Skip to main content

खरडफळा

द्रुपालच्या नव्या आवृत्तीत खरडफळा नसल्याने रिकामटेकड्या गप्पा मारण्याची सुविधा नाहीशी झाली.अभिव्यक्ती स्वातंत्र्याची ही गळचेपी आता मोडून काढण्यासाठी हा खरडफळा हा धागा म्हणून काढलाय!!
मंडळी , रिकामटेकड्या गप्पा मारायला या . खरडफळ्याचे गतवैभव परत आणा.
नबा यांच्याशी गप्पा झाल्या नाहीत बऱ्याच दिवसात ..

फक्त हत्ती क्षमस्व !!
बाकी सगळे या
चालक मालक मंडळी - एवढे चालवून घ्या आमचे !!

'न'वी बाजू Tue, 24/03/2026 - 20:57

In reply to by सई केसकर

घरी येईपर्यंत मी विचार केला की SG कोणत्या अमेरिकन राज्याचे लघुरूप आहे.

तात्यांचा बस चले तो उद्या सिंगापूरसुद्धा अमेरिकेचे राज्य बनून जाईल. आहे काय नि नाही काय?

सॅनफ्रॅन, सॅनहोजे, सॅन अमुक सॅन तमुक असा डोक्याला खूप ताण दिल्यावर...

१. यांपैकी कोठलेही अमेरिकन राज्य नाही.

२. 'संतसंतिणींचा मेळावा' म्हणणार होतो, परंतु, उगाच काही शाळकरी पौगंडी अश्लील संकेत आठवून गेले, नि आळंदीच्या वाटेच्या आठवणींनी गहिवरून आले. (संदर्भ समजला नसल्यास सोडून द्या.)

यातलं स्टिरिओटिपिकल गृहीतक:
कर्वेनगर म्हणजे काका अमेरिकेतच गेलेले असणार!

मी सांगतो तुम्हाला, काका विशाल कोथरुडाबाहेर कोठेही गेलेले नसणार म्हणून.

आमच्या लहानपणी (जेव्हा नेहरूंच्या वंशावळीच्या दुष्ट सोशालिस्ट राजवटीचे सावट भारतावर असे, वगैरे वगैरे) किनई, पुण्यात (कोठल्या फूटपाथवर, कोण जाणे, परंतु) लालनिळेपांढरे चट्टेरीपट्टेरी टीशर्ट मिळायचे. पैकी पांढर्‍या पट्ट्यावर 'दुबई' नाहीतर 'सिंगापूर' नाहीतर 'न्यूयॉर्क' असे काहीबाही (रोमन अक्षरांतून) लिहिलेले असायचे. आमच्या वेळची शायनर मंडळी तसले टीशर्ट घालून गावभर हिंडत.

झालेच तर, लक्ष्मी रोडच्या फूटपाथवर जीनचे स्कूलबॅगवजा बॅकपॅक मिळत. त्यावर पुढच्या बाजूस 'जपान', 'ऑस्ट्रेलिया', 'ब्रिटन' असे काहीबाही लिहिलेले (आणि त्याबरोबर लिहिलेल्या देशाचा झेंडा) असले लोगो असत. (पैकी, 'ब्रिटन' असे लिहिलेल्या आवृत्तीत त्या यूनियन जॅकच्या लाल आणि निळ्या रंगांची हमखास आलटापालट झालेली असे; परंतु ते सोडून देऊ.)

शिवाय, 'मेड अ‍ॅज़ जपान:४४४' की कायसेसे लिहिलेला नाडीने तोंड आवळणार्‍या नायलॉन बॅगचाही एक प्रकार त्याच फूटपाथवर मिळे. (पैकी, 'मेड इन'ऐवजी 'मेड अ‍ॅज़'मागील भावना एक वेळ समजू शकतो, परंतु, ४४४चा सिग्निफिकन्स मला आजतागायत समजलेला नाही. चालायचेच.)

गेऽले ते दिवस!

तर सांगण्याचा मतलब, काकांच्या ग्लोबट्रॉटरगिरीची मर्यादा लक्षात आली असेलच. (लक्ष्मी रोडच्या फूटपाथवर आजकाल असल्या चिजा मिळतात की नाही, ठाऊक नाही; झालेच तर, हाँगकाँग गल्लीत हल्ली मोबाइल प्रावरणे सोडून काहीच मिळत नाही. परंतु, काकांनी घातला होता तसल्या टीशर्टास पुण्यात कोठेतरी 'औटलेट' असणारच!)

असो चालायचेच.


सान फ्रान्सिस्को, सान होसे, सान आंतोनियो वगैरेंमधील 'सान' बोले तो (स्पॅनिशमध्ये) 'संत', तर सांता क्लारा, सांता मोनिका, सांता बार्बरा वगैरेंमधील 'सांता' बोले तो (स्पॅनिशमध्ये) 'संतीण' (किंवा, 'स्त्री संत', if you will).

सई केसकर Wed, 25/03/2026 - 06:04

In reply to by 'न'वी बाजू

>>यांपैकी कोठलेही अमेरिकन राज्य नाही.
माय बॅड. राज्य आणि शहर असा गोंधळ झाला.

>>तात्यांचा बस चले तो उद्या सिंगापूरसुद्धा अमेरिकेचे राज्य बनून जाईल. आहे काय नि नाही काय?
तात्यांवरून आठवलं. अलीकडे काँग्रेसचे दोन प्रवक्ते: सुप्रिया श्रीनेत आणि पवन खेडा, दर दोनेक दिवसांनी युट्यूबवर पत्रकार परिषद घेतात. आता ती त्यांना तिथे का घ्यावी लागते याचं कारण उघड आहे. पण या प्रेस्कॉन मी न चुकता बघते कारण (काँग्रेसही "तसलंच" असलं तरी) आजच्या घडीची वक्तृत्वाची पातळी किती घसरली आहे ते बघता, स्वच्छ हिंदीत (हिंदीत का असेना!), राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्दे मांडणारं काही भारतात ऐकायला मिळतं. ज्यात हे सर्व मुद्दे भारताच्या दृष्टिकोनातून मांडलेले असतात. बघायला काय बीबीसी किंवा सीएनएन देखील बघता येतंच. पण मोदीजी त्यांच्या दृष्टीने इतके महत्वाचे नाहीत.
तर तर, परवा खेडा यांनी साहब बीबी और गुलाम हा गुरुदत्तचा सिनेमा वापरून एक प्रेस्कॉन केली. साहेब = तात्या बीबी=बीबी आणि गुलाम=ओळखा..
https://www.youtube.com/live/QdrSqkAtAcE?si=Q40lsOqrIowQkjpi

अर्थात याबद्दल मतमतांतरे असणारच. पण मुख्य प्रवाहातील मीडिया हे न दाखवून नक्कीच TRP गमावतो आहे. हल्ली मराठी वृत्तवाहिन्या एखाद्या घरातली भोचक आत्याबाई (मला इथे आत्याबाई शब्द वापरताना खूप त्रास होतो आहे कारण हे सगळं करणारे पुरुष पत्रकारच असतात) असल्यासारख्या बातम्या देतात.
एखादा राणे कुणाबद्दल तरी काहीतरी अत्यंत हीन वक्तव्य करतो. मग हे सगळे माईक घेऊन त्याच्याकडे जाऊन त्याला सांगतात (वास्तविक ते त्यानं टीव्हीवर बघितलेलं असतं!) आणि त्याला विचारतात "तुमचं याबद्दल काय म्हणणं आहे?" मग तो त्याहून हीन असं काही बोलतो की लगेच हे माईक घेऊन राणेकडे जातात. असं २४ तास करत बसणं म्हणजे बातम्या.
सुप्रिया श्रीनेत यांचं भाषण ऐकताना सुषमा स्वराज यांची आठवण होते. पण ते मोदींबद्दल वाईट बोलत नाहीत असं नाही. ते फक्त सिद्ध हिंदीत बोलतात म्हणून ते वाईट वाटत नाही. उदाहरणार्थ मोदींचे परराष्ट्र धोरण म्हणजे सगळीकडे जाऊन "खी खी खी" हसणे हे वर्णन मला फार आवडलं.
असो.
गुरुदत्तच्या सिनेमात तात्या नेतन्याहु आणि मोदींना बसवणे ही करमणूक भोचक अत्याबाईपेक्षा मला जास्त आवडते.

>>लक्ष्मी रोडच्या फूटपाथवर आजकाल असल्या चिजा मिळतात की नाही, ठाऊक नाही;
मिळतात! आम्ही लहान होतो तेव्हा सारसबागेबाहेर एका बाजूला Adidas आणि दुसऱ्या बाजूला nike यांचे लोगो असलेला एकच बूट (म्हणजे अशी जोडी) मिळायची! आता काय.मिळतं याचा सर्व्हे घ्यायला हवा या निमित्ताने. पण सध्या देशप्रेम फार बोकाळले असल्याने सगळीकडे पैठणीचे ड्रेस दिसतात. फारच डोक्यात जातात ते. खरी पैठणीसुद्धा आता नेसावीशी वाटत नाही.