Skip to main content

जखम आणि खपली....

काहीतरी भस्सकन खुपतं. जखम होते. कधी वरवरची तर कधी खोल खोल रुतलेली. कधी साधसच खरचटत्;कधी बाहेरचं काहीतरी खोल आत रुतून बसतं. कधी आपलाच एखादा भाग हिसकटून, उचकटून बाहेर निघतो ना, तेव्हाची जखम तर जीवघेणी असते. जखम कसली, तेवढ्या प्रमाणात आलेला त्या भागाचा मृत्यूच की तो.
तेव्हा ठणकतं; खुपतं; दुखतं. पण तरीही show goes on ह्या उक्तीप्रमाणे आहे तिथून आहे तशीच जमेल तितकी जखम हळूहळू भरुन यायला लागते. फार मोठ्ठा भाग गेला असेल तर शरीर तो संपूर्ण भाग पुन्हा बनवूही शकत नाही कित्येकदा. पण जगताना त्याचीही सवय करुन घ्यावी लागते; खरं तर सवय होउन जाते.
वेदनेचा आणि तीव्र दु:खाचा तो क्षण मागे सरु लागतो. अवचित पुरेसा मागे गेला तर कधी तो घडलाही होता हेही जणू आपण विसरून जातो. ह्यासाठी आख्खं आयुष्यच वगैरे जायची गरज नाही; रडून थकलो, नंतर एक दीर्घ झोप झाली की काहीकाळ डोकं कसं एका वेगळ्याच विश्वात जातं. तोवर खपली धरु लागलेली असते.
वेदना नाही, तर घटनेची आठवणही नाही. पण कधीतरी आपल्याही नकळत आपलाच हात त्या जखमेवरच्या नव्यानं बसू लागलेल्या खपलीकडे जातो. आपलाच हात तीच खपली काढू पाहतो. आपल्याला त्रासही होतो. भळभळत पुन्हा रक्त येउ लागतं. पण आपलाच हात आपलीच दुखरी जागा सोडायला तयार नसतो. आपण आपल्यालाच दचकतो. जणू त्या दुखण्यातूनही,त्रासातूनही काही समाधान मिळतं की काय.
खपली खरवडली जाते.सोलली जाते.पुन्हा त्रास होतो. पुन्हा जखम नव्यानं ताजी होते. नव्यानं त्रास होतो. मागचा आघात आता अधिकच दृढमूल होतो. त्याची जाणीव घट्ट खोलवर अजूनच मेंदूत जाउन बसते. हे कळत असतं; जखमेनं आपण कळवळतही असतो. पण तरीही पुढच्याही वेळेस आपलाच हात आपल्याही नकळत जखमेच्या खपलीवर टवका मारतोच.
.
आंधळी असते म्हणे जखम. एकदा लागलं की पुन्हा पुन्हा तिथेच लागतं.आश्चर्य वाटायचं ह्या गोष्टीचं; murphy's law कसे रोचक, पण सार्वत्रिक अनुभवास येणारी निरिक्षणं सांगतात तसच त्याच त्या जागेवर जखम होण्याचं आश्चर्य वाटायचं. पण कित्येकदा तर आपल्या स्वतःलाच ती जखम पुन्हा उचकटायला हवं असतं; ट्रिगर फक्त आपणच तिथे जाउन शोधतो असं होतं. किंवा तसंही नसेल होतं एखादेवेळेस. पण जाता येता खूप सार्‍या छोट्या मोठ्या गोष्टी आख्ख्या अंगाला लागतच असतात. पण शरीर दुभंग नसताना कसं कामाच्या व्यस्तेतेत त्या क्षुल्लक धक्क्यांची जाणीवही होत नाही. त्याचा फरकही पडत नाही.
नंतर तुम्ही जखमी असता; आणि जाता येता, इथे तिथे उठबस करताना काही गोष्टी अंगाला लागतातच. त्यातच हा भाग कसा काहिसा कमजोर झालेला असतो.संवेदनशील असतो. इथे छोटासा स्पर्शही दुखर्‍या नसेची जाणीव करुन द्यायला पुरेसा असतो. हे नेहमी होणारे छोटे मोठे क्षुल्लक धक्के मग मात्र त्या जागेवर जीवघेणे वाटतात.जखम पुन्हा पुन्हा भळभळायला लागते. दुखरी होते. जखम आंधळीच असते; तेच प्रारब्ध असते; ह्यावर मग आपणही विश्वास ठेवू लागतो; वेदना हेच प्रारब्ध स्वीकारुन. विव्हळत, कण्हत.

--मनोबा

Node read time
2 minutes
2 minutes

ऋता Sat, 23/03/2013 - 02:01

एक ताजी जखम झाली आहे...कोर्टाने दोषी ठरवल्यावर ठेवणीतले आधिकार बाहेर काढून बड्यांमधल्या आरोपीला खुल्लेआम वाचवण्याचे प्रकार सुरु आहेत ते बघून.
ही जखम खोलच होत जाणार असं वाटत आहे.

श्रावण मोडक Sun, 24/03/2013 - 22:18

In reply to by ऋता

याच खटल्यात त्या बड्यासारखाच आरोप एका वृद्ध मुस्लिम महिलेवरही आहे, म्हणे. तिला टाडा कायम आहे. तिला पाच वर्षे सक्तमजुरी आहे. अगदी सुप्रीम कोर्टातही तीच शिक्षा आहे. एकच गुन्हा, शिक्षा मात्र दोन, असा हा प्रकार झाला आहे, असं म्हणतात.
ही एक जखम एकाच जागेवर होत राहते सारखी.

सहज Sat, 23/03/2013 - 06:56

बर्‍याचदा कोणत्याही विषयाबद्दल आमचे जे काही मननीय विचार आहेत ते आपसूक विविध भारती ऐकत तयार झालेल्या मनातल्या आठवणींतून स्फूरलेले असतात.

हा धागा वाचून माझ्या मनात आलेले पहीले गाणे विषय शिर्षकात लिहले आहेच. पण आता मनराव म्हणले की आमच्या डोळ्यासमोर राजकुमार येणार. काय मनचक्षु दाखवतो.

मन Tue, 26/03/2013 - 07:59

सर्व वाचकांचे आभार.
@ऋता,श्रामो :- ह्म्म. अशा जखमा आहेत खर्‍या. विसरल्या म्हणेपर्यंत त्याच जखमा नव्याने होतात.
@सहज :- गाणे चांगले आहे.
@ऋषिकेश :- आभार.