघाली आहे. लक्ष्मीच्या पावलांच्या अळत्याने तांबूस झाले होते.

४. पत्रलेखेचे किरमिजी अवगुंठन.

५. माणकांच्या आसनाच्या कांतीमुळे शूद्रक राजाच्या मांड्या लाल रक्तासारख्या दिसत होत्या. तांबड्या रंगाचे छत.

६. अळता लावलेली चांडाळकन्येची पावलं पल्लवांसारखी लाल दिसत होती.

७. पंपा सरोवरातली मंजिष्ठ रंगाची सुवर्ण किरणे.

८. ताडाच्या फळासारखी शाक्य भिक्षुणीची भगवी वस्त्रे.

९. केरळ कामिनीचे गुलाबी गाल.

१०. दिवसभर इथे तिथे हिंडून डोळे लाल झालेल्या आश्रमात परतणाऱ्या गाईप्रमाणे कपिल किंवा तांबडी संध्याकाळ

११. क्षिप्रा नदीच्या पाण्यात हत्ती उतरले की त्यांच्या कुंभावरच्या शेंदराने नदीचे पाणी संध्येसारखे लाल व्हायचे

१२. कदंबाच्या फुलाचा लाल रंग, त्याच्या रोमांचासारखे केशर यांचा सुंदर वापर बाणाने महाश्वेता - पुंडरिक यांच्या प्रथमस्पर्शावेळी केला. चण्डिकेच्या गळ्यातली कदंबाच्या फुलांची माळ मरणाचा, रक्ताचा अशुभ रंग धारण करणारी भीषण अशी बाणाने दाखवली आहे.

पांढरा रंग

पांढऱ्या रंगाला बाण अमृताचा वा चुन्याच्या रंगाची उपमा देतो. गोऱ्या रंगाला तो चंद्राच्या कांतीची उपमा देतो. ज्योत्स्नेच्या पांढऱ्या रंगाचे उदाहरण देताना तो म्हणतो : महाश्वेता चांदण्या रात्री भेटायला निघाली तेव्हा'' चांदण्या रात्री जग हस्तिदंतातुन कोरले होते ''. म्हातारपणात देखील असे काही मोजकेच पुण्यवान महाभाग असतात की केसांच्या पांढरेपणा बरोबरच त्यांच्या आचरणाचा शुभ्रपणाही वाढत जातो. विंध्याटवीतल्या उत्तुंग वृक्षाच्या अग्रावर असलेल्या फुलांच्या घोसांची शुभ्रता आणि त्यांची चमकत्या ताऱ्याशी तुलना त्यानेच करावी. ज्योत्स्नेची प्रसन्नधवल प्रभाही तो रंगवून सांगतो. श्वेत कमळं बाणांला प्रिय होती. नायिका कादंबरीचे सौन्दर्य सुधांशुभ्र, सुधेप्रमाणे मधुर पण कदंबाच्या सुरेप्रमाणे कादंबरीप्रमाणे उन्मादक होते. म्हणून तर तिचे नाव कादंबरी.

निळा रंग

शूद्रक राजाचे पादपीठ नीलमण्यांचे होते. त्याच्यावर पाय ठेवल्यामुळे त्याची नखे काळी दिसत होती. महाश्वेतेने पुंडरिकाला भेटायला जाताना निळे अवगुंठन घेतले होते. निळ्या कमळाच्या झुबक्यात निळी पाणपाखरे लपल्यासारखी झाली होती. मातंग कन्या- लक्ष्मी- निसार उज्जल वर्णाची असते. महाश्वेतेचे उत्तरीय निळे असते. कृष्णवर्ण निळ्या रंगाबरोबर केश संभारात आढळून येतो.

पिवळा रंग

पिवळ्या रंगाला तो चाफ्याच्या फुलांचा, गोरोचनाचा व हळदीचा रंग म्हणतो

काळा रंग

चंद्रापिडाच्या सम्श्रुचा (मिशीचा) रंग काळा रंग सुंदर होता असे बाण म्हणतो. पण बाणपुत्र मात्र त्या कृष्ण वर्णाला ' सम्श्रुराग' असे म्हणतो.

हिरवा रंग

पोपटाचा, पानाचा रंग बाणाला फार प्रिय आहे. जसे सूर्याच्या हिरव्या रंगाच्या घोड्यांच्या प्रभेनेच आकाश हिरवळलं आहे.

कादंबरीत ' पाटल' रंग वारंवार येतो. ' पाटल' म्हणजे 'श्वेतरक्त' उर्फ गुळाची रंग. फिक्या गुलाबी रंगाच्या छटेपासून ते लाल शेंदरी, तांबडा, सगळ्या त्याच्यात सामावतात. देवीचे वस्त्र ' पाटल' असते. सरस्वतीची जुनी चित्रे, त्याची काही वर्णन.

१. सूर्य मावळतो आहे त्याचा लाला रंग होता तो हळू हळू ' पाटल' होत जात आहे. .

२. भिल्ल राजपुत्राच्या एका कानातल्या पाटल रंगाची छटा ज्या पर्णशय्येवर तो डाव्या कुशीवर पहुडला होता, तिच्या पल्लवांवर पडली होती.

३. पोपटाच्या चोची लाला कशा तर हरीण फाडणाऱ्या वाघाची नखे हरिणाच्या रक्ताने लाला होतात तशा. हरिणे जया वाटेने जायची त्या वाटेवरचा पाचोळा त्यांच्या रक्ताचे थेंब पडून लाल पाटल झाला होता. सिंह ज्या मार्गावरून जातो तो मार्ग त्याच्या नखांच्या प्रतापामुळे 'रुधिर पाटल' झाला आहे. हरिणाची काळरात्र यायच्यापूर्वी येणाऱ्या रक्ताने ओल्या झालेल्याच संध्येप्रमाणे 'आपाटल' असणाऱ्या आपल्या नजरेने तो भिल्लकुमार पाहून लागला. एक वुद्ध शबर रक्त बिंदूप्रमाणे पाटल असणाऱ्या दृष्टीने पाहत होता. शिकारी कुत्र्याच्या जिभा त्यांच्या स्वाभाविक पाटलत्यामुळे, त्या कोरड्या होत होत्या तरी त्यांच्यातून जे घामाचे थेंब गल्त होते ते हरिणाच्या रक्ताच्या थेंबासारखे वाटत होते.

४. पोपटांच्या पिलांच्या थोड्याशा उघडलेल्या पाटलरंगाच्या चोचींना उमलू लागलेल्या कमळांची शोभा आली होती. जाबाली ऋषींच्या आश्रमात नुकत्याच झाडावरून काढून आणलेल्या वल्कलांच्या रसाने जमीन पाटल झाली होती. शूद्रक राजाच्या वाड्यात वैशंपायन पोपटाला जांभळाचा रस प्यायला देतात त्याचं वर्णन नील पाटल.

५. पारव्याच्या पायांप्रमाणे पाटलरंगाचा सूर्य क्षितिजावरून खाली गेला. संध्या ही पोवळ्याच्या वेलीप्रमाणे पाटल रंगाची आहे.

६. संध्याकाळचे ऊन शेंदराच्या रेणूंसारखे पाटल आहे. महाश्वेतेचा आधार यौवनाच्या रंगामुळे पाटल झाला आहे. पुंडरिकाच्या कांतीचे वर्णन ' चकोराच्या लोचनांप्रमाणे पाटल'संध्या सूर्याची किरणे गेरूच्या डोंगरातल्या सलिलप्रमाणे पाटल होती. प्रियंगुच्या मंजिरीप्रमाणे अस्तसमयी रविबिंब पिंजरेसारखे पाटल आहे.

७. विश्वनाथ कविराज या बाराव्या शतकातील साहित्य दर्पणाच्या कर्त्याने सांगितले की " पांढऱ्या वस्त्राची शोभा त्यात थोडा भगवा रंग मिसळला तर किती तरी वाढते. ''

पाटल नावाचा वृक्ष होता. पण संपूर्ण कादंबरीत त्याचा उल्लेख नाही. हे दुर्गाबाईंचं मत आहे. त्या पुढं असही म्हणतात की अनेक नखरेल छटांचा पाटल रंग बाणानंतर कविसंवेदनेतून अंतर्धान पावल्यासारखा झाला. पाटलीपुत्राच्या अस्तानंतर पाटलीचे झाडही आमच्या सवेंदनातून करवंडले.... राहिले फक्त जुन्या ठेवणीच्या कवित्वात. म्हटले तर हे वाङ्मय जिवंत , नाहीतर मेलेले.

कपोत रंग (कबुतरी रंग)

कादंबरीत अजून एका रंगाचा उल्लेख झाला आहे तो राजपुत्र चंद्रापीडाच्या विरहव्यथेचं व त्याच्या अंतसमयीच वर्णन करतो: कपोत रंग (कबुतरी रंग) पावसाळी वातावरणाचा कुंदपणा, धूसर छाया, धूसर रंग हा साहित्याच्या दंडकाप्रमाणे कबुतराचा रंग. कबुतर हे शनिदेवतेच वाहन. म्हणजे आप्पतीचं. तसेच ते मृत्यूचे पाखरू.यम हा रंगाचा स्वामी. विरहाचा करूण परिपाक. बाणपुत्राने चंद्रापीडाच्या यात्रेच्या- अखेरच्या प्रसंगी जो रंग सूचित केला आहे, त्याचे नाव ही घेतले नाही. पण पावसाळी धूसर वातावरण निर्माण करताना मरणसूचक कपोत - वर्ण, कबुतरी रंग त्याने दाखवला आहे. त्यालाच इंग्रजीत ग्रे किंवा दगडी रंग म्हणतात.

प्रतिबिंबाचा खेळ

बाणाला प्रकाशाच्या ओढीमुळे पारदर्शकपणाचे सुंदर भान आहे. लखलखीत नितळपणा,आरशातले, लखलखीत फारशीतले, स्त्रीपुरुषांच्या कांतिमान अवयवात पडलेले प्रतिबिंब किती ठिकाणी दर्शविले आहे.

१. शूद्रक राजाचे राजपुत्र मित्र त्याची प्रतिंबीब होती.

२. राजसभेत बसलेल्या राजांच्या रत्नाच्या चुडामणीत प्रतिहराचे प्रतिबिंब

३. शूद्रक राजाचे प्रतिबिंब रत्नांच्या फरशीत पडले आहे.

४. चंद्रकांत मण्यांच्या आरशात कादंबरीचे प्रतिबिंब

५. विश्वासू सेवक स्वामींच्या चिंतारूपी आरशात स्वतःचे प्रतिंबीब पाहतात.

६. कादंबरीच्या डोळ्यांत पुष्करिणीच्या जळातलं प्रतिंबीब लाल कमळासारखे

७. रत्नांच्या खांबात कादंबरीची शेकडो प्रतिबिंबे

८. बोटांच्या नखात रत्नकुंडलाचे प्रितबिंब

९. कादंबरीच्या स्तनमंडलातले चंद्रापीडाचे प्रतिबिंब मावळते; कारण ते तिच्या सखीच्या गालात उमटलेले असते.

१०. चंद्रापीडाचे चुंबन त्याची आई विलासवती घेते, त्यावेळी तिच्या गटात उमटलेले त्याचे प्रतिबिंब

११. तरलिका म्हंजते, महाश्वेतेच्या गालांचं हे आपलं प्रतिबिंबचा आहे असे समजून चंद्र चुंबन घेतो.

१२. विलासवतीच्या मुखाचे आरशात प्रतिबिंब पडले तेव्हा सूर्य मंडलात चंद्रबिंब शिरलेल्या लक्ष्मीसारखी ती दिसत होती.

१३. अच्छोद सरोवरात वने, पर्वत, नक्षत्रे ही प्रतिबिंबे

१४. चंद्राचे प्रतिबिंब सरोवरात पडावे त्याप्रमाणे गर्भाने विलासवतीत प्रवेश केला. गर्भाच्या मिषाने दर्पण लक्ष्मीप्रमाणे तारापीड राजाचे प्रतिबिंब ती वाहत होती.

१५. उज्जयिनी नगरीत चंद्राचे प्रतिबिंब पडत. चंद्र कामाग्नीमुळे तापतो नि चंदन शिंपल्यामुले शीतल झालेल्या मणिमय फरशीत लोळतो असे वाटते.

१६. तारापीड म्हणतो लहान बाळ लुटूलुटू चालताना त्याचं फरशीत पडलेलं प्रतिबिंब मी कधी पाहीन.

१७. कादंबरीची प्रतिबिंबे म्हणजे शेकडो लक्ष्म्याच

१७. महाश्वेतेचं प्रतिबिंब शंकराच्या सफ्टीकाच्या लिंगात पडते; जणू ती त्याच्या हृदयातच प्रविष्ट झाली होती.

१८. चंद्रापीडाचे प्रतिबिंब आपल्या पायाच्या नखात पडेल या भीतीने हिमगृहातल्या दासी बाजूला झाल्या.

१९. कादंबरीच्या स्तनावर ढळत्या चवऱ्यांचे प्रतिबिंब पडले होते.

२०. कादंबरीच्या स्तनांवर प्रतिबिंबित झालेले तिचे मुख जणू तिच्याकडेच बघत होते.

कादंबरीच्या सुरुवातीला बाईंनी दिलेल्या व्याख्यानाची प्रस्तावना आहे. त्यात बाई म्हणतात. रंगलाघवात व प्रतिबिंबचित्रणात बाणाची गती होती., तशीच रंगगोपनाचे, निसर्गाच्या लीलेचे भानही त्याला होते. अच्छोद सरोवरात निळी कमळे होती. त्या नीलकमलवनात निळे पाणपक्षी लुप्त झाल्यासारखे वाटायचे. रंग लाघवामुळे आणि प्रतिबिंबसृष्टीच्या निर्मितीमुळे, वृक्ष, स्थळे, तळी, पक्षी, प्राणी त्याचप्रमाणे मानवी व्यक्तींच्या चित्रीकरणात बाणाला यश प्राप्त झाले आहे. म्हणूनच बाणाची प्रतिभा चित्रग्राहिणी आहे असे रवींद्रनाथ म्हणतात. रंगावर बाणाची केवळ प्रीती होती असे नव्हे ; तो केवळ रुचीविशेष नव्हता. रंगविलोकता हा बाणाचा आंतरिक भाववेषच होता. त्याच्या अंतराशक्ती बाह्य रंगरूपात संक्रमित करणे फार दुर्मिळ आहे. रंगाचा खेळ हा बाणाच्या वृत्तीचाच खेळ होता. हा अंतर्बंध रंगात, रेषेत आणि शब्दात आविर्भूत होतो.

डाँ. भट म्हणतात '' बाण हा जागरूक कलावंतही आहे. शब्द कणांचा खच पाडताना तेच ते नाणे पुन्हा पुन्हा न फेकण्याचे चातुर्य बाण जसे दाखवतो तसे त्या नाण्याचे रंगरूप व नाद याकडेही बाणाचे पुरेपूर लक्ष असते. रंगरूप आणि नाद वैभव आणि माधुर्य बाणाच्या शैलीत दिमाखाने मिरवीत असते.

एखाद्या गोष्टीचं, निसर्गाचं वर्णन करताना तीचं रजस्वला स्त्री सारखी सुंदर आहे असे यापूर्वी कधीही वाचनात आले नाही. पाळीची हजारो लाखो वर्णनं त्या नकोशा दिवसात अशा सुरुवातीपासून सुरु होतात. अमंगळ, विटाळ, शिवाशिव, त्याचे त्रास, आधुनिक काळात नॅपकिन्स, त्यांची वाढत चाललेली घाण, या सगळ्या पार्श्वभूमीवर आकाश धरणी आणि पर्वत रजस्वला स्त्री सारखे सुंदर होते हे खरंच अलौकिक प्रतिभेचं लक्षण आहे. आणि ते ही सातव्या शतकात आणि आज २०१६ त आपण काय करत आहोत. ' रजस्वला' हा शब्द तीन ठिकाणी आला आहे पण कुठेही अश्लील वाटत नाही. बाई म्हणतात आकाशाला भिडलेले, धवल पुष्पांनी खच्चून भरलेले वृक्षवितान विंध्यपरिसरात मी पहिले आहेत. नर्मदा, शोण, आणि क्षिप्रा यांच्या वनविभागात हिंडताना तो समग्र परिसर लाल फुलांनी लाल रंगाने रंगलेला मी पहिला आहे.लाल - पिवळ्या रेणूंनी- रजांनी सारी भुई झाकून गेलेली मी पाहिली आहे. त्याचा शब्द मला बोचत नाही. श्लेशाचे कौतुक वाटते. पिवळ्या फुलांच्या बहराचे बाण- आकाश धरणी यांच्यातल्या प्रकाश मंडळाचे चित्रण आपल्यापुढं उभे करतो. रजस्वला स्त्रीला त्याने पुष्पवती होणे असे संबोधले आहे. खरंच रजस्वला स्त्री किती सुंदर दिसते. द्रौपदिला जेव्हा राजसभेत आणलं तेव्हा ही ती रजस्वला होती. नुकतीच न्हाऊन निघाली होती. तिच्या त्या दिसण्याचं वर्णन मी एका पुराण सांगणाऱ्या ब्राह्मणाकडून ऐकलं होतं. नंतरची वर्णनं आठवण्यासारखी नाहीत. बाणाने स्त्रीच्या ऋतूप्राप्तीला स्त्री पुष्पमती/ पुष्पवंती होणे हे संबोधणं म्हणजे किती मान राखला आहे. म्हणजे एखाद्या फुलाचं उमलुन येणे तसा हा काळ त्याला सूचित करायचं आहे

सूर्यप्रकाशाच्या माध्यमातून, निसर्गाच्या वेगवेगळ्या अविष्कारातून, दृश्यकला जेव्हा अस्तित्वात नव्हती. तेव्हा केवळ शब्दांच्या सहाय्याने ते विशिष्ट क्षण, ती स्थिती पकडून ती शब्दबद्ध करणे किती अवघड होते. हे सर्व रंगाविष्कार त्या काळच्या जगाचा अर्थ लावण्याचे साधन आहे. त्याकाळचं सौन्दर्य आणि वास्तवही दर्शविते. हे सर्व वाचताना आपण त्याकाळच्या वातावरणाची सफारी करत असतो. त्याचे डोळे एखाद्या लेन्स प्रमाणे काम करतात. तो कसबी लेखक आहे, तो निर्माता आहे, दिग्दर्शक आहे, तो एडिटर आहे, सिनेमॅटोग्राफर आहे, संगीतकार आहे, नृत्यकार आहे, वेषभूशा, रंगभूषा, नैपथ्यकार आहे, संगीतही त्याचेच, गायनही त्याचेच. सिनेमाच्या भाषेत बोलायचे तर सुपर- डुपर हिट सिनेमा आहे. कथा फुलवणं म्हणजे काय ? हे बाणाकडून शिकावे. जिथं सवांद कमी पडतात, तिथं त्याची भरगच्च रंगीत वर्णनं येतात. उपकथानकासारखी इतर पात्रे येतात. पोपट मैनेचं भांडण येते. आपण काय शिकलो ? सिनेमा ही पाश्च्यात संस्कृतीची देण आहे. नाही सातव्या शतकात त्याने भव्य दिव्य चित्रपट निर्माण केला. जो आजच्या सिनेमाच्या कितीतरी पुढे होता. जेव्हा फक्त श्रवण हेच माध्यम होतं. त्याला दृश्यकलेचा परिणाम मिळवून देऊन उभं करण्यासाठी शब्द प्रभू, रंग प्रभू, निसर्ग प्रभू बाणाला विनम्र अभिवादन

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

या बाई कोण?

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

एकूण वाक्यरचना वगैरे पाहिली तर दुर्गाबाई भागवत असाव्यात असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्हाला नसत्या चौकशा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्या म्हताऱ्या भिल्लाने अजून उडण्याचं त्राण आले नाही अशा पोपटाच्या पिल्लांना ,,,,,,,,
.
.
ती किंचित उमललेल्या कमळांच्या कळ्यांच्या पाकळ्यांच्या टोकासारखी गुलाबी दिसत होती. काहींची डोकी नुसती कापत होती.

पोपटाच्या पिल्लांचे वर्णन फार सुंदर आहे.
.
लाल रंगाच्या छटेला इतके शब्द होते? हरवले आता. तांबडा, गेरु, किरमिजी,कुंकुमारक्त याव्यतिरिक्त आठवत नाहीत.
.
एकंदर वर्णन फार मोहक आहे खरे आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लाल रंगाच्या छटेला इतके शब्द होते? हरवले आता. तांबडा, गेरु, किरमिजी,कुंकुमारक्त याव्यतिरिक्त आठवत नाहीत.

आहाहा किरीमिजी लाल रंग असतो का ? कसा दिसतो म्हणे ?
किरीमीजी वळणाचा धुंद पाऊस येतो साजण नाही उशाशी अशा काहीतरी ग्रेस च्या कवितेच्या ओळी आठवताहेत
म्हणजे हा नेमका कसा असतो

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

http://mywordsnthoughts.com/myworld/all-about-kerala/asthamikkaatha-sand...
केरळच्या संध्याकाळिंचे सुंदर फोटो आहेत.
त्यातल्या वरुन तीसऱ्या फोटोतील गडद लाल. (जांभळा नाही) गडद लाल, बहुतेक तो किरमिजी आहे.
_____________
येस्स सापडला-
इंग्रजीतही किरमिझी म्हणतायत की लोकं.
https://www.pinterest.com/ygmrdmlri/k%C4%B1rm%C4%B1z%C4%B1/
____________
https://66.media.tumblr.com/754627cb20900b5cb8850427a7c534c7/tumblr_mwfh4gzzIO1t0kudko1_400.jpg

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्हाला बाणाची ‘कादंबरी’ आवडली याचा मनापासून आनंद वाटला, आणि तुमचा हेवाही वाटला. मी ती इंग्रजी भाषांतरात वाचलेली आहे. It wasn’t my cup of tea. ती खूप लांब आहे हा माझा आक्षेप नाही. नुसत्या लांबीने काही बिघडत नाही. Middlemarch दणदणीत लांब आहे, पण अनेकदा वाचायला काही वाटत नाही. माझी मुख्य तक्रार अशी की ‘कादंबरी’चं कथानक अतोनात किचकट झालेलं आहे. अनेक नायक, त्यांचे अनेक पुनर्जन्म, यांतल्या काही जन्मांत तो मनुष्यरूपात असणार, काहींत प्राणिरूपात तर काहींत यक्षाच्या रूपात, अमुक तमूकच्या प्रेमात पडते पण अमुक जेव्हा पूर्वजन्मी यांव होती आणि तमूक त्यांव होता तेव्हा त्यांच्यामध्ये तिसरंच काहीतरी झालं होतं, असल्या प्रकारांमुळे वाचताना मनाला फार शीण येतो. कुठल्या शापित यक्षाच्या कुठल्या जन्मात त्याचं कुठल्या अप्सरेवर प्रेम होतं हे लक्षात ठेवता ठेवता दमछाक होते. आणि दुसरं म्हणजे प्रतिमांचं सौंदर्य जे काही असायचं ते असो, पण त्या किती प्रमाणात असाव्यात याला काही ताळतंत्र नाही आणि पाल्हाळ लावल्यामुळे कथानकाची हानी होते याचीही जाण नाही. माझ्या आठवणीप्रमाणे चंद्रापीडाचा घोडा इंद्रायुध याचा जेव्हा पहिल्यांदा उल्लेख होतो तिथे अगदी उपमा-उत्प्रेक्षांचा पाऊस पाडून त्याच्या प्रत्येक अवयवाचं भरभरून वर्णन करण्यात तीनचार पानं खर्च केलेली आहेत. ते वाचताना शंभरातल्या नव्व्याण्णवांना कंटाळा येईल हे नक्की.

इलियड, अोडिसी, रामायण, महाभारत हे सगळे ग्रंथ ‘कादंबरी’पेक्षा जुने आहेत, पण आपली लोकप्रियता टिकवून आहेत. (अर्थात रामायण-महाभारत मूळ स्वरूपात वाचणारे कमी, संक्षिप्त आवृत्त्याच वाचल्या जातात हे मान्य.) पण याउलट कादंबरी आवडीने वाचणारं कुणी भेटत नाही. ह्यामागे हीच कारणं असावीत का असा प्रश्न पडतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

समर्ग दुर्गा बाई वाचतांना मी कादंबरी पर्यंत पोहोचले. कथानक विस्कळीत असल्यानं कंटाळवाणे होते. मला बाईंच लेखन अभ्यासायचं होत. त्यातून शिकायचं होतं,कादंबरीच्या भाषांतरित पुस्तकात मला बाणापेक्षा बाईच जास्त सापडल्या. तुमच्या प्रतिसादाने एक नवी बाजू समोर आली. धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अमची पण न'वी बाजू नसली तरी हीच असते संस्कृत काव्य, कादंबऱ्यांची. कंटाळवाण्या अतिरेक उपमा ( तळटीपा, कोट्यांपेक्षा) अधिकच.
गेमॅाफथ्रोन्सची श्टुरीही अशीच आहे म्हणतात.
(कादंबरी मोठी म्हणजे लांब नव्हे दीर्घ म्हणायचे आहे, जयदीपना.)
--
पण थोडा ऐवज इकडे लिहिलात ते बरं केलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"श्रीखंड खाल्ल संकट टळल " नावाची एक फार जुनी सर्वोत्कृष्ठ मराठी विनोदी कथा संग्रहात वाचलेली कथा होती. त्यात नायकाला दिवसभर वेगवेगळ्या ठिकाणी आग्रह करकरुन श्रीखंड खायला दिलं जातं मग तो कावुन जातो... अस
इतक्या प्रतिमा इतकी गोड वर्णन वाचल्यावर तो शिवीगाळीचा वगैरे लेख गोड जेवणावर मसाला पान च्या उतारासारखा होतो.
हे भौ पुराने जमाने के दवणे च होंगे
एकुण संस्कृत सुभाषित सुंदर विलक्षण असतात पण १०० वा २०० पालथी घातल्यावर १ हाती लागतो. ही वर्णने पण छान च असतात पण नेहमी नाही बरेचदा अतिरेक होतो
त्यामुळे सलग वाचणं म्हणजे मोठीच ॲचीव्हमेंट मानतो काही काही लोकं तर जेन ऑस्टीन इ. टीपीकल क्लासिक्स पण पुर्ण वाचुन दाखवतात.
ते फारच थोर वगैरे वाटतात आजच्या काळात
म्हणजे आध्यात्मिक पेशन्स वगैरे वाढवण्यासाठी सोशल मिडियातली उत्तेजना कमी करण्यास किंवा एक शिक्षा म्हणुन कैद्यांना रोज अस जेन ऑस्टीन किंवा अशी संस्कृत वगैरे वाचावयास द्यावी. शेवटी सुटकेच्या दिवशी मग
गिफ्ट म्हणुन मात्र तुम्ही काहीही घ्या असा पर्याय देता येइल

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1