अनोळखी व्यक्तींना नात्यांचे लेबल नको:
माझ्या सर्व मित्र आणि मैत्रिणींनो, वर्ष सरता सरता आपण एका वेगळ्या विषयावर बोलू. हा विषय थोडा जास्त मिश्किलपणे आणि थोडा कमी गंभीरपणे मी या लेखात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे फिफ्टी फिफ्टी विथ एस्ट्रा कॉमेडी तडका. आता बघा, आपला भारत हा आपुलकीचा देश आहे, असं आपण अभिमानाने सांगतो. ही आपुलकी कधी कधी इतकी जास्त ओसंडून वाहते की, इथे प्रत्येक अनोळखी माणूस अचानक आपला नातेवाईक होतो.
भाजी घेताना भाजीवाली मावशी, ऑटोवाला दादा, ऑफिसमधली रिसेप्शनिस्ट ताई, हॉटेलमधला वेटर भैय्या, विमानातली हवाई सुंदरी दीदी. 😉
हे नातेसंबंध इतक्या वेगाने वाढतात की, एखाद्या लग्नाची पत्रिका काढायची वेळ आली तर "यापैकी कोणकोणत्या नातेवाईकाला बोलवायचे?” असा प्रश्न पडावा! 😜
पण मला एक साधा प्रश्न पडतो. भाजीवालीला मावशी म्हटलं, म्हणून ती जास्त भाजी देणार आहे का? आणि तिने उद्या समजा आपल्या दोन्ही तळहातात शकुनीसारखे फासे रगडून फोन करून “मेरे प्यारे भाँजे, मला जरा लोन फेडायला अर्जंट पंधरा हजार रुपये हवे आहेत, देतो का? पंधरा महिन्यांनी परत करीन!” असं म्हटलं, तर आपण तशी मदत करणार आहोत का? नसेल, तर हे नातं नक्की कुठपर्यंत टिकतं असं आपणास वाटतं? भाजीचे पैसे देईपर्यंत? की पुन्हा पुन्हा भाजी घेतांना? 🤔
खरं तर हे शब्द प्रेमातून कमी आणि सवयीतून जास्त वापरले जात असावे. नाव विचारायची, लक्षात ठेवायची गरज नको किंवा माहीत असेल तर त्यानंतर “जी” लावायची तसदी नको, म्हणूनसुद्धा बरेचदा आपण दादा-ताईचा शॉर्टकट मारतो. एकाच शब्दात आदर, ओळख आणि आपुलकी तिन्ही उरकून टाकायचा हा प्रयत्न असतो.
पण मला सांगा फक्त मावशीच का? भाजीवाली आत्या का नाही? रिक्षावाला मामेभाऊ, समोरच्या बिल्डिंगमधली आतेबहीण, सोसायटीला सिक्युरिटी गार्ड भाचा, लंडनला जातांना विमानात शेजारी बसलेली क्लिओपात्रा नणंद, एखाद्या मोठ्या कंपनीचा मालक अंबानी सासरेबुवा, सुतार मामा, प्लंबर भाचा, टेलर पुतण्या, फळवाली आरती आतेबहीण, अभिनेत्री मधुबाला मामेबहीण असे कुणी का म्हणत नाही? सांगा बरे! 🤪
प्रवासात भेटलेल्या अनोळखी व्यक्तीला सुनबाई, जावई, जाऊबाई, नणंद असे एकदा संबोधून तर पहा खरं. काय मज्जा येईल! 😂
एसटीमध्ये खिडकीजवळ बसलेल्या अनोळखी माणसाला:
"अहो, जावई बापू! जरा खिडकी बंद करता का? गार वारा लागतोय कानाला!" 😜
खाड!! 💥
सिनेमा तिकीटच्या लाईनमध्ये, समोरच्या बाईला:
"अहो, सासुबाई. माझे पण तिकीट काढून देता का?"
खाड!! 💥
लोकल ट्रेनच्या गर्दीत:
"मेव्हणे बुवा/साले साहेब, जरा मला बसायला जागा देता का?"
खाड!! 💥
"खाड" आवाज कशाचा आहे ते सुजाण वाचक ओळखून घेतीलच!!
🖐🏽
मग घराघरात, चौकाचौकात असे डायलॉग ऐकायला येतील.
"तुम्हाला सांगतो, एमजी रोडवर माझे दहा जावई, त्याच्या बाजूच्या बिल्डिंगमध्ये माझ्या तेवीस सुना राहतात, रोज संध्याकाळी गार्डनमध्ये भेटणारे सतरा सासरेबुवा, चोवीस मामेबहिणी आणि...!" तुम्हीच पुढची कल्पनाशक्ती लढवा आता. 😄
काहीजण (बरेचदा "जणी") उगाच समोरच्या अनोळखी व्यक्तीशी अत्यंत जुजबी बोलतांना सुद्धा त्याला त्याच्या वयाची जाणीव करून देणारं नातं जोडतात. काका, आजी, आजोबा जरा बाजूला सरकता का? मी म्हणतो, काय गरज आहे? एखाद्या अनोळखी मुलीला आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असणाऱ्या माणसाला त्याचे वय जाणवून द्यायचे गरजेचे आहे का? असेल तर काकाच का म्हणायचे? एकदा सासरेबुवा म्हणून पहा बरे! पिताश्री, मामाश्री संबोधून पहा. म्हणजे मग काय गोंधळ होईल, ते विचारायलाच नको. जर तुम्ही अनोळखी व्यक्तीला सासरा जावई सून सासुबाई प्रियकर प्रेयसी ही नाती लावणार नसाल, तर इतरही कोणतेच नाते सुद्धा कशाला लावायचे म्हणतो मी! 🤪
हेच एखादा कॉलेजवयीन मुलगा वयस्कर स्त्रीला बळजबरीने काकू म्हणतो ते पण कशाला? "आंटी मत कहो ना!" असा कोणतातरी डायलॉग या निमित्ताने मला आठवला. कोणत्या चित्रपटातला आहे आठवत नाही.
लेख वाचतांना माझे मिश्किल मित्र मला विचारतील, "काय रे निमिष, तुला कोणती पोरगी काका बिका म्हणाली की काय? म्हणून चिडून तू हा लेख लिहिलेला दिसतोय!"
नाही रे बाबांनो. तसे कधीही होत नाही! असो! 😄
तसेच, आपल्यापेक्षा वयाने खूप छोटी अनोळखी स्त्री/मुलगी असली, तरी तिला "अगं तुगं तू" करण्याचं सुद्धा काहीच कारण नाही. हेच लहान वयाच्या मुलाला उगाचच "अरे कारे तू" म्हणून संबोधणाऱ्या मोठ्या वयाच्या स्त्रीला सुद्धा लागू होतं. "तुम्ही" असे संबोधणे योग्य आहे माझ्या दृष्टिकोनातून!
पण गंमत अशी की, ही आपुलकी फक्त शब्दापुरतीच असते.
दादा म्हणालो म्हणून तो ऑटोवाला मीटरपेक्षा कमी पैसे घेतो का?
ताई म्हटलं म्हणून गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये समोरची बाई फाईलवर लवकर सही देते का?
वेटरला भैय्या म्हटलं म्हणून तो तुम्हाला कॉम्प्लीमेंट म्हणून दोन एक्स्ट्रा गुलाबजाम देतो का?
कोपऱ्यावरच्या पानवाल्याला मामा म्हटलं की तो रोज फुकटात पान देईल का?
मला मात्र “अमुक-तमुक जी”, “सर”, “मॅडम” हे शब्द जास्त प्रामाणिक वाटतात. कारण त्यात नाटक नाही. खोट्या नात्याचा आव नाही. जे आहात ते आहात. एक व्यावसायिक व्यवहार, स्पष्ट आणि सरळ! 😎
आपुलकी दर्शवणे वाईट नाही, पण ती खरी आणि मनापासून असावी. अनोळखी व्यक्तींशी लावलेली नाती ही पत्त्याच्या घरासारखी असतात. दिसायला छान, पण वाऱ्याच्या झोताने कोसळणारी.
आदर हा शब्दांत नाही, वागण्यात असतो. आणि कधी कधी एक साधं “जी” हे हजार वेळा वापरलेल्या “दादा”पेक्षा जास्त सन्मान देऊन जातं. प्रतिक्षा जी, राकेश जी. कोमल मॅडम. अभिजीत सर. ✅👍🏽
म्हणून बाजारात भाजी घेताना मावशी म्हणायचं की “मॅडम” म्हणायचं, हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. नातं शब्दांनी नाही, कृतींनी आणि मनातल्या हेतूंनी सिद्ध होतं.
आणि हो, “ताई” शब्दामागे अजून एक फारच रंजक मानसिकता दडलेली आहे. अनोळखी स्त्रीला ताई म्हटलं की काही पुरुषांच्या मनात अचानक एक समाधानाची लहर येते, “बघा, मी किती संस्कारी आहे! माझं एकपत्नी व्रत किती घट्ट आहे!”
पण खरंच असं असतं का? रोजच्या जीवनात आणि प्रवासात भेटणाऱ्या प्रत्येक समवयीन अनोळखी स्त्रीला ताई म्हटलं, म्हणून तुमचं चारित्र्य प्रमाणपत्र आपोआप जिभेतून छापलं जाऊन कपाळावर जाऊन चिकटतं का? की मग ताई म्हणताना पुरुषाच्या मनात आदरापेक्षा भीती जास्त काम करत असते? ही भीती कुणाची? बायकोची? समाजाची? की मग स्वतःच्याच मधल्या पुरुषीपणाची? 🫣
ताई हा शब्द इथे आदराचा नसून सुरक्षाकवच बनतो. एक सामाजिक हेल्मेट! जसं काही तो शब्द म्हटला की, समोरच्या स्त्रीच्या मनातले सगळे संशय आपोआप डिलीट होतील. “मी तुम्हाला ताई म्हणालो आहे, म्हणजे आता माझ्या मनात तुमच्याबद्दल काहीच चुकीचं असू शकत नाही", असा एक अलिखित भोळा भाबडा समज! 🙋🏻
पण आदर हा शब्दात नसतो, दृष्टिकोनात असतो. समोरच्या स्त्रीला ताई म्हटलं आणि नजरेतून, वागण्यातून किंवा विचारातून मात्र आदर नसेल, तर तो शब्द केवळ उच्चारापुरताच उरतो!
या नात्यांचा सगळ्यात अपमान तेव्हा होतो, जेव्हा एखादी बायको जबरदस्तीने नवऱ्याला एखाद्या रोजच्या संपर्कातल्या स्त्रीला ताई म्हणायला लावते. किती बालिशपणाची हद्द!
खरं तर आत्मविश्वास असलेली, नीट संस्कार असले की कोणत्याही व्यक्तीला आपलं चारित्र्य सिद्ध करण्यासाठी नात्यांचा आधार घ्यावा लागत नाही. त्याला ना ताईची ढाल लागते, ना भैय्याचा मुखवटा.
असा पुरुष स्त्रीकडे स्त्री म्हणून, माणूस म्हणून पाहतो, नात्याच्या लेबलशिवाय.
👉🏼 पण याचा अर्थ असा नाही की, जो पुरुष असा नात्यांचा आधार घेतो तो "संस्कारी" नसतो. नाहीतर बऱ्याच जणांना मुद्दाम उलटा अर्थ काढण्याची सवय असते.
म्हणून प्रश्न ताई म्हणायचं की नाही हा नाही. प्रश्न हा आहे की, तो शब्द आदरातून येतोय, संस्कारातून येतोय की भीतीतून?
आता हेच चित्र थोडं उलट्या बाजूने पाहूया.
स्त्री जेव्हा एखाद्या अनोळखी पुरुषाला दादा किंवा भैय्या म्हणते, तेव्हा ते खरंच आदरातून असतं का? की मग तो शब्द स्वतःभोवती उभारलेली एक अदृश्य सुरक्षा भिंत असते? अनेक वेळा दादा हा शब्द नात्यापेक्षा सेफ्टी लॉकसारखा वापरला जातो.
“मी त्याला दादा म्हटलं आहे, म्हणजे आता तो पुरुष मर्यादेत राहील", अशी एक शांत अपेक्षा. जसं काही त्या शब्दाने त्याचं वागणं आपोआप सभ्य होईल. पण खरंच असं होईल का? दादा म्हटलं म्हणून प्रत्येक अनोळखी पुरुष लगेच सख्खा भाऊ बनतो का? भैय्या म्हटलं म्हणून नजर, भाषा आणि वागणूक लगेच बदलते का? की तो शब्द फक्त स्त्रीच्या मनाला दिलासा देण्यासाठी असतो?
❓
इथे मुद्दा आदराचा कमी आणि स्वतःच्या सुरक्षिततेचा जास्त असतो आणि ते पूर्णपणे समजण्यासारखंही आहे. कारण समाजाने स्त्रीला सतत सावध राहायला शिकवलं आहे.
✍🏽✅👉🏼 आदर, मर्यादा आणि सभ्यता या गोष्टी नात्यांच्या लेबलशिवायही पाळल्या जाव्यात, हेच खरं समानतेचं लक्षण आहे.
व्यक्तिगतपणे सांगायचं झालं तर, मला स्वतःला कधीच कुणाही अनोळखी किंवा रोजच्या ओळखीच्या व्यक्तीला नात्यात बांधलेलं आवडत नाही. माझ्यासाठी समोरचा माणूस हा माणूस असतो. दादा, ताई, मावशी, वहिनी किंवा भैय्या नाही. म्हणूनच मी नाव माहित झाल्यावर नावापुढे जी लावणं, किंवा सरळ सर–मॅडम म्हणणं पसंत करतो. नंतर झालंच तर मैत्रीचे नाते. बाकी काही नाही.
खरे तर मैत्री हे "नाते" नाहीच. नात्यांपेक्षा कित्येक पटींनी श्रेष्ठ अशी ती गोष्ट आहे. जात, पात, वय, आर्थिक परिस्थिती, लिंग यातील भेद न मानता जुळते ती असते अस्सल मैत्री!
हां, आणि तुमच्यातील माणुसकी अनोळखी व्यक्तीला जाणवून देण्यासाठी त्याला रक्ताच्या नात्याचे लेबल द्यायची गरज नाही.
यावर लगेच काही लोक भुवया उंचावतात: 🫵🏽 😡
“आपल्या संस्कृतीत असं नाही!”,
“भारतीय मूल्यं विसरायला नको!”
“मॅडम आणि सर, ही इंग्लिश संस्कृती आहे!”,
(फक्त इंग्रजी शब्दांना आक्षेप असेल तर मग या शब्दांना पर्यायी मराठी शब्द शोधून ते म्हणावेत)
पण मला मॅडम सर म्हणण्यात आणि नावापुढे जी लावण्यात भारतीय संस्कृतीचा कुठेही अनादर केला आहे असे वाटत नाही, कारण शेवटी शब्द कोणते वापरले, यापेक्षा मनातला हेतू काय आहे, हे जास्त महत्त्वाचं असतं. ताई-दादा म्हणत अपमान किंवा वाईट नजर शक्य आहे आणि सर-मॅडम म्हणत पूर्ण आदर राखणंही शक्य आहे.
खरं सांगायचं तर, आपल्या आजूबाजूला असंख्य उदाहरणं आहेत की सुरुवात ताई–दादाने होते. एकमेकांना ताई दादा संबोधल्यामुळे आजूबाजूचे लोक पण भारतीय संस्कृतीनुसार निश्चिंत राहतात. मग चहा एकत्र होतो, मेसेजेस वाढतात आणि अचानक लक्षात येतं की अरेच्चा, हे दोघे तर ताई-दादा राहिलेच नाहीत. प्रेमी जोडपे झालय. तेव्हा प्रश्न पडतो की, जर शेवटी प्रेमातच पडायचं होतं, तर आधी या चुकीच्या नात्यांचा वापर का केला? इतरांनी संशय घेऊ नये म्हणून? आणि मग नकळत का होईना, आपण या शब्दांचा, या नात्यांचा अपमानच करत नाही का? मग इथे भारतीय संस्कृतीचा अपमान नेमका कोणी केला? 🤔
जो समोरच्या स्त्रीला ताई, मावशी, वहिनी म्हणत नाही तो पाप का जादूगार आहे आणि जो प्रत्येक अनोळखी स्त्रीला नात्यांची लेबलं लावत सुटतो तो पुण्य का सौदागर आहे, असे सरसकट म्हणता येणार नाही. 🙂🙏🏽
यावरचा एक प्रचलित, पण भन्नाट जोक आहे. एक सुंदर मोलकरीण, जी आधी मालकिणीला वाहिनी म्हणायची,
ती अचानक तिला ताई म्हणायला लागते. यावरून मालकिणीला शंका येते. वगैरे वगैरे. 😂
म्हणजे शब्द बदलतो, तेव्हा नातं बदलत नाही, तर हेतू बदललेला असतो. म्हणूनच मला वाटतं, उगाच नात्यांची लेबलं लावण्यापेक्षा सरळ, प्रामाणिक संबोधन केव्हाही चांगलं. अनोळखी व्यक्ती जर नंतर रोजच्या ओळखीचा झाला आणि जरी तो समवयीन असला किंवा नसला, तरीही त्याच्याशी/तिच्याशी आपली मैत्री नक्कीच होऊ शकते! तेवढेच पुरेसे आहे. काय म्हणता?? 🤔😎
लोकांना योग्य प्रश्न का पडत नाहीत
काका, ताई, दादा, भाऊ, आजोबा, चाचा, अनोळखी लोकांना बोलणे चूक च आहे.
काका, ताई, दादा, भाऊ, चाचा, दीदी, आजोबा अनोळखी लोकांना बोलण्यात त्या लोकांचा आदर करणे ही भावना बिलकुल नसते पन तुछ समजण्या ची भावना, खोटा कळवळा, etc हेच असते.
पण वयाने जास्त असतील तर रिस्पेक्ट बोललं च पाहिजे. मग तुम्ही sir, म्हणा किंवा कोणता ही योग्य शब्ध वापरा.
लोकांची आर्थिक स्थिती, हुद्दा, अधिकार असणारे पद बघून कसे ••° मध्ये शेपूट घालून बोलता तसें च सर्व लोकांशी बोला.
.
फॉरअचेंज, निबंध तितकाही वाईट नाही, परंतु, स्माइल्यांचा वापर टाळलात, तर बरे होईल. त्याने लेख विनाकारण, नको तितका थिल्लर वाटतो.
असो चालायचेच.