Skip to main content

मिकेलांजेलोचा पालक - पास्तावाला

टेक्ससमधल्या उन्हाळ्यातल्या एका शनिवारच्या रम्य दुपारी धोधो ऊन पडत होतं. सकाळी सकाळी फार्मर्स मार्केट आणि नेहेमीची वाणसामानाची खरेदी करून अदिती आणि श्रीयुत अदिती फारच दमले होते. जेवणानंतर सोफ्यावर पसरून "आता पुढचा वेळ कसा घालवता येईल, याचा विचार दुसऱ्याने मांडला तर बरा", असा विचार करत आळसावत होते. अशा वेळेस दोघांचंही लक्ष टीव्हीच्या रिमोटकडे गेलं. अदितीला पुढची दुश्चिन्ह दिसायला लागली. "श्रीयुत अदितीने रिमोट मिळवला तर पुढचे दोन तास 'अमेरिकाज होम व्हीडीओज', 'सर्व्हायरमॅन', किंवा तसंलच काहीतरी जुनं पॉर्न बघायला लागेल. त्यापेक्षा आपण काहीतरी वेगळं पॉर्न बघायचा प्रयत्न केला पाहिजे. माणसाने त्याच्या कंफर्ट झोनमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत रहावं." हा सगळा विचार पूर्ण करायच्या आत अदितीचा हात रिमोटवर पडला आणि श्रीयुत अदितीने कपाळावर हात मारण्याचे कष्टसुद्धा केले नाहीत.

टीव्ही पाहताना सारखे चॅनल बदलायचे नाहीत. चॅनल बदलत राहिलीस तर सुरू होईल तो कार्यक्रम बघायचा, अशी "शिस्त" अदितीला बालवयातच लावली गेली होती. ती अजूनही शक्यतोवर या नियमाचं पालन करते. त्यात जो चॅनल मागच्या वेळेस बंद झाला होता तो साधारणतः स्थानिक बातम्यांसाठी सकाळी लावला जातो. पण शनिवारच्या रम्य दुपारी तिथे फूड पॉर्न लागलं होतं. श्रीयुत अदितींच्या डोळ्यात खुनशी झाक जाणवली. "आता पाहतोच तुझी 'शिस्त' किती टिकते ते!" असा तो खुनशी भाव होता. आधी अनेकदा "किती चॅनल बदलतोस तू. टीव्ही गाईड पाहून एकदाच काय ते ठरव आणि पहा की!" असं बोलून तिने 'साईनफेल्ड'मधलं वर्णन सार्थ ठरवलं होतं. पण नावडत्या विषयातलं पॉर्न लागल्यामुळे अदितीची ग्रँड गोची झाली. आता तिने हट्टाला पेटण्यापेक्षाही, "कोण आता चॅनल बदलणार, रिमोट कधीचाच हातातून गळून पडलाय" म्हणत चॅनल तसाच ठेवला. तेव्हा जे काही दिसलं त्याचं हे वर्णन आहे.

तर ती टीव्हीतली लिडीया सांगत होती. मिकेलांजेलो (अंतोनियोनी नव्हे, 'डेव्हीड'वाला) याला एकाच प्रकारे पालक आवडत असे. त्याच पाककृतीचा पास्ता सॉस बनवून ती मिकेलांजेलोप्रती आदर व्यक्त करते. म्हणून हा आमचा (सध्यातरी) आवडता मिकेलांजेलो पास्ता -

साहित्य सगळंच अंदाजे, लिडीयामावशीने तसंच सांगितलं :
लांब पास्ता - स्पगेटी, फेतुचिनी, एंजल हेअर कोणताही चालेल.
ऑलिव्ह तेल
पाईनचे दाणे - हे फार महाग असतात. माझ्यासारखे कंजूष असाल आणि "तू फार कंजूष आहेस" हे ऐकायची तयारी असेल तर पिकान, काजू, आक्रोड, यांच्यापैकी काहीही चालून जाईल. त्यांचे तुकडे वापरावेत.
मनुका किंवा बेदाणे
पालक
रिकोटा चीज
काळी मिरी
पार्मेजान चीज
बाकी दोन पातेली, डाव, कालथा, चिमटा, चमचा, पाणी इ.
टेक्ससची रम्य दुपार वगैरे सगळं पर्यायी आहे.

एकीकडे पास्ता उकळत ठेवावा. पास्त्याच्या लांब काड्या मोडायच्या नाहीत असं लिडीया मावशीने सांगितलं. पण आपापल्या मूड आणि आवडीनुसार ठरवावं.

एका छोट्या वाटीत बेदाणे/मनुका घेऊन त्यावर पास्त्याचं गरम पाणी घालून ते भिजवावं. दुसऱ्या पातेल्यात किंचित ऑलिव्ह तेल घालून त्यावर पाईनचे दाणे किंवा आक्रोड, पिकान हे दाणे परतायला घ्यावेत.

वरच्या, उजव्या फोटोतले पांढरे दाणे पाईनचे आणि तपकिरी पिकानचे तुकडे आहेत.

ते चटकन खरपूस होतात. ते काढून ठेवायचे. त्याच पातेल्यात गरज असल्यास आणखी ऑलिव्ह तेल घालून पालकाची पानं परतायची. पालक शिजायला कितीसा वेळ लागणार. (मध्ये फारतर हा धागा उघडून पाकृ शोधून खातरी करण्याइतपतच वेळ मिळेल.) तो शिजला की त्यात रिकोटा चीज घालायचं आणि ते सगळं एकत्र ढवळायचं.

यापुढच्या कृतीमध्ये लिडीयामावशी म्हणते की पास्ता किंचित कच्चट ठे‌वायचा आणि रिकोटा-पालकामध्ये घालायचा. श्रीयुत अदिती यांच्या मते फार शिजवलं तर रिकोटा चीज फाटतं त्यामुळे पास्ता पूर्ण शिजवावा आणि शेवटीच सॉसमध्ये टाकावा. त्यामुळे आपापल्या सोय, निवडीनुसार काय करायचं ते ठरवा. हा पाठभेद वगळता आता त्या सॉसमध्ये बेदाणे/मनुका पाणी वगळून घालायच्या. पास्ता शिजला की/ अर्धा एक मिनीटानंतर गॅस बंद करायचा. त्यात भाजलेले दाणे घालायचे. वरून (असल्यास ताजी, नसल्यास तीन वर्षांपूर्वी आणलेली) काळी मिरी घालायची. काळी मिरी शिजवायची नाही नाहीतर तिची कडसर चव पदार्थात उतरते. -- लिमा.

हा असा लांबडा पास्ता वाढणं हे कसब आहे. त्यामुळे ते काम हौशी लोकांना किंवा श्रीयुत अदिती प्रकारच्या लोकांकडे सोपवावं. (ही पायरी पर्यायी आहे.) वाढताना तो चिमणीच्या घरट्यासारखा गोल-गोल करून वाढायचा, असं लिमा म्हणाली. तिच्याकडे चिमट्यासारखं प्रकरण होतं त्यामुळे ते सोपंही असावं. सगळ्यात शेवटी वरून पार्मेजान भुरभुरा‌वं आणि खावं. सोबत काय प्यावं हे लिमाने सांगितलं नाही म्हणून मला माहित नाही.

टीप - सॉस फार घट्ट आहे असं वाटल्यास लिमाची युक्ती वापरायची. पास्ता शिजवलेलं पाणी त्यात थोडं थोडं घालावं. अदितीची युक्ती, पालक शिजवताना वर झाकण ठेवलं तर पालकालाच पुरेसं पाणी सुटतं. रिकोटासुद्धा बऱ्यापैकी पातळ होतं.
या प्रकारात मनुका/बेदाण्यांची गोड चव विचित्र लागेल अशी शंका आम्हाला आली होती. पण ते खाताना दिसत नाहीत आणि मध्येच गोडसर किंवा दाण्यांची चव लागली की गंमत वाटते.

अवांतर -
१. हा प्रकार शाकाहारी आहे. त्यामुळे परदेशात गेल्यावरही "इथे शाकाहारी पाककृती कोणत्या असतात" असा प्रश्न विचारण्याची आवश्यकता नाही.
२. या पाककृतीत अंडं नाही, त्यामुळे "अंड्याशिवाय कसं करायचं?" हे विचारू नये.
३. पास्त्यामध्ये अंडं असतं ते मला माहित्ये. पण लोकांना ते सांगत सुटू नये. दृष्टीआड सृष्टी असली की काय वाट्टेल ते खपवता येतं.

अतिअवांतर - फोटोस हासू नये.

आवड/नावड

उदय. Fri, 05/09/2014 - 03:47

चांगली दिसतीय ही पाककृती. पण ही पास्तावाला डिश खाऊन श्रीयुत अदिती पस्तावला नाही ना?

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 05/09/2014 - 03:56

In reply to by उदय.

नाही. अजून सहाएक महिने या पदार्थाला मागणी निश्चित असेल. त्यापुढे हा ताप जरा उतरेल.

पालक परतताना पातेल्याच्या कडेला चिकटला तर श्रीयुत अदिती किंचित पस्तावतात. पण त्याला इलाज म्हणून अदिती आधीच पातेल्यात पाणी घालून ठेवते आणि मग खायला बसते.

अरविंद कोल्हटकर Fri, 05/09/2014 - 04:08

पाइन नट्स म्हणजे चिलगोजे. ते कोठल्याहि सुकामेव्याच्या दुकानात मिळतात.

नंदन Fri, 05/09/2014 - 06:56

पाकृ जमलेली दिसतेय. संधी (आणि स्फूर्ती) मिळताच करून पाहण्यात येईल.

अवांतर - शीर्षकाचा संदर्भ ही कविता.

ऋषिकेश Fri, 05/09/2014 - 10:04

लिड्यामाव्शी व अदितीकाकूंचा _ _ _ असो

(गाळेलेली जागा पाकृ कशी होतेय ते बघून मग भरली जाईल. माझ्या अंदाजाने यात सुक्यामेव्याऐवजी तीळाचे+दाण्याचे कूट किंवा ताहिनी असे काहीतरी टाकून पाठभेदाचा प्रयोगही करून बघता यावा!)

:)

नगरीनिरंजन Fri, 05/09/2014 - 15:37

In reply to by आदूबाळ

पालक आवडत नसल्याने या पापात (म्हंजे पालक पास्त्यात) आम्ही वाटेकरी होणार नाही.
बाकी दिसतोय मात्र चांगला.

अतिशहाणा Fri, 05/09/2014 - 19:21

In reply to by वामा१००-वाचनमा…

पालक आवडतो. सर्वत्र मिळतो. सॅलडमधील कच्चा (बेबी पालक), नुसताच कांदा वगैरे परतून फोडणी टाकून शिजवलेला, डाळ-पालक, पालक पराठे, पालक पनीर, पालक टोफू, भुर्जीमध्ये टाकलेला पालक, पालकाची पातळ भाजी, पालक सांबार वगैरे कसाही केला तरी छान लागतो.

वरील पाककृतीही छानच दिसते आहे.

वामा१००-वाचनमा… Fri, 05/09/2014 - 19:38

In reply to by अतिशहाणा

पालक सूप सुद्धा मस्त.
पालकाची शेंगदाणे घालून वरुन लसणाची फोडणी दिलेली पातळ भाजी तर अप्रतिम लागते.

रुची Fri, 05/09/2014 - 21:50

In reply to by वामा१००-वाचनमा…

पालकाची शेंगदाणे घालून वरुन लसणाची फोडणी दिलेली पातळ भाजी तर अप्रतिम लागते>>
अतिशय सहमत. या अशा काही असामान्य पाककृतींमुळे अगदी नकचढ्या फ्रेंचांचही "आमचंच कुसिन क्लासिकवालं" नाक खाली होईल अशी खात्री वाटते.

रुची Fri, 05/09/2014 - 21:37

अरे देवा! अदितीला स्वयंपाक करून, त्याचे फोटो काढून, पाकृ.चा धागा बनवलेला पहायला लावलंस, त्यात तो पदार्थ चक्क चांगला झालेला दिसतोय. :p आता अजून कायकाय पहायला लावणार आहेस रे देवा! आजकाल कशाचा काही भरवसा राहिला नाही.
अरेरे ! विक्षितबै ​अश्या चुलीपाशी दिवस कंठू लागल्या तर 'ऐसी'वरील गॉसिपपंथाचे तीनचौदा वाजलेच म्हणून समजा!>> अशी एका आदरणीय व्यक्तीमत्वाने केलेली टिप्पणी आठवली आणि मन भरून आलं.

रुची Fri, 05/09/2014 - 21:40

पालकासारखी गुणी भाजी कोणाला का आवडू नये? चवीला साधीसरळ असते, वाईट वास नाही, शिजवायला कष्ट पडत नाहीत, प्रकृतीला चांगली असते, रंग सुरेख असतो, करपट ढेकरा येत नाहीत...पण एकदा द्वेष मनात भरला की पालकही शेपूसारखा वाटायला लागतो हेच खरं ;-)

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 05/09/2014 - 21:46

In reply to by रुची

आणखी एक गुण - निवडायलाही त्रास होत नाही.

पण शेपूसारख्या भारी चवीसाठी निवडण्याचे कष्टही मोजले जात नाहीत. (या रुचीला काही चवढव समजतच नाही. नाव रुची आणि ...)