पल्प फिक्शन
उत्पल
सगळेच दिवे,पेटतात विझतात
सगळेच खांब, हलतात पडतात.
डोक्यावर चंद्र,बेताल गातो
पारावर कावळा, टोचून खातो.
आगीची गुढी,आगीची काठी
नैवेद्याला,राखेची वाटी.
तहान तहान,शरीर बेभान
अलगद ऑरगॅझम,गादी परेशान.
इथली मुक्ती,तिथली मुक्ती
प्रवचन पेग,संध्याकाळी सक्ती
काँक्रीटचं जंगल,जंगलातलं तळं
काठापाशी रांगतंय, बेवारशी जुळं.
आपलेच दात,आपलेच ओठ
चराचराला मधाचं बोट.
कोण म्हणतं वाया,कोण म्हणतं शिल्लक
सापाचा मूड,गारुडी कफल्लक.
आडवा डोंगर,तिरके पाय
शिखराचं लक्षण,समजत नाय.
सुसाटते गाडी,रस्त्याला ताप
माडीवरलं सत्य,उगीचच पाप.
नवरा बायको,खासमखास
उरलेली भांडी,घासून टाक.
केकाटतं पोर,जिवाला घोर
उगीच म्हणायचं,नाचतो मोर.
मसणात जगा,कविता करा
ढेकूण मारा,'वध' म्हणा.
आयच्यान सांगतो,शेणाचं लक
एरवी विष्ठा विचार? व्हॉट द फक!
वा!
!!!