Skip to main content

सिद्धोबा

मुख्य रस्त्यावर तो कधीच नसतो.
थोडं आत वळल्यावर -
भर दुपारी अचानक
एक हिरवाकंच पाचू सामोरा येतो.
मूळ खोड नसणाऱ्या
पारंब्यांच्या वडाखाली
मोरांचा एक थवा
केकारवत फिरतो इकडेतिकडे.
तहानलेल्या डोंगराच्या पायथ्याशी
एक नितळ झरा आहे, थंडगार!
वेळू आणि आमराई
वगैरेही-

निळंशार आकाश, स्वच्छ मन,
निवलेले डोळे, अक्षय शांती-
तोच सिद्धोबा!

पण थोडं आत वळावं लागतं -
स्वतःच्या.
कारण मुख्य रस्त्यावर तो कधीच नसतो -
तिथे रहदारी असते फक्त.

.

श्रावण मोडक Fri, 25/01/2013 - 14:05

आवडली रचना. शेवटचा भाग अगदी कळसाकडे नेतोय. :-)

अजित विश्वनाथ भागवत Fri, 25/01/2013 - 14:55

फार छान.
खूप आवडला सिद्धोबा!
ते सहज पण दुर्मिळ दर्शन उत्तम व्यक्त झाले आहे.
नुस्तं वाचून देखिल एवढं छान वाटलं...
'रहदारी'चा उल्लेख मात्र उगीच ढोबळ वाटून गेला.

राजन बापट Fri, 25/01/2013 - 18:10

कविता आवडली.

>>पण थोडं आत वळावं लागतं -
स्वतःच्या.

या ओळींमधला शेवटचा शब्द टाळता आला असता. माझ्यामते तरीही सूचकता अधोरेखित झाली असती आणि कदाचित अधिक धारदार बनती.

सन्जोप राव Tue, 29/01/2013 - 06:43

In reply to by राजन बापट

असेच म्हणतो. अर्थात आमच्यासारख्या औरंजेबांना 'स्वतःच्या आतमध्ये वळणे' ही सांकेतिकता हा शब्द नसता तर कळाली असती याची ग्यारंटी नाही. त्यामुळे हाये ह्येच ब्येस हाये.
कविता एकूणात आवडली. नाना, जरा आत वळा आणि अधिक लिहीत चला.

सहज Tue, 29/01/2013 - 06:54

चला ह्या कवितेचा वापर करुन नानामहाराज ब्रँड बनवता येईल. नाहीतरी सध्या बर्‍याच बुवाबाबांचे शेयर्स कोसळले आहेत हा नवा एनएफओ भारी दिसतोय!!

;-)

ऋषिकेश Wed, 30/01/2013 - 12:47

लय ब्येस.. अतिशय आवडली
बर्‍याच दिवसांनी कवितेला पाच चांदण्या द्यायचा योग आल :)