नव-उदारमतवादाचा पोपट तर मेला, पण पुढे काय?

संकल्पना

नव-उदारमतवादाचा पोपट तर मेला, पण पुढे काय?

मूळ लेखक - जोसेफ स्टीगलिट्झ

भाषांतर - ए ए वाघमारे

मानवकल्याणासाठी सर्वांत उपयुक्त अर्थव्यवस्था कुठली हे ठरवण्याची वेळ आता आली आहे. याचं कारण म्हणजे अमेरिका व इतर प्रगत अर्थव्यवस्थांमधील गेल्या ४० वर्षांच्या नव-उदारमतवादाच्या अनुभवानंतर, कुठल्या व्यवस्था कुचकामी आहेत हे तरी निदान आपल्याला कळलं आहे.

नव-उदारमतवादाचा प्रयोग म्हणजे श्रीमंतांवर कमी कर लावणं, श्रम आणि वस्तू बाजाराचं निर्नियमन, वित्तीयीकरण आणि जागतिकीकरण, हा सपशेल फसला आहे. आज अर्थव्यवस्थेची वाढ दुसर्‍या महायुद्धानंतरच्या पाव शतकातल्या कठीण काळातील वाढीपेक्षाही कमी आहे. त्यातही जी थोडीफार वाढ दिसते ती अत्युच्च उत्पन्न गटातच झालेली दिसेल. त्यापेक्षा खालच्या वर्गातल्या लोकांचं उत्पन्न गेली काही दशकं जवळपास एकाच ठिकाणी थिजलेलं आहे आणि काहींच्या बाबतीत तर घटलेलं आहे, हे पाहता नव-उदारमतवादाचा पोपट मेला आहे हे ठासून सांगण्याची आणि त्याचं दफन करण्याची वेळ आता आली आहे.

नव-उदारमतवादाची भलामण करणाऱ्या तीन मुख्य राजकीय विचारसरणी म्हणजे: अति-उजवा राष्ट्रवाद, डावीकडे कललेला मध्यममार्गी सुधारणावाद आणि (नव-उदारमतवादाचं अपयश दर्शवणारी, मध्यममार्गाच्या जोडीनंच उजवीकडे कललेली) पुरोगामी डावी विचारसरणी. यातील पुरोगामी डाव्या विचारसरणीचा अपवाद वगळता, इतर पर्याय कुठल्या ना कुठल्या कालबाह्य झालेल्या (किंवा आतापर्यंत कालबाह्य व्हायला हव्या होत्या) अशा तत्त्वांशी आश्रित म्हणून बांधले गेले आहेत.

उदाहरणार्थ, डावीकडे कललेला मध्यममार्ग हा नव-उदारमतवादाचा मानवी चेहरा आहे. त्याचा उद्देश अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन आणि ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेयर यांची धोरणं, त्यात आधीपासूनच असलेल्या वित्तीयीकरण व जागतिकीकरण ह्या संदर्भांत थोडेफार बदल करून, एकविसाव्या शतकात राबवणं हा आहे. तर दुसरीकडे, अति-उजवे राष्ट्रवादी लोक जागतिकीकरणाचे पूर्ण विरोधक आहेत. आजच्या सगळ्या समस्यांचं मूळ कारण स्थलांतरित आणि विदेशी लोक हेच आहेत असं त्यांचं मत आहे. तसंही डॉनल्ड ट्रम्प यांची कारकीर्द पाहिली तर ती अति-उजव्या राष्ट्रवादाची अमेरिकी आवृत्तीच म्हणावी लागेल. उदाहरणार्थ, श्रीमंतांचा कर कमी करणं, निर्नियमन आणि कल्याणकारी योजना बंद करणं वा त्यांचा संकोच करणं.

याशिवाय एक तिसरा कंपूसुद्धा आहे ज्यांना मी पुरोगामी भांडवलवादी म्हणतो. त्यांचं मत इतरांपेक्षा पूर्णपणे वेगळं आणि मुख्यतः चार तत्त्वांवर बेतलेलं आहे. पहिलं म्हणजे बाजार, राज्य आणि नागरी समाज यांतील समतोलाची पुनर्स्थापना करणं. संथ अर्थवाढ, वाढती विषमता, वित्तीय अस्थैर्य आणि पर्यावरणाचा ऱ्हास ह्या बाजारानं जन्माला घातलेल्या समस्या आहेत. त्यामुळे त्यांचं निराकरण बाजाराकडून होणं शक्य नाही आणि बाजार ते स्वतःहून करणारही नाही. पर्यावरण, आरोग्य, कामाच्या ठिकाणी सुरक्षितता इत्यादी बाबतींत नियमन करून बाजार काबूत ठेवणं हे सरकारांचं काम आहे. शिवाय, बाजार जे करू शकत नाही किंवा स्वतःहून करणार नाही अशा गोष्टी करणं हे सुद्धा सरकारांचंच काम आहे. उदाहरणार्थ, मूलभूत विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण आणि प्रजेचं आरोग्य ह्यांमध्ये गुंतवणूक करणं.

दुसरा प्राधान्यक्रम म्हणजे, जिला आपण 'राष्ट्राची संपत्ती' म्हणतो ती मुख्यतः दोन संकल्पनांशी संबंधित आहे हे समजून घेणं. पहिली म्हणजे आपल्या भोवतालाचा वैज्ञानिक पद्धतीने सातत्याने वेध घेत राहणं आणि दुसरी म्हणजे ज्यात मानवसमूह एकत्रितपणे सर्वांच्या व्यापक भल्यासाठी, समष्टीसाठी, झटत असतात अशा एका सामाजिक संरचनेची उभारणी. असं असलं तरी समाजांतर्गत सहकाराला चालना देण्याबाबत बाजाराची भूमिका अद्यापही महत्त्वाचीच आहे. परंतु बाजारावर जर कायद्याचा वचक असेल आणि बाजार लोकतांत्रिक चाचण्यांना सामोरं जायला बांधील असेल तरच बाजार ही अपेक्षा पूर्ण करू शकेल. अन्यथा, व्यक्ती इतरांचे शोषण करत गब्बर होत राहतील आणि कल्पकतेचा उपयोग करत खरी संपत्ती निर्माण करण्याच्या फ़ंदात न पडता धोरणदोहनाचा मार्ग पत्करून असलेल्या संपत्तीचे शोषण करत राहतील. आजचे बहुतेक धनवंत हे ह्या शोषणमार्गावरून चालतच आजच्या स्थितीला पोचले आहेत. धोरणदोहनाला प्रोत्साहन देत संपत्तीनिर्माणाचे आधारभूत घटकच नष्ट करणारी ट्रम्प यांची धोरणं त्यांना चांगलीच साहाय्यक ठरली आहेत. पुरोगामी भांडवलवाद नेमकं ह्याउलट करू इच्छितो.

आता आपण तिसऱ्या प्राधान्यक्रमापर्यंत पोचतो, तो म्हणजे राक्षसी बाजारशक्तीच्या वाढत्या समस्येचं उत्तर शोधणं. माहितीच्या सहज उपलब्धतेचा (गैर)फायदा घेणं, संभाव्य स्पर्धकांना विकत घेणं आणि त्यांच्या उद्योग प्रवेशाला अडथळे निर्माण करणं ह्याद्वारे दिग्गज कंपन्यांनी मोठया प्रमाणात धोरणदोहनाचा अवलंब केला आहे. ह्यात इतर सर्वांचंच नुकसान आहे. विषमतेचं प्रमाण आणि तिच्या वाढीचा वेग इतका अधिक का आहे ह्याची उत्तरं कॉर्पोरेट क्षेत्राची वाढती बाजारशक्ती आणि कामगारांची घटती सौदाशक्ती यांत सहज मिळू शकतात. यंत्रमानवीकरण आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातील प्रगती पाहता, जोवर नव-उदारमतावादातील मांडणीपेक्षा अधिक क्रियाशील भूमिका सरकारं घेत नाहीत तोवर ह्या समस्या अधिकच गंभीर होत जाण्याची शक्यता आहे.

ह्या पुरोगामी कार्यक्रमाचा पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अर्थशक्ती आणि राजकीय प्रभावशक्ती यांतले दुवे कमकुवत करणं. हे दोन्ही घटक एकमेकांना पूरक आणि स्ववर्धिष्णू आहेत, विशेषतः अमेरिकेसारख्या देशात जिथे धनवंत व्यक्ती आणि कंपन्या अमर्याद खर्च करू शकतात तिथे तर हे नक्कीच खरं आहे. अमेरिका जसजशी 'एक डॉलर, एक मत' ह्या मुळातूनच लोकशाहीविरोधी असलेल्या व्यवस्थेकडे वळते आहे, तसतशी लोकशाही मूल्यांचा समतोल सांभाळणाऱ्या व्यवस्थेची निकड अधिकाधिक जाणवणार आहे. अन्यथा धनशक्तीला काबूत ठेवणं कोणालाही शक्य होणार नाही. ही केवळ नैतिक वा राजकीय समस्या नाही; कारण कमी विषमता असलेल्या अर्थव्यवस्थांची कामगिरी निश्चितच उजवी आहे असं दिसून आलं आहे. त्यामुळे पुरोगामी भांडवलवादी सुधारणांची सुरुवात राजकारणावरील पैशाचा प्रभाव कमी करणं आणि आर्थिक विषमता कमी करण्यापासून होणं गरजेचं आहे.

गेल्या अनेक दशकांतील नव-उदारमतवादामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई एका झटक्यात करेल अशी कुठलीही जादूची कांडी नाही. पण वर दिलेल्या मार्गाने जाणाऱ्या एका सर्वसमावेशक कार्यक्रमाद्वारे ते निश्चितच शक्य आहे. अर्थात राक्षसी बाजारशक्ती आणि विषमता निर्माण करण्यात खाजगी क्षेत्र जितकी कार्यक्षमता दाखवतं तितक्याच दृढनिश्चयाने सुधारक ह्या समस्यांचा सामना करतात का यावरही बरंच काही अवलंबून आहे.

वरच्या सर्वसमावेशक कार्यक्रमाचा भर शिक्षण, संशोधन अशा संपत्ती-निर्माणाच्या खऱ्या स्रोतांवरच असायला हवा. अमेरिकेतील ग्रीन न्यू डील आणि ब्रिटनमधील एक्स्टिंक्शन रिबेलिअन ह्या चळवळींप्रमाणे हा सुधारक कार्यक्रमही पर्यावरण रक्षणासाठी आणि हवामानबदलाविषयी जागल्याच्या निष्ठेनं कार्यरत असावा. तसंच एकही नागरिक चांगल्या राहणीमानासाठी आवश्यक अशा मूलभूत गरजांपासून वंचित राहता कामा नये ह्याची शाश्वती देणाऱ्या कल्याणकारी सामाजिक योजनांचाही त्यात विचार असावा. यात आर्थिक सुरक्षितता, काम मिळण्याची संधी, जगता येईल इतकं किमान वेतन, आरोग्यसुविधा, मुबलक प्रमाणात घरं, सुरक्षित निवृत्तजीवन आणि सगळ्या मुलांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण यांचा समावेश होतो.

हा कार्यक्रम अगदीच परवडण्यासारखा आहे. किंबहुना, तो न राबवणं आपल्याला परवडण्यासारखं नाही. राष्ट्रवादी आणि नव-उदारमतवाद्यांनी सुचवलेले पर्याय तर अधिक प्रमाणावर कुंठितता, विषमता, पर्यावरणाचा ऱ्हास, राजकीय कर्कशता यांची हमी देणारे आहेत; ज्यांचे परिणाम आपण कल्पनाही करू नये असे होऊ शकतात.

पुरोगामी भांडवलवाद हा शब्द विरोधाभासी शब्दालंकाराचे उदाहरण नाही. उलट तो एका पूर्णपणे फसलेल्या विचारसरणीला सगळ्यांत व्यवहार्य आणि बहुरंगी पर्याय आहे. किंबहुना, आपल्याला आपल्या आजच्या आर्थिक आणि राजकीय अस्वस्थतेतून मुक्तीसाठी सर्वोत्तम अशी संधी देऊ करणारा आहे.

(लेखक अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेते असून कोलंबिया विद्यापीठात प्राध्यापक आणि रूझवेल्ट इन्स्टिट्यूट येथे मुख्य अर्थशास्त्री म्हणून कार्यरत आहेत.)

***

भाषांतरकाराच्या नोंदी :

Information Advantages: माहितीच्या सहज उपलब्धतेचे (गैर)फायदे
Rent-seeking: धोरणदोहन - ह्याला भारतीय संदर्भात हफ्ता-वसुलीही म्हणता येईल. पण त्यातून पूर्ण अर्थबोध होत नाही. प्युरिस्टिक अर्थानं विचार केला तर ते योग्य असलं तरी हफ्ता-वसुली म्हणलंं की कॉमिक्समधले पट्ट्यापट्याचे टी-शर्ट घातलेले गुंड
नजरेसमोर येतात. म्हणून धोरणदोहन हा व्यापक अर्थाचा शब्द तयार केला. त्याचा अर्थ सरकारी धोरणे हवी तशी वाकवून, प्रत्यक्ष अर्थकारणात मूल्यवर्धन न करता, नफेखोरी करणं असा घेतलेला आहे. विकिपीडियावर अधिक माहिती मिळेल. ताजं उदाहरण द्यायचं तर सध्या भारतात जिओ मोबाइल आणि आय. यू. सी. चार्जेसबद्दलच्या वादाकडे बघता येईल.

मूळ लेखाचा दुवा

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

लेख अमेरिका आणि प्रगत देशांबद्दल आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश जावडेकरांची शिक्षणसंस्थांबद्दलची मुक्ताफळं ऐकलीत का? उदाहरणार्थ, ही बातमी वाचा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लेख आणि भाषांतर उत्तम आहेत! अभिनंदन!. काही प्रॉब्लेम्स:
१. नव - उदारमतवाद हे "Neo-liberalism" चे शब्दशः भाषांतर दिशाभूल करणारे आहे. उदारमतवादाचा "या" तत्वप्रणालीशी थेट संबंध काही नाही. "निरंकुश जागतिक भांडवल-प्रवेश-शाही" असा काहीसा अर्थ त्याला आहे. (याहून चांगले भाषांतर अधिक जाणकार लोक नक्कीच करू शकतील).
२. भारतीय कामगारांचे हितसंबंध जागतिक भांडवलाच्या (काहीसे!) बाजूचे आहेत. अधिक चांगल्या पगाराच्या , सुख-सवलतींच्या, 'एअर-कंडिशन्ड " कंपन्यात काम करणे कोणाला नको आहे? भारतीय कामगारांचे धोरण, परदेशी भांडवलाला आत येऊ देऊन, कंपनी पातळीवर युनियन करून , लढे उभारून, जास्तीत-जास्त सवलती पदरात पडून घेणे असे असायला नको का? युनियन-विरोधी राजकारणाची अंमलबजावणी -ज्यात काँग्रेस आणि भाजप ही दोन्ही सरकारे येतात!- ही राष्ट्रीय पातळीवरची सरकारेच करतात (त्यांना परकीय भांडवलाची "फूस" असते हे उघड आहे ). आणि म्हणून विरोध त्या राष्ट्रीय-सरकारी धोरणांना व्हायला हवा, परकीय भांडवल प्रवेशालाच नाही. परकीय भांडवलाविरुद्धची "लढाई" ही स्वदेशी भांडवलदारांची, स्पर्धा टाळण्याची आणि आपले चराऊ कुरण राखण्याची लढाई आहे. कामगारांनी तिचे समर्थन करण्याचे कारण नाही.

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

नव - उदारमतवाद हे "Neo-liberalism" चे शब्दशः भाषांतर दिशाभूल करणारे आहे.->> सहमत. परंतु असं वाटण्याचं कारण म्हणजे सामाजिक आणि आर्थिक संदर्भात या एकाच शब्दाचे अर्थ वेगवेगळे आहेत. इथे आर्थिक परिभाषेतलाच अर्थ अभिप्रेत आहे. मराठीमध्ये अर्थविषयक लिखाणात खुली, साम्यवादी आणि मिश्र अर्थव्यवस्था या तीन शब्दांच्या पुढे लेखक सहसा जात नाहीत. त्यामुळे नवे शब्द तयार करण्याची गरजही कुणास वाटत नाही. त्यामुळे मराठी ही ज्ञानभाषा वगैरे होण्यापासून (आणि भारत विश्वगुरू होण्यापासून) कोसो दूर आहे, हे अवांतर.

भारतीय कामगारांचे हितसंबंध जागतिक भांडवलाच्या (काहीसे!) बाजूचे आहेत.>> सहमत

बाकी सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

येथे समस्त बहिरे बसतात लोक
का भाषणे मधुर तू करिशी अनेक

इंटरेस्टिंग मांडणी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!