वेडपट व्हरमाँट

अमेरिकेच्या इशान्य टोकाची सहा राज्यं न्यू इंग्लंड म्हणून ओळखली जातात. पूर्वी भेटलेल्या एका प्राध्यापिकेमुळे त्यांच्यापैकी व्हरमाँट या राज्याबद्दल थोडं अधिक कुतूहल होतं. ही बाई पुण्याला आली होती तेव्हा नेहेमी पंजाबी ड्रेस घातलेली दिसायची. कापडही अगदी पक्कं भारतीय दिसायचं. एक दिवस चहाच्या वेळस गप्पा मारताना तिला समजलं की आम्ही दोघी मैत्रीणी स्वतःसाठी खरेदीला जाणार आहोत तर ही पण आली. निदान सात-आठ ड्रेससाठी कापड खरेदी केली. "घरी जाऊन शिवेन मीच!" मी आणखी चकीत झाले. कदाचित हे व्हरमॉंटही असेल बुवा भारताच्या बहुतांश भागासारखं गरम! तर ते ही नाही. तिच्या एका विद्यार्थ्याकडून समजलं की तिथे चांगलं फूटफूटभर बर्फही पडतं. आणि अशा हवेतही ही बाई हे असेच सुती, भारतीय कपडे घालून फिरते. वर कोटबिट घालत असेल. पण तरी काय! एवढंच सांगून तो थांबला नाही, "व्हरमाँटची शोभते हो ही!" असा वेडपटपणा करणारी बाई आणि तिच्या राज्याबद्दल अधिक प्रेम का वाटू नये!

अमेरिकेत आल्यावर समजलं की प्रसिद्ध आईस्क्रीम कंपनी 'बेन अँड जेरीज' ही पण मूळ व्हरमॉंटचीच. आता व्हरमाँटला गेलंच पाहिजे. न्यू यॉर्क राज्यात, आठवडाभर एक मित्र आणि त्याच्या कुटुंबीयांना मनसोक्त पिडल्यानंतर आम्ही रोडट्रीपला निघालो. न्यू इंग्लंडमधे सहा दिवस फिरायचं ठरलं. व्हरमाँटमधे म्हटलं तर आयुष्य काढलं तरी मनाचं समाधान होणार नाही, पण सध्या ते शक्य नाही म्हणून एकच दिवस व्हरमाँटच्या नावाने काढला. साधारण आठ तास तिथे गाडीतून फिरणे, आणि रस्त्यात बेन अँड जेरीजच्या एका फॅक्टरीला भेट, ज्या शहरात रहाणार होतो तिथे जागेपणीचे काही तास आणि रस्त्यात काही दिसलं तर तिथे उनाडायला दोनेक तास, असा विचार होता. व्हरमाँटनंतर ईशान्य कोपर्‍यातल्या मेन (Maine) या राज्याकडे कूच असा एकंदर प्लॅन ठरवून आम्ही न्यू यॉर्कचं विधानभवन (Capitol building) सोडलं. ही इमारतही फार सुंदर आहे. त्याबद्दल लिहून किंवा तिचे फोटो दाखवून तिच्या सौंदर्याला न्याय मिळणार नाही. ज्यांना शक्य आहे त्यांनी आल्बनीला जाऊन ही इमारत आतून पहावीच. तीन वेळा पाहूनही माझं समाधान झालेलं नाही. काही दुर्दैवी जीवांनी आल्बनीत राहूनही ती बिल्डींग बघितलेली नाही. देव त्यांच भलं करो. पण ते असो.

तर व्हरमाँट. म्हणजे हिरव्या डोंगरांचं राज्य. हे आकाराने अगदीच लहान आहे, महाराष्ट्राच्या दशांशापेक्षाही कमी क्षेत्रफळ. आणि लोकसंख्या सव्वासहा लाख, डोंबिवलीच्या निम्मी. थोडक्यात बरचसं व्हरमाँट रिकामं आहे... असं वाटेल. जिथे माणसांनी काही बांधलेलं नाही आणि पाणी नाही तिथे झाडं आहेत. या रोडट्रिपमधे निसर्गसौंदर्य बघण्यासाठी मुद्दाम वेळ काढण्याचा विचार नसल्यामुळे व्हरमाँटमधे बघण्यासारख्या फारच कमी जागा राहिल्या. मुख्य आकर्षण अर्थातच बेन अँड जेरीज होतं. वॉटरबरी नामक एका अर्ध्या-अधुर्‍या खेड्यात बेन अँड जेरीजची फॅक्टरी टूर करता येते. मूळ कंपनी सुरू झाली जवळच्याच बर्लिंग्टन नावाच्या शहरात. हेच व्हरमाँटमधलं सगळ्यात मोठं शहर, लोकसंख्या पंचेचाळीस हजारापेक्षा कमी. प्रतिस्पर्धी हागन-दाझ किंवा ही फॅक्टरी बघून कोणा नव्या उद्योजकाला मिळणार्‍या उत्तेजनाला घाबरून का काय, या मूळ फॅक्टरीच्या टूर्स वगैरे नसतात. वॉटरबरीची फॅक्टरी मात्र सगळ्यात मोठी आहे हे खरं. माफक चार डॉलर या दरात (रूपयात किती हे सांगत नाही, कारण रूपया सध्या पडलेला आहे. माफक हा शब्द अस्थानी वाटायचा.) बेन आणि जेरीबद्दल थोडक्यात माहिती आणि वरच्या मजल्यावरून खालची आईस्क्रीम बनवणारी यंत्रं पहाता येतात. याचे फोटो फार चांगले आले असते (... आता असं म्हणायला माझं काय जातंय!). पण आम्ही तिथे गेलो तोपर्यंत 'यंत्र' या विषयाची स्पर्धा आटोपली होती आणि तसेही तिथे फोटो काढू देत नाहीत. स्टीलच्या नळ-बरण्यांचे माणसांसकट काढलेले फोटो आपण हागन-दाझला दाखवले तर बेन अँड जेरीचं गुपित फुटेल की!

तर या बेन अँड जेरीची टूर मात्र बर्‍यापैकी न-अमेरिकन होती. अमेरिकेत रहाणार्‍या, राहिलेल्या किंवा फिरलेल्या लोकांना यातली गंमत थोडी जास्त भावेल. अमेरिकेत कोणतीही पर्यटनयोग्य जागा, वस्तू, गोष्ट किती मोठी आहे हे दाखवण्याचा फार सोस असतो. उदाहरणार्थ आमच्या ऑस्टीनमधे बरीच वटवाघळं आहेत, पंधरा हजारांच्या आसपास असतील. पंधरा हजार वटवाघळं हा काय छोटा आकडा आहे का! पण सांगायचं काय तर, उत्तर अमेरिकेतली, शहरी भागातली वटवाघळांची मोठी वसाहत ऑस्टीनात आहे. किंवा काय तर, ही ठरावीक गुहा उत्तर अमेरिकेतली, चुनखडकातली, पाण्यामुळे तयार झालेली सगळ्यात मोठी आहे. एखादी गोष्ट सुंदर, सेक्सी असण्यासाठी मोठ्ठीच असायला पाहिजे का? Size doesn't matter! पण हे या अमेरिकनांना कोण सांगणार? बेन अँड जेरीज हा अपवादच. अमेरिकेतला सगळ्यात मोठा आईस्क्रीमवाला/आईस्क्रीमवाली कोण हे या टूरमधे अजिबात सांगितलं नाही. उलट बेन अँड जेरीजचं आईस्क्रीम एवढं वेगळं आणि लोकप्रिय का, हे सांगितलं. बेन कोहेनला म्हणे सायनस आहे. त्यामुळे बारीकसा स्वाद येण्यासाठी जेरी ग्रीनफील्डने घातलेला फ्लेवर त्याला कमीच, खरंतर बेचव वाटायचा. फ्लेवरचं प्रमाण वाढवलं, आईस्क्रीममधे चॉकलेट, कॅरमल किंवा फ्लेवरप्रमाणे जे काही असेल त्याचे तुकडे जेव्हा जेरीने घातले, ते बेनला आवडलं. अशा पद्धतीने बेन अँड जेरीजच्या ठरावीक पद्धतीच्या आईस्क्रीमची सुरुवात झाली. बाकी बरीच विकीपिडीत माहितीही तिथे मिळाली, ती विकीपिडीयावर सापडेलच. टूरनंतर इवल्याशा कपात salted caramel and chocolate chip अशा भयचकित करणार्‍या नावाचं आईस्क्रीम समोर आलं. कॅरमल आणि मीठ! फोटो काढता न आल्यामुळे चार डॉलर वसूल झाल्यासारखं वाटत नव्हतं. त्यामुळे या विचित्र प्रकारचं आईस्क्रीम चाखून तरी पाहू म्हटलं. चॉकलेट फ्लेवरच्या आईस्क्रीममधे कॅरमलच्या पाघळलेल्या तुकड्यांमधून मीठाची किंचितशी चव कशी लागेल याचं वर्णन करता येणं कठीण आहे. बेसनाचा मऊसूत लाडू खाताना मधेच "हा काय तुकडा आला" म्हणून वैतागून चावा घ्यावा तर तो बदाम निघावा, तसं काहीतरी!

ते सांडणारं आईस्क्रीमही प्लास्टीकचं आहे.

पाकिटातले आणखी थोडे पैसे खर्चून, आईस्क्रीमचा टब संपवून आम्ही पुढे बर्लिंग्टनला गेलो. साखर खाऊन म्हणे मुलं फार चेकाळतात, त्यामुळे पालक पोरांना चॉकलेटं, आईस्क्रीमं फार खाऊ देत नाहीत. आम्ही वयस्कर लोक आहोत, आईस्क्रीम चापून फार सुस्तावलो होतो. मग सरळ बर्लिंग्टनच्या शँप्लेन तलावासमोर जाऊन बसलो. कधी नव्हे ते तलावाशेजारी आईस्क्रीमचा ठेला पाहूनही आमच्या बर्‍या अर्ध्याने "आईस्क्रीम खाऊ या?" असं विचारलं नाही. तलावाच्या मागच्या टेकड्यांमागे सूर्यही लवंडायला जात होता. निसर्गसौंदर्य बघायला वेळ घालवायचा नाही हा निश्चयही थोडा बाजूला केला; समोर दिसतोच आहे सूर्यास्त तर काय डोळे बंद करून बसायचं का? कॅमेर्‍याच्या चौपट वजनाची बॅग उचलून आणली होतीच म्हणून उगाच आपले थोडे फोटो काढले. त्यातही मी उभे फोटो काढत होते म्हणून बर्‍या अर्ध्याने कटकट केली. "सूर्यास्ताचे फोटो कसले उभे काढतेस? डेस्कटॉपवर कसे लावणार मी ते? तुझे ते कचरा, गंज, तुटक्या बाटल्या आणि फुटक्या नशीबाचे फोटो काढ हवंतर उभे!" आणि वैतागून खिशातून फोन काढला. चूक, चूक म्हणतात ती हीच. "अरे हे फोटो तुला फोनवर लावता येतील की!" यावर भांडण संपलं. शेवटचा शब्द माझाच असल्यामुळे भांडण संपण्याला तसाही अन्य पर्याय नव्हताच. तरीही त्याची तक्रार वाढू नये म्हणून त्याच्याही हातात कॅमेरा दिला. हा फोटो कोणी काढलाय आठवत नाही, पण प्रोसेसिंग मीच केलंय, म्हणून इथे डकवून देते.

बेन अँड जेरीजला जाऊन आल्यामुळे व्हरमाँटमधे "मार्क करण्याचं" समाधान लाभलेलं होतं. पण फार आनंद झाला नव्हता. दुसर्‍या दिवशी सकाळी उठून मेनला जाण्याचा बेत होता. तिथे म्हणे अफूची शेतीही आहे. (जसं काही गूगल मॅपवरच अफूची शेती कुठे आहे ते दाखवलेलं आहे, पण डिंग मारायला आपलं काय जातं? फेसबुकावर थोडीच कोणी पुरावा मागतं?) रस्त्यात व्हरमाँटची राजधानी होती आणि ती इमारत त्या दिवशी उघडी असणार होती. माँटपेलियर गावात शिरायचा प्लॅन केला. एकीकडे पर्यावरणासाठी प्लास्टीक रिसायकलिंग वगैरे केलं, ग्लोबल वॉर्मिंगबद्दल पुस्तकं वाचली, तेलाच्या किंमतींबद्दल माहितीपट पाहिले तरी ऐनवेळी बेत बदलता येण्याच्या सोयीसाठी बुडाशी गाडी पाहिजे ब्वॉ! रस्त्यात थोडं गुग्गलताडन, विकीपीडन करून घेतलं. स्मार्टफोन वापरून फेसबुकावर चेकिन वगैरे करता येत असलं तरी कधीमधी ते खरंच उपयुक्त ठरतात की!

माँटपेलियर हे व्हरमाँटच्या राजधानीचं शहर आहे. राजधानीची इमारत आतून पहाता येते. आत जाण्यासाठी विमानतळांवर असते तसली काहीही सुरक्षाव्यवस्था नसते. सोमवार ते शनिवार इमारत खुली असते. दर अर्ध्या तासाला गायडेड टूर्स असतात, इत्यादि. बाकी काही विधानभवनं पाहिलेली आहेत ती तशी मोकळ्या जागेत, पठार, कॅपिटॉल हिल वगैरेवर आहेत. ही इमारत मात्र टेकडीच्या पायथ्याशी आहे. ते टेकाड हिरवंगार आहेच. (अर्थात आम्ही भर उन्हाळ्यात गेलो; पृथ्वी तिच्या कक्षेत विरूद्ध बाजूला जाते तेव्हा तिथे फक्त खराटे रहात असतील.) विधानभवनाच्या समोरच्या इमारतीही 'फॅक्टरी मेड' अर्थात स्टँडर्ड अमेरिकन दिसत नव्हत्या. व्हरमाँटचं हे विधानभवन आटोपशीर आहे. अधिकृतरित्या बांधलेलं, मध्यम आकाराचं देऊळ असावं असं वाटलं. वर पुन्हा शेंडीवाला, सोनेरी कळस असला की लगेच हे सगळं भारतीय असावं असंच वाटतं. अमेरिकेत बायका सोनं वापरत नाहीत मग बहुतेक श्रीमंती मिरवण्यासाठी बिल्डींगीच मढवतात.

विधानभवनासमोरची एक इमारत History for dummies
विधानभवन या फोटोला नाव काय देऊ, बहीण का स्वयंस्पष्ट?

असे थोडे फोटो बाहेरून काढून आत शिरलो. बाकी काही राज्यांच्या विधानभवनांमधे स्वागतालाच एक्स-रे मशीन आणि सुरक्षारक्षक असतात. इथे हिरवट शर्ट घातलेला एक रसरशीत म्हातारा समोर आला.

म्हातारा: गुडमॉर्निंग.
आम्ही: गुडमॉर्निंग.
म्हा: विधानभवनात तुमचं स्वागत. तुम्ही व्हरमाँटचेच का?
मी: अरे कर्मा! इथेही परीक्षा द्यावी लागणार का?
म्हा: ... फुकट आईस्क्रीम हवं असेल तरच परीक्षा द्यावी लागेल.
मी: आम्ही कालच फुकट आणि विकतचं आईस्क्रीम खाल्लं. असो. तुझ्या मागच्या प्रश्नाचं उत्तर, नाही. आम्ही दूरदेश टेक्सासातून आलो.
म्हा: तिथे फारच दुष्काळ आहे म्हणे. आलाच आहात तर या इमारतीची गायडेड टूर घ्या. आणि जाताना बाटलीत भरून थोडा पाऊसही न्या हवं तर.
मी: फार चिडवू नकोस. आमच्याकडे गेल्या महिन्यात सरासरीपेक्षा दोनच इंच कमी पाऊस पडलाय.
म्हा: मग काय पूरबीर नाही ना आला?
मी: पेरीकृपेने अजून तरी अशी आफत आलेली नाही. (रिक पेरी हा टेक्ससचा गर्व्हनर आहे; भारतीय पद्धतीप्रमाणे मुख्यमंत्र्यांना समकक्ष.) हां, तर टूर होईल ना अकराची?
म्हा: होय तर. आणि तुम्ही दोघं फार नशीबवान आहात.
मी: ....?
म्हा: हां मग. मी आठवड्यातून एकच दिवस इथे असतो. बुधवारी. आणि तुम्ही बरोबर बुधवारीच इथे आला आहात. मला तुमच्या नशीबाचा हेवा वाटतो... तर हे आमचं व्हरमाँट. माँटपेलियर ही नेहेमीच व्हरमाँटची राजधानी होती. माँटपेलियर हे गाव अमेरिकन राज्यांच्या राजधान्यांमधलं सगळ्यात लहान गाव आहे. आठ हजार लोकसंख्या आहे. आणि आमच्याकडे मॅकडॉनल्ड्स नाही. मॅकडीत खायचं असेल तर शेजारच्या बारी गावात जाऊन खावं लागेल. पण तुम्ही दोघं हुशार दिसता, तुम्ही माँटपेलियरमधे यायचं ठरवलंत. ...तसे आमच्याकडे फार लोक येत नाहीत. मी या लोकांना कधीपासून सांगतोय; आठवड्यातून एकदा लोकांना फुकटची कॉफी आणि असल्यास गव्हर्नरची भेट ही लालूच पुरत नाही. जास्त लोकं यायला हवीत तर आपण फुकटचं आईस्क्रीम द्यायला सुरूवात करू या. पण कोणी कोणी ऐकत नाही हो माझं! यांचं काय म्हणणं, तर "लोकं आईस्क्रीम खाल्ल्यावर तुझ्या बडबडीकडे लक्ष देतील का?" पण मी काय इतका स्वार्थी दिसतो का? नाही, तुम्हीच सांगा. समजा आईस्क्रीम खाऊन लोकांनी माझ्याकडे दुर्लक्ष केलं तर केलं. मी तरीही इथे नोकरी करणारच, मग शेंडी तुटो वा पारंबी!

व्हरमाँटचं विधानभवन अतीव सुंदर वगैरे प्रकारातलं नाही. पण तिथे पक्के 'व्हरमाँट प्रकार'चे नियम आणि संबंधित गोष्टी आहेत. तिथल्या आमदारांना (त्यांच्या समकक्ष सेनेटर्स आणि रिप्रेझेंटेटीव्ह्ज) कामकाज सुरू असतं तेव्हा आठवड्याचे सहाशे डॉलर्सच्या आसपास मिळतात. अधिवेशनाचा किमान काळ लक्षात घेतला तरी आमदारांना वर्षाचे चौदा हजार वगैरे मिळतात. (अमेरिकेतले सरासरी उत्पन्न पस्तीस हजाराच्या आसपास आहे.) हे लोक वर्षाचा उरलेला काळ शेती किंवा अन्य काही उद्योगधंदे करतात. विधानपरिषदेच्या सभागृहात आम्हाला आमदारांच्या खुर्च्यांवर बसवताना म्हातारा सांगत होता. मी घाबरतच तिथे बसले आणि मागे रेलले. "आरामात बसा तिथे. खुर्च्या तशा दीडशे वर्ष जुन्या आहेत, पण भक्कम आहेत. थोडी कुरकूर करतील, पण तेवढंच. इथला एक आमदार तर दीडशे किलो वजनाचा आहे, पण तो रेलला तरीही खुर्ची मोडत नाही. थोडा आवाज करते एवढंच." मी बिनधास्त रेलले.

समुद्री जीव दाखवणारं झुंबर विधानपरिषदेत टूर गाईड

मग आमची स्वारी निघाली विधानसभेकडे. तिथल्या डेस्कना कुलपं आहेत हे त्याने मुद्दाम सांगितलं. "आता यात काय नवल!" या प्रतिसादात्मक चेहेर्‍यांची त्याला सवयच असणार. म्हणे "विधानपरिषदेत लोकांना कुलपं नकोयत. इथल्या आमदारांनी कुलपं मागितली. विधानसभेतले हे लोक थोडे हायटेक आहेत, लॅपटॉप वगैरे घेऊन येतात. कुलपं नसल्यामुळे त्यांना इमारतीत इतर कुठे किंवा शहरात फिरताना लॅपटॉप हातात मिरवावे लागतात. म्हणून मग त्यांनी माझ्या बॉसला विनंती करून दीडशे कुलपं मागवली. त्यांची स्वतंत्र ऑफिसंही या इमारतीत नाहीत. लोकांना जे काय भेटायचंय ते आपापल्या मतदारसंघातच भेटतात. विधानपरिषदेत फार कोणाला कुलपं नकोयत; ते सगळे शेतकरी वगैरे लोकं आहेत. त्यांनीच स्वतःहून विधानपरिषदेत संगणक आणायला बंदी केली आहे. दोन आहेत ते पण पाचेक वर्षांपूर्वी आणले, कारकून लोकांना टिपणं काढायला ते सोपे पडतात म्हणून!"

हे ऐकून मला खालच्या मजल्यावर पाहिलेली एक पाटी आठवली.

ताजं मेपल सिरप पॅनकेक्सबरोबर हादडायच्या मिषाने का होईना, वेडपटपणा मिरवणार्‍या व्हरमाँटमधे काही काळ राहिलं पाहिजे.

field_vote: 
4.333335
Your rating: None Average: 4.3 (3 votes)

प्रतिक्रिया

आवडले वर्णन आणि फोटो. तो सूर्यास्ताचा खूपच जबरी आहे. व्हरमाँट ला आम्ही एकदा 'फॉल कलर्स' पाहायला गेलो होतो. हायवेच्या दुतर्फा भव्य झाडांच्या नैसर्गिक भिंती सुंदर होत्या (आणि काँक्रीट साउंड वॉल पेक्षा कितीतरी प्रेक्षणीय). मात्र हार्टफोर्ड वरून तेथे जाणार्‍या हायवेवर दिसली होती ही झाडे - व्हरमाँटमधेच होती की मधल्या एखाद्या राज्यात ते अचूक लक्षात नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

व्हरमाँटचे वेडपट वर्णन आवडले. गेल्या वर्षी, न्यू यॉर्क टाईम्समध्ये निवडणुकीपूर्वी प्रत्येक राज्याचा वेध घेणारी एक लेखमालिका प्रकाशित झाली होती. त्यातल्या व्हरमाँटबद्दलच्या भागाची सुरूवातही Vermont is a quirky state अशा मंगलाचरणानेच झाली होती :). (दुवा). एकदा निवांत वेळ काढून भटकून यायला हवं इथे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आवडला! :-).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काय करू आता धरूनियां भीड
नि:शंक हे तोंड वाजविलें
नव्हे जगीं कोणी मुकियाचा जाण
सार्थक लाजोनि नव्हे हित

लेख आवडला .. सूर्यास्ताचे छायाचित्र तर फारच छान ..

पुढील लेखाच्या प्रतिक्षेत ...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाबा बर्वे
" समर्थाचिया सेवका वक्र पाहे
असा सर्व भूमंडळी कोण आहे ? "

'विकीपीडन'!!!
ROFL ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

तुमच्यासारख्यांसाठी आदर्श राज्य आहे तर मग हे. Smile

बाकी तो म्हातारा अगदी अवली दिसतोय.

लिखाणशैली आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

Smile
छानच. त्यांच्या विधानसभेचे वर्णन आवडले (आणि सूर्यास्ताचा फटु जरा मोठ्या आकारात द्यायला हवा होता असे वाटले)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

भारीय व्हरमाँट!
वर्णन, फोटो छान आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त डीटेल्ड वर्णन आवडले. पण फटू दिसत नसल्याने रसग्रहण पूर्ण झाले नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सुर्यास्ताचा फोटो सुंदर आहे, परत एकदा हिवाळ्याच्या थोडं आधी फॉल-कलर्स आणि हिवाळ्यात पांढर्‍या झालेल्या डोंगरांबद्दल लेखाचा भाग २ टाका ही विनंती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुरेख राज्य आणि तसाच सुरेख लेख, खूप लोकांना हे राज्य/गाव माहिती नसते,
आम्ही दर वर्षी पानगळीचे रंग बघायला जातो इथे, बार, माँटपेलिअर, स्टोव्ह अशी काही सुंदर गावे आहेत, हॅलोवीन च्या सुमारास पम्पकिन फेस्टिव्हल असतो त्याचे पण सुंदर फोटोज मिळू शकतात. हिवाळ्याच्या सुरुवातीला, कोवळ्या उन्हात पॅनकेक्स आणि इथलेच स्थानिक मेपल सिरप ह्यांचा ब्रेकफास्ट म्हणजे स्वर्गसुख.

सर्व फोटो - Olympus E-PL1 with Minolta 50mm F1.7 manual focus

श्री. व सौ. भोपळे

बुजगावणे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान वर्णन. अमेरिकेतल्या राज्यांची/शहरांची नावं ऐकलेली असली तरी भौगोलिक रचना माहित नाहीत. "आल्बनीत राहूनही ..." वगैरे समजण्यासाठी मुद्दाम नकाशा उघडून पाहिला.

शहरं, व्यक्ति वगैरेंना 'ब्रँड' करणं मला आवडत नाही...लेखाचं शीर्षक नाही तरी व्हरमाँट आवडलं.
फोटो थोडे अंधारलेले वाटत आहेत मला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख तर आवडलाच, पण 'बरा अर्धा' हा उल्लेखही आवडला. अजून फोटो दिले असते तर आवडलं असतं.
तोफेचा फोटो छान आहे आणि कॉमेंट पण!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपण कुठल्याकुठल्या जागा 'मार्क' केल्या आहेत हे सांगण्याचा क्षीण प्रयत्न असल्याचं हा लेख वाचल्यावर ताबडतोब लक्षात येतं. तसंच आम्ही टबभरून आइस्क्रीम खाल्लं आणि बेन-जेरींना हाय म्हटलं वगैरे सांगून लोकांना जळवण्याचा क्षीण प्रयत्नही कळतो.

काही दुर्दैवी जीवांनी आल्बनीत राहूनही ती बिल्डींग बघितलेली नाही. देव त्यांच भलं करो. पण ते असो.

तसं मुंबईत रहाणाऱ्या किती लोकांनी मंत्रालय बघितलेलं असतं? उग्गाच लोकांना नीचा दाखवण्यासाठी असले पेरलेले शब्दप्रयोग पाहिले की या प्रयत्नांचा क्षीणपणा आणखीनच जाणवतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त वर्णन. २ वर्षे काढलीयेत व्हरमाँटात आणि सर्वात आवडते राज्य आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे लोक उगाच टेक्सास-न्यु मेक्सिकोत येऊन अमेरिकेत गेलो म्हणून सांगतात आणि व्हरमाँट वगैरे पाहून अमेरिका फिरलो असे सांगतात. (अशा आशयाचे एक वाक्य आठवले आणि अंमळ हळवा झालो!) Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

Wink म्ह्त्र्य्शि म्य्तरी क्रुन देन्र क ? प्ल्ज बुध्वार्च डॅट थ्र्व्न्र दे. :love:

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0