Skip to main content

रात्रीची रोषणाई

आमच्या गावात काही न्यूयॉर्कसारख्या गगनचुंबी इमारती नाहीत. पण आहेत तेवढ्या बघण्यासाठी एक छोटी टेकडी अगदी शहरातच आहे. तिथून काढलेला हा फोटो:

मूळ फोटो इथे पहाता येईल. त्यातून फक्त कातरून हा फोटो बनवला आहे. फोटोसाठी अपरचर ४.० आणि एक्सपोजर टाईम १० सेकंद. कॅमेरा कॅनन S3 IS. हा फोटो ट्रायपॉड वापरून काढला आहे.

दुसरा फोटो हायवेवरून जाताना, कॅमेरा हातात धरूनच काढलेला आहे.

कॅमेरा तोच, अपरचर २.७ आणि एक्सपोजर २.५ सेकंद. गाडीचा वेग साधारणतः ताशी १०० किमी एवढा होता.

यावरून फोटो कसे काढावेत किंवा काढू नयेत, कातरावेत किंवा कातरू नयेत यासंबंधी चर्चा झाल्यास आवडेल.
टीपः फोटो फेसबुकावर आहेत; फेसबुक बॅन असल्यास ....

आगामी आकर्षणः अमेरिकेतल्या सर्वात जुन्या पतंगोत्सवाचे या वर्षीचे फोटो.

रुची Tue, 06/03/2012 - 02:04

अदिती, पहिला फोटो छान आला आहे पण मी काढला असता तर एफ स्टॉप ४ पेक्षा जास्त वापरून पाहिला असता. ८ किंवा जास्त वापरला असता तर डेप्थ ऑफ फिल्ड वाढल्याने जास्त क्लियर आला असता किंवा जास्त इमारती क्लियर दिसल्या असत्या असे वाटते. ट्रायपॉड वापरलास, पण शटर रिलिज मॅन्युअली केलेस की रिमोट? आयएसओ सेटिंग काय वापरलेस?

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 06/03/2012 - 02:17

In reply to by रुची

करून पहाते.

तसंही पुन्हा तिथे जाऊन अधिक फोटो काढणं भाग आहे. आत्ताचा कॅमेरा आता वय दाखवायला लागला आहे. हे फोटो काढले त्या दिवशी झूम इन करायला नकार देत होता, बहुदा थंडी वाजली असावी. कारण त्याच्या दुसर्‍याच दिवशी स्वच्छ उजेडात तापमान व्यवस्थित असताना सगळं गाडं नीट चालू झालं.

दोन्हीसाठी आय.एस.ओ. १०० वापरलं. अधिक आय.एस.ओ. वापरायला आवडलं असतं, नॉईज फारच वाढतो असं शुक्र-गुरूचे फोटो काढताना वाटलं. कदाचित २०० ला फार नॉईज येणार नाही, ते ही करून पहायला हवं.
हा फोटो २०० आय.एस.ओ.ला काढला आहे, एस्पोजरही जास्त झालं आहे. पण त्यात नॉईज अधिक वाटल्यामुळे (घाबरून) आय.एस.ओ. सेटींग कमी केलं.

शटर रिलीज मॅन्युअलीच केलं, पण ट्रायपॉड वापरताना दोन सेकंदाचा डीले ठेवला होता.

सानिया Tue, 06/03/2012 - 04:38

प्रत्यक्षात टेकडीवर येऊन नजारा पाहिल्याशिवाय या फोटोतील त्रुटी सांगता येणे अवघड आहे. पण चांगला प्रयत्न इतके सध्या म्हणता येईल.

आतिवास Tue, 06/03/2012 - 10:36

रात्रीच्या वेळी बाहेर पडून, टेकडी चढून, ट्रायपॉड वापरून फोटो काढायचा हा उत्साह वाखाणण्याजोगा आहे.
फोटो आवडले. त्यातलं तंत्र मला अर्थातच कळत नाही!

Nile Tue, 06/03/2012 - 10:51

इमारतींचा फोटो अजून जवळून काढला तर चांगला येईल. सहसा उंच इमारती डाव्याबाजूपासून उजव्याबाजूपर्यंत असा.

माझ्या मित्राने काढलेले दोन फोटो इथे उदाहरण म्हणून देतो. (समोर पाणी असेल तर असा फोटो काढायला मदत होते.)

१. http://500px.com/photo/3326021
२. http://500px.com/photo/2469058

ऋषिकेश Tue, 06/03/2012 - 14:48

In reply to by Nile

अदितीचे फोटो बघायचेत (अ‍ॅक्सेस इल्ला), मात्र तुझ्या मित्राच्या फोटोतील दुसरा फोटो मस्तच आहे!

अवगतः त्या (500px) साईटवर टाकायला हवेत फोटो हाफीसातून अ‍ॅक्सेस होतेय :)

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 06/03/2012 - 21:58

In reply to by Nile

सहमत आहे. फोटो आवडले.

थोडक्यात, आपणांस अधिक गगनचुंबी इमारती बांधता येत नसतील तर निदान फोटो कातरायला शिकावे! ;-)

मी ज्या टेकडीवरून फोटो काढले, तिच्या पायथ्याशी पाणी आहे. शहराचा मध्यवर्ती भाग आणि टेकडीच्यामधे बरीच जागा आहे. मध्यवर्ती भागातली नदी मात्र दुसर्‍या बाजूला आहे. पुढच्या वेळेस फोटो काढेन तेव्हा याचा विचार जरूर करेन.

Ashutosh Tue, 06/03/2012 - 15:27

छान वाटले फ़ोटो. दुसरा विशेषकरुन आवडला. त्यातला प्रकाशाचा खेळ पाहायला आवडला.

धनंजय Wed, 07/03/2012 - 23:36

माझीसुद्धा रात्रीच्या "स्कायलाईन" रोषणाईची चित्रे अशीच येतात. आणि मला आवडत नाहीत - याचे कारण कॅमेर्‍यातील संवेदकांना (सेन्सर एलिमेंटांना) हवा तितका मोठा मापनाचा आवाका (डायनॅमिक रेंज) नाही.

डावीकडील दोन इमारतींच्या छतावरील रोषणाई जळून पांढरी-खाक झाली आहे. (डोळ्यांना मात्र रोषणाई सुबकच दिसली होती ना?) दहा सेकंदांच्या अनावरण कालात दिव्याचे बिंब असलेल्या पिक्सेलच केवळ जळून गेल्या नाहीत, तर त्याच्या आजूबाजूच्या पिक्सेलही जळून गेल्या, आणि एक-एक भद्दाडा सफेद ठिपका काय तो दिसतो आहे. पण दहा सेकंदांच्या अनावरण कालात काही भाग पुरते काळे आहेत (आणि डोळ्यांना मात्र ते दिसत होते ना?).

अशा प्रकारे दहा सेकंद म्हणजे काही ठिकाणी फार झाले, तर काही ठिकाणी पुरले सुद्धा नाहीत!

अशा परिस्थितीत काय करावे? याचे उत्तर नाईल यांच्या चंद्राच्या प्रकाशचित्रात मिळते. बिंबाचा उजळ भाग सुद्धा जळणार नाही, इतपत कमी अनावरण काल ठेवून शेकडो-हजारो चित्रे काढायची. त्या चित्रांना फ्लोटिंग-पॉइंट अंकगणित वापरून सरासरी "चित्र" बनवायचे. (हे चित्र अजून आपण पटावर बघू शकत नाही. बिटमॅप, जेपेग, रॉ... कुठल्याही दाखवण्यासारख्या चित्रात रंगांची रक्कम पूर्णांक संख्येत असतो.) आता या फ्लोटिंग पॉइंट "चित्रा"ला नॉनलिनियर-ट्रान्स्फॉर्म करावे. (माझ्या अंदाजाने लॉगॅरिदम किंवा असे काहीसे.) मग चित्र पूर्णांक-गणिताचे असे बदलून घ्यावे, आणि प्रदर्शित करावे.

चित्रे काढल्यानंतर हे सर्व गणिती प्रकार करणारी प्रणाली (सॉफ्टवेअर) मोफत उपलब्ध आहे, त्याचा दुवा मागे नाईल यांनी दिला होता. (मी खुद्द ती प्रणाली उतरवून प्रयोग केलेले नाहीत, ही लाजिरवाणी बाब येथे कबूल करतो.)

- - -
नाईल यांच्या मित्राने कुठल्या सेटिंग वापरून पिट्सबर्गचे फोटो काढलेले आहेत?

Nile Thu, 08/03/2012 - 03:23

In reply to by धनंजय

नाईल यांच्या मित्राने कुठल्या सेटिंग वापरून पिट्सबर्गचे फोटो काढलेले आहेत?

पहिले चित्र तर कॅमेर्‍यातील HDR वापरून काढलेले आहे. दुसराही बहुतेक तसाच काढलेला असावा (त्याने काही चांगले सिंगल शॉट्सही काढलेले आहेत). कॅमेर्‍यातील HDR मध्ये कॅमेरा दोन (किंवा तीन) फोटो घेऊन ते जोडतो. रात्रीच्या प्रकाशातील फोटोंवेळी (संधीप्रकाशात इ.) या तंत्राने फोटो चांगले येतात असा माझा अनुभव आहे. (या बद्दल अधिकः http://www.nikonusa.com/Learn-And-Explore/Nikon-Camera-Technology/gltv4…)

सिंगल शॉटमध्येही अनेकांनी रोषणाईचे चांगले काढलेले फोटो दिसतात. काही भागात ओव्हरएक्झोज-अंडरएक्सपोज होणे टाळता येत नाही पण इमारतीपासूनचे अंतर आणि प्रखर प्रकाश असलेला भाग काळजीपूर्वक निवडल्यास चांगला फोटो येण्यात मदत होते असा माझा अनुभव आहे. दुसर्‍या एका मित्राचे उदाहरण खाली देतो आहे. (मित्राचे नाव देवर्ष शाह)

फोटोचे सेटिंगः f/11, 200 ISO, 20 sec

मागच्या उंच उमारतीबद्दल धनंजय म्हणतात ती अडचण इथेही जाणवते आहे. हा फोटो स्कायलाईनचा नाही तरी ओव्हरएक्स्पोज्ड आणि अंडरएक्स्पोज्ड भाग यात खुबीने टिपले गेलेत असं मला वाटतं. (फोटो सर्वांना दिसेल की नाही याची यात्री नाही.)

धनंजय Thu, 08/03/2012 - 03:54

In reply to by Nile

छान चित्र. फोटोमधील व्हॅनिशिंग पॉइंट विचित्र आहे. क्षितिजसमांतर रेषा उजवीकडे एकत्र येतात, पण डावीकडे एकत्र येतच नाहीत. त्यामुळे इमारत वाकडी कलल्यासारखी वाटते. (अति-वाइड-अँगल लेन्सने घेतलेले चित्र ऑफ-सेंटर कातरणे, हे याचे कारण आहे, असा माझा कयास आहे.)

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 08/03/2012 - 04:49

In reply to by धनंजय

क्षितिजसमांतर रेषा उजवीकडे एकत्र येतात, पण डावीकडे एकत्र येतच नाहीत.

हे नीट समजलं नाही.

धनंजय Thu, 08/03/2012 - 10:04

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

सफेद इमारतीवर (उत्सवमूर्ती इमारतीवर) अनेक आडव्या रेषा आहेत. उदाहरणार्थ प्रत्येक मजल्यावरती अशी रेषा आहे. या रेषा उजवीकडे-डावीकडे वाढवता येतात. उजवीकडे वाढवल्या तर सर्व रेषा चित्राच्या बाहेरच्या एका बिंदूवर एकमेकांना छेद देतात. पर्स्पेक्टिव्ह ड्रॉइंगमधील हा "व्हॅनिशिंग पॉइंट" आहे. डावीकडे मात्र रेषा एकमेकांपासून दूर जातात. परंतु या परिस्थितीत इमारतीकडे थेट समोरून बघताना असा एकीकडचाच व्हॅनिशिंग पॉइंट डोळ्यांना दिसू शकेल काय? नाही. डावी दिशा आणि उजवी दिशा "सिमेट्रिकल" आहेत.

त्यामुळे आपले डोळे/मन आपल्याला सांगतात, की हा मुळात व्हॅनिशिंग पॉइंट नाहीच, बिल्डिंगच वाकडी आहे. उजवीकडे कललेली आहे.

मुळात बिल्डिंग बहुधा वाकडी नाही.

चिंतातुर जंतू Thu, 08/03/2012 - 17:40

>>डावीकडील दोन इमारतींच्या छतावरील रोषणाई जळून पांढरी-खाक झाली आहे. (डोळ्यांना मात्र रोषणाई सुबकच दिसली होती ना?) दहा सेकंदांच्या अनावरण कालात दिव्याचे बिंब असलेल्या पिक्सेलच केवळ जळून गेल्या नाहीत, तर त्याच्या आजूबाजूच्या पिक्सेलही जळून गेल्या, आणि एक-एक भद्दाडा सफेद ठिपका काय तो दिसतो आहे. पण दहा सेकंदांच्या अनावरण कालात काही भाग पुरते काळे आहेत (आणि डोळ्यांना मात्र ते दिसत होते ना?).

असे होणे हा प्रत्येक वेळी फोटोतला दोषच मानावा असे मला स्वतःला प्रकर्षाने वाटत नाही. काही भाग खूप झगझगीत आणि काही अगदी काळा यातून चौकटीत काही डौल किंवा समतोल साधला जाऊ शकतो. उदाहरणार्थ जॉर्ज द ला तूरच्या चित्रांत असे होते. हे पाहा:

धनंजय Thu, 08/03/2012 - 21:53

In reply to by चिंतातुर जंतू

तंत्र आणि प्रमाद यांच्यात पुष्कळदा फरक करता येतो. (अर्थात काही ठिकाणी कठिण जाते, पण हे क्वचित.)

कलेची परिचित परंपराही मला कुरूप वाटते, असा गैरसमज देणारे त्या प्रतिसादात काहीही नव्हते. "क्यारोस्कूरो" चित्रण (पूर्ण काळा, पूर्ण पांढरा असे भाग चितारणे) हे प्राचीन आणि प्रभावी तंत्र आहे. परंतु चित्रकार (आणि छायाचित्रकार) हे तंत्र वापरतात, तेव्हा विचारपूर्वक आणि हेतुपुरस्सर वापरतात. हा परिणाम प्रामाद टाळून हेतुपुरस्सर कसा साधावा, हे डार्करूम-शौकिनांना शिकवतही. (मी एका हौशी वर्गात हे तंत्र शिकलो आहे, पण घरी डार्करूम नसल्यामुळे सगळे काही विसरलो आहे. बहुधा "अंडर-एक्सपोझ+ओव्हर-डेव्हलप=पुश द फिल्म" हे तंत्र त्या प्राथमिक वर्गात शिकवले होते.) कृष्णधवल चित्रपटांत, विशेषतः फिल्म न्वार मध्ये या अतिशय-कृष्णधवलतेचा (सॅच्युरेटेड कॉन्ट्रास्टचा) अतिशय प्रभावी उपयोग केलेला दिसतो.

जॉर्ज द ला तूरच्या सुताराच्या चित्रात, आणि त्या शैलीच्या अन्य चित्रांत क्यारोस्कूरो तंत्र खुबीने वापरलेले असते. हे सगळे ठीकच आहे. तांत्रिक प्रभुत्वाने कलात्मकता साधली आहे, हे बघताना सहज कळते.

अदिती यांनी दिलेल्या चित्रात काही इमारतींची छप्परे जळून आजूबाजूची पिक्सेलेही जळून जाणे कलात्मक प्रभावही साधत नाही, आणि हेतुपुरस्सर असल्याचे कुठलेच लक्षण मला त्यात दिसत नाही. उलट हे भाग जाळून चितारण्याची त्यांची इच्छा नव्हती, असे त्यांनी प्रतिसादांत सांगितलेले आहेच. त्यामुळे माझी कयास ठीक होता.

कलात्मक प्रभावाकरिता काही पिक्सेले हेतुपुरस्सर जाळून टाकण्याकरिता सुद्धा तंत्र लागते, नुसते एक्स्पोझर वाढवून चालायचे नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 08/03/2012 - 23:07

In reply to by धनंजय

होय हा प्रमाद आहे. 'आऊल' आकाराची, डावीकडून दुसरी इमारत फारच जळली आहे.
चंद्रकोरींचे फोटो काढतानासुद्धा ही अडचण अनेकदा येते. डोळ्यांना चंद्राच्या रात्रीचा भाग दिसतो, पण फोटो चंद्राचा दिवसाचा भाग जाळल्याशिवाय दिसत नाही. नाईलने सुचवलेले सॉफ्टवर वापरून अनेक प्रतिमा स्टॅक/(सरासरी/मिडीयन) पद्धतीने एकत्र करून अधिक चांगल्या प्रतिमा मिळतील हे मान्य आहे. जमेल तेव्हा असं करून पहाते.

Nile Thu, 08/03/2012 - 21:28

In reply to by चिंतातुर जंतू

वर दिलेल्या चित्रात त्यामुलीचा चेहरा अजून उजळल्याने डोळे, तोंड, नाक न दिसता एक पांढरा ब्लॉब दिसला तर ते चित्रात डौल येईल का? फरक इथेच आहे.

चिंतातुर जंतू Thu, 08/03/2012 - 23:58

धनंजयच्या मतांशी सहमतच आहे. मला फक्त कधीकधी असं वाटतं की अधिकाधिक तपशील अधिकाधिक स्पष्ट दिसणं चांगल्या छायाचित्रासाठी आवश्यक असतं असा काहीसा सरसकट दृष्टिकोन ठेवला जातो. त्यातच मेगॅपिक्सेली कॅमेऱ्यांमुळे हे सरसकटीकरण वाढत चाललंय की काय अशी शंका येते. छायाचित्रात काही तपशील धूसर ठेवून, निव्वळ छायाप्रकाश किंवा निवडक ठळक आकार यांच्या सहाय्यानं एखाद्या अमूर्त चित्राचा परिणामही साधता येतो. ही शक्यता लक्षात आणून देणं मला म्हणून गरजेचं वाटतं.

>>वर दिलेल्या चित्रात त्यामुलीचा चेहरा अजून उजळल्याने डोळे, तोंड, नाक न दिसता एक पांढरा ब्लॉब दिसला तर ते चित्रात डौल येईल का? फरक इथेच आहे.

उदाहरण मूर्त चित्राचं दिल्यामुळे कदाचित मुद्दा नीट अधोरेखित झाला नसेल. पण अमूर्त चित्रात लय किंवा डौल असतो याचं एक उदाहरण पाहा. इथे झगझगीत आणि काळा यापेक्षा रंगांत फरक आहे.