Skip to main content

बलात्कारः (गैर)समज आणि तथ्ये

आपल्याकडे एकूणच बलात्कार आणि त्यासंबंधीचा विदा यावर जाहीर वाच्यता होत नव्हती. दिल्लीच्या नृशंस घटनेनंतर यावर समाजात विविध मतांतरांची मुक्तपणे घुसळण चालू आहे ती स्वागतार्ह वाटते. जालावर किंवा प्रत्यक्षात कित्येक सामान्यांकडूनच नव्हे तर काही प्रशासकीय अधिकारी, पोलिस अधिकारी, आमदार/खासदार/नगरसेवक वगैरेंकडून कधी प्रत्यक्षपणे किंवा कधी अप्रत्यक्षरीत्या स्त्रियांनी 'आव्हानात्मक' कपडे घालू नयेत, 'ओळखीच्या' व्यक्तीसोबत स्त्री अधिक सुरक्षित असते, बलात्कार हे 'अचानक'- त्या वेळच्या मन:स्थितीमुळे होतात वगैरे प्रकारची विधाने करताना आपण ऐकतो.

ही विधाने केवळ समज आहेत की त्याला ठोस शास्त्रीय आधार आहे का? याचा विविध विद्यापीठांनी अभ्यास केलेला आहे. त्यातील काही पेपर्स जालावर उपलब्ध आहेत. त्याच्या आधारावर काही प्रमुख समज-गैरसमज आणि तथ्ये यांच्यावर प्रकाश टाकण्याचा या लेखाचा हेतू आहे. हा अभ्यास अमेरिकेत झाला आहे. माझ्यामते बलात्कारी व्यक्तीच्या मानसिकतेचा अंदाज येण्यासाठी यामुळे फरक पडू नये. मात्र तरीही अमेरिकेतील परिस्थिती व विदा भारतात लागू नाही असे वाटत असेल तरीही एकदा माहिती वाचून काढावी आणि मग निष्कर्ष काढावा असे वाटते.

समजः महिला पुरुषांना बलात्कारासाठी काही वक्तव्यांतून किंवा आव्हानात्मक कपड्यांतून किंवा रोजच्या वागण्यातून उद्युक्त करतात.
तथ्ये:

  • अमेरिकेच्या A Federal Commission on Crime of Violence ने केलेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की केवळ ४.४% प्रकरणांमध्ये स्त्रीने केलेल्या आव्हानात्मक कृत्याने किंवा कपड्यांमुळे पुढील दुर्घटना झाली आहे. अर्थात ९५.६% प्रकरणात यात स्त्रीच्या आव्हानात्मक वर्तणुकीचा किंवा कपड्यांचा संबंध नसतो.
  • तो अभ्यास असेही दाखवतो की बलात्कारित महिलेने कोणते कपडे घातले होते हे बहुतांश बलात्कार करणार्‍यांच्या लक्षातही नसते
  • युनिव्हर्सिटी ऑफ मिनिसोटा केलेल्या अभ्यासानुसार बहुतांश बलात्कार हे 'ठरवून' केलेले असतात, अर्थातच ती स्पॉन्टॅनियस कृती नसते स्त्रीने घातलेले कपडे बलात्कार करणार्‍याच्या दृष्टीने गौण असतात
  • अजून एका (थेरेसा बेइनेर यांनी केलेल्या) अभ्यासानुसार तर अधिक शरीर दाखवणार्‍या मुलींवर झालेल्या बलात्काराचे प्रमाण जीन्स, पायजमा किंवा अंगभर कपडे घालणार्‍या मुलींपेक्षा बरेच कमी आहे. - त्यांच्यामते त्याचे कारण अश्या स्त्रियांवर बलात्कार करण्याने पुरुषांचे 'वर्चस्व' गाजवण्याचे, काहीतरी लुबाडण्याचे 'आव्हान' कमी होते

समजः फक्त सुंदर, आकर्षक, तरुण मुलींवरच बलात्कार होऊ शकतो
तथ्ये:

  • अमेरिकेच्या National Victim Center, The Federal Bureau of Investigations and the National Crime Survey या तिघांनीही स्वतंत्रपणे जमवलेला विदा मिनिसोटा युनिव्हर्सिटीने अभ्यासला असता असे दिसते की बलात्कार कोणत्याही वयाच्या, कोणत्याही वर्णाच्या, बांध्याच्या मुलींवर/महिलांवर होतो.

समजः परिचित व्यक्तीसोबत बाहेर जाणे चांगले कारण परिचिताकडून बलात्कार होण्याची शक्यता कमी असते.
तथ्ये:

  • अर्ध्याहून अधिक बलात्कार हे परिचित व्यक्तीकडूनच होतात. बलात्कारित स्त्रीपर्यंत सहज पोचता येणे, तिच्या सवयींची / वेळापत्रकाची माहिती असणे, इतर व्यक्तींच्या विश्वासामुळे आपल्यावर आळ येणार नाही अशी आशा वगैरे गोष्टी परिचिताच्या बाजूने असतात.
  • स्वतःच्या इच्छेविरुद्ध नवर्‍याकडून बलात्कार होणार्‍या कित्येक स्त्रियांचा अभ्यास केल्यास हे प्रमाण भयावहरीत्या बदलेल असा अंदाज अनेक तज्ज्ञ व्यक्त करतात.

समजः बलात्कार केवळ महिलांवरच होतात.
तथ्य:

  • प्रौढ पुरुषांवर बलात्काराचे प्रमाण नगण्य असले तरी १२ ते १६ वर्षांपर्यंतच्या मुलग्यांवर अनेकदा बलात्कार केले जातात (व यातील बहुतांश बलात्कारी हे 'स्ट्रेट' आणि विवाहित असतात.)
  • 'ऑरेंज काऊंटी रेप व्हिक्टिम' चा संकलित विदा पाहता एकूण बलात्कारितांपैकी ८% हे पुरूष आहेत. आणि त्यांच्यावर बलात्कार करणारे आणि ते स्वतःदेखील 'स्ट्रेट' आहेत. समलैंगिकांवर होणारे बलात्कार देखील बहुतांश वेळा भिन्नलिंगी व्यक्तीच करतात

समजः बलात्कार ही अचानक होणारी कृती असून, बलात्कार करणारे 'सेक्श्युअली फ्रस्ट्रेटेट' असतात.
तथ्ये

  • बहुतांश युनिव्हर्सिटीज असे सांगतात की बलात्कार हा 'लैंगिक प्रेरणेतून' होत नसून दुसर्‍या व्यक्तीवर अधिकार / वर्चस्व गाजवायच्या ईर्ष्येतून होत असतो.
  • युनिव्हर्सिटी ऑफ मिनिसोटाचा अभ्यास सांगतो की ७१% बलात्कार हे 'पूर्वनियोजित' असतात
  • बलात्कार करणार्‍यां पुरुषांपैकी लग्न होऊन ते आपल्या पत्नीशी नियमितपणे शरीरसंबंध ठेवणार्‍यांचे प्रमाण ६०% भरते

समजः बहुतांश बलात्कार करणारे पुरुष हे मानसिक रुग्ण असतात आणि त्यांची लैंगिक भूक अमाप असते
तथ्यः १३०० व्यक्तींचा अभ्यास असे दाखवतो की काही व्यक्ती अश्या प्रकारच्या असतात मात्र बहुतांश पुरूष हे मानसिक दृष्ट्या विकलांग नसतात आणि त्यांची लैंगिक भूक सामान्य असते. मात्र बहुतांश व्यक्ती ह्या तापट आणि दुसर्‍यावर अधिकार गाजवणार्‍या असतात.

समजः 'गँग रेप' ही अपवादात्मक (रेअर) कृती आहे.
तथ्यः अमेरिकेतील ४३% बलात्कारात एकापेक्षा अधिक व्यक्तींचा सहभाग असल्याचे समोर येते.

समजः बलात्कारित स्त्रीला झालेल्या बलात्काराविषयी प्रश्न विचारले जाऊ नयेत. त्याने तिला सदर घटना विसरण्यास मदत होते
तथ्यः मानसोपचार तज्ज्ञांच्यामते, मानसोपचार तज्ज्ञांच्या समोर किंवा जवळच्या नातेवाइकाकडे झालेल्या बलात्काराचे साद्यंत वर्णन करण्याने स्त्रीचे मानसिक आरोग्य सुधारण्याला अधिक बळ मिळते. भारतात अश्या स्त्रीला 'गप्प बस, वाच्यता करू नकोस', 'त्या पुरुषाशी लग्न करून' किंवा 'आतल्या आत मिटवून' कॉप्रमाईज करायला भाग पाडले जाते त्यामुळेही बलात्कार करणार्‍यांना बळ मिळते असे वॉशिंग्टन पोस्टचा अभ्यास सांगतो.

अपेक्षा आहे हा विदा बघितल्यावर एकूणच बलात्कार हा प्रकार, त्यामागील नृशंसता आणि त्यावर करायचे उपाय यावर मते व्यक्त करताना ती अधिक 'इन्फॉर्म्ड' असतील

संदर्भः
http://www.d.umn.edu/cla/faculty/jhamlin/3925/myths.html
http://answers.google.com/answers/threadview/id/776945.html
http://clubtroppo.com.au/2011/05/17/does-provocative-clothing-protect-w…
http://www.washingtonpost.com/blogs/worldviews/wp/2012/12/29/india-rape…

चिंतातुर जंतू Wed, 02/01/2013 - 11:11

धन्यवाद. भारतातल्या बलात्कारांसंदर्भात काही रोचक विदा 'हिंदू'मधल्या ह्या जुन्या लेखात आणि लेखात दिलेल्या दुव्यांत मिळावा. त्यातले काही महत्त्वाचे निष्कर्ष :
बलात्कारांच्या घटनांत वाढ, पण ज्यात शिक्षा झाली अशा प्रकरणांच्या संख्येत घट
गुन्ह्याच्या तपासात पोलिसांची अक्षमता आणि अपुरी संख्या हे अडथळे
इशान्येकडच्या राज्यांत स्त्री-साक्षरतेचं प्रमाण अधिक, स्त्रियांचं लोकसंख्येतलं प्रमाण अधिक आणि बलात्काराच्या गुन्ह्यात शिक्षा होण्याचं प्रमाणदेखील अधिक. हा परस्परसंबंध सध्याच्या वादावादीत रोचक ठरावा.
कायदे अधिक कडक करून फारसा फायदा होत नाही; तर कार्यप्रणालीत बदल केल्यानं फायदा होतो.

गवि Wed, 02/01/2013 - 11:23

In reply to by चिंतातुर जंतू

शिवाय, इशान्येकडच्या राज्यांत सेक्शुअल रिलेशन्स बहुधा काहीशी नैसर्गिक आणि लिबरल आहेत, त्यामुळे तिथे "बलात्कार" या विशिष्ट गुन्ह्याचं प्रमाण त्या दृष्टीनेही कमी आहे. याउपर असंही ऐकण्या-वाचण्यात आहे की जगात एकूणच जिथे आदिवासी प्रभाव म्हणा किंवा अन्य काही कारणांनी शरीरसंबंध हे जास्त प्रिमिटिव्ह, निसर्गसुलभ राहिले आहेत तिथे बलात्कार आणि स्त्रीविषयक गुन्हे कमी आहेत.

हे सत्य आहे का मला माहीत नाही, पण साधारण पटण्यासारखं आहे..

नितिन थत्ते Wed, 02/01/2013 - 13:57

In reply to by गवि

+१

बलात्कार हे सिव्हिलायझेशनचे अपत्य आहे.

सामाजिक + कायदेशीर कल्पनेनुसार अलिकडेपर्यंत बलात्कार हा स्त्रीवर अन्याय होत नसून तिच्या स्वामीच्या [लग्नापूर्वी वडील आणि लग्नानंतर पती] हक्कावर होतो असा समज होता.

आबा Thu, 03/01/2013 - 18:04

In reply to by नितिन थत्ते

इच्छेविरुद्ध लैंगिक संबंध ठेवणे याला जर बलात्कार म्हणत असतिल तर ते सिव्हिलायझेशनच्या आधी पण होत होते.
त्याला गुन्हा असं म्हणने आणि शिक्षा करणे हे सिव्हिलायझेशनचं अपत्य आहे !

'न'वी बाजू Thu, 03/01/2013 - 18:15

In reply to by आबा

टकुर्‍यात सोटा हाणून गुहेत फरफटत नेणे, वगैरे?

शक्य आहे, पण यात तथ्य किती, नि क्यारिकेचरायझेशनचा भाग किती, कल्पना नाही.

(म्हणजे, सिव्हिलायझेशनपूर्वीचे सगळेच संबंध हे दोन्ही बाजूंच्या इच्छेनेच होत असत, किंवा फरफटत नेण्यापूर्वीची मोडस ऑपरंडी वेगळी होती, किंवा केवळ केव्हमन केव्हमनिणीच्याच टकुर्‍यात सोटा हाणत असेल कशावरून, वाइसे वर्सा कशावरून नाही*, वगैरे कोणतेही दावे नाहीत. फक्त, मी पाहायला गेलेलो नाही, इतकेच.)
=======================================================================================================================
* पण या दुसर्‍या परिस्थितीत अंमळ कठीण होत असेल, नाही?

आबा Thu, 03/01/2013 - 19:35

In reply to by 'न'वी बाजू

केव्हमनिणीने केव्हमनच्या डोक्यात सोटा हाणून लैंगिक संबंध ठेवले (किंवा वाईसे वर्सा) तरीही तो बलात्कारच झाला की.
बाकी तुम्हाला काय सिद्ध करायचंय याचा अंदाज येत नाही, पण असो.

बाकी सत्य की कॅरिकेचरायझेशन हे निर्विवादपणे सिद्ध करता येणार नाही (सध्या तरी) पण नक्की कॅरिकेचरायझेशनच आहे असं म्हणणं हे टीपॉट एथीइजम आहे.

'न'वी बाजू Thu, 03/01/2013 - 21:14

In reply to by आबा

सिद्ध काहीही करावयाचे नाही. केवळ टीपॉट अग्नॉस्टिकाची भूमिका मांडली, इतकेच.

प्रकाश घाटपांडे Wed, 02/01/2013 - 11:22

मात्र तरीही ही तथ्ये भारताला लागु नाहि असे ज्यांना वाटते त्यांनी यापुढील लेख वाचु नये.

या वाक्यापर्यंत असलेले विवेचन ज्यांना मान्य आहे त्यांनीच पुढील लेख वाचावा अन्य लोकांनी तो वाचू नये असा त्याचा अर्थ समजायचा का?

ऋषिकेश Wed, 02/01/2013 - 11:26

In reply to by प्रकाश घाटपांडे

नाहि तसे नाहि. लेखात दिलेली माहिती ही केवळ अमेरिकेत जमवलेली आहे हे आधीच स्पष्ट केले ते यासाठी की "असे सगळे किनै 'तिथेच' चालते, आपल्याकडे नै बॉ असे काही किंवा इथे सगळेच वेगळे आहे" असे मानणार्‍यांनी उगाच लेखन वाचण्यात वेळ वाया घालवू नये म्हणून ;)

बॅटमॅन Wed, 02/01/2013 - 11:37

भारी लेख. असा विदा एके ठिकाणी जमवलेला हाताशी असला की स्टिरिओटाईप्स कुरवाळणार्‍यांना यथास्थित झोडपायला मजा येते ;) बहुत धन्यवाद ऋषिकेशजी.

श्रावण मोडक Wed, 02/01/2013 - 12:26

लेखकाने इशारा केला असला तरी, त्याचा हेतू वेगळा आहे. सबब तो येथे मांडत असलेल्या मुद्यांना लागू नाही, असे मानून लिहितो आहे.
बलात्कार या शब्दाची व्याख्या काय मानून हा अभ्यास केला गेला आहे हे पाहिले पाहिजे. व्याख्या महत्त्वाची, कारण त्यानुसारच पुढच्या गोष्टी ठरतील. ज्युलियन असांजे याच्याशी (अमेरिकेत घडलेली नाही तरीही संकल्पना स्पष्ट होण्यासाठी) संबंधित बलात्कार घडामोड हा संदर्भाचा मुद्दा आहे.
ही व्याख्या काय यावरच पुरूषी वर्चस्व हा मुद्दाही अधिक नेमकेपणाने मांडता येणार आहे.
येथे मांडलेला सारा अभ्यास सर्वेतील सहभागींमधील बहुमताचा आहे. त्यामुळे त्याला एकूण स्थिती म्हणून किती महत्त्व द्यायचे हा प्रश्न वर्चस्व या सिद्धांताबाबत उपस्थित होतो. वर्चस्वाचा निष्कर्ष कशातून निघाला हे काही या मांडणीत दिसत नाही. ते समजले तर नेमकेपणा अधिक येईल.

गवि Wed, 02/01/2013 - 12:40

In reply to by श्रावण मोडक

बलात्कार या शब्दाची व्याख्या काय मानून हा अभ्यास केला गेला आहे हे पाहिले पाहिजे.

हा प्रश्न अतिशय महत्वाचा वाटतो आहे. अमुक इतके शेकड्यांनी बलात्काराचे गुन्हे दाखल होऊनही प्रत्यक्ष गुन्हा सिद्ध होणं किंवा शिक्षा मात्र अगदी हातच्या बोटावर मोजण्याइतक्यांनाच.. अशा बातम्या बर्‍याचदा वाचतो. बलात्कार सिद्ध करणं खरंच कठीण असू शकेल हा विचार अशा वेळी मनात येतो. पोलीसांच्या दृष्टीने झालेली घटना बलात्कारच होता हे सिद्ध करणं का अवघड जात असेल (आणि म्हणून बर्‍याच केसेसचा निकाल योग्यरीतीने लागत नसेल) याच्या काही शक्यता:
-बलात्काराच्या व्याख्येतच बहुधा प्रत्यक्ष लैंगिक अवयवांचा संयोग झालेला असणं आवश्यक आहे. त्यासाठी शरीराच्या स्त्रावांचा पुरावा सिद्ध होणं आवश्यक. त्यासाठी पीडित व्यक्तीची योग्य वेळेत तपासणी होणं आवश्यक. शिवाय हे संबंध विना-प्रोटेक्शन झालेले असणं आवश्यक. बलात्कारी पुरुषाने निरोध वापरल्याच्या घटना वाचण्यात येतात.
-झालेला शरीरसंबंध हा इच्छेविरुद्ध आहे हे सिद्ध करणं. याला ऑब्जेक्टिव्ह पुरावा काय आणणार? विरोधाच्या / झटापटीच्या खुणा?
-अशा प्रसंगाचे थेट साक्षीदार मिळणं बर्‍याच केसेसमधे कठीण असावं कारण ही क्रिया कुठेतरी निर्जन जागी नेऊन / गाठूनच केली जात असणार..

अशा वेळी शिक्षेचा कालावधी / तीव्रता / जरब काहीही वाढवली तरी सिद्ध होण्यातले हे धोंडे कसे दूर होणार?

ऋषिकेश Wed, 02/01/2013 - 14:24

In reply to by गवि

बलात्कार या शब्दाची व्याख्या काय मानून हा अभ्यास केला गेला आहे हे पाहिले पाहिजे.

हा प्रश्न अतिशय महत्वाचा वाटतो आहे.

अगदी सहमत!
जर १८६० मध्ये तयार झालेल्या भारतीय पीनल कोड ३७५ कडे बघितले तर 'पेनिट्रेशन' आवश्यक धरले आहे. अगदी संयुक्त राष्ट्रांच्या संमत व्याख्येतही पेनिट्रेशन (कितीही अत्यल्प) असणे आवश्यक समजले गेले आहे.

मात्र ४ डिसेंबरलला सादर झालेल्या crminal Law (amendment) Bill, 2012 मध्ये सदर कायदा बदलासाठी प्रस्तावित आहे. यात 'सेक्युअल इंटरकोर्स' च्या ऐवजी 'सेक्स्युअल असॉल्ट' असा शब्दप्रयोग केला जाणार आहे. शिवाय व्याख्येत अशी वाढ केली जाणार आहे

(a) penetration of a person’s vagina, anus, urethra or mouth with any part of the body including the penis, or any other object for a sexual purpose; (b) manipulation of a body part of another person so as to cause penetration of the vagina, anus, urethra or mouth by any part of the other person’s body; (c) cunnilingus and fellatio.

याव्यतिरिक्त अनेक चांगले बदल या विधेयकात केलेले आहेत. आताच्या आंदोलनाकडे पाहता बजेट सत्रात हे विधेयक मंजूर केले जाईल असे दिसते.

बलात्काराच्या व्याख्येतच बहुधा प्रत्यक्ष लैंगिक अवयवांचा संयोग झालेला असणं आवश्यक आहे. त्यासाठी शरीराच्या स्त्रावांचा पुरावा सिद्ध होणं आवश्यक. त्यासाठी पीडित व्यक्तीची योग्य वेळेत तपासणी होणं आवश्यक. शिवाय हे संबंध विना-प्रोटेक्शन झालेले असणं आवश्यक. बलात्कारी पुरुषाने निरोध वापरल्याच्या घटना वाचण्यात येतात.

पिडीत व्यक्तीच्या तपासणीबाबत बरोबर. म्हणूनच सर्व स्त्रियांना बलात्कार झाल्यास काय करावे याचे शिक्षण अत्यावश्यक आहे असे मत मी नेहमी व्यक्त करत आलो आहे. केवळ घाबरून, नालस्तीच्या भितीने अनेकदा महत्त्वाचे पुरावे स्त्रिया आपणहून नष्ट करतात किंवा कुटुंबियांकडून केले जातात. अवांतरः ही नालस्तीची भिती ही 'यापेक्षा मरण बरे' अश्या प्रकारच्या वक्तव्यानंतर अधिक दृढ होते. तेव्हा कायदे कडक - पक्षी कृत्य खून करण्याइतके निघृण ठरवणे म्हणजे बलात्कार = खून ==> अर्थात त्यापेक्षा मरणे बरे असे स्त्रीस वाटायला लावण्यासारखे आहे का? यावरही विचार व्हायला हवा.

निरोध वापरल्यास त्याला नष्ट करायचे अनेक बलात्कार करणार्‍यांच्या (त्या कैफात) लक्षात रहात नाही. अश्यावे़ळी स्त्रीने धाडसाने निरोध हस्तगत केले तर अधिक उत्तम पण तसे करायचे असते हे तेव्हाच्या मानसिकतेत त्याबाबतीतल्या शिक्षणाशिवाय डोक्यात येणेही कठीण आहे. दुसरे असे अश्या व्यक्तीस काहि तासांत (किती ते विसरलो) पकडले तर तेथील फॉरेन्सिक खुणांवरून निरोध वापरल्याचे सिद्ध केले गेले आहे असे पुसटसे आठवते.

झालेला शरीरसंबंध हा इच्छेविरुद्ध आहे हे सिद्ध करणं. याला ऑब्जेक्टिव्ह पुरावा काय आणणार? विरोधाच्या / झटापटीच्या खुणा?

होय. शिवाय घडलेला घटनाक्रम. शक्य असल्यास प्रत्यक्षदर्शी पुरावे. अनेकदा यात एकापेक्षा अधिक व्यक्ती सहभागी असतात. अश्यावेळी दुसर्‍या व्यक्तीने थेट गुन्हा केला नसेल तर त्याला पोलिस कमीत कमी शिक्षा होईल असा दिलासा देत साक्षीदार म्हणून वापरतात.
दुसरे असे फाटलेले कपडे हा देखील पुरावा असतो. यासाठीच तक्रार करतेवेळीच त्यावेळचे कपडे पोलिसांकडे सुपूर्त करणे आवश्यक असते. पुन्हा स्त्रीयांचे याबाबतीतले शिक्षण आले.

अशा प्रसंगाचे थेट साक्षीदार मिळणं बर्‍याच केसेसमधे कठीण असावं कारण ही क्रिया कुठेतरी निर्जन जागी नेऊन / गाठूनच केली जात असणार..

थेट साक्षीदार मिळवणं कठिण असलं तरी त्या व्यक्तीला पिडीत स्त्रीसोबत बघितलेल्या व्यक्ती, त्यांना एकत्र शेवटची भेटलेली व्यक्ती आणि तिचे ठिकाण, बलात्कारानंतर पहिली भेटलेली व्यक्ती आदींवरून परिस्थितीजन्य पुरावा तयार करता येऊ शकतो.
मात्र निर्जन जागी नेऊन / गाठूनच ही कृती केली जाते असे मात्र नाही. अनेकदा रहात्या घरांत हे कृत्य घडते.

ऋषिकेश Wed, 02/01/2013 - 13:08

In reply to by श्रावण मोडक

येथे मांडलेला सारा अभ्यास सर्वेतील सहभागींमधील बहुमताचा आहे

प्रत्येक निरिक्षणाला हे लागू नाही.
बरेचसे निष्कर्ष प्रत्यक्ष गुन्हेगारांचा संकलीन विदा वापरून काढलेले आहेत. जसे बहुतांश बलात्कारीत पुरूषांना स्त्रीचे कपडे लक्षातही रहात नाहीत किंवा केवळ ४.४% गुन्ह्यात स्त्रीकडून आव्हानात्मक कृती घडली आहे.

सन्जोप राव Thu, 03/01/2013 - 18:45

विचार करायला लावणारा विदा आहे. बराचसा परिचित असला तरी. धन्यवाद.
लेखातील (आणि प्रतिसादांतील) भाषा आणि शुद्धलेखनाच्या चुका विरस करणार्‍या आहेत. शुद्धलेखनाला फाट्यावर मारतो असे धोरण वगैरे या संकेतस्थळाने जाहीर केलेले नसल्याने या बाबतीत लेखकाने आणि प्रतिसादकर्त्यांनी जागरुक राहावे असे वाटते. संपादकांनी यात हस्तक्षेप करुन या चुका दुरुस्त करता आल्या तर तेही पाहावे. 'अर्थ कळाला ना? मग एवढी चिकित्सा कशाला?' असा प्रश्न पडल्यास त्याला 'बिकॉज इट इज देअर' असे उत्तर द्यावे.

ऋषिकेश Fri, 04/01/2013 - 10:18

In reply to by सन्जोप राव

प्रतिक्रियेबद्दल आभार! शुद्धलेखनाला फाट्यावर मारण्याचे संस्थळाचे धोरण नाही हे निरीक्षण बरोबर आहे. मात्र त्याबाबतीत कोणतेही टोकाचे धोरण न ठेवता तो निर्णय प्रत्येकावर सोडलेला आहे. संपादक म्हणून प्रत्येक लेखनात / प्रतिसादात लक्ष घालून ते दुरुस्त करणे नेहमी शक्य होईलच असे नाही (किंबहुना तसे करणे बरेच कष्टाचे, वेळखाऊ आणि अस्वाभाविक ठरावे असे माझे वैयक्तिक मत आहे जे सगळ्यांनाच मान्य व्हावे)

असो. माझी शुद्धलेखनाची समज आता जगजाहीर आहेच ;) मात्र केलेल्या चुका ह्या बंडखोरी करण्यासाठी केलेल्या नसून माझ्या लेखनात असलेला शिस्तीचा अभाव आणि बराचसा कंटाळा (की टंकाळा?) दर्शवणार्‍या आहेत याची खात्री देऊ इच्छितो.

मूळ लेखातील चुका माझ्या वकुबानुसार + मनोगतावरचा शुद्धिचिकित्सक वापरून दुरुस्त केल्या आहेत. त्याव्यतिरिक्त काही त्रुटी राहिल्यास सांगावे, सुधारले जाईल.

(अवांतरः त्रु आणि तृ यांचे उच्चार वेगळे आहेत का? शुद्धिचिकित्सकात तृटी असे लिहिल्यास दुरुस्त करून त्रुटी असे लिहावयास लावले. मोल्सवर्थमध्ये दोन्ही शब्द मिळाले नाहीत, तर /दाते-कर्वे मध्ये त्रुटी/त्रुटि असे दोन शब्द एकाच अर्थाचे मिळाले. एक त् + ऋ आणि एक त् + र् + उ आहे हे कबूल पण मी उच्चार बहुदा सारखाच करतो :( )

चिंतातुर जंतू Fri, 04/01/2013 - 15:44

In reply to by ऋषिकेश

>>त्रु आणि तृ यांचे उच्चार वेगळे आहेत का?

हो. कारण रु आणि ऋ यांचे उच्चार वेगळे आहेत.

ऋषिकेश Fri, 04/01/2013 - 15:51

In reply to by चिंतातुर जंतू

होय. पण त बरोबर आल्यावर हा फरक करणे कठीण वाटते आहे.
मी दोन्हीचा उच्चार करताना बहुदा एकाच ठिकाणी जीभ लावतो. माझ्या कानांना/जीभेला फरक करणे अवघड आहे. जसे श आणि ष म्हणताना वेगळ्या ठिकाणी जीभेचा स्पर्श होतो, तो ऐकताना + बोलताना जाणवतो. मात्र तृण आणि त्रुटी मध्ये मला उच्चाराचे वेगळेपण जाणवत नाहिये.

माहित नसलेल्या शब्दाला लिहायची वेळ आली तर त्रु की तृ कसे समजावे, यासाठी दोन वेगळे उच्चार कोणते हे कानांना माहित असणे गरजेचे वाटते त्यासाठी हा प्रश्न आहे. योग्य उच्चार अरणारी ध्वनीमुदित आवाजिका किंवा जीभ कुठे लावली जाते याचे ढोबळ वर्णन केल्यास काहि उपयोग व्हावा

चिंतातुर जंतू Fri, 04/01/2013 - 15:58

In reply to by ऋषिकेश

>>माहित नसलेल्या शब्दाला लिहायची वेळ आली तर त्रु की तृ कसे समजावे, यासाठी दोन वेगळे उच्चार कोणते हे कानांना माहित असणे गरजेचे वाटते

मला विचाराल तर उच्चारावर अवलंबून राहण्यापेक्षा शब्दकोश पाहणं सोयीचं जातं. असो. रु उच्चारताना ओठांचा चंबू होतो; ऋ उच्चारताना तो होत नाही.

क्रेमर Thu, 03/01/2013 - 22:23

समजः 'गँग रेप' ही अपवादात्मक (रेअर) कृती आहे.
तथ्यः अमेरिकेतील ४३% बलात्कारात एकापेक्षा अधिक व्यक्तींचा सहभाग असल्याचे समोर येते.

हे समजले नाही. अपवादात्मक (रेअर) कृती आणि एकूणापैकी ४३% घटना असे कसे काय?

'न'वी बाजू Thu, 03/01/2013 - 22:27

In reply to by क्रेमर

'एकूणापैकी ४३% घटना' हे तथ्य असून ते 'अपवादात्मक (रेअर) कृती' या प्रचलित समजाचे खंडन आहे, असे मी तरी यातून वाचले.

गवि Fri, 04/01/2013 - 16:53

नवीन धागा काढायला नको, म्हणून इथे लिहीतोय, कारण याचा उल्लेख केल्याशिवाय राहवत नाहीये.

या आणि या बातम्यांवरुन ही खूप डिस्टर्ब करणारी परिस्थिती समोर आली म्हणून अस्वस्थ वाटतं आहे. सर्वात लहान, त्यामुळे "मायनर" असणार्‍या रेपिस्टने त्या मुलीवर सर्वात जास्त क्रूर आणि अनैसर्गिक अत्याचार केला होता. ती बेशुद्ध असताना दोनदा बलात्कार, आतडी हातांनी बाहेर काढणे, शेवटी निर्वस्त्र करुन बाहेर फेकणे या सर्वांमागे हा "लहान" मुलगा होता. लिहीवत नसूनहे हे अत्यंत अस्वस्थ करणारे तपशीलसुद्धा नमुन्यादाखल आवर्जून इथे उल्लेखण्यामागे माझा हा उद्देश आहे की हे सर्व "बाल"गुन्हेगाराच्या कल्पनेशी जुळवणं किती कठीण आहे हे समजावं.

आणि आता त्याची बोन डेन्सिटी (?) टेस्ट घेऊन वय निश्चित करताहेत, पण स्कूल लीव्हिंग सर्टिफिकेटवरुन त्याचं वय साडेसतरा वर्षं, अर्थात मार्जिनली अल्पवयीन आहे. यामुळे त्याला साधी कैदही होऊ शकणार नाही. सुधारगृहात ठेवलं जाईल, आणि ते सुद्धा अधिकात अधिक ३ वर्षं. त्याच्यावर "सुधारणा" स्वरुपाचे उपाय केले जातील.

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 04/01/2013 - 20:41

In reply to by गवि

... हे सर्व "बाल"गुन्हेगाराच्या कल्पनेशी जुळवणं किती कठीण आहे हे समजावं.

१८ वर्ष म्हणजे बालपण संपलं हा आकडा सरासरीवरून ठरवलेला असावा. हे वय शारीरिक मॅच्युरिटीसाठी महत्त्वाचं असावं. (अन्यथा अनेक वयस्कांना 'मोठे व्हा' असं अनेकदा सांगावंसं वाटतं, तो भाग निराळा.) आत्ता अशी कायदेशीर तरतूद कदाचित नसेलही, पण शारीरिक मच्युरिटी १८ वर्षांआधीच आली असल्याची शक्यता तपासता येत असेल तर मग सहा महिने लहान म्हणून कमी शिक्षा असा प्रकार होणारही नाही.

हा प्रकार भयंकर हिंस्त्र आहे आणि 'बालक' असल्यामुळे याला गुन्ह्याची शिक्षा कमी मिळू नये या विचारांशी सहमत.

प्रकाश घाटपांडे Fri, 04/01/2013 - 20:43

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

हा प्रकार भयंकर हिंस्त्र आहे आणि 'बालक' असल्यामुळे याला गुन्ह्याची शिक्षा कमी मिळू नये या विचारांशी सहमत.

अगदी हेच म्हणतो मी!

स्मिता. Fri, 04/01/2013 - 20:49

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अगदी असेच म्हणते. त्याचा गुन्हा कुठल्याही दृष्टीने बालकासारखा नाही. एखादा राक्षस-बालक सुद्धा असं काही करायला धजावणार नाही.
आज जर १८ वर्षे व्हायला केवळ ६ महिने बाकी म्हणून एवढ्या राक्षशी गुन्हेगाराला नाममात्र शिक्षा होत असेल तर उद्या कोणताही गुन्हेगार चार दमड्या मोजून खोटे कागदपत्र आणून वय कमी दाखवेल.

ऋषिकेश Sat, 05/01/2013 - 15:32

In reply to by स्मिता.

वय केवळ कागदपत्रावरून ठरत नाही. पोलिस/न्यायालय यांना वाटल्यास अनेक 'बॉर्डरलाईन' केसेसमध्ये बोन मॅरो टेस्ट किंवा इतरही व्य निश्चित करणार्‍या टेस्त करून बायोलॉजिकल वयाची निश्चिती केली जाते.
बाकी मताचा आदर आहेच

स्मिता. Mon, 07/01/2013 - 20:49

In reply to by ऋषिकेश

तुमचे मुद्दे आधीही पटले होतेच! पण ही केसच अशी आहे की तिच्या तपशिलात काही नवीन वाचले तरी भावनांवर नियंत्रण राहत नाही आणि प्रतिशोधाची भावनाच तेवढी वरचढ होते. असो.

'न'वी बाजू Fri, 04/01/2013 - 21:06

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

कायद्याने अज्ञान आरोपीवर काही गंभीर गुन्ह्यांच्या बाबतीत विकल्पाने संबंधित आरोपी कायद्याने सज्ञान असल्याप्रमाणे खटला चालविण्याची तरतूद भारतीय कायद्यात अस्तित्वात आहे काय? (असल्यास, प्रस्तुत केसला ती लागू होते काय?)

ऋषिकेश Sat, 05/01/2013 - 15:30

In reply to by गवि

अरेरे... हे भयंकर आहे.
तरीही या अपवादात्मक घटनेसाठी अल्पवयीन मुलांना होणार्‍या शिक्षेचा कायदा बदलावा किंवा अधिक शिक्षेची तरतूद करावी या मताशी अजूनही सहमत नाही. कोणताही कायदा एकाच घटनेला डोळ्यासमोर ठेऊन बनवला जाऊ नये असे वाटते. शिवाय श्री.थत्ते म्हणतात त्याप्रमाणे अश्या एका घटनेवरून उत्साहाच्या भरात प्रीझम्टिव्ह गिल्ट असलेले कायदे तयार होऊ शकतो जे अधिक धोकादायक आहे

आडकित्ता Wed, 09/01/2013 - 20:28

In reply to by गवि

आणि आता त्याची बोन डेन्सिटी (?) टेस्ट घेऊन वय निश्चित करताहेत,

बोन डेन्सिटी नव्हे. शरीरातील हाडे जन्मतः पूर्णपणे 'ऑसिफाईड' नसतात. क्ष किरण चित्रे काढून त्यावरून त्या व्यक्तीच्या हाडांच्या ऑसिफिकेशनच्या पूर्णतेवरून तिच्या वयाचा अंदाज बर्‍यापैकी अचूकपणे बांधता येतो. दातांचीही क्ष किरण तपासणी यात येते.

(साडे सतरा वर्षे दाखल्यात लिहिलेल्या या नमून्याचे वय मोजताना मी तरी सर्व एरर मार्जिन्स पहाता नक्कीच चूक करीन व रिपोर्ट १९ च्या आसपास येईल असे वाटते.)

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 09/01/2013 - 21:36

In reply to by आडकित्ता

पांढर्‍या ठशातल्या वाक्यात तुमचं मत असलं तरी त्यात माहितीही आहे. या वय ठरवण्याच्या चाचणीतली एरर सहा महिन्यांपेक्षा अधिक असेल तर त्याला फायदा "उठवला" जाईल का हा प्रश्न महत्त्वाचा वाटतो.

अवांतरः कसाबचं वयही या चाचणीतून ठरवण्यात आलेलं होतं असं आठवतं.

आडकित्ता Fri, 11/01/2013 - 22:11

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

'ठरवलं' होतं ना?
या प्राण्यापेक्षा कसाब बरा. आईच्यान, लै मनापासून सांग्तोय. कसाबला किमाण डिल्युजन होतं की he is waging a war against a 'kaafir' country. इथे हा काय होता? इन्सेन?
एन्शन्ट चायनिज टॉर्चर्स अन Cosa Nostra यांच्या शिक्षा एकत्र कराव्यात या ****ला

'न'वी बाजू Fri, 04/01/2013 - 18:17

In reply to by नितिन थत्ते

खरे आहे.

अनेक भारतीय भाषांतून आढळणार्‍या 'बलात्कार' या शब्दाचे मूळ फारसी असले पाहिजे. किंवा नसल्यास, खटला-नव्हे-अभियोग-सूड-नव्हे-प्रतिशोध-कोर्ट-नव्हे-न्यायालय-सिग्नल-नव्हे-अग्निरथगमनागमननिदर्शनपट्टिका-छाप भाषाशुद्धीवाल्यांनी मूळ विदेशी कल्पनेकरिता प्रतिशब्द म्हणून 'बलात्कार' (हा शब्द) भारतीय भाषांत (बलात्काराने?) घुसडला असावा.

(तसेही, 'बलात्कार' हा शब्द म्हणायला 'नैसर्गिक' वाटत नाही, नाही? म्हणजे हा निश्चितपणे घुसडलेलाच शब्द आहे! म्हणजे ही संकल्पना 'आपली' नसावीच. छे छे!)
===============================================================================================================
बाकी, भारतात बलात्कार होत नाहीत, बलात्कार होतात, ते इंडियात, असे "ते" म्हणतात. रोचक आहे. म्हणजे आता "त्यांच्या"तही टू-नेशन थियरी मानायला लागले की काय? (अर्थात, तसेही कधी मानत नव्हते म्हणा!)

प्रकाश घाटपांडे Mon, 07/01/2013 - 20:08

स्त्रियांवरील अन्यायाबद्दल अनेकदा चर्चा होतात. त्या व्हायला पाहिजेतच. पण पुरुषाची कामेच्छा, त्याच्या कामपूर्तीतील अडथळे आणि त्यातून त्याची होणारी लैंगिक आणि मानसिक कोंडी हा विषय कधी चर्चेच्या ऐरणीवर येत नाही
या विषयावर मंगला सामंत यांचा लोकसत्तामधील लैंगिकतेच शमन कि दमन? हा लेख एक वैज्ञानिक दृष्टीकोन व सामाजिक दृष्टीकोन सांगणारा आहे त्यातील मुद्यांवर चर्चा होताना दिसत नाही. मानसशास्त्रीय पैलू या लेखात चांगले मांडले आहेत बघा.

ऋषिकेश Tue, 08/01/2013 - 09:29

In reply to by प्रकाश घाटपांडे

लेखाच्या दुव्याबद्द्ल आभार
वेगळा दृष्टीकोन आणि मुद्दा लक्षात आला तरी "मुक्त शरीरसंबंध असणाऱ्या समाजव्यवस्थेत, स्त्रीवरील आफ्रिकन स्त्रीप्रमाणे पुरुषाला दूर ठेवू शकते" हे काही पटले नाही.
या व्यवस्थेमुळे येणारे एकाच गटातील स्त्रीपुरूषांचे संबध --> त्यायोगे वेडसर मुलांची पैदास वगैरे दोष दूर करण्यासाठी माणसाने 'भाऊ बहिण' हे नाते निर्माण केले. एकपत्नीत्त्व (किंवा एकच जोडी असणे) हे काही फक्त मनुष्य प्राण्यात दिसणारे नसून अनेक प्राण्यांत व पक्ष्यांत दिसून येते. तेव्हा 'विवाह' पद्धत ही आधीच्या पद्धतीतून आवश्यक ते बदल होत उत्क्रांत होत तयार झालेली पद्धत आहे. नव्या सामाजिक व्यवस्थेतही लग्न व्यवस्थेत आवश्यक ते बदल होत आहेत. लीव-इन रिलेशनशिप, समलैंगिक संबंध वगैरे पद्धतीने लैंगिक गरजा भागवणे समाज मान्य व्हायला वेळ लागणार असेल तरी त्याची सुरवात दिसते आहे. अश्यावेळी सध्याची लग्नव्यवस्था अधिक उत्क्रांत करण्याऐवजी पुन्हा तीला मागच्या काळात नेणे रुचले नाही

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 08/01/2013 - 21:37

In reply to by ऋषिकेश

एकपत्नीत्त्व (किंवा एकच जोडी असणे) हे काही फक्त मनुष्य प्राण्यात दिसणारे नसून अनेक प्राण्यांत व पक्ष्यांत दिसून येते.

अलिकडेच एक व्याख्यान ऐकलं, विषय होता Evolution of social behaviour. सामाजिक वर्तनात या संशोधक विशेषतः जोडीदार शोधणे आणि समागम यांचा अभ्यास करत आहेत. त्या व्याख्यानात समजलेल्या माहितीप्रमाणे सस्तन प्राण्यांच्या ९७% प्रजाती एकपत्नीत्त्व पाळणार्‍या नाहीत, पक्ष्यांमधे एकपत्नीत्त्वाचं प्रमाण बरंच जास्त आहे.

सध्याची लग्नव्यवस्था अधिक उत्क्रांत करण्याऐवजी पुन्हा तीला मागच्या काळात नेणे रुचले नाही

अशा प्रकारचा निष्कर्ष असावा असं मलातरी वाटलं नाही. लेखिका सध्यातरी आजूबाजूला दिसणार्‍या गोष्टी आणि त्यामागचं विज्ञान इतपतच बोलत आहेत.

ऋषिकेश Thu, 17/01/2013 - 09:12

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

दुसर्‍या भागात कित्येक मुद्दे चांगले आहेत. मात्र एकुणात हा भाग अधिक गोंधळात टाकणारा वाटला.
इतकेच नाही तर लैंगिक भुक न भागल्याने बलात्कार होतात असा निष्कर्ष लेखिकेला काढायचा आहे काय अशी शंकाही आली. तसे असल्यास बलात्काराला केवळ लैंगिकतेशी जोडून केलेली एक चुक ठरेल.

दुसरे म्हणजे व्यक्तीला फाशी द्यायला लेखिकेचा विरोध नाही हे मतही रोचक आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 17/01/2013 - 11:24

In reply to by ऋषिकेश

'भूक न भागल्याने' असं म्हणण्यापेक्षा 'टॅबू असल्यामुळे' असं मला वाटलं. टॅबू असल्यामुळे मुलांसमोर बोलणं, कृती होत नाही (उदा: आई-वडील मुलांसमोर एकमेकांचं चुंबन घेत नाहीत) आणि अचानक लैंगिकता फक्त रोगट स्वरूपातच समोर येते. लैंगिकता आणि प्रेम उत्कट स्वरूपात समोर न आल्यामुळे रोगट गोष्टींवर "पोषण" होतं आणि विकृती निर्माण होते हे त्यांचं म्हणणं पटलं.

फाशीच्या शिक्षेला विरोध नसणं, किंवा कॅस्ट्रेशनलाही पाठींबा असणं हे धाक बसवण्याच्या दृष्टीकोनातून सुचवल्यामुळे मान्य करण्यासारखं आहे. या लेखाच्या सुरूवातीलाच, त्या अन्य प्रकारच्या लैंगिक गुन्हेगारांना तातडीने शिक्षा मिळावी ज्याचा अधिक चांगला परिणाम होईल असंही सुचवतात.

ऋषिकेश Thu, 17/01/2013 - 11:53

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

विकृती निर्माण होण्याबद्दल सहमत आहे.

मात्र बलात्कार करण्याची प्रेरणा ही अश्या प्रकारच्या विकृतीतून येते असे अजून तरी वाचनात आलेले नाहि त्यामुळे त्याबद्दल साशंक आहे इतकेच.

लैंगिक गुन्हेगारांना तातडीने शिक्षा मिळावी ज्याचा अधिक चांगला परिणाम होईल असंही सुचवतात.

+१ त्याच्याशी सहमतही आहेच

लेखात बर्‍याचदा तर्कशुद्ध प्रतिपादने असताना एखाद्या वाक्यात विपरीत मत आल्याने ते अधिक ठळकपणे जाणवले इतकेच

अनुराधा१९८० Fri, 18/01/2013 - 15:02

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मंगला सामंत यांचे मत पटण्यासारखे नाही. लैंगिक भुकेचे शमन होऊन बलात्कार थांबणार नाहीत. तसे असते तर अमेरिकेत, साउथ अमेरिकेत बलात्कार झाले नसते. तिथे शमन करायला बरेच मार्ग ( कायदेशीर ) उपलब्ध असतात.
ही मानसिक विक्रुती आहे आणि गुन्हेगारी प्रव्रुत्ती आहे. त्याला उगाचच justify करण्याचे किंवा कारणे देण्याचे प्रयत्न होता कामा नयेत.

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 18/01/2013 - 21:52

In reply to by अनुराधा१९८०

सामंत यांनी ही विकृती का निर्माण होत असावी याची भारतीय संदर्भात कारणं दिलेली आहेत. विकृती निर्माण होण्याचं कारण किंवा सोकावण्याचं कारण शोधणे म्हणजे justification नव्हे. पुढे असे प्रकार रोखण्याच्या प्रयत्नांचा हा पहिला भाग आहे. ही यादी, हा तपशील संपूर्ण आहे असा दावा (बहुदा त्यांचाही) नसावा. भारतीय संदर्भात त्यांनी फक्त बलात्कारच नाही, अन्य प्रकारच्या लैंगिक प्रकारच्या गुन्ह्यांबद्दलही उल्लेख केला आहे. पाश्चात्य देशांमधे असे प्रकार (शिट्या मारणे, अश्लील कमेंट्स करणे, गर्दीचा फायदा घेऊन धक्के मारणे, स्पर्श करणे इ.) होत नाहीत / नगण्य प्रमाणात होतात. भारतात या प्रकारच्या गुन्हेगारांना शिक्षा होत नाही त्यामुळे बलात्कारासारखे गंभीर गुन्हे करण्यासाठी लोक आणखी सोकावतात अशा प्रकारचा विचारही त्यांनी मांडला आहे.

पाश्चात्य देशांमधे किंवा भारतातल्या 'इंडीया'*तही असे प्रकार कमी प्रमाणात असावेत असा अंदाज या प्रकारचं विश्लेषण वाचून करता येईल. महाराष्ट्र टाईम्सने अलिकडे अशा प्रकारची आकडेवारीही प्रसिद्ध केली होती. (दुवा शोधते आहे.) पण पाश्चात्य देशांमधले आकडे पहाता हे पटत नाही. भारतात आणि पाश्चात्य, प्रगत देशांमधे किती बलात्कारांची नोंद होत नाही, बलात्कार म्हणजे नक्की काय असेही प्रश्न या संदर्भात उपस्थित होतात. 'इंडीया'*तले अनेक बलात्कार हे फसवून शरीरसंबंध ठेवण्याचे प्रकारही अधिक प्रमाणात असावेत असा अंदाज आहे. (विकीलीक्समुळे प्रसिद्ध झालेल्या ज्यूलियन असांजवर लैंगिक अत्याचाराचा खटला सुरू आहे.)

*शरद जोशींची व्याख्या

सुमित Tue, 08/01/2013 - 18:19

तुम्ही दिलेली माहिती अतिशय उपयोगी आणि महत्वाची आहे...
याद्वारे लोकांना, समज आणि "गैरसमज" यातला फरक नक्कीच कळून येईल, अशी अशा करतो...
पुन्हा एकदा धन्यवाद...

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 09/01/2013 - 04:03

वेगळा धागा करण्यापेक्षा इथेच चर्चा सुरू आहे म्हणून लिंका देते. सुहेला अब्दुलाली नामक मुलीवर ३२ वर्षांपूर्वी बलात्कार झाला. तेव्हाच्या तिच्या भावना, खरंतर विचारच तिने लिहीले होते. दिल्लीच्या केसमुळे ही पोस्ट व्हायरल झाली. हे समजल्यानंतर तिने पुन्हा एक लेख लिहीला आहे. तो इथे. त्यातला फार आवडलेला भाग:

When I was 17, I could not have imagined thousands of people marching against rape in India, as we have seen these past few weeks. And yet there is still work to be done. We have spent generations constructing elaborate systems of patriarchy, caste and social and sexual inequality that allow abuse to flourish. But rape is not inevitable, like the weather. We need to shelve all the gibberish about honor and virtue and did-she-lead-him-on and could-he-help-himself. We need to put responsibility where it lies: on men who violate women, and on all of us who let them get away with it while we point accusing fingers at their victims.

ऋषिकेश Wed, 09/01/2013 - 09:00

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अनेक आभार!
दोन्ही दुवे उत्तम आहेत. मला पहिल्या लेखातील हे आवडले (आणि मत जुळल्याने, आणि असा विचार कोणत्यातरी व्हिक्टिमने केल्याचे दिसल्याने सुक्ष्मसा आनंदही झाला)

I have also been aware of the stigma that attaches to survivors. Time and again, people have hinted that perhaps death would have been better than the loss of that precious“virginity.” I refuse to accept this. My life is worth too much to me.

I feel that many women keep silent to avoid this stigma, but suffer tremendous agony because of their silence. Men blame the victim for many reasons, and,shockingly, women too blame the victim, perhaps because of internalized patriarchal values, perhaps as a way of making themselves invulnerable to a horrifying possibility.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 09/01/2013 - 09:45

होय. आजूबाजूला केसाला धक्का न लागलेले लोकं knee-jerk प्रतिक्रिया देत असताना, या मुलीने वयाच्या १७व्या वर्षी भीषण प्रसंगाला तोंड दिल्यानंतरही एवढा सुज्ञपणा दाखवला. हॅट्स ऑफ.

गवि Wed, 09/01/2013 - 10:50

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अगदी... सर्वत्र फक्त बलात्काराचं प्रिव्हेन्शन किंवा जालीम शिक्षा यांचीच चर्चा होत असताना कोणीच "बलात्कार झाला तरी स्त्रीचं आयुष्य तितकंच वर्थ आहे" अशी विचारप्रक्रिया तयार करण्यावर चर्चा करताना दिसत नाहीत.

बलात्कार होऊच नयेत, असे होतातच कसे?, पोलीस काय करतात, कायदा कसा कमी पडतो यावर सर्व भर असतो.

पण तरीही झालाच बलात्कार तर त्याचा किती डाग किती काळ मनात बाळगायचा..?

अलिखित, अघोषित विचार हवेत तरंगत असतो की आता बिचारीवर बलात्कार झाला ना, म्हणजे तिचं उरलेलं आयुष्य नासलं, वाया गेलं, बरबाद झालं, - यापेक्षा मरण बरं वगैरे.

बलात्कार ही कितीही भयंकर घटना असली, तरी ती झाल्यावर स्त्रीला सुरुवातीचा काही काळ, कोणताही शारिरेक / मानसिक धक्का पचवायला जितका वेळ निसर्गत: लागतो तितका गेल्यावर ही गोष्ट मागे सोडून पुन्हा तितक्याच आनंदाने जगता आलं पाहिजे.

अश्या स्त्रीला न स्वीकारु शकणं हे माझ्या मते जास्त भयानकरित्या अमानुष आहे.

ऋषिकेश Wed, 09/01/2013 - 11:11

In reply to by गवि

कोणीच "बलात्कार झाला तरी स्त्रीचं आयुष्य तितकंच वर्थ आहे" अशी विचारप्रक्रिया तयार करण्यावर चर्चा करताना दिसत नाहीत.

अगदीच असं नाहि हं ;)
मिसळपाव वर झालेल्या चर्चेत मी दिलेल्या या प्रतिसादावर झालेल्या उपचर्चेत हा विषय पुढे आला होता. (पण जी छोटीशी चर्चा झाली त्यात तसे होणे कसे शक्य नाही असा प्रतिवाद झाला हेही खरेच म्हणा :( )

गवि Wed, 09/01/2013 - 11:17

In reply to by ऋषिकेश

मी मिपा, ऐसी किंवा अशा चर्चेविषयी बोलतच नाहीये. मीडियामधे संपूर्ण देशासमोर येणार्‍या ज्या चर्चा, महाचर्चा, भाषणे, विधाने, ट्वीट्स वगैरे येतात त्यामधे हा विचार दिसत नाही असं म्हणायचंय.. :)

ऋषिकेश Wed, 09/01/2013 - 11:30

In reply to by गवि

ते कळ्ळं होतं मला.. म्हणून तर तस कै नै म्हणताना डोळा मारणारी मायली दिली.
आणि नंतरचा प्रतिसाद आपल्या मताची झैरात म्हण हवं तर ;)

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 10/01/2013 - 01:36

In reply to by गवि

सोहेला यांची ही वेबसाईट. सोहेलांच्या माहितीमधे लिहीलं आहे की त्या शिकवणं, व्याख्यानं देणं, लिखाण याशिवाय त्यांनी बलात्काराला तोंड देण्यासाठी एक केंद्रही चालवलेलं आहे. ज्या व्यक्तीला बुद्धीजीवी म्हणता येईल अशा व्यक्तीला बलात्कारानंतर आयुष्य फुकट गेलं असं का वाटू नये याचं उत्तर इथे आहे. १००-१५० वर्षांपूर्वी स्त्रियांना पुरुषाच्या मुलांना जन्म देणं आणि रांधा-वाढा-उष्टी काढा यापलिकडे आयुष्यच नव्हतं.

स्त्री-शिक्षण, सबलीकरण यांची आणखी वेगळी आवश्यकता कशी सांगावी? "माझी मूल्यं माझ्या योनीत नाहीत" आणि "जिवंत रहाणं सगळ्यात महत्त्वाचं आहे" हे सुहेला यांचे विचार कुठून आले, ते किती योग्य आहे ते त्यांच्याकडे बघून लगेचच समजतं.

सोहेला म्हणतातः But rape is not inevitable, like the weather. या विधानामागची कारणं त्यांनी दिलेली नसली तरी ते समजून घेता येईल असं विधान आहे. (लोकसत्तामधला मंगला सामंत यांचा लेख उदाहरणार्थ) असा संतुलित विचार बहुसंख्य "सभ्य" समाज करेल तेव्हा या गुन्ह्याची तीव्रता फार वाटणार नाही. पिडीत व्यक्तीला या ट्रॉमाबाहेर येण्यात त्याचा फार फायदा होईल.

अश्या स्त्रीला न स्वीकारु शकणं हे माझ्या मते जास्त भयानकरित्या अमानुष आहे.

सुदैवाने, माझ्या आजूबाजूचे लोक तरी अशा प्रकारे, भयानक अमानुष विचार करताना दिसत नाहीत. पण "आता या मुलीचं लग्न कसं होणार" वगैरे झापडबंद, मध्यमवर्गीय विचार अजूनही दिसतो.

ऋषिकेश Thu, 04/07/2013 - 10:45

आतापर्यंत वर दिलेला विदा हा परदेशी माध्यमांतून आला होता. आजच वाचनात भारतातील नव्हे अगदी महाराष्ट्रातील विदा आला आहे. आणि वरील निष्कर्षांना तो अतिशय पुरक आहे.

DNA मधील मुळ बातमी

या बातमी नुसारः २०१२ मध्ये महाराष्ट्रात नोंदल्या गेलेल्या १८३९ केसेसपैकी १८३२ म्हणजे ९९.६१% केसेसमध्ये बलात्कार करणार्‍या व्यक्ती या पिडीत व्यक्तीशी परिचयातीलच होत्या. यापैकी १,१०१ बलात्कार ओळखीच्या व्यक्तीकडून, ५०१ बलात्कार शेजार्‍यांकडून, १५३ नातेवाईकांकडून तर ७७ कुटुंबातील व्यक्तीकडूनच झाले आहेत.

अर्थातच मुलींसाठी अनोळखी व्यक्ती बरोबर बाहेर भटकु नकोस, रात्री बाहेर जाऊ नकोस वगैरे "नियम" लादताना या विदा डोळ्यासमोर बाळगला तरी पुरेसे आहे.

मी Thu, 04/07/2013 - 11:23

In reply to by ऋषिकेश

>>यापैकी १,१०१ बलात्कार ओळखीच्या व्यक्तीकडून, ५०१ बलात्कार शेजार्‍यांकडून, १५३ नातेवाईकांकडून तर ७७ कुटुंबातील व्यक्तीकडूनच झाले आहेत.

जर ओळखीच्या व्यक्तीबद्दल, शेजार्‍याबद्दल, नातेवाईकाबद्दल आणि कुटुंबातील व्यक्तीबद्दल संदेह निर्माण झाल्यास व्यक्तिने(भविष्यात पिडित होउ शकणार्‍या) काय करावे असे आपले मत आहे?

गवि Thu, 04/07/2013 - 11:27

In reply to by मी

अगदी अगदी हेच वाटलं.

० ते ६० या वयोगटातल्या स्त्रियांनी कोणाहीसोबत कोठेही केव्हाही जाऊ नये अथवा येऊ नये अथवा बोलू नये अथवा दिसू नये असा जालीम आणि परिणामकारक उपाय या सर्वातून समोर येतो..

ऋषिकेश Thu, 04/07/2013 - 11:36

In reply to by मी

जर एखाद्या व्यक्तीला असा संदेह आधीच निर्माण झाला तर ती (संभावित पिडीत) व्यक्ती योग्य ती खबरदारी आपणहून आधीच घेईल असे वाटते.
या व्यतिरिक्त काही गोष्टी करता येतीलः
१. (संदेह असो अथवा नसो प्रत्येक व्यक्तीने) जवळ स्प्रे बाळगणे, स्वसंरक्षणाचे ट्रेनिंग घेणे, जवळील वस्तुंचा प्रसंगी शस्त्र म्हणून कसा वापर होऊ शकतो याचा विचार करून ठेवणे कधीही उपयुक्त ठरू शकते. शिवाय कधी असा प्रसंग आलाच तर काय करता येईल, काय करावे व काय करू नये याची माहिती करून घेणे अधिक महत्त्वाचे आहे. घरातील माहितगार व्यक्तीने आपल्या आई/बायको/बहिणीसोबत याविषयी खुलेपणाने बोलुन असा प्रसंग आल्यास काय केले पाहिजे याविषयी घरात चर्चा झाली असणे अधिक श्रेयस्कर. तसेच अल्पवयीन मुलांसोबत त्यांच्यातील समज किती आहे याचा अंदाज घेऊन त्यानुसार बोलणे असले पाहिजे. त्या मुलांना अप्रोचेबल वाटेल असे वातावरण असले पाहिजे वगैरे वगैरे बरेच काही.

२. जर एखाद्या व्यक्तीबद्दल अशी शंका असेल तर त्या व्यक्तीपासून सावध राहणे व त्या व्यक्तीसोबत आपणहून एकट्याने कोठेही न जाणे.
३. त्या व्यक्तीने छेड काढली किंवा इतर काही कृती केल्यास योग्य तितका ओरडा करून सगळ्यांना त्याबद्दल सुचित करून ठेवणे.

या व्यतिरिक्त (२ व ३ व्यतिरिक्त) पटकन सुचले नाही.

मी Thu, 04/07/2013 - 12:03

In reply to by ऋषिकेश

तुम्ही दिलेली बातमी तुमच्या लेखातील विचाराला धरुनच/पुरक आहे, आणि काळजी घेण्याबद्दल दिलेले पर्यायही योग्यच आहेत, त्यामुळे इतरांनीही काळजी घेण्याबद्दल तुम्हाला आक्षेप नसावा असे वाटते.

ऋषिकेश Thu, 04/07/2013 - 12:17

In reply to by मी

इतरांनीही काळजी घेण्यावर, किंवा काळजी घ्या असे सांगण्यावर आक्षेप नाही. मात्र त्याच्याआडून व्यक्तीस्वातंत्र्यांवर निर्बंध घालण्यावर आक्षेप आहे