Skip to main content

"चित्रगुप्ताचा न्याय: सेल्फी घेणारा माकड झाला"

त्याचा मृत्यू झाला. त्याचा आत्मा एका प्रकाशमार्गाने चित्रगुप्ताच्या दरबारात पोहोचला. त्याला समोर एक विशाल न्यायासन दिसले , त्यावर चित्रगुप्त विराजमान होते . ते धवल वस्त्रात, तेजस्वी आणि शांत दिसत होते. त्यांच्या पुढ्यात असंख्य ग्रंथ होते. त्यात पृथ्वीवरील प्रत्येक माणसाने केलेल्या पाप आणि पुण्याचा हिशोब होता.

चित्रगुप्ताने विचारले, “कुठे जाण्याची इच्छा आहे?”

तो आत्मा म्हणाला, “माझ्या जीवनात अनेक चुका झाल्या, पण शेवटी मी भगवंताच्या दर्शनाला गेलो. त्यांच्या चरणी क्षमा मागितली. माझे पाप नष्ट झाले. मला स्वर्ग मिळाला पाहिजे.”

चित्रगुप्ताने एक जाड ग्रंथ उघडला. त्याच्या पानांवर त्या आत्म्याचे संपूर्ण जीवन, प्रत्येक कृती, प्रत्येक विचार नोंदलेले होते. तो ग्रंथ पहात चित्रगुप्त म्हणले “पण माझ्या रेकॉर्डमध्ये तुझ्या क्षमायाचनेचा उल्लेख नाही.”

तो आत्मा चकित झाला. “असं कसं होईल? मी मंदिरात गेलो होतो. फोटो घेतले, सेल्फी काढले, रिल बनवली. साक्ष आहे!”

चित्रगुप्त थोडं हसले. “हो, साक्ष आहे. मंदिराच्या सिंहद्वारासमोर तू सेल्फी घेतलीस. परिसरातील मूर्तींसोबत घेतलेले फोटो आहेत. धार्मिक विधींचे व्हिडिओ ही आहेत. देवतेच्या दर्शन घेताना क्षमा मागण्याची रिलही आहे. पण...”

चित्रगुप्त थोडं थांबले. “तुझं लक्ष फक्त कॅमेऱ्यात होतं. क्षमा मागताना तुझ्या डोळ्यांत भक्ती नव्हती, फक्त फ्रेम होती. तुझ्या मनात पश्चात्ताप नव्हता, फक्त पोस्ट टाकण्याची घाई होती. त्यामुळे तुझं पाप नष्ट झालं नाही.”

तो आत्मा गप्प झाला.

चित्रगुप्त म्हणाले, “मी तुला नरकात पाठवणार नाही. तुला पृथ्वीवर परत पाठवतो, दिल्लीच्या चिडियाघरात, माकड रूपात.”

“माकड?” तो आत्मा चकित झाला.

“हो. तिथे तू माकड चेष्टा करशील. लोक तुझ्या सोबत सेल्फी घेतील, फोटो काढतील, रिल बनवतील. जसं तू मंदिरात देवाचे दर्शन करताना केलं होतंस. पण आता तू त्यांच्या फ्रेममध्ये असशील. लोक तुझ्या रूपात हास्य, करुणा आणि विसंगती पाहतील. तुला तुझा पूर्वीचा जन्म आठवेल ‘आपणही कधी असं केलं होतं आणि त्याच्या परिणाम भोगतो आहे. तेंव्हा तू खर्‍या अंतकरणाने केलेल्या पापांची क्षमा मागितली तर पुढच्या जन्मी तुला स्वर्ग मिळेल.

तो आत्मा आता शांत होता. त्याला समजलं होतं, फोटो पुरावा नाही, भगवंताच्या चरणी सच्या मनाने केलेली प्रार्थनाच चित्रगुप्ताच्या दरबारात पुरावा असते.

सई केसकर Tue, 30/12/2025 - 19:31

>>>हो. तिथे तू माकड चेष्टा करशील. लोक तुझ्या सोबत सेल्फी घेतील, फोटो काढतील, रिल बनवतील. जसं तू देवतेसमोर केलं होतंस.

याचा अर्थ काय होतो?

सैराट Wed, 31/12/2025 - 17:18

In reply to by सई केसकर

देवता माकड आहे !

'न'वी बाजू Wed, 31/12/2025 - 18:37

In reply to by सैराट

हा देवतेचा बहुमान आहे.

(अवांतर: हनुमानाबद्दल एकीकडे आम्हाला अभिमान आहे (कारण आमच्यातला एकजण देव झाला, म्हणून), पण दुसरीकडे त्याची लाजसुद्धा वाटते (कारण (वानरासारखा वानर असून) त्याने रामाची (“‘श्री’ मत कहो उसे!”) चाटूगिरी केली, म्हणून (अरे, वानरजातीला काही स्वाभिमान असायला हवा की नको?), आणि, त्या भानगडीत, ज्याच्याशी काही घेणेदेणे नाही अशा थर्ड पार्टीची लंका जाळायला स्वतःची शेपटी पेटवून घेतली, म्हणून. असो चालायचेच.)

'न'वी बाजू Tue, 30/12/2025 - 19:39

माकडांची बदनामी थांबवा!!!!!!

(कितीही झाले, तरी माझे पूर्वज, माझे बांधव आहेत ते!)

'न'वी बाजू Wed, 31/12/2025 - 19:15

आम्हाला जे रामायण लहानपणी शिकविण्यात आले, त्यानुसार, हनुमान हा वानर (ape) आहे, माकड (monkey) नव्हे.

परंतु, माकडांना शेपूट असते, तर वानरांना ती नसते, हा दोहोंमधील प्रमुख फरकांपैकी एक आहे, असे आधुनिक जीवशास्त्र सांगते.

आता, हनुमानाने आपली पेटविलेली शेपूट लंका जाळायला वापरली होती, असा दाखला रामायणात सापडतो. तसेच, पुढे महाभारतात हनुमानाची एंट्री होते, त्यातसुद्धा भीम हनुमानाची (रस्त्यात पसरलेली) शेपूट उचलण्याचा प्रयत्न करतो, असे वर्णन आहे. (झालेच तर, अर्जुनाच्या रथावरील ध्वजात हनुमानाचे चित्र असते, त्यातसुद्धा हनुमानास (बहुधा) शेपूट असते. (चूभूद्याघ्या.))

मग नक्की काय? हनुमान हा वानर आहे, की माकड? हनुमानाचे ‘वानर’ म्हणून वर्णन आणि त्याला चांगली लांबलचक शेपूट असणे, यांची सांगड कशी घालायची?

की, आयुर्वेदिक (किंवा भारतीय पारंपरिक) वैद्यकात (किंवा आमच्या (दिवंगत) म्याटर्नल आजीच्या बटवाशास्त्रात) ज्याप्रमाणे एखादा पदार्थ ‘उष्ण’ किंवा ‘थंड’ असणे याचा तो पदार्थ गरम किंवा गार असण्याशी संबंध (असलाच, तर) व्यस्त असतो (उदाहरणादाखल, बर्फ हा (माझ्या ऐकीव माहितीप्रमाणे; चूभूद्याघ्या.) ‘उष्ण’ असतो; Go figure!), तशातला काही हा प्रकार आहे? बोले तो, आमच्या पारंपरिक ‘शास्त्रां’त कशालाही काहीही म्हणतात, नि त्यामुळे त्यांची आणि आधुनिक विज्ञानाची सांगड घालणे हे आम्हाला तर सोडाच, परंतु, साक्षात ब्रह्मदेवाचा बाप जरी पृथ्वीवर अवतरला, तरी त्यालासुद्धा अशक्य आहे, असे काहीसे?

असो चालायचेच.

'न'वी बाजू Wed, 31/12/2025 - 23:28

In reply to by 'न'वी बाजू

ज्याप्रमाणे एखादा पदार्थ ‘उष्ण’ किंवा ‘थंड’ असणे याचा तो पदार्थ गरम किंवा गार असण्याशी संबंध (असलाच, तर) व्यस्त असतो (उदाहरणादाखल, बर्फ हा (माझ्या ऐकीव माहितीप्रमाणे; चूभूद्याघ्या.) ‘उष्ण’ असतो; Go figure!),

यापुढे, पुढील मजकूर चिकटविण्याचा राहून गेला:
 

“किंवा, ‘पित्त’ ही संज्ञा, (पोटातील) acidity, इथपासून ते bile (which is positively alkaline), इथपर्यंत, इतक्या wide rangeमधील काहीही दर्शवू शकते,”

असो चालायचेच.

सई केसकर Wed, 31/12/2025 - 20:04

प्लॅस्टिक सर्जरीचे उदाहरण आहे. त्याकाळी हे सगळं होतं.
हल्ली गंगावन इतिहासजमा झाली आहेत आणि आता आपण थेट हेअर extension लावू शकतो. लिप फिलर्स वापरून पातळ ओठ कोळंबीची अलर्जी आल्यावर होतात तसे जाड करून घेता येतात. बाकी कुठे कुठे काय काय टोचून त्याचे कसे कसे परिणाम होतात हे समजून घ्यायचं असेल तर किम करडाशियां आहेच.
तर वानरला शेपटीची हौस असेल आणि तो गणपतीच्या प्लॅस्टिक सर्जनकडे गेला असेल ही शक्यता नाकारता येत नाही.
शिवाय गणपती पार्वतीच्या अंगचा मळ काढून तयार केला होता. (देव देवता किती शतकांतून एकदा अंघोळ करायचे देवालाच ठाऊक). तरीही तो चांगला गोरापान आहे. त्यामुळे त्या काळच्या वैद्यांना glutathione देखील माहिती होते. किंवा पार्वतीच्या अंगावर पांढरा शुभ्र मळ तयार व्हायचा. यापैकी काहीही सत्य असू शकतं.

'न'वी बाजू Thu, 01/01/2026 - 01:01

In reply to by सई केसकर

किंवा पार्वतीच्या अंगावर पांढरा शुभ्र मळ तयार व्हायचा.

(ऐकीव माहितीनुसार) शंकर-पार्वती हे हिमालयात राहात होते, ही बाब लक्षात घेतल्यास, पार्वती ही (आद्य) snow-woman असू शकेल, ही शक्यता विचारात घेतली आहेत काय?

(In which case, (अंगावरच्या पांढऱ्याशुभ्र) मळाचा गणपती करणे हा तिच्या डाव्या हाताचा मळ असू शकेल.)

(देव देवता किती शतकांतून एकदा अंघोळ करायचे देवालाच ठाऊक).

पुण्यात राहून असले ताशेरे मारणे सोपे आहे. हिमालयात राहात असतात (आणि घरात central heating वगैरे नसते), तर तुम्हीसुद्धा केली नसतीत, काय समजलात?

(तसेही, त्या लोकांच्यात ब्रह्मदेवाची कालगणना प्रचलित होती, म्हणतात. त्यामुळे, त्या हिशेबाने, पार्वती दिवसातून एकदा (किंवा कदाचित दिवसातून एकाहून अधिक वेळासुद्धा) आंघोळ करीत असणे शक्य आहेच.)

चिमणराव Thu, 01/01/2026 - 06:19

माझ्या निरीक्षणाच्याप्रमाणे वानरांना चांगल्या लांब आणि डौलदार शेपट्या असतात. शिवाय ती माकडांसारखा हावरटपणा करत नाहीत, शिस्तबद्ध असतात. माकडं मात्र फारच त्रास देतात, दंगा करतात. त्यामुळे माकड होशील आणि तेसुद्धा दिल्लीच्या पिंजऱ्यात ही चांगलीच अद्दल घडवली आहे चित्रगुप्ताने ( म्हणजे तशी काही शक्यता असेल तर).
बाकी आणखी कुणाला कायकाय शिक्षा दिल्या आहेत ते पण जाणून घ्यायचे आहे.

सई केसकर Thu, 01/01/2026 - 06:53

>>>snow-woman असू शकेल, ही शक्यता विचारात घेतली आहेत काय?
मग गणपती स्नो चाईल्ड झाला. त्याचं डोकं उडवलं तर ते परत जोडायला शंकराला पाच पन्नास पावलं चालून ते परत उचलून खांद्यावर ठेवलं की झालं!
अख्खा हत्ती कशाला मारायला लागला असता त्याला? मला लहानपणी असं वाटायचं की गणपतीसाठी जो हत्ती मारला, त्यालाही ससा, कोल्हा अशा एखाद्या प्राण्याचं डोकं का नाही लावलं. मग जो प्राणी त्या साठी मारला त्याला आणखीन कुणाचं. ही क्रिया काळाच्या अंतापर्यंत चालू राहिली असती. ते गणितात नसतं का काहीतरी (n-1) तसं. किंवा नरसिंहाला माणसाचं धड लावण्यापेक्षा गणपतीच्या हत्तीचं धड लावलं असतं तर दोन्ही डोकी आणि धढं योग्य ठिकाणी वापरली जाऊन प्रश्न तिथेच संपला असता.

'न'वी बाजू Thu, 01/01/2026 - 07:26

In reply to by सई केसकर

त्याचं डोकं उडवलं तर ते परत जोडायला शंकराला पाच पन्नास पावलं चालून ते परत उचलून खांद्यावर ठेवलं की झालं! अख्खा हत्ती कशाला मारायला लागला असता त्याला?

डोके उडविल्यावर ते उतारावरून घरंगळत गेले (We are talking about a Himalayan terrain now.), आणि दरीत कोसळले आणि/किंवा त्याच्या ठिकऱ्या ठिकऱ्या झाल्या. तेच डोके पुन्हा आणून बसविणे was no longer an option.

(तसेही, शंकराची नावीन्याची हौस आणि/किंवा विनोदबुद्धी यांपैकी काही येथे कामी आले असणेसुद्धा शक्य आहे. किंवा, त्याहूनही सोपे (आणि, plausible!) स्पष्टीकरण: शंकर तेव्हा (नेहमीप्रमाणे) भांगेच्या तारेत होता!)

असो चालायचेच.