जेवण
सर्वप्रथम एखादी बरीशी पदवी मिळवावी; एकापेक्षा दोन बऱ्या, दोनापेक्षा तीन बऱ्या. पदव्या. पण एकसुद्धा पुरेल. मग एक नोकरी शोधावी. व्यवसायही चालेल. पदवी आणि नोकरीचा संबंध असण्याची गरज नाही. मग एक बुवा शोधावा. तो बरा असला पाहिजे, बरा अर्धा नसला तरी चालेल.
मग एखादा शुक्रवार निवडावा. आधी आठवडाभर नाकावर टिच्चून नोकरी, व्यवसायाचं काम करावं. आपण चिक्कार काम केलं की कोणाचं ना कोणाचं नाक टिचतंच. कुणाचं, ते महत्त्वाचं नाही. शुक्रवारी दुपारी कामातूनच सवड काढून डुलकी काढावी आणि डुलकी काढल्याचं जाहीर करावं. ह्यातून आपण आठवडाभर खच्चून काम केलंय, हे साटल्यपूर्ण पद्धतीनं व्यक्त होतं.
संध्याकाळी प्रश्न येतो, "जेवायचं काय?"
आपण जाहीर करावं, "सँडविच."
बरा (अर्धा) म्हणतो, "चल, जेवू या."
आपण सावकाशपणे सोफ्यावरून उठत म्हणावं, "तू सँडविच लावायला घे. मी बाहेरून बाझिल आणते."
सँडविच लावायला साधारण पाच मिनीटं लागत असतील तर तीन मिनिटं बाझिलच्या रोपांचं निरीक्षण करावं. अर्ध्या मिनिटात बाझिल काढून होतं; एक मिनीट ते धुवायला लागतं. (बाझिल धुतलेलं पाणी पुन्हा झाडांना घालावं.) धुतलेलं बाझिल त्याच्या हातात द्यावं आणि पुन्हा निवांतपणे सोफ्यावर जाऊन बसावं. सँडविच आपल्या समोर येतं. स्वयंपाकघरातून सोफ्यापर्यंत ते कसं येतं, रोबॉट आणतो का बरा (अर्धा) वगैरे चौकश्या करू नयेत. कधीमधी आपलं शिक्षण वगैरे सगळं गुंडाळून टाकावं, आपल्या लाजेसारखं.
ते सँडविच असं दिसतं. चबाटा पावावर पेस्तो, मोझारेला चीज, टोमॅटो आणि बाझिलची ताजी पानं. (काटा-सुरी स्टीलचे आहेत. त्यावर प्रकाश कसा चमकतोय ते पाहा!)
आपल्या ताटातले शेवटचे दोन घास राहिलेले असताना जाहीर करावं. "आपल्याकडे गोडसुद्धा आहे."
"काय आहे", उत्सुक बऱ्या (अर्ध्या)चा प्रश्न.
उत्तर न देता जागेवरून उठावं. मुगाच्या शिऱ्याचं पाकीट फोडावं आणि बऱ्या (अर्ध्या)ला वास द्यावा. "वास वाईट नाहीये ना?"
तो लिखित शब्दप्रामाण्य मानणारा असावा. "कधीचं आहे ते? कुणी आणलं?" त्यावर उत्तर देऊ नये. ह्या दोन्ही पायऱ्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत.
पाकिटावर लिहिल्यानुसार दूध आणि पाणी कढईत घेऊन पाकीट रिकामं करावं; पाकीट गॅसशेजारी ठेवून, जिन्नस उकळायला लावून पुन्हा निवांतपणे सोफ्यावर जावं. उरलेले दोन घास खायला सुरुवात करावी. बऱ्या (अर्ध्या)ला अजिबात राहवत नाही; एक्सपायरी उलटलेली वस्तू अशी कशी खायची! एक्सपायरीबद्दल पाकिटावरचे लिखित शब्द बघायला तो गॅसपाशी जाईल. म्हणूनच त्या वरच्या पायऱ्या महत्त्वाच्या आहेत. "बघ जरा ते लागतंय का?"
मग तो शिरासुद्धा आपसूक सोफ्यापर्यंत येईल. बसल्याजागी जमेल तसा त्याचा फोटो काढावा. "पुरणासारखा लागतो नै! साखर अंमळ कमी असती तर चाललं असतं."
खुपच सुंदर
आमच्यात त्या वरच्या पदार्थाला कॅनापे म्हणतात, तो मार्गारीटा सोबत शुक्रवारी संध्याकाळी खाण्याचा रिवाज आहे. तो दुसरा पदार्थ मात्र जरा वेगळा वाटला. नासाने माणूस चंद्रावर पाठविण्यापुर्वी यानात खाण्यायोग्य काय काय पदार्थ नेता येतील ह्याविषयी संशोधन केले होते. त्यात हा पदार्थही होता.
मंगळावर पाउल ठेवणाऱ्या पहिल्या भारतीयांच्या नाश्त्यात काय काय देता येईल ह्यावर संशोधन झाले पाहिजे.
गंडलेल्या गंडवलेल्या
गंडलेल्या गंडवलेल्या फसवलेल्या आणि फसलेल्या पाककृतींचे लेख फारच करमणूक करतात.
तुमच्याकडे माइंडगेम्स आट्यापाट्या चालतात.
एकूण तुमचा बरा अर्धा यांचेबद्दल आदर वाढतो आहे.
----------
फोटोंसह लेख मस्त झालाय.
-----------
शेवटचा पाककृती {लेख} 'एका भेंडीचं काय करायचं' आठवला.
.
बाझिलची चटणी नाही करता येत का? पुदिन्यासारखी?
विकतचं ते पौष्टिक आणि चविष्ट! फार्मर्स मार्केटात स्थानिक पीकान वापरून केलेला पेस्तो मिळतो. आम्हांला तोच खायची सवय लागली आहे. भर उन्हाळ्यात त्यात हिरवा रंगही जास्त दिसतो.
बाझिलचे बर्फासारखे तुकडे फ्रीज करून वापरता येतात; किंवा तू म्हणतेस तशी पूडही करतात. मी जास्त आलेला बाझिल शेजाऱ्यापाजाऱ्यांत वाटून टाकते.
पाककृती?
पाककृती सदरात लेख. यात पाककृती काय आहे नक्की? आपले कौतुक कसे करावे याची कृती आहे का