रक्त - राणामामा (भाग १)

संकल्पना

रक्त - राणामामा (भाग १)

मूळ लेखिका - उर्वशी बुटालिया

- भाषांतर नारायण आवटी

उर्वशी बुटालिया राणामामा

उर्वशी बुटालिया यांनी सुमारे दहा वर्षे परिश्रम करून या पुस्तकासाठी संशोधन केले आहे. फाळणीचा एक चालताबोलता इतिहास त्यांनी पुस्तकातून मांडला आहे. या इतिहासात लेखिकेने सामान्य माणसालाच स्थान दिले आहे. फाळणीची झळ सोसलेल्या सामान्य माणसाच्या व्यथा आणि यातना पुस्तकात केंद्रस्थानी आहेत. पुस्तकातील 'रक्त' हे प्रकरण 'ऐसी अक्षरे' दिवाळी अंकासाठी निवडले आहे.

अपेक्षेप्रमाणे मला फाळणीसंबंधी हकीकती समजल्या, मी अनुभव ऐकले, तेव्हाच खरी कथेची सुरुवात झाली, विचारांना चालना मिळाली. कारण फाळणीसंबंधी काही लिहायचंच, हे माझ्या मनात बसलं होतं. प्रत्येक हकीकत, ऐकलेले अनुभव माझा पाठपुरावाच करीत होते. कथेची सुरुवात कुठून करावी, मांडणी कशी करावी, निवेदनाची पद्धत कशी असावी, याबद्दल मी विचार करत होते. म्हणजे आपण जे ऐकलं आहे, ते तसंच लिहावं का, या उलटसुलट विचारानं मला थोड्या यातना झाल्या. मी गंभीरपणे विचार करायला लागले. कारण मी जे काही लिहिणार आहे, ते सगळं खाजगी, वैयक्तिक असणार. यासंबंधी माझा मामा मला म्हणाला होता की, "तुला काय लिहायचं असेल ते लिही, त्याचं मला काही वाटणार नाही, दुःख होणार नाही."

आता माझ्या लिहिण्याविषयी माझ्या आईलासुद्धा माहीत होतं. तरीसुद्धा माझ्या मनाची चलबिचल होत होती. त्यातून मी बाहेर पडू शकत नव्हते. मामा आणि आई मला लिहिण्यासाठी उत्तेजन देत होते, तरी नंतरच्या परिणामाची त्यांना कल्पना नव्हती. मला मात्र त्याची खात्री होती. तेव्हा माझ्या मनात एक विचार आला, की फाळणीविषयी आपण जे लिहिणार आहोत, ते लिहून झाल्यावर आधी आईला आणि मामाला वाचून दाखवावं, मगच प्रसिद्धीला द्यावं; पण तेही माझ्या मनाला पटणारं नव्हतं. कारण एकदा मी लिहायचंच, असा ठाम निश्‍चय केल्यानंतर परत स्वतःच्या मनाशी प्रतारणा करण्याची माझी इच्छा नव्हती. ते मनाला पटणारही नव्हतं. तेव्हा या सगळ्याच गोष्टींचा मी अनेक बाजूंनी विचार करायला लागले. मी जे लिहिणार आहे, ते अनुभव, त्या हकीकती केवळ माझ्याच कुटुंबाशी संबंधित नव्हत्या. तर त्या निमित्तानं माझ्या आणि कुटुंबाशी निगडित अनेक गोष्टी उजेडात येणार होत्या. त्याशिवाय भारत आणि पाकिस्तान या दोन नव्यानं निर्माण झालेल्या देशांबद्दलही बरीच माहिती उजेडात येणार होती. आणि हा सारा इतिहास स्पष्टपणे लिहून काढणं म्हणजे थोडा आक्रस्ताळेपणाही ठरण्याची शक्यता होती. शिवाय लेखनातून मी काही मोठा सिद्धांत मांडणार आहे, असंही मला वाटत नव्हतं. तरीसुद्धा माझ्या मनात अनेक प्रश्नांनी थैमान मांडलं. प्रवासाला निघाल्यापासून या प्रश्नांनीी माझा पाठपुरावा केला होता. आणि एकदा लिहिण्याची जबाबदारीच मी घेतली होती, तेव्हा त्याची सुरुवात कुठून करावी, शेवट कसा करावा, याचा विचार करणं भागच होतं. कित्येक अनुभव सांगण्यासारखे होते; पण सुरुवात कुठून करावी, श्री गणेशा कुठून करावा, या गोंधळात थोडे दिवस मी होते. माझ्या लिहिण्यामागची अनेक बलस्थानं होती. आत्तापर्यंतच्या आयुष्यात फाळणीतल्या हिंसाचाराबद्दल, अत्याचार, बलात्कारांबद्दल मी बरंच ऐकलं होतं. आणि त्यामुळे लोकांवर झालेले आघात याचीही मला कल्पना होती. म्हणजे मला लिहायला प्रवृत्त करणारी ही माझ्या मनाची अस्वस्थताच कारण होती. त्याशिवाय मी माझ्या काही मित्रांबरोबर फाळणीवर एक चित्रपट तयार करत होते. त्या वेळी माझ्या मित्रांनी फाळणीतून होरपळून निघालेल्या अनेक लोकांशी माझी ओळख करून दिली होती, प्रत्यक्ष त्यांच्याशी माझं बोलणं झालं होतं. माझ्या प्रेरणेमागचं हे सुद्धा एक कारण होतं. दुसरं म्हणजे, १९८४ साली दिल्लीत इंदिरा गांधींची भीषण हत्त्या झाली आणि नंतर दिल्लीत दंगल उसळली. हजारो शीखांची हत्या झाली. कत्तल झाली. अनेक जण हल्ल्यामुळे लुळेपांगळे झाले, हिंसाचाराचा अतिरेक झाला. कित्येकांचं आयुष्यच उद्ध्वस्त झालं. आणि हा हिंसाचार फाळणीची आठवण करून देणाराच होता. कदाचित ही दंगल, हा हिंसाचारसुद्धा माझ्या लेखनामागची प्रेरणा असू शकेल. माझ्या मनात गोंधळ निर्माण झाला होता. आणि, खरी तर इथंच कथेची सुरुवात झाली होती. आता निवेदनाच्या ओघात बर्‍याच गोष्टी पुढं येतीलच.

१९८७ सालचा तो कडक उन्हाळा. रात्रीचे दहा वाजले होते. आणि लाहोरच्या उपनगरातील काहीशा जुन्या घराच्या व्हरांड्यात मी उभी होते. हिरव्या, पिस्ता रंगाच्या, भेगा पडलेल्या जुन्या भिंतीवर एका तारेला एक धुरकट बल्ब अडकवलेला होता. त्याचा मंद प्रकाश व्हरांड्यात पडला होता. मी थोडी अस्वस्थ आणि घाबरलेलीपण होते. तरीही मनातली उत्सुकता कमी झाली नव्हती. मला जे काही क्रूरकर्म करायचं होतं, त्याची छाया मनावर पडली होती. शिवाय मनात इतर अनेक विचार, शंकाकुशंका होत्याच. तेव्हा घुमजाव करून पळून जावंसुद्धा वाटत होतं. पण हे लाहोर होतं, रात्रीचे दहा वाजले होते. मुख्य म्हणजे लाहोरमध्ये निर्मनुष्य रस्त्यावर रात्रीच्या वेळी स्त्रिया फिरत नव्हत्या. किंवा गर्दीच्या रस्त्यावरसुद्धा वाहनांच्या शोधात स्त्रिया जात नव्हत्या. म्हणून दारावरची घंटी वाजविण्याशिवाय मला दुसरा पर्यायच नव्हता. मी घंटी वाजवली, तेव्हा थोड्याच वेळात तीन स्त्रिया खिडकीच्या गजांजवळ आल्या. मी "अमुक एक गृहस्थ घरात आहेत का, ते इथंच राहतात का" म्हणून विचारलं. "होय", त्या तिघी म्हणाल्या. परंतु ते गृहस्थ बाहेरगावी दौर्‍यावर गेले आहेत, आणि ते दुसर्‍या दिवशी परत येणार आहेत, असं त्या तिघींनी मला सांगितलं. म्हणजे हे काहीतरीच घडलं होतं. मला हे अनपेक्षित होतं. ठीक आहे. आणि समजा, मला पाहिजे होते, ते गृहस्थ घरीच असले असते तर त्यांनी मला लगेच ओळखलं असतं. का? तर नाही. पण ती माझ्या मनाची मूर्ख समजूत होती. आणि, खरं तर, त्या गृहस्थांनी या पूर्वी मला कधी बघितलं सुद्धा नव्हतं. आणि 'मी' म्हणजे 'उर्वशी' कुणी अस्तित्वात असेल, याची त्यांना कल्पना असणं शक्यच नव्हतं.

मी मनाच्या अशा गोंधळलेल्या अवस्थेत खाली, फरशीकडं बघत होते. मग मला अस्पष्ट असं आठवलं की, फरशीवर जे काही कोरलं होतं, तो एक खेळाचा प्रकार होता. सगळ्या चौकटीच कोरल्या होत्या; आणि त्याबद्दल मला माझ्या आईनं आधीच सांगितलेलं होतं. माझ्या आजोबांनी आजीसाठी म्हणून ते सगळं कोरून ठेवलं होतं. विचार करता करता मी माझ्या अंगातलं बळ एकवटलं आणि त्या तिघींना मला कुणाला भेटायचं होतं, मी कुठून आले, हे सांगितलं. मी त्यांच्या बहिणीची मुलगी आहे हे सांगितलं. आणि मी दिल्लीहून आलेय हे सांगावंच लागलं.

दाराची खिटी ओढली गेली. मला आत बोलावलं. त्या तिघी कोण होत्या, तर एक राणामामाची बायको म्हणजे माझी मामी; आणि तिच्या दोन मुली म्हणजे माझ्या मामेबहिणी. त्या दिवशी त्या तिघीजणी माझ्याशी मोकळेपणानं बोलल्या. खूप चांगलं वागल्या. अर्थात ती माझी कल्पनाच होती. खरोखरच त्या माझ्याशी मैत्रीच्या स्वरूपात बोलल्या का, हे मला काहीच सांगता येत नव्हतं. एक मात्र मला आठवतं, ते म्हणजे मी कोण आहे, हे त्यांनी ओळखलं आणि हेही एक आश्‍चर्यच होतं. "तू नक्कीच सुभद्राची मुलगी असली पाहिजेस कारण तू थोडी तिच्यासारखीच दिसतेस", त्या म्हणाल्या. मला आश्‍चर्य वाटलं. मी तिच्यासारखी दिसतेय हे कशावरून? त्या तिघींनीतर माझ्या आईला बघितलंसुद्धा नव्हतं. त्या वेळी मी थोडी कावरीबावरी झाले. मी काही विचारूच शकले नाही. नंतर त्यांनी मला दिवाणखान्यात नेलं. तो दिवाणखाना फारच मोठा होता. आणि त्याची सजावट फार भडक होती. एक तासभरतरी आम्ही काळजीपूर्वक बोललो. विचारांची देवाणघेवाण झाली. कोकाकोलाही प्यायलो. नंतर मला नेण्यासाठी माझी मैत्रीण फराना आली. मला तिची बहीण फरिदा माहीत होती. त्यांच्या घरी ती राहत होती. खरं तर माझ्या कथेचा शेवट इथंच होऊ शकला असता. कारण माझा मामाच घरी नव्हता, त्यामुळं विषयच संपला होता. आणि माझ्या मनालाही थोडं बरं वाटतं होतं. आता माझ्या मनात चांगले विचार येत होते. की, जे मी केलं, ते चांगलंच केलं आणि जे करायचं होतं तेच केलं. आता मी घरी जाऊ शकते. आणि जे काही घडलंय् ते विसरू शकते. परंतु कृतीपेक्षा बोलणं सोपंच असतं. कारण फाळणीचा इतिहास मला मोकळं सोडणार नव्हता. माझा पाठपुरावा करणार होता.

पाकिस्तानी सरहद्द ओलांडणं हे मी समजंत होते त्यापेक्षा कितीतरी सोपं होतं. परंतु व्हिसा मिळणंच फार अवघड जात होतं. पाकिस्तानातल्या उच्च आयुक्तांचं जे ऑफिस होतं, तिथं व्हिसा मिळविण्यासाठी दोन वेगवेगळी टेबलं होतं. एक होतं, ते ज्याला पाकिस्तानी परदेशी समजत होते, त्यांच्यासाठी आणि दुसरं टेबल होतं, ते भारतीयांसाठी. व्हिसा मिळविण्यासाठी तिथं चक्क ढकलाढकलीच चालली होती; इतकी गर्दी होती. आवश्यक त्या कागदपत्रांची लवकर पूर्तता कशी होईल, यासाठी लोकांची धडपड चालली होती. लोकांची जिथं रांग होती, तिच्यापुढं एक म्हातारा बसला होता. थोडा कमरेत वाकलेला, डोक्याला टक्कल पडलेला. झटपट फोटो काढून घ्या, असं तो लोकांना सांगत होता. त्याच्या शेजारीच एक डेव्हलपरची बादली होती. म्हणजे झटपट फोटोचा तो प्रकार होता. एकदा पाकिस्तानच्या हद्दीत आलं, की विमानतळावरचं सगळं वातावरण आपल्यासारखंच वाटत होतं. तीच भाषा, कपडे तसेच, गोंधळ तसाच, अगदी वासही तसाच! हद्द ओलांडून मी आत आले आणि माझ्या भावना मला आवरता आल्या नाहीत. मला हुंदकाच दाटून आला. हा प्रकार मला अनपेक्षित होता. मला आपल्याच घरी आल्यासारखं वाटलं. या भावनावेगाची मला आधी कल्पना आली नाही. तशी माझ्या मनाची तयारी नव्हती आणि मग मीच मला प्रश्न विचारायला सुरुवात केली की, हे असं का? हे असं का घडलं?

माझा जन्मतर फाळणीनंतर पाच वर्षांनी झाला होता. तरीसुद्धा मी जे ऐकलं होतं, मला जे काही माहीत झालं होतं, ते काय होतं, तर यातना, मनस्ताप, दुःख, आघात, स्थलांतर, हाल... हा इतिहास. ज्या यातनामय इतिहासानं माझ्या आजोबांचा आणि आजीचा जन्मभर पाठलाग केला, ती हीच का जागा? आयुष्यात मी पहिल्यांदाच ही जागा बघत होते. मला कळत नव्हतं, की दिल्लीपेक्षा ही जागा मला जवळची का वाटावी? दिल्लीत आत्तापर्यंतचं माझं आयुष्य गेलेलं. पण मी इथं का आले? फाळणीचा जो भीषण इतिहास, ऐकलेल्या हकीकती, घटना, यांचा असा कोणता माझ्या मनावर परिणाम झाला? मामाच्या घरातल्या व्हरांड्यात उभी असताना माझ्या डोक्यात अनेक विचार आले. मला हे सगळं अनपेक्षित होतं. माझ्या मनात जेव्हा फाळणीची माहिती घ्यायची, फाळणीचं अंतरंग शोधायचं आलं होतं, तेव्हा बघताबघता मला बरीच काही ज्ञाताज्ञात माहिती मिळेल, याची मलाच कल्पना नव्हती. कारण मला ही जी माणसं भेटली, ती माझं इतकं स्वागत करतील, मामा आणि त्याच्या घरातील इतर मंडळी मला इतकी आपुलकी दाखवतील, ह्याची अपेक्षा नव्हती. मला हे लोक आपल्याच कुटुंबातील एक समजले. खरं तर, हे एक आश्‍चर्यच होतं. कारण फाळणीच्या सीमारेषेनं आम्हाला इतकं दूर लोटलं होतं, की त्याची कल्पना करवत नाही. धर्मांमध्ये समाजात, राजकारणात, इतिहास, भूगोलात जिथं तिथं आम्हाला फाळणीच दिसत होती. सीमारेषा आत-बाहेर. आणि या आघातातून कुणी बाहेर पडण्याचे जे काही प्रयत्न केले असतील, त्यांची टिंगलटवाळीच झाली.

त्या रात्री राणामामाच्या घराबाहेर मी उभी होते. राणामामा हा माझ्या आईचा सर्वांत लहान भाऊ. फाळणीच्या वेळी अनेक उत्तर प्रदेशीय कुटुंबं विभागली गेली त्याप्रमाणे आमचं कुटुंबसुद्धा विभागलं गेलं. माझी आई त्या वेळी अविवाहीत होती. आणि ती भारतीय सीमारेषेत होती. म्हणजे भारतात आली होती. राणामामानं मात्र तिथंच राहणं पसंत केलं. माझ्या आईच्या आणि तिच्या वंशजांच्या म्हणण्याप्रमाणं पाकिस्तानातच राहण्यात राणामामाचा काही हेतू होता. त्याला माझ्या आजोबांची मालमत्ता, संपत्ती बळकवायची होती. आजोबा फार काळ काही जगले नाहीत. कुटुंबात इतर काही माणसं होती आणि त्यातील काही संपत्तीवर टपलेली होती (या ना त्या मार्गानं) त्यात राणामामा संपूर्ण संपत्तीचा वारसदार होऊ शकणार होता. म्हणजे मालकच! या कारणामुळं आणि फाळणीनंतर मामाशी संपर्क ठेवणं जवळपास अशक्यच झाल्यामुळं एकूण कुटुंबाचा राणामामाशी संपर्कच तुटला होता. फाळणीनंतर चाळीस वर्षांत त्याच्याबद्दल काहीच समजलं नाही; त्याची कुणाशी गाठभेट झाली नाही- अगदी मी त्याला भेटायला जाईपर्यंत.

तेव्हापासून मला आठवतंय, की आम्ही आमच्या आजीकडून, म्हणजे माझ्या वडिलांच्या आईकडून फाळणीच्या हकीकती एकेल्या आहेत. ती आमच्याजवळ राहत होती. आणि माझ्या आईवडिलांकडूनही बर्‍याच गोष्टी ऐकल्या आहेत. त्या दोघांनी फाळणीच्या काळात दिवस काढले होते आणि वेगवेगळे अनुभव घेतले होते. वाटेमध्ये मी या सगळ्या हकीकतींची अनुमानानं नोंद केली. त्यात राणाची कथासुद्धा. राणा पाकिस्तानात नुसताच राहिला नाही, तर त्यानं कळस केला. म्हणजे त्यानं मुसलमान धर्म स्वीकारला आणि मला संशय आहे, की त्यामुळंच तो आमच्या कुटुंबात नकोसा झाला असणार. माझ्या आईनं जातीय दंगली चालू असता अतिशय कठीण परिस्थितीत पाकिस्तानात दोनदा प्रवास केला. आपल्या कुटुंबीयांना आणण्यासाठी ती दोनदा लाहोरला जाऊन आली. तिनं पहिल्यांदा आपल्या लहान भावाला, म्हणजे बिल्लूला आणि बहिणीला, सविताला आणलं. दुसर्‍या खेपेस ती आपल्या आईला आणि सर्वांत लहान भाऊ म्हणजे राणाला आणण्यासाठी गेली होती. (माझे आजोबा म्हणजे आईचे वडील कधीच वारले होते.) आई म्हणाली, की राणानं यायला नकार दिला आणि तो आजीलासुद्धा सोडायला तयार नव्हता. माझ्या आजोबांची जी काही मालमत्ता, संपत्ती होती, ती माझ्या आजीच्या नावावर होती. परंतु 'इस्टेटीसाठीच काही मी आजीला ठेवून घेतोय असं काही नाही', असं राणा म्हणाला. मी तिला लवकरच भारतात आणून सोडीन, असं त्यानं सांगितलं. परंतु नंतर ते कधीच घडलं नाही. कारण देशाची फाळणी झाल्यावर भिन्न धर्मीयांना दुसऱ्या देशांत मुक्तपणे जाता येत नव्हतं. फिरता येत नव्हतं. ते अशक्यच झालं होतं. काही ठरावीक लोकांना आणि सत्ताधारी व्यक्तींनाच तशी मोकळीक होती. नंतर परिस्थिती थोडी सुरळीत झाली. दंगेधोपे थांबले. ज्या लोकांनी आपली घरंदारं घाईघाईत सोडून पळ काढला होता, त्या लोकांना परत आपापल्या घरी जाणं अशक्यच झालं होतं. कारण दोन्ही सरहद्दींवर अतिशय सावधानाता होती. इकडून तिकडं जाणार्‍या-येणार्‍या लोकांवर पोलिसांची व हेरगिरी करणार्‍यांची सक्त नजर होती. राणा आणि त्यांच्या घरातील लोकांनी काही काळ आमच्याशी संपर्क ठेवला होता. परंतु नंतर त्यांच्या लक्षात आलं की आपल्यावर पोलिसांची पाळत आहे. आपल्याला गुन्हेगारांसारखं वागवलं जातंय. आपली पत्रं फोडून वाचली जातात आणि प्रश्न विचारले जातात. त्यानंतर राणा कुटुंबियांनी हळूहळू संबंधच तोडून टाकले. आणि पुढं चाळीस वर्षं हीच परिस्थिती कायम राहिली. राणामामा जरी माझ्या आजोबांच्या घरात राहत असला, तरी त्याला नंतर कुणी पत्र पाठवत नव्हतं, त्याच्याशी बोलत नव्हतं किंवा त्याच्या घरूनही काही बातमी समजत नव्हती. गेली चाळीस वर्षं हीच परिस्थिती होती.

१९४७च्या आसपास आमच्या घरातील लोकांनी एक उडत उडत बातमी ऐकली की माझी आजी (म्हणजे आईची आई) वारली म्हणून. अर्थातच कळत नकळत कानांवर आलेली ही बातमी. खरा प्रकार काय आहे, हे कुणालाच नक्की सांगता येत नव्हतं कारण बातमीच तशी होती; पण या बातमीचा परिणाम व्हायचा तो झालाच. आमच्या सर्व कुटुंबाचं आणि मुख्य म्हणजे, माझ्या आईचं कधीही न भरून येणारं नुकसान झालंय हीच भावना सर्वांची झाली; आणि या बातमीचा दुसरा परिणाम काय झाला, तर आजी व राणामामा यांच्याविषयी आमच्या मनांत जी कटुतेची भावना होती, ती नाहीशी झाली. जो राग होता, तोही मावळला. त्याचं कारण कदाचित आमच्या कुटुंबातला आजी हा शेवटचा दुवा असावा. ज्या आजीकडून आम्ही लहानपणी फाळणीच्या गोष्टी ऐकल्या, तीच ही आमची आजी!

मध्यरात्र झाली आणि मैत्रिणीच्या घरचा फोन वाजला. म्हणजेच फरिदाच्या घरचा. त्या वेळी आम्ही गप्पागोष्टी करत बसलो होतो. बराच वेळ आमचं बोलणं चालू होतं. बोलता बोलता आमचं केहवा पिणं चाललं होतं. खारट-गोड चहाला पाकिस्तानात केहवा म्हणतात. फरिदानं फोनकडं थोडं गोंधळूनच बघितलं. कारण तिला थोडी शंका आली, अशा अपरात्री कुणी फोन केला असेल! नंतर तिनं लगेच फोन माझ्या हातात दिला. आणि म्हणाली, अगदी अधीरपणे "तुझे मामा दिसतायत." फरिदा पोनवर बोलत होती तेव्हाच फोनमधून पुरुषी आवाज ऐकू आला. माझे मामा अगदी मोकळेपणानं बोलत होते, "फरिदा, कृपया माझ्या मुलीला फोनवर बोलाव. ती तुझ्याच घरी आली आहे असं वाटतं. मला तिच्याशी थोडं बोलायचं आहे." मी फोन घेतला. तेव्हा मामा म्हणाले, "बेटी, तू तिकडं काय करतेयस? खरं तर, तू माझ्या घरीच यायला पाहिजेस. आणि इथंच राहायला पाहिजे. तू मला पत्ता सांग. ताबडतोब मी तुला न्यायला येतो." तेव्हा माझ्या एक लक्षात आलं की, राणामामा माझ्याशी अगदी आपुलकीनं बोलत होता. त्यात कुठलाही औपचारिकपणा नव्हता किंवा ओळखीच्या काही खाणाखुणा नव्हत्या. त्यामुळं मी अगदी भारावून गेले. फोनवर आम्ही दोघे बोललो. रात्रीची वेळ वगैरे थोडी मी माझी बाजू मांडली. शेवटी त्यांना सांगितलं, आता रात्री तुम्ही येऊ नका. मामा नुकतेच दौर्‍यावरून आले असतील आणि थकलेही असतील. पण मामा म्हणाले, "मी मित्राला बरोबर घेऊन येतो. मी काही केवळ तुझ्याशी बोलायला येत नाही, तर तुला न्यायलाच येतोय. तू परस्पर जायचं नाहीस. माझं घर हे तुझंच घर आहे आणि तू आपल्या माणसांबरोबर राहायला पाहिजेस." मामांच्या आर्जवी बोलण्यानं मला आश्‍चर्यच वाटलं. घर? कुटुंब? आपलीच माणसं?

मला तरी त्या वेळी हे शब्द नवखेच होते! आणि ते बोलणं अशा दोन व्यक्तींमधलं होतं, की ज्या दोघांनी एकमेकांना कधी बघितलंसुद्धा नव्हतं. अशा परिस्थितीत मी त्यांच्या घरी जाऊन राहणं आवश्यक होतं का? खरं तर, मी जायला उत्सुकही होते. तरी पण माझं काही नक्की असं नव्हतं. कारण जे गृहस्थ मला माहीत नाहीत, ज्यांचा आमच्या कुटुंबाशी तसा संबंध नाही, येणं-जाणं नाही, अशा ठिकाणी मी माझा बाडबिस्तारा घेऊन कशी जाणार आणि राहणार? दुसरे दिवशी मी सामान वगैरे न घेताच त्यांच्या घरी गेले. तेव्हा मामांनी लगेच विचारलं, की तुझं सामान वगैरे कुठंय? त्याच दिवशी संध्याकाळी ते माझ्याबरोबर पुन्हा फरिदाच्या घरी आले आणि आम्ही माझी बॅग वगैरे घेऊन परत त्यांच्या घरी गेलो.

मी एक आठवडाभर मामांच्या घरी राहिले. तेव्हा मुक्काम असेपर्यंत मामाविषयी माझ्या मनात एक कटुतेची भावना होती. कारण माझ्या आईला तो फार कारस्थानी आणि कपटी आहे, असा संशय होता. म्हणून त्याच्याशी पुन्हा संबंध ठेवायची किंवा आपुलकी वाढवायची आईची इच्छा नव्हती. तो पाकिस्तानात का राहिला आणि आईला त्यानं का ठेवून घेतलं, तर ते केवळ इस्टेटीसाठी. कारण लाहोरमधली इस्टेट, घरदार, एकूण सगळी मालमत्ता ही माझ्या आजीच्या नावावर होती. म्हणजे राणामामाच्या आईच्या नावावर होती. त्यामुळं राणामामाविषयीचा माझ्या आईच्या मनातील राग वर्षानुवर्षं तसाच धुमसत होता. परंतु सध्याची माझी पाकिस्तानातील ही भेट राजकीय होती. मला देशाच्या फाळणीविषयी माहिती मिळवायची होती. आमच्या कुटुंबानं इथं काय यातना भोगल्या आहेत, त्याविषयी सुद्धा मला सविस्तर माहिती मिळवायची होती. म्हणून माझ्या दृष्टीनं मामाची गाठभेट फार महत्त्वाची होती. मी इथं आले, राणामामाला मी बघितलं, आणि मुख्य म्हणजे, त्यानं मला 'मुली' म्हणून हाक मारली म्हणजे आमचं नातं प्रेमाचं, आपुलकीचं झालं. आणि अशा परिस्थितीत मला मामाच्या घरून निघणं काही प्रशस्त वाटलं नाही. तेव्हा मी मामाच्या त्या प्रशस्त, भल्या मोठ्या घरात चांगली आठ दिवस राहिले. त्या आठ दिवसांत आम्ही सगळ्यांनी खूप गप्पा मारल्या. तो आठवडा म्हणजे, प्रेम, भावना, जिव्हाळा यानं ओथंबलेलाच होता. मी भारतात परत आल्यावरसुद्धा ते दिवस विसरू शकले नाही. आणि त्या झालेल्या स्वागताबद्दल, अगत्याबद्दल मी कुणाजवळ धड बोलूही शकले नाही. इतकी मी भारावून गेले होते. माझ्या आयुष्यातला तो प्रसंगच वेगळा होता. मामा, मामी, मामेबहिणी... मनमोकळं बोलणं, खाणं-पिणं, जेवण, झोप... मला तर ते एक स्वप्नच वाटत होतं. आणि मुख्य म्हणजे, मामाबरोबर एकदा माझं जे काही बोलणं झालं होतं, त्याबद्दल मी कुणाजवळही एक चकार शब्द काढला नाही. आणि तसं कुणापाशी बोलणंही शक्य नव्हतं. मला मात्र त्या वेळी आमच्या दोघांत झालेला संवाद सगळा आठवतो. थोडक्यात म्हणजे, मी त्या वेळी मामाला स्पष्टपणे विचारलं, "तू पाकिस्तानातच का राहिलास, भावा-बहिणीबरोबर तू भारतात का आला नाहीस?"
तसा तो म्हणाला, "हा तुझा प्रश्न ठीक आहे. परंतु त्या वेळी कित्येकांना असं वाटत होतं की, जरी देशाची फाळणी झाली, तरी हिंसाचार, दंगेधोपे काही होणार नाहीत. अर्थात तेव्हा माझाही समज असाच झाला होता. काही तरी मोठा बदल होणार आहे, याची कल्पना आम्हांला नक्कीच आली होती. पण त्यासाठी आपण आपलं घर का सोडायचं?"

त्या वेळी मामाला वाटलं नव्हतं की, त्या फाळणीसारख्या राजकीय निर्णयाचा आयुष्यावर काही विपरीत परिणाम होईल, म्हणून. पण नंतर जेव्हा राणामामाच्या काही गोष्टी लक्षात आल्या, त्या वेळी खूपच उशीर झाला होता. लाहोर सोडण्याची वेळ निघून गेली होती. बोलताबोलता त्यानं काही गोष्टी मला सांगितल्या. "फाळणीच्या वेळी मी वीस वर्षांचा होतो. माझं शिक्षण सुद्धा फारसं झालेलं नव्हतं. मला नोकरी नव्हती. नोकरी मिळवण्यासाठी माझी कुणी शिफारस करील, असं माझ्याजवळ काहीच नव्हतं." पण मला वाटतं, राणामामाचे अनेक नातेवाईक दिल्लीमध्ये होते. तेव्हा कुणीतरी त्याच्याकडं लक्ष दिलं असतं. पण नंतर तो म्हणाला, "हे बघ, फक्त तुझी आईच तेवढी होती, तिनं मला भारतात बोलावलं. इतर कुणीही बोलावलं नाही. पण ती एकटीच होती आणि तिनं आधीच इतर नातेवाईकांची जबाबदारी घेतली होती." मग मी त्याला विचारलं, "माझ्या आजीनं तुझ्यापाशीच राहावं असा आग्रह तू का धरलास?"

मला वाटलं होतं, की तिला ठेवून घेण्यात काहीतरी तसंच कारण असेल आणि त्याबद्दल राणामामा काही वेगळंच सांगेल, म्हणून. मला उगीचच उत्सुकता लागून राहिली. पण त्यानं जे स्पष्टीकरण दिलं, त्याच्यावर माझा विश्वास बसला नाही.

तो म्हणाला, "मला तुझ्या आईनं सांगितलं होतं की, तू माझ्याबरोबर चल, म्हणून. पण मी मनात म्हटलं, की माझी जबाबदारी तिच्यावर कशाला टाका, तेव्हा मीच तिला सांगितलं की, मीच आईची जबाबदारी घेतो आणि आम्ही दोघंही इथंच राहतो, म्हणजे तुझी आजी आणि मी."

माझी आजी दयावन्ती १९५६ साली वारली. आणि ही बातमी आमच्या घरात आणि इतर नातेवाईकांना कधी कळलीच नसावी. मी ज्या वेळी १९८७ राणाला भेटले, तेव्हा त्यानंच ही बातमी मला पहिल्यांदा सांगितली. आम्ही आपलं ऐकत होतो, की आमची आजी पाकिस्तानातच राहिली होती. ती इकडं आलीच नाही. आमच्या घरी कधीतरी अशी अंधूक बातमी आली होती की, आजी १९४९,१९५२-५३ साली वारली किंवा त्याच्याही आधी वारली असावी म्हणून. पण ती खरी बातमी नव्हती. १९५६ साली ती वारली, म्हणजे फाळणीनंतर ती नऊ वर्षं हयात होती. त्या वेळी तिच्या आठ मुलांपैकी सात मुलं दिल्लीत होती. आणि दिल्ली ते लाहोर हे अंतर विमानानं गेलं, तर केवळ अर्ध्या तासाचं होतं. आणि त्यांपैकी म्हणजे दिल्लीत असणाऱ्यांपैकी कुणालाही ही बातमी समजली नव्हती. राणामामानं मला सांगितलं की त्याला म्हणे, दिल्लीत यायचं होतं. पाकिस्तानात राहायचं नव्हतं. आपण राणामामाच्या म्हणण्याप्रमाणे गृहीत धरू या, की इतरांप्रमाणे तोसुद्धा भारतात येण्याची संधीच शोधत होता. पाकिस्तानातच राहण्याचा निर्णय काही त्यानं मनापासून घेतला नव्हता. त्याला स्थलांतर करायचं होतं, त्यासाठी योग्य वेळेची तो वाट बघत होता.

परंतु धर्मांतराचं काय? त्या धर्मावर विश्वास ठेवणाऱ्यांपैकी तो एक होता काय? धर्म म्हणजे तो काय समजत होता? शेवटी एका देशाचे दोन तुकडे करण्यामागची तर्कसंगती, विचार, जे काही होतं ते धर्मावर आधारितच होतं. असं सांगितलं जातं; आणि यावरच सर्वाधिक विश्वास ठेवला जात होता. त्याला सत्याची कास होती. कारण अनेक लोकांवर धर्मांतर करण्यासाठी सक्ती करण्यात आली होती. पण राणाचं काय? तो काय म्हणाला, "माझ्यावर कुणीही, कसल्याही प्रकारची सक्ती केली नाही. पण खरं सांगायचं, तर त्याशिवाय मला दुसरा मार्गच नव्हता. मला जर इथं राहायचं असेल, तर धर्मांतर एवढा एकच पर्याय होता. म्हणून मी तो स्वीकारला. मी माझा धर्म बदलला आणि एका मुसलमान मुलीशी लग्न केलं. मुसलमानी नाव धारण केलं." परंतु हा जो बदल केला गेला, तो नाईलाज म्हणून, का केवळ सोय म्हणून? तो परिस्थितीचा दोष होता, यावर राणामामा विश्वास ठेवील का? माझ्या प्रश्नाला राणामामानं जे उत्तर दिलं होतं, त्यावर विश्वास ठेवणं मला तरी कठीण होतं. आणि मी जेव्हा त्याला विचारलं, की मी हे सगळं लिहिणार आहे तर तो म्हणाला, "अर्थात तुला काय हवं ते तू जरूर लिही. त्याचा माझ्या आयुष्यावर काही वाईट परिणाम होणार नाही."

परंतु मला स्वतःला मात्र वाटत होतं, की मी जे लिहिणार आहे, त्याचे बरेवाईट परिणाम काय होणार आहेत याची त्याला जाणीव नव्हती. म्हणून मला जे करायचं होतं, मी जे ठरवलं होतं, तेच केलं. मला काही गोष्टींबद्दल गप्प बसणं भाग होतं ते मी केलं. मी यातून काही पळवाट काढणार नव्हते. फक्त एवढंच होतं की, आख्यायिका म्हणून याचा उपयोग करायचा नव्हता किंवा ज्याला आपण बुद्धिप्रामाण्य म्हणू असं काही करणार नव्हते, किंवा मला राणामामाचा मर्मभेद करायचा नव्हता. किंवा त्याला उघडं पाडायचं नव्हतं.

माझ्या प्रश्नाचं उत्तर देताना राणामामा म्हणाला, "एक गोष्ट मी तुला सांगतो, या चाळीस वर्षांत मी एकदाही सुखानं झोपलो नाही. प्रत्येक रात्री मला माझ्या निर्णयाचं दुःख होत होतं. पश्चात्ताप होत होता."

त्याचं हे बोलणं ऐकून मी थिजूनच गेले. मला समजलं नाही, की तो असं का बोलला, याचा अर्थ काय; त्याला काय सांगायचं होतं? गेली चाळीस वर्षं तो असा जगला कसा? त्याच्या मनाला ती गोष्ट इतकी लागली असेल, तर पुढील चाळीस वर्षं तो असाच जगणार का?
"हे बघ, पोरी…" काही तरी पुन्हा सांगण्याच्या भावनेनं तो म्हणाला, जणू मागे आम्ही जी काही चर्चा केली, त्या वेळी त्याला कुणी काही सांगण्यापासून परावृत्त केलं होतं. "जे काही झालयं, ते झालंय; पण धर्मांतराला क्षमा नाही. भूतकाळ आपला पाठलाग करत असतो, एखाद्या शिकारी कुत्र्यासारखा. माझ्याच बाबतीत सांगायचं, तर मला धर्मांतर फारच त्रासदायक ठरलंय; कारण मी एकाच जागी राहत आलो आहे. आजसुद्धा मी जेव्हा बाजारात चालत जातो, तेव्हा मी लोकांची 'हिंदू हिंदू' अशी कुजबूज नेहमीच ऐकत असतो. तुला माहीत नाही. ते लोक मला कधीही क्षमा करणार नाहीत. कारण मी बाटगा आहे."

राणामामा आपल्या कुुटुंबीयांना शोधत भारतात का आला नाही? मला याचं आश्‍चर्य वाटतं. त्याला खरोखरच मनापासून जर आपलं कुटुंब आपल्यापासून दूर गेलेलं आहे, आपलं फार नुकसान झालेलं आहे, असं वाटत असेल, तर तो इतर लोकांप्रमाणे कुटुंबाचा शोध घेत का फिरला नाही? ठीक आहे, अगदी सुरुवातीला सीमा ओलांडून जाणं लोकांना शक्य नव्हतं. पण नंतर परिस्थितीत काहीतरी सुधारणा झालीच होती. तेव्हा त्यानं का प्रयत्न केला नाही? परंतु त्याच्याजवळ याही प्रश्नाचं उत्तर होतं.

"मी कुठं आणि कसा जाणार होतो? माझ्या कुटुंबाला, बहिणींना मी कुठं आहे याचा ठावठिकाणा माहीत होता. पण भारतात माझे नातलग नक्की कुठं आहेत, हे मात्र मला माहीत नव्हतं. आणि पूर्वीचा एक हिंदू माणूस मुसलमान धर्म स्वीकारतो आणि आपल्या हिंदू नातेवाइकांना शोधत भारतात येतो, यावर कोण विश्वास ठेवणार होतं? आणि मला माहीत असलेलं फक्त हे एकच घर."

आणि अजून सुद्धा तो अनेक अर्थांनी घराची व्याख्या करत होता. इथं पूर्वीच दूरचित्रवाणीचं आगमन झालं होतं. राणामामा प्रत्येक दिवशी भारतातील बातम्या ऐकत होता, हे त्यानंच सांगितलं. ज्या वेळी तो दूरचित्रवाणीवर क्रिकेट बघायचा, त्या वेळी भारत-पाकिस्तान सामना असला, तर त्याचा कल गुप्तपणे का असेना पण भारताकडंच असायचा. किंवा भारत इतर देशांबरोबर क्रिकेट खेळत असेल, तर त्याला भारताविषयीच जिव्हाळा वाटायचा. अलीकडे जेव्हा तो चित्रवाणीच्या छोट्या पडद्यावर करमणुकीचा कार्यक्रम, मालिका बघतो, तेव्हा त्याला भारतात, आपल्या घरीच असल्यासारखं वाटतं. त्यानं जरी मला लाहोरमधलं घर हे एकच माझं घर आहे, असं सांगितलं होतं, तरी! पंजाबी भाषेमध्ये भावना आणि आठवणी जागृत करणारा आणि आवाहन करणारा एक शब्द आहे तो म्हणजे 'वतन'! त्याचं भाषांतर करणं अवघड आहे. तरी सुद्धा त्याचा अर्थ असा की, घर, देश, जमीन वगैरे. 'वतन' या शब्दाचे तिन्ही अर्थ किंवा त्यांपैकी एक अर्थ अभिप्रेत असतो. जेव्हा एखादा पंजाबी किंवा एखादी पंजाबी बाई आपल्या 'वतन' याविषयी बोलतो किंवा बोलते, तेव्हा त्या व्यक्तीला आपल्या जन्मभूमीविषयी, जागेविषयी ओतप्रोत जिव्हाळा, प्रेम-आस्था वाटत असतात.

फाळणीमुळे अनेक पंजाबी लोकांनी आपल्या मूळ घरादारांचा त्याग केला आहे. म्हणजेच आपल्या 'वतना'चा त्याग केला आहे. राणामामाच्या बाबतीत चेष्टेनं बोलायचं झालं, तर जरी तो पाकिस्तानातल्या आपल्या मूळ घरी राहत असला, तरी त्याचं वतन म्हणजे भारतच! भारतात तो एकदाच आणि फार थोड्या काळासाठी गेला होता. राणामामाच्या बायका-मुलांसाठी हा प्रकार थोडा विचित्रच होता. कारण राणामामाच्या मनामध्ये जी सुप्त ओढ आहे, तीविषयी घरातल्यांना काहीच माहिती नव्हती. त्यांना हे गूढ समजत नव्हतं. त्यांना राणामामा ज्या गोष्टी सांगत असे, त्या नवख्याच वाटत. तो या देशाच्या सरहद्दीपलीकडील लोकांविषयी, कुटुंबाविषयी, हिंदूंविषयी बोलतो, त्या गोष्टी त्यांना अनभिज्ञ वाटत. एकदा त्या दोघी तरुण मुली मला म्हणाल्या की,
"आपा, तुझं बरोबर आहे. तूसुद्धा आमच्यासारखीच एक आहेस. पण आम्हांला असं वाटतं, की ते लोक खरोखरच भयानक होते."

आणि त्या मुलींना दोष कोण देणार? त्यांचं बरोबर होतं. कारण त्या दोघी हिंदूंना भेटल्या, त्या केवळ दूरच्या नात्यातील एका जोडप्याला. जे जोडपं कधीतरी एकदाच त्यांच्याकडं आलं होतं. आणि ते जोडपं अगदी नेहमीप्रमाणेच कडव्या, जुनाट हिंदू रीतीरिवाजाप्रमाणेच वागलं होतं. म्हणजे मुसलमानांना अस्पृश्य समजून ते स्वतःचं जेवण स्वतःच तयार करीत. तसा त्यांचा आग्रहच असायचा. आणि या कुटुंबानं तयार केलेला कुठलाही पदार्थ ते खात नसत. जणू ते या कुटुंबात, घरातील लोकांत न्यूनगंडाचीच भावना निर्माण करीत. कालांतरानं या फाळणीवरच मी काम करत असता वीर बहादूरसिंग नावाच्या इसमाला भेटले. तो म्हणाला की, हिंदू आणि शीख यांनी मुसलमानांना कशी वागणूक दिली, याबद्दल काही सांगतो,
"आमच्या घरी कुठलाही समारंभ, कार्यक्रम असला, तर आम्ही मुसलमानांना बोलवत असू. ते आमच्या घरी जेवत, खात-पीत. परंतु आम्ही मात्र त्यांच्या घरी जेवत नव्हतो. खात-पीत नव्हतो. आणि ते काही चांगलं नव्हतं, हे आता मला समजलं. शिवाय मुसलमान जेव्हा आमच्या घरी जेवायला यायचे, तेव्हा आम्ही त्यांना त्यांच्यासाठी कोपर्‍यात वेगळी ठेवलेली भांडी घासायला सांगत असू. ती माणसं मग त्या ताट-वाट्यांत जेवायची आणि सगळी भांडी धुऊन ठेवायची. हा असला भयानक प्रकार तेव्हा होता. पाकिस्तानची निर्मिती होण्यासाठी हेच कारण होतं. आम्ही जेव्हा त्यांच्या घरी लग्नकार्यासाठी, समारंभासाठी जात होतो, तेव्हा त्यांनी आम्हांला अतिशय सन्मानानं वागवलं होतं. ते आम्हांला त्या वेळी कोरडा शिधा देत. तूप, पीठ, डाळ, त्यांच्याकडं जी काही भाजी असेल, ती आणि कोंबडीचं मटण- इतर मटण आणि ते ही कच्चं; आणि आमचं त्यांच्याशी वागणं इतकं हीन दर्जाचं होतं, की ते सांगायलासुद्धा मला लाज वाटते. एखादा पाहुणा आमच्या घरी आला, तर आम्ही त्याला सांगत असू, की ती भांडी घे आणि धुऊन आण. आणि आई किंवा बहीण त्या पाहुण्याला जेवायला वाढायच्या, त्या अगदी चमत्कारिक रीतीनं. पोळी वगैरे वाढताना त्यांच्या ताटात पोळी वरून फेकायची म्हणजे आई-बहिणीला अशी भीती वाटायची, की तो पाहुणा ताटाला स्पर्श करील आणि ताट दूषित होईल... हिंदू आणि शीखांनी मुसलमानांना जी वागणूक दिली, तशी वागणूक इतर हलक्या जातीच्या लोकांनी दिली नसेल किंवा तशी वागणूक इतर हलक्या जातीतील लोकांना आम्ही दिली नसेल."

वर्षानुवर्षं राणामामा आपलं अंतःस्थ कोंडमारा होत असलेलं आयुष्य जगत होता. त्यांतल्या त्यांत त्याच्या डोक्यात जे विचार होते, त्याची जपणूक त्यानं केली होती. राणामामाच्या या उलघालीविषयी कुणालाच धड माहीत नव्हतं. परंतु प्रत्येक जण विशेषतः त्याच्या घरातली माणसं मात्र साशंक होती. त्याची मुलं त्यांतल्या त्यांत मुली आणि सुना त्याची काळजी घेत. परंतु राणाच्या मनात कोणते विचार घोळत आहेत, त्याच्या मनात नेमकं काय आहे, याविषयी त्या सगळ्यांना भीती वाटत होती. मुलींनी त्याच्यावर जेवढं प्रेम केलं, त्याच्या तसूभरही त्याच्या मुलांनी मामाला प्रेम दाखवलं नाही. राणामामानं मिळवलेल्या संपत्तीवरच मुलांचं लक्ष होतं. कदाचित राणामामाच्या मनाची जी विचित्र कोंडी झाली आहे, तिची जाणीव फक्त एकाच व्यक्तीला झाली असणार, ती म्हणजे त्याची बायको, माझ्या मामीला. मला वाटतं, की राणामामाच्या वाट्याला धर्मांतरानंतर जी कुचंबणा आली, त्याची मानसिक उलाघाल झाली, ती आपल्या मुलांच्या वाट्याला येऊ नये, याची काळजी मामीनं घेतली. मुलांना तिनं मुसलमान धर्मीय म्हणूनच लहानाचं मोठं केलं. मुलींनी बुरखा धारण केला. मुल्ला-मौलवींना घरीच बोलावून त्यांच्याकडून शिक्षण दिलं. कुराणाचं पठन कसं करायचं, याचंही शिक्षण त्यांनी घेतलं. त्यांतल्या त्यांत तरुण असणार्‍या, सर्वांत लहान असणार्‍यांना, ज्यांना फाळणीचे संदर्भ आठवत नव्हते, घटना लक्षात नव्हत्या, त्यांच्या बाबतीत राणामामा हा परकाच राहिला. म्हणजे कुटुंबाच्या, घरादाराच्या अनेक हकीकती जपून असलेला, असा राणा हा एकाकीच राहिला. काही बाबतींत घरातील माणसांमधलं आणि राणामधलं अंतर वाढतच गेलं. आणि नंतर राणामामा जास्तच एकाकी पडला. इतर बाबतींत एक विलक्षण विरोधाभास होता, जो समजून घेतला पाहिजे. एक वयस्कर सन्माननीय पिता, अधिकार असलेली घरातील व्यक्ती म्हणून राणा निष्प्रभ झाला होता.

इतर पंजाबी कुटुंबातील सर्वसामान्य, मध्यमवर्गीय माणसांपेक्षा तो जास्तच सहृदय होता. तरीसुद्धा संपत्तीचा मालक असूनही, घरातील सर्व लहानमोठ्यांना तो एक अडचण, धोंड वाटत होता. हा लवकरात लवकर आपल्या मार्गातून कसा दूर होईल, हीच भावना त्याच्याविषयी घरात होती. इतकी चमत्कारिक परिस्थिती असताना तो राहिलाच कसा? तिथं असं कुणीही नव्हतं, की ज्याच्याशी तो या गोष्टी मनमोकळेपणानं बोलू शकला असता. राणामामानंच हे सर्व सांगितलं. आणि अशा मनाला यातना देणार्‍या, छळणार्‍या गोष्टी सांगणार कुणाला? आणि कशा सांगणार? राणामामाला समजून घेणारं तिकडं कुणीही नव्हतं. एकदा तोच मला म्हणाला होता, "काही गोष्टी न सांगितलेल्या बर्‍या." मग या गोष्टी त्यानं मला तरी का सांगितल्या? मी कोण?

एक दिवस संध्याकाळी आम्ही असंच बोलत होतो. फक्त चहा, आणि खाणं-पिणं असलं, की थांबत होतो. त्यादिवशी त्यानं फाळणी झाल्यापासून आपण आजपर्यंत कसे दिवस काढले, हे तो सांगत असताना माझ्या मनावर एक प्रचंड दडपण आलं. ते एक संकटच वाटत होतं. त्यानंतर मी मामाला विचारलं,
"तू हे सगळं मला का सांगतोयस? मी कोण आहे? माझ्याबद्दल तुला काहीच माहिती नाही. आपण इथं भेटलो, म्हणून ठीक आहे. बाहेर कुठं भेटलो असतो अगदी अचानक, तरी तू मला ओळखलंसुद्धा नसतंस. हे ठीक आहे की, आपली भाषा एक आहे. कपड्यांमध्येसुद्धा साम्य आहे. हे ठीक…"

त्यानं माझ्याकडं मग बराच वेळ बघितलं अन् तो म्हणाला,
"पोरी, माझ्या रक्ताचं जे नातं आहे, त्या नात्यांशी मी पहिल्यांदाच बोलतोय."
हे ऐकून मला थोडा धक्काच बसला. मला त्याचं बोलणं तितकंसं आवडलं नाही, मग मी म्हणाले, "तुझ्या घरातली माणसं तुझ्या रक्ताची आहेत. मी नव्हे."
तसा तो म्हणाला, "ना. त्या लोकांना मी परका आहे. मला वाटतं, तू मला समजून घ्यावं. तुला काही माहिती घ्यायचीय, म्हणूनच तू इथं आलीस. - आम्हांला सगळं सांग. हे जर काही घडलं नसतं, तर तू आली नसतीस. तू हा विषय निवडलास, तू आलीस, असं समजू या की, तू माझ्या डोक्यावरचं ओझं हलकं करण्यासाठी आलीस."

राणामामाचं बोलणं मला थोडं पटलं. आणि नंतर मला वाटायला लागलं की, केवळ फाळणीमुळं आतून-बाहेरून उद्ध्वस्त झालेली अशी कितीतरी माणसं असतील. हे सगळं मला आत्ता समजतंय. अशी किती तरी माणसं अबोलपणे, सगळं मनात साठवून शांतपणे जगत असतील. अशी कितीतरी माणसं असतील, की ज्यांनी आपलं मूक दुःख, मनोगत दुसर्‍याला मनमोकळं सांगितलं नसेल; आणि आम्ही तरी काय केलं? शाळेमध्ये भारताचा आधुनिक इतिहास शिकलो एवढंच, पण या देशाची फाळणी झाली आहे, स्वातंत्र्य आणि फाळणी एकदम जन्माला आलेल्या दोन उलटसुलट घटना; फाळणीची दुसरीही अशी वेगळी बाजू आहे, हे आम्हांला कुठं माहीत आहे? इतिहासकारांनी या भयानक घटनांची नोंद का घेतली नाही? का या संहारक, भीषण घटनेला कुठल्याच पुस्तकात जागा नव्हती?

मी पाकिस्तानातून भारतात परत आले, तेव्हा मी या दुसर्‍या हद्दीत राहणार्‍या नातेवाईकांसाठी भेट म्हणून पाठवलेल्या वस्तू, पत्रं, आणखीही कित्येक गोष्टी आणल्या होत्या. राणा कुटुंबातील प्रत्येकानं काही ना काही पाठवलं होतं. राणामामानंतर आपल्या बहिणींसाठी एक सविस्तर पत्र पाठवलं होतं. (राणामामाला एक भाऊ पण होता. तो वारला.) मी पत्र दाखवलं, तेव्हा सुरुवातीला आई संतापलीच. तिच्या मनात राणामामाविषयी फारच कडवटपणा भरला होता. तेव्हा तिची समजूत घालणं कठीणच गेलं. मी आले त्याच दिवशी आईच्या पाचही बहिणी आमच्या घरी आल्या होत्या. त्या अगदी एका ओळीत बसल्या. त्यांच्या मनांत मामाच्या पत्राबद्दल जिज्ञासा होतीच. पण त्याच्याविषयी तेवढाच रागसुद्धा होता. नंतर एकेकीनं ते पत्र घेतलं आणि वाचलं.

मग एकेक आठवणी निघाल्या. मोठ्यानं हसणं सुरू झालं. आणि मला त्या म्हणाल्या, 'आम्हांला सांग' सर्वांनी आग्रह केला. "आपलं ते घर कसं दिसतंय? अंगणातलं जुनं पेरूचं झाड तसंच आहे का? त्या चॉपर खेळाचं काय झालं? घराच्या मागच्या भागात कोण राहतंय?" असे अनेक प्रश्न विचारले. मी त्या प्रश्नांची उत्तरं जमतील तशी दिली. कोणत्या खोलीत कोण राहतंय आणि घर कसं बदललंय, हे मी कसं सांगणार? कारण ते जुनं घर मी कधीही बघितलं नव्हतं.

मामाचं पत्र पुन्हापुन्हा वाचलं गेलं. ते पत्र पुन्हापुन्हा वाचणं, पत्राचा वास घेणं, हसणं, रडणं हे सगळे प्रकार झाले. नंतर माझ्या आईनं आणि तिच्या बहिणींनी मग पाकिस्तानातील लोकांशी संबंध पुन्हा जोडले. मामाकडून नंतर नेहमीच प्रसंगानुरूप पत्रव्यवहार सुरू झाला. नंतर मीसुद्धा अनेक वेळा पाकिस्तानात गेले. मामाला भेटत राहिले. एकदा त्यानं माझ्या आईला पत्र लिहिलं.
"मला असं वाटतं, की उर्वशीला इथं एका पिंजर्‍यात घालूनच ठेवावं!"

मग आई मला म्हणाली की, तुझ्यामुळं मामाच्या आयुष्यात खूप बदल झालाय. खरंच मामानं मला अशी वागणूक दिली, की मला आता माघार घेऊन चालणार नव्हतं, सगळे संबंधच सुरळीत झाले होते. तरीपण जुने राग-लोभ थोडे राहिलेच. कित्येक अशा सुप्त गोष्टी आहेत, की त्यांची चर्चा करणं शक्य नाही.

एकदा मी पाकिस्तानात जायला निघाले तेव्हा आई मला म्हणाली, "मामाला विचार की, तू माझ्या आईला जाळलंस, का पुरलंस?"
तिच्या या बोलण्यानं मला सखेद आश्‍चर्य वाटलं. "तुझ्या आईनं कधी धर्माला फारसं महत्त्व दिलं नाही. ती नास्तिकही नव्हती. तिनं मनाचा तोल टिकवून ठेवला होता. तुला आता कशी काय आठवण झाली?" मी तिला विचारलं तेव्हा ती म्हणाली, "ते त्यालाच विचार."
ती अगदी कळकळीनं बोलली. आईच्या म्हणण्याप्रमाणे मी त्याला विचारलं, तेव्हा त्यानं मला आजीविषयी सांगितलं.
"आजी या देशात आपलं मूळ हिंदू नाव तसंच ठेवून राहिली कशी?" माझा प्रश्न.
"मला तिचा धर्म बदलावा लागला. इथले लोक तिला आयेशाबीबी म्हणूनच ओळखत होते." तो म्हणाला, "आईचं मी दफन केलं."

माझी आजी त्या मूक शांततेत, अंधुकशा वातावरणात फाळणीनंतर नऊ वर्षं राहिली कशी? तिच्या मुली जवळ नाहीत; त्या कुठं असतील, याचं तिला काहीच कसं वाटलं नाही? आपल्याला सगळ्या नातेवाइकांनी, मुलींनी सोडून दिलंय, असंच ती समजली असेल का? फाळणी झाली, त्यानंतर व आधी बर्‍याच घटना घडल्या आहेत, याची काहीच माहिती तिला समजली नसेल? नावाप्रमाणे खरोखरच ती दयावन्ती होती. नशीबवान. इतकं मोठं कुटुंब असलेली एक भाग्यवान आजी. तिची नऊ मुलं (सहा मुली आणि तीन मुलं) आणि तिचे पती. ज्यांचा भरभराटीला आलेला वैद्यकीय व्यवसाय. डॉक्टर. तेव्हा आजी नक्कीच नशीबवान, सुखी होती. तिच्याही आयुष्यात एक फार मोठी दुःखद घटना घडली. तिचा मोठा मुलगा, विक्रम, हा अपघातात गेला. विमानोड्डाणाचा सराव करत असता विमानाला अपघात झाला आणि त्यातच तो गेला. ते तिचं फार मोठं दुःख होतं. ती विसरत नव्हती. स्वयंपाकपाणी आणि घरच्या लोकांची देखभाल एवढाच काय तो तिचा विरंगुळा होता. नंतर दुसरी आपत्ती ओढवली. तिचे पती आजारी पडले आणि त्यातच गेले. तोही आधार गेला. ती पुन्हा अंतर्मुख झाली.

अर्थातच जेव्हा फाळणीची वेळ आली, तेव्हा तिला आजूबाजूला काय घडतंय हेच समजलं नसेल. मग असं वाटतं की, तिचं जे स्वतःचं, अत्मिक जग होतं, त्यातच ती रमली असेल. तोच तिचा विरंगुळा झाला असेल. अर्थातच, तिच्या वाट्याला फाळणीनंतर जे आयुष्य आलं असेल, त्याविषयी तिला काय वाटत होतं, तिच्या काय भावना होत्या, हे तिला कुणी विचारलं असेल असं मला वाटत नाही. माझी आई तिला नेहमीच 'कट्टर हिंदू' म्हणायची. म्हणजे ती काही अगदी जहाल हिंदू नव्हती. ती एक तेजस्वी ज्योत होती. तिचा धर्मावर विश्वास होता. ती उपासतापास करायची व आत्मिक समाधान मिळवायची. तरी सुद्धा तिचं नशीब पुढं कसं फिरलं; तर एका रात्रीत फाळणीच्या अनेक घटना घडल्या. तिचे दिवस फिरले. जप-तप-पूजा याचं तिला मिळालेलं हे फलित! मला उगीच वाटतं की, खरोखरच तिला शेवटी शेवटी काय वाटलं असेल? ती जास्तच विरक्तीकडं वळली असेल का? तिचं शांत चित, स्वच्छ मन... मग शेवटी तिला असा का अनुभव आला? फाळणीनंतर नऊ वर्षांत तिच्याबरोबर होतं कोण? तर दयावन्तीचं जगणं आणि तिचा शेवटी झालेला करुण अंत याविषयी इतिहास काही नोंद घेईल का? किंवा हे असं का घडलं, याचं स्पष्टीकरण तरी करील का?

फाळणीचा परिणाम काय झाला, तर एक कोटी वीस लाख लोकांनी स्थलांतर केलं. घरंदारं सोडली. जवळजवळ दहा लाख लोक प्राणांस मुकले. पंच्याहत्तर हजार स्त्रियांचं अपहरण झालं; त्यांच्यावर बलात्कार झाले. कित्येक स्त्रिया परधर्मीयांकडून गर्भार राहिल्या. हजारो कुटुंबांची ताटातूट झाली, घरंदारं जाळण्यात आली. खेडी ओस पडली. उत्तरेकडच्या, मोकळ्या, सुंदर जागा मग निर्वासितांच्या छावण्या झाल्या. परंतु आता पन्नास वर्षांनंतरही तिथे कुठे फाळणीचं स्मारक नाही, किंवा स्मृतिकेंद्र नाही. काही नाही. त्याशिवाय काही कुटुंबांनी, विशिष्ट समाजानं ज्या काही आठवणी जपलेल्या होत्या, त्याही आता हळूहळू पुसट होत चालल्या आहेत. ज्या वेळी मी फाळणीसंबंधी माहिती गोळा करायला लागले, त्या वेळी फारच चमत्कारिक, मन सुन्न करणार्‍या बातम्या ऐकल्या: त्याआधी ही ऐकत आले होते. त्या म्हणजे दोन्ही सरहद्दींजवळील खेड्यांत शेकडो स्त्रियांनी विहिरीत उड्या टाकल्या किंवा त्यांच्यावर उड्या टाकून प्राणार्पण करण्याची सक्ती केली गेली. कारण त्यांना पळवून नेण्याची, त्यांच्यावर बलात्कार होण्याची, त्यांचं सक्तीनं धर्मांतर होण्याची भीती होती. लोकांनी, त्यांतल्या त्यांत स्त्रियांनी स्वतःचं बलिदान द्यावं?

मग मी बीर बहादूरसिंगच्या आईला म्हणजे बसंत कौरला भेटले. साठीतली उंचीपुरी, सरळ बांध्याची ती बाई त्या वेळी खेड्यात राहत होती. खेडं होतं थोहा खालसा, साल होतं १९४७. त्याच वेळी स्त्रियांनी विहिरीत उड्या टाकून प्राणार्पण करण्याचा निर्णय घेतला. त्या वेळी नव्वदपेक्षा जास्त स्त्रियांनी मुसलमानांच्या भीतीनं विहिरीत उड्या टाकल्या आणि हा प्रकार त्या बसंत कौरनं प्रत्यक्ष पाहिला आहे. तिनं सुद्धा उडी टाकली होती. परंतु विहिरीत उडी घेतलेल्या सगळ्याच स्त्रिया बुडतील, इतकं पाणी नव्हतं. त्यामुळं ती जिवंत राहिली. ती म्हणाली,
"त्याचं असं आहे, की आपण जर तंदूरमध्ये बर्‍याचशा रोट्या टाकल्या, तर सगळ्याच काही भाजल्या जाणार नाहीत. सगळ्यांत वर असणार्‍या तशाच राहतील. तसंच झालं. आम्ही उड्या टाकल्या, पण तशाच जिवंत राहिलो. नंतर आम्हांला विहिरीबाहेर काढण्यात आलं, हा भाग वेगळा. ज्या विहिरीत खोल बुडाल्या, त्या गेल्या. आम्ही जिवंत राहिलो."

आणि तिचा मुलगा बीर बहाद्दूरसिंग यानं तर प्रत्यक्ष आपल्या बहिणीला, स्वतःच्या बापानं ठार मारताना बघितलं. आपल्यासमोर आपल्या बहिणीच्या प्रत्यक्ष जन्मदात्यानं केलेल्या हत्येचा तो साक्षीदार होता. आणि तो मोठ्या अभिमानानं सांगत होता, की आपली बहीण धीट होती. तिनं हौतात्म्य पत्करलं. इतर शीखधर्मीय हुतात्म्यांच्या मालिकेत ती जाऊन बसली. त्याच्या आवाजात प्रौढी होती. 'हृदयाची विभागणी' या चित्रपटाच्या निमित्तानं अमृतसरमध्ये मी मंगलसिंग नावाच्या म्हातार्‍या माणसाला जाऊन भेटले. आणि आपल्याच कुटुंबातील माणसांना कुटुंब प्रमुखानं कसं मारलं, याची माहिती मला मिळाली. आणि मला धोक्याचीच सूचना मिळाली. यापुढं विचित्र बातम्या ऐकाव्या लागतील, हे मला समजलं. मंगलसिंगनं सांगितलं,
"मी आणि माझ्या दोघा भावांनी मिळून घरातल्यांना मारण्याचा निर्णय घेतला." त्याच्या घरातील सतराजण हुतात्मे झाले, असं तो म्हणाला. आम्हांला ते कृत्य नाईलाजानं करावं लागलं, असं तो म्हणाला, "तसं केलं नसतं, तर त्या सर्वांना सक्तीनं धर्मांतर करावं लागलं असतं." आणि आपलं ते कर्तव्य पार पाडून मंगलसिंग अमृतसरमध्ये स्थायिक झाला. त्यानं आपल्या नव्या आयुष्याला अमृतसरमध्ये सुरुवात केली. मी ज्या वेळी त्याला भेटले, त्या वेळी तिघां भावांपैकी तो एकटाच राहिला होता. त्याचं हे कुटुंब नवं होतं. बायको, मुलं, नातवंडं. त्या सगळ्यांनी मंगलसिंगची सर्व हकीकत ऐकली होती. पण त्यांनी मनात काहीच ठेवलं नव्हतं.

"या सगळ्या गोष्टी तू कशासाठी माहीत करून घेतेयस?" त्यानं मला विचारलं, "याचा आता उपयोग काय?"
मी त्याला सांगितलं की, तुम्ही तुमचं दुःख, झालेलं अपरिमित नुकसान कसं सहन केलंत, या गोष्टी मला समजून घ्यायच्या आहेत. तेव्हा तो म्हणाला,
"माणसाची जी भूक असते, तिच्याबरोबर दुःख, यातना हे सगळं काही विसरावं लागतं. ते विसरलं जातं. तुझ्या हे लक्षात आलं का? जर तुमच्याजवळ काहीच शिल्लक नसेल, तुम्ही विरक्त झाला असाल, तर दुःख होण्याचं काही कारणच नाही."

ही सगळी हकीकत तुला कशासाठी पाहिजे आहे? मी ज्यांच्याकडं मुलाखत घेण्यासाठी म्हणून गेले किंवा ज्यांना मी माझं फाळणीसंबंधीचं लेखन दाखवलं किंवा कुणाला दाखवण्यासाठी मी गेले, त्या सगळ्यांनी मला हाच प्रश्न विचारला की, तू हे कशासाठी करते आहेस? या संशोधनाचा उपयोग काय? फाळणीवरच्या संशोधनाला सुरुवात करण्याआधी मी माझी कागदपत्रं अभ्यासू विद्यार्थ्यांच्या परिषदेत दोन-तीन वेळा तरी वाचून दाखवली होती. त्यांतले मला जे प्रश्न अवघड वाटत होते, तेच प्रश्न मी इतरांनाही वाचून दाखवले. त्यामागे माझा उद्देश एवढाच होता, की इतरांनाही माझ्या या मोहिमेत सहभागी करून घ्यायचं होतं; कारण मला माझ्या इतिहासाचं लेखन पारंपरिक पद्धतीनुसार करायचं नव्हतं. फाळणीची वेदना, लोकांनी भोगलेल्या जबरदस्त यातना धोपटमार्गी लेखन पद्धतीत सांगणं शक्यच नव्हतं. आणि दुसरं म्हणजे, हे काम करत असताना अनेकांचे बरेवाईट अनुभव एकत्र करून त्या अनुभवांना शब्दरूप द्यायचं काम सोपं नव्हतं. भारताच्या जडणघडणीत या लोकांचा व इतर अनेकांचा काय वाटा होता, याची आम्हांला काहीच माहिती नाही. आणि ज्यांना फाळणीमध्ये हालअपेष्टा, यातना भोगल्या, त्यांना हे नक्कीच माहीत नसणार, की त्यांचे सारे अनुभव, दुःख, यातना लोकांसमोर शब्दरूप मांडताना, म्हणजेच दुःख यातनांची चिरफाड करताना (लेखणीनं) इतिहासकार व्यथित होणार आहेत का? फाळणीची कहाणी सर्वांचीच होती. फाळणीनं अनेकांना ग्रासलं होतं. अनेक होरपळून निघाले होते. आमच्यासारखी कुटुंबं फाळणीत निर्वासित झाली होती.

माझं काम सुरू करण्याआधी काही काळ जाणारच होता. मी ज्या कथा, वेदना, हकीकती ऐकते आहे, पुढेही ऐकणार आहे, त्यांचा अर्थ कसा लावायचा? त्यांचा सारांश काय? मला एक मात्र कळून चुकलं होतं, की आपण इतिहासकार झाल्याशिवाय फाळणीच्या घटनांकडं निःशंकपणे पाहू शकणार नाही. माझ्या मनात अनेक शंका-कुशंका थैमान घालत होत्या. मी सध्या जे काही फाळणी संदर्भात ऐकते आहे, कुणाच्या तोंडून कथा, हकीकती वगैरे त्यांवर किती विश्वास ठेवायचा, खरोखरच त्यावर विसंबून राहावं का? इतकी वर्षं लोटल्यानंतरसुद्धा तेव्हाच्या गोष्टींवर, मौखिक माहितीवर कसा विश्वास ठेवावा? आणि अनेक लोकांनी मला जे आपले अनुभव सांगितले, अगदी निवडक माहिती सांगितली ती आणि तशीच माहिती त्या लोकांनी इतरांनाही सांगितली असणार. म्हणजे त्यांची दुःखं ऐकणारी मी काही पहिलीच लेखिका नसणार. मला याची पूर्ण कल्पना आहे की, मी एक पंजाबी कदाचित अर्धी शीख बाई आहे. तेव्हा लोकांनी मी विचारलेल्या प्रश्नांना जसा प्रतिसाद दिला, तसंच मी त्याचं शब्दांकन केलं. म्हणजे जसं कथन, तसंच शब्दांकन.

फाळणीतील लोकांच्या आठवणींना, पूर्वस्मृतींना मी आणखी किती महत्त्व द्यायला पाहिजे होतं? मी घेतलेल्या मुलाखतींमधून दरवेळी मी अनुभवलं काय, तर त्या लोकांमधली जातीय भावना, कडवटपणा, संताप हेच. आणि त्यांच्या तोंडून या हकीकती ऐकताना मला भीतीच वाटत होती. आणि हे सर्व कथारूप साहित्य जमा करून मी काय करायला पाहिजे होतं? आता यामधला खरेपणा शोधून लोकांपुढं ठेवायला, पर्यायानं जबाबदारी घ्यायला मी कुणी इतिहासकारतरी असायला पाहिजे होते. एक निधर्मी भारतीय असल्यामुळेच मी कोणत्या गोष्टी प्रसिद्ध केल्या पाहिजेत आणि कोणत्या नाही, याची काळजी मी घेतली पाहिजे? या आणि अनेक अशा प्रश्नांनी माझा सतत पाठपुरावा केला होता. मी ज्या काही मुलाखती घेतल्या होत्या, त्या एकतर्फीच असतील, म्हणजे सांगणार्‍यांनी नाण्याची एकच बाजू मांडली असेल, तर त्या प्रसिद्ध करणं योग्य होईल का? म्हणजे जे साहित्य मी जमवलं आहे, ते उसनंच आहे. आणि याची पहिली किंवा दुसरीच बाजू फक्त प्रसिद्ध करणं म्हणजे त्या साहित्याचा दुरुपयोगच करणं नव्हे का? आजपर्यंत तरी हा प्रश्न मी सोडवू शकलेले नाही. खरं तर, मला प्रामाणिक राहणं आवश्यक होतं आणि म्हणूनच काळजीही घेणं महत्त्वाचं होतं. तेव्हा माझी अशी द्विधा अवस्था झाली होती. आणि मी ज्यांच्याकडे गेले, त्या लोकांनी मला प्रत्येक वेळेला प्रश्न विचारला, की तू हे कशासाठी आणि का करतेयस? हा प्रश्न वेगळ्याच कारणानं माझ्यासाठी महत्त्वाचा होता; ज्या भूमिकेतून आमच्या या दोन देशांमध्ये सीमारेषा आखली होती, ती कारणं लक्षात घेता, मला पाकिस्तानात जाऊन प्रत्येक गोष्टीची शहानिशा करणं जवळजवळ अशक्यच झालं होतं. मुलाखती घेणं दुरापास्त झालं होतं. त्यामुळं झालं काय, तर माझं जे काम होतं, ते अर्धवट म्हणजे एकतर्फीच झालंं होतं आणि मला माहीत होतं, की हे काही खरं नाही. मला काय करावं, हेच कळत नव्हतं. मी घेतलेलं काम सोडून द्यायला पाहिजे होतं का? प्रश्न सोपा नव्हता. उत्तरही सोपं नव्हतं. शेवटी मी ठरवलं, की आपण करतोय हे काम जर खरोखरच चांगलं आहे, असं वाटत असेल, तर मी हे काम, कार्य पुढं चालू ठेवायला हवं. सोडून चालणार नाही.

निदान सुरुवातीची काही वर्षतरी भारत-पाकिस्तान सीमेवरचे निर्बंध फार जाचक नव्हते. जाणंयेणं सहज शक्य झालं होतं. त्याचा चांगला परिणाम म्हणजे मी पाकिस्तानात अनेक वेळा जाऊ शकले व राणामामाशी नातं दृढ करू शकले. आपापसांतील संबंध वाढवू शकले. एकदा राणामामाच्या दुसर्‍या मुलीचं लग्न होतं त्या वेळी मी माझ्या आईला व तिच्या थोरल्या बहिणीला घेऊन पाकिस्तानात मामाकडं गेले होते. आम्ही लग्नाला जायचा बेत ठरवला, तेव्हा आमची उत्सुकता वाढली होती. कारण आम्हांला कुठे तरी परक्या, अनोळखी ठिकाणी आपण जाणार आहोत, असं वाटत होतं. त्या दोघींना कल्पना नव्हती, की त्यांचा भाऊ त्यांच्याकडं कोणत्या भावनेनं बघेल. राणामामाची तेव्हा प्रतिक्रिया काय होईल? त्यांचं घर त्यांना कसं वाटेल? आणि त्यांचं आवडतं शहर, लाहोर त्या दोघींचं स्वागत कसं करील? विमानतळावर राणामामा त्याच्या दोघी बहिणींना घेऊन जाण्यासाठी आला होता. एक्केचाळीस वर्षांपूर्वी माझ्या आईनं आणि मावशीनं राणामामाला बघितलं होतं. त्या वेळी तो वीस वर्षांचा तरुण होता. सडपातळ, उंच आणि तरतरीत. आणि आता जो माणूस त्यांना भेटला, तो साठीतला, टक्कल पडलेला, आहेत ते केस पांढरे झालेला होता. त्यानं त्या वेळचा प्रसिद्ध अवामी पोशाख परिधान केला होता. घोळदार पायजमा आणि शर्ट. त्या वेळी भुट्टो तसा पोशाख करीत म्हणून तो प्रसिद्ध झाला होता. मी कल्पना करत होते, की तो बघणार काय, तर दोन पांढर्‍या केसांच्या स्त्रिया. माझी मावशी सत्तरीतली आणि आई साठीतली. ही दीर्घकाळानंतर झालेली गाठभेट तशी औपचारिक नव्हती. सांगणं तसं कठीणच; कारण सगळेच स्वतःचे अश्रू आवरण्याचा प्रयत्न करत होते.

आता मी एखाद्या पाहुणीसारखी, तिर्‍हाइतासारखी बाजूला उभी होते. माझी मैत्रीण लाला विमानतळावर आली होती. ती मला म्हणाली, "त्या दोघींच्या व तुझ्या मामाच्या चेहर्‍यावरचे भाव मी कधीच विसरणार नाही. शब्दांमध्ये व्यक्त करणं ते कठीणच होतं."

आम्ही गाडीतून घरी आलो. घरी येताना गाडीमध्ये सगळेच मोजकं बोलत होते.

आम्ही घरी आलो. हेच ते घर ज्या घरामध्ये माझी आई, मामा व इतर भावंडं मोठी झाली. माझ्या आईला व तिच्या बहिणीला या घराचा कोपरान कोपरा माहीत होता. आणि आज हेच घर आणि घरातली इतर माणसं त्या दोघींना परकी वाटत होती. खरोखर अनोळखीच होती. तेव्हा या घरात त्या दोघींना मोकळेपणानं प्रवेश करणं शक्यच नव्हतं. त्या दोघींनी अगदी नम्रपणे घरात प्रवेश केला. परंतु माझ्या मामीनं दोघींचं स्वागत फार चांगलं केलं. ती अत्यंत प्रेमळपणे वागली. माझ्या मनात शंका आली. ती म्हणजे पाकिस्तानची सरहद्द सोडून गेलेल्या या दोघी (आणि मी सुद्धा) आज या लग्नघरी कशासाठी आल्या आहेत? त्या इथं काय करताहेत? ही माणसं इतर पाहुण्यांसमोर आपली पंचाईत तर करणार नाहीत? मामी आणि तिच्या दोन मुली आधी एक-दोन दिवस जरा जपूनच वागल्या. त्या तिघी जेव्हा आमच्याशी बोलत, तेव्हा वाटत होतं, की त्या मनमोकळं बोलत नाहीत, त्यांच्या मनांवर कसला तरी ताण आहे. कुठल्या तरी दडपणाखाली त्या वावरताहेत. एक-दोन दिवस गेल्यावर मात्र त्या तिघीजणी मोकळेपणानं बोलू लागल्या. मग मात्र माझा मामा, आई, मावशी एका खोलीत बसून जुन्या आठवणींना उजाळा देऊ लागले. कधी हसायचे. कधी त्यांना रडू यायचं. मामानं आपल्या दोघी बहिणींना सगळं घर दाखवलं. त्या जुन्या खोल्या, ते आवडतं पेरुचं जुनं झाड सारं काही डोळे भरून बघून घेतलं. अर्थातच आईवडील, नातेवाईक, घराण्याचे पूर्वज यांच्या आठवणी निघाल्या. ज्या वेळी आम्ही विमानतळावर उतरलो, त्या वेळी मी, मामा, आई आणि मावशी यांची मध्यस्थ होते. म्हणजे ओळखी होईपर्यंत (खरं तर, ओळख पटेपर्यंत) पण आता त्या तिघांना माझी जरूर भासत नव्हती. नंतर मी त्यांना सांगितलं, की मी आता माझ्या मैत्रिणीबरोबर राहते. म्हणजे लालाबरोबर. अर्थात लालाबरोबर राहताना मला थोडं अपराध्यासारखं वाटत होतं. पण तरीसुद्धा मी खुशीत राहिले. त्या तिघांची गाठभेट घडवून आणली यातच मला आनंद वाटत होता. आता ते तिघं मनमोकळं बोलू शकतील. म्हणजे मी नसतानासुद्धा. पण माझ्या एक लक्षात आलं नाही, की दूर गेलेलं एक कुटुंब अनेक वर्षांनी एकत्र येतं आणि लगेच एकरूप होतं, हे आश्‍चर्यच नाही का?

आता मामाच्या घरातल्या माणसांसंबंधी सांगायचं झालं तर, लग्नकार्यासाठी म्हणून दोघी बहिणी इथं येणं हे साहजिक होतं. शेवटी ते नातं रक्ताचंच होतं. आणि मुसलमान कुटुंबात हिंदूंना राहता येणार नाही, असा कायदा थोडाच होता? आणि समजा, तसा कायदा असताच, तर? आणि समजा, लग्नकार्यात हिंदूंनी त्या कुटुंबात काही अडचणी निर्माण केल्या, तर काय? म्हणजे आपल्या जमीनजुमल्यावर हक्क सांगण्यासाठीच हिंदू लोक इथं आले असते तर काय? आता दुसरी एक अडचण म्हणजे, माझी आई आणि मावशी या दोघी म्हातार्‍या झालेल्या. वयानुसार आणि रीतिरिवाजांनुसार त्या दोघींचा आदर ठेवायला पाहिजे. याचा अर्थच असा की, त्या दोघींना लग्नकार्यात वेगळी जागा करून दिली पाहिजे. त्यांना सन्मानानं वागवलं पाहिजे. आणि याची चाहूल मला लागली होती. एक अनाकलनीय स्तब्धता मला घरात जाणवू लागली. या बाबतीत दुरावा वाढत गेला. जी सीमा ओलांडून आम्ही इथं आलो, ती सीमा कशी सहजपणे आखली गेली, याची जाणीव मला झाली.

मी काही वर्षं राणामामाकडं जाणंयेणं चालू ठेवलं होतं. पत्रव्यवहार चालू ठेवला होता. मला काहीतरी करून राणामामाला पुन्हा भेटण्यासाठी जायचं होतं. म्हणून मी ही पूर्वतयारी करत होते. पण ते तेवढं सोपं नव्हतं. आमचा पत्रव्यवहार चालू होता, त्या वेळी पाकिस्तानी पोलिसांनी मामावर नजर ठेवली होती. तेव्हा मामाला काळजी वाटायला लागली. मग त्यानं आम्हांला पत्र पाठवणंच बंद करून टाकलं. परंतु माझ्या आईनं काही दिवस तरी राणामामाला पत्रं पाठवणं, भेटवस्तू पाठवणं चालूच ठेवलं होतं. त्यानंतर मीसुद्धा माझ्या मैत्रिणींमार्फत राणामामाला अनेक वेळा निरोप पाठवले, पत्रं पाठवली. एक दिवस मामानं माझ्या मैत्रिणींमार्फत उलट निरोप पाठवला. "माझ्याशी तू शक्य तो संपर्क ठेवू नकोस. त्याचे परिणाम वाईट होतील. माझ्यापुढं अनेक अडचणी निर्माण होतील." हा निरोप अधिकृत होता. घरातल्या लोकांनीसुद्धा निदान आपल्या मुलाबाळांसाठी तरी भारतातील तुमच्या नातेवाइकांशी संबंध ठेवू नका; पत्रव्यवहार करू नका, म्हणून मामावर दडपण आणलं होतं. आणि नंतर परिस्थिती अशी आली, की कोणत्याही परिस्थितीत एका देशातून दुसर्‍या देशात जाणंयेणं फार कठीण होऊन बसलं. राणामामाची भेटगाठ होऊन आता बरीच वर्षं झाली होती. त्याचं काय झालं, तो आहे, का नाही, याची मला काहीच माहिती मिळाली नाही. पण तसं काही झालं नसेल. तो जिवंत असावा आणि त्यानं खुशालीत जगावं, असंच मला वाटत होतं. पण ज्या अर्थी त्याच्याबद्दल कुणी बरीवाईट बातमी सांगितली नाही, त्या अर्थी तो अजून जिवंत असणार आणि काही घडलं, तर कुणीतरी आपल्याला बातमी सांगणारच. तो नक्कीच सुखरूप असेल. त्यानं तसंच राहावं. मी माझ्या मनाची समजूत करून घेत होते. पण माझा आशावाद मलाच भ्रामक वाटू लागला. मला आठवतं, की आईच्या सांगण्याप्रमाणे मी मामाला तेव्हा विचारलं होतं, "तू आजीचं दहन केलंस का दफन केलंस? तू जे काही केलं असेल, त्याप्रमाणे तू मला तिकडं घेऊन चल. म्हणजे स्मशानात किंवा कबरस्तानात. मला ती जागा बघायचीय." मला आठवतं, संध्याकाळच्या वेळी आम्ही दोघे बोलत होतो. बाहेर बघता-बघता मी त्याला हा प्रश्न विचारला होता. तेव्हा जमिनीवरची धूळ पायानं झटकत तो म्हणाला,
"नाही पोरी, तशी म्हणजे, मी तुझ्या आजीचं काय केलं आहे, हे सांगण्याची माझ्या मनाची तयारी अजून तरी झाली नाही."

१४ ऑगस्ट १९९६ रोजी जवळजवळ शंभर भारतीय नागरिकांनी भारत-पाकिस्तान सरहद्दीवर असलेल्या पंजाबमधील 'वाघा' या गावाला भेट दिली. या नागरिकांच्या मनांत बरेच दिवसापासून येतं होतं, की 'वाघा'जवळ जावं. आपल्या मनातील सद्भावना पाकिस्तानी हद्दीतील नागरिकांपाशी व्यक्त कराव्यात. दोन्ही देश मनानं एकच आहेत. फक्त मध्ये एक रेषा आहे, एवढंच. म्हणजे अतिशय उदात्त हेतूनं हे लोक पंजाबमध्ये गेले होते.

भारतीयांनी आणि पाकिस्तानी लोकांनी सरहद्दीवर दोन्ही बाजूला समान संख्येनं उभं राहावं आणि शांततेसाठी गाणी म्हणावीत. भारतीयांची अशी कल्पना होती की, सरहद्दीवरची चौकी ही प्रतीकात्मक असावी आणि तिथून दोन्ही बाजूंच्या नागरिकांना आपल्या दुसर्‍या विभागाचं दर्शन घेता यावं. परंतु त्या सर्वांची निराशाच झाली आणि त्यांना परत यावं लागलं. कारण भारत-पाकिस्तानमधील सरहद्द ही फारच अडचणीची होती. सरहद्द ओलांडणं एवढं सोपं नव्हतं.

भारतीय हद्दीत एक कमान होती. त्या कमानीवर विजेच्या निळसर प्रकाशात अक्षरं झळकत होती. 'मेरा भारत महान!' आणि पाकिस्तानी हद्दीत तशाच कमानीवर लाल अक्षरे झळकत होती. 'पाकिस्तान झिंदाबाद!' या ठिकाणी लोक सहलीसाठी येतात; खातात, पितात आणि मजा करतात. रोज संध्याकाळी इथे धार्मिक विधी चालतात. कशासाठी, तर पुन्हा विपरीत काही घडू नये, म्हणून. दोन्ही देशांनी एकमेकांच्या कुरापती काढून एकमेकांवर हल्ले करण्याचं, अतिक्रमण करण्याचं सोडून द्यावं व शांतता नांदावी, यांसाठी. दररोज झेंडे खाली घेतले जातात, दोन्ही बाजूंचे सुरक्षा सैनिक खाडखाड करत एकमेकांसमोर येतात आणि मोठ्या तडफेनं पुन्हा मागं वळून आपापल्या जागी जातात. हा संध्याकाळचा विधी इतक्या अचूकपणे रोज केला जातो, तेव्हा मनात येतं, की या दोन्ही बाजूंच्या सुरक्षा सैनिकांना आपसांतले फरक, वेगळेपण, सीमारेषा यांचं संरक्षण करताना किती प्रयास पडत असतील, किती कसरत करावी लागत असेल. दिवसाउजेडी लोक सीमारेषेजवळ येतात, त्या वेळी तिथं जे हमाल असतात, त्यांच्या गणवेशांचे रंग निळे आणि तांबडे असतात. हेतू हाच की हा आमचा आणि हा त्यांचा हमाल हे ओळखता यावं, फरक लक्षात यावा! दोन्ही बाजूंचे हमाल बारा इंची रुंद अशा सीमारेषेवर येतात, जड बॅगा वगैरे सामान एकमेकांकडं सुपूर्द करतात. सामान पोहोचतं करताना दोन्ही बाजूंच्या हमालांची डोकी एकमेकांजवळ येतील. पण पाऊल मात्र एका रेषेच्या आत आणि दुसरं बाहेर असतं. पाळणीचं दुःख, यातना, हिंसाचार वगैरेंच्या आठवणी सरहद्दीवर काढल्या जात नाहीत. किंवा इतर कुठंही म्हणजे भारत, पाकिस्तान, बांगला देशात जाहीरपणे याची वाच्यता होत नाही. फाळणीत दहा लाख लोक तरी मेले असतील; पण त्यांचं स्मारक कुठंच झालं नाही. लोकांच्या जवळ फाळणीच्या संदर्भात ज्या (दुःखद) आठवणी, आहेत, त्या क्वचितच घराबाहेर सांगितल्या जातात. आपला धर्म, जातपात सोडून इतर कुणालाही या घटना सांगितल्या जात नाहीत. अशा आठवणी, अनुभव फक्त आपल्या हाडामांसाच्या नातेवाईकांनाच, जातीतल्या लोकांनाच सांगितल्या जातात.

मूळ पुस्तक - The Other Side of Silence, Duke University Press, 2000
भाषांतर - नारायण आवटी; मेहता प्रकाशन; २००१
पुनर्मुद्रणाची परवानगी देण्याबद्दल लेखिका उर्वशी बुटालिया आणि मराठी भाषांतराचे प्रकाशक मेहता प्रकाशन ह्यांचे आभार.

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

बाप रे!!! हा लेख वाचायचा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0