Skip to main content

विज्ञान (व तंत्रज्ञान) शिक्षण व वैज्ञानिक दृष्टिकोन

श्रद्धेच्या प्रांतातील विसंगतीवर बोट ठेवण्यासाठी उत्साही बुद्धीप्रामाण्यवादी चिकित्सक अनेक वैज्ञानिक पुरावे सादर करत असतात; प्रत्यक्ष प्रयोगांचे दाखले देत असतात; समीकरण मांडतात; सर्वेक्षणाच्या निष्कर्षांचे दाखले देतात; ग्राफ्स काढून मुद्दा पटवण्याचा प्रयत्न करतात. या त्यांच्या पुराव्यातून, दाखले - संदर्भातून भ्रामक विज्ञानाच्या आधारे चढवलेले श्रद्धेचे इमले कोसळू लागतील, असा एक (भाबडा) आशावाद या चिकित्सक कार्यकर्त्यांच्या मनात दडलेला असतो. परंतु सश्रद्धांच्या समोर हे सर्व पालथ्या घागरीवर पाणी ओतल्यासारखे होत असते. या सर्व पुराव्याबरोबरच प्रत्येकाने विज्ञानाचे शिक्षण घेतल्यास वैज्ञानिक दृष्टिकोन प्राप्त होऊन श्रद्धेचे जळमट दूर होईल असे त्यांना मनापासून वाटत असते. त्यांचे हे प्रयत्न अत्यंत श्लाघनीय, प्रामाणिक व wishful thinkingचे असले तरी दैवी चमत्कार आणि अतींद्रिय शक्तीवरील विश्वास व भ्रामक विज्ञानावर आधारलेली मानसिकता वाढतच आहे, याबद्दल दुमत नसावे.

सर्व सामान्यात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी चिकित्सक नेहमीच विज्ञान व विज्ञान शिक्षणावर भर देत असतात. विज्ञान व तंत्रज्ञानातील लहान - मोठ्या तत्वांचा, नियमांचा, सिद्धांतांचा जसजसा परिचय होत जातो तसतसा रूढी, परंपरा यांच्यातील विसंगती, चमत्कार, अतींद्रिय वा अलौकिक शक्ती, दृष्टिभ्रम, हातचलाखी इत्यादींची पकड ढिली होत जाईल यावर त्यांचा दृढ विश्वास असतो. परंतु अलिकडील काही संशोधकांच्या मते विज्ञान शिक्षण हे कुठल्याही प्रकारे चिकित्सक दृष्टी देत नाही; उलट काही वेळा चिकित्सकतेला ते मारक ठरू शकते. याविषयी संशोधकांनी खालील तीन कारणांचा उल्लेख केला आहे:

1. विज्ञान शिक्षणाचा भर प्रामुख्याने विज्ञान - तंत्रज्ञान विषय समजून घेण्यासाठी लागणार्‍या तांत्रिक कुशलतेवर असते. त्यात चिकित्सक वृत्तीत वाढ करणाऱ्या गोष्टींचा अंतर्भाव नसतो. शिकविणार्‍यांना सर्व उत्तरं माहित असतात व विद्यार्थी प्रयोगातून (वा घोकंपट्टी करून) तीच अपेक्षित उत्तरं शिक्षकांच्या समोर सादर करतात. सामान्यपणे बरोबर उत्तर येईपर्यंत विद्यार्थी प्रयोगातील निष्कर्षाशी झटापट करत असतात.

2. विज्ञान शिक्षण सामान्यपणे संशोधनातील निष्कर्षांचा आढावा घेण्याच्या पावित्र्यात असते. संशोधनाचे उद्दिष्ट काय होते, त्याची पार्श्वभूमी काय होती याविषयी विद्यार्थी शेवटपर्यंत अनभिज्ञ राहतात. त्यामुळे काही चुकीच्या गृहितकांवर, गैरसमजुतीवर वा विषयाचे गांभीर्य लक्षात न घेता त्याचे सामान्यीकरण करण्यावर भर देण्याकडे विद्यार्थ्यांचा कल असतो.

3. विज्ञानाच्या निष्कर्षांला नेहमीच 'अखेरचा शब्द' मानण्याची सवय जडलेली आहे. आज काढलेल्या निष्कर्षात पुढे केव्हा तरी बदल होऊ शकतात याची जाणीव ठेवली जात नाही. त्यामुळे संशोधकाने सादर केलेले data, ग्राफ्स, संदर्भ वा दुवे यांची फार चिकित्सा न करता स्वीकारल्या जातात. कारण त्यात वैज्ञानिक, प्रायोगिक, नैदानिक (clinical) अशा शब्दांची सर्रासपणे वापर केलेले असल्यामुळे समोरच्याला गप्प बसविणे सोपे जाते. पांढरा कोट घातलेल्यांच्या भोवती बुद्धीमत्तेचे वलय असते अशी एक (गैर) समजूत समाजात पेरली गेलेली आहे.

सामान्यपणे विज्ञानाचे विषय शिकविताना facts वर जास्त भर दिला जात असल्यामुळे शिकणार्‍यांना जास्त चिकित्सकपणे विचार करण्यास वाव दिला जात नाही. एखाद्या पुराव्याची जास्त चिकित्सा न होता facts वा त्यावरून काढलेले निष्कर्ष स्वीकारार्‍ह की अस्वीकृत एवढ्यापुरतेच विद्यार्थ्यांची बुद्धीमत्ता काम करते व शिक्षकांच्या शब्दांवर विश्वास ठेवण्याकडे कल वाढतो. त्यामुळे खरे विज्ञान व भ्रामक विज्ञान यांच्यातील ठळक फरक समजून न घेता विद्यार्थी पास होत होत शिक्षण संपवतो. कुठल्याही विज्ञानविषयक पाठ्यपुस्तकाची थोडीशी तपासणी केल्यास ही बाब चटकन लक्षात येईल. 500 - 600 पानांच्या पुस्तकात संशोधनासंबंधीच्या मुद्यावर 10-15 पानंसुद्धा त्यात नसतात. पुरावे कसे तपासावेत, गृहितकांची तपासणी कशी करावी, यापूर्वीच्या संशोधनातील उणीवा कोणत्या याविषयी कुणालाच देणे घेणे नसते. शिकविणाऱ्यांना अभ्यासक्रम संपविण्याची घाई व शिकणार्‍यांना कसेबसे परीक्षेत उत्तीर्ण होऊन दाखविण्याची घाई. यामुळे वैज्ञानिक संकल्पनाबद्दल चिकित्सकपणे विचार करायला कुणालाही फुरसत नाही.

विज्ञान शिक्षण खरोखरच विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवू शकते का याविषयी अमेरिकेतील विद्यापीठात एक प्राथमिक स्वरूपाची चाचणी घेण्यात आली. तीन विद्यापीठातील 16 ते 20 वयोगटातील 207 विद्यार्थ्यांनी या चाचणीत भाग घेतला. दोन सत्रात चाललेल्या या चाचणीतील पहिल्या सत्रात विज्ञानविषयातील काही जुजबी प्रश्नांना उत्तर देणे अपेक्षित होते. या सत्रातील प्रश्नांचे स्वरूप असे होते:
1. पृथ्वीवर असलेला अत्यंत महत्वाचा ऊर्जाश्रोत कोणता?
(a) वनस्पती (b) प्राणी (c) कोळसा (d) खनिज तेल (e) सूर्य

2. यापैकी कुठली गोष्ट बरोबर आहे?
(a) ऊर्जेला एका श्रोतातून दुसर्‍या श्रोतात परिवर्तित करता येते (b)ऊर्जाश्रोतात परिवर्तन करता येत नाही (c) चलनवलनासाठी लागणार्‍या ऊर्जेला स्थितीज ऊर्जा (potential energy) असे म्हटले जाते. (d) ज्या वस्तूत ऊर्जा असते त्या ऊर्जेला गतीज ऊर्जा (kinetic energy) असे म्हटले जाते.(e) भविष्यकाळातील ऊर्जाश्रोत म्हणून आण्विक ऊर्जेलाच वैज्ञानिक मान्यता देत आहेत.

3. गर्भकाळात स्त्रीला कुठल्या गोष्टीमुळे इजा संभविण्याची शक्यता आहे?
(a) वडील RH- positive आणि आई RH - negative (b)गर्भावस्थेतील तिमाहीत गर्भवतीला जर्मन गोवर येणे (c) आई RH- positive आणि वडील RH - negative (d) (a) व (b) असल्यास (e) (b) व (c) असल्यास

4. ट्रिचिनॉसिस (trichinosis) या संसर्गजन्य रोगस्थितीचे वर्णन अशा प्रकारे करता येईल (a) परावलंबी विषाणू (b) परस्पर स्पर्श (c) बाजारीकरण (d) उपयुक्त जीवाणू (e) सौम्य लक्षण

5. कार्बनी (organic) व अकार्बनी (inorganic) संयुक्तामधील ठळक व्यत्यास
(a) कार्बनी संयुक्त हे जैविक व अकार्बनी संयुक्त अजैविक (b)जगात सापडणार्‍या कार्बनी संयुक्तांची संख्या अकार्बनी संयुक्ताच्या संख्येपेक्षा कित्येक पटीत आहे. (c) अकार्बनी संयुक्त सजीवापासून तयार होतात. (d) अकार्बनी संयुक्त निर्जीव वस्तूपासून तयार करता येतात (e) कार्बनी संयुक्तामध्ये कार्बनचा अंश असतो.

6. आवर्त सारणीमधील (periodic table) Pb ही संज्ञा या धातूला सूचित करते:
(a) लोखंड (b) फास्फोरस (c) शिसे (d) प्लुटोनियम (e) पोटॅशियम

7. नवीन खडूचे मोजमाप करण्यासाठी सर्वात इष्ट मापन कोणते असेल?
(a) मीटर (b) लिटर (c) ग्राम (d) सेंटीमीटर (e) किलोमीटर

8. यापैकी कुठल्या रोगात जनुकीय दोष आढळतात?
(a) डाउन्स सिंड्रोम (b) लैंगिक गुप्तरोग (c) मलेरिया (d) रक्ताचा कॅन्सर (e) श्वसनरोग

9. लिटमसी कागद हायड्रोक्लोरिक आम्लमध्ये बुडविल्यास
(a) काही बदल होत नाही. (b) कागद वितळून जाते. (c) कागद निळा होतो. (d) कागद तांबडा होतो. (e) कार्बन प्रक्रियेमुळे ऑक्सिजन बाहेर पडते.

10. पृथ्वी व सूर्य यामधील अंतर केव्हा कमीत कमी असते?
(a) उन्हाळ्यात (b) हिवाळ्यात (c) पावसाळ्यात (d) वसंत ऋतूत (e) वसंत ऋतू व उन्हाळा यांच्यामधील काळात

चाचणीच्या दुसर्‍या सत्रात विद्यार्थ्यांना त्यांच्या अंधश्रद्धेविषयीच्या आकलनाविषयी श्रेणी देण्यास सांगितले गेले होते.
( श्रेणी पद्धत 1 : यावर माझा पूर्ण अविश्वास आहे, 2 : याच्या खरेपणाविषयी शंका आहेत, 3: काही सांगता येत नाही, 4 : हे खरे असावे असे वाटते, 5 : यावर माझा पूर्ण विश्वास आहे.)

1 एखाद्याच्या हस्ताक्षरावरून त्याचे व्यक्तिमत्व ओळखता येते.

2 मन:शक्ती वापरून भविष्यात वा दुसर्‍यांच्या मनात डोकावता येते.

3 एखाद्याच्या जन्मराशीवरून त्याचे व्यक्तिमत्व व त्याचे भविष्य कळू शकते.

4 अक्राळ विक्राळ अशा दोन पायाचा प्राणी हिमालयात फिरत असतो.

5 शारीरिक वेदना होत असलेल्या शरीराच्या भागावर लोहचुंबक ठेवल्यास वेदना थांबतात.

6 कानात पेटती मेणबत्ती ठेवल्यास शारीरिक व्याधी कमी होते.

7 निर्जन प्रदेशातील विहिरीत भूत प्रेतांचा वास असतो.

8 साखळी पत्रं पाठविल्यामुळे भाग्य उजळते.

9 परग्रहावर मानवी अस्तित्व आहे; परंतु शासन त्याविषयीच्या बातम्यांची जाहीर वाच्यता करत नाही.

10 शाप दिल्यास वाईट होण्याची दाट शक्यता आहे. एवढेच नव्हे तर शापाने माणसं मरतात.

11 हातात धरलेला आरसा खाली पडून त्याचे तुकडे झाल्यास तुमच्यावर नक्कीच संकट कोसळणार.

12 भानामतीसारखे प्रकार घडत असतात व भूत पिशाच्चामुळे माणसं मरूही शकतात.

13 काहींच्यात दैविशक्ती असल्यामुळे जमीनीतील पाण्यांचा ते शोध घेऊ शकतात.

14 कुत्री, मांजरं यासारख्या संवेदनशील पाळीव प्राण्यांना भूत प्रेतांच्या सानिध्याची चाहूल लागते.

या विधानांच्याबद्दल दिलेल्या श्रेणीत विविधता असली तरी बहुतेक श्रेण्या 3 व 4च्या मध्ये कुठेतरी होत्या. अंधश्रद्धा विषयीच्या श्रेणींची व पहिल्या सत्रातील विज्ञानविषयक प्रश्नांच्या उत्तरांची तुलना केल्यावर यात कुठल्याही प्रकारचा संबंध नाही, हेच प्रकर्षाने जाणवले. विज्ञानासंबंधी अचूक ज्ञान असूनसुद्धा त्यातील बहुतेक अंधश्रद्धेपासून दूर राहू शकले नाहीत. पहिल्या सत्रातील चाचणीत जास्तीत जास्त गुण मिळविणारेसुद्धा दुसर्‍या सत्रात मांडलेल्या कित्येक चमत्कारांच्या दाव्यावर विश्वास ठेवत होते. यावरून विद्यार्थी वैज्ञानिक चिकित्सा पद्धतीचा वापर करत नव्हते हे स्पष्ट होते. विद्यार्थ्याना विज्ञानाचे शिक्षण देत असताना कशा प्रकारे विचार करावा यापेक्षा कुठला विचार करावा यावर भर दिल्यामुळे ही स्थिती ओढवली असावी, असे वाटते. ( Students are taught what to think but not how to think.). या चाचणीने काही प्रश्नही उपस्थित केले.

शिक्षणाची पातळी वाढत असताना भ्रामक विज्ञान, चमत्कार वा अतींद्रिय शक्तीवरील विश्वासात फरक पडत जातो का? विज्ञान शाखेतील अभ्यास कला, वाणिज्य वा इतर मानव्य शाखेतील अभ्यासापेक्षा खरोखरच अंधश्रद्धेला तडा देवू शकते का? वैज्ञानिक खरोखरच चिकित्सक असल्यास विज्ञान शिक्षणाच्या वाटेवर असताना या प्रकारच्या अंधश्रद्धा गळून का पडत नाहीत? जास्त शिक्षित असल्यास अंधश्रद्धा कमी व कमी शिक्षित असल्यास अंधश्रद्धा जास्त असे विधान करता येईल का?

या सर्व गोष्टींचा चिकित्सकपणे विचार करू लागल्यास आजच्या शिक्षण पद्धतीतच काही मूलभूत बदल अपेक्षित आहेत. केवळ विज्ञान शिक्षणावर भरवसा न ठेवता चिकित्सकपणा रुजविण्यासाठी वेगळ्याच प्रकारच्या शिक्षणाची आवश्यकता असून त्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे.

जरी ही चाचणी सर्वसमावेशक नसली तरी या चाचणीतील निष्कर्ष विज्ञान शिक्षणाचा पुनर्विचार करण्यास भाग पाडते, हे मात्र नक्की.

संदर्भ: e-Skeptics News Bulletin

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

वृन्दा Tue, 17/02/2015 - 23:27

तरी मराठी संस्थळांवर वावरुन वावरुन, चिकीत्सकपणा थोडा तरी आलाय माझ्यात ;)

जोक्स अपार्ट,

चिकित्सकपणा रुजविण्यासाठी वेगळ्याच प्रकारच्या शिक्षणाची आवश्यकता असून त्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे.

+१

रेड बुल Wed, 18/02/2015 - 01:35

हा खेळ पुर्णपणे व्यक्तीगत पातळीवरील अनुभावाधारीत असतो, म्हणूनच ए.पी.जे. अब्दुल कलामही त्यांच्या अंधश्रध्दाना(?) हे आहे हे असे घडते बुवा म्हणत (स्वतःपुरते)त्याला चिटकुन असतात, अन पुणे मनपाच्या मेलेले उंदीर उचलणार्‍या विभागातील इसम देव घंटा अस्तित्वात नसतो , जोतीष्य थोतांड असते वगैरे वगैरे छातीठोक पणे नुसते सांगुच शकतो असे नाही तर सिध्दही करु शकतो. कारण श्रध्दा अंधश्रध्दाचा शिक्षणाशी काडीचा संबंध नाही... कारण त्या अशिक्षीत सुषीक्षीत फरक जाणत नाहीत...

ऋषिकेश Wed, 18/02/2015 - 10:15

लेख आवडला.

फक्त

तरी दैवी चमत्कार आणि अतींद्रिय शक्तीवरील विश्वास व भ्रामक विज्ञानावर आधारलेली मानसिकता वाढतच आहे, याबद्दल दुमत नसावे.

हे विधान मी केवळ एक अंदाज या अर्थी घेतले आहे. मला या विधानाबद्द्ल शंका आहे.

प्रकाश घाटपांडे Wed, 18/02/2015 - 14:37

विज्ञान वैज्ञानिक व वैज्ञानिक दृष्टीकोन हा विषय सर्वकालीन आहे.काही लोकांना श्रद्धेचा माज असतो तर काही लोकांना अश्रद्धेचाही माज असतो.
http://www.aisiakshare.com/node/2323?page=2#comment-38671

श्रद्धेच्या प्रांतातील विसंगतीवर बोट ठेवण्यासाठी उत्साही बुद्धीप्रामाण्यवादी चिकित्सक अनेक वैज्ञानिक पुरावे सादर करत असतात; प्रत्यक्ष प्रयोगांचे दाखले देत असतात; समीकरण मांडतात; सर्वेक्षणाच्या निष्कर्षांचे दाखले देतात; ग्राफ्स काढून मुद्दा पटवण्याचा प्रयत्न करतात. या त्यांच्या पुराव्यातून, दाखले - संदर्भातून भ्रामक विज्ञानाच्या आधारे चढवलेले श्रद्धेचे इमले कोसळू लागतील, असा एक (भाबडा) आशावाद या चिकित्सक कार्यकर्त्यांच्या मनात दडलेला असतो

अगदी अगदी. अंनिस त कार्यकर्त्यांच्या प्रारंभी च्या टप्प्यात भारतातील सर्व समस्यांचे मूळ अंधश्रद्धेत दडलेले आहे. एकदा का अंधश्रद्धेचे निर्मुलन झाले की मग काही प्रॉब्लेम नाही.
दाभोलकरांची सर्व पुस्तके वाचली, व्याखान ऐकले की अंधश्रद्धेच्या गर्तेत अडकलेले लोक बाहेर येतील. मनातील गैरसमजूतींची सर्व जळमट दूर होतील, शंका कुशंकांचे निरसन होईल व स्वच्छ वैज्ञानिक दृष्टीकोनाचे आकाश पहायला मिळून जगणे सुखी आनंदी होईल. अशी स्वप्न कार्यकर्त्यांना पडतात.

अजो१२३ Wed, 18/02/2015 - 15:16

वैज्ञानिक दृष्टिकोन नावाचा कोणता दृष्टिकोन नसतो. विज्ञानाला अयोग्य योग्य काय ते माहित नाही. इतकेच काय हे शब्दच माहित नाहीत. मानवी जीवन मात्र या शब्दांशिवाय पुढे जाऊ शकत नाही.

तिरशिंगराव Thu, 19/02/2015 - 17:42

घरातील वातावरणाचा प्रत्येक व्यक्तिवर परिणाम होत असतो. अगदी जनरलाईझ करता नाही आले तरी, सर्वसामान्यपणे आई-वडिल जर वैज्ञानिक दृष्टीकोनाचे असतील तर मुले बहुधा तशीच होतात. आमच्या घरांत, आम्हा तीन भावंडांपैकी फक्त मी विज्ञान शाखेकडे गेलो. एक आर्टिस्ट तर दुसरी आर्टस शाखेकडे. पण आम्हा तिन्ही भावंडांचा कुठल्याही कर्मकांडावर विश्वास नाही. आमच्या आई-वडिलांचाही नव्हता. त्याउलट, माझे मामा मोठे शास्त्रज्ञ, दोन्ही मुलें विज्ञानशाखेकडे गेलेली. तरी त्यांच्या घरांत सर्व काही यथासांग आणि पारंपारिक पद्धतीचे विधी होतात. मामांची नातवंडे तर आत्ताच्या काळातली. पण तीही याला अपवाद नाहीत. माझ्या मते कारण एकचः घरातील पूर्वापार वातावरण.
जातजाता: आणखीही एक कारण असू शकेल. ते सदाशिवपेठेत वाढले, आम्ही मुंबईत!

अजो१२३ Thu, 19/02/2015 - 17:50

In reply to by तिरशिंगराव

सर्वसामान्यपणे आई-वडिल जर वैज्ञानिक दृष्टीकोनाचे असतील तर मुले बहुधा तशीच होतात.

मग शिक्षणाचा, इ इ फायदा काय?

पण आम्हा तिन्ही भावंडांचा कुठल्याही कर्मकांडावर विश्वास नाही.

ऑफिसमधे अगदी वेळेवर (रोज, आयुष्यभर) जाणे कर्मकांड नाही का? तुम्ही जी कर्मकांडे करता त्यांना तुम्ही कर्मकांडे मानत नाही आणि कर्मकांडे करता पण म्हणून ती कर्मकांडे नाहीत असे होत नाही.

तिरशिंगराव Thu, 19/02/2015 - 17:59

In reply to by अजो१२३

वरील उदाहरणात शिक्षण गृहीत धरले आहे.
रोजच्या जीवनावश्यक कामांना आम्ही कर्मकांड का म्हणावे ? याठिकाणी, कर्मकांड हा शब्द देवाच्या बाबतीत अद्ध्याहृत धरलेला आहे.
ऑफेसात गेलो नाही तर पैसे मिळणार नाहीत, म्हणजे ते जगण्यासाठी आवश्यक आहे. देव देव करणे, निदान आम्हाला तरी जीवनावश्यक वाटत नाही.

अजो१२३ Thu, 19/02/2015 - 18:46

In reply to by तिरशिंगराव

मी ऑफिसात जाण्याबद्दल नाही बोलतंय. "एका विशिष्ट वेळीच" ऑफिसमधे जाण्याबद्दल बोलतोय. उदा. रोज दहा वाजताच का जावं? १०-१५ मिनिटे मागे पुढे का नाही?

प्रकाश घाटपांडे Thu, 19/02/2015 - 20:30

In reply to by अजो१२३

त्यांना निरर्थक किंवा कालबाह्य कर्मकांड असे म्हणायचे आहे. आपण समाजजीवनात काही रीतीभाती पाळतो ती तशी कर्मकांडच आहेत. समारंभात आपल्याला नावडत्या माणसाचे देखील हसून स्वागत करावे लागते. पुरोगाम्यांमधे दीपप्रज्वलानाने कार्यक्रमाची सुरवात हे कर्मकांडच की. कर्मकांडाचा भावार्थ लक्शात घ्या!

अजो१२३ Fri, 20/02/2015 - 11:06

In reply to by प्रकाश घाटपांडे

कर्मकांडाचा भावार्थ लक्शात घ्या!

मलाही तेच म्हणायचं आहे. आपण जी कर्मकांडे करतो ती कर्मकांडे नाहीत असे कर्मकांडविरोधकांत मानायचे कर्मकांड (प्रथा) आहे.

नितिन थत्ते Fri, 20/02/2015 - 08:58

In reply to by अजो१२३

तुमच्या कामात तुमचा इतरांशी (बाह्य पार्टीशी किंवा ऑफीसातील इतरांशी) संबंध येत नसेल तर १० वाजताच जाणे गरजेचे नाही. पण तुम्ही ऑफीसात असण्यावर ऑफीसातली इतर माणसांची कामे अवलंबून असतील तर वेळ पाळणे गरजेचे. बँकेची वेळ १० ते ३ आहे असे ग्राहकांना जाहीर केल्यावर कॅशिअरने १० वाजता हजर असणे गरजेचे आहे. पावणेदहाला यायला अर्थातच बंदी नसते. पण कॅशिअर १० शिवाय येत नाही कारण आपली जास्तीची १५ मिनिटे तो बँकेला देऊ इच्छित नाही.

इट इज नो वे कर्मकांड....

[ऑल्विन टॉफ्लरच्या म्हणण्यानुसार वक्तशीरपणा ही औद्योगिक संस्कृतीची गरज आहे. शेतकरी बैल घेऊन शेत नांगरायला जातो तेव्हा तो आठला गेला काय किंवा साडेआठला गेला काय ! (इतर कुणाचे) नुकसान होत नाही].

अजो१२३ Fri, 20/02/2015 - 11:10

In reply to by नितिन थत्ते

नोकरीवर जाणारा प्रत्येकजण कॅशियर नसतो. आणि कॅशियरसाठी लोक २० मिनिटे अगोदरपासून वाट पाहत असले तर १०.०० वाजता जाण्याचे कर्मकांड मोडले पाहिजे.
--------------
ज्या लोकांना दहा वाजता(च) जायची आणि सहा वाजता(च)परत यायची काहीही गरज नाही ते देखिल वेळ पाळण्याचे कर्मकांड (जे पूर्णत: अनावश्यक आहे, शिवाय सर्वांच्याच प्रचंड गैरसोयीचे आहे) हे पाळतात.
--------------------

शेतकरी बैल घेऊन शेत नांगरायला जातो तेव्हा तो आठला गेला काय किंवा साडेआठला गेला काय ! (इतर कुणाचे) नुकसान होत नाही].

घरातले प्रेत ओलांडून पेरणी करायला निघालेला शेतकरी पाहिला नाहीत वाटतं. असो.

नितिन थत्ते Sat, 21/02/2015 - 09:25

In reply to by अजो१२३

>>घरातले प्रेत ओलांडून पेरणी करायला निघालेला शेतकरी पाहिला नाहीत वाटतं. असो.

तिथे सुद्धा मार्जिन १-२ तासांचे असेल बहुधा .....

शिवाय घरात प्रेत असेल तर शेतकर्‍याबरोबर शेतात कामाला येणारी इतर माणसे सुद्धा बहुधा मयतासाठी शेतकर्‍याच्या घरीच आलेली असण्याची बरीच शक्यता. म्हणजे शेतकर्‍यासाठी शेतावर खोळंबून राहिले आहेत अशी शक्यता कमीच.

ॲमी Sat, 21/02/2015 - 07:55

लेख आवडला. त्या दहा प्रश्नांची उत्तरंदेखील लेखाच्या शेवटी किंवा प्रतिसादात दिली असती तर बरं झालं असतं.
घाटपांडेंनी लिंक दिलीय तो प्रतिसाद फार आवडला.

शशिकांत ओक Sat, 28/02/2015 - 19:07

अंधश्रद्धा विषयीच्या श्रेणींची व पहिल्या सत्रातील विज्ञानविषयक प्रश्नांच्या उत्तरांची तुलना केल्यावर यात कुठल्याही प्रकारचा संबंध नाही, हेच प्रकर्षाने जाणवले. विज्ञानासंबंधी अचूक ज्ञान असूनसुद्धा त्यातील बहुतेक अंधश्रद्धेपासून दूर राहू शकले नाहीत. पहिल्या सत्रातील चाचणीत जास्तीत जास्त गुण मिळविणारेसुद्धा दुसर्‍या सत्रात मांडलेल्या कित्येक चमत्कारांच्या दाव्यावर विश्वास ठेवत होते. यावरून विद्यार्थी वैज्ञानिक चिकित्सा पद्धतीचा वापर करत नव्हते हे स्पष्ट होते.

निष्कर्ष म्हणून सांगितलेले

ही चाचणी सर्वसमावेशक नसली तरी या चाचणीतील निष्कर्ष विज्ञान शिक्षणाचा पुनर्विचार करण्यास भाग पाडते, हे मात्र नक्की.

यावर (उच्च शिक्षित) ... वैज्ञानिक खरोखरच चिकित्सक असल्यास विज्ञान शिक्षणाच्या वाटेवर असताना या प्रकारच्या अंधश्रद्धा गळून का पडत नाहीत?

उत्तर - मानवी स्वभाव हे त्याचे महत्वाचे कारण असावे कदाचित...