Hi-So – समकालीन जगण्याचे छिन्न भग्न अवशेष

Hi-So - Aditya Assarat

गेल्या काही वर्षांत खा-उ-जा (खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण) धोरणांमुळे एकेकाळच्या विकसनशील देशांत फार मोठे आणि झपाट्यानं बदल झाले. त्यांतल्या अनेक बदलांबद्दल चांगली-वाईट मतप्रदर्शनं होत राहतात. धरणं-सेझ-लवासा वगैरे प्रकल्प, त्यांतले विस्थापित होणारे प्रकल्पग्रस्त, त्यांमुळे होणारे पर्यावरणबदल अशा गोष्टींबद्दल बोललं जातं. शहर-गाव यांच्यातली आर्थिक-सामाजिक दरी, टीव्ही-मोबाईल आदि माध्यमांचं समाजातलं वाढतं स्थान आणि त्याचे चांगले-वाईट परिणाम यांबद्दलसुद्धा बोललं जातं. पण मानवी नातेसंबंधांसारखी अगदी मूलभूत गोष्ट यामुळे बदलली का? ती कशी बदलली? किंवा मूल्यव्यवस्था बदलताहेत का? कशा? अशा गोष्टींचा धांडोळा आपल्याकडे क्वचित घेतला जाताना दिसतो. कधीकधी त्याबद्दल वैचारिक मंथन होताना दिसतंही, पण अशा प्रश्नांना कलाकृतीमधून तोंड फुटताना फारसं (निदान आपल्याकडे) दिसत नाही. त्यातल्या त्यात मराठी नाटकांत थोड्याफार प्रमाणात असे विषय आले, पण मराठी-हिंदी चित्रपटात ते येताना फारसे दिसत नाहीत. आपल्या शेजारच्या थायलंडमध्ये बनलेला एक चित्रपट नुकताच पाहण्यात आला. त्यात असा काहीसा प्रयत्न दिसला. या चित्रपटाची ही थोडक्यात ओळख.

या चित्रपटाचा एक महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे त्याला फारसं कथानक नाही. एक चित्रपट अभिनेता आणि त्याची एक मैत्रीण यांचे संबंध सुरुवातीच्या अर्ध्या भागात दिसतात. तोच अभिनेता आणि त्याची दुसरी मैत्रीण यांचे संबंध दुसऱ्या भागात दिसतात. एवढंच. म्हणजे घटनांच्या पातळीवर काहीच घडत नाही, पण मनोव्यापारांच्या पातळीवर सूचक पद्धतीनं पुष्कळ काही जाणवून दिलं जातं. अर्थात, एखादा कळीचा पेच उभा करणं आणि तो सुखद किंवा दु:खद रीतीनं अखेर सोडवणं अशा चित्रपटाची ज्यांना अपेक्षा असते अशांना प्रचंड कंटाळा येईल असं वातावरण चित्रपटामध्ये आहे. पण ज्यांना याहून वेगळं काहीतरी अनुभवायची इच्छा आहे त्यांना चित्रपटासारख्या दृक-श्राव्य माध्यमाच्या सघन वापरातून घाटदार केलेल्या आशयाची उकल करणं हे रोचक वाटू शकेल आणि त्यातून काही विषण्ण अर्थबोधसुद्धा होऊ शकेल.

आनंद हा तरुण अमेरिकेत शिक्षण घेऊन आता थायलंडमध्ये परत आला आहे. तो एका चित्रपटात अभिनय करतो आहे. निसर्गरम्य वातावरणात समुद्राकाठी चित्रपटाचं चित्रीकरण चालू आहे. त्याची पाश्चात्य मैत्रीण लोकेशनवर त्याच्यासोबत आली आहे. टूरिस्ट सीझन संपला आहे; त्यामुळे ते जिथे राहत आहेत ते हॉटेल रिक्कामं आहे. एकंदर वातावरण कंटाळवाणं आहे. त्यात आनंद शूटिंगमध्ये बिझी आहे. त्याची मैत्रीण वैतागते. इथे प्रकर्षानं जाणवणारी गोष्ट म्हणजे वरवर पाहता ज्यांना प्रेमीयुगुल म्हणता येईल अशा या दोघांच्या आयुष्यातली विस्तीर्ण पोकळी. एकमेकांसोबत अनेक वर्षं काय पण काही दिवसदेखील घालवणं त्यांना कठीण आहे, कारण त्यांच्यात काही संवादच नाही. हॉटेलातल्या एका कर्मचाऱ्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सर्व कर्मचारी एकत्र येतात, दारू ढोसतात, गप्पा मारतात असा एक प्रसंग आहे. आनंदची मैत्रीण त्यात सहभागी होते. त्या साध्या माणसांच्या सहवासात तिला काहीतरी मजा मिळते. पण गप्पा, मौजमजा असं काही आनंदबरोबर मात्र होत नाही. कदाचित अमेरिकेत ते एकत्र राहत असतील. कदाचित तिथल्या दैनंदिन आयुष्यात ही पोकळी जाणवत नसेल. पण या निर्जन स्थळी मात्र ती टोचते.

एका प्रसंगात आनंद आणि त्याची मैत्रीण यांचं सेटवर भांडण चालू आहे. अचानक एक तंत्रज्ञ येऊन त्यांना सांगते की जरा शांत रहा; चित्रपटासाठी लोकेशन साऊंड रेकॉर्ड होत आहे. दोघं शांत होतात. त्या शांततेत मग तिथला परिसर ‘ऐकू’ येऊ लागतो. हिरव्यागार शेताची वाऱ्याची सळसळ, समुद्राची गाज, पक्षी, कीटक यांचे आवाज आपल्याला ऐकू येऊ लागतात. मग ते दृश्य किती शांत आणि रम्य आहे हे जाणवतं. हे युगुल मात्र याचा आस्वाद घेऊ शकत नाही हे मग तिथे आपल्याला टोचू लागतं. जणू शहरी कलकलाटात त्यांच्यातली शांतताच हरवून गेली असेल की काय, असा विचार मनात येतो.

शूटिंग होणाऱ्या चित्रपटातली आनंदची व्यक्तिरेखासुद्धा हरवलेली आहे. स्मृतीभ्रंश झालेला नायक एका भग्न घरात (भग्नतेला बहुदा त्सुनामीचा संदर्भ आहे) आपली ओळख आठवायचा प्रयत्न करतो आहे. पण प्रत्यक्षातच जो आपलं स्वत्व हरवलेला आहे त्या आनंदला ही भूमिका साकारतानासुद्धा त्रास होतो. ‘तुझा अ‍ॅक्सेंट थाई नाही’ म्हणून दिग्दर्शक त्याला ओरडतो. यातून आनंदचं तिथलं उपरेपण अधोरेखित होतं. धड ना इथला धड ना तिथला असा भंजाळलेल्या अस्मितेचा आनंद आजच्या थायलंडचा (आणि भारताचासुद्धा) प्रतिनिधी वाटतो. अमेरिकन गर्लफ्रेंडशी ब्रेकअप होणं मग अपरिहार्य वाटतं.

चित्रपटाच्या दुसऱ्या भागात ‘वेटिंग फॉर गोदो’सारखं हेच पुन्हा रिपीट होतं. आता आनंद शहरात आहे. त्याचं स्वत:चं मोठं घर आहे. घर म्हणण्यापेक्षा एक अख्खा अपार्टमेंट कॉम्प्लेक्सच म्हणता येईल असं ते ठिकाण आहे. आनंद आणि काही नोकर एवढीच मंडळी तिथे राहतात. चित्रपटाचं शूटिंग आता संपलंय. त्याची पब्लिसिटी किंवा तत्सम काहीतरी जबाबदारी सांभाळणारी एक मुलगी आता आनंदची मैत्रीण आहे. पण ‘तोच खेळ पुन्हा उद्या’ होतो आहे.

त्याची नवी मैत्रीण दिसायला आधुनिक आहे खरी, पण ती एका छोट्या खेड्यात वाढलेली आहे. आनंदशी तिचाही संवाद नाही, पण घरातल्या नोकरांशी आहे. इथे पुन्हा आनंदचं उपरेपण अधोरेखित होतं. विनापाश लोंबकळत असणारा आनंद कदाचित कुठेच मूळ धरू शकत नाही, पण कदाचित म्हणूनच त्याची नातीही कोणत्याच मातीत (देशी, विदेशी) आपली मुळं रुजवू शकत नाहीत. तो कुठे जाईल, कुठे रमेल, काहीच सांगता येत नाही. त्याचे काही अमेरिकी मित्र एकदा शहरात येतात. त्यांच्याबरोबर तो पबमध्ये जातो; दारू पितो; तिथे पूल टेबल असतं; म्हटलं तर मौजमजा असते. त्याची मैत्रीण मात्र तिथे रमत नाही.

आनंदचं घर एका बाजूनं ढासळत आहे किंवा तोडलं जात आहे. इथे शहरात कसली त्सुनामी येऊन गेली आहे का? नंतर कळतं की ही त्सुनामी निसर्गदत्त नाही. आनंदची आई परदेशी असते. तिला हे सबंध घर तोडून जमीन डेव्हलपरच्या ताब्यात द्यायची आहे. मग इथे मॉल वगैरे काहीतरी ‘आधुनिक’ होईल. अनेक वर्षं घरात काम करणाऱ्या नोकरांना ते ठाऊक नाही. त्यांना वाटतंय मालकिणीला घर नव्यानं बांधायचंय. आनंदला मात्र सत्य माहीत आहे. रिकाम्या खोल्यांत फिरणारा आनंद आपल्या लहानपणच्या स्मृतींत आणि त्यांच्या नश्वरतेत स्वत:ला अखेरचं भिजवून घेतो आहे असं मग वाटतं. तोदेखील एक विस्थापित आहे, पण त्याचं पुनर्वसन कुणीच करू शकत नाही. तो कोणत्या प्रकल्पाचा ग्रस्त आहे हे त्याचं त्यानंच शोधून काढायचं आहे. मग कदाचित त्याला आपली सुजलाम सुफलाम भूमी कोणती ते सापडेल. मग आपलं पुनर्वसन तो स्वत:च करू शकेल.

एकीकडे चित्रपटावर पोस्ट- प्रॉडक्शन चालू असणार. एक दिवस चित्रपटाची पोस्टर्स हातात येतात. आता आनंदचा चेहरा शहरभर झळकणार असतो. पण आनंद? तो कुठे असतो? तो कुठेतरी असतो का? एका तलम क्षणी चित्रपट विरघळून जातो. ‘आहे मनोहर तरी गमते उदास...’ अशा आनंदच्या प्रश्नांची उत्तरं देणं त्याला शक्य नसतं. या संक्रमणाच्या काळात ती उत्तरं कुणापाशी तरी आहेत का? माहीत नाही. कदाचित काही पिढ्या अशा मध्य लटपटीत हरवून जातील.

सुन्न मनानं आपण चित्रपटगृहाच्या बाहेर येतो. पॉपकॉर्नचे वास, रिंगटोन, निऑन साइन्स आणि इतर शहरी गजबजाटात हरवतो.

Hi-So - 'हाय सोसायटी' याचं थाई लघुरूप

चित्रपटाची माहिती आणि मध्य लटपटीतल्या काही तलम प्रतिमा इथे पाहायला मिळतील.
http://international.memento-films.com/artscope/hi-so

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

भव्यदिव्य चित्रपटांची समीक्षा ढोबळमानाने सोपी समजली जाते पण जेव्हा वरवर सोपे दिसणारे कथानक घेऊन एखादा कल्पक दिग्दर्शक पडद्यावर जे नाट्य उलगडण्याच्या प्रयत्न करतो त्यावेळी 'त्याला' नेमके काय अभिप्रेत आहे याची समीक्षा करणे म्हणजे धुक्याला कवेत घेण्यासारखे असते. श्री.चिंतातूर जंतू यानी केलेला 'हाय-सो' चा प्रयत्न मला भावला असे म्हणतो, तो इतका की चित्रपट पाहणे निकडीचे वाटावे. कथानायकातील शून्यपणा साहित्याला नवा नाही, तो काही (ही) करत नाही असे ज्यावेळी भासते नेमके त्याचवेळी तो काहीतरी करीत असल्याचीही जाणीव होत राहते. चित्रपट पाहिल्यावर यावर अजून लिहिता येईल, पण त्रोटक कथानकावरून इतपत समजू शकतो की, नायकाच्या आयुष्यात आलेल्या त्या दोन्ही तरूणी (अमेरिकन व नंतरची थाई) अगदी 'ऑर्डिनरी लाईफ' जगू इच्छिणार्‍या दिसतात (तशाच असू शकतील असे कथानकावरून तरी वाटते). जे कदाचित आनंदला मंजूर नसेल. अमेरिकन क्लासमेटने थेट तिथून परदेशात नायकासाठी येणे आणि त्याच्या येथील रुटीनमध्ये आपल्याला स्थान नाही हे ओळखणे म्हणजे तिने त्याला अमेरिकेत राहत असतानादेखील ओळखले नव्हते असे म्हटले पाहिजे. चित्रपटातील चित्रपटात असलेल्या त्याच्या कामाबाबत ती त्याला बोलते करू शकली असती, पण नाही. ती काय वा नंतरची दुसर्‍या भागातील खेड्यात वाढलेली नवीन मैत्रिण. ही तर टिपिकल भारतीय नारीच वाटते एकंदरीत तिच्या वर्णनावरून. थोडक्यात 'मिस्टेरिअस आनंद' च्या ह्या दोन्ही मैत्रिणी 'नॉन-मिस्टेरिअस' ठेवण्यात दिग्दर्शकाने रित्या आयुष्याचे मेटॅफर मांडले आहे.

अमेरिकन मैत्रिणीसमवेत राहिलेले ते मोकळे हॉटेल आणि नंतरच्या भागातील ती तशीच रिकामी असलेली वास्तू [जी आता डेव्हलपरला द्यायची आहे] ही दोन्ही प्रतिके फारच सूचक आहेत आनंदच्या आयुष्याची प्रतिमा ढळढळीत करण्यासाठी. ते अमेरिकेतून परतल्यानंतरही आतापर्यंत तसेच भयाण रिकामे राहिले आहे [सखी सोबतीला असूनही...असलेली, येऊ घातलेली] आणि अजून किती काल ती पोकळी भरण्यासाठी जावा लागेल हेही प्रेक्षकावर सोपवून दिग्दर्शकही रिकामा राहिलेला दिसतो.

Hi-So - 'हाय सोसायटी' याचं थाई लघुरूप ~ असा श्री.चिं.जं. नी दिलेला थेट अर्थ समजतो, पण या कथानकाच्या दृष्टीने Hi-So ला एक विशिष्ट असा अर्थ असावा. नक्की आठवत नाही पण कुठेतरी वाचनात वा लेक्चरमध्ये ऐकले होते की "हाय-सो" हे तिथल्या भागात 'स्लॅन्ग' या अर्थाने जनलोक वापरतात...कदाचित 'सिनिकल' या टिंटने. तसे असेल तर मग आनंदचे जगणेही सिनिकल म्हटले पाहिजे. [हा अंदाज आहे, खात्री नाही.].

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चित्रपट पाहिलेला नाही, पहायची इच्छा आहे... पण परीक्षणावरूनच काही आकार उभे राहिले.
हाय सोसायटीतल्या बहुतेकांनाच ही भांजाळलेली अवस्था आंदण म्हणून मिळाली असावी असा संदेश वाटला. एकीकडे अमेरिकन किंवा पाश्चात्य संस्कृतीशी नातं मांडलेलं असलं तरी संवाद साधण्याइतकी जवळीक नाही. दुसऱ्या बाजूला आपल्याच देशात वाढलेली, बदललेली संस्कृतीसुद्धा आपलीशी वाटत नाही. याच पार्श्वभूमीला आहे ते मोडून पडतंय. उच्च समाजातले (श्रीमंत) ती मोडतोड आणि नवनिर्माण अविरतपणे घडवून आणत आहेत. खालच्या नोकरवर्गातल्यांना या बदलांत फारसं आतडं अडकलेलं नसल्यामुळे त्यांना आनंदच्या दुःखाचा शाप नाही. हा मात्र मध्ये अडकलेला आहे. न घर का न घाट का. त्रिशंकू.

असंच नियमितपणे वेगळ्या चित्रपटांची ओळख करून देत रहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>त्रोटक कथानकावरून इतपत समजू शकतो की, नायकाच्या आयुष्यात आलेल्या त्या दोन्ही तरूणी (अमेरिकन व नंतरची थाई) अगदी 'ऑर्डिनरी लाईफ' जगू इच्छिणार्‍या दिसतात (तशाच असू शकतील असे कथानकावरून तरी वाटते). जे कदाचित आनंदला मंजूर नसेल. अमेरिकन क्लासमेटने थेट तिथून परदेशात नायकासाठी येणे आणि त्याच्या येथील रुटीनमध्ये आपल्याला स्थान नाही हे ओळखणे म्हणजे तिने त्याला अमेरिकेत राहत असतानादेखील ओळखले नव्हते असे म्हटले पाहिजे. चित्रपटातील चित्रपटात असलेल्या त्याच्या कामाबाबत ती त्याला बोलते करू शकली असती, पण नाही. ती काय वा नंतरची दुसर्‍या भागातील खेड्यात वाढलेली नवीन मैत्रिण. ही तर टिपिकल भारतीय नारीच वाटते एकंदरीत तिच्या वर्णनावरून. थोडक्यात 'मिस्टेरिअस आनंद' च्या ह्या दोन्ही मैत्रिणी 'नॉन-मिस्टेरिअस' ठेवण्यात दिग्दर्शकाने रित्या आयुष्याचे मेटॅफर मांडले आहे.<<

चित्रपटाविषयी पुष्कळ काही सांगून तो पाहण्याची मजा घालवू नये म्हणून मी अनेक गोष्टींचा खुलासा करायचं किंवा अनेक वर्णनं द्यायचं टाळलं होतं. आनंद कथानकाचा केंद्रबिंदू असल्यामुळे त्याच्या मैत्रिणींना एकरंगी रंगात रंगवलं गेलं असेल तर ते माझ्याकडून, मूळ चित्रपटात नाही. आता फक्त एवढंच म्हणेन की त्या मुली काय किंवा आनंद काय, सगळेच 'सर्वसामान्य' अशा अर्थानं ऑर्डिनरी आहेत, पण 'नॉन-मिस्टेरिअस' कुणीच नाही. आपापल्या आयुष्यात नक्की कशाला धरून ठेवायचं, कोणती मूल्यं पाळायची आणि एकंदर आयुष्याला आकार कसा द्यायचा याविषयी प्रत्येकजण गोंधळलेला आहे. आनंदला एखादी गोष्ट मंजूर-नामंजूर असण्यासाठी त्याला जी जीवनदृष्टी लागेल तीच त्याच्यापाशी नाही. सद्गुण-दुर्गुणापेक्षा निर्गुण जसं वेगळं तसं हे आहे. कुणीच कुणाला नीट ओळखलं आहे असं वाटत नाही कारण कुणाचीच ओळख मुळात त्याला स्वतःलाच स्पष्ट नाही. पहिली मैत्रीण टिपिकल अमेरिकन नाही, तशीच दुसरी टिपिकल भारतीय नारी नाही, कारण टिपिकल होण्यासाठी लागेल तेवढा आकारच कोणत्या व्यक्तिरेखेला नाही.

हां, आनंद आणि त्याच्या मैत्रिणी यांत एक मोठा फरक मात्र दिसतो - त्या दोघीही आपापल्या परीनं आपल्या परिसराशी काहीतरी नातं जोडू इच्छितात - अमेरिकन मैत्रीण हॉटेलातल्या कर्मचार्‍यांशी, तर थाई मैत्रीण घरातल्या नोकरांशी. आनंद मात्र निर्विकारपणे वावरत राहतो. या दोघींएवढीही जीवनेच्छा त्याच्यात दिसत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

आनंदची लोंबकळ चित्रपटात परिणामकारक रेखाटल्याचे परीक्षणावरून जाणवते. एकाच नात्याच्या दोन निराळ्या खांबांना पकडण्यासाठी लागणारा आशावाद कुठून आला असावा, याविषयी कुतूहल वाटते. वर दिलेले चित्र बोलके आहे.

अवांतर: न्युयॉटामध्ये आलेले बारके परीक्षण

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जंतुंच्या चित्रपट परीक्षणावर काही टिप्पणी करण्याइतका या क्षेत्राचा माझा अभ्यासही नाही, आणि तेवढी जाणही नाही. त्यामुळे चित्रपट परीक्षण हा भाग सोडून, कथानक ऐकून काय वाटले ते नमूद करतो. त्याअगोदर हे आवर्जून सांगतो, की जंतुंचे चित्रपट/ कला समीक्षण वाचणे हे एक शिक्षण आहे. चित्र/ शिल्प कसे पहावे, सिनेमा कसा पहावा हे सोप्या शब्दांमध्ये कुणीतरी सांगावे असे गेली अनेक वर्षे मला वाटत आले आहे. ते आत्ता मिळत आहे. त्यासाठी मी ऋणी आहे.

वेल. आता कथानकाविषयी. मला ही कथा म्हणजे खाउजा वरील, समकालीन काळावरील टिप्पणी वाटत नाही. मला ही कथा उच्चभ्रू समाजातील रस हरवलेल्या आयुष्यावरची टिप्पणी वाटते. (हेन्स द नेम. अर्थात मी सिनेमाच्या शीर्षकावरुन हा तर्क केलेला नाही.)

आयुष्यात पोकळी आहे ती आनंदच्या. त्याच्या सेटवरील तंत्रज्ञ त्याला शांत रहायला सांगतो, म्हणजे तो ती शांतता जाणवण्याच्या स्थितीत आहेच ना. आनंद नाहीये. पण ज्याअर्थी शांतता रेकॉर्ड करणारे लोक आहेत, त्याचा आस्वाद घेणारे लोक आहेत, त्याअर्थी खाउजा जगामध्ये लोकांच्या संवेदना हरवल्या आहेत हा निष्कर्ष अनाठायी आहे. आनंदच्याच रिलेशनमधल्या त्याच्या मैत्रिणीही मजेत राहू शकणार्‍या आहेत. आनंदच्या संगतीत येऊन त्यांचे गणित बिघडत आहे.

आनंद नाळ तुटलेला आहे. नाळ जोडायची त्याची इच्छाही मेलेली आहे. त्याचे कारण खाउजा जग नसून त्याचा हस्तिदंती मनोर्‍यावरचा राजवाडा आहे. हा हस्तिदंती मनोरा म्हणजेच हाय सो.

हीच गोष्ट, याच आशयासहीत, कोणत्याही काळात चित्रीत करता येऊ शकते. हे असले हस्तिदंती हाय सो मधले दुखीराम आनंद सगळ्या काळात असतात. आणि हाय सो मधले सगळेच असले दुखीराम असतील असेही वाटत नाही.

असो. परीक्षण हे एकूणच आमच्यासारख्यांची सिनेमा या माध्यमाची जाण वाढवणारे आहे हे पुन्हा एकदा आवर्जून सांगतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"हाय सो मधले सगळेच असले दुखीराम असतील असेही वाटत नाही."

~ एक्झॅक्टली. मला नेमकी ही 'दुखीराम' नस पकडता आली नाही माझ्या प्रतिसादात.
रॉबर्ट डी नीरोचा 'टॅक्सी ड्रायव्हर' मधील ट्रॅव्हिस बिकलही असाच एक दुखीराम. मात्र न्यू यॉर्कमधील त्याच्या संगतीत येणारे (वा तो ज्यांच्या संगतीत जातो तो ते) सारेच त्याच्यासारखे जगावर उखडून असणारे वाटत नाही. वेश्याव्यवसायात ढकलली गेलेली ती 'आयरिस' बालिकाही त्याच्या सहवासात येण्यापूर्वी मजेतच जगत असल्याचे दिसते, जरी ती ड्रगच्या अंमलात असली तरीही. ट्रॅव्हिसचे जगणे कमीजास्त प्रमाणात हाय-सो मधील आनंदसारखेच आत्मकेन्द्री आहे असेच दिसते.

"परीक्षण हे एकूणच आमच्यासारख्यांची सिनेमा या माध्यमाची जाण वाढवणारे आहे हे पुन्हा एकदा आवर्जून सांगतो."
+ सहमत. परीक्षणामुळे चित्रपट पाहाण्याची आस निर्माण झाली यातच चिंजं यांच्या लेखनशैलीचे कौशल्य आहे. मी उत्सुकतेने लागलीच New York Times Review वाचला पण चिंजंच्या लिखाणामुळे जितका हाय-सो समजतो तितका तिथून समजू शकत नाही. तिथला Mysterious characters चा एक मुद्दा मला पटला ज्याचा मी प्रतिसादात मुद्दाम उल्लेख केला पण चिंजंनी तोही योग्यरितीने खोडून काढला आहेच.

अशोक पाटील

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>आयुष्यात पोकळी आहे ती आनंदच्या. त्याच्या सेटवरील तंत्रज्ञ त्याला शांत रहायला सांगतो, म्हणजे तो ती शांतता जाणवण्याच्या स्थितीत आहेच ना. आनंद नाहीये. पण ज्याअर्थी शांतता रेकॉर्ड करणारे लोक आहेत, त्याचा आस्वाद घेणारे लोक आहेत, त्याअर्थी खाउजा जगामध्ये लोकांच्या संवेदना हरवल्या आहेत हा निष्कर्ष अनाठायी आहे. आनंदच्याच रिलेशनमधल्या त्याच्या मैत्रिणीही मजेत राहू शकणार्‍या आहेत. आनंदच्या संगतीत येऊन त्यांचे गणित बिघडत आहे. <<

एका तांत्रिक तपशीलाचा उल्लेख करतो. सेटवरची तंत्रज्ञ निव्वळ दिग्दर्शकाची आज्ञा पाळते आहे. रेकॉर्ड केला जाणारा साऊंड चित्रपटातल्या चित्रपटाच्या प्रेक्षकांना कसा ऐकू येईल हे आपल्याला माहीत नाही. लोकेशनवर साउंड रेकॉर्ड करणं ही एक सर्वसामान्य पद्धत आहे. असे आवाज निव्वळ पार्श्वभूमी म्हणून वापरले जाऊ शकतात. शांततेचा आस्वाद कुणाला घ्यायचा आहे असं यातून दिसत नाही. भांडण थांबल्यामुळे भांडण करणार्‍याच्या मनातली भांडणाची कलकल थांबेल असंही नाही. थोडक्यात, शांतता आपल्याला ऐकू येते.

>>आनंदच्याच रिलेशनमधल्या त्याच्या मैत्रिणीही मजेत राहू शकणार्‍या आहेत. आनंदच्या संगतीत येऊन त्यांचे गणित बिघडत आहे. <<

हे नक्की सांगता येत नाही. किंबहुना दोनही नात्यांमध्ये आनंद एकटा दोषी आहे असं वाटत नाही. नातं फुलवण्यासाठी इथे कुणीच पुरेसं सक्षम आहे असं वाटत नाही.

>>मला ही कथा म्हणजे खाउजा वरील, समकालीन काळावरील टिप्पणी वाटत नाही. मला ही कथा उच्चभ्रू समाजातील रस हरवलेल्या आयुष्यावरची टिप्पणी वाटते.<<

या दोन गोष्टींचा परस्परसंबंध आहे असं वाटतं. म्हणजे काय, तर खाउजा धोरणांमुळे विकसनशील देशांत काही प्रमाणात ऐहिक समृद्धी आली. त्या समृद्धीबरोबर जगण्यात फरक पडले. उदा: वस्तूंच्या वापरात फरक पडला. नित्योपयोगी वस्तू उपयोगापुरत्या घेण्याचा इतिहास असलेला मध्यमवर्ग आता सोयीपेक्षा चैन म्हणून अनेक वस्तू 'कन्झ्यूम' करू लागला. प्रत्येक वस्तू दिलखेचक करण्याकडे ती वस्तू 'मार्केट' करणार्‍यांचा कल जसा वाढला, तसतसा आयुष्यातला कोलाहल वाढला. आज आपली शहरं सतत पदोपदी कंठाळी स्वरात काहीतरी विकत असतात. तुम्ही साधे रस्त्यानं चालत असाल तरी जाहिरातींची होर्डिंग्ज डोळ्यांना खुपत राहतात. बस, बस स्टॉप, रेल्वे, स्टेशन, सगळीकडे अधिकाधिक जागा अशा कलकलाटानं भरून गेलेली असते. हा कलकलाट वाढला तसे आपले उत्सवही अधिक कंठाळी झाले. दहीहंडी, गणपती, नवरात्र, दिवाळी, ख्रिसमस, स्वातंत्र्यदिन, जयंत्या अशा सर्व प्रसंगी होणारं ध्वनिप्रदूषण वाढलं. टेलिव्हिजनवर पूर्वी अडीच तासाच्या चित्रपटात फार तर बातम्यांसाठी एखादा 'ब्रेक' असे. आता ब्रेकचा कालावधी चित्रपटाइतकाच असतो. आशयघन चित्रपट असा दोन ब्रेकच्या मध्ये पाच-पाच मिनिटं बघायला गेलं तर त्याच्या आशयाचं काय होईल? रेडिओवर पूर्वी सलग गाणी ऐकता यायची. आता अडीच मिनिटांचं गाणं पूर्णसुद्धा केलं जात नाही. डीजेंची बाष्कळ कलकल आणि जाहिराती यातच आपली लालतिखट रेडिओ स्टेशन्स वेळ घालवतात. अशानं संगीत (किंवा शांतता) ऐकायला कान तयार कसा होणार?

>>हीच गोष्ट, याच आशयासहीत, कोणत्याही काळात चित्रीत करता येऊ शकते. हे असले हस्तिदंती हाय सो मधले दुखीराम आनंद सगळ्या काळात असतात.<<

अर्थात, पण त्या काळातल्या व्यक्तींना त्या काळातले संदर्भ असतात. 'टॅक्सी ड्रायव्हर'मधला (१९७६) डी निरो व्हिएतनाम युद्धातून आलेला आहे. तो युद्धाचे संदर्भ घेऊन येतो. मी उल्लेख केलेल्या 'वेटिंग फॉर गोदो'मध्ये (१९४८-४९) दुसर्‍या महायुद्धाचे संदर्भ आहेत. तसा हा आनंद अमेरिकेतून शिक्षण घेऊन अमेरिकन मैत्रिणीसह येतो. मला वाटतं हा संदर्भ उघड आहे. वर वर्णन केलेल्या परिस्थितीत वाढलेला आताचा शहरी तरुणवर्ग पुष्कळसे गॅजेट्स, मित्र, मौजमजा, खाणंपिणं, खरेदी अशा गोष्टींत रमतो. अशात काही कारणानं मैत्रीचा कस लागेल असं शांत, निवांत वातावरण आणि एकांत मिळाला तर नात्याचं काय होईल? हा प्रश्न निव्वळ हस्तिदंती मनोर्‍यातला राहिला आहे असं आज वाटत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

जंतुंचे चित्रपट/ कला समीक्षण वाचणे हे एक शिक्षण आहे. चित्र/ शिल्प कसे पहावे, सिनेमा कसा पहावा हे सोप्या शब्दांमध्ये कुणीतरी सांगावे असे गेली अनेक वर्षे मला वाटत आले आहे. ते आत्ता मिळत आहे. त्यासाठी मी ऋणी आहे.

सहमत आहे. धनंजयच्या कवितेवरील प्रतिसाद वाचूनही इतर प्रतिसादकांबद्दल हेच म्हणावेसे वाटते.

वरचे सर्व प्रतिसाद वाचल्यानंतर माझी एकूणच जाणीव किती तोकडी आहे याची जाणीव झाली. असे धागे आणि प्रतिसाद अधिकाधिक प्रमाणात येत रहावेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

>>वरचे सर्व प्रतिसाद वाचल्यानंतर माझी एकूणच जाणीव किती तोकडी आहे याची जाणीव झाली. असे धागे आणि प्रतिसाद अधिकाधिक प्रमाणात येत रहावेत.

अगदी असेच म्हणतो..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एकंदर 'हाय - सो' वर प्रातिनिधीक भाष्य करायचे असल्यास दोन तीन उपकथानके हवी होती अन्यथा एक बोरींग कथा इतकीच ओळख लागते आहे. थाई मित्राबरोबर बघुन काही गवसते का पाहीले पाहीजे.

बाकी चिंजं यांचे परिक्षण हा एक विलक्षण अनुभव आहे यात शंकाच नाही. काही वेळा सिनेमापेक्षा परिक्षण जास्त प्रभावी वाटले आहे. पण ह्या लेखात जितके निरस, भकास वर्णन / चित्र नजरेसमोर आले आहे त्यावरुन सिनेमा त्याहून शतपटीने बोरींग असणार असे प्रथमदर्शनी वाटत आहे.

Despite being back in Thailand now for around 10 years and having lots of friends who know him by his nickname Juke, he still feels like an outsider, so much so that it feels normal.
"I go abroad to a film festival and I'll meet somebody I have more in common with than the person who lives down the street from me in Bangkok," Aditya says.
"And that's what the movie is about - a world where we don't define ourselves by the borders in which we live but by the way we were educated, the way we were raised. It's not that definite anymore - it's a lot more fluid."

आता प्रत्यक्ष चित्रकर्त्याने हे लिहले असल्याने खर तर त्रयस्थ माणसाला यात भकास, उदास वाटले नाही पाहीजे. हे आहे असे आहे. शेवटी काय पुन्हा एकदा 'ज्याची त्याची जाण. ज्याची त्याची समज'

>या संक्रमणाच्या काळात ती उत्तरं कुणापाशी तरी आहेत का?
Smile खुद्द चित्रपट बनवणार्‍याच्या वरच्या खुलाश्यात काही प्रश्नच नाही आहे, जे काय आहे ते नॉर्मल आहे तर उत्तरे कसली व कोणाला हवी आहेत ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

परीक्षण आणि तदनुषंगिक चर्चा आवडली. कधीही पाश्चिमात्य वसाहतवादी सत्तांच्या अंमलाखाली न आलेला मात्र झपाट्याच्या विकासानंतर पाश्चिमात्य संस्कृती आपलासा करणारा थाय मध्यमवर्ग, त्याच्या समस्या आणि परीक्षणात म्हटल्याप्रमाणे 'मध्य लटपटीची' त्रिशंकू अवस्था हे सारं आपल्याला परिचित वाटावं असं. चिंजंनीच 'धोबी घाट' ह्या चित्रपटाच्या परीक्षणात हे प्रश्न केवळ उच्चभ्रू समाजापुरते मर्यादित न राहता मध्यमवर्गालाही पडू लागले आहेत, ह्याचा विस्ताराने खुलासा केला होता. ह्या सार्‍या पार्श्वभूमीवर चित्रपटाबद्दलचे कुतूहल वाढले आहे. संधी मिळताच नक्की पाहेन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उत्तम रसग्रहण म्हणजे नेमकं काय ह्याचं उदाहरणच घालून दिलंत तुम्ही Smile Hats Off! तुमचं परीक्षण न वाचता जर चित्रपट पाहीला असता तर कितीतरी बारकावे निसटून गेले असते.
पाहण्याच्या यादीत टाकला आहेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

परीक्षण वाचून चित्रपट पाहण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

आपल्या भोवतालच्या परिस्थितीशी नाळ तुटल्यामुळे नायकाला ही भंजाळलेली अवस्था प्राप्त झाली आहे. वेगवेगळ्या वातावरणात वाढलेल्या दोन मैत्रिणींबरोबरचे संबंध नायकाचा एकटेपणा अधोरेखित करण्याकरता यशस्वीपणे वापरले गेले आहेत असे वाटते.
नायकापुढे मुळात गोंधळ आहे तो 'स्वतःला काय हवे आहे?', 'माझा मार्ग कुठला?' हे ओळखण्याचा. कुठलाच मार्ग त्याला 'आपलासा' वाटत नाही आहे.

तनहाईकी ये कौनसी मंझील है रफीको(रफीक = मित्र)
ता-हद-ये-नजर, एक बयाबान(निर्जन, ओसाड, वाळवंट) सा क्युं है?

त्याच्या मैत्रिणींनी मात्र त्यांच्यापुरते मार्ग शोधले आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चिंजं नी केलेले परीक्षण (आता अप्रतिम म्हणत नाही कारण ती द्विरुक्ती होइल) वाचल्यानंतर फारसे शब्द खर्च करून आपले अगाध ज्ञान उघडे करावेसे वाटत नाही कारण चिंजंची परीक्षण/समीक्षा इतकी बोलकी, मार्मीक असते की म्हणून म्हणून आम्ही शब्दकरंटे काय म्हणणार तर - परीक्षण आवडले किंवा मस्त!!! असो. पण राहवत नाही.
मूळ सिनेमाला फारसे कथानक नसून मनोव्यापाराच्या पातळीवर सूचकता खूप आहे असे चिंज म्हणतात. असे सिनेमे स्वतः पहाण्यापेक्षा कोणीतरी त्याचा अर्क काढून दाखविलेला मला अधिक आवडतो. स्लो सिनेमे, आर्ट फिल्म स्वतः पाहण्यापेक्षा कोणी विद्वानाच्या नजरेतून त्यातील सौंदर्यस्थळे, सूचकता उलगडलेली जास्त आवडते. हा सिनेमा त्या पठडीतील वाटतो.

अवांतर - तसंही पाहता,सिनेमाविषयक माझे ज्ञान अगाधच आहे. कित्येक वर्षात पाहीलेले आणि आवडलेले ३/४ च सिनेमे - पिंजरा, प्रेटी वूमन, दिल चाहता है आणि शकोला (Chocolat) त्यामुळे तशी आवड डेव्हलप झालेलीच नाही. त्यामुळे वरील सिनेमा पहायची विशेष इच्छा झाली नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बघावासा वाटतो आहे.
नेटफ्लिक्सवर (स्ट्रीमिंग फॉर्मॅट) उपलब्ध नाही. आणखी काही सेवांमध्ये उपलब्धता पडताळून बघतो.

कथानकाच्या दोन भागांमध्ये अनेक संकेत समांतर/विरोधी असावेत, आणि त्यांचे कोडे उकलणे रंजक आणि अर्थपूर्ण असावे, अशी कल्पना येत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0