Skip to main content

५) Are you out of your sense? Yes ! It's Sensory Integration Disorder.

आपण शाळेत असल्यापासून शिकत आलो आहोत, मानवाला पंचेंद्रीये असतात. स्पर्श, स्वाद, गंध, आवाज व दृश्य.( sight, smell, taste, touch, sound).
पण मी तुम्हाला सांगितले कि ती माहिती चुकीची आहे तर?

हो, आपल्याला वर नमूद केलेल्या पाच इंद्रियांच्याखेरीज अजून दोन लपलेले(हिडन) सेन्सेस असतात.


  1.  Vestibular - our sense of balance that is regulated by the inner ear. म्हणजे असं बघा, आपण बसमध्ये बसलो आहोत, बस डावीकडे वळाली तर आपण उजवीकडे कळतो कि नाही? (इनर्शिआमुळे) पण आपल्याला कशानेतरी कळते कि आपण जास्त उजवीकडे झुकलो आहोत. व आपण सरसावून नीट बसतो. हे कसे कळते? जेव्हा आपण एका बाजूस जास्त झुकतो (समजा दोरीवरून balance साधत चालत असताना) तेव्हा आपल्या त्या बाजूच्या कानातील फ्लुइड वाढते. व मेंदू त्याप्रमाणे सुचना देऊन शरीराची पोझिशन सुधारतो. या vestibular sense मुळेच आपल्याला आजूबाजूचे भान येते. आपण शरीराचा balance करत आहोत कि नाही, आपल्या शरीराच्या हालचाली या सर्व आपल्याला या  सेन्समुळे ज्ञात असतात. 
  2. Proprioceptive - या सेन्समुळे आपल्याला आपले हात, पाय अशासारखे अवयव कुठे आहेत हे समजते. आपल्या शरीरातील स्नायू, ligaments, joints हे आपल्या शरीराला ती माहिती पुरवत असतात. 



Autism spectrum वर असलेल्या मुलांचे वरील सातपैकी काही सेन्सेस हे नॉर्मल माणसाप्रमाणे काम करत नाहीत. त्यामुळे ही मुले कधी कान झाकताना दिसतात, तर कधी डोळ्यापुढे हाताने विचित्र हातवारे करतात, तर कधी दाणकन अंग टाकून देतात. हे असं का होते? माझ्या मुलाचे विचाराल तर तो आवाज व दृश्य याबाबतीत हायपरसेन्सेटिव्ह आहे. म्हणजे तो कधी कान झाकतो , कधी जाळीच्या खुर्चीतून बघायला त्याला आवडते. स्पर्श किंवा tactile sense बद्दल बोलायचे तर तो hyposensetive आहे. त्याला सोफ्यावर अंग फेकून द्यायला खूप आवडते. आवडते म्हणजे दिवसातून एकदा दोनदा तो असे करतो का? तर नाही. तो उठल्यापासून झोपेपर्यंत अगणित वेळा असे करत असतो. तसेच मार लागलेला कळत नाही. हे ही या सेन्स बद्दल असलेल्या कमी प्रतिसादामुळे होते. मेंदूपर्यंत हि सुचना जातच नाही.

स्वाद - खाणे. ही एक लढाई असते. कारण एरवी मुलांना खाण्याची चव आवडली तर तो पदार्थ मुलं खातात. पण स्पेक्ट्रमवर असलेल्या, Sensory Integration Disorder असलेल्या मुलांसाठी अजून एक factor विचारात घ्यावा लागतो. टेक्श्चर. पदार्थाचे टेक्श्चर कसे आहे यावर बर्याच गोष्टी ठरतात. त्यामुळेच ही मुलं अतिशय  Picky Eater असतात. त्यांना खायला घालणे ही त्यांच्या आयांसाठी अगदी जिकिरीची गोष्ट असते. तोंड उघडायाचेच नाही ही पहिली पायरी. उघडले तरीही जिभेला पदार्थाचा स्पर्श होताच सगळे बाहेर काढून टाकणे. मग त्यापुढे अजिबातच तोंड न उघडणे. vicious circle. जरी पदार्थ, त्याचे टेक्श्चर आवडले तरी तो पटापटा चावून सर्व ताट साफ करेल तर तसे नाही. तो पदार्थ गालात धरून बसणे. तुम्ही म्हणाल सगळीच मुले अशी करतात. तर नाही. तुम्ही माझ्या घरी या व बघा जेवणाच्या वेळेसची माझी कसरत. हे सारखे नव्हे. या सगळ्या सेन्सरी गोष्टींमुळे माझ्या मुलाला क्रंची, क्रिस्पी पदार्थ खूप आवडतात. लहान मुलांचे staple food मऊ गुरगुट्या भात अजिबात खात नाही माझा मुलगा. 
फक्त खाण्याबद्दलच नव्हे, आपल्याला कल्पना करता येणार नाही इतके या मुलांचे आयुष्य अवघड असते या sensory integration disorder मुळे. प्रखर प्रकाशात , गोंगाटाच्या ठिकाणी प्रचंड unsettling, uncomfortable वाटते या मुलांना. 
एक एक गोष्ट हळूहळू explore करत असल्याने व मुळातच सेन्सेस व्यवस्थित काम करत नसल्याने सतत जीभेशी खेळणे, तोंड वेडेवाकडे करणे, एखाद्याच गोष्टीला नको तितके attach  होणे, सततची पळापळ, चेहर्यासमोर हाताने काहीतरी अदृश्य हातवारे करणे, डोळ्याच्या कडेने बघणे, गोल गिरक्या घेणे, अतिशय अडगळीच्या जागेत कमी जागेत खुपसून बसणे, धोक्याची कल्पना नसणे,  दुसर्या व्यक्तीस बिग हग देताना अतिशय घट्ट कवटाळणे अशासारखे प्रकार घडत असतात. 

Autism झालेल्या मुलांच्या आयुष्यात Sensory Integration Disorder ने अगदी ठाण मांडलेलेच असते म्हणा ना..  

-स्वमग्नता एकलकोंडेकर

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

ऋषिकेश Wed, 12/02/2014 - 11:42

प्रखर प्रकाशात , गोंगाटाच्या ठिकाणी प्रचंड unsettling, uncomfortable वाटते या मुलांना.

:(
सायलेन्स झोन वगैरे एरवी गुळगुळीत झालेल्या सुचनांना अश्या पार्श्वभूमीवर काय झगझगीत महत्त्व येते. :(

भारतात दिवाळी, गणपती विसर्गन आदी दिवशी अश्या मुलांचे काय होत असेल कल्पनाही करवत नाही :(

सानिया Thu, 13/02/2014 - 04:41

जेव्हा आपाले सेन्सेस योग्य तर्‍हेने काम करत असतात, तेव्हा यांचे महत्व कळत नाही. पण अनेकांवर चव, वास(हे दोन्ही सेन्सेस एकत्रच काम करतात.), पोत, आवाज आणि प्रकाश यांचा तीव्र परिणाम होऊ शकतो.

वेस्टिब्युलर सेन्समुळे संभाव्य धोक्यांची कल्पना शरीराला येऊ शकते. तोल संभाळता येणे(तोल संभाळण्याच्या क्रियेला 'रायटींग(righting) अ‍ॅक्शन' असे म्हणतात.). खोल विहीरीत डोकावले असता, अंधार्‍या/काळोख्या ठिकाणी जायला भिती वाटणे, हे सारे वेस्टिब्युलर सेन्सचे परिणाम आहेत. जेव्हा इतर काही सेन्स योग्य तर्‍हेने काम करत नसतात, तेव्हा हा सेन्स अतिशय तीव्र असतो. उदा. मी एका जन्मतः अंध(अनेकदा अंध व्यक्तींमधे थोड्याफार प्रमाणात अंधार-उजेडाची जाणीव असते, पण या मुलाला जन्मतःच डोळे नव्हते, म्हणजे नुसत्या रिकाम्या खाचाच होत्या. सर्दी झाल्यावर नाकपुड्यांबरोबरच याही खाचांमधून शेंबूड बाहेर येत असे. सुदैवाने डोळ्यांवर पापण्या होत्या, त्यामुळे ते वाईट दिसत नसे.) मुलाबरोबर काम करत होते, त्याला जरी दिसत नसले, तरीही तो अडखळून क्वचितच पडत असे. त्याला मुद्दाम पाडण्याचा प्रयत्न केला तरीही तो लगेच सावरत असे. अनेक मुलांबरोबर काम करूनही या मुलासारखी रायटींग अ‍ॅक्शन मी अजूनही पाहिली नाही. मसल्स नीट काम करत नसताना अथवा लो मसल टोन असतानासुद्धा हा सेन्स तीव्र असतो, आणि प्रत्येक काम करताना(विशेषतः चालताना, बसताना, जिने चढताना हे सहज लक्षात येते.).

प्रोप्रिओसेप्टिव सेन्स म्हणजे, जर तुम्हाला डोळे मिटून टाळी वाजवायला सांगितली तर येते ना? ती या सेन्समुळे. दोन्ही हात कुठे आहेत हे एकमेकांना कळून त्यांचे को-ऑर्डिनेशन होणे वाटते तेवढे सोपे नाही. ज्यांना अशाप्रकारचे इनपुटस् हवे असतात, ते सतत खबदाडीत बसण्याचा प्रयत्न करणे, आपले जॉइंट्स दाबायला सांगणे, चादरीची घटट गुंडाळी करून त्यात बसणे, खोक्यात जाऊन बसणे असे प्रकार करत असतात. अनेकांना जेवायला किंवा काम करायला बसताना टेबल खूप पुढे ओढायला लागते, तेही याच कारणाने.

अनेकदा काही सेन्स नीट काम करत नसतील तर मुलं खात्री करण्याकरता एकाऐवजी अनेक सेन्स वापरतात. उदा. पानातल्या पदार्थांचं रूप आणि गंध दोन्ही मनास भावले, तरच पदार्थ चाखून बघणे. रिकाम्या पिशवीत काही नाहीये ना याची खात्री करण्यासाठी एकदा पिशवीत डोकावणे आणि परत स्पर्शाने खात्री करणे इ.

ज्यांना सेन्सरी इन्टीग्रेशनचे प्रॉब्लेम्स असतात, त्यांना त्यावर मात केल्याशिवाय इतर कामांवर लक्ष केंद्रित करणे शक्य नसते. म्हणूनच ही सर्वात प्रथम पायरी आहे, एकदा ही पार पाडली, की इतर गोष्टींवर काम करणे तुलनेने सोपे जाते.

असो. या विषयावर लिहावे तितके थोडे आहे.

स्वमग्नता एकलकोंडेकर Thu, 13/02/2014 - 06:19

In reply to by सानिया

अहो, तुम्ही प्लीज अजुन लिहा. किती छान व समर्पक उदाहरणे सांगत आहात! अगदी आवडला प्रतिसाद!!

मी एक महत्वाचा मुद्दा लिहायला विसरले, या सेन्सरी केओसमुले आपल्याला ज्या गोष्टी सहज कळतात त्या या मुलांना कळत नाहीत. उदा: वेल्वेटचे कापड नुसते पाहूनच आपल्याला कळते त्याचा स्पर्श किती मऊ असेल ते. किंवा झाडाचे खोड अथवा sandpaper किती खरखरीत असेल हे. हे या मुलांना शिकवावं लागते. .

त्याच्या सेन्सरी नीड्स पुर्या करणे हा त्याच्या ऑक्युपेशनल थेरपीस्टपुढे आव्हान असते. ती व आम्ही त्याच्यासाठी वेगवेगळ्या activities शोधात असतो.. उदा: प्लेडो(घरगुती मळलेली कणिक दिली तरी चालते) मध्ये खेळणे. एका बॉक्स मध्ये भरपूर बीन्स ओतून त्यात त्याला खेळायला बसवणे, वाळू - sand box मध्ये छोटी खेळणी लपवून ती त्याला शोधायला लावणे. शेव्हिंग क्रीमचा फोम करून त्यातून चित्रे काढायला लावणे (तो तोंडात जात नाही ना अर्थातच बघणे) , थोड्याश्या जड खेळण्यांची बॉक्स दोरी लावून त्याला ओढत न्यायला सांगणे, wheelbarrow walking - म्हणजे आपण त्याचे पाय धरायचे व मुलाने हातावर चालायचे, भल्या मोठ्या बॉल पूल मध्ये मुलाला हालचाल करायला लावायचे, अतिशय इलेस्तिक अशा स्ट्रेची प्रकारच्या कापडाच्या अरुंद टनेल मधून त्याला रांगायला सांगणे, मऊसर ब्रशने अंग हलके घासून काढणे ( याने proprioceptive सेन्सला फायदा होतो)

अशा सारख्या कैक activities आम्ही त्याच्या कडून करून घेणे अपेक्षित असते. जितके जास्त कराल तितके मुलाचा आपल्या स्वत:च्या शरीराचा, अवयवांचा अवेअरनेस वाढतो.

प्रतिसाद अतिशय आवडला व माहितीपूर्ण आहे.

फक्त

उदा. पानातल्या पदार्थांचं रूप आणि गंध दोन्ही मनास भावले, तरच पदार्थ चाखून बघणे.

फक्त हे उदाहरण खटकले. मला तर रंग, रूप, स्पर्श, गंध आणि ध्वनी या सगळ्य जाणीवांना कुरवाळल्याशिवाय जेवण आवडतच नै :(
निव्वळ भोवती असह्य गोंगाट आहे, कोणीतरी भांडतंय/रडतंय अश्या जागी मला जेवता येत नाही. वास आवडला नाही तर चवीला रुचकर लागणारं जेवण असलं तरी तोंडातच टाकवत नै. निव्वळ लिबलिबित 'दिस्तंय' म्हणून पदार्थ खायच्या आधी चारदा विचार करतो. मात्र मला हे अप्राकृतिक/सेन्स नीट काम न करण्याची लक्षणे आहेत असे वाटले नव्हते.

स्वमग्नता एकलकोंडेकर Thu, 13/02/2014 - 12:07

In reply to by ऋषिकेश

नाही ऋषिकेश, सेन्सेस व्यवस्थित काम करत आहेत. मेंदूपाशी योग्य तो मेसेज पोचवत आहेत म्हणूनच तुमचा मेंदू व मन एकत्र असा विचार करतात, व निर्णय घेतात की तो लिबलिबीत पदार्थ तुम्हाला नको आहे. हे सगळे व्यवस्थित आहे. माझ्यामते. बहुतेक बरोबर विचार केला मी. सानिया बरोबर का?

सानिया Fri, 14/02/2014 - 02:55

In reply to by ऋषिकेश

मात्र मला हे अप्राकृतिक/सेन्स नीट काम न करण्याची लक्षणे आहेत असे वाटले नव्हते

.

हा हा हा! सुरुवातीला जेव्हा जाणीवपूर्वक आपल्या सेन्सेसचा विचार करायला शिकले, तेव्हा माझीही अशीच अवस्था झाली होती! मला तर त्या काळात स्वत:च्या आणि भेटलेल्या प्रत्येकाच्या बारीक-सारीक सवयींवरून काही अनुमाने बांधण्याची विचित्र सवय जडली होती(जसे शाळेत असताना काही काळ आपण पाणी न पिता रासायनीक द्रव्य H2O पितो आहोत असे वाटत असे तसेच.). सुदैवाने हा रोग लवकरच आटोक्यात आला. आता असं बघा, एकाच गंधाचा परिणाम वेगगेवळ्या व्यक्तींवर वेगवेगळ्या प्रकारचा आणि वेगवेगळ्या प्रमाणात होत असतो. अगदी एकाच गंधाचा परिणामही एकाच व्यक्तीवर तो गंध कशाप्रकारे सामोरा आला आहे, त्यानुसार वेगळा होऊ शकतो. उदा. मला मोगर्‍याच्या ताज्या फुलाचा वास आवडतो पण जास्मीन या नावाखाली मिळणारा बाटलीबंद गंध आवडत नाही. आपल्या लक्षात आले नाही, तरीही आपले एकापेक्षा अधिक सेन्स दरवेळी मेंदूपर्यंत माहिती पोचवत असतात आणि त्यांचा एकत्रीत परिणामच आपल्या . आवडी-निवडींना कारणीभूत असतो. तेव्हा यात काहीच गैर/अप्राकृतिक नाही.

माझे विधान होते, ते ज्यांचे सेन्स नीट काम करत नाहीत, त्या व्यक्तींबद्द्ल. त्यांचा मेंदू समोरच्या वस्तूचे खात्रीलायक चित्र उभे करण्यात अयशस्वी ठरतो त्यामुळे त्यांना एकापेक्षा अधिक सेन्सवर अवलंबून रहायलाच लागते. ही त्यांची आवड नसून गरज असते. उदा. समोर एका बशीत बेसनाचा लाडू व दुसर्‍या बशीत कचोरी (हे दोन्ही साधारण सारखेच दिसणारे आहेत हे गृहीत धरलं आहे.)ठेवली तर न खाताही बघून, वास घेऊन व हातात घेऊन आपण फरक सांगू शकतो. पण जर या जाणीवा नीट काम करत नसतील, तर हे सगळं करूनही त्या व्यक्तीला हा फरक सांगता येणार नाही. प्रत्यक्ष खाल्याशिवाय हा फरक कळणार नाही आणि प्रत्यक्ष खाल्यावर अपेक्षाभंगाचं दु:ख एवढं असेल, की परत ती व्यक्ती कचोरीच काय लाडूही खाण्याचं नाव टाकेल. हे स्वमग्न मुलांच्या बाबतीत फारच खरं आहे. कारण त्यांची कल्पनाशक्ती कमकुवत(त्यांना कल्पनाशक्तीच नसते असंही म्हटलं जातं, पण अनेक प्रसंगात मी त्याची चुणूक पाहिली आहे.....असं मला वाटतं) असते. लहान मुलाला जर एक त्रिकोण , एक लंबगोल आणि एक फुगा अशी चित्रं दाखवून दोन सारखी चित्रं कुठली असं विचारलं तर ते मुल सहजपणे लंबगोल आणि फुग्याचं चित्र हातात देईल, पण स्वमग्न मुलाला हा सारखेपणा कळेलच असं नाही. किंबहूना तो लंबगोल वेगळ्या प्रकारे काढला असता, तो लंबगोल आहे, हेच मुळी कळणार नाही. अनेकदा असंही होतं की क्ष या व्यक्तीने स्वमग्न मुलाला गोल काढायला शिकवला, तर क्ष ने सांगितल्यावर लगेच तो मुलगा गोल काढेल, पण य या व्यक्तीने तेच सांगितले तरीही काय करायचे हे या मुलाला कळणार नाही. म्हणूनच स्वमग्न मुलांच्या बाबतीत आखीव दिनक्रम असणे जरूरीचे आहे असे म्हणतात.

आपण कळत-नकळत एकापेक्षा अनेक सेन्सेस वापरत असतो खरे, पण अनेकदा यामुळे(पण यामुळेच असे नाही) मेंदूत आवशक्यतेपेक्षा जास्त माहिती गोळा होते आणि मेंदू भंजाळून जातो. याला सेन्सरी ओव्हरलोड असे म्हणतात. अशावेळी मग अस्वस्थता, चिडचीड, कंटाळा अशी लक्षणं दिसायला लागतत. आपल्यापैकी सर्वांनाच एखादे कंटाळवाणे लांबलचक व्याख्यान ऐकताना जांभया आल्या असतील. हाच तो सेन्सरी ओव्हरलोड. तिथून सुटका होऊ शकत नसेल तर मग लक्ष विचलीत करण्याकरता आपल्या वहीची खरडवही करणे, हातातल्या कागदाची अथवा रुमालाची सुरळी करत बसणे अशा अनेक गोष्टीही आपण केल्याच असतील. जर परिस्थिती हाताबाहेर गेली, तर नर्वस सिस्टिमला 'शट डाऊन' हा आदेश मिळतो आणि सेन्सरी प्रोसेसिंग काही काळापुरते स्थगित केले जाते. काही मुलं, भिंतीवर जोरजोरात डोकं आपटताना जर तुम्ही पाहिली असतील, तर अनेकदा ते सेन्सरी ओव्हरलोडची शिकार असतात. अशाप्रकारे डोकं आपटून नर्वस सिस्टीमला ते शट-डाऊन असा आदेश देत असतात. बर्‍याचदा पालक हा लक्ष वेधण्याचा प्रकार आहे असं म्हणून दुर्लक्ष करतात. तसे करू नका ही कळकळीची विनंती आहे.