'गे प्राईड' कट्टा
हे असं काहीतरी एखाद्या सिनेमात वगैरे होतं. म्हणजे असं की आपल्याला मित्राकडे कधीही जायला चालतं, पण तेव्हा विशेष असं काही कारण, काम नसतं. पण घरच्या काही कारणांमुळे तिकडे जायला लागतं. आणि मग तिथला मुक्काम वाढतच जातो आणि मग आपल्याला आणखी उनाडायला आणखी जास्त संध्या (संधीचं अनेकवचन) मिळत जातात. या वेळेला अशी संधी फक्त सिनेमात वगैरे न राहता प्रत्यक्षातच आली. मुळात काय झालं वगैरे सगळं बिनमहत्त्वाचं आहे. पण वॉशिंग्टन डीसी भागातला माझा मुक्काम आणि रिकामा वेळ अचानक (वैश्विक तेजी यावी तसा) वाढला. मग त्या भागातच राहणाऱ्या धनंजय आणि अमुकला इमेलं केली. "मुलांनो, तुमच्या गावात किंवा राजधानीच्या गावात कुठेतरी भेटायचं का?" त्यातही धनंजय कामाचा. बॉल्टीमोरला गेल्या शनिवारी, १४ जूनला, गे प्राईड परेड होती. तिथे येणार का म्हणून त्याने पृच्छा केली.
धनंजय भेटेल, बाल्टीमोर पुन्हा पाहता येईल आणि प्राईड परेडची गंमतही अनुभवता येईल असा तिहेरी फायदा दिसल्यावर 'हो' हे एकमेव उत्तर होतं. पण बडबड करायची हौस असल्यामुळे, मी इमेलवर, गेल्या वेळेस मी एका गे प्राईड परेडला गेले होते, त्याचाही अनुभव लिहून काढला. तो कधीतरी नंतर जाहीर करेन. बहुदा अमुकने यापेक्षा चौपट जास्त विचार केला असेल, पण तो तसा गप्प बसणाऱ्यातला असल्यामुळे तो फक्त 'हो' एवढंच म्हणाला.
अमेरिकेत सगळं दूरदूर असतं म्हणून कारने जायला लागतं. धनंजय मात्र चांगल्या भागात राहतो. तिथून ट्रेनस्टेशन चालत पाच-सात मिनीटांच्या अंतरावर आहे. मित्रमंडळाबरोबर अजून पाच-सात मिनीटं मिळावीत म्हणून बहुतेक तो कार घेऊन स्टेशनवर आला होता. शिवाय आम्हाला घेऊन खेकडे खायला नेण्याचा त्याचा बेत होता. खेकडे खायचे म्हणजे डोंगर पोखरून उंदीर मिळतो, याची कल्पना असल्यामुळे आम्ही तो बेत मोडून काढला. बहुमताला मान्यता देत धनंजयने जुन्या प्रकारच्या एका बाजारात चांगले क्रॅबकेक खायला घालण्याचं मान्य केलं. स्टेशन ते घर असं पाच-सात मिनीटांचं अंतर कारने पार करणारे आम्ही बाजारापर्यंत वीसेक मिनीटं चालत गेलो. रस्त्यात अर्थात बाल्टीमोर दर्शन झालंच. हे शहर बरंच जुनं आहे, म्हणजे युरोपीय लोकांनी बांधलेलं दिसतं. खास अमेरिकन, एका साच्यातून निघालेल्या इमारती दिसत नाहीत, सगळ्या इमारती निरनिराळ्या दिसतात. क्वचितच एखादी चकचकीत काचेची इमारत, आणि बाकीच्या जुन्या, एकोणीसाव्या शतकात बांधलेल्या. फोर्ट भागातून फिरताना जशी गंमत वाटते तशीच बाल्टीमोरमध्ये वाटते. मी ते सगळं बघण्यात फार गुंगल्यामुळे फोटो काढायचे राहूनच गेले.
पण बाल्टीमोरमध्ये गुन्हेगारीही बऱ्याच प्रमाणात आहे. सगळीकडे ग्राफीट्या दिसतात. त्यांनी शहर आणखी विद्रूप होऊ नये म्हणून बऱ्याच भिंतीवर काही भित्तीचित्रं - mural काढलेली दिसली. आमच्याशी केलेल्या प्रश्नोत्तरांमुळे बहुदा धनंजयला फार त्रास झाला असावा. एका फोटोसाठी मॉडेल बनून, त्याने तो व्यक्त केला.
जेवायला जाताना रस्त्यावर फार काही गर्दी दिसली नाही. आपण चुकीच्या दिवशी या मंडळींना आमंत्रण दिलं का काय, अशी धास्ती धनंजयला वाटत होती. पण झकास जेवण आणि गप्पा रंगल्यामुळे आम्हाला फार काही फरक पडला नसता. जेवताना, जवळच असणाऱ्या एका इतालियन दुकानाबद्दलही गप्पा झाल्या. अमुकला इटलीबद्दल प्रेम असल्यामुळे आपण तिथे जावंच अशी टूम निघाली. पण जेवण संपेपर्यंत प्राईड परेडची वेळ झाली होती, म्हणून परेड असेल तर बघू असं म्हणत आम्ही परत निघालो. आणि खरंच परेड होती. रस्त्यातून चालताना त्यांची तयारी जवळपास पूर्ण झाल्याचं दिसत होतं. काही लोक आपल्या गाण्याबजावण्याची शेवटची प्रॅक्टीस करत होते. काही आपले कपडे, झेंडे ठीकठाक करत होते. आम्ही परेडची सुरूवात होती तिथे जवळच उभे राहिलो होतो. सुरूवातीला सगळा दर्शकवर्ग थंड होता. बहुदा उन्हामुळे बरेच लोक कावले असावेत. पण अधूनमधून वाऱ्याची झुळूक येत होती.
परेड सुरू झाली आणि बघता बघता माहौल बदलला. टाळ्या, चित्कार यांनी सगळा परिसर भरून गेला. अधूनमधून गाणी लावलेले ट्रक्सही जात होते. बहुतेकसे लोक दर्शकांकडे माळा फेकत होते, मार्दी ग्रा सारखंच. पण इथे दर्शकांऐवजी परेडमध्ये सहभागी लोकांनीच शर्ट काढले होते. अमुक आणि धनंजयने पकडलेल्या सगळ्या माळा शेवटी माझ्या गळ्यात विराजमान झाल्या. आयुष्यात मी जेवढे दागिने घातले नसतील तेवढे या निमित्ताने घालून घेतले. गावातले काही प्रतिष्ठित लोक आणि व्यावसायिकही परेडमध्ये सहभागी झाले होते. बाल्टीमोर शहरातले सध्याचे न्यायाधीश, राज्याच्या प्रमुखपदासाठी शर्यतीत उतरलेली एक समलैंगिक स्त्री, त्या भागातले काही पब, क्लब, नाटक मंडळी वगैरे लोकांचे गट तिथे आले होते. हे त्याचे काही फोटो (फोटो म्हणून थोर नाहीत, पण प्राईड परेड काय असते याचा अंदाज यातून येईल.) -
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
सगळी परेड संपली. पुढे एका जत्रेच्या ठिकाणापर्यंत आम्ही चालत गेलो. आजूबाजूच्या इमारतींमधून काही लोक बघत होते. काही घरांमध्ये सप्तरंगी झेंडेही दिसले. जत्रेमध्ये सप्तरंगी झेंडे, ब्रेसलेटपासून अगदी पांढऱ्या सफेद गादीपर्यंत बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी विकायला होत्या. खाण्यापिण्याच्या गोष्टी होत्या. अधूनमधून जोरदार संगीत वाजत होतं. बहुतेकसे लोक त्या तालातच चालत होते. एकंदर सगळं गणपती-विसर्जन प्रकारचं वातावरण तयार झालं होतं. तीन-चार तास सलग उभं राहून माझे पाय तक्रार करायला लागले होते. काही तासांची ही गंमत बघून, अनुभवल्यानंतर आम्ही आपापल्या घरांकडे निघालो.
समलैंगिकांना इंग्लिशमध्ये गे, गे = आनंदी, का म्हणतात हे समजलं नसेल तर एक तरी परेड अनुभवावी.
खेकडा वृत्ती
खेकडे खायचे म्हणजे डोंगर पोखरून उंदीर मिळतो, याची कल्पना असल्यामुळे आम्ही तो बेत मोडून काढला.
असहमत, पण ते एक असो. (शेवटी आम्ही कोकणेच)
ग्राफिटीचे फोटू पाहून फिलाडेल्फिया डाऊनटाऊनमधून केलेली भटकंती आठवली. तिथेही अशाच अनेक रंगीत भिंती पहायला मिळतात.
अवांतर - या वृत्तांताला 'क्रॅबकेक आणि बीफकेक' हे नाव शोभले असते :)
छान! त्या गावाचं जे वर्णन
छान! त्या गावाचं जे वर्णन केलं त्यावरुन ते पाहाण्याची इच्छा झाली (नाहीतर ते टीपीकल अमेरिकन एकसारखे शहरं).
आमच्याशी केलेल्या प्रश्नोत्तरांमुळे बहुदा धनंजयला फार त्रास झाला असावा. एका फोटोसाठी मॉडेल बनून, त्याने तो व्यक्त केला.
तो चौथा फोटो ज्यात एक माणूस साखळ-दंडात अडकलेला आहे ते धनंजय आहेत का?
आपण चुकीच्या दिवशी या मंडळींना आमंत्रण दिलं का काय, अशी धास्ती धनंजयला वाटत होती.
ह्याचा अर्थ ही परेड एकापेक्षा जास्त दिवस चालते का?
कँप?
सॅन फ्रान्सिस्को किंवा न्यू यॉर्कमधल्या परेडपेक्षा छोटी परेड असणार ह्याचा अंदाज होता, पण त्यांपेक्षा कमी कँप१सुद्धा होती का? फोटोंवरून तसं वाटतंय. 'san francisco pride 2013' किंवा 'new york pride 2013'वर गूगल इमेज सर्च केलं तर मी काय म्हणतोय त्याचा अंदाज यावा ('सेफ सर्च' पर्याय वापरत असाल तर खोडून काढावा लागेल. चेतावनी : NSFW).
१ - दुसरा अर्थ पाहावा.
...
शिवाय आम्हाला घेऊन खेकडे खायला नेण्याचा त्याचा बेत होता. खेकडे खायचे म्हणजे डोंगर पोखरून उंदीर मिळतो, याची कल्पना असल्यामुळे आम्ही तो बेत मोडून काढला.
शंका: काकू कधीपासून खेकडे खाऊ लागल्या?
(मी चुकीचे तर काही वाचले नाही ना? कदाचित, न जाणो, 'आम्हाला घेऊन खेकड्यांना खाऊ घालायला नेण्याचा त्याचा बेत होता' - अधिक रोचक! - असे वाक्य असेल, म्हणून पुन्हापुन्हा वाचले. पण छ्या:!)
खेकड्यांकरिता आमंत्रण
माझ्या घरी खेकडेमेजवानीचा शौकीन मी एकटाच. म्हणजे जर बियर-गप्पांबरोबर खेकडे खाण्याबाबत शौकीन आहे, घरी आणून एकट्यानेच खाणे तसे कंटाळवाणे. त्यामुळे खेकड्यांच्या सीझनमध्ये कोणी येथे भेट द्यायला आले (मे-स्पटेंबर) तर विशेष आमंत्रण देतो आहे. जनरल कोटा आमंत्रणही आहे, पण हे खास.
खेकडे न-खाणार्या गप्पिष्ट लोकांना सुद्धा पुन्हा येण्याचे आमंत्रण आहे. (३_१४ व अमुक यांनी आमंत्रणातून वगळल्याची तक्रार करू नये.)
चिंज : होय, ही परेड छोटी आहे. कामकरी वर्ग, ग्लॅमरचा गंध नसलेले लोकच बहुसंख्येने दिसतात. शरीरसौष्ठव म्हणा, पेहराव म्हणा, शोभारथांची सजावट म्हणा, समूहनाचाचे दिग्दर्शन म्हणा आणि कँपीपणाचा उच्च दर्जाचा अतिरेक म्हणा... सर्वच बाबतीत ही थोडी प्रादेशिक-खेडवळ होती. (३_१४ने जरा एसेफडब्ल्यू चित्रे निवडलेली आहेत, त्यापेक्षा परेड क्वचित कधी एनेसेफडब्ल्यू होती म्हणा. पण मोठ्या शहरातील मिरवणुकींइतकी खचितच नाही.)
युगांडामधील गे-विरोधी
युगांडामधील गे-विरोधी कायद्यामुळे अमेरिकेने युगांडावरील व्यापारी संबंध थांबवले असल्याचं, तसंच त्यांना विसा देणार नसल्याची बातमी आजच बी.बी.सी. वर वाचली. त्यावर अर्थातच उलट सुलट प्रतिक्रीयाही आलेल्या आहेत. ("दुसर्यांच्या कायद्यात ढवळाढवळ करण्याचा अमेरीकेला काय अधिकार, अफ्रिकेचं कल्चर अमेरिकेपेक्षा वेगळं आहे त्यात ओबामाने नाक खुपसण्याचं काम नाही वगैरे वगैरे" विरुद्ध "अमेरिकेने तुम्हाला कायदा करू नका असं सांगीतलं नाहीये, पण कोणाबरोबर व्यापार करायचा कोणाबरोबर नाही हे ठरवण्याचा अधिकार अमेरिकेला आहेच, इ.इ.")
अमेरिकेकडे जगात सुव्यवस्था
अमेरिकेकडे जगात सुव्यवस्था स्थापन करण्याची मक्तेदारी नाही इतकेच म्हणावेसे वाटते.
अमेरिकेच्या मक्तेदारीबद्दल बरोबर आहे, पण एका देशाने दुसऱ्या देशाशी नैतिक कारणावरून संबंध तोडणं याला इतिहास आहे. साउथ आफ्रिकेला वंशद्वेषाबद्दल आंतरराष्ट्रीय निर्बंधांना तोंड द्यावं लागलं होतं.
अंतर्गत प्रश्न
हा प्रश्न महत्त्वाचा आहे यात शंका नाही. समलिंगी व्यक्तींवर अन्याय होत आहे हे मान्य आहे. भारत सरकारने कायदा बदलावा याला माझे संपूर्ण समर्थन आहे. मात्र यासाठी बाहेरुन मदत घेण्याइतकी वाईट परिस्थिती आलेली नाही. सद्य परिस्थितीत एखाद्या देशाच्या अंतर्गत प्रश्नांमध्ये इतर देशांनी व्यापारी हितसंबंधांची अडवणूक वापरून ब्लॅकमेलिंग करु नये असे मला वाटते. भारतांतर्गत या संबंधांसाठी पूर्ण अनुकूल मत असून केवळ सरकारच्या मनमानीमुळे हा अन्याय सुरु आहे काय? भारतात गे-लेस्बियन प्रश्नांवरून नागरी हिंसाचार, दंगली वगैरे चालू आहेत काय? की सरकारने हा सर्वाधिक महत्त्वाचा प्रश्न समजून सद्य कायदा वापरून समलिंगी संबंधकर्त्यांना वेचून पकडले आहे व त्यांचे शिरकाण सुरु केले आहे?
म्हणूनच युगांडावर व्यापारी दबाव, भारतावर नव्हे
म्हणूनच युगांडावर व्यापारी दबाव आहे, भारतावर नव्हे.
भारतावर या बाबतीत व्यापारी दबाव आणता येईल (किंवा दबाव आणायचा विचार चालू आहे) वगैरे, ऋषिकेश यांचा कल्पनाविलास आहे. त्यावर तितपतच हलकीफुलकी चर्चा अपेक्षित होती, असे वाटते.
युगांडाबाबत आणखी गंमत अशी, की त्यांच्या विधिमंडळाकरिता ही बाब प्राथमिकतेची नव्हती. काही अमेरिकन धर्मप्रसारकांनी तिथे जाऊन या कायद्याचे राजकारण चालू केले (किंवा अतिशय दुर्लक्षित मुद्द्याला पेटवले, म्हणा). खुद्द अमेरिकेतील विधिमंडळांत आणि न्यायालयांत पिछेहाट होत असताना काही धार्मिक संस्थांना कट्टरवादी झेंडे रोवण्याकरिता आफ्रिका खंड सापडला!
प्रोजेक्ट बोलो
यासारखे प्रकार कितपत घडत असतील? आता कमी होत असतील तर ठीक आहे, पण सत्तेचा वापर करून माणसांना छळणं अनैतिक नाही का?
भारतात सुदैवाने
भारतात सुदैवाने समलैंगीकांविरुद्ध हिंसाचार दंगली चालू नसल्या तरी युगांडामधे जो नविन कायदा केला आहे त्यानुसार समलैंगिकांना तुरूंगवास (आणी काही केसेस मधे मृत्युदंड देखील) होऊ शकतो.
अशा वेळी अमेरिकेने घातलेले व्यापार निर्बंध आणि मदत खर्चात केलेली कपात आक्षेपार्ह आहे का ?
मला दोन्ही आक्षेपार्ह वाटतात.
युगांडाचा कायदा व अमेरिकेचे निर्बंध दोन्ही आक्षेपार्ह वाटतात. युगांडाचा कायदा पटला नाही म्हणून निर्बंध घातले, मग दुसरा एक आक्षेपार्ह कायदा उदा. ब्लास्फेमी. यासारखे कायदे करणाऱ्या पाकिस्तानविरुद्ध अमेरिकेचे काय धोरण आहे बॉ. युगांडाबरोबरच्या व्यवहारांवर मर्यादा घातल्याने फारसे अार्थिक नुकसान होत नसावे त्यामुळे 'कूल पॉईँट्स' मिळवण्यापुरते अमेरिकेने हे केले असावे असे मला वाटते.
फेसबुकावरचे फोटो ज्यांना बघता
फेसबुकावरचे फोटो ज्यांना बघता येत नाहीयेत, आणि घरून (किंवा इतर कुठूनही) कोणतेही फोटो बघण्याची सोय आहे त्यांना इथे काही अधिक फोटो पाहता येतील. क्वचित कधी एनेसेफडब्ल्यू दृष्यं दिसली, पण गर्दीमुळे फोटो काढायला जमलं नाही किंवा पुढच्या लोकांनी (बुद्ध्याच नाही पण) फोटो बॉंबिंग केलं म्हणूनही काही फोटो दाखवले नाहीत.
'न'वी बाजू - ज्या दिवशी गळ्यात ८-१० माळा घालून मिरवल्या त्या दिवशी मी खेकडे खाल्ल्याबद्दल आश्चर्य कसलं व्यक्त करताय? उलट नांग्या मोडून खेकडे खाण्याच्या बेताला मोडता घातला याबद्दल आश्चर्य व्यक्त करा.
तो चौथा फोटो ज्यात एक माणूस साखळ-दंडात अडकलेला आहे ते धनंजय आहेत का?
होय. तोच तो, तोतया; जो बहुतेकदा गंभीर मुखवटा घालून बसलेला असतो.
पुण्याकरिता, मुंबईकरिता तारखा
(फेसबुकवरून)
1. There will be a 3 day Pune Pride Queer Festival starting from this year under the banner of Samapathik Trust.
2. The dates are tentatively 10th, 11th and 12th October 2014. Theatre Festival on 10th, Film Festival on 11th and LGBTI Pride Walk on 12th October 2014.
मुंबईत जानेवारीच्या उत्तरार्धात.
-----
पुण्यात समारोह लहान असेल, असे वाटते. मुंबईत मात्र मिरवणूक वगैरे थोडी मोठी असते, असे ऐकून आहे.
"रिअप्रोप्रिएशन"
हा शिवीची मालकी घेऊन तिचा निर्देश बदलण्याचा प्रकार आहे : reappropriation विकी पानावरून असे दिसते की खुद्द "गे" शब्दसुद्धा त्याच प्रकारात येतो.
अन्य क्षेत्रांतली पुनर्स्वामित्वग्रहणाची उदाहरणेसुद्धा त्या विकीपानावर सापडतील.
LGBT pride month
जून महिना 'LGBT pride month' समजला जातो असं कालच्या ग्रंथालय भेटीमुळे समजलं. त्याबद्दल काही इतिहास विकीपीडीयावर सापडला.
LGBTQQIP2SAA
सुमारे ५० वर्षांपूर्वी 'गे' व्यक्ति आणि त्यांच्या समस्या हा विषय दबक्या आवाजात चर्चेत यायला सुरुवात झाली तेव्हा 'गे' हा प्रकार जनसामान्यांना माहीत झाला. काही दिवसांनी त्यात 'L'ची भर पडली. गेल्या १०-१२ वर्षांमध्ये LGBT हे अभिधान पुरेसे स्थिर झाल्यासारखे वाटत होते. अलीकडेच त्याला 'Q' लागू लागला. आता पुढील शक्यता LGBTQQIP2SAA ची दिसते.
कालपरवाच अशी बातमी वाचली की उभयलिंगी, लिंगसंशयी इत्यादि व्यक्तींवर लिंगसापेक्ष he, she, him, her अशा सर्वनामांच्या रूपांमधून अन्याय होऊ नये म्हणून xe, xem, xyr अशी लिंगनिरपेक्ष सर्वनामे भाषेत आणण्याची खटपट सुरू झाली आहे.
LGBTQ बद्दल सहसंवेदना मान्य केल्यावर हे पुढचे जरा जास्तीच होते आहे असे नाही वाटत?
LGBTQ बद्दल सहसंवेदना मान्य
LGBTQ बद्दल सहसंवेदना मान्य केल्यावर हे पुढचे जरा जास्तीच होते आहे असे नाही वाटत?
सहसंवेदना मान्य केल्यावर असे करणे 'जास्तीच' आहे हे म्हणणे एकवेळ पटु शकेल पण त्याचे प्रीरिक्वीसिट 'सहसंवेदना मान्य करणे' इतके सोपे नाही.
ती समाजाकडून होत नाही आणि मग अशी बंडखोर पावले उचलली जातात. मग एरवी सहसंवेदनेला मान्य न करणारे ह्या किंचितशा आत्यंतिक पावलाच्या दबावानेही किमान सहसंवेदना समजतील इतपत अपेक्षा असते.
छ्या, हा कसला कट्टावृत्तांत?
छ्या, हा कसला कट्टावृत्तांत? किंबहुना याला कट्टाच म्हणावं की नाही असा प्रश्न मला पडलेला आहे.
- कट्टा होणार असं जाहीर करणारा लेख आलाच नाही.
- त्यामुळे कट्ट्याला कोण कोण येणार, त्यासाठी नक्की कुठे भेटायचं यावर उलट्यासुलट्या चर्चा झाल्याच नाहीत.
- कट्ट्याला आलेल्या लोकांपैकी कोण आधी आलं, कोणी कोणाची कशी वाट बघितली, उशीरा कोण आलं, घाईघाईत कोण निघून गेलं वगैरेविषयी एक अक्षरही नाही.
- लोकांनी काय हादडलं, कुठचेकुठचे पदार्थ खाल्ले याचा एकही फोटो नाही. मग लोकांचे तोंपासु, जळजळ झाली वगैरे प्रतिसाद कसे येणार?
- कट्ट्याला जमलेल्या लोकांचे स्वेच्छेने काढलेले ग्रुप फोटो अत्यावश्यकच. इथे एकट्याच बिचाऱ्या धनंजयचा फोटो आहे. तोसुद्धा जबरदस्तीने बांधून ठेवून काढलेला.
- आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संस्थळ-मालकीण म्हणून ३_१४ बैंनी सर्वांना पुस्तकं वगैरे काही वाटली नाहीत, त्याबद्दल त्यांचा निषेध.
उगाच कसल्यातरी भटकंतीच्या धाग्याला कट्टावृत्तांत म्हणणं म्हणजे साप म्हणून भुई बडवणं आहे झालं.
फोटो मस्तच हो, जो जो काकू.
फोटो मस्तच हो, जो जो काकू. वृत्तांत आवडला.
खेकडे खायचे म्हणजे डोंगर पोखरून उंदीर मिळतो, याची कल्पना असल्यामुळे आम्ही तो बेत मोडून काढला. ----- .... एकदम सहमत.
The Govt. should legalize gay marriages. That way gay people can be made as miserable as non-gay people. असं माझी एक मैत्रिण म्हणाली होती ते आठवले.
----
(स्वगत - अडल्ट्री प्राईड कट्टा काढायला पायजे आता.)