... आणि माझी काशी झाली! (भाग २)

१. मी हा लेख खूप घाईघाईत लिहितेय. आणि त्यामुळे त्यात होणार्‍या लेखनचुका तुम्ही मोठ्या मनाने, दिवाळीचा फराळ घालून मोठ्या झालेल्या तुमच्या पोटांत घालाल या आशेने दुरुस्त न करता तशाच ठेवते आहे.

२. गेल्या भागातला शेवटचा परिच्छेद पुढीलप्रमाणे-

थोडक्यात काय, फील्डवर्क म्हणजे भाषाविज्ञानाचा एक छोटासा पण महत्त्वाचा कोपरा आहे.

भाषाविज्ञान या नवव्या पात्राचा एवढा परिचय तूर्तास पुरे.

__________________________________________________________________________________

हा. तर आम्ही जिथे स्थलांतर केलं ती खोली कल्पनातीत प्रमाणात स्वच्छ निघाली. मी खोलीचा कोपरान्-कोपरा तपासला, सिलिंगवरून एक करडी नजर फिरवली, पलंगाखाली वाकून पाहिलं, बाल्कनीचं दार उघडून तीत डोकावले, अगदी बाथरुमच्या दारामागचा प्रदेशही बारकाईने न्याहाळला. सगळीकडे पाय हापटून पाहिले. पण कुठ्ठे म्हणजे कुठ्ठेही एक्कही पाल दिसली नाही आणि मी सुटकेचा पहिला नि:श्वास सोडला. मग मी उर्वरित बाथरुम पाहून घेतलं. ते भलतंच चकाचक आणि स्वच्छ होतं हे पाहून सुटकेचा दुसरा नि:श्वास सोडला. मग प्रेमाने एकदा खोलीवरून नजर फिरवली. एक डबलबेड, एक खुर्ची आणि एक एयरकुलर एवढा ऐवज जेमतेम मावेल एवढ्या आकाराची खोली, बाल्कनीतून दिसणारी वाराणसीची स्कायलाईन (!), आणि खोलीच्याच आत असलेली स्वच्छ बाथरुम! सुख सुख म्हणतात ते हेच बरं! एकटीसाठीच्या खोलीची चैन कधीच अनुभवायला न मिळालेल्या मला ८ दिवस या खोलीत एकटीने रहायला मिळ्णार या कल्पनेनेच गारेगार वाटलं.
__________________________________________________________________________________

आंघोळ, नाश्ता वगैरे आटपून झाल्यावर आम्ही सगळे आजेसरांच्या खोलीत जमलो आणि त्यांच्या पलंगावर गोल करून बसलो. आजेसरांनी आमची विभागणी चार गटांत केली आणि प्रत्येक गटावर वेगवेगळं काम सोपवलं. इतरांना दिलेलं काम हे प्रकल्पाचं मुख्य काम होतं- वाराणसीतल्या मराठीभाषकांच्या मराठी शब्दसंपदेचा अभ्यास करणं. साधारणपणे, शब्दसंपदेसंबंधीचा डेटा कलेक्ट करण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या आखल्या जातात. कधीकधी इंग्रजी किंवा हिंदी शब्द देऊन त्यासाठीचा त्या भाषेतला शब्द विचारला जातो, कधी आसपासच्या वस्तूंसाठीचे शब्द विचारले जातात, कधी रेखाचित्रे पुढे करून त्यातल्या वस्तूंसाठीचे शब्द विचारले जातात इ. इ. या प्रकल्पाची माहिती अद्याप प्रकाशित न झाल्याने या प्रकल्पात अवलंबलेली नेमकी पद्धत वगैरे गोष्टी मला इथे आत्तातरी उघड करता येणार नाहीत.

मला त्यांनी माझं आवडतं काम दिलं. शब्दसिद्धीचा म्हणजे शब्द घडवण्याच्या प्रक्रियेचा अभ्यास. मग पहिला दिवस त्यानुसार डेटा काय घ्यायचा हे ठरवून डेटासेट तयार करण्यात गेला. त्यादिवशी फील्डवर्क झालंच नाही. वाराणसीतली मराठी असते कशी श्रवणी ते अजूनही ऐकायला न मिळाल्याने मी कासावीस झालेले. त्यात गेल्या फील्डवर्कचा कोणताच डेटा प्र.सूं.नी यावेळी सोबत बाळगला नव्हता हे ऐकून माझ्या चेहर्‍यावर एक तिखट प्रतिक्रिया उमटली.

दुपारी आम्ही एका महत्त्वाच्या कामगिरीवर निघालो. जेवणासाठी चांगली पण स्वस्त जागा शोधणे. हे काम अपेक्षेपेक्षा फारच कठीण निघालं.

एकतर आम्ही ज्या भागात उतरलो होतो, त्या शिवाला भागातला मुख्य रस्ता हा दोन बसगाड्या समोरासमोर आल्या तर चक्काजाम होईल एवढ्या रुंदीचा होता. सगळीकडे शेण आणि कचरा पसरेला होता. त्यामुळे वाट काढणं मुळातच कठीण होतं. त्यात रस्त्याच्या डाव्या बाजूने वाहन चालवावे या नियमाला फाट्यावर मारत लोक यथेच्छ गाड्या हाकत होते. वाट्टेल तसा कट एकमेकांना मारत होते. सिग्नल नावाची चीज तिथे अस्तित्त्वात नव्हती. या अशा रहदारीच्या वेळात रस्त्याच्या मधोमध काही गाई स्थितप्रज्ञांना लाजवणारा निर्विकारपणा धारण करून शेपट्या उडवत चालल्या होत्या. त्या अशाच वागणार हे मनात अगदी घट्ट धरून ऑटो-सायकलरिक्षा-स्कूटर-सायकल-चालक उरलेल्या जागेतून आपला वेग तसूभरही कमी न करता सुळकन् जात होते. काही गाई मधेच मलमूत्रविसर्जन करून आजूबाजूच्या लोकांना तीनताड उडायला भाग पाडत होत्या. आणि हे सगळं चालू असताना प्रत्येक गाडीचालक मिनिटातली तीस सेकंदे आपल्याकडच्या भोंग्याचा मन:पूत घोष करत होता.

मुंबई आणि दिल्ली अशा ठिकाणी राहिलेल्या मला कोणत्याही रस्त्याच्या रहदारीची भीती वाटणार नाही हा माझा भ्रमाचा भोपळा पहिल्या मिनिटात फुटला. मी मुकाट इतरांच्या मागून, गाईंना टाळत, भोंग्याने दचकत चालू लागले. पण तेही सोपं नव्हतं. वाराणसी ही अशी जागा आहे, की तिथल्या रस्त्यावर पुढचं पाऊल टाकण्यापूर्वी तुम्हाला जमिनीकडे पाहून त्यावर शेण नाहीये ना याची खात्री करून घ्यावी लागते. मग एकदा डावीकडे आणि एकदा उजवीकडे वळून कोणतं वाहन आपल्या अंगावर येत नाहीये ना (हो, एक माणूस रस्त्याच्या कडेने चालत असतानाही त्याच्या अंगावर एकाने आपली बाईक घातलेली मी या डोळ्यांनी पाहिली आहे. सुदैवाने कोणालाही थोडंही लागलं नाही), मग एकदा समोर आणि एकदा मागे पाहून तिथूनही कुणाचं आक्रमण होत नाहीये ना हे पहावं लागतं. थोड्या वेळाने मी इतकी घाबरले की मला वाटलं मी मधेच आकाशाकडे पाहून आपल्या डोक्यात काही पडत नाहीये ना याचीही खात्री करून घ्यायला हवी.

या अशा प्रकारे चालताना आजूबाजूच्या खानावळींकडे लक्ष ठेवणं हेही एक दिव्य होतं. बर्‍याचशा खानावळी टपरीछाप होत्या आणि त्यात मोठ्ठ्या कढईतून तेलाने थबथबलेले समोसा आदींचे घाणे बाजूच्या ताटात ठेवले जात होते. आम्ही त्या सगळ्या टपर्‍यांवर काट मारली. मग पुढे स्वयंपाकघर बाहेरून न दिसणारी एक खानावळ लागली. तीत आम्ही शिरलो. आधीच येऊन बसलेल्यांच्या ताटांत डोकावून पाहिलं तर भाज्या तेलाने थबथबलेल्या दिसल्या. मेनूमध्ये पनीर हा शब्द सर्वाधिक वेळा वापरलेला दिसला. या खेरीज तिथे दाक्षिणात्य पदार्थ मिळत होते, पण उत्तर प्रदेशात बनवले गेलेले दाक्षिणात्य पदार्थ खाऊन पहायचं धारिष्ट्य तोवर कुणात आलं नव्हतं. राहता राहिले चायनीज पदार्थ. ते इथे आपल्या नेहमीच्या सवयीचे नसतील याची पूर्ण खात्री होती. त्यामुळे नेमकं काय खायचं हा प्रश्न आम्हाला सुटेना. शेवटी चायनीज भात त्यातल्या त्यात कमी तेलाचा असेल असा विचार करून आम्ही तो मागवला. त्या भाताचं वर्णन करण्याच्या फंदात मी आत्ता पडत नाही. Suffice it to say, की इथे नेमकं खायचं काय हा प्रश्न पहिले तीन दिवस मला सुटलाच नाही आणि मला पनीरच्या आणि चायनीज पदार्थांवर ते तीन दिवस भागवावे लागले.

संध्याकाळी आम्ही दुसरी एखादी जास्त चांगली खानावळ दिसते का ते शोधायला दुसर्‍या एका रस्त्यावरून चालत गेलो, तर तिथे उलटंच चित्र दिसलं.
_____________________________________________________________________________

तिथले रस्ते बरेच प्रशस्त होते. रस्त्यावर कचराही कमी होता. एक मॉल आणि बरीचशी पॉश दुकानं आणि रेस्टॉरंटं होती. इथे जरा स्वच्छता असेल असा संशय घ्यायला बरीच जागा होती. पण अर्थातच ही रेस्टॉरंटं आमच्या खिशाच्या बाहेर होती. हा रस्ता आणि आमचा शेणाने सजलेला रस्ता यांना जोडणारा एक संधिरस्ता ('संधिकाल' असतो, ना तसा) होता. तिथे बरेच स्टॉल्स टाकलेले होते आणि त्या स्टॉल्सवर चक्क नॉन-व्हेज विकलं जात होतं. सगळीकडे 'शुद्ध शाकाहारी'च्या पाट्या पाहून गांजलेले आम्ही लोक या स्टॉल्सकडे आशाळभूत नजरेने पाहून इथे खायचं की नाही या महत्त्वाच्या प्रश्नावर खल करू लागलो.

मी जिथे प्रवासाला जाईन तिथे तिथलं जेवण खायचं. अगदीच अस्वच्छता पाळली जात असली तरच ती जागा टाळायची, अन्यथा आपल्या पोटावर वाट्टेल ते पचवण्याचा जबरदस्त विश्वास ठेवायचा असा माझा नेम असतो. पण फील्डवर्कमध्ये तब्येती सांभाळणं हे सर्वांत महत्त्वाचं असतं. एखाद्या बेसावध क्षणी एखाद्या स्टॉलवरच्या पाण्याच्या बाटलीतून घेतलेला घोट किंवा एखाद्या मोहाच्या क्षणी खाल्लेला तळलेला मासा याची किंमत २-३ दिवस अंथरुणाला खिळून राहून आणि त्या काळात शून्य फिल्डवर्क करून भरावी लागते.

या फील्डट्रीपला माझ्याबाबतीत थोड्या फरकाने हेच झालं. मला नदीतले मासे खायला फार आवडतात. त्यामुळे वाराणसीत येऊन गंगेतले मासे खायचा शक्य तितका प्रयत्न करायचा असं ठरवलं होतं. पण मासे नीट स्वच्छ केलेले नसतील तर आरोग्याला घातक ठरू शकतात म्हणून मी तो मोह शेवटच्या दिवसापर्यंत टाळला. पण शेवटच्या दिवशी एका बर्‍या रेस्टॉरंटात रोहू (माझा आवडता मासा) मिळत असल्याचं कळलं आणि माझा संयम सुटला. मी तिथे रोहूचे दोन तळलेले तुकडे खाल्ले. दुपारी लगेच मला त्याचा त्रास झाला, पण तो शेवटचा दिवस असल्याने आम्हाला फील्डवर्क करायचं नव्हतं, जी कामं होती ती खोलीवर राहूनच करायची होती, त्यामुळे माझ्या कार्यक्षमतेला फारसा बाध आला नाही.

पण हे सगळं नंतर घडलं. शिवाला भागातल्या त्या पहिल्या संध्याकाळी तंदुरी चिकन विकणारे ते स्टॉल्स पाहून आमचा खल चालला होता, तेव्हा मी इथे नको खाऊया असा सावध पवित्रा घेतला. शेवटी एका पडक्या खोलीत चार टेबलं मांडून चिकन बिर्याणी आणि फ्राईड चिकन विकणार्‍या एका स्टॉलमध्ये जाऊन खायचं या प्रस्तावावर आम्ही मांडवली करून कारवाई केली. ती पडकी खोली बरीच अस्वच्छ होती. चिकनची हाडं टेबलाखालीच टाकण्यात आली होती. पण आम्ही चिकन खाण्याच्या ओढीने त्यांकडे कानाडोळा केला. बिर्याणी आणि फ्राईड चिकन स्वस्त आणि मस्त होती. चिकन जिभेवर चांगली लागलीये, पण आता पोटात जाऊन काय धुमाकूळ घालतेय ते उद्या कळेलच अशी स्वतःशी चिंता करत मी खोलीवर परतले.

वाराणसीच्या रस्त्यांवरच्या वाहतुकीखेरीज त्या दिवशी माझ्या मनावर ठसलेली दुसरी गोष्ट म्हणजे, तिथल्या दोन आर्थिक स्तरांमध्ये दिसून येणारी दरी. एकीकडे अस्वच्छ आणि अरुंद रस्ते, दुसरीकडे स्वच्छ आणि रुंद रस्ते; एकीकडे अस्वच्छ, अनारोग्याचा सतत वास असलेले पण स्वस्त जेवण पुरवणारे स्टॉल्स आणि खानावळी, पण दुसरीकडे चकाचक, स्वच्छ पण महागडी हॉटेल्स आणि रेस्तरॉ अशी सरळ सरळ विभागणी दिसली. यांच्यातला मध्यममार्ग आम्ही राहत होतो त्या भागात तरी दिसला नाही.

पण वाराणसीतला खरा बकालपणा मी अजून पाहिलाच नव्हता. याचं प्रत्यंतर मला आलं ते त्यानंतरच्या दिवशी.
_______________________________________________________________

चिकनने आमच्यापैकी कोणाच्याही पोटात धुमाकूळ घातला नाही हे आनंदाने नोंदवून मी आता पुढच्या दिवसाबद्दल लिहिते.

त्या दिवसाची सुरुवात झाली ती गटातल्या एका नवख्याचा स्मार्टफोन काल संध्याकाळच्या फेरीदरम्यान हरवल्याच्या बातमीने. बिच्चार्‍याच्या चेहर्‍यावर काळजी अगदी स्पष्ट दिसत होती. पोलिसांत तक्रार करायची की नाही यावर थोडा खल झाला. 'नको, कोणीतरी चुकून उचलला असेल. तेव्हा बॅटरी संपत आली होती, त्यामुळे आत्ता माझा फोन लागत नसेल. त्यांनी बॅटरी रिचार्ज केली की सुटेल प्रश्न' असं तो मोबाईल-विरहात बुडालेला नवखा म्हणाला. त्याचा निरागसपणा पाहून मला बिच्चार्‍याची दया आली.

यावर घालवण्यासाठी अधिक वेळ आमच्याकडे नव्हता. त्यामुळे आम्ही तो विषय तिथेच सोडून ब्रह्माघाटाकडे कूच केली. तिथल्या एक दोन मराठी-भाषकांना आम्ही येणार आहोत हे आधीच सांगून ठेवलेलं होतं. आम्ही उतरलो आणि तिथे जायला वाहन शोधू लागलो तेव्हा कळलं, की पूज्य उमा भारती, पूज्य अनिल अंबानी आणि आपले प.पू. पं.प्र. ही मंडळी एक-एक करून या तीन दिवसांत येणार असल्याने पोलिसांनी सामान्य जनतेचा विचार न करता वाहतुक हवी तशी अडवली होती. हे सगळं बोलणं चालू असताना एक चमत्कार घडला. बाजूला उभा असलेला सायकल-रिक्षावाला मराठी भाषक निघाला. लागलीच प्र.सूं.नी वाहनाची व्यवस्था करण्याचं काम तिथेच थांबवलं आणि आम्ही सगळे मिळून त्याची चौकशी करू लागलो, त्याला एखाद्या दिवशी आमच्या गेस्ट हाऊसवर येऊन आम्हाला डेटा देण्याबाबत त्याची मनधरणी करू लागलो. सुदैवाने तो तयार झाला. आमची वाहतुकीची समस्याही त्यानेच सोडवली. त्या दिवशी ब्रह्माघाटला ऑटोरिक्शाने जाता येणार नसलं तरी सायकल-रिक्षांना तिथे जायला मुभा होती. त्याने लगेच आम्हाला दोन-तीन सायकल-रिक्षा जमवूनही दिल्या. दिल्लीतल्या सायकल-रिक्षांचा अनुभव असल्याने मी एक आवंढा गिळला, आता जे होईल ते होईल अशी मानसिक तयारी करून मी सायकल-रिक्षात चढले. आजेसर हे ज्ये. भा. वै. असल्याने आणि मी गटातली एकुलती एक स्त्री असल्याने आम्हा दोघांना स्पेशल स्टेटस होता. त्यामुळे फक्त आम्हा दोघांना अशी एक सायकल-रिक्षा देण्यात आली. उरलेल्यां ६ जणांनी २ सायकल-रिक्षांमध्ये आपली अंगं कोंबली आणि अशा तर्‍हेने आमचा प्रवास सुरू झाला.

सायकल-रिक्षा कधीही कलंडेल अशी भीती मला सतत वाटत असते हा भाग तर सोडाच. पण ती चालवणार्‍या म्हातार्‍या चालकांना असं काम करायला लावणं मला अजिबातच पटत नाही. फील्डवर्कमध्ये स्थानिकांशी आणि आपल्या गटातल्यांशी किमान आणि गरजेपुरताच संघर्ष ठेवायचा अशी माझी पद्धत असल्याने मी त्यावेळी या प्रकाराला फारसा विरोध केला नाही. पण चढावरून जाताना ते बिच्चारे म्हातारबाबा सायकलवरून उतरून, कमरेतून पुढच्या बाजूने ९० अंशांत झुकून जीव खाऊन रिक्षा ओढू लागले, तेव्हा माझं मन द्रवलं. आजेसर एक म्हातारे आणि सडपातळ. त्याचं वजन असून असून कितीसं असणार. त्यापेक्षा माझं गरगरीत धूड रिक्षातून उतरवून मी रिक्षासोबत चालते असा हट्ट मी म्हातारबाबांकडे धरला, पण हे काय आलंच आपलं ठिकाण असं त्यांनी मला खोटं खोटं सांगून माझं काहीही ऐकलं नाही. त्यानंतर चढाचा रस्ता असेल तर सायकल-रिक्षाने प्रवास करायचा नाही म्हणजे नाही, मग कितीही विरोध करायची वेळ येवो असा चंग मी मनाशी बांधून टाकला.

कसेबसे आम्ही ब्रह्माघाटावर पोहोचलो. ते एक वेगळंच जग होतं.
________________________________________________________________________

ब्रह्माघाट (आणि काही इतर घाट) म्हणजे अरुंद बोळांचा एक भुलभुलैया आहे. त्या बोळांची परिघाजवळची टोकं ही एक हातगाडी आणि एक बाईक बाजूबाजूने जाऊ शकेल एवढ्या रुंदीची आहेत. पण दोन हातगाड्या समोरासमोरून आल्या तर वाहतुकीची कोंडी ठरलेली. थोडं आत गेल्यावर हे बोळ आणखी अरुंद होतात आणि दोन बाईक्स समोरासमोरून आल्या तर एकमेकांना धडका लागू नयेत म्हणून त्यांना थोडे कष्ट घ्यावे लागतात. एकदम आतले बोळ तर याहूनही अरुंद आहेत. आम्ही एका बोळात शिरलो होतो, तो बोळ म्हणजे एका बारक्या गटारावर दगड टाकून बनवलेला असल्याने त्या बारक्या गटाराच्याच रुंदीचा होता.

रस्त्याच्या रुंदीवर मला मुळीच आक्षेप नाही. पण त्यावर वाट्टेल तशा, वाट्टेल त्या वेगाने आणि मुख्य म्हणजे कर्कश्श भोंग्यांच्या बटणावर कायम एक बोट दाबलेलं ठेवून बाईक्स आणि स्कूटर्स चालवणार्‍यांपैकी एकालातरी शेवटच्या दिवशी ओरडायचं असा निश्चय मी केला होता. तो निश्चय फळाला आला नाही कारण अनपेक्षितपणे शेवटच्या दिवशी फील्डवर जाणंच रद्द झालं. असो.

बरं, त्यात अरुंग बोळांतून गाई आणि म्हशींचा सर्वत्र बिनदिक्कत संचार चाललेला असतो, ती समस्या वेगळीच. तिथेही आक्षेप घ्यायचं कारण नाही. मी एका दिवसात त्या बोळांना विटले याचं मुख्य कारण म्हणजे तिथला भयंकर गलिच्छपणा. बोळांमध्ये जागोजागी गाईंनी मल-मूत्र विसर्जन केलेलं. लोकांनी कचरा वाट्टेल तिथे वाट्टेल तसा टाकलेला. त्यात तो कचरा गाईंनी तोंड घालून आणखी विखुरलेला. त्या कचर्‍यात सडके अन्न आणि निर्माल्य यांपासून वापरलेल्या सॅनिटरी नॅपकिन्सपर्यंत काहीही होतं. हे कमी वाटलं म्हणून की काय काही घरांच्या दरवाजाशेजारी मानवी विष्ठा! या सगळ्यांवरचे माश्यांचे ढग. ही अडथळ्याची शर्यत पार करत जायचं म्हणजे खरंच एक त्रास होता.

बरं हा गलिच्छपणा एखाद्या झोपडपट्टीत असता, तर त्याचं इतकं वाटलं नसतं. कारण झोपडपट्टीतल्या लोकांकडे मुळातच रिसोर्सेस कमी असतात, असलेले रिसोर्सेस स्वच्छतेवर खर्च करणं शक्य नसतं, कधी स्वच्छतेचं महत्त्वही अशिक्षितपणामुळे माहीत नसतं. पण या बोळांतून राहणारे लोक म्हणजे ४-५ मजली घरांमध्ये राहणारे, चांगली आर्थिक स्थिती असलेले, सुशिक्षित आणि आपल्या उंबर्‍याच्या आतला परिसर दृष्ट लागेल इतका स्वच्छ ठेवणारे होते. त्यामुळे त्यांच्या उंबर्‍यापलीकडची घाण पाहिली की डोकं जास्तच उठे.

शेवटी शेवटी आम्ही हतबुद्ध होऊन तिथल्या लोकांना विचारू लागलो, की तुम्ही एवढ्या घाणीत राहता कसे? तर जो तो शेजार्‍याकडे बोट दाखवून 'ते लोक खूप घाण करतात' असं सांगू लागला. त्यामुळे हा प्रश्न विचारण्यात अर्थ नसल्याचं आमच्या लक्षात आलं.

या सगळ्यात एक चांगली गोष्ट म्हणजे, तिथल्या मराठीभाषकांशी आमच्या भरपूर गप्पा झाल्या. त्यांचं थोडासा हिंदीसारखा हेल असणारं, हिंदी शब्दांची अधून-मधून पेरणी करणारं मराठी फारच रोचक वाटलं. त्यांच्या भाषेच्या व्याकरणातल्या कोणत्या गोष्टींचा अभ्यास करायला हवा, हे पहिल्या दोन दिवसांत थोडं थोडं लक्षात येऊ लागलं. पण तसं करण्यासाठी पुरेसा वेळ नसल्याने, आम्ही त्यातले ४-५ मुद्दे निवडले आणि त्यावर फार पद्धतशीरपणाचा आग्रह न धरता, मिळेल तेवढा, मिळेल तसा डेटा जमवायचा असं ठरवलं. यामागे काही तांत्रिक आणि काही व्यावहारिक कारणे होती. नेमके कोणते मुद्दे निवडले, भाषा नेमकी कशी होती, याचं मला खोलात वर्णन आत्ता करता येणार नाही. त्यामुळे क्षमस्व.
_________________________________________________________________________________________

क्रमशः

पुढील भाग इथे वाचायला मिळेल- http://aisiakshare.com/node/3491

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (5 votes)

प्रतिक्रिया

एकच नंबर. रिअल इंड्या म्हणतात तो हाच. मोठ्या शहरात वाढलेल्यांना ते अजून अंगावर येतं, परंतु लहान शहरात वाढलेल्यांना इतकं वेगळं वाटत नाही. तरी एक गोष्ट बाकी खरी आहे- महाराष्ट्रातली टायर २-३ ची शहरे (विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातली) आणि यूपीतली टायर १-२ ची शहरे यांत तादृश फरक नाही. महाराष्ट्रातली शहरे अधिक ऐसपैस अन स्वच्छ असतात. इन जण्रलच गंगाकाठच्या सपाट प्रदेशात दाटीवाटीने राहण्याचे प्रमाण फार जास्त आहे दख्खनपेक्षा. हे मी पानिपत, ओल्ड दिल्ली, मथुरा अन सेंट्रल कोलकाता अशा ४ ठिकाणी तरी पाहिले आहे. अशा ठिकाणी जेवणाचा प्रॉब्लेम येतो हे खरेय, परंतु अशा वेळी तिथे 'वैष्णो भोजनालय' हा पर्याय एकदम चांगला असतो. प्युअर व्हेज, तुलनेने बर्‍यापैकी स्वच्छ आणि तितकासा महागही नाही. अशा खानावळी पानिपत अन मथुरेत तरी लै आहेत. वाराणसीतही नक्की असतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पण महाराष्ट्रात घाटावरल्या शहरांच्या तुलनेत कोकणातली घरे आणि शहरे जास्त स्वच्छ वाटली. इतकेच कशाला मुंबई पुण्याच्या कोणत्याही एस्टीने प्रवास करा आणि कर्नाटक महामंडळाच्या बसने प्रवास करा. फरक लगेच लक्षात येतो. राजस्थानची कलाकुसर सुंदर आहे पण जयपूर, जोधपूर अशा कोणत्याही मोठया आणि प्रसिद्ध शहरातल्या रेल्वे स्टेशन परिसरात मुत्रविसर्जनाचा एवढा तीव्र वास येतो की विचारता सोय नाही. गुजरातेतल्या काही शहरांनाही हे लागू होते. त्यामानाने दक्षिण भारत खुपच स्वच्छ वाटला. एवढ्या वर्षांच्या प्रवासाच्या अनुभवावरुन हेच म्हणावे लागेल की माणसे बाहेरुन जितकी सुंदर दिसतात तेवढे त्यांचे राहणीमान गलिच्छ असते. अर्थात प्रत्येक नियमास आणि अनुभवास अपवाद असतोच. तसेच हे सार्वत्रिक विधान नाही असे नमुद करतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ळॉळ बरोबरे. कोकणात तुलनेने स्वच्छता जास्त आहे.

अन आपल्या लालडब्याच्या तुलनेत कर्नाटकचे डबे इतके मस्त असतात, लयच भारी. अगदी आपला क्लास टॉपर म्हणजे शिवनेरी- त्यांच्या ऐरावतासमोर चिंधी आहे.

तदुपरि ते सुंदर दिसणे अन राहणीमान इ. शी तितकासा सहमत नाही. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अगदी सहमत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काशी ग काशी , तुझी सवय कशी , जरा बोल माझ्या पाशी ग …… हे दादा कोंडकेच्या सिनेमातले गाणे उगीच आठवते आहे Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चित्रदर्शी! हा एकच शब्द सुचतोय!
मस्त चालुये!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

+१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

जिवंत वर्णनाने भरलेला मस्त लेख !

"२. गेल्या भागातला शेवटचा परिच्छेद पुढीलप्रमाणे-" मधल्या दुव्यावर टिचकी मारल्यास "विनंती केलेले पान सापडत नाही" असा संदेश येतोय.

तो भाग कोठे सापडेल हे कोणी सांगू शकेल का ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दुवा सुधारला आहे. आता बघा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

लेख रोचक असल्याने धीर धरवला नाही. "नवे लेखन" मधून शोधून काढलाच त्याला !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाराणसीत खाण्याचे वांदे झाले .. ये बात कुछ हजम नही हुयी !!
वाराणसीतच काय सार्‍या उत्तरेतच मुसलमानी आक्रमणांनी हा बकालपणा आणला आहे... फार कशाला महाराष्ट्रातील काही शहरे पहावीत .. मिरज , भिवन्डी , औरन्गाबाद .. त्यातील काही भाग तुम्हाला हमखास बकाल दिसतील.
पण वाराणसी शहराचे एक शान आहे , मी ही काही दिवस वाराणसीत काढले आहेत.. त्याच्या स्वभावाशी तुम्ही जुळवून घ्याल तर त्यासारखी मजा नाही. भाषेचा अभ्यास अकर्ता आहात तर तिथल्या बहुधंगी स्म्स्कृतीचा आस्वाद घ्या ना !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बकालपणा हा उत्तरेत अनादिकाळापासून आहे. कोलकात्यातला बकालपणा काय मुसलमानांमुळे आलाय का? सेंट्रल कोलकाता नीअर सी आर अ‍ॅव्हेन्यू आणि एकूणच नॉर्थ कोलकाता हे अ‍ॅज़ बकाल अ‍ॅज़ एनीथिंग आहेत. मेटियाबुर्ज भाग आणि सोनागाछी भाग, तसेच बडाबाझार इ. भाग सारखेच बकाल आहेत. मुसलमानांचा संबंध नाही.

शिवाय मिरजेतला बकालपणा हा विशिष्ट समाजाची देणगी वाटू शकते, पण तसे नाही. स्टँडजवळील 'प्रेमनगर' (लोकल परिभाषेत 'नगर') नामक भाग पहा, तो कै कमी बकाल नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मस्त झालाय हा भागादेखील!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आवडतंय ....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.